time machine in Marathi Science-Fiction by Kalyani Deshpande books and stories PDF | टाईम मशीन

Featured Books
Categories
Share

टाईम मशीन


"पार्थ, आम्ही जाऊन येतो लग्नाला, खरं तर तू ही यायला पाहिजे होतं." पार्थ ची आई म्हणाली.

"हो न! एवढा काय तो अभ्यास करायचा? जरा बाहेर पड, तुलाही बदल घडेल." पार्थ चे बाबा म्हणाले.

"नको बाबा, पुढच्या वेळेस मी येईन आता तुम्ही जा. मी नीट राहीन." पार्थ म्हणाला.

"बरं! तुझा मित्र येणार आहे न रात्री झोपायला? नाहीतर काकांकडे जा रात्री. घरी एकटा राहू नको आणि हो, प्रयोग शाळेत चुकूनही जाऊ नको, कळलं?", पार्थ चे बाबा त्याला सक्त ताकीद देत म्हणाले.

"हो बाबा! मी करतो व्यवस्थित मॅनेज. तुम्ही काळजी करू नका. मस्त एन्जॉय करा लग्नात. हॅपी जर्नी!!", पार्थ ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला.

पार्थने आईबाबा बाहेर गेल्यावर दार लावून घेतले आणि त्याने आनंदाने स्वतः भोवती एक गिरकी घेतली. 

आज मुद्दामच तो आईबाबांसोबत गेला नव्हता. कारण आज त्याला त्याच्या बाबांच्या प्रयोगशाळेत शिरण्याची आयती संधी चालून आली होती. अनेक वर्षांच्या मेहनतीने त्याच्या बाबांनी एक टाईम मशीन बनवली होती. सध्या ती प्रयोगावस्थेत होती. त्याचे बाबा त्याला कधीही त्यांच्या प्रयोग शाळेत फिरकू देत नसत. पार्थ ला मात्र तिथे कसं जाता येईल याचीच उत्सुकता असायची आणि आज त्याने ठरवलंच होतं की आईबाबा लग्नाला गेले की दोन दिवस काही येणार नाही तेव्हा आपण प्रयोग शाळेत जाऊन टाईम मशीन बघायचीच. 

त्यासाठी त्याने अनेक दिवसांपासून त्याच्या बाबांच्या आवाजात बोलण्याचा सराव करणं सुरु केलं होतं. कारण प्रयोगशाळेची पास की होती पार्थच्या बाबांच्या आवाजातील 'दार उघड दार, कामं आहेत फार' हे वाक्य.

पार्थ ने हे वाक्य त्याच्या बाबांच्या नकळत ऐकून घेतलं होतं. आता तो प्रयोग शाळेच्या दारासमोर उभा राहिला आणि अतिउत्साहित होऊन म्हणाला,"दार उघड दार, कामं आहेत फार' पण दार काही उघडलंच नाही. पार्थ ला खूप आश्चर्य वाटलं मग त्याला कळलं की आपण गडबडीत आपल्याच आवाजात म्हंटल. मग त्याने जरा घसा खाकरला आणि त्याच्या बाबांच्या आवाजासारखं खर्जात म्हंटल, "दार उघड दार कामं आहेत फार" आणि काय आश्चर्य!!! दार सटाक्कन उघडलं.

 पार्थ ला फार आनंद वाटला. तो आत शिरला आणि त्याची नजर टाईम मशीन ला शोधू लागली. अखेर एका कोपऱ्यात त्याला ती दिसली. तो लगबगीने तिकडे गेला. त्या मशीन वरचे आवरण त्याने काढले. एखाद्या धान्याच्या दुकानात कसा भलामोठा वजन काटा असतो त्याचप्रमाणे ती टाईम मशीन दिसत होती. पार्थ थोडा घाबरतच त्या मशीनवर उभा राहिला. त्याच्या मोठ्या पॅनेल वर मध्यभागी स्क्रीन होतं व आजूबाजूला शून्य ते नऊ अश्या आकड्यांचे बटण होते. तसेच काळाच्या पुढे किंवा मागे जाण्यासाठी प्लस आणि माइनस सिम्बॉल चे बटण होते. त्या मशीनवर एक मनगटी घड्याळ लावलं होतं.

 पार्थ ने मशीन कशी वापरायची ते मशीन वर लिहिलेले नियम वाचले. त्यात लिहिलं होतं की जेवढे वर्षे तुम्हाला मागे जायचं असेल तेवढा आकडा आणि वजा खूण हे बटण दाबायचे. आणि जर काळाच्या पुढे जायचे असेल तर तेवढे अंक दाबून व अधिक चिन्हाचे बटण दाबून जाता येत होतं.

 झालं! पार्थ ने देवाचं नाव घेऊन घड्याळ लावलं आणि 100 हा आकडा दाबला आणि प्लस बटण दाबलं. बटण दाबताच मशीन मधून एक वेगळ्याच प्रकारचा सायरन वाजू लागला. मशीनवरचे वर्तुळाकार एलइडी लाईट्स चमकू लागले. पार्थ ला गरगरायला लागलं आणि त्याचे भान हरपले. काही क्षणातच तो काळाच्या शंभर वर्षे पुढे गेला. 

काही क्षणातच त्याने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य तो बघतच राहिला. तो एका मोठ्या काचेच्या ए सी केबिन मध्ये एका आरामदायक खुर्चीवर बसला होता. त्या केबिन मध्ये एक मोठा स्क्रीन लावला होता व त्यात इलेक्ट्रिक सिटी बसेस ची माहिती मिळत होती. उजव्या बाजूला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवले होते. डाव्या बाजूला स्त्री व पुरुषांकारिता प्रसाधान गृह होते. 

तेवढ्यात एक इलेक्ट्रिक बस येऊन थांबली. त्या केबिन मध्ये बसलेले लोकं लगबगीने त्या बस मध्ये बसण्यासाठी बाहेर पडले. आश्चर्य म्हणजे कोणीच आत जायची गडबड नव्हते. कंडक्टर एकेक नंबर म्हणत होता आणि त्या त्या नंबर चे ई तिकीट असलेले लोकं आत बसत होते. सगळे नंबर संपल्यावर ती बस चालायला लागली. 

तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला म्हणून त्याने वळून पाहिलं. एक साधारण त्याच्याच वयाचा मुलगा त्याच्याकडे बघून स्माईल करत होता.

"काय रे! कुठून आलायस तू? तुझं गाव कोणतं?" तो मुलगा म्हणाला.

त्या मुलाने असं म्हंटल्यावर पार्थ चे स्वतःच्या पोशाखा कडे पाहिलं,'अरे खरंच आहे! माझा शर्ट पॅन्ट हा थोडा वेगळा वाटतो ह्या मुलाच्या शर्ट पॅन्ट पेक्षा ' असा पार्थ ने विचार केला. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, "अरे काय विचार करतोय तू? की एखाद्या टाईम मशीन ने आला आहेस इथे?"
त्याने असं म्हणताच पार्थ चमकलाच,' अरे! ह्याला कसं कळलं टाईम मशीन बद्दल?' त्याला विचार करत असलेला पाहून तो मुलगा पुन्हा म्हणाला, " जाऊ दे! कमीतकमी तुझं नाव तर सांग! माझं नाव अर्जुन आहे आणि तुझं? " असं म्हणून अर्जुन ने पार्थ समोर शेकहँड करायला हात केला. तसा पार्थ भानावर आला आणि चाचरत म्हणाला, "काय, काय नाव म्हणालास तू? "

"अर्जुन! अर्जुन आहे माझं नाव आणि तुझं काय आहे?" 

"माझंही तेच आहे" पार्थ ने सांगितलं.

"अच्छा तुझंही नाव अर्जुनच आहे? "

"म्हणजे माझं नाव पार्थ आहे म्हणजे अर्जुनच ना!"

"ओह! ओके, तसं होय! छान आहे तुझं नाव. बरं सांग न काही तूझ्याबद्दल" अर्जुन म्हणाला.

"तू बरोब्बर ओळखलंस. मी टाईम मशीन वरूनच आलोय इथे. बापरे! फारच टेकनॉलॉजि पुढे गेलीय रे 100 वर्षात." पार्थ ने म्हंटलं.

"हो आमच्या घरचे बाबा, काका, आजोबा आजी ही तेच म्हणतात." अर्जुन म्हणाला.

"रस्ते सोळा पदरी झालेत. मला तर विश्वासच बसत नाही. अगदी दुबई ला आल्यासारखं वाटलं मला काही क्षण. ए सी ग्लास चेम्बर असलेले बस स्टॉप्स, सगळीकडे इलेक्ट्रिक बसेस, सगळे इलेक्ट्रिक वाहने. सगळ्यांकडे डिजिटल पासेस, तिकीट्स. नो गर्दी नो ढकला-ढकली व्वा खूप मस्त " पार्थ भारावला होता. 

"अरे! हे तर काहीच नाही, तू चल माझ्यासोबत. मी दाखवतो जग किती पुढे गेलंय ते " अर्जुन असं म्हणत पार्थला बस स्टॉप च्या बाहेर घेऊन आला. बाहेर बऱ्यापैकी ऊन होतं. अर्जुन ने कॅब बुक केली, एका मिनिटात इलेक्ट्रिक ए सी ऑटो आली जीला कार सारखेच दार होते आणि ती संपूर्ण बंद होती. त्यात बसून पार्थ, अर्जुन सोबत त्याच्या घरी जायला निघाला. 

एका दहा मिनटात पार्थ आणि अर्जुन एका मोठ्या बंगल्यासमोर उभे होते. अर्जुन ने मेन गेट वर व्हॉइस कमांड दिली आणि दार उघडले. त्यानंतर त्याने पार्थ ला गेट च्या आत घेतलं, त्यानंतर ते अंगणातून घराच्या प्रवेश द्वाराजवळ गेले. पुन्हा अर्जुन ने व्हॉइस कमांड दिली आणि हाताचा अंगठा प्रवेश द्वाराला लावला त्या दारावर लावलेल्या स्कॅनर ने तो अंगठ्याचा ठसा स्कॅन होऊन मॅच झाला आणि दार उघडल्या गेलं. आत गेल्या गेल्या अर्जुन ने पार्थ ला सोफ्यावर बसायला सांगितलं. आणि तो सुद्धा आत गेला. हॉल च्या कोपऱ्यात एक इसम बसला होता. 

अर्जुन ने त्याला उद्देशून म्हंटले, "रामू काका जरा पाणी आणता का?"

"हो ", असं म्हणून तो इसम आतून पाणी घेऊन आला.

पाणी पीत पीत पार्थ घरात चहूबाजूने बघत होता. सगळं घर आद्ययवत वस्तूंने भरलं होतं. व्हॉइस कमांड देऊन अर्जुन ने ए सी, टीव्ही ऑन केला. टीव्ही वरच्या बातम्या बघून जग फारच प्रगत झालं असं आढळून येत होतं. राजकारणात नवीन बदल घडला होता. प्रत्येक प्रांताच्या मुख्य मंत्र्यांव्यतिरिक्त प्रत्येक प्रांताचा एक जनतेचा प्रतिनिधी नेमला होता ज्याला फक्त लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवणे हे एकच काम होतं. पंतप्रधान, मुख्यमंत्री ह्यांचं स्पेशल सोशल मीडिया अकाउंट होतं ज्यावर कोणीही आपल्या समस्या टाकू शकत होतं आणि त्या सात दिवसांच्या आत सोडवल्या ही जात होत्या.  

अर्जुन ने त्याच्या घरातील सगळ्यांना हॉल मध्ये बोलावलं. त्याचे बाबा, काका तर घराबाजूलाच असलेल्या त्यांच्या ऑफिस मध्ये काम करत होते त्यामुळे घरी असलेली त्याची आई, आजी आणि काकू पार्थ ला भेटले, त्यांच्या गप्पाही झाल्या. पार्थ टाईम मशीन ने आला ह्या बद्दल कोणालाही आश्चर्य वाटलं नाही ह्याच आश्चर्य मात्र पार्थ ला वाटलं.

 त्याने त्याबद्दल विचारलं असता अर्जुन ने सांगितलं,"अरे! हे 3024 साल आहे पार्थ! टाईम मशीन खूप कॉमन आहे. अनेक इतिहास संशोधक टाईम मशीन ने काही वर्षे मागे जातात आणि ऐतिहासिक काळाचा अनुभव घेतात. त्याचा त्यांच्या अभ्यासाला आणि संशोधनाला खूप उपयोग होतो. 

"अरे व्वा! हे तर अत्भुत आहे. ऐकावे ते नवलच!! "पार्थ आश्चर्याने म्हणाला.

"आणखी अनेक आश्चर्य तुला पाहायचेत पार्थ" अर्जुन असं म्हणाला आणि त्याने टीव्ही वर एक न्युज चॅनेल लावलं. हा बघ आत्ताचा प्रधानमंत्री आणि हा बघ असं म्हणून त्याने त्याच्या स्मार्टफोनवर 2075 सालच्या पंतप्रधानाचा एक विडिओ दाखवला. 
तो बघून पार्थ म्हणाला, "बापरे! हा तर पन्नास वर्षांनी वयस्कर दिसण्याऐवजी जास्त यंग दिसतोय. "

"कारण 2075 मधील पंतप्रधान हा खरा आहे आणि आताचा जो पंतप्रधान आहे तो त्याचा क्लोन आहे.", हे अर्जुन चे वाक्य ऐकून पार्थ उडालाच. 

"कमाल आहे! केवढं प्रगत झालं जग!" पार्थ म्हणाला.

सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान होता तो म्हणून सर्वानुमते शास्त्रज्ञान्नी अर्थात त्या पंतप्रधानाची अनुमती घेऊन त्याचा, त्याच्यासारखेच गुण रूप असलेला क्लोन बनवला. 

पार्थ हे सगळं भारावून ऐकत होता. सहजच पार्थ चे अर्जुनच्या स्मार्टफोन कडे लक्ष गेलं आणि पुन्हा त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. इंटरनेट चा वेग 5जी वरून 50जी झाला होता. सर्फीन्ग खूप फास्ट होत होतं. 

"चल पार्थ, आपण माझ्या बाबांच्या मित्राच्या शेतात जाऊन येऊ " अर्जुन म्हणाला.

"इकडे कसं काय शेत? म्हणजे शहरात?" पार्थ म्हंटला.

"अरे शहराच्या थोडं बाहेर आहे पण जास्त लांब नाही. आमच्या घरापासून फक्त 100 किलोमिटर" अर्जुन सहजतेने म्हणाला.

'शंभर किलोमीटर म्हणजे दोन तास सहज लागतील' असा पार्थ विचार करत होता तेवढ्यात अर्जुनच म्हणाला, "फार वेळ लागणार नाही आपल्याला तिथे. जास्तीतजास्त अर्धा तास. 

"फक्त अर्धा तास?" पार्थ 

"तू चल तर खरं?" अर्जुन 

अर्जुन ने घराबाहेर येताच मोठ्याने आवाज दिला, "ए सदू भाऊ! गाडी काढ " 

काही क्षणातच एक पॉश चकचकित टू सीटर कार आमच्यासमोर येऊन उभी राहिली. अशी कार पार्थ ने याआधी कधीच बघितली नव्हती.

"विदेशी कार आहे का रे?" पार्थ ने विचारलं.

"नाही रे! स्वदेशीच आहे. ही कंपनी खूप फेमस झाली आहे आता. आधी तू कार मध्ये बस तर खरं." अर्जुन म्हणाला.

पार्थ आणि अर्जुन कारमध्ये बसले. लगेच पार्थ ने विचारलं, "अरे ह्यात तर ड्रायवर ला बसायला जागाच नाही?"

"ड्रायवर ची गरजही नाही. ही कार ड्रायवर विना चालते." अर्जुन ने असं म्हणताच पार्थ फार अचंबित झाला.

कार सुरु झाली हे पार्थ ला कळलंही नाही कारण काहीच आवाज आला नाही. अर्जुन कार चे फिचर्स समजावून सांगत होता. कार फुल्ली ऑटोमॅटिक होती. अर्जुन ने कार मध्ये लोकेशन टाकलं. कार खूप वेगात धावत होती. ट्राफिक होता पण रस्ते मोठे असल्याने आणि सगळे नियमात चालत असल्याने गर्दी वाटत नव्हती. कार समोर कोणी असलं की आपोआप काही मिटर आधीच स्पीड कमी होऊन, पुढे ब्रेक लागून थांबत होती. समोरचा अडथळा बाजूला झाला की पुन्हा वेग पकडत होती. 

रस्त्यावर अर्जुनच्याच कार सारख्या अनेक कार्स धावत होत्या. काही कार मध्ये ड्रायवर होते तर काही कार्स ऑटोमॅटिकली सुरु होत्या. 

मोजून पंचवीस मिनिटात ते दोघे शेतात पोचले. तिथे सर्वत्र हिरवळ होती. शेतमजूर नियमानुसार कामं करत होते. वेगवेगळे पिके,फळं, फुलं, झाडं दिसत होते. त्या शेतात काही विदेशी फळे, पिके पण दिसत होते. 

"का रे, आता पावसाच्या आभावामुळे शेती पिकली नाही किंवा शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे ह्यात काय बदल घडला आहे 3024 मध्ये ?" पार्थ म्हणाला.

"अरे! ती पूर्वीची परिस्थिती झाली. आता सगळे शेतकरी सधन झाले आहेत. शेती कशी करायची? कुठल्या जमिनीत कुठलं पीक लावावं ह्या आणि अश्याच बारीक सारीक गोष्टींची माहिती मोफत ऑनलाईन मिळते. आता कृत्रिम पावसाची सुद्धा सोय आहे त्यामुळे पावसाअभावी शेती पिकत नाही असं होतच नाही आणि आता फळ-भाज्या, धान्य सगळ्यांना सरसकट भारत भर एकच भाव आहे. कुठे कमी कुठे जास्त असं नाही. शेतकऱ्यानां त्यांच्या मालाला योग्य दर मिळतोच मिळतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाले आहेत.

"बाकी ह्या शेतात मजुरांच्या कामाच्या वेगाला मानलं पाहिजे. किती वेगात आणि न थकता काम करतायेत हे!!" पार्थ 

" कारण हे मानव मजूर नसून रोबोट मजूर आहेत. " अर्जुन सस्मित म्हणाला.

"क्काय!! कमाल आहे खरंच!!" पार्थ अचंबित झाला.

"अरे आमची रोबोट बनवण्याची कंपनी आहे. माझे आईबाबा आणि काकाकाकू त्यातच काम करतात. मी सुद्धा त्याचंच शिक्षण घेतोय." अर्जुन ने सांगितलं.

"अरे पण असे सगळे कामं रोबोट ने केलेत तर बेरोजगारी वाढणार नाही का?" पार्थ ने प्रश्न उपस्थित केला.

" अरे आता बेरोजगारी संपुष्टात आली आहे भारतात" अर्जुन म्हणाला.

"ते कसं?" पार्थ ने विचारलं.

"एक तर सगळेच कामं रोबोट करतात असं नाहिये फक्त मेहनतीचे कामं रोबोट कडून करून घ्यायचे. त्यांना ऑपरेट करणे, रोबोट्स चे पार्टस बनवणे हे सगळं मानवच करतात. त्यात मानवाला उलट रोजगार उपलब्ध झाला आहे. अंगमेहनतीचे कामं, मजूर कामं हे आधी मानव करायचे ते आता रोबोट कडून करून घेता येते एवढंच. बाकी बुद्धिचे सगळे कामं अजूनही मानवच करतात. आपली लोकसंख्या आधी ज्या वेगाने वाढायची तशी आता वाढत नाही कारण आता कुठल्याही जाती-धर्माचा असो 'एक दांम्पत्य एक अपत्य' असं सरकारचे धोरण आहे. एकापेक्षा अधिक मूल हवं असेल तर दत्तक घ्यायचं. आजकाल आरक्षण हे जातीवर दिले न जाता आर्थिक परिस्थिती वर दिले जाते. भ्रष्टाचार जवळ जवळ संपुष्टात आला आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला सक्त ताकीद दिल्या जाते तरीही त्याने ऐकलं नाही तर त्याला कामावरून काढून टाकलं जाते त्यामुळे सगळे आपापले कामं चोख करतात. " अर्जुन म्हणाला.

"का रे? अजूनही जातीयवाद आणि धार्मिक तेढ आहे का भारतात?" पार्थ ने विचारलं.

"नाही. आता पूर्वीसारखा जातीयवाद, धार्मिक वाद राहिला नाही. कारण प्रत्येकाला आता एकच नियम आहे. त्यामुळे आता भारत ही एकच जात आणि भारत हा एकच धर्म आहे." अर्जुन म्हणाला.

पार्थ आणि अर्जुन घरी वापस आले. त्याच्या घरचं आणि आजूबाजूचे एकंदरीत मराठी संस्कृती चे वातावरण पाहून पार्थ म्हणाला, "का रे अर्जुन एवढं जग पुढे गेलं पण तुमच्या घरी अजूनही आपली भारतीय संस्कृती जागृत आहे. मला छान वाटलं."

"अरे का असणार नाही? आता अभ्यासक्रमात 'भारतीय संस्कृती' हा विषय अगदी पहिली ते स्नातकोत्तर शिक्षणापर्यंत अनिवार्य केला आहे. आपली संस्कृती किती महान आणि शास्त्रावर आधारित आहे हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय. एखादं लहान मूल कसं लाड करून घेण्यापुरते दुसऱ्याच्या कडेवर जाते पण येते पुन्हा आपल्या आईकडेच तसंच काही चांगल्या गोष्टी इतर संस्कृतीच्या जरी घेतल्या तरी आपल्या संस्कृती ची कास सोडायची नसते आणि उगीच अंधानुकरण करायचं नसते हे आता भारतीयांना कळले आहे." अर्जुन म्हणाला.

तेवढ्यात बेल वाजते. 

"राजूभाऊ दार उघडा " असं अर्जुन ने म्हणूनही राजूभाऊ तसूभरही हलला नाही. पार्थ ला ह्याचं आश्चर्य वाटलं.

लगेच अर्जुन म्हणाला, "राजूभाऊ कृपया दार उघडाल का? "असं म्हणताच राजूभाऊ लगबगीने दार उघडायला गेला.

" का रे अर्जुन तुमच्या कडचे नोकर फारच इगो असलेले आहेत. जेव्हा तू प्लिज म्हंटल तेव्हाच त्याने ऐकलं " पार्थ ने विचारलं.

त्यावर अर्जुन खळखळून हसत म्हणाला, " अरे त्यांचे प्रोग्रॅमिन्ग च तसं केलंय. " 

"म्हणजे? हा राजूभाऊ सुद्धा रोबोट आहे?" पार्थने आश्चर्याने विचारले.

"नाही तर काय!! आमच्याकडे सगळे नोकर रोबोटच आहेत." अर्जुन हसत म्हणाला. 

तेवढ्यात दारातून एक तिशीची स्त्री आत आली. पार्थ ला अर्जुन ने ओळख करून दिली. ती अर्जुन ची मोठी बहीण होती. तिच्यासोबत तिची एक पाच वर्षांची मुलगी सुद्धा होती. 

अर्जुन बहिणीला म्हणाला,"हे बघ सुधा ताई हा पार्थ! टाइम मशीन ने 2024 मधून आला. त्याला मी नवनवीन सुधारणा झाल्या त्याबद्दल सांगितलंय. आता तू तुझ्या अनुभवाबद्दल सांग"

" सर्वप्रथम पार्थ तुझे 3024 मध्ये स्वागत आहे. आता इतर तंत्रज्ञानाप्रमाणे मेडिकल सायन्स सुद्धा पुढे गेलं आहे. आधी गरोदरपणी होणाऱ्या बाळाला काही व्यंग आहे की नाही हे खात्रीने कळत नव्हते पण आता अगदी गरोदर झाल्या झाल्याच तिसऱ्या महिन्यात करता येणाऱ्या एका टेस्ट मध्ये सगळं खात्रीलायक सांगता येते त्यामुळे होणारे बाळ हे खात्रीने अव्यंग च होते. त्याचप्रमाणे काही प्रॉब्लेम असेल तर गर्भारपणातच काही उपचार करून चांगलं गुटगुटीत बाळ निर्माण होते. एवढंच नव्हे तर आई बाबांनमधील जे जे अवगुण आहेत ते वगळून फक्त जे जे चांगले गुण आहेत ते सुद्धा होणाऱ्या मुलामध्ये खात्रीलायक आणल्या जाऊ शकतात. आता हेच बघ माझी मुलगी सुप्रिया हिच्या मध्ये माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे जे चांगले फिचर्स आहेत ते सगळे आले आहेत. हिच्या वेळेस मी गरोदर असताना हिच्या मेंदू ची वाढ नॉर्मल होत नव्हती पण टेस्ट केल्याने ते कळलं आणि योग्य ते उपचार केल्यावर तिची मेंदूची वाढ नॉर्मल व्हायला लागली. आज तिच्या वर्गात सगळ्यात हुशार तीच असून तिचा आय क्यू नॉर्मल पेक्षा खूप जास्त आहे. " सुधा म्हणाली.

" व्वा खूपच छान. मला एकेक ऐकून खूप आश्चर्य आणि त्याबरोबरच समाधान ही वाटते आहे. " पार्थ म्हणाला.

" चल पार्थ आता मी तुला आमची रोबोट बनवण्याची कंपनी दाखवतो. " असं म्हणून अर्जुन त्याला जवळच असलेल्या तिथल्या कंपनीत घेऊन गेला. 

तिथे जाऊन आणि तिथला अवाढव्य डोलारा पाहून पार्थ चे डोळे दिपले. सर्वत्र लोकं आपापल्या विभागात आपापले नेमून दिलेले कामं करीत होते. कोणी रोबोट चे पार्टस तर कोणी त्याचे इलेक्ट्रॉनिक सर्किट तर कोणी सॉफ्टवेअर बनवण्याचे कामं करीत होते. अनेक लोकांना त्यांच्या कंपनीत रोजगार मिळाला होता. अर्जुन ने पार्थ ला कंपनीतले सगळे विभाग दाखवले. त्यानंतर अर्जुन त्याला आपल्या बाबांच्या केबिन मध्ये घेऊन आला. त्याच्या बाबांशी त्याने ओळख करून दिली. पार्थ ची नजर सहजच मागच्या भिंतीवर गेली आणि तो चक्रावलाच कारण तिथे अर्जुनच्या कुटुंबाच्या वंशावळीचा मोठ्ठा फोटो होता त्यात त्याचा आणि त्याच्या आई बाबांचा वयस्कर असलेला फोटो होता. त्याच्या बाबांच्या फोटो खाली नाव लिहिलं होतं 'माधव श्रीधर देशमुख' आणि आईच्या फोटो खाली लिहिलं होतं 'रमा माधव देशमुख तर त्याच्या फोटो खाली होतं 'पार्थ माधव देशमुख आणि त्याच्या बाजूला एक स्त्री होती तिच्या फोटो खाली नाव होतं 'सुभद्रा पार्थ देशमुख. ' 

'बापरे!! म्हणजे ही सुभद्रा माझी बायको(असे वाटून पार्थ थोडा लाजला ), अर्जुनचे बाबा माझा नातू आणि हा अर्जुन माझा पणतू आहे तर!!' 
असा पार्थ विचार करतच होता की अर्जुन म्हणाला, 

" अरे पार्थ तो बघ माझ्या खापरपणजोबांचा फोटो. भारतातील पहिली टाईम मशीन त्यांनीच बनवली होती. आणि त्याच्या खाली बघ, तो माझ्या पणजोबांचा फोटो. भारतातील पहिला रोबोट त्यांनीच बनवला होता. आणि काय योगायोग आहे पहा! त्यांचेही नाव पार्थ च होते " अर्जुनचे हे वाक्य ऐकून पार्थ च्या अंगावर उत्तेजित झाल्याने शहारा आला. 

"अरे! हा नुसता योगायोग नाहिये रे अर्जुन बेटा!" असं पार्थ ने म्हणताच अर्जुन ने चमकून पार्थ कडे पाहिलं.

"म्हणजे??" अर्जुन आणि अर्जुन चे बाबा म्हणून म्हणाले.

"जरा नीट फोटो बघ अर्जुन. त्यात तुझ्या पणजोबांमध्ये आणि माझ्या चेहऱ्या मध्ये तुला साम्य वाटत नाही?" पार्थ 

अर्जुन आणि त्याच्या बाबांनी तिकडे बघितलं आणि एकदम त्यांच्या डोक्यात क्लिक झालं. 

"आजोबा!!", "पणजोबा!!" असं म्हणून अर्जुनचे बाबा आणि अर्जुन पार्थ ला बिलगले. काही वेळ तसंच राहून ते भानावर आले. अर्जुनच्या बाबांनी सगळ्या कुटुंबाला फोन करून त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले. सगळ्यांना जेव्हा कळलं तेव्हा सगळ्यांना आनंदयुक्त आश्चर्याचा धक्का बसला. अर्जुनची आई आणि काकू तर आजेसासरे बुआ म्हणून पार्थच्या पाया पडायला आल्या पण पार्थ ने त्यांना थांबवलं. कंपनीतल्या सगळ्या कामगारांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्याही आश्चर्याला पारावर उरला नाही. सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पार्थचे आणि देशमुख कुटुंबाचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर सगळे देशमुख परिवार वासी आपल्या घरी आले. तिथे दोन दिवस पार्थने मस्त पाहुणचार झोडला एक छान फॅमिली फोटो काढला आणि एकदम पार्थच्या लक्षात आलं की आता 2024 मध्ये आपल्या आईबाबांची लग्नाहून येण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे त्याने 3024 मधील देशमुख परिवाराचा निरोप घेतला.

"चल अर्जुन आता मला निघायला हवं. आणि हो सध्या मला आजोबा, पणजोबा म्हणू नका पार्थच म्हणा."

" बरं पणजो.. " असं म्हणून अर्जुन ने जीभ चावली आणि पुढे म्हणाला, " बरं पार्थ ! पण पुढील वेळी आपल्या राहिलेल्या फॅमिली मेंबर्स ना 3024 ची सफारी करायला नक्की घेऊन ये घरी. "

"हो हो नक्की!" असं म्हणून पार्थ ने सगळ्यांना प्रेमाने आलिंगन देऊन निरोप घेतला.

"चला भेटू पुन्हा" असं म्हणून त्याने त्याच्या मनगटी घड्याळाचे बटण दाबले आणि क्षणार्धात तो 2024 मध्ये त्याच्या घरच्या प्रयोगशाळेत आला. बाहेर कुलूप उघडल्याचा आवाज आल्याने त्याने लगेच सगळं जागच्या जागी ठेवलं आणि प्रयोगशाळा व्यवस्थित बंद करून तो बाहेर बैठकीत आला. 

तेवढ्यात कुलूप उघडून त्याचे आईबाबा घरात आले.

"काय रे पार्थ? नीट राहिलास न? काही कारभार तर केला नाही?" पार्थ च्या बाबांनी विचारलं.

"नाही नाही बाबा, मी एकदम छान राहिलो. " पार्थ त्याच्या बाबांकडे कौतुकाने आणि आरशात स्वतःकडे अभिमानाने बघत म्हणाला.

 लग्नातल्या गमतीजमती सांगितल्यावर थोडयावेळाने त्याचे बाबा प्रयोगशाळेत गेले. तिथे टाईम मशीन जवळ त्यांना एक फोटो दिसला. त्या फोटोतल्या लोकांमध्ये त्यांना पार्थ दिसला आणि मागच्या कॅलेंडर वर 3024 हे साल दिसले. त्यांनी लगेच टाईम मशीन तपासली, त्यावरील रेकॉर्डिंग वरून त्यांना संपूर्ण माहिती मिळाली आणि पार्थचे स्वतः आणि त्यांच्याकडे अभिमानाने बघण्याचे कारण कळले. त्यांनाही ते बघून कमालीचा आनंद झाला आणि ते मनाशीच म्हणाले,

'चला तर! पार्थने उत्तघाटन केलंच आहे आणि पुढे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा आपल्याला पुरावा सुद्धा मिळाला आहे तेव्हा ही टाईम मशीन आता लॉन्च करायला काहीच हरकत नाही.

*******************समाप्त*****************