"का गं वापस आली? शाळेत जायला निघाली होती न तू?",सुलभा म्हणाली
प्रतिभा यावर काहीच बोलली नाही ती मान खाली घालून उदास बसून राहिली.
"अगं तुला विचारतेय मी, अशी का बसली नाराज होऊन?",सुलभाने पुन्हा विचारलं
"ताई मला खूप कंटाळा आलाय, रोज मी शाळेत जाते त्या रस्त्यावर ती चांडाळ चौकडी असते आणि नाही नाही ते बोलत असतात, कधी एकदम जवळ येऊन घाबरवतात, त्यामुळे आज मी आणि माझी मैत्रीण घाबरून पळून आलो घरी. रोज कसेबसे जातो आम्ही शाळेत जीव मुठीत धरून पण आज कहरच झाला, आज त्यातल्या एका मुलाने माझ्या मैत्रिणीची ओढणीच धरली, ती आणि मी खूप घाबरलो तिने कशीबशी ओढणी सोडवली आणि आलो आम्ही पळून.",एवढं बोलून प्रतिभा रडू लागली.
"अच्छा असं आहे तर प्रकरण, हे तू मला आधीच सांगायला हवं होतं, शाळेत जायला दुसरा रस्ताही नाहीये, जो आहे तो फारच लांबचा आहे,एक काम कर प्रतिभे मला दोन दिवस दे मी विचार करते आणि सांगते यावर तोडगा,तोपर्यंत तू घरीच थांब",सुलभा म्हणाली.
दोन दिवसांनी सुलभा प्रतिभाला म्हणाली, "आता तू नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ शकते,अगदी कुठलीही भीती न बाळगता"
"खरंच! खरं सांगतेय तू ताई?",प्रतिभा आश्चर्याने म्हणाली.
"हो अगदी खरं!",सुलभाने तिला खात्रीपूर्वक सांगितले.
नेहमीप्रमाणे प्रतिभा आणि तिची मैत्रीण त्याच रस्त्याने शाळेत जाऊ लागल्या, हळूहळू चालत चालत रस्त्यावरचा तो कोपरा जवळ जवळ येत होता, ह्या दोघींची धडधड वाढली,तो कोपरा नजरेच्या टप्प्यात आला,आणि प्रतिभाला फारच आश्चर्य वाटलं, तिथे कोणीच नव्हतं. नेहमी असणारी चांडाळचौकडी गेली कुठे? असा विचार प्रतिभाच्या मनात आला आणि तिला जरा आनंदही झाला,पण अचानक कुठूनतरी ती चांडाळ चौकडी उपटली तर असा विचार करून तिला भीतीही वाटू लागली पण तसं काहीच झालं नाही त्या नीट शाळेत गेल्या, शाळा संपल्यावर त्याच रस्त्याने नीट घरीही आल्या.
घरी येऊन प्रतिभाने विचारले,"ताई आज चमत्कारच झाला! तू केलं ना हे सगळं? पण कसं काय जमवलं? सांग न!"
"हे बघ प्रतिभा, दोन दिवस मी तुला घरी राहायला सांगितलं न त्या दोन दिवसातच आम्ही हे सगळं केलं, माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी ह्या प्रकरणाची कल्पना दिली,पोलिसात तक्रार नोंदवली आणि इनपेक्टर सौदामिनी दांडगेना विश्वासात घेऊन एक प्लॅन आखला.
त्या दिवशी दोन मुली चेहऱ्यावरून ओढणी घेऊन त्या चांडाळ चौकडीच्या समोरून जाऊ लागल्या, त्यांचे परत आचरट बोलणे सुरू झाले तेवढयात एका बाईक वरून दोन हेल्मेट धारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या मुलांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला. ते मुलं ओय! ओय! करत डोळे चोळत बसले,अचानक काही बुरखाधारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या चौकडीच्या अंगावर चादर टाकली आणि त्यांना बांधून खूप धुतलं.
प्रतिभा अचंबित होऊन ऐकत होती.
"एवढयात सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन आली त्यातून इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे आणि काही महिला कॉन्स्टेबल्स उतरल्या त्यांनी त्या चांडाळचौकडीला ताब्यात घेतलं आणि तुरुंगात टाकलं, त्यांच्या आईवडिलांनाही मुलांकडे लक्ष देण्याची समज दिली.
दोन महिन्यांनी त्यांना सोडताना इन्स्पेक्टर सौदामिनी यांनी त्यांना सक्त ताकीद दिली,
"यापुढे कुठल्याही मुलीला छेडताना आढळले तर गाठ माझ्याशी आहे,बदला घेण्यासाठी जर वाकडं पाऊल उचललं, ऍसिड अटॅक करण्याचा प्रयत्न जरी केला तर आजन्म ह्या अंधाऱ्या कोठडीत तुम्हाला सडावं लागेल,सूर्यही दिसणार नाही तुम्हाला, याद राखा!"
"त्या बाईक वरच्या व्यक्ती, चेहऱ्यावरून ओढणी घेणाऱ्या मुली आणि बुरखाधारी व्यक्ती कोण होत्या?",प्रतिभाने विचारलं.
सुलभाने हसून सांगितलं," त्या बाईकवरच्या व्यक्ती म्हणजे मी व माझी मैत्रीण होतो आणि बुरखाधारी व्यक्तीही माझ्या मैत्रिणीच होत्या, चेहऱ्यावरून ओढणी घेणाऱ्या व्यक्ती दोन लेडी कॉन्स्टेबल होत्या."
"Thank you ताई! आता मी व माझ्यासारख्या सगळ्या मुली शाळेत निर्धास्तपणे जाऊ शकू.",प्रतिभा म्हणाली.
"सगळ्या स्त्रिया जर संघटित झाल्या न तर अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकतात, स्त्रियांची संघटित शक्ती अचाट आणि अफाट असते हे त्या गुंडांनाही कळलं असेलच."
. *************