Mhanichya Katha in Marathi Classic Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | भीक नको पण कुत्रं आवर

Featured Books
Categories
Share

भीक नको पण कुत्रं आवर

अक्षरशः(शब्दशः) अर्थ:- एकदा एक भिकारी एका घरी भीक मागायला जातो तेव्हा घरमालक भीक आणेस्तोअर त्याच्या कडचे कुत्रे त्या भिकार्याला भुंकून भुंकून एवढं हैराण करते की भिकारी बाहेरूनच ओरडतो भिक नको बाबा आधी कुत्रं आवर.

गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ):- एखादी व्यक्ती उपकार करत असेल किंवा मदत करत असेल आणि त्याबरोबरच जर ती मदत मिळण्याऐवजी त्यातून काही समस्या निर्माण होऊन डोकेदुखी वाढत असेल तर मेहेरबानी नको पण डोकेदुखी थांबव म्हणजेच भीक नको पण कुत्रं आवर असं म्हणण्याची वेळ येते.

आता वाचा त्यावर आधारित कथा:-

सुरेश नोकरीनिमित्त शहरात त्याच्या मित्राकडे राहायला येतो. सुरेशची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला सध्याच वेगळी रूम करून राहणं परवडणारं नसते. त्यामुळे तो त्याचा बालपणीचा मित्र रमेश कडे काही महिने राहायला येतो.

सुरेश ला नोकरी मिळते. परंतु त्याची नोकरी रात्र पाळीची असते त्यामुळे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत तो नोकरीच्या ठिकाणी असतो आणि सकाळी सकाळी तो घरी येतो. पहिला पगार आल्या आल्या मित्राला आपल्या राहण्या खाण्याचे पैसे देऊ आणि जमलं तर वेगळी रूम करून राहू असं तो मनोमन ठरवतो.

इकडे रमेश आणि रमेशची बायको टिफिन सर्व्हिस चालवत असतात त्यामुळे त्यांना डबे ने आण करण्यासाठी माणसांची गरज असतेच. रमेश ला सुरेश राहायला आल्यावर बरंच वाटते.

सुरेश ड्युटी वरून सकाळी घरी आला की रमेश सुरेश आता नाईट शिफ्ट करून आलेला आहे तेव्हा त्याला आता झोपेची गरज असेल ह्याचा काहीच विचार न करता त्याला लगेच म्हणतो,

"सुरेश हे दळण घेऊन ये बरं! मी आणलं असतं पण मला डबे पोचवायला जायचंय. आणि हो दळण तिथे ठेवू नको बरं. दळण होईपर्यंत तिथेच थांब आणि लगोलग दळण घेऊनच ये."

सुरेश ला त्याला नाही म्हणवत नाही त्याला वाटते आज रमेश मुळेच आपण शहरात राहून नोकरी करू शकत आहोत. त्यामुळे तो निमूटपणे दळण आणायला जातो.
दळणाला खूप रांग असते सुरेशला बराच वेळ थांबावं लागते. जो तो आपापला दळणाचा डबा पुढे दामटत असतो. तिथे बसायला ही जागा नसते त्यामुळे कधी यापायावर थोडावेळ त्या पायावर भार टाकून तो कडाकड जांभया(जांभाळ्या) देत उभा असतो. काहीवेळ तर त्याला उभ्या उभ्याच डुलकी लागते. कसाबसा त्याचा नंबर येतो दळण वाला त्याला आवाज देऊन उठवतो,
"ओ भाऊ! तुमचं दळण आहे न! द्या न मग लवकर मग माझा लंच टाइम होईल अजून तुम्हाला ताटकळत राहावं लागेल"
सुरेश खडबडून जागा होतो आणि त्याला दळणाचा डबा देतो.
घरी दळण आणल्यावर आता थोडावेळ आपण झोपू असं त्याला वाटते तेवढ्यात रमेश ची बायको त्याला म्हणते,

"आवो भाऊजी जरा ह्या पिंट्याला शाळेत सोडता का नेहमी हेच सोडतात पण हे डबे पोचवायला गेले न ट्राफिक मध्ये अडकले असतील."

नाईलाजाने सुरेश पिंट्याला घेऊन शाळेत जातो. तिथून आल्यावर. लगेच त्याच्यासाठी कामं तयारच असतात.

"भाऊजी ह्या डब्याची ऑर्डर ऐनवेळी आली बघा तुम्ही पोचवून देता का फार लांब नाही दोन किलोमीटर वरचं आहे घर पायी गेले तरी चालेल"

झालं सुरेश डबा पोचवून येतो. तोपर्यंत रमेश आला असतो जेवणं वगैरे होतात. झोप असह्य झाल्याने एका कॉटवर सुरेश झोपतो. तो झोपून पाच मिनिटं झाले न झाले असतील की
टिंग टॉंग ....टिंग टॉंग टिंग टॉंग....

अशी एकसारखी बेल वाजते. कोणीच कसं काय दार उघडत नाही हे बघून सुरेश चरफडत उठून दार उघडतो तर दारात रमेशची बायको उभी.

"चुकून दार लागल्या गेलं आणि लैच च दार असल्याने आतून कोणीतरी उघडल्या शिवाय उघडल्या जात नाही ",रमेश ची बायको ओशाळवाणे हसत म्हणाली.

असं करता करता संध्याकाळ कधी झाली हे सुरेश ला कळलं सुद्धा नाही.

रमेश दुकानात वाण सामान आणायला गेला होता. पिंट्याला शाळेतून आणण्याचं काम पुन्हा सुरेश वर येऊन ठेपलं. रात्री जेवून सुरेश नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेला. दुसऱ्या दिवशी थोड्या फार फरकाने त्याला सतत कामं करावे लागले आणि झोप मुळीच झाली नाही. असे कसेतरी पंधरा दिवस गेले आणि सुरेश ला झोप न झाल्यामुळे थकवा जाणवायला लागला. त्याने नोकरीच्या ठिकाणी ऍडव्हान्स पगार मागून स्वतः ची वेगळी राहण्याची व्यवस्था त्वरित केली.

रमेश ला खाण्या पिण्या चा खर्च देऊन त्याने त्याचा निरोप घेतला. त्यावर रमेश सुरेश ला म्हणाला,
"अरे घाई काय आहे एवढ्यात वेगळं राहायला जाण्याची मला काही जड नव्हता तू"
त्यावर सुरेश 'अरे बाबा तुझे उपकार नको पण तुझे कामं आवर भीक नको बाबा पण कुत्रं आवर', असे मनात त्याला हात जोडत म्हणाला आणि उघडपणे
"नाही रे जड जरी नसलो तरी मित्राचा किती फायदा घेणार मधून मधून मी येईलच सुटीच्या दिवशी तुम्हीही येत जा पण सुट्टीच्या दिवशी हं!", असं म्हणून सुरेश ने रमेश ला राम राम म्हंटल(निरोप घेतला).
           ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆