शिक्षणातून संस्कार रुजावेत?
शिक्षणातून संस्कार रुजायला हवं. कॉपी करणं पापच. परंतु अलिकडील काळात शाळेतील विद्यार्थी हे कॉपी करीत असतात आणि त्यांनी कॉपी करु नये म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परंतु कितीही अशा प्रकारचे अभियान राबवले गेले तरी कॉपी ही कॉपीमुक्त होणार नाही. कारण जे संस्कार आलेले असतात. ते संस्कार हे अभ्यासक्रमातूनच आलेले असतात नव्हे तर ते राबविणाऱ्या घटकातूनही आलेले असतात. त्यातच त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा परीसरही भर टाकत असतो. महत्वाचं म्हणजे असं होवू नये म्हणून अभ्यासक्रमच तयार करतांना तो संस्कारक्षम तयार करावा. तो राबविणारा घटकही संस्कारक्षम असावा आणि त्याचा परीसरही संस्कारक्षम बनावा. जेणेकरुन संस्कार त्या विद्यार्थ्यात रुजेल. ते कॉपी करणार नाहीत. व्यतिरीक्त देशही संस्कारक्षम बनेल हे तेवढंच खरं.
अलिकडे शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे. त्यानुसार शिक्षणाला वाघिणीचे दूध समजले जात असून शिक्षण सर्वांना मिळायला हवं. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ते शिकवीत असतांना वा देत असतांना शिक्षण काही शैक्षणिक धोरणं आखले जात आहेत व बदलत्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना कामाला लादले जात असून विद्यार्थी स्वतः शिकावा व त्याचे सुप्त गुण बाहेर निघावे, त्याचा विकास व्हावा म्हणून तेच सुप्त गुण त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन व्हावे वा ते सुप्त गुण वृद्धींगत होत जावून ते देशाच्या कामी यावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे.
शिक्षण सर्वांना मिळायलाच हवं. ते सर्वांना दर्जेदारच मिळायला हवं. यासाठीच शिक्षण धोरण हे बदलत्या काळानुसार वेळोवेळी आखलं जात असतं. हे सगळं बरोबर आहे. त्यासाठी शिक्षणाची रुपरेषा ठरवली जाते व त्यासाठी प्रशिक्षणं राबवली जातात. त्यासाठी खर्चही केला जातो. परंतु असं असतांनाही व भावी काळात घडणारी पिढी शिकवीत असतांना साहजीकच असं लक्षात येतं की जी पिढी शिकते. त्या पिढीत संस्कारच रुजलेले नाहीत. चारदोन जर सोडले तर त्यातील कुणीतरी गुंड निघतात. कुणीतरी मायबापाची सेवा करीत नाही. कुणीतरी चोऱ्या करतात. असं का होतं? याचाच अर्थ असा की मुलांना लहानपणापासून जे शाळेच्या माध्यमातून संस्कार आपण देतो. ते संस्कार मुळात आपले त्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारीकडे नेणारे असतात. कारण सध्याच्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकात संस्कार रुजविणाऱ्या गोष्टी असल्या तरी ते शिकविणारे व अभ्यासक्रम राबविणारे घटक हे स्वतः संस्कारीत नाहीत आणि अभ्यासक्रमही संस्कार देणारा नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास इतिहासाचं देता येईल. इतिहासात अमूक व्यक्तीनं अमूक व्यक्तीला मारलं. अमूक युगातील व्यक्ती अमूक युगात शिकार करुन जगायचा. यात अशाच प्रकारच्या गोष्टी जर अभ्यासक्रमात राबवल्या जात असतील तर मुलांमध्ये संस्कार रुजणार कुठून? शिवाय आजच्या काळातील शाळेतील परिक्षा. शिक्षक स्वतःच मुलांना चांगला पेपर सोडवता यावा म्हणून मदत करतात. ज्यातून कॉपीची सवय लागणारच. पुढे त्याचा बिनधास्तपणा एवढा वाढतो की ती मुलं चोऱ्याही करु लागतात.
आजची काही पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम हा जरी संस्कारावर काहीसा आधारीत असला तरी अलिकडील काळात मुलांवर संस्कार कसे करावेत. हा प्रश्न शिक्षकांसमोर आ वासून उभा आहे. कारण तो विद्यार्थी जसा करेल वा जसा वागेल. तसं त्याला वागू द्यायचं आहे. त्याला रागवायचे नाही. मारायचे तर अजीबात नाही. त्यामुळं पुर्वी जो धाक असायचा की ज्या धाकातून मुलं मायबापाची सेवा करायचे. ते आता दिसत नाही. आज जे घटक अभ्यासक्रम राबवतात. त्याच घटकांचं खाजगी आयुष्य पाहिलं तर त्यांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसतात. कित्येक ठिकाणी पती पत्नीचे वाद असतात. कित्येक ठिकाणी अशा स्वरुपाचा उपक्रम राबविणारा घटक वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो आणि कित्येक ठिकाणी त्या व्यक्तीचे हात हे भ्रष्टाचारात लिप्त असतात.
अभ्यासक्रम तयार करणे वा ती प्रक्रिया घडून येणे ही काही साधी पद्धत नाही. ती एखाद्या गर्भात तयार होणाऱ्या बाळासारखी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे एखादे बाळ गर्भात तयार होत असतांना त्या बाळावर आई कशी वागते. ती काय खाते पिते, त्या आईच्या सभोवताल कसे वातावरण आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम होत असतो. तोच परिणाम अभ्यासक्रम तयार करतांनाही होतो. ज्याप्रमाणे एखाद्या परीक्षकाचे पेपर तपासत असतांना त्याच्या मनात कोणते विचार येतात. त्याचप्रमाणे गुण पेपरवरही उतरतात. त्यामुळंच जेव्हा अभ्यासक्रम तयार होतो. तेव्हा तो तयार होत असतांना वा जो कोणी तो अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात कोणती भावना असते. त्यानुसार अभ्यासक्रम तयार होवू शकतो. मग तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीने रागात तयार केला तर तो राग अभ्यासक्रमात उतरणारच आणि तो जर आनंदात असेल तर तो आनंदही अभ्यासक्रमात उतरणारच. जेव्हा तो आनंदात असेल, तेव्हा तो ज्या कथेत आनंद व्यक्त केल्या गेला. ती कथा घेणार आणि जर तो व्यक्ती रागात असेल, तर राग व्यक्त केल्या गेलेल्या कथा घेणार.
महत्वपुर्ण बाब ही की अलिकडील काळातील अभ्यासक्रम हा देखील अशाच स्वरुपाचा तयार व्हावा की ज्यातून संस्कार फुलतील. अन् ते राबविणारे घटकही संस्कारक्षम वा संस्कार फुलविणारेच असावेत. ते घटक प्रसन्न व सुविचार बाळगणारे असावेत. जसा अभ्यासक्रमात संस्कार असेल, तसाच तो शिकविणारा घटक हा देखील संस्कारक्षम. उदाहरणार्थ अभ्यासक्रमात खोटे बोलू नका हा संस्कार सांगितला असेल तर त्या राबविणाऱ्या घटकानेही खोटे बोलू नये नव्हे तर त्याने खोटे न बोलता वागावे. तरंच अभ्यासक्रमातून संस्कार फुलतील. ज्या संस्कारातून घडणारी भावी पीढी ही संस्कारक्षम घडेल व देशातील गुन्हेगारीही कमी होईल नव्हे तर देशातही संस्कारक्षमता वाढीस लागेल. जी देशाच्याच विकासाच्या कामात येईल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०