मध्यंतरी एका हॉटेल च्या जिम मध्ये सायकल दिसली
आणी चालवायचा मोह आवरता आला नाही ..खूप ,मस्त वाटले
आणी मग आठवले ते .
.सायकल चे दिवस ..!
लहान असताना पहिल्यांदा वडिलांनी सायकल चालवायला सांगितले मला
मी म्हणाले तुम्ही शिकवा ..
मग त्यांच्याच जेन्ट्स सायकल वर जवळच्या मैदानावर रोज आमचा
शिकण्याचा सराव सुरु झाला
तशी मी वडिलांची खूप लाडकी ..साधे मला खरचटले तरी त्यांना वाईट वाटत असे
पण सायकल शिकताना मात्र मी सायकल मध्ये पाय घातला
आणी पॅडेल मारायला सुरुवात केली की ते सायकलधरलेला हात सोडून देत असत ..
आणी मी धाडकन पडले की त्यांना हसू येत असे
मग मी रागावले मी ते म्हणत ..
अग पडल्या शिवाय सायकल कशी येईल तुला ..?
आणी एक लक्षात ठेव सायकल आणी पोहणे एकदा शिकले की कधी विसरत नाही
मग मात्र सायकल हळुहळू सरावाने छान चालवता येऊ लागली ..पण विकत घ्यायची तेव्हा ऐपत नव्हती
त्यामुळे दुकानातून भाड्याने घेवून चालवायचे ..
त्या काळात कॉलेजमध्ये सुद्धा दोन किंवा तीन मुलींकडेच सायकल असे
त्यांचा आम्हाला खूप हेवा वाटत असे मग त्यांच्या कडून आम्ही चक्कर
मारण्यासाठी सायकल मागून घेत असू
त्या काळी वर्गातील एक श्रीमंत मुलगी “लुना घेवून येत असे
ती तर आम्हाला “झाशीची राणी वाटत असे ..!!
एकदा तर आम्ही जवळ जवळ दहा मैत्रिणी दुकाना तुन भाड्याने सायकली घेवून
कॉलेजच्या स्पोर्टसच्या परीक्षे साठी जायचे ठरवले होते ..
पण वाटेत इतक्या अडचणी आल्या की बस..
दोघींना सायकली भाड्याने मिळायला वेळ लागला
.त्यात दोघी नवशिक्या
होत्या त्या पडल्या ..
असे करत आम्ही ग्राऊंड वर पोचेपर्यंत परीक्षा संपली .
मग सरांकडून जे काही आम्हाला बोलून घ्यायला लागले .. की सांगता सोय नाही
त्यानंतर मग बँकेत नोकरी लागली त्यावेळी आमच्या बँकेच्या शाखा दिवसातून दोन वेळा असत
सकाळी आणी संध्याकाळी .
घरापासून बँक बरीच दूर असल्याने बसने जात असे पण
बसने जाणे पण नंतर वेळखावू होवू लागले
मग ठरवले छान लेडीज सायकल घ्यायची
त्यावेळी बँकेत पण सायकल घेण्या साठी कर्ज मिळत असे
पण मी आपले पगारातूनच सायकल घ्यायचे ठरवले ..
पाचशे रुपयाला सायकल होती तेव्हा
छान माझ्या आवडत्या लालचुटुक रंगाची सुंदर सायकल घेतली ..
त्या वेळी पंजाबी किंवा जीन्स घालणं ..अशी फॅशन नव्हती
आम्ही सर्व मैत्रिणी साडीच नेसत असू
साडी नेसून सायकल चालवणे हे सुद्धा एक “दिव्य "च असे
पण तेव्हा त्याचे काहीच वाटत नसे ..कारण स्वतःची सायकल असणे हा खूप मोठा आनंद असे
त्यावेळी बँक दोन वेळा असल्याने माझ्या सायकलवरून बँकेत चार फेऱ्या होत
बँक घरापासून जवळ जवळ पाच किलोमीटर होती
आणी पूर्ण रस्ता चढ आणी उतार यांचा होता ..
तेव्हा आमचे लग्न झाले नव्हते त्यामुळे
दुपारच्या वेळी घरी आले की जेवून परत मी आणी माझी मैत्रीण आपापल्या सायकली घेऊन बाहेर पडत असू
आणी डबल सीट बसून गावभर हिंडत असू
निरनिराळ्या मैत्रिणी कडे नातेवाईका कडे सायकल वरून डबल सीट जाण्यात
एक निराळीच “धम्माल ..असे ..
घरची पण कधी कधी म्हणत अग कीती फिरता ग सायकलवरून
दमाल ना ..
कारण खरेतर इतके सायकल वरून फिरणे ..खूपच श्रमाचे होते
पण आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे 😊दमणूक तर अजिबात वाटत नसे !
माझ्या त्या वेळच्या साहेबांना माझ्या सायकलिंग चे खूप कौतुक वाटे
ते मला म्हणत इतकी सायकल चालवता तुम्ही तर“लेडी जेम्स बॉंड..आहे !!!
त्यांच्या या पदवीचे मला फार हसू येत असे ..😀
जवळ जवळ सहा एक महीने हा माझा दिनक्रम चालू होता
नंतर मात्र बँकेची परीक्षा द्यावी असे मनात आले आणी मग सायकल वरून जाण्यात
उगाचच फार शक्ती खर्च होते आहे असे वाटू लागले ..
नुकतीच स्वयंचलित वाहनाची पण तेव्हा लाट येवू लागली होती
आणी मग जवळ पैसे पण असल्याने मी सायकल विकून “लुना घेतली
खूप वाईट वाटले होते ती माझी लाडकी लालचुटुक सायकल विकताना..
जणु एखाद्या ..जवळच्या मैत्रिणीला कायमचा निरोप दिला .. ..!