आत्ता पर्यंतच्या केसेस मधली ही सगळ्यात आव्हानात्मक केस होती आणि तरीही ती यशस्वी रित्या पार पडली याचं मला समाधान आहे.
"हॅलो राघव!", पलीकडून इन्स्पेक्टर नाईकांचा आवाज
"हो बोलतोय, काय झालं सांगा",मी म्हंटल.
"खूप महत्त्वाचं काम आहे ,पोलीस स्टेशन ला येशील का ?"
"हो लगेच पोचतो",मी मी पोलीस स्टेशनात पोचलो.
"बोला इन्स्पेक्टर नाईक काय झालं? का एवढ्या घाईघाईने बोलवून घेतलं",मी
"बाबच तशी आहे, फार गंभीर बाब आहे",इन्स्पेक्टर नाईक
"तेच सांगा म्हणतोय",मी
"होहो सांगतो,जरा आतल्या केबीन मध्ये ये",इन्स्पेक्टर नाईक
आत एक गृहस्थ बसले होते. "हे मंत्री अण्णासाहेब जहागीरदार यांचे सचिव अक्षय गंधे,यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय",इन्स्पेक्टर नाईक
"त्याचं काय आहे, अण्णासाहेब जहागिरदारांचा ई-मेल अकौंट हॅक झालाय आणि त्यामुळे फार अडचण निर्माण झालीय. महत्वाचा डेटा त्या अकौंट वर आहे तो आता वापरता येत नाहीये त्यासाठी शक्य तेवढ्या लवकर ई-मेल अकौंट रिकव्हर व्हायला हवं.",अक्षय
"आपण त्यांचा लॅपटॉप सोबत आणलाय का?",मी
"हो हा काय",अक्षय
मी जवळपास तीन तास बसून तो ई-मेल अकौंट रिकव्हर करून दिला.
"आता तुम्ही तुमचा ई-मेल अकौंट वापरू शकता. मी तो पूर्णपणे रिकव्हर केलाय. सतत पासवर्ड बदलत चला. मी तुमच्या लॅपटॉप मध्ये आमच्याच सॉफ्टवेअर कंपनीचं अव्वल दर्जाचं अँटी व्हायरस सॉफ्टवेअर सुद्धा इन्स्टॉल करून दिलं आहे.
आणखी एक महत्वाची बाब तुम्हाला सांगायचीय. ज्याने कोणी तुमचं ई-मेल अकौंट हॅक केलं त्याचा आय पी अड्रेस मी ट्रेस केलाय. तो आय पी अड्रेस शत्रू देशातला आहे. आणि ज्या डिव्हाईस वरून तुमचं अकौंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्याचा डिव्हाईस आयडी सुद्धा मी ट्रेस केलाय. त्या डिव्हाईस वर मी एक मेसेज पाठवलाय की जो ओपन करताच त्यातला प्रोग्रॅम कार्यन्वित होईल आणि एवढेच नाही तर त्या डिव्हाईस वरून जे जे मेसेजेस किंवा मेल्स पाठवल्या जातील त्याची एक कॉपी आपोआप तुमच्या जुन्या ई-मेल अकौंट वर येईल.
जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा मेसेज किंवा ई-मेल अनोळखी नंबर किंवा ई-मेल आयडी वरून येईल तेव्हा तो लगेच डिलिट न करता मला आवर्जून कळवा. एवढं न विसरता नक्की करा. त्यावरून मोठ्या रहस्याचा भेद होईल असं मला वाटते. तुम्ही आणखी एक काम करा जुन्या ई-मेल अकौंट मधल्या डेटा चे बॅकअप घ्या आणि त्यातला डेटा डिलीट करून टाका आणि दुसरा ई-मेल अकौंट वापरा. ",मी म्हंटल.
तीन दिवसांनी अक्षय चा मला फोन आला. "हॅलो गुप्तहेर राघव! त्या जुन्या ई-मेल अकौंट वर एक मेसेज आलाय तो मी तुम्हाला फॉरवर्ड केलाय तो तुम्ही एकदा बघून घ्या." मी आलेला मेसेज बघितला. तो मेसेज असा होता, 10-1-8-1-7-9-18-4-1-18 18-5-1-4-25 20-15 4-9-5 ‘ह्या संदेशाचा अर्थ काय असू शकेल’ असा मनात विचार करत असताना अचानक माझे डोळे चमकले. मी एक कागद आणि पेन घेउन त्या संदेशाची उकल केली. त्या संदेशाची उकल होती, ‘JAHAGIRDAR READY TO DIE’ सिक्रेट मेसेज ची अशी उकल निघता मी गंभीर झालो. मी लगेच इन्स्पेक्टर नाईकांना आणि अक्षय ला ह्याबद्दल सांगितलं तसं त्याने मला अण्णासाहेब जहागिरदारांकडे बोलावलं. मी तिथे जाऊन त्यांना झालेली उकल दाखवली आणि ती उकल मी कोणत्या पद्धतीने केली हे ही समजावून सांगितलं. "हे बघा यातून हा मेसेज निघाला",असं म्हणून मी त्यांना मेसेज दाखवला. आता गंभीर होण्याची पाळी अक्षय गंधे, अण्णासाहेब जहागीरदार आणि इन्स्पेक्टर नाईकांची होती.
"पण त्या मेसेजेस चा अर्थ काय,आम्हाला तर काहीच कळत नाही",अण्णा साहेब
"पण त्या मेसेज वर सगळे आकडे होते त्यातून हा संदेश कसा निघाला ?",अण्णा साहेब आश्चर्याने म्हणाले.
"तो संदेश गुप्तलिपीतला आहे त्याला क्रीप्टोग्राफी म्हणतात, मी गुप्तहेर असल्याने मला त्याची माहिती आहे. इंग्लिश अल्फाबेट्स ना एक ते सव्वीस आकडे क्रमाने दिले की त्या मेसेज ची उकल झाली.
क्रीप्टोग्राफीतली अगदी सोपी पद्धत आहे ही या ही पेक्षा कठीण पद्धती असतात.",मी
"पण ह्या माणसाचं आम्हाला मारण्याची इच्छा असण्याचं कारण काय?",अण्णा साहेब
"मला वाटते साहेब,महिन्याभरापूर्वी ब्लॅक पँथर या दहशतवाद्याला तुम्ही ऑर्डर दिल्यामुळे फाशी झाली होती कदाचीत हे कारण असू शकेल",इन्स्पेक्टर नाईक
"ओह,बरोबर आहे हेच कारण आहे , मी विसरूनच गेलो होतो. पण आता पुढे काय करायचं?",अण्णा साहेब
"आता आपल्याला पुढच्या संदेशाची वाट बघावी लागेल. काही संदेश आला तर मला त्वरित सांगा",मी म्हंटल.
दुसऱ्या दिवशी आणखी एक संन्देश आला.
"गुप्तहेर राघव ,मी अक्षय बोलतोय, अण्णा साहेब जहागिरदारांचा सेक्रेटरी. नवीन मेसेज आलाय तो मी तुम्हाला sms करतो."
1-13-1-25 18-5-1-4-25 20-15 4-9-5
"अण्णा साहेब तुम्हाला आता फारच सावध राहावं लागेल,कारण नवीन मेसेज नुसार एक मे महाराष्ट्र दिनी त्याचा तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. आज २८ एप्रिल आहे. आपल्याजवळ फक्त दोन दिवस शिल्लक आहे.",मी
"माझं भाषण आहे जनता मैदानावर एक मे रोजी त्याचं काय करायचं",अण्णा साहेब
"ते तुम्हाला रद्द करावं लागेल,आणि एखाद्या सुरक्षित स्थळी पोचावे लागेल,एक काम करता येईल तुमच्या भाषणाचा विडिओ न्यूज चॅनेल वर टेलिकास्ट करता येईल. त्या माणसाची तुमच्यावर नजर आहे त्यामुळे त्याच्या नकळत तुम्हाला सुरक्षित स्थळी निघावं लागेल.",मी
"पण ह्या घरापेक्षा सुरक्षित असं कुठलं ठिकाण असणार",अण्णा साहेब
"ठीक आहे पण घरातून बाहेर पडू नका. जो पर्यंत हया माणसापर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला फार जपावं लागेल आणि जरा खाजगीत काही बोलायचंय फक्त तुमच्याशीच",मी
"चला त्या बाजूला",असं म्हणून अण्णा साहेब मला त्यांच्या स्टडी रूम मध्ये घेऊन गेले.
"ही रूम कॉन्फिडेंशीअल मीटिंग साठीच आहे तेव्हा मोकळेपणाने बोला काय बोलायचंय ते",अण्णा साहेब
"हे बघा अण्णा साहेब मला फक्त एवढंच सांगायचंय की प्रत्येक क्षण सावध राहा,तुमचे आजूबाजूचे लोकं, नोकर,कर्मचारी सगळे विश्वासार्ह आहेत न याची एकदा खात्री करून घ्या,थोडंही संशयास्पद वाटलं तर त्यांना बदलायला मागे पुढे पाहू नका.", मी
"अण्णा साहेबांनी म्हंटल,"मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते मी पूर्णपणे सावध राहीन आणि काही वाटलंच तर त्वरित तुम्हांला कळवेन." अण्णासाहेब व मी स्टडिरूम च्या बाहेर आलो.
"अण्णा साहेब मला वाटते ज्या ई-मेल अकौंट वर मेसेज येतात ते अकौंट मीच ऍक्सेस करावं असं मला वाटते, म्हणजे अक्षय तो मेसेज बघेल मग मला कळवेल यात बराच वेळ जाईल म्हणून म्हणतो.",मी
"हो हो , अक्षय यांना तो ई-मेल आय डी आणि पासवर्ड देऊन दे",अण्णा साहेब.
"अण्णा साहेब तुमच्या भाषणाचा विडिओ रेकॉर्ड करा पण आत्ताच तो न्यूज चॅनेल ला देऊ नका तसेच तुम्ही सभा रद्द करणार हे आत्ताच कोणाला सांगू नका", मी
अक्षय कडून ई-मेल अकौंट चे डिटेल्स घेऊन मी अण्णासाहेबांचा निरोप घेतला. अण्णा साहेबांचा महाराष्ट्र दिनी देण्याच्या भाषणाचा विडिओ रेकॉर्ड करण्यात आला. तो त्यांनी स्वतःजवळ गुप्त ठेवून दिला. पण कशी कोण जाणे,’अण्णा साहेब महाराष्ट्र दिनी प्रत्यक्ष भाषण न देता जनतेला त्या भाषणाचा विडिओ बघायला मिळणार आहे ‘ ही बातमी उडत उडत पत्रकारांपर्यंत पोचली. त्यांनी लगेच ती प्रक्षेपित केली. अण्णा साहेबांनी ती न्युज प्रक्षेपित करू नका अशी आज्ञा दिली पण तोपर्यंत जर शत्रूने ती बातमी बघितली असेल तर कठीण आहे. ३० एप्रिल रात्री अण्णा साहेबांच्या केस संदर्भात अभ्यास करत असताना माझा फोन खणाणला. "मी अण्णा साहेब जहागीरदार बोलतोय तुम्ही माझ्या घरी लगेच येऊ शकता का कारण इथे जे घडलं ते फोन वर सांगण्यासारखं नाही मी इन्स्पेक्टर नाईकांना ही बोलावलंय."
"हो मी लगेच येतो",असं म्हणून मी अण्णा साहेबांच्या घराकडे निघालो. नेमकं घडलं काय असेल? अण्णा साहेबांचा आवाज धास्तावलेला वाटत होता. असा विचार करतच मी, अण्णा साहेब जहागीरदारांच्या बंगल्यात शिरलो. "काय झालं अण्णा साहेब इतक्या तडकाफडकी का बोलावलं?",मी
"चला माझ्या बेडरूम मध्ये,काय झालं ते दाखवतो",अण्णा साहेब
"ते बघा",अण्णा साहेब
"अरे खिडकी ची काच तर फुटलेली आहे,आणि हे काय ?",मी
"आत्ता तासभरापूर्वी मोठ्ठं आवाज आला म्हणून मी बघतो तर काय खिडकीची काच फुटलेली होती आणि हा दगड ज्याच्यावर ही चिठ्ठी चिटकवली होती",असं म्हणून अण्णा साहेबांनी मला चिठ्ठी दाखवली.
"ह्या कागदावर मेसेज आहे",मी म्हंटल.
‘READY TO DISASTER’
अण्णा साहेब डोक्याला हात लावून बसले.
"अण्णा साहेब , मी समजू शकतो तुमची परिस्थिती पण काळजी करू नका मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्या केसालाही धक्का बसणार नाही. आता फक्त एकच काम करा काहीही विचार न करता मी सांगतो तसं करा. आता तुम्ही तुमचे महत्वाचे कागदपत्र, फोन, लॅपटॉप ,औषधें , कपडे वगैरे सगळं सामान घ्या आणि मी तुम्ही आणि इन्स्पेक्टर नाईक आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तिथे पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो, अक्षय किंवा बॉडी गार्डस कोणालाही सोबत घेण्याची गरज नाही, माझ्यावर विश्वास ठेवा यातच तुमचं भलं आहे. चला त्वरा करा.",मी
"ठीक आहे अंबाबाईंनीच तुम्हाला माझ्या रक्षणासाठी पाठवलेलं दिसते,मी आवश्यक ते सामान घेतो आणि निघू आपण लगेच.",अण्णा साहेब.
मी,इन्स्पेक्टर नाईक आणि अण्णा साहेब जहागीरदार पोलीस स्टेशन मध्ये पोचलो. "बोला गुप्तहेर राघव, तुमचा काय प्लॅन आहे ?", अण्णा साहेब
"इथून एक किलोमीटर वर देवीचं देऊळ आहे तिथे आपल्याला जायचंय. फक्त जाण्याआधी अण्णा साहेब तुम्ही वेषांतर करून घ्या,पोलिसांचा गणवेश तुम्ही घाला,इन्स्पेक्टर नाईक तुम्हाला मदत करतील तुमच्या बंगल्याभोवती सुद्धा पोलिसांनी पहारा ठेवलेला आहे.",गुप्तहेर राघव
" एक बरं आहे मी सडाफटींग असल्यामुळे माझ्या मागे पुढे कोणी नाही जो माझी काळजी करेल किंवा ज्याची मी काळजी करेन आता तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे गुप्तहेर राघव" अण्णा साहेब म्हणाले.
थोड्या वेळाने अंधार पडल्यावर इन्स्पेक्टर नाईक, अण्णा साहेब व मी पोलीस स्टेशन च्या बाहेर पडलो आणि देवीच्या देवळात पोचलो. सगळ्यांनी अंबा देवीला मनोभावे नमस्कार केला.
"चला आता माझ्या मागे या बाजूने",मी
सगळे मंदिराच्या मागच्या बाजूला आले,तिथे भिंतीच्या एका जागी मी दाब दिला तशी ती भिंत दरवाजा उघडावा त्याप्रमाणे उघडली,तेवढ्यात तिथे पुजारी आले.
"अरे पुजारी ह्यावेळेस कसे काय? ही काय भानगड आहे?" अण्णासाहेब आश्चर्याने म्हणाले.
"काळजी करू नका अण्णा साहेब " असं म्हणून मी "ये बरं झालं तू आलास" असं त्या पुजाऱ्याला म्हणजेच पुजारी वेशातील माझ्या मित्राला म्हंटले.
"अरे पण हे पुजारी महाराज कसे काय तुमच्या प्लॅन मध्ये?",अण्णा साहेब आश्चर्याने म्हणाले.
"तो माझा मित्र आहे, तो पुजारी नाहीये. त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून वेषांतर केलंय. त्याचं नाव विघ्नेश वेदपाठक आहे. चला आता घाई करा. ह्या गुप्त रस्त्याने चला",मी म्हंटले.
सगळे आत गेल्यावर मी भिंत पूर्ववत बंद केली आणि जवळचा टॉर्च सुरू केला. "मला आतातरी सांगाल का आपण काय करणार आहोत ते",अण्णा साहेब काळजीने म्हणाले.
"अण्णा साहेब इथून दोन किलोमीटर चालत गेल्यावर हा भुयारी मार्ग वीर गडावर निघतो,तिथेच तुमच्या राहण्याची व्यवस्था केलीय. तिथे तुम्ही खात्रीने सुरक्षित राहाल. हा विघ्नेश तुमच्या सोबत तेथे असेल तेव्हा काळजी करू नका. काही वाटलं तर फोन वर तुम्ही संपर्क करू शकता. विघ्नेश हा माझा अत्यंत निष्णात आणि प्रामाणिक मित्र आहे त्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिन्त असा.",मी चालता चालता अण्णा साहेबांना सांगितले.
"हो अण्णासाहेब! गुप्तहेर राघवने मला कल्पना दिलेली आहे. तुम्हाला मुद्दाम च ऐन वेळेवर सांगितलं जेणेकरून आपली योजना गुप्त राहावी म्हणून. तुम्ही निश्चिंतपणे तिथे राहा काही वाटलं तर मलाही तुम्ही संपर्क साधू शकता, जोपर्यंत आम्ही गुन्हेगारपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही वीर गडावरच राहणं आवश्यक आहे." इन्स्पेक्टर नाईक म्हणाले.
"माझ्या मते महाराष्ट्र दिनी काहीतरी गडबड करण्याचा गनीमाचा मनसुबा दिसतोय, त्या आधी त्याला पकडता आलं तर फार बरं होईल. हातात फारच कमी वेळ राहिलाय. उद्या 1मे महाराष्ट्र दिन",मी म्हणालो.
सगळेजण भुयारी मार्गाने वीर गडावर पोचले. वीरगडावरून संपूर्ण शहर दिसत होते. बाहेरून बघताच दुश्मनांना जरब बसवणारा रांगडा वीरगड आतूनही महाकाय प्रशस्त होता. ह्या गडाला बघून सगळ्यांना शिवकालीन काळाची आठवण येत होती.
"फारच विलोभनीय आहे हा गड, मला तर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येतेय, बहिर्जी नाईक हे महाराजांचे निष्णात हेर होते.",अण्णा साहेब म्हणाले. मी व इन्स्पेक्टर नाईक यांनी होकारार्थी माना डोलावल्या. "अण्णासाहेब हा विघ्नेश तुमच्या जवळ राहील, आम्हाला मात्र पुढच्या कामगिरी साठी बाहेर पडावं लागेल.",मी म्हणालो.
"तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. मला सुरक्षित स्थळी ठेवून तुम्ही सगळे मात्र तुमचा जीव धोक्यात टाकून काम करत आहात" अण्णासाहेब स्नेहाद्रतेने म्हणाले.
"हे तर आमचं कर्तव्यच आहे अण्णासाहेब तुमच्या सारखा सचोटीने काम करणारा नेता आम्हाला गमवायचा नाही" मी म्हणालो.
"तुम्ही गुप्तहेर असल्याने अनेक गुप्त गोष्टींची तुम्हाला खबर असणं साहजिकच आहे तरीसुद्धा एक उत्सुकता म्हणून विचारतो की या मार्गाचा पत्ता तुम्हाला कसा लागला?",अण्णासाहेब उत्सुकतेने म्हणाले.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंना गुंगारा देण्यासाठी अनेक असे भुयारी मार्ग बनवले होते. माझ्या पणजोबांना भारतीय इतिहासाची फार आवड. त्यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ वाचून स्वतः च्या नोंदी काढून अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात अशा काही गुप्त मार्गांचाही उल्लेख आहे. त्यांच्या पुस्तकात एक नकाशा होता त्यात ह्या मंदिराचा उल्लेख होता तसेच गुप्त कळ कुठे आहे याचाही उल्लेख होता म्हणून मला हा गुप्त मार्ग कळला. माझ्या पणजोबांनी त्यांच्या अभ्यासासाठी ह्या नोंदी केलेल्या असल्याने त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या नाहीत. आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल माझे पणजोबा सुद्धा त्यांच्या काळात गुप्तहेर म्हणूनच काम करत असत. त्यांच्या कडूनच हेरगिरीचा वारसा मला मिळाला असं म्हंटल तरी चालेल." मी हसत म्हणालो.
"फारच मनोरंजक आहे हे, मी फारच प्रभावित झालो",अण्णा साहेब भारावलेल्या स्वरात म्हणाले.
"खरंच फारच अत्भूत आहे हे सगळं. महाराजांनी बनवलेल्या ह्या योजना आजही आपल्या कामात येत आहेत" इन्स्पेक्टर नाईक म्हणाले.
"खरंय, शिवाजी महाराज आहेतच महान", अण्णासाहेब व मी एकसुरात म्हणालो.
"अण्णा साहेब आम्ही आता निघतो, विघ्नेश अण्णा साहेबांची काळजी घे, आपण सगळे फोन द्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू, चला इन्स्पेक्टर साहेब",असं म्हणून मी, इन्स्पेक्टर नाईकांना घेऊन भुयारी मार्गाने बाहेर आलो व मंदिराची मागची भिंत पूर्ववत बंद करुन टाकली. घरी यायला बरीच रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी एक मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होऊ लागला. शहरात ठीकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते,कुठे लेझीम वाजवत मिरवणुका निघत होत्या,कुठे पोवाडा गायन स्पर्धा होती तर कुठे लोकनृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. मी लॅपटॉप ऑन करून अण्णासाहेबांचे हॅक केलेलं ई-मेल अकौंट वारंवार बघितले पण मेसेज काही आला नव्हता. आणि सकाळी बघताच अचानक त्यावर एक मेसेज झळकला, 4-9-19-1-19-20-5-18 9-14 4-1-14-3-5 ‘DISASTER IN DANCE’ "हॅलो इन्स्पेक्टर नाईक मी राघव बोलतोय मला सांगा की आज कुठे कुठे नृत्याचे प्रोग्राम सुरू आहेत?",मी " आज महाराष्ट्र दिना निमित्त सगळीकडेच नृत्याचे प्रोग्राम्स आहेत पण सगळ्यात मोठा लावणी महोत्सव नटरंग नाट्य मंदिरात सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे तिथे",इन्स्पेक्टर नाईक "मला वाटते की तिथे काहीतरी स्फोट होण्याची शक्यता आहे कारण मला आत्ताच तसा मेसेज आलाय,मी तिकडेच निघतो तुम्हीही शक्य तितक्या लवकर पोहोचा तिथे.",मी मी व थोड्याच वेळात साध्या वेशातले इन्स्पेक्टर नाईक तिथे पोचलो. "स्फोटके आत तर कोणी आणू शकणार नाही कारण प्रत्येकाची हॉल मध्ये एन्ट्री घेतानाच बॉम्ब डिटेक्टर,मेटल डिटेक्टर द्वारे कसून तपासणी केल्या गेलेली आहे.",इन्स्पेक्टर नाईक "पण मेसेज तर ‘Disaster in dance’ असा आलाय म्हणजे अगदी हॉल मध्ये जरी नाही तरी नाट्यमंदिराच्या आजूबाजूला कुठेतरी बॉम्ब असण्याची शक्यता नक्कीच आहे.",मी "तुम्ही सुचवल्याप्रमाणे साध्या गणवेशात पोलीस मी ह्या हॉल च्या आजूबाजूला पेरून ठेवले आहेत जराही काही संशयास्पद आढळलं तर ते लगेच आपल्याला कळवतील.",इन्स्पेक्टर नाईक "हे फारच छान केलं तुम्ही तरीही एकदा मी हॉल च्या बाहेर एक चक्कर टाकून येतो.",मी मी बघितलं, सगळे लोकं आपापली कामं करण्यात मग्न आहेत,पलीकडे डोसे वाला भराभर डोसे करून देतोय,फुलवाली फुलं विकण्यात गुंतलीय तर चहा टपरी वाला चहा करून देण्यात गुंतलाय. सगळं नॉर्मल वाटतेय संशयास्पद काहीही नाही. चला एक चहा घेऊ जरा फ्रेश वाटेल असा विचार करून मी चहा टपरीवर गेलो तिथे एक चहा पिऊन मी परत हॉल मध्ये आलो. "बाहेर तर काही आढळलं नाही,थोडावेळ आत कार्यक्रम बघू , तुम्ही चला हवं तर",मी स्टेज वर कलाकार एकाहून एक उत्कृष्ट लावणी नृत्य सादर करत होते. तेवढ्यात एका लावणीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं, लावणी म्हणणारी गायिका एकच कडवं वारंवार म्हणत होती,बाकी सगळे लोकं नृत्य बघण्यात मग्न होते, इन्स्पेक्टर नाईकांच्या सुद्धा काही लक्षात आलं नाही पण माझं बारीक लक्ष असल्यामुळे मला ते जाणवलं, वाम करी हो वृश्चिक ज्याच्या वाम कर्म हा करीत असे विष आहे मनात ज्याच्या वामकर्णी तर कुष्ठ असे जी जी रं जी(कोरस) ह्या ओळी तिने दोन तीनदा म्हंटल्या की कोरस म्हणणारे व नृत्यांगना सुद्धा थोडी गोंधळली पण त्यांनी प्रेक्षकांना हे जाणवू दिलं नाही. "इन्स्पेक्टर नाईक त्वरित माझ्या मागे बाहेर चला",असं म्हणून मी चपळाईने हॉल च्या बाहेर पडलो, हॉल ला लागून असलेल्या चहा टपरी वाला निघण्याच्याच तयारीत होता तेवढ्यात, "काय भाऊ निघाले एवढ्या लवकर, तुमचा चहा मला फार आवडला म्हणून माझ्या मित्राला घेऊन आलो",मी इन्स्पेक्टर नाईकांकडे अंगुलीनिर्देश करून चहावाल्याला म्हणालो. "थोडा चहा आहे एक कप निघेल घ्या लवकर",असं चहा वाल्याने म्हंटल आणि नकळत मला त्याच्या मोबाइलमध्ये टाईप केलेला मेसेज दाखवला, तो मेसेज बघताच मी इन्स्पेक्टर नाईकांना आणि इन्स्पेक्टर नाईकांनी त्यांच्या सहकाऱ्याला मेसेज केला दोन मिनिटं पूर्ण होण्याआधी नाट्यमंदिरानजीकच्या स्वाद रेस्टॉरंट मध्ये पोलिसांनी एका माणसाला ताब्यात घेतले. "त्याचा मोबाइल आधी ताब्यात घ्या आणि मला द्या",मी घाईघाईने म्हणालो. त्याचा मोबाईल तपासल्यावर मी म्हणालो,"हा अब्राहम साठी काम करतो, ह्याचं नाव ब्लॅक रॉक आहे,आता हाच आपल्याला अब्राहम पर्यंत पोचवेल." हे वाक्य पूर्ण झालं न झालं तेवढ्यात एक पिस्तुल ची गोळी त्या ताब्यात असलेल्या माणसाच्या दिशेने आली, मी स्वतः समोर होऊन ती गोळी अडवली व तात्काळ स्वतः जवळच्या पिस्तुल ने त्या मारेकऱ्याच्या दिशेने गोळी चालवली. ती गोळी मारेकऱ्याच्या गुडघ्यावर लागली आणि तो कोलमडून पडला. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. मी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं असल्यामुळे माझ्यावर पिस्तुलच्या गोळीचा परिणाम झाला नाही. तात्काळ बॉम्ब निकामी करणारे पथक येऊन त्यांनी चहाच्या गाडीला लावलेला बॉम्ब निकामी केला. नियोजित वेळेवर कोड वर्ड मध्ये ब्लॅक रॉक आणि पॉईझन च्या मोबाईल वरून अब्राहम कडे ‘DONE’ असा मेसेज मी पाठवला जेणेकरून त्याला संशय येऊ नये म्हणून. चहावाल्याने प्रसंगावधान राखून ब्लॅक रॉक कुठेय ते सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गायिकेनं सुद्धा प्रसंगावधान राखून गाण्यातून हिंट दिली म्हणूनच मी चहावाल्या पर्यंत पोचू शकलो. त्या गायिकेला हॉल मध्ये येत असताना चहावाल्याचं कोणाशी तरी फोनवर बोलणं संशयास्पद वाटलं आणि चहा वाल्याच्या डाव्या हातावर विंचूचे टॅटू होते तसेच त्याच्या डाव्या कानावर कोडाचा डाग होता म्हणून तिने गाण्यातून हिंट दिली. चहा वाल्याला तर जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्याने निमूटपणे आपल्या चहाच्या गाडीला बॉम्ब लावू दिला होता. "बऱ्या बोलाने बोलले तर तुम्हाला आमच्या महाराष्ट्रातील झुणका भाकरी, ठेचा, पुरण पोळी असा पाहुणचार करू नाहीतर इन्स्पेक्टर तुम्हाला धम्मक लाडू आणि चापट पोळी देतीलच", मी हसत ब्लॅक रॉक आणि पॉइझन ला म्हणालो. पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्यावर ताब्यात असलेल्या गुन्हेगारांनी महाराष्ट्रात असलेले सगळे अड्डे सांगितले त्यावर त्वरित छापे मारून सगळ्यांना अटक करण्यात आली. ‘ब्लॅक रॉक’ आणि नंतर ताब्यात घेतलेला ‘पॉईझन’ यांच्या मोबाइलमधून आलेल्या मेसेज द्वारा मला मोबाईल नेटवर्क कंपनी च्या मदतीने अब्राहम च दिल्लीतील लोकेशन कळलं, महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत दिल्ली पोलिसांना संपर्क केल्या गेला. तिथल्या कमिशनर शी मी, इन्स्पेक्टर नाईक,महाराष्ट्रातील कमिशनर यांची झूम मीटिंग झाली. त्यांना मी तिथल्या अब्राहम च्या अड्ड्याची माहिती दिली. मी सांगितल्याप्रमाणे तिथल्या पोलिसांनी अड्ड्यावर छापा टाकताच अब्राहम रंगे हाथ पकडला अब्राहम ला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धक्काच बसला. त्यानंतर मी अण्णा साहेबांना परत त्यांच्या बंगल्यात सुखरूप आणून सोडलं. अण्णा साहेबांनी पुन्हा पुन्हा आभार मानले. "अण्णा साहेब हे फक्त माझ्याच मुळे शक्य झालं नाही यात इन्स्पेक्टर नाईक, त्यांची टीम ह्या सगळ्यांचंच योगदान आहे",मी "हा तर तुमचा नम्र पणा आहे पण ज्या चपळाईने तुम्ही सगळं केलं की संपूर्ण महाराष्ट्र काय,भारत काय, संपूर्ण जग थक्क झालं.",इन्स्पेक्टर नाईक. "अंबा देवीची कृपा दुसरं काय", मी असं म्हणून हात जोडले, तसे सगळ्यांचे हात भक्तिभावाने जोडल्या गेले. "टरिंग टरिंग" "कोणाचा फोन?",इन्स्पेक्टर नाईक "पुढची कामगिरी", मी "Best Of Luck", इन्स्पेक्टर नाईक आणि अण्णासाहेब एकदमच म्हणाले.
◆◆◆