The relationship between you and me in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | नाते तुझे नी माझे

Featured Books
Categories
Share

नाते तुझे नी माझे

 नाते तुझे नी माझे

 

 

       अतिदक्षताकक्षाचे दार उघडून अरूण भावे आत आला. “सर सगळ्या फॉरमॅलिटीज पु-या झाल्या. सालागव्हर्टमेंट हॉस्पिटल मध्ये जायचा हा पहिलाच एक्सपिरीअन्स.. इथे ह्या सेक्शनला बीलघ्या... त्या सेक्शनमध्ये चलन पास करून घ्या... आर. एम्. ओ. ची साईन घ्या...मेट्रनची नोट घ्या...डेडली एक्सपिरीअन्स काऊंटरवरच्या क्लार्कने हा सगळा चक्रव्यूहवर्णन करून सांगितला तेव्हा डिस्चार्ज मिळवणं ही ‘मेरे बस की बात नही’ असंच मीमनात म्हटलं होतं... पण गॉडब्लेस... मेट्रनऽऽ काय बरं त्यांचं नाव... हांऽऽफर्नांडिस मॅडम... त्यांच्या साईनसाठी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो... वाटलेलंमेट्रन म्हणजे काळी ढुस्स... भला मोठा रोड रोलर... खरखरीत आवाज अन् तिरस्कारयुक्तनजर... असलं प्रस्थ असणार... पण ही मेट्रन साली भलतीच क्यूट... फॉर्म वाचूनझाल्यावर मधाळ आवाजात मॅडम म्हणाल्या... "प्रदिप बापट आपले डॅडी ना?"

       त्यांच्याप्रश्नापेक्षाही त्यांच्या गोड आवाजाने मी अक्षरशः चितपट झालेलो... मग सांगितलंत्यांना... "मी त्यांचा असिस्टंट... बापट साहेब इंडोकेमचे पर्चेसिंगमॅनेजर... मी त्यांच्या सेक्शनला अकौंटंट आहे." चष्मा काढून हातात घेत दीर्घउसासा सोडीत मॅडम म्हणाल्या, "सॉरी... घारे डोळे, गोरा रंग आणि पोश्चर...साहेबांच्यात आणि तुमच्यात खूपच साम्य आहे... बसा ना तुम्ही..." अन् मॅडमनीबेल वाजवली वॉर्डबॉय लगबगीने आत आला... मॅडमनी पर्समधून पैसे काढले... फॉर्म अन्पैसे त्याच्याकडे देऊन म्हणाल्या, "जा चलन भरून रसीट घेऊन ये... अन् तोपर्यंत दोन कॉफी दे पाठवून..." वॉर्डबॉय रसीट घेऊन येईपर्यंत कॉफी पिणंझालं... मॅडमनी तुमची थोडी चौकशी केली... जुजबी... म्हणजे मिसेस काय करतात... मुलंकिती... "सर काय प्रकार मला कळेचना... मी आपला गप्प बसलेला... वॉर्डबॉयडिसचार्ज सर्टिफिकेट घेऊन आला ते माझ्या हातात देत मॅडम म्हणाल्या, "गुडबाय्यु मे गो..." तेव्हा मात्र न रहावून मी म्हटलं... "मॅडम आपण ओळखतासाहेबाना? अन् बील... सरानी पैसे दिलेयत्..." मी खिशातून बंडल बाहेर काढल मलाहाताने थांबण्याची खूण करीत मॅडम म्हणाल्या, "तुझ्या सरांचे एक रिलेटीवमगाशीच येऊन गेले... त्यानी दिले होते बीलाचे पैसे..."

बेडवरून खाडकन उठत प्रदिप म्हणाला, "कायम्हणालास नाव... फर्नांडिस?" त्यावर अरूण उत्तरला "होऽ हो...फर्नांडिस... सुनिता फर्नांडिस" अरूणचं उत्तर ऐकून प्रदिप दोन्ही हातानी डोकंगच्च दाबीत बेडवर जवळजवळ कोसळलाच... सुनिता... सुनिता... सुनिता इतोरीनफर्नांडिस....... परब मास्तरांनी गेंगण्या सुरात हजेरी घ्यायला सुरुवात केलेली...विमला धाकू चव्हाण, इंदू हरी बागवे, कमळा राघो पाडावे, सुनिता इतोरिन फर्नांडिसमुलींची नावं संपल्यावर मग मुलांची नामावली सुरू झाली. हजेरी झाल्यावर प्रदिपचीपाटी तपासून मास्तर म्हणाले, "आता पाट्या बाहेर काढा... भटा म्हणजे प्रदिप(मास्तर आणि मुलंसुध्दा त्याचा उल्लेख 'भटा' असाच करायचे) सगळयांची गणितं तपास...ज्यांची दोन गणित चुकली त्याना चार छड्या, तीन चुकली त्याना सहा छड्या, सगळी चुकलीत्याना दहा छड्या दे आणि शुध्दलेखन घाल मग... मी जरा आजचा पट पुरा करून टाकतो. हेबघा रे पोरानो आता गप्प ऱ्हायचं... कोणी काय आवाज केला जरासा तरी नायसा करून टाकीनएकेकाला... घ्या गणित तपासून..."

सुनिताचंएक गणित चुकल... डोळयात पाणी आणीत अजिजिच्या सुरात सुनिता म्हणाली, "पद्या...एक पावट् सोड हां मला... मी नाय छड्या घ्यायची... माझी गणित नेहमी बरोबर येतात. हेएक अवघडच होतं! आणि घरात माझी आई-बाबा मला दाखवीत नाय अभ्यास...आये माझी... तिला लिहायला वाचायला येत नाय... मग मी काय करणार... तुझं आपलं बरंआहे... तुझी आई-बाबा तुला दाखवतात अभ्यास...ए मी तुझ्या घरी येऊ अभ्यासाला"

बापटांच्याघरापासून हाकेच्या अंतरावर किरीस्तावांची घरे. त्या दिवशी सुनिता संध्याकाळीअभ्यासाला बापटांच्या घरी गेली. किरीस्तावाची पोरगी घरी आली हे आईला एवढंस रूचलेलंनव्हतं...पण अश्राप मुल त्याचा अव्हेर कसा करायचा... तिचं मन म्हणालं... पदूबरोबरसुनितालाही गूळपोह्याची वाटी तिने दिली. पदूचं खाऊन झाल्यावर तो उठून हात धुवायलागेला... सुनिताचं खाऊन झालं... गुळाची बोटे चाटून झाल्यावर तिने नेसूच्या परकरालाबोटं पुसली... तशी आई ओरडली... "ऊठ आधी... ते जमिनीवर सांडलेले पोहे वेचूनवाटीत भर नी बाहेर नेऊन अंगणाच्या कडेला टाक..." वाटी, तोंड धुवायला लावूनचमग आईने तिला अभ्यासाला बसू दिलं... दिवस जात राहिले... उष्टं, खरकटं, विधी-निषेध एकेकभटांच्या चालीरीती सुनिताला उलगडत गेल्या किरीस्तावाची असली तरी लीन आहे, स्वच्छरहाते, चांगल बोलते, अभ्यासात तर पदु इतकी हुशार!म्हणून आईने तिचा अव्हेर केला नाही. सुनिताला समजायला लागलं अन् आपली पायरी तिनेकधी ओलांडली नाही.

ब्राह्मणाचंवागणं- बोलणं, त्यांच्या घरातली स्वच्छता... सुनीता त्यांच अनुकरण करायची, कळायलालागल्यावर तीने मांस-मच्छर खाणं बंद केलं... क्वचित प्रसंगी दारू खाऊन आल्यावरइतोरीन बडबडायचा...

“मांस-मच्छरबंद करायला आम्ही भट बामन थोडेच हाऊत?... तो आमचा धर्म हाय... आठ रोजात एकदा तरीसागोती हवी नायतर आमचा नाळगूत धरणार... उद्या लगीन झाल्यावर घोव वशाट मागेल...त्येला डुकाराचा नायतर ढोराचा मटन रांदून वाडावा लागेल तुला... भटांकडे जाऊन मोठीभटीन होणार माझी बया..” पण मुलीचं स्वच्छ, टापटीप वागणं, निग्रहाने शाकाहारघेणं... त्याला मनातून खूप आवडायचं सुध्दा !

मुलंजाणत्या वयात आलेली... अकरावीला बोर्डाची परिक्षा म्हणजे मोठचं पर्व ! गेली ५-६वर्ष पदूचे वडिल क्षयानं अंथरूणाला खिळलेले ! कुटुंबाची ओढघस्त सुरू झालेली.सुनिता वरचेवर बापटांच्या घरी यायची. पदूची आई वस्ताद... हे वय म्हणजे खुळं वय...आपला नाश आणि जगाचं हसं व्हायचं... सुनिताचं येणं बंद व्हावं असं तिने आडून आडूनसुचवून बघितलं पण पदू तिचं बोलणं उडवून लावायचा आईच्या सांगण्यामागे तिच्या मनातवेगळा विचार काय असावा याचा त्याला अंदाजच नव्हता. सुनिताकडे मॅट्रिक मॅक्झिन्स्,गाईड सगळा संच... पदूला पुस्तकांची जमवाजमव करताना यातायात. अण्णा आताशी कायमझोपून रहायचे... त्याना सारखा खोकला यायचा... उठून फिरायचं त्राण नाही. सुनिताशीसंगत सोडायची म्हणजे अभ्यासाचं कसं होणार? त्याने तर बोर्डात नंबर काढायचा चंगबांधलेला. सुनिता येतच राहिली... आईची बारीक नजर असायची पण अभ्यासाव्यतिरिक्त अगदीसंशय घ्यायलासुध्दा तिला काही आक्षेपार्ह बाब सापडली नाही.

मॅट्रिकचारिझल्ट लागण्यापूर्वी पदूचे वडिल वारले... पदू ८७% मार्क मिळवून बोर्डात पहिलाआला. सुनिता ७३% मार्क मिळवून पास झाली. इतोरिन पँट-शर्टचं कापड भेट म्हणून घेऊनकौतुक करायला पदूच्या घरी आला. तो ओसरीवर कडेलाच पाय सोडून बसला “भटीन काकूतुमच्या पदूची संगत धरली पन माजा चेडू चांगले मारक घेऊन पास झाला. जीजस त्येचा भलाकरील... आमच्या जातीत शिक्षणाला मोठा मान... सुनिताला रत्नागिरीच्या कालेजात घालीनमी... माजी भैन बुलुश ऱ्हाता ना रत्नागिरीक... पदूला पन फुढे शिकायला पाटवा...रत्नागिरीला तुमच्या लोकांची होस्टेल असा तिथे ऱ्हायची, जेवनाची सोय करतात... बगापटला तुमाला तर... मी सगळी म्हायती काडली रॉड्रिग्ज मास्तर कडून... काय थोडी मदतमी पन करीन. माजी पोरगी किरीस्तांव म्हनून कदी खाली पन क्येला नाय तिचा... मला जाणहाय तेची.”

पदूनेरत्नागिरीला संस्कृत पाठशाळेत राहून बी. एस्सी. ला अॅडमिशन घेतली. सुनिता तिच्याआंटीकडे थिबा पॅलेसला रहायची. कॉलेजच्या रंगीबेरंगी दुनियेत पदार्पण केल्यावरमात्र एक वेगळाच भावबंध त्यांच्यामध्ये विणला जाऊ लागला. शहरी वातावरणामुरलेल्या... छानछोकीत वागणा-या घमेंडखोर मुलींच्या घोळक्यात सुनिता वेगळीचदिसायची. ख्रिश्चन असली तरी कुंकवाची मोठी टिकली लावणारी, गोल चेहे-याची सुनिता...आर्जवी मधुर बोलणं... लांबसडक कुरळे केस... तिचं वेगळेपण प्रदिपच्या मनातप्रकर्षाने ठसत गेलं... शहरी वातावरणातली कंपू करून रहाणारी पोरं... त्यांचंपिकेटींग... सुनिता खाली मान घालून वावरायची. परिस्थितीला जिद्दीने तोंड देतअभ्यासाला वाहिलेला पदू... त्याचे संस्कार; पदू आपल्याला दुष्प्राप्य आहे हेसुनितानं पूर्ण ओळखलेलं... पण जन्माचा संगाती म्हणून अन्य कुणी पुरूष विशेषतःतिच्या धर्मीयातला... अभक्ष्य भक्षण करणारा... संस्कारहीन... छे छे! त्या पेक्षामदर मेरी बनून कुवांरपण पत्करलं... तिने ठाम ठरवलेलं... पदूकडून विचारणा झाली तरजीजसची कृपाच म्हणायची... प्रायश्चित्त करून धर्मांतर करायची सुध्दा तिचीमनःस्थिती...

अलिकडेपदूच्या वागण्यातलं वेगळेपण तीला जाणवायला लागलेलं... त्याचं पहाणं... हसणं...उशीर झाला तर त्याच्या चेहे-यावर दिसणारी नाराजी... ती जीजसला आळवायची... 'गॉड अल्माय टी... तुझ्या कृपेचा एक बिंदू दे मला... पदूला बुध्दी होऊ दे... तो पृच्छा करूदे बस्स...’ गणपती तिचं आराध्य दैवत... संकष्टीचे उपास सुध्दा तिने सुरू केले.पदूच्या वागण्यात सलगी वाढली पण थेट विचारायचा धीर त्याला होईना? आई काय म्हणेल?ती या धर्मबाह्य संबंधाला कदापिही मान्यता देणार नाही. किंबहुना आपले संबंधनिरपेक्ष आहेत अशी खात्री तिला वाटतेय म्हणूनच तिचा विरोध नाही पण गुह्य कळलं तरआपल्याला फसवल्याचा दोषारोप ती देईल याची भीती वाटायची त्याला ! म्हणून कित्येकवेळा तोंडाशी आलेले शब्द तो ओठावाटे उच्चारणं टाळायचा.

बी.एस्सी. होऊन पदू केमीकल इंडस्ट्रीमध्ये नोकरीला लागला. सुनिता शिक्षिका म्हणूनआचरा हायस्कूलमध्ये रूजू झाली. त्या वर्षी गणेश चतुर्थीला पदू चिंदरला घरी आलेलाचतुर्थीच्या दिवशी दुपारी जेवणे आटोपली अन् तासाभराने सुनिता आली. मग दोघं बोलतबोलत बाहेर पडली. नोकरीतल्या गमतीजमती सांगून झाल्या आणि अचानक पदू स्तब्ध झाला."सुनिता तू हो म्हणशील असा विश्वास वाळगून एक विचारायचय् तुला... हो म्हणणारअसं वचन दिलस तरच विचारतो नाहीतर माझं बोलणं माझ्या मनातच राहू दे... सांग देशीलवचन?" ज्या क्षणाची सुनिता वाट पहात राहिलेली तो सोन्याचा क्षण जीजसनेवर्तमान म्हणून तिच्यापुढे ठेवलेला अंर्तबाह्य मोहरून सुनिता म्हणाली, "दिलंवचन... खरंतर तू हे असं विचारशील या आशेवर जगतेय मी सगळंच बोलून दाखवायचं नसतं...मी प्रायश्चित्त घेऊन धर्मांतर करीन... इतक्या वर्षाच्या साधनेनं मी मनानं ब्राह्मणझालेय. फक्त तू पवित्र बंधनात बांधून मला पावन कर..."

रात्रीपदूने आईजवळ विषय काढला. "आई, आधी तुझी क्षमा मागतो. तुला ही गोष्ट स्पष्टसांगायला सुध्दा मला कसतरी वाटतय... पण... आई... मी सुनिताशी लग्न करणारेय्"पदूचे शब्द ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली पण आधी त्याला पुरते मनात काय आहेते आयकू दे असा भावार्थी विचार करून तिनं स्वतःला आवरलं अन् म्हटलं,"अस्सं... कधी ठरवलीत ही गोष्ट... अगदी कालपर्यंत माझ्यासमोर साळसूदपणीस्वच्छ वागण्याचं नाटक करीत आलात तुम्ही... गोष्ट या थराला कधी गेली? कुणी नेली?अभ्यासाच्या निमित्ताने ओसरी चढली अन् आता माझ्या टकल्यावर मि-या वाटणार म्हण कीही सुनिता... तू एक दुधखुळा असशील पण मी चार पावसाळे बघितले आहेत... दारूड्याइतोरिनची किरीस्ताव पोर ब्राह्मणाचा उंबरा भ्रष्टावू पहातेय काय? मी बरी गप्पराहीन..." गर्भगळीत झालेल्या पदूनं आईच्या चरणावर मस्तक ठेवलं... "आई,गजाननाची शप्पथ घेऊन सांगतो... तू सुनिता बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस... आई चूकमाझी आहे."

आवंढागिळून घशात आलेला हुंदका कष्टाने थोपवीत पदू पुढे बोलू लागला, "आई सुनिताचीकाहीच चूक नाही मीच विचारलं... तुझ्याशप्पथ सांगतो आई... रत्नागिरीला कॉलेजातअसतानाच मला तिच्याविषयी ओढ वाटायला लागली. पण त्यावेळी धारिष्ट्य नाही झालं...आणखी सुनिता सुध्दा एवढी संयमाने वागायची की, तिच्यासमोर प्रेम व्यक्त करायची मलाभीतीच वाटायची. आई मी जग बघितलय् सुनिता ख्रिश्चन आहे हे एक न्यून सोडलं तर नावठेवायला तरी जागा आहे का? तिचं वागणं बोलणं... सगळे ब्राह्मणी संस्कार आत्मसातकेलेयत् तिनं... तिचं चारित्र्य निष्कलंक आहे याची खात्री तू सुध्दा देशील... आईमी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. आज धीर करून मी हा विषय तिला स्पष्टच विचारला...हे संबंध तुला आवडणार नाहीत याची कल्पना आहे सुनिताला... पण... आई... सुनिताख्रिश्चन धर्म सोडायला तयार आहे. हल्ली प्रायश्चित्त विधी करून अन्य धर्मीयांनाहिंदू धर्मात घेतलं जातं... कायद्यानेही संमती दिलीय या गोष्टीला आणि आई...माझ्यासाठी घरदार, आईवडील हे पाश सुध्दा सोडायला तयार झालीय सुनिता... आई आता नाहीम्हणू नकोस...”

गोष्टआपण समजत होतो तेवढी सोपी नाही. मामला हाताबाहेर गेला आहे हे आईने ओळखलं. तिनेनिग्रहाने डोळयातलं पाणी मागे परतवून खंबीरपणे शेवटचा घाव घालायचा अशा निग्रहानेचतोंड उघडलं... “पदू, ती बया तिसरीत असताना प्रथम ही ओसरी चढली तेव्हाच सावधव्हायला हवं होतं मी! पण माझंच चुकल... तू अकरावीत असताना तिचं येणं बंद करायचाविषय काढला होता आठवतं तुला... तू काय सांगितलं होतस त्यावेळी...? माझ्यासमोरमर्यादाशील वागण्याचं ढोंग करून शेवटी केसानं गळा कापायला निघालास काय रे चोरा?सणासुदीच्या दिवशी गणपती गजानन घरात असताना हे सुचल वाटतं तुला? म्हणे धर्मांतरकरायला तयार आहे सुनिता... एवढा सोपा आणि सवंग आहे काय रे धर्म? कोणी कुठच्याभडभुंज्याने अन्य धर्मियांना शुध्द करून हिंदू धर्मात घेण्याच्या नावाखाली स्वतःचीतुंबडी भरण्यासाठी हा प्रायश्चित्त विधी सुरू केला असेल... त्या सोकाजीला धर्मभ्रष्ट करायचा मक्ता कोणी दिला रे? म्हणे कायद्याची समंती आहे... मढ्याच्याटाळवेवरचं लोणी खाणारं काँग्रेस सरकार... निवडणूकीच्या आदल्या दिवशी भाजी पु-यावाटून, वाडीप्रमुख, गावप्रमुखांच्या तुंबड्या भरून मतं विकत घेणारी पुढा-यांचीऔलाद, सत्तेला वेसवा बनवून दिल्लीत राजरोस बाजार मांडणारं सरकार ! त्याने केलेल्याकायद्याना मी किंमत देत नाही. वेदशास्त्र संपन्न घनपाठी ब्राह्मणाची मी मुलगीआहे... त्यांच्या प्रवचनातून धर्म म्हणजे काय ते पुरतं उमगलं आहे मला... स्वतःलाहिंदू; त्यातही ब्राह्मण म्हणवून घेणारा तू पढतमूर्ख... डिग्री मिळवली म्हणजेगगनाला हातच टेकले जसे... कधीतरी आपण धर्मग्रंथ पवित्र भगवद्गीता वाचावी तरी असंवाटलं का तुला?”

“किरीस्तावाचीपोरगी... पण संयम तिने पाळला. तिने चळवलं नाही तुला तूच चळलास... आता एवढा चळलासचतर तू कां नाही किरीस्ताव होत... तू स्वीकार ख्रिश्चन धर्म... त्यांच्या धर्मातसोय आहे तशी... बापटांच्या सात पिढ्या जाऊ देत नरकात... पिंड घालायला कोणी नाहीम्हणून राहू देत लटकत... तुला कसलं घेणं देणं आहे? तुझ्यासाठी ती धर्म सोडायलातयार झाली... तू तिला शुध्द करून हिंदू धर्मात घेणार आणि ब्राह्मण अर्पण करून पावनकरणार... वाहवा रे वाहवा...! धर्म म्हणजे काय पोरखेळ वाटला होय रे तुला? हिंदूधर्म मिळण्यासाठी जन्ममरणाच्या फे-यातून चौ-यांशी लक्ष योनी पार कराव्या लागतात...तो जन्मानेच मिळवावा लागतो. अकलेचे तारे खूप तोडलेस तू... आता माझं ऐक. प्रेमाच्यावल्गना माझ्यापुढे तरी नको करू. क्षयग्रस्त नव-याशी निष्ठेनं संसार केला मी... आठवर्ष सगळं अंथरूणातच होतं त्यांच... रात्रीच्या रात्री त्यांच्या उशाशी बसून जागुनकाढल्यात मी... तुझं प्रेम हे प्रेम नव्हे... आकर्षण आहे ते... पोर ठसठशीत, देखणी,लाघवी आहे. तिच्या रूपाला भुललास तू... आता थांबव हे... सुनितापेक्षा दसपटचांगल्या मुली हेरल्यात मी... पितृपक्ष संपू दे मग सुरू करूया मोहीम आणि देऊया बारउडवून... सुनिताची समजूत मी काढीन... इतःपर तिला भेटणं बोलणं बंद... समजलं?”

गौरीच्याआदल्या दिवशी पदू चोरून सुनिताला भेटला. आईचा नकार त्याने सांगितला. त्या बरोबर तोहे ही म्हणाला की, “आता गोष्ट हाताबाहेर गेली... मी तुझ्याकडे उच्चार केला तेव्हाचतु माझी झालीस. आईने परवानगी नाकारली तेव्हा पळून जाऊन लग्न करणे हा एकच पर्याय.काळ हे सगळयावरचं औषध आहे. आई उद्या विरोध विसरेल. तू तिचं मन जिंकून घेशील याचीमला खात्री वाटते.” दुस-या दिवशी पहाटेच्या गाडीने गणपतीपुळ्याला जाऊन गुपचुप लग्नकरायचा बेत ठरला. पदू घरी येऊन साळसूदपणे झोपला. आई आवराआवर करून गणपती समोरच आडवीझाली. पहाटेचे पाच वाजले. पदू उठला. खोलीचं दार हळूच उगडायला लागला दार उघडेना...मग खटखट केलं... छे... आईला हाका मारल्या... पण दार उगडल नाही.

पावणेसहाचीवस्तीची गाडी वाजली तेव्हा आईने दार उघडलं. “पदू तुझी इथपर्यंत मजल जाईल असं वाटलंनव्हतं. परवा हा विषय झाला. तू त्यानंतर गप्पच आहेस. पण मी सावध आहे. काल तू बाहेरपडलास तेव्हा जानु घाड्याला तुझ्या पाळतीवर पाठवला होता मी. घरात देव आहे.त्याच्या समोर तरी आजचा प्रसंग मी टाळला. तू लहान नाहीस. मी तुला पदराखाली काठेवणारेय् काय कर आंघोळ पूजा करून गणेशाचं विर्सजन कर. मग माझ्या नावाने आंघोळ करआणि माझ्या नावाने तुळशीत तीलांजली टाकून पड घराबाहेर. मी तुला मेल्ये नी तू मला.”

सुनिताठरल्याप्रमाणे बसस्टॉपवर आलेली पदू आला नाही पण आलेल्या गाडीत बसून ती निघून गेलीतीने थेट वास्को गाठलं अन् ‘नन्’ ची दिक्षा घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये रूजू झाली.

काळाच्याओघात आई गेली. घराकडे तर पदू कित्येक वर्षात फिरकला नाही. सुनिता कुठे आहे, कायकरते याची माहिती सुध्दा मिळवायचा प्रयत्न त्याने केला नाही. चार दिवसापूर्वीकंपनीच्या कामासाठी कंपनीच्या गाडीतून येताना कोल्हापूरला शाहू पुतळ्यासमोर गाडीलाटँकरने ठोकरलं... पुढे काय झालं कळलं नाही. पदूला जाग आली तेव्हा आपण सी. पी. आर.हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्हकेअरमध्ये असल्याचं त्याला समजलं. सगळ्या टेस्ट झाल्यानशिबाने त्याला काहीच दुखापत झालेली नव्हती तरी कंपनीच्या डायरेक्टरनी त्याला चारदिवस अॅडमिट करून ठेवण्याचा फोन मेसेज दिला. आज त्याला डिस्चार्ज घेऊन न्यायलाकंपनीची गाडी आली.

“सरडॉक्टरना बोलावू का? तुम्हाला बरं वाटत नाही का?” अरूणच्या प्रश्नाने भानावर येतप्रदिप म्हणाला... “नो ऽ नो... दॅटस् नॉट द मॅटर... चार दिवस इथे नाहक डांबून पडलोमी मस्तपैकी बीअर मारुया” दोघे रूम बाहेर पडले. “सर फॉरमॅलिटी म्हणून फर्नांडिसमॅडमना भेटून मग निघूया का?” अरूणला हातानेच खूण करीत प्रदिप कॅरिडॉरमधून भराभराबाहेर पडला. कंपनीच्या ए. सी. कार जवळ तो येताच कडक सॅल्यूट ठोकीत ड्रायव्हरनेबँकडोअर उघडला. प्रदिप आत शिरणार एवढयात वॉर्डबॉय धावत आला. “बापट साहेबऽऽफर्नांडिस मॅडम बलवत्यात...” बॅग सीटवर टाकून प्रदिप वॉर्ड बॉयच्या मागून निघाला.

केबिनचंदार उघडून तो आत शिरला. “प्रदीप... मी तुला दोष नाही देणार... धर्म जन्मानेच बदलतायेतो हे उशिरा समजलं मला पण आपलं नातं... ते इतकं तकलादू आहे का रे? सात फेरेही नफिरता आपण एकनिष्ठ राहिलो. आता संध्याछाया दिसायला लागल्या. निमित्तमात्रहीएकमेकांशी बोलणं, भेटणं यात माझ्या दृष्टीने तरी काही गैर नाही... कितीही झालं तरीमी स्त्री आहे... मी नाही तुझ्या इतकी निष्ठुर होऊ शकत...” सुनिताने चष्मा काढूनडोळे टिपले. “सुनिता... तू अशी भावविवश होशील याची खात्री होती मला म्हणूनच तुलाटाकून परभारे निघालो मी... अन् तेच योग्य आहे. हा आरंभ आहे सुनिता...जन्म-मरणाच्या फे-यातून आपण पुन्हा भेटू... माझी खात्री आहे... या जन्मीची साधनापुढच्या जन्मी... त्याच्या पुढच्या जन्मी कधीतरी नक्की फळाला येईल... या नात्यालासहधर्माचं कोंदण जडेल... आपण वाट पाहूया तोपर्यंत... त्या क्षणाची!”

                           **************