रोजचा टमटम चा प्रवास एक वेळ तरी असतोच ..
संध्याकाळी त्या छोट्या गावात बसचा भरोसा नसतो
टमटम खचाखच भरलेली ..
त्यातल्या त्यात बँक मॅनेजर बाईना
टमटमवाल्याने मधल्या भागात एक जागा “बहाल” केलेली असते .
बसमध्ये मोबाईल वर यु ट्यूब ,फेस बुक पाहता येते
पण टमटममध्ये केवळ अशक्य असते
फक्त आजूबाजूला कानावर जे पडते ते ऐकत रहाणे
कोण लोक एकमेकाशी बोलत आहेत हे पण कित्येकवेळ समजत नसते
कारण आपली त्यांच्या कडे पाठ असते
इथे शहरातली शुद्ध बोलणारी माणसे नाहीत ,,
असाच एक संवाद ..
अग अनशे किती दिसांनी भेटलीस
तु बी कवा नदरेला पडली नाहीस मंग्ये
काय सांगायचं अग ह्येच की परपंचा ची लगबग चालु हाय
पण तु गावाकड कशी काय अल्तीस ?
म्हायरची लई दिसांनी याद आली की काय ?
मंग्ये म्हायेरचा कवा बाईला इसर पडतो व्हय ?
पन आपल्याला बी आपल अविक्ष असतया की ?
त्ये बी खरच हाय म्हना,,
तुजी भावजय गेली म्हून ऐकल ,,
व्हय मंग्ये तिच्याच दिसा साटी आल्तो
काय झाल म्हनायचं अचानक ?..
मी बी मागला म्हय्ना लेकाकडे हुती कोल्हापूरला मला मागुन समजल
अग आजारी हुती थोडी
खुब्याच आप्रेशन केल हुत तिच्या सांगली च्या हास्पिटलात
म्हैनाभर दवाखाना लागला हुता तिच्या माग ,,
आप्रेशन बी मोट हुत ..
मग काय तिथच ग्येली की काय त्यी ?
न्हाय ग इतक्या मोट्या अप्रेश्नातून वाचली हुती की त्यी
सुकरूप घरला बी आली होती
मग कशाने गेली ग त्यी आनशे ?
काय सांगू तुला आता बये ..घरच्या काण्या हायती ह्या
पन..तु काय परकी हायीस
हस्पिटलात न्येली तवा डागदर म्हण्ल्ये बरी व्हायील पण चालणार हाय की न्हाय
ह्ये न्हाय सांगता येत ..
खाटावर पडून बी राह्येल ..
तरी बी विच्छा घट्ट तिची म्हणून बरी बी झाली
मग का म्हून झाल अस त्यीच?
अग घरी ग्येली आन दुसर्या दिशी उटून बगती तर काय
दोन ल्येकरांनी घराचे दोन जाप्ते करून वाटण्या करून घीतल्या हुत्या
शेता बिताच्या बी समद्या वाटण्या करून घीणार म्हनली तीची प्वार
आईला बी म्हैना म्हैना वाटून सांबालनार हुती म्हन..
त्ये ऐकून न बगून हिच्या पायातलं बळ ग्येल समद ..
म्हैना भर हास्पिटल ला ग्येल तवर हिथ यवड रामायण घडल म्हणताना
तिची वासनाच गेली बग जगायची
चार दिवसात ख्येळ खल्लास
पार हुत्याच नव्हत झाल बग ..
मागे हुंदके ऐकू येत होते
वळून पहायचा पण धीर नाही झाला मला
मग पुढच्या थांब्यावर दोघी उतरल्या
आणि आम्ही पुढच्या मार्गाला लागलो .
प्रवास दुसरी..
नेहेमी प्रमाणे टमटम खचाखच भरलेली
मधल्या जागेत मी दाटी वाटी ने बसले होते
एका थांब्या वर शेजारची व्यक्ती उठून उतरली
आणि पुढचा माणूस चढला
हातात एक पिशवी दुसर्या हातात मोबाईल
त्या गर्दीत पिशवी त्याने माझ्या पायात ठेवली
ताई जरा ध्यान द्या पिशवी कडे ..तो बोलला
मग मला वाटल असेल काही फार महत्वाच ..
म्हणून मी पण माझ्या पायात जागा केली पिशवीला
दोन मिनिटात लक्षात आले
स्वारी भरपुर प्यायली आहे
बसायला पण नीट येत नव्हते
टमटमभर वास सुटला हित
पण आता सहन करण्या वाचून पर्याय नव्हताच
जीव मुठीत धरून बसून राहिले
तो पर्यंत त्याला एक फोन आला ..
पक्या बोल र रांडीच्या
तोंडाच्या वासा सोबत आता शिव्या पण चालु होत्या
व्हय ..व्हय र भाड्या समद घेतलाया
दोन बाटल्या हायती यकदम ठर्रा .
चकना बी हाय
तुला हवा त्योच रे मुडद्या..
तळलेले काजू खातोय येड्झावा...
आता अगदी ऐकवेना इतक्या घाण घाण शिव्या
आतली सगळी माणसे ऐकत होती की नाही कोण जाणे
जो तो एकमेकात दंग होता
त्यात टमटमचा भन्नाट आवाज “
आणि आत लावलेली मोठ्या आवाजातली नव्वद च्या दशकातील
अर्थ हीन भसाडी ..गाणी
त्यामुळे हा फोन फक्त शेजारी बसलेल्या मलाच ऐकू येत होता
कधी ठिकाण येते असे झाले होते
अजून फोन चालूच होता ..
तुला काय इस्वास नाय का वाटत माझा
व्हय रक्ती मुंडी बी अन्लीया म्या भाजायला
रक्ती मुंडी शब्द ऐकताच अंगावर काटा आला
नॉन व्हेजची कधी सवयच नसल्याने कसे तरीच वाटत होते
आता फोन वर हमरी तुमरी सुरु झाली
तुला इस्वास वाटत न्हाय न...
ह्ये बग ह्या पिशवीत हाय दारूची बाटली आणि रक्ती मुंडी
म्याडम पिशवी द्या ती तुमच्या पायातली
ओह नो ..
म्हणजे आता पर्यंत एखादी महत्वाची वस्तु असावी म्हणुन
जी पिशवी मी पायात धरली होती
त्यात दारूच्या बाटली आणि रक्ती मुंडी होती तर ...
धरणी पोटात घेईल तर बरे असे झाले मला
पण सुदैवाने लगेचच्या थांब्या वर तो उतरून गेला ..पिशवी घेऊन ...