ऍडव्होकेट ठमी
"सुमे!! मला माहितीये तूच माझा मेकअप बॉक्स चोरला आहे. काल मी सगळ्यांना तो दाखवत असताना तुझीच वाईट नजर होती त्यावर. " कुमी फणकारत म्हणाली.
"वा ग वा! तू काहीही म्हणशील आणि मी काय ऐकून घेईन होय!" सुमी रागावत म्हणाली.
"गल्स! रिलॅक्स! मी आहे न! सो चिल! आय विल मॅनेज एव्हरीथिंग!" ठमी अगदी ठामपणे म्हणाली आणि मला एकदम ठसका बसला.
ठमी अतिवेगाने तिच्या घराकडे पळाली आणि थोड्याचवेळात तिने एक लांबच लांब काळा कोट आणला
आणि माझ्या मनात धोक्याची घंटा खणखणली.
झालंही तसंच! तिने ऐलान करून टाकलं, " चला कुमी-सुमी, काही काळजी करू नका. आता कुमीची केस मी लढणार आहे आणि सरकारी वकिल म्हणून... " असं ती म्हणून माझ्याकडे बघणार एवढ्यात मी माझी नजर दुसरीकडे वळवली आणि आपण त्या गावचे नाही असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पाहिला पण छया! ते काही जमलंच नाही, ठमी एकटक माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, "सरकारी वकील सुमिकडून लढतील. "
"अगं पण माझ्याकडे काळा कोट कुठे आहे?" मी पळवाट शोधत म्हंटल.
"मग काय झालं? मी बोलत असताना मी कोट घालेल आणि तू बोलत असताना तूला लगेच काढून देईल. त्यात काय एवढं!" ठमी बेफिकीरीने हात उडवत आणि मान वाकडी करत म्हणाली.
'ठीक आहे, आलिया भोगासी असावे सादर ह्या अर्थाने तोंड पाडून मी सरकारी वकील व्हायला तयार झाली.
"हां तर मिस कुमी! आपली काय तक्रार आहे ती जज समोर..." असं म्हणून ठमीने डोकं खाजवलं कारण जज व्हायला कोणीच नव्हतं. तेवढ्यात आमच्याच गल्लीत राहणारा पण आमच्यापेक्षा तीन चार वर्षांनी लहान असा चार -पाच वर्षांचा पिंटू बाजूने शर्ट ने नाक पुसत पुसत जात होता. त्याला आवाज देण्यासाठी ठमी त्याच्याजवळ गेली आणि काहीतरी त्याला हातवारे करत, डोळे बारीक-मोठे करत, कसं तरी तिने एकदाचं त्याला जज व्हायला पटवलं.
इकडे तिकडे बघून एक मोठा खडक वजा दगड ठमीने एकटीने दात-ओठ खात आमच्या पुढ्यात आणून ठेवला आणि पिंटूचं बखोटे धरून त्याला आसनस्थ केलं. पिंटू ही आता पुढे काय होते ते बाहीने नाक पुसत पाहू लागला.
तेवढ्यात ठमीच्या डोक्यात काय आलं काय माहित ती लगबगीने पिंटू जवळ गेली आणि त्याच्या कानात काहीतरी पुटपुटली, सोबतच तिने एका हाताची मूठ दुसऱ्या हाताच्या पंज्यावर आपटली आणि ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन वकिलाच्या पवित्र्यात उभी राहिली.
"चला तर मिस कुमी सांगा तुमची काय तक्रार आहे?" ठमी मान झटकावत म्हणाली.
" माझा मेकअप बॉक्स सुमीने चोरला " कुमी ओरडली.
ती ओरडताच इतकावेळ नाक पुसणारा पिंटू हातावर मूठ आपटून 'ऑर्डर ऑर्डर ' असं किंचाळला.
त्याच्याकडे डोळे वटारून ठमीने बघितलं तसा पिंटू.. म्हणजे जज शांत बसला.
"हां तर मिस कुमी आपल्याला असं का वाटलं ते डिटेलवारी सांगा " ठमी केसांना झटका देऊन म्हणाली.
"मी मधल्या सुट्टीत सगळ्यांना मेकअप बॉक्स दाखवला आणि मग सगळया वर्गबाहेर चालल्या गेल्या फक्त सुमीच तेवढी वर्गात राहिली आणि मी दप्तरात तो बॉक्स ठेवताना तिने पाहिला होता आणि मी वर्गबाहेर गेल्यावर ती सावकाशपणे नंतर बाहेर आली होती. " कुमी ठासून सांगू लागली.
"अच्छा! म्हणून तुम्हाला तसं वाटलं. " असं कुमीला म्हणून ठमी जज साहेबा कडे पाहून म्हणाली, "दॅट्स ऑल युवर ऑनर " असं म्हणताना ती उजवा हात असा आडवा करणार होती पण तो काळ्या कोट मधून काही केल्या निघेना मग थोड्या प्रयत्ननंतर तो एकदाचा बाहेर निघाला.
ठमीने असं म्हणताच पिंटू उर्फ जज साहेब पुन्हा हातावर मूठ आपटून ऑर्डर ऑर्डर म्हणू लागला ते पाहून ठमी चवताळली आणि वेगात पिंटू जवळ जाऊन ती तिथे काहीतरी खुस्फूसली. ते ऐकून पिंटू ताडकन उठला आणि ठमी कडे तर्जनी दाखवून काहीतरी बोलू लागला आणि जायला वळला ते पाहून ठमी ने त्याचा शर्ट पकडला आणि पुन्हा जागेवर त्याला बसवलं आणि काहीतरी त्याला कबूल केलं मग तो शांत बसला. ठमीने लगेच मला कोट काढून दिला मी नाईलाजाने तो घातला.
मी कुमीची उलट तपासणी सुरु केली, " कुमी आपण सुमीला आपला मेकअप बॉक्स घेताना प्रत्यक्ष पाहिलं होतं का? "
कुमी जरा गडबडतच म्हणाली, " अ.. नाही.. म्हणजे मी घेताना पाहिलं नाही "
"म्हणजे सुमिनेच कुमीचा मेकअप बॉक्स चोरला ह्याला काहीही पुरावा नाही जज साहेब " मी पिंटू कडे पाहत म्हंटल. पिंटू कोणत्या विचारात होता काय माहित त्याचं लक्ष नव्हतं म्हणून जज साहेब असं ठमी ओरडली तसा तो भानावर येऊन पुन्हा हातावर मूठ आपटणार तेवढ्यात ठमीने डोळे मोठे करून 'जजसाहेब..' म्हणून असा आवाज काढला की पिंटू गपगार झाला.
"चला माझी उलट तपासणी ची वेळ झाली दे बरं कोट " ठमी म्हणाली आणि कोट पुन्हा तिने परिधान केला.
" मिस सुमी सगळ्यात शेवटपर्यंत वर्गात थांबून आपण काय करत होतात? स्पष्टीकरण द्या " ठमी
" मी पाणी प्यायला आली होती. माझं पाणी पिणं झाल्यावर मी वर्गाच्या बाहेर आली. मी कुमीचा मेकअपबॉक्स मुळीच चोरला नाही " सुमी
सुमीच्या बोलण्यावर आता काहीतरी धमाकेदार बोलावं म्हणून ठमीने तोंड उघडलं पण काहीच न सुचल्यामुळे तिने तोंड बंद करून कोट मला काढून देऊ लागली. तेवढ्यात एक बाई डोक्यावर टोपलं घेऊन आमच्या बाजूलाच येऊन बसली. मला वाटलं चला कोर्टात जसे केस ऐकायला लोकं येतात तशी ही आली असेल.
इकडे ठमीचा कोट काही केल्या निघेना म्हणून मीच म्हंटल "राहूदे मला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत."
इतक्यात ठमीला काहीतरी आठवलं म्हणून तीच सुमिकडे बघून बोलायला लागली, " मिस सुमी तुम्ही पाणी पिलं आणि वर्गात कोणी नाही हे पाहून कुमीच्या बॅगमधून त्यांचा मेकअप बॉक्स चोरला. बरोबर? "
"नाही नाही मी कशाला चोरू मेकअपबॉक्स? माझ्याकडे ह्यापेक्षा चांगला मेकअप बॉक्स आहे " सुमीने असे म्हणताच कुमी ओरडली, "जागं,जा! खोटारडे! तुझ्याकडे नाहिये "
"मी खोटी नाही. तूच खोटारडी आहे कुमे " सुमी ओरडली
" मला खोटी म्हणते थांब तुझ्या झिंज्याच हातात देते तुझ्या " कुमीने सुमीच्या वेण्या धरल्या. सुमीने कु्मीच्या नाकावर एक बुक्की लगावली.
"अरेरे! भांडू नका गल्स! आम्ही ऍडव्होकेट्स आहोत ना!" ठमी भांडण थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली.
"ओ जज साहेब! ओ युवर ऑनर " ठमी पिंटूला म्हणाली पण त्याचं लक्षच नव्हतं.
इकडे कुमी -सुमी चांगल्याच जुम्पल्या. ती मघाची बाई सुद्धा भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात ठमी ओरडली," ए पिंट्या!! आता कर न ऑर्डर ऑर्डर, आता कुठे तंद्री लागली तुझी बावळटा!!" ते ऐकताच पिंटू ऑर्डर ऑर्डर ओरडू लागला. इकडे ठमी कुमी आणि सुमीच्या मध्येत उभी राहिली आणि तिने दोन्ही हातांनी त्यांना दूर केलं तेव्हा कुठे त्या शांत झाल्या पण ह्या भानगडीत, झटापटीत ठमीच्या कोटची डावी बाही कु्मीच्या हातात आणि उजवी सुमीच्या हातात ट र्रर्र कन फाटून आली. सगळ्या एकदम स्तब्ध झाल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या.
तेवढ्यात "पिंट्या! त्या राजूच्या मामाने फॉरेन वरून चॉकलेट्स आणले रे तो वाटून राहिला आहे. चल लवकर!" असं पिंटूच्या मित्राने म्हणताच पिंटू बाणासारखा जे पळत सुटला की गायबच झाला.
ती मघाची बाई ठमीला म्हणाली, "ठमे! पाह्य हे काय झालं "
मला ती अशी का बोलतेय काही कळलं नाही. ठमीने मात्र सावकाश कोट काढून त्याच्या बाह्या घेऊन त्या बाई जवळ देत म्हंटल, " सॉरी हं बाई! ह्या बाह्या शेजारच्या टेलर काकू शिवून देतील तुम्हाला. "
ती असं म्हणत असताना माझी आत्या म्हणजे ठमीची आई तिथे आली आणि म्हणाली " ठमे! तुला काही लाज आहे की नाही? बोहारणीला दिलेला कोट तू घेतला. चल घरी! अभ्यास कर जरा, नाहीतर देते तुला धम्मक लाडू. मग करत बस ऑर्डर ऑर्डर "
ठमी तिच्या आईचा अविर्भाव पाहून पळून गेली. मी ही घरी जाणारच होती की तेवढ्यात कुमीची लहान बहीण तिथे आली आणि तिला पावडरच्या डब्याचं झाकण उघडून मागू लागली. तिचा संपूर्ण तोंडाला काजळ आणि लिपस्टिक फासलेला अवतार पाहून आणि हातातच कुमीचा मेकअपबॉक्स पाहून मी जे समजायची ते समजली पण सुमी मात्र कुमिकडे खाऊ की गिळू नजरेने बघत राहिली.
.
. ******************