उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः ॥
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ असा आहे की एकदा उंटाचं लग्न होतं ज्यात गाढवाला गीत गायला बोलावलं होतं. त्यात उंट 'अहो ध्वनी:' म्हणजे गाढवाच्या गाण्याची प्रशंसा करत होता तर गाढव 'अहो रूपं' म्हणजे उंटा च्या रूपा ची प्रशंसा करत होता.
उंट हा कुरूप दिसण्यासाठी प्रसिध्द आहे तर गाढव हा कर्कश्श आवाजा साठी प्रसिद्ध आहे पण जेव्हा दोन अवगुणी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्ती एकमेकांची प्रशंसा करून स्वतः चे समाधान मानून घेतात कारण इतर त्यांची प्रशंसा करणारं कोणीच नसते.
पुढे ह्याच सुभाषितावर आधारित मी एक कथा लिहिली आहे जी आपणास नक्की आवडेल.
एक आटपाट नगर होतं. तिथे बबन आणि मगन असे दोन उमेदवार दरवेळेस प्रमाणे निवडणुकीसाठी उभे होते.
गावातील बरेच जण बबन चे मतदार होते तर काही जण मगन ने धरून ठेवले होते.
बबन भाषण फार छान द्यायचा त्यामुळे गावातील सगळे जण त्यावर प्रभावित व्हायचे.
मगन सुद्धा भाषणात पोट तिडकीने बोलायचा मात्र त्याच्या भाषणात मनोरंजकात्मता कमी असल्याने लोकं प्रभावित होत नसत.
नेहमीप्रमाणे निवडणूक आटोपली अंदाजाप्रमाणे बबन बहुमताने निवडून आला.
निवडून आल्या आल्या त्याने पार्ट्या देणे. इकडे तिकडे निरर्थक फटफटीवरून फिरणे हे उद्योग सुरू केले पाहता पाहता पाच वर्षे निघून गेले. गावाची प्रगती तर सोडाच त्याने पाच वर्षात रस्त्यातील एक खड्डा सुद्धा बुजवला नाही. जे लोकं त्याच्या भाषणाने प्रभावित झाले होते ते सगळे त्याच्यावर नाराज झाले.
लोकांना कळून चुकले की बबन फक्त गोड बोलू शकतो परंतु गावातील लोकांविषयी त्याला काहीही आस्था नाही. हेच मगन गोड गोड बोलू शकत नाही पण त्याला गावाबद्दल प्रेम आहे म्हणून पुढच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी बहुमताने मगन ला निवडून दिलं.
पाच वर्षात मगन ने गावाचा विकास केला आणि त्यामुळे दर निवडणुकीत तो निवडून येऊ लागला त्यामुळे बबन च्या पोटात दुखू लागलं त्याला ते सहन होईना. जेव्हा त्याला कळलं की आपल्या गोड गोड भाषणाने कोणीही यापुढे इम्प्रेस होणार नाही तेव्हा त्याने एक युक्ती केली. त्या गावातले तर सगळे जण त्याला चांगलेच ओळखून होते त्यामुळे त्याची प्रशंसा करायला आणि त्याचा निवडणुकीत प्रचार करायला कोणीही तयार नव्हते म्हणून त्याने बाहेर गावाहून एक सवंग चित्रपटाचा अभिनेता आणला ज्या चे सगळे सिनेमे फ्लॉप झाले होते आणि त्याच्याकडून त्याने निवडणूक प्रचार करणं सुरू करून टाकलं.
सगळीकडे मोठमोठे होर्डिंग्ज लागले. कर्ण्यावरून सगळी कडे घोषणा वाजू लागली.
'रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ज्यांचे प्रत्येक चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झालेले ते प्रसिद्ध अभिनेते छगन कुमार ह्यांच्या विनोदी शैलीत गावाचे हितचिंतक,गावाचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करणारे आदर्श नेते बबनराव ह्यांचा निवडणूक प्रचाराची सभा येत्या रविवारी गावातल्या मैदानावर भरणार आहे होssss'
झालं प्रचाराच्या दिवशी बबन,बबन चे कार्यकर्ते, छगन कुमार असे सगळे स्टेजवर जमा झाले. मैदानात फार नाही पण काही तुरळक गर्दी जमा झाली होती.
आधी बबन च्या एका कार्यकर्त्याने छगन ची तोंड फाटे स्तोअर तारीफ केली आणि मग छगन कुमार ने माईक हातात घेउन बबन ची तारीफ करणं सुरू केलं.
जी काही तुरळक गर्दी होती ती सुद्धा "काही लाज नाही हो 'अहो रूपं अहो ध्वनीं' आहे दुसरं काय! एकमेकांच्या नसलेल्या गुणांची प्रशंसा करतात कोणी करत नाही तर" असं म्हणत हळूहळू पांगली त्यामुळे आता स्टेजवर बबन बबन चे काही कार्यकर्ते आणि छगन एवढेच उरले होते, नाही म्हणायला एक माणूस मैदानात बसला होता. छगन ने त्याला मोठ्या उत्साहाने विचारलं,
"का रे बाबा तू का थांबलास? तुला भाषण आवडलं का?"
"नाही हो! ही खाली जी सतरंजी टाकली न ती माझ्या घरची आहे आणि ती वापस नेल्याशिवाय माझी घरची मला आत घेणार नाही म्हणून वाट बघत बसलो."
★☆★☆★☆★☆★☆★
(वरील कथा पुर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काडीमात्र संबंध नाही 🙏)