सामाजिक वणवे निर्माण करु नये *सामाजिक वणवे विनाकारण निर्माण करु नये की ज्यातून आपलेच नाही तर इतर समाजाचे नुकसान होईल. ज्यातून देशाचेही नुकसान होईल फायदा हा कोणालाच होणार नाही.* जात....... जातीप्रथा अजुनही गेलेली नाहीच आणि जाणारही नाहीत. त्यातच जातीवरुन पुर्वी जसा अपमान व्हायचा. तोच अपमान आजही होतो. परंतु सद्यस्थितीत महार जातीला अति भव्यदिव्य स्वरुपात महत्व आलेलं आहे आज लोकं सहजासहजी महार जात सांगणाऱ्या लोकांच्या नादाला लागत नाहीत. त्याचं कारण आहे, त्यांच्यातील एकता आणि त्यांच्यातील कायद्याची जाण. व्यतिरीक्त त्यांची लढण्याची प्रवृत्ती. ती प्रवृत्ती, ती एकता आणि ती कायद्याची जाण इतर समाजात दिसत नाही. जरी त्यांच्या जातीचा समावेश शुद्र जातीत होय असला तरी. एवढंच नाही तर लोकं आरक्षणाअंतर्गत असलेल्या सोयीसवलतीचा लाभ घेवू इच्छितात नव्हे तर घेतात. परंतु आपली जात लपवतात. परंतु काही महाभाग असेही आहेत की जे स्वाभीमानानं जात सांगतात. ते लपवीत नाहीत. असाच एक प्रसंग. 'मी चांभार आहे.' त्याचं स्वाभीमानी बोलणं. तसा पुढील व्यक्ती म्हणाला, "आपले कुठले आहात?" "महाराष्ट्रातील आहो." "महाराष्ट्रातील म्हणजे?" "महाराष्ट्रातील म्हणजे, मी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे." "असं कसं होवू शकेल! अहो, महाराष्ट्रात फक्त एकच जात होती, ती म्हणजे महार. इतर जाती नव्हत्याच. मला कायद्याचा अभ्यास आहे." तो व्यक्ती बोलत होता व कायद्याचा अभ्यास आहे असं सांगून अज्ञानता प्रगट करीत होता. त्याला कदाचीत माहीत नव्हते की चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेस याच महाराष्ट्रातील महाडला राहणाऱ्या भैय्यासाहेब व नाशिकला राहणाऱ्या शिवतरकर गुरुजींनी मदत केली होती आंदोलनात. जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी होते. त्याचं म्हणणं होतं की एक महार जात सोडली तर चांभार, मेहतर व इतर जाती या महाराष्ट्राबाहेरील आहे. असा त्याचा जावईशोध संबंधीत व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडणारा होता. त्यानंतर तो पुढं म्हणाला, "मला सांगा, तुम्ही बौद्ध आहात की हिंदू?" "मी बौद्ध." "असं कसं होवू शकेल?" "का होणार नाही?" "अहो बरेचसे चांभार हे हिंदूच आहेत. मग तुम्ही कसे काय बौद्ध? अन् तुम्ही चर्मकार म्हणत जा. चांभार नको." त्या व्यक्तीचे निरर्थक प्रश्न. त्यावर उत्तर देत त्या व्यक्तीचा स्वाभीमान कुठंतरी ठेचला जात होता. परंतु वाद जर वाढवला तर वाद विकोपाला जाईल. याचा विचार करुन उत्तर देणारा व्यक्ती गप्प होता. समाजात अशीच उपद्व्यापी माणसं असतात. ज्यांना काहीच करायचं नसतं जात आणि धर्माचं. तरीही जातीवरुन व धर्मावरुन ते वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्यानंतर ते गोत्यात येतात. वरील व्यक्तीस अमूक व्यक्ती हा चांभार आहे की तो चांभार नाही हे विचारुन जातवाद तयार करायची काय आवश्यकता होती? वरील व्यक्तीला ती जात बौद्धात येत नाही, हिंदूत येते हे म्हणून धर्मवाद निर्माण करायची काय आवश्यकता होती? तसेच वरील व्यक्तीला चांभार हे महाराष्ट्रातील नाही, ते बाहेरुन आले असेही विचारायची काय आवश्यकता होती? तरीही काही लोकं निरर्थकपणे असे प्रश्न विचारून जातवाद, धर्मवाद व प्रदेशवाद तयार करीत असतात. काही लोकं तर असेही दिसतात की त्यांना त्या विषयाचं काही घेणंदेणं नसतं. ना नफातोटा असतो. तरीही ते विनाकारण असे उपद्रवी प्रश्न विचारत असतात. जसे आर्य विदेशी आहेत, ते विदेशातून आले म्हणणे, इंग्रजांनी कोहिनूर नेला म्हणणे, शिवाजी महाराज हे हिंदूचेच होते असे म्हणणे, इत्यादी गोष्टी या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. तशा प्रकारच्या गोष्टी केल्यानं समाजात तेढ निर्माण होते. जी तेढ सामाजिक एकतेला त्रासदायक ठरते. ज्या गोष्टी करुन काहीच समाज तुटत असतो. समाजात पुर्वीपासून असेच वातावरण होते. एससी एसटीला असेच बोलणे बोलून समाजातील काही लोकांनी उच्च जातीपासून तोडले. त्यांचेवर अनन्वीत अत्याचार झालेत. त्यांना समाजापासून दूर ठेवले. उच्च जात व कनिष्ठ जात यात भेदभाव निर्माण केला. केवळ समाजात भेदभावच निर्माण केला नाही तर त्याच भेदभावावरुन त्यांचे त्या काळात अनन्वीत हालहाल केले. आजही ती परिस्थिती सुधारली नाही. आज कायद्याचं राज्य असल्यानं थोडीशी परिस्थिती व वास्तविकता दबून आहे. परंतु पुर्ण परिस्थिती व वास्तविकता दबून नाही. ही परिस्थिती व वास्तविकता कधीकधी डोकं वर काढते व त्यानंतर वरीलप्रमाणे लोकं बोलत असतात व समाजात तेढ निर्माण करीत असतात. विशेष सांगायचं झाल्यास माणसानं समाजात अशा प्रकारच्या गोष्टी करुन का समाजात तेढ निर्माण करावी? माणसानं माणसाप्रमाणे राहतांना इतर लोकांशी पशुगत व्यवहार का करावा? पशूही कधी तसा व्यवहार करीत नाहीत. ते आपल्या कळपातील इतर प्राण्यांना वेळप्रसंगी मदतच करतात. जेव्हा एखाद्या प्राण्यांवर एखादा सिंह हमला करतो. तेव्हा रानातील रानरेडे त्या सिंहाचीही वाट लावून टाकतात. इथं तर आपण माणसं आहोत. मग माणसानं समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी एकतेनं का राहू नये? का माणूसकीसारखे वर्तन करु नये? असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं कालही नव्हती आणि आजही नाहीत. आजही समाजात अशाच वर्गामुळे समाज नासतो. समाजाला त्यातून वेगवेगळ्या अत्याचाराचा सामना करावा लागतो आणि अशाच कुमाणसिकतेनं समाजातील लायक व्यक्तीचे हक्कं डावलले जातात. मग निर्माण होतो संघर्ष. त्या संघर्षातून वणवे तयार होतात. जे वणवे संपुर्ण असे बोलाची कढी असणाऱ्या व्यवस्थेला नष्ट करीत असतात. जे डॉ. बाबासाहेब, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेमहाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या रुपानं झालं हे तेवढंच खरं. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०