डिस्क्लेमर:
हे पुस्तक केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने लिहिले गेले आहे. येथे दिलेल्या आर्थिक संकल्पना, गुंतवणुकीचे मार्ग आणि अनुभव वैयक्तिक लेखकाच्या दृष्टिकोनातून मांडले गेले आहेत. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी वाचकांनी स्वतःचा अभ्यास करावा आणि आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लेखक किंवा प्रकाशक कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी जबाबदार राहणार नाहीत.
प्रकरण 1
रिच डॅड पुअर डॅड
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्यानुरुप
मला दोन वडील होते. एक श्रीमंत, तर एक गरीब. त्यापैकी एक खूप उच्चशिक्षित आणि बुध्दिमान होते. त्यांनी पीएच.डी. मिळवली होती. महाविद्यालयातील चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षांच्या आतच पूर्ण केला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. तिच्या साहाय्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड, शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण केलं. दुसऱ्या वडिलांनी आठवी इयत्ताही पूर्ण केली नव्हती.
दोघांनीही आयुष्यभर कष्ट केले. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वीही ठरले. फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले, तर एक हवाई राज्यातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. एकानं आपल्या पाठी कुटुंब, चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली, तर दुसऱ्यानं फक्त बिलं!
दोघांचीही व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती. दोघंही खंबीर स्वभावाचे होते. त्यांचा लोकांवर प्रभावही पडे. या दोन्ही डॅडनं मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या. मागितल्यावर सल्लेही दिले. दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं. दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता. फरक होता, तो अभ्यासक्रमामध्ये.
मला जर एकच वडील असते, तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा मी तो नाकारला असता. दोन वडील असल्यामुळे माझ्यासमोर दोन परस्परविरुद्ध दृष्टिकोन येत गेले : एक श्रीमंत माणसाचा आणि एक गरीब माणसाचा. कुठलाही एक सल्ला नुसता न स्वीकारता किंवा न नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो, योग्य वाटतो तो स्वीकारता येत होता.
अर्थात, त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखरीचे श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीबही नव्हते. दोघांच्याही कारकीर्दीला नुकतीच सुरुवात होत होती. दोघंही आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य मिळविण्यासाठी झगडत होते. पैशांबाबत मात्र त्यांची मतं अगदी दोन टोकांची होती. उदा. एकजण म्हणायचे, की पैशांचा लोभ हेच साऱ्या पापांचं मूळ आहे, तर दुसरे म्हणायचे, पैशांचा अभाव हेच साऱ्या पापांचं मूळ आहे.
हे असं असल्यामुळे मी बऱ्याचदा बुचकळ्यात पडायचो. एकतर हे दोन्ही वडील आपापल्या मतांवर ठाम होते. ते तितकेच अभ्यासूही होते. त्यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हे मलाच ठरवता यायचं नाही. सुरुवातीला दोघांचंही पटायचं. मीदेखील वयानं लहानच होतो आणि मला 'चांगला मुलगा' म्हणवून घ्यायचं होतं. दोन विरुद्ध मतांमुळे, त्यातही पैशांबाबतच्या तीव्र मतांमुळे ते शक्य होत नव्हतं आणि खरं सांगायचं, तर या परिस्थितीमुळेच मीदेखील विचार करू लागलो. दोघांची मतं, त्यांचे सल्ले ऐकून त्यावर चिंतन करण्याची सवय मला लागली. काय आणि का, हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो.
मी खूप विचार करू लागलो होतो. माझ्या मोकळ्या वेळातला बहुतेक वेळ 'ते असं का म्हणत असावेत,' याचा विचार करण्यातच जायचा. या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला, की मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो. खरंतर यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे किंवा काय कळतंय त्यांना, असं म्हणून झटकून टाकणंही सोपं होतं; पण मला अतिशय प्रिय असणारे हे दोन वडील असल्यामुळं विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग पडलं. निवड करणं, मत स्वीकारणं किंवा नाकारणं ही मोकळीक मला भावी आयुष्यात खूपच उपयुक्त ठरली.
श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात आणि मध्यमवर्गीय देण्यांशी कायमच झगडत राहातात. याचं कारण आहे आर्थिक शिक्षणात. आपल्याकडे शाळा-कॉलेजांमध्ये हा महत्त्वाचा विषयच शिकवला जात नाही. तो शिकवला जातो घरात. बहुतेक सारेजण हा अतिशय महत्त्वाचा विषय आपापल्या पालकांकडूनच शिकतात, गरीब पालक आपल्या मुलाला पैशांबद्दल काय सांगतात? ते फक्त सांगतात, 'शाळेत जा. भरपूर शीक' मग ते मूलही त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत जातं. भरपूर अभ्यास करतं, चांगले गुण मिळवतं आणि आयुष्यात पुढे जात राहातं, ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टीकोन आणि मनोभूमिका घेऊनच. ती काही बदलत नाही. ते लहानपणीच ती शिकलेले असतात.
पैशाबद्दल शाळेत शिकवलं जात नाही. शाळा-कॉलेजामध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यावरच भर असतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय-आर्थिक कौशल्य-हा गृहीतच धरलेला नाही. अगदी उत्तम बँकर्स किंवा डॉक्टर्स शाळेत उत्तम गुण मिळवत असले, तरी बाहेरच्या जगात काय? तिथं ते उत्तम आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी आयुष्यभर झगडतच राहातात. आपल्या राष्ट्रावर वाढत जाणाऱ्या कर्जामागे हेच तर कारण आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे नेते आणि अधिकारी शैक्षणिक दृष्ट्या कितीही उच्चशिक्षित असले, तरी अर्थविषयक बाबींचं त्यांचं ज्ञान तोकडं असतं.
आज लक्षावधी लोक आर्थिक आणि वैद्यकीय गरजांसाठी सरकार किंवा त्यांच्या कुटुंबावर अवलंबून आहेत. त्यासाठी मेडिकेअर किंवा सामाजिक सुरक्षिततेसारख्या सरकारी योजनाही आहेत; पण पुढील काळात जेव्हा लक्षावधी लोकांना या आधाराची गरज भासेल, तेव्हा काय होईल, याची मला नेहमीच काळजी वाटते. काळ जसजसा पुढे जात राहील, तसतशी लोकसंख्या वाढेल आणि आर्थिक प्रशिक्षण नसल्यामुळे निम्नस्तरीय लोकांची संख्याही मोठी असेल. हे सारे याच योजनांवर अवलंबून राहू लागले, तर त्या कोसळून पडतील आणि त्यावेळी आपण काय करणार आहोत? आपलं भविष्य आताच्या पिढीवर अवलंबून आहे आणि त्यांचं अर्थविषयक शिक्षण त्यांचे पालकच करत असतील, जे बहुसंख्येनं गरीबच आहेत, तर पुढे काय होईल, हे सांगायला कोणी मोठा भविष्यवेत्ता असायची गरज नाही.
नशिबानं दोन प्रभावी वडील मिळाल्यामुळे मला दोघांकडूनही शिकता आलं. हे शिकता शिकता एखाद्या विचाराचा, मान्यतेचा जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो, हे जाणून घेता आलं. त्या विचारांमागचा कार्यकारणभाव समजावून घेता आला. उदाहरणच सांगायचं, तर माझे एक वडील म्हणायचे, 'हे विकत घेण्याची माझी काही ऐपत नाही.' दुसऱ्या वडिलांची मात्र अशा वाक्यांना बंदी होती. 'ही वस्तू मला हवी आहे. ती मला विकत घ्यायची आहे,' असं ठरवून मग त्यादृष्टीनं विचार करावा, पावले उचलावीत, असा त्यांचा आग्रह असे. या दोन वाक्यांमध्ये एक विधान आहे, तर एकात प्रश्न दडलेला आहे. पहिलं उत्तर असेल, तर मुद्दा तिथंच संपतो. उलट दुसरं उत्तर तुम्हाला विचारप्रवृत्त करतं. लवकरच श्रीमंत होऊ घातलेले माझे वडील म्हणायचे, 'हे विकत घेण्याची माझी ऐपत नाही,' याचा खरा अर्थ आहे, 'माझा मेंदू काम करत नाही.' तुम्ही जेव्हा 'ही वस्तू मला विकत घ्यायची आहे,' असं ठरवता, तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेनं काम करायला लागतो. याचा अर्थ असाही नाही, की तुम्हाला जे काही वाटतं, ते तुम्ही विकत घ्यावं. याचा अर्थ एवढाच आहे, की जगातला सर्वांत शक्तीशाली संगणक, तुमचा मेंदू, तो उपयोगात आणा. त्याला त्या दिशेनं विचार करायला प्रवृत्त करा. माझा मेंदू दिवसागणिक सामर्थ्यवान होत चालला आहे; कारण मी त्याचा तसा उपयोग करतो. तो जेवढा सामर्थ्यवान होईल, तेवढे जास्त पैसे मी कमावीन. 'ही गोष्ट विकत घेण्याची माझी ऐपत नाही,' हे वाक्य तुमचा मेंदू आळशी असल्याचं लक्षण आहे, असं त्यांचं ठाम मत होतं.
माझे हे दोन्ही वडील प्रचंड कष्ट करत. त्यांच्यात एक मोठा फरक होता, तो म्हणजे पैशांची गोष्ट आली, की एक वडील आपल्या मेंदूला डुलकी घेऊ देत, तर दुसरे त्याला अंग झाडून कामाला लावत. त्याच्याच परिणामस्वरूप एक डॅड गरीब राहिले आणि एक श्रीमंत झाले. एक माणूस नियमितपणे व्यायाम करतो आणि दुसरा सोफ्यावर लोळत टीव्ही पाहातो, तसाच हाही प्रकार. योग्य व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहातं, तसंच मेंदूला व्यायाम दिल्यामुळे संपत्ती चांगली राहाते. वाढते. आळस केला की आरोग्य आणि संपत्ती या दोन्हीचा र्हासच होतो.
माझ्या या दोन्ही डॅडचे विचार परस्परविरोधी होते. एक डॅड म्हणायचे, की श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादायला हवा. त्यातून मिळणारा पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरता येईल. दुसरे डॅड अगदी विरोधी विचारांचे. ते म्हणायचे, की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर कर लादणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्यांना शिक्षा देणंच आहे. हे अतिशय चुकीचंच आहे. हे म्हणजे जो निर्माण करतो त्याला शिक्षा आणि जो काहीच करत नाही, त्याला बक्षीस !
एक डॅड म्हणायचे, 'खूप अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल.' दुसरे डॅड म्हणायचे, 'खूप अभ्यास करा, म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे मालक व्हाल.'
एक डॅड म्हणायचे, 'मी श्रीमंत नाही; कारण मला मुलं आहेत', तर दुसरे म्हणायचे, 'मी श्रीमंत व्हायलाच हवं. कारण मला मुलं आहेत.'
जेवायला बसल्यानंतर एकजण आर्थिक आणि व्यावसायिक चर्चेला प्रोत्साहन देत, तर दुसत्यांना ही गोष्ट अजिबात मंजूर नव्हती.
एक म्हणायचे, 'पैसा सुरक्षित ठेवा. व्यवहार सुरक्षितच असावेत', तर दुसरे म्हणत, 'जोखीम घ्यायला शिका.'आपलं घर म्हणजे सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. ती सर्वोत्तम मालमत्ता आहे, असा एकाचा भक्कम विश्वास होता. दुसऱ्याला वाटायचं, की घर म्हणजे डोक्यावरचं मोठं कर्ज आणि तुमची तीच सर्वांत मोठी गुंतवणूक असेल, तर त्यातून फक्त मनःस्तापच मिळेल.
दोन्ही डॅड आपापली बिलं नियमितपणे भरत. फक्त एकजण आल्यादिवशी भरायचे, तर दुसरे शेवटच्या दिवशी.
कंपनी किंवा सरकार यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घ्यावी, असं एका डॅडला वाटे. पगारवाढ, निवृत्तीनंतरचे फायदे, वैद्यकीय सेवा, आजारपणाची रजा, सुटी आणि इतर फायद्यांबाबत ते कायम विचार करत. त्यांचे दोन काका सैन्यात होते. वीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर भरपूर फायदे मिळत होते. त्याचं त्यांना कायम कौतुक वाटायचं. विद्यापीठात असलेली मुदतठेव योजना त्यांना आवडायची. नोकरीची सुरक्षितता आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्यांना नोकरीपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटत. 'मी जर ही सरकारी नोकरी मनापासून केली आहे. खूप कष्ट घेतले आहेत, तर नोकरीत आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या गोष्टींवर माझा हक्कच आहे,' असं त्यांचं ठाम मत होतं.
याउलट दुसऱ्या डॅडचा स्वसामर्थ्यावर विश्वास होता. माणसानं स्वावलंबीच असावं, असं त्यांना वाटायचं. ही 'हक्का'ची मानसिकता त्यांना बोचायची. असा विचार करत करतच लोक कमजोर आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात, असं त्यांना वाटे. माणसानं आर्थिकदृष्ट्या सक्षमच असलं पाहिजे, असं ठाम प्रतिपादन ते करायचे.
एक डॅड त्यांच्या उत्पन्नातून थोडे तरी डॉलर्स बाजूला टाकण्यासाठी धडपडायचे, तर दुसरे त्याच पैशांची गुंतवणूक करायचे.
चांगली नोकरी मिळविण्यासाठी उत्तम सीव्ही कसा लिहावा, हे मला एका डॅडनं शिकवलं, तर दुसऱ्यानं उत्तम व्यावयिासक आणि आर्थिक प्लॅन कसा करावा, हे शिकवलं.
या दोन टोकांच्या मतांच्या गदारोळामुळे माझा अजिबात तोटा झाला नाही. उलट फायदाच झाला. मी विचार करायला शिकलो. एखाद्याच्या विचारांचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे पाहाण्याची संधी मला मिळाली. माझ्या हेही लक्षात आलं, की फक्त आणि फक्त विचारांमुळेच आपल्या आयुष्याला आकार येत असतो.
माझे गरीब डॅड नेहमी म्हणायचे, की मी कधीच श्रीमंत होणार नाही आणि हे त्यांचंच भाकीत सत्यात उतरलं. दुसऱ्या बाजूला माझे श्रीमंत डॅड हे मी श्रीमंत आहे, असंच म्हणायचे. 'मी श्रीमंत आहे आणि श्रीमंत माणसं हे असं वागत नसतात,' असं ते नेहमी म्हणायचे. एकदा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ते पार कोलमडून पडायची वेळ आली होती; पण तेव्हाही ते 'मी श्रीमंत आहे,' असंच म्हणत. आर्थिक फटका बसणं आणि गरीब असणं यात मोठा फरक आहे. आर्थिक फटका तात्पुरता असतो, तर गरिबी कायमची असते, असं ते सांगत.
गरीब डॅड म्हणत, माझ्या दृष्टीनं पैशाला फारसं महत्त्व नाही, तर श्रीमंत डॅड म्हणत, पैसा ही शक्ती आहे.
आपले विचार खूप महत्त्वाचे असतात. आपल्या जीवनाचा मार्ग तेच ठरवत असतात. असं असलं, तरी विचारांची शक्ती काही मापता येत नाही. ती अनुभवता येते. मला माझे विचार मांडता येत होते. मुळात मी विचार करू लागलो होतो. त्यातून मला जाणवत होतं, की माझे गरीब डॅड हे पैसे कमी मिळत असल्यामुळे गरीब नव्हते. त्याचे विचार आणि तशा कृतीमुळे ते गरीब राहिले होते. सततच्या विचारांमुळे मला या दोन्ही डॅडच्या विचारांतील तफावत लक्षात येत होती. त्यांची दोन टोकांची मतं आणि त्यामुळे होणारे परिणाम मी जवळून अनुभवत होतो. आता माझ्यापुढे प्रश्न होता, की मी कोणाचा सल्ला मानावा? श्रीमंत डॅडचा की गरीब डॅडचा?
दोघांनाही शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींविषयी प्रचंड आदर होता. मी भरपूर शिकावं, याबाबत त्यांचं दुमत नव्हतं. मतभेद होता, तो काय शिकावं याबाबत. एकाला वाटायचं, की मी खूप अभ्यास करावा. पदवी मिळवावी आणि पैसे कमावण्यासाठी चांगली नोकरी करावी. मी वकील किंवा अकाउंटंट व्हावं किंवा एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये एमबीएला प्रवेश मिळवावा, असं वाटायचं. दुसऱ्यानं मला श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलं. पैसा म्हणजे नक्की काय आहे, पैसा कशा प्रकारे काम करतो, आपल्यासाठी तो काय करू शकेल, याचा अभ्यास करायला हवा, असं ते सांगायचे. 'मी पैसे मिळवण्यासाठी काम करत नाही, तर पैसे माझ्यासाठी काम करतात,' असं ते नेहमी सांगायचे.
त्यावेळी मी नऊ वर्षांचा होतो. हे सारं अनुभवत होतो. विचार करत होतो आणि त्या विचारांतून मी श्रीमंत डॅडचं ऐकावं. त्यांच्याकडून पैशांविषयीचं ज्ञान मिळवावं, असा निर्णय घेतला. माझ्या गरीब डेंडकडे उत्तम पदव्या होत्या, तरीही याबाबत त्यांचं न ऐकण्याचं मी ठरवलं.
थोडं शहाणपण रॉबर्ड फ्रॉस्ट्रकडून...
रॉबर्ड फ्रॉस्ट हे माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. त्यातली 'द रोड नॉट टेकन' ही कविता माझी सर्वांत आवडती. मी ती जवळजवळ रोज वाचतो. त्यात एक सुंदर विचार आहे, तो मला आवडतो.
वाट अशी जी मी न घेतली
चालत असता दिशा दूरची
अडखळलो थोडा एकदिशी
समोर होत्या वाटा दोन
एक डावी अन् एक उजवी
थांबून थोडा पाहुनी गेलो
वाट एक मग सुंदरशी
पर्णराजी आच्छादित अन्
लोक चालले त्यावरूनी
दुसरी वाट तशीच परंतु
गवताळ अन् उजाडशी
वहिवाटही नसे तिथे अन्
भासे गूढ वलयाची...
होते माहीत मजला हेही
पहिली वाट सोयीची
दुसरी वाट पाहे वाट
अखंडित पण पथिकांची
अभिमानेही आज सांगतो
तीच वाट मम भाग्याची
धाडस करूनी परिश्रमांते
वाकविले मी दैवाही !
मी गेली अनेक वर्ष या कवितेचं मनन करतो. माझ्या उच्चशिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशांविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता. तरीदेखील याच निर्णयामुळे माझ्या आयुष्याला आकार आला, हेही तितकंच खरं.
कोणाचा सल्ला ऐकायचा, हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं. माझ्या श्रीमंत डॅडनं सतत तीस वर्षं, मला माझ्या ३९व्या वर्षापर्यंत शिकवलं. ज्यावेळी त्यांना वाटलं, की आता माझ्या डोक्यात त्यांचं शिकवणं शिरलं आहे, मला सर्व समजलं आहे. जे शिकलो त्याचं आकलन झालं आहे, त्याचवेळी ते थांबले.
पैसा हे शक्तीचं एक रूप आहे; पण त्याहीपेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण. पैसा येतो आणि जातो. तो पैसा कसं काम करतो किंवा त्याकडून काम कसं करून घ्यायचं, याचं शिक्षण मिळालं असेल, तरच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. संपत्ती मिळवू शकता. फक्त विधायक विचारसरणी उपयोगाची नाही. तेवढंच असूनही अनेकांना काहीच करता येत नाही; कारण त्यांना पैसा कसा कार्य करतो, याचंच शिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळेच ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत राहातात.
मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझं वय होतं नऊ वर्ष. त्यामुळे श्रीमंत डॅडनं दिलेले धडे खूपच साधे होते. फक्त सहा धडे होते ते. तेच धडे मी तीस वर्ष गिरवत होतो. हे पुस्तक त्याच सहा धड्यांवर आहे. माझ्या श्रीमंत डॅडनं मला जे जे सांगितलं, ते ते मी या पुस्तकातून तुमच्यासमोर ठेवतो आहे. हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत. हे आहेत चौकातले दिशादर्शक खांब. बदलत्या दलत्या आणि अनिश्चित वातावरण असलेल्या वेळी हे खांव तुम्हाला योग्य ती दिशा देतील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील.