Crazy in Marathi Motivational Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | बेधुंद

Featured Books
Categories
Share

बेधुंद


"मला तर बाई काही पटत नाही! आमच्या वेळेस असं काही नव्हतं." शुभांगी 

"मॉम! आता जमाना बदलला. तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं चालेल?" सारा बेफिकीरीने बोलली.

"पहा हो! ही काय म्हणते ते!" शुभांगी, साराच्या बाबांकडे म्हणजे सुधीर कडे पाहून म्हणाली.

"जाऊ दे! शुभा! चालायचंच. आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपले मतं बदलावे लागतील. जाऊ दे साराला. सुशांत आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही." सुधीर ची परवानगी मिळताच सारा खूप आनंदित झाली.

"चला मी जाते बॅग भरायला. दुपारी शॉपिंग ला सुद्धा जायचंय." असं म्हणून सारा तिच्या खोलीत चालली गेली. 

तेवढ्यात तिला सुशांत चा फोन आला, "झाली की नाही प्रि वेडींग शूट ला जायची तयारी सारा डार्लिंग? "

"हो, हो तेच सुरु आहे." सारा लाजत म्हणाली.

"उद्या मी बरोब्बर घ्यायला येतो सकाळी नऊ वाजता, सो बी रेडी **" सुशांत ने आणखी काहीतरी गोड संबोधन सारा साठी वापरलं तशी तिने लाजतच फोन ठेवला. 

दुपारी सारा शॉपिंग साठी तिच्या मैत्रिणी बरोबर गेली. बरेच वेगवेगळे फॅशनेबल कपडे, कॉस्मेटिक्स घेऊन ती संध्याकाळ पर्यंत आली. एकंदरीतच सारा भलतीच खुश आणि एक्सायटेड होती. साराची आई, शुभांगी साराशी काहीही न बोलता तिला ऑबझर्व करत होती आणि मनाशीच म्हणत होती, ' काय बाई! आजकालची पिढी जरा सुद्धा प्रगल्भता नाही. सगळ्याच बाबतीत उथळपणा. लग्न करायचं नंतर हवं तिथे जायचं फिरायला पण नाही, ह्यांना सगळं आधीच करायची घाई असते. काय तर म्हणे प्रि वेडींग. एकेक खूळ आहे दुसरं काय ' 

तिला असं विचारात पाहून सुधीर तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "नको इतका विचार आणि काळजी करू. सुशांत आणि सारा दोघेच कुठे जाणार आहेत त्याच्या फार्महाउस वर? त्याचा मित्र सुद्धा जाणार आहे सपत्नीक तेव्हा बी रिलॅक्स!!"

रात्रीचे जेवणं झाल्यावर रोजच्यासारखा साराला दहा वाजता सुशांत चा फोन आला. दोघांच्या गप्पांना जसा पूर आला होता. जवळपास रात्री बारा वाजेपर्यंत दोघे बोलत राहिले. शेवटी बारा वाजल्यावर सारानेच सुशांतला भानावर आणले, "अरे बघ किती वाजले! उद्या निघायचं आहे न लवकर मग आता ठेव बरं फोन. "

" तुझ्याशी सारखं बोलतच राहावं वाटते बघ सारा! कळलंही नाही कधी वाजले बारा!"

"चल! काहीतरीच तुझं कवी सुशांत!!" सारा खळखळून हसत म्हणाली व पुढे बोलली, "आणि हो फोटोग्राफर ला सांगितलं न आठवणीने " 

"हो राणी सरकार!!" 

"मी ठेवते फोन " साराने हसतच फोन ठेवला.

रात्री बराच वेळ उत्साहित असल्यामुळे साराला झोप आली नाही. मग केव्हातरी तिचा डोळा लागला. 

सकाळी तिला जाग आली ते बाबांच्या आवाजाने, " सारा आठ वाजले, सुशांत येईल तासाभरात तोवर आवरून घे "

सारा खडबडून जागी झाली. भराभर तिने सगळं आटोपलं आणि ती नाश्त्याला डायनिंग टेबल जवळ बसली. शुभांगीने तिच्या ड्रेस कडे बघून नाक मुरडलं तिला न बोलताच नाश्ता वाढला. साराने भराभर घास कोंबले आणि तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला.

" आला वाटतं सुशांत! चला आईबाबा! निघते मी " म्हणत घाईघाईने सारा बॅग घेऊन निघाली. 

निळा टॅंक टॉप आणि काळी शॉर्ट्स घातलेल्या सारा कडे सुशांत बघतच राहिला. शेवटी त्याच्या डोक्यावर टपली मारून सारा म्हणाली, "उशीर होत नाहिये का?"

"अरे हो हो! मिलिंद मिता लाही पिकअप करायचे आहे, नाही का?" सुशांत 

"हो तेच तर म्हंटल मी " सारा 

" सारा एक आयडिया करायची का? "

"कोणती?"

"मिलिंद -मिता ला कटवून आपण दोघेच जायचं का?" सुशांत डोळे मिचकावत म्हणाला. 

" काही नाही! जसं ठरवलं तसंच करू आपण " सारा सुशांतच्या दंडाला बारीक चिमटा घेत म्हणाली तशी सुशांत ने जरा नाराजीनेच कार पुढे नेली. कार मिलिंद च्या घरासमोर येऊन थांबली. 
मिलिंद आणि मिता रेडीच होते. चौघे मिळून गाडीत मस्त हास्य विनोद करत करत सुशांत च्या फार्म हाऊस वर पोचले. सुशांत चे फार्महाऊस फार प्रशस्त होते. मोठी लिविंग रूम, डाव्या उजव्या बाजूला दोन दोन बेडरूम्स होत्या. तसेच घरापुढे मोठे अंगण, बराच मोठा एरिया होता. अंगणाच्या डावीकडे मोठा स्विमिंग पूल सुद्धा होता. सभोवताली पपई, पेरू, लिंबू, आवळे, बोरं असे बरेच झाडं होते. टेरेस वर मोठा झोपाळा होता आणि अनेक फुलांचे रोपं लावले होते. सुशांत-सारा आणि मिलिंद-मिता फ्रेश झाले. थोड्याच वेळात फोटोग्राफर सुद्धा आला. सारा ने बराच मेकअप केला. मिताने तिला मेकअप करण्यासाठी मदत केली. अनेक प्रकारचे वेस्टर्न आउटफिट्स साराने काल शॉपिंग करून या फोटो शुट साठी आणले होते. 
"सारा! आवरलं की नाही? " सुशांत ने आवाज दिला 

"चल, सारा! आवर लवकर. काही सनसेट चे सुद्धा फोटो घ्यायचे आहेत." मिता 

"हो हो, झालंच माझं " सारा आवरून समोर अंगणात आली. सुशांत आणि सारा मस्त नटले होते. फोटोग्राफर च्या सल्ल्याने ते वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढून घेऊ लागले. 

" हां! आता हा हात ह्यांच्या खांद्यावर ठेवा..... आता इकडे पहा.... आता थोडं एकमेकांजवळ सरका..... आता दोन्ही हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवून डोळ्यात डोळे घालून रोमँटिकपणे एकमेकांकडे पहा..... " असे फोटोग्राफर त्यांना सूचना देत होता आणि त्याबरहुकूम ते करत होते. मधून मधून सुशांत साराच्या कानात काहीतरी सांगत होता आणि ती खळखळून हसत होती. मिलिंद मिता सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत होते. अंगणात, झाडाजवळ, टेरेसजवळ, सूर्यप्रकाशात, सूर्य अस्ताला जाताना, चांदण्यात असे सर्वत्र आणि सगळ्या वेळेचे त्यांचे फोटो काढण्यात आले. वेस्टर्न कपड्या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नवनवीन फॅशनचे ब्लाउजेस घालुनही साराचे सुशांत सोबत फोटोशूट होत होते. एवढ्यात पाऊस सुरु झाला. 

सारा आणि सुशांत भिजत होते. फोटोग्राफर म्हणाला की पावसातले सुद्धा काही फोटो काढू म्हणून त्यांनी पावसात सुद्धा काही फोटो काढले. सुशांत मोठ्या उत्साहात फोटो काढून घेत होता पण सारा आता कंटाळली होती म्हणून त्यांनी मग फोटोसेशन आवरते घेतले. कपडे वगैरे चेंज केल्यावर त्यांनी बाहेर पावसाची रिमझिम बघत फार्महाउस वर सुशांतच्या कुक ने बनवलेल्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणं झाल्यावर काही वेळ गप्पा मारणे झाल्यावर सुशांत साराच्याच खोलीत झोपायला जात असलेला पाहून मिताने त्याला टोकलं, " अरे सुशांत!तिकडे कुठे जातोयेस? तुला आणि मिलिंद ला एका खोलीत झोपायचं आहे. मी जाणार आहे सारा च्या खोलीत झोपायला. " 
"काय मिता तू? असं काय करतेय बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसारखे! आता दोन महिन्यात आमचे लग्न होणारच तर आहे. " सुशांत बेफिकीरीने म्हणाला. 

" हो बरोबर आहे पण अजून दोन महिने बाकी आहेत न, मग आता जा तुझ्या खोलीत, मिलिंद येईलच थोड्या वेळात. " मिता आपल्या मतावर ठाम आहे हे पहिल्यावर सुशांत चा नाईलाज झाला. 

रात्री बराच वेळ सारा-सुशांत ची फोनवर चॅटिंग सुरु होते. शेवटी कधीतरी पहाटे पहाटे ते आपापल्या खोल्यांमध्ये झोपले. सकाळी सगळं आटोपल्यावर ते नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागले. दोन्हीकडे लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. व्यवहार बैठकीत जे ठरलं होतं त्यानुसार साराचे आईवडील आहेर-भेटवस्तू, दागिने, कपडेलत्ते ह्यांची खरेदी करत होते. सगळं सुरळीत सुरु असताना सुशांत च्या आईने अचानक मोठ्या रकमेच्या हुंड्याची मागणी केली. तो आकडा ऐकून साराच्या आईवडिलांना घेरी यायचीच बाकी राहिली होती. त्यांनी सुशांत च्या आईला सर्वतोप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण परिणाम शून्य. शेवटी त्यांना हे लग्न मोडावं लागलं. कदाचित सुशांत ची आईला हेच अपेक्षित होतं. 

त्यांनी लगेच त्याचं लग्न दुसऱ्या एका श्रीमंत स्थळाशी ठरवलं. सुशांत ने सुद्धा आईपुढे बुगुबूगू मान हलवली. साराला सुशांत चे खूपच आश्चर्य वाटले. शेवटी तिने सुद्धा मूव्ह ऑन होण्याचे ठरवले. इकडे सुशांत चे लग्न झाले होते पण महिन्याभरातच सुशांतचा आणि त्याच्या आईचा तर्हेवाईक स्वभाव पाहून त्याच्या बायकोने त्याच्याशी घटस्फोट घ्यायची प्रक्रिया सुरु केली. काही काळाने सुशांत आणि त्याच्या बायकोचा घटस्फोट झाला. त्यादरम्यान साराला एक स्थळ सांगून आलं होतं. सर्व बाजूने ते स्थळ उजवं होतं त्यामुळे सारा आणि त्या मुलाचं म्हणजे सुजय चे लग्न ठरलं. सारा आनंदात होती. पण सुशांत आता घटसफोटीत असल्याने त्याला काही साराचा आनंद पाहवल्या गेला नाही. 

त्याने एक विकृत आयडिया काढली. सुशांतने साराच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजेच सुजयचा फोन नंबर कुठून तरी माहित करून घेतला आणि त्याला त्यांचे मागे फार्महाउस वर पावसात काढलेले आणि बऱ्यापैकी जवळ आलेले फोटो पाठवून दिले. ते पाहून सुजयचे डोकेच सटकले. त्याने साराला त्याबद्दल विचारले. साराने ते फोटो खरे आहेत पण त्यापलीकडे आम्ही मर्यादा ओलांडली नाही असे सांगितले पण सुजय ला विश्वास बसेना त्यामुळे दुर्दैवाने पुन्हा एकदा साराचे लग्न मोडले. त्याप्रकरणानंतर साराचे लवकर लग्न जमत नव्हते. 

आणखी एक -दोनदा सुशांत ने ते फोटो दाखवून साराचे लग्न मोडले. शेवटी साराला दुसऱ्या लांबच्या शहरात स्थलांतरित व्हावं लागलं तेव्हा कुठे हो हो नाहीनाही म्हणता म्हणता तिचे लग्न अखेर जमले. अश्याप्रकारे प्रिवेडींग शुट मुळे साराला आणि तिच्या पालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. 
वेळीच तिने बेधुंद न होता तिच्या आईचे ऐकले असते तर कदाचित तिला होणारा त्रास टाळता आला असता.