"सीमा आपण लग्न करायचं तर एकाच मांडवात, तसं मी माझ्या आईबाबांना सांगितलं आहे. तू सुद्धा सांगितलं आहे ना काका काकूंना?" रीमा
"हो ग! आपण लहानपणी पासून ठरवलेलं मी कशी बरं विसरेन." सीमा
सीमा आणि रीमा बालपणापासूनच्या मैत्रिणी. शाळा एक, कॉलेज एक, नोकरीचे ठिकाण एक. आता लग्नाच्या वयाच्या झाल्या असल्यामुळे त्यांच्या आईबाबांनी त्यांच्यासाठी स्थळं बघणं सुरु केलं होतं.
सीमा ला एक स्थळ पसंत पडलं. मुलाकडील मंडळीची झट मंगनी पट ब्याह करण्याची इच्छा होती पण सीमाने त्यांना सांगितले की माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरल्याशिवाय मी लग्न करणार नाही. सीमाच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे सोहम ने ते मान्य केलं.
रीमाला मात्र एकही स्थळ पसंत पडेना. शेवटी होहो नाहीनाही म्हणता म्हणता रीमाने राहुल चे स्थळ पसंत केलं. ठरल्याप्रमाणे रीमा सीमा दोघींचे लग्न एकाच मांडवात लागलं. योगायोगाने दोघींचे सासर एकमेकांपासून जवळच होते. नव्या संसाराच्या नवलाईत पाच वर्षे कसे गेले हे चौघांनाही कळले नाही. दोन्ही कुटुंबातील आजी आजोबा नातवंड पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. अखेर रीमा आणि सीमा ने चान्स घ्यायचं ठरवलं. सीमा लगेच गरोदर राहिली पण रीमाला गर्भनिरोधक गोळ्या आधी घेतल्या असल्याने गरोदर होण्यात अडचण आली.
ह्यावेळेस सीमाला रीमा साठी थांबता आलं नाही. नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले तरीही सीमाला कळा आल्या नाही त्यामुळे तिचे सिझेरीयन करायचे डॉक्टरांनी ठरवले. एक चांगला गुढीपाडव्याचा मुहूर्त पाहून सीमा प्रसवली. तिला एक गुटगुटीत मुलगी झाली. रीमा सायलीच्या म्हणजे सीमाच्या मुलीच्या बारशाला आली आणि तिला राहून राहून वाटून गेलं की जर आपल्यालाही वेळेवर मूल झालं असतं तर आज त्याचंही बारसं असतं.
सीमाची मुलगी आता चार वर्षांची झाली होती.
अनेक उपाय करून शेवटी रीमाला आता दिवस गेले होते. सीमाची मुलगी आता चार वर्षे आठ महिन्यांची झाली होती. रीमाला साडे आठ महिने पूर्ण झाले होते. गुढीपाडवा जवळ आला होता तसा तिने तिच्या नवऱ्याजवळ तगादा लावला.
"राहुल गुढीपाडवा जवळ आला आहे. मला पण आपलं मूल गुढीपाडव्याला व्हावं असं वाटतेय "
"पण हे आपण कसं ठरवणार? ते डॉक्टरांनाचं ठरवू दे "
"पण जवळ जवळ नऊ महिने पूर्ण होतायेत गुढी पाडव्यापर्यंत मग काय प्रॉब्लेम आहे?"
"डॉक्टरांना विचारून बघावं लागेल."
ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी डॉक्टरांना विचारले. त्यावर डॉक्टर म्हणाले, "कसं आहे की वेळ पूर्ण होईपर्यंत आपण वाट बघायला पाहिजे. वेळे आधी जर बाळ सिझर करून जन्माला आलं तर काही प्रॉब्लेम येतोच असं नाही पण येण्याची शक्यता असते. "
तरी सुद्धा रीमाने तिच्या काही ओळखीच्या स्त्रियांचे उदाहरण देऊन, त्यांना कसे वेळेच्या थोडे दिवस आधी सिझर करूनही कसे चांगले मुलं झाले हे सांगून डॉक्टरांना तिचा मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न केला. शेवटी हो हो नाहीनाही करता करता डॉक्टरांनी जे होईल त्याला रीमा जबाबदार असेल ह्या बोलीवर गुढीपाडव्याला सिझर करण्याचं मान्य केलं.
गुढीपाडव्याला सकाळी रीमाला ऍडमिट केलं. त्यानंतर योग्य ती प्रक्रिया करून सिझर करून रीमाच्या पोटातलं बाळ काढलं. तिला सुद्धा मुलगी झाली होती पण ती क्रिटिकल कंडिशन मध्ये असल्याने तिला incubator मध्ये ठेवण्यात आलं. साधारण 20 ते 25 दिवस रीमाची मुलगी इनक्यूबेटर मध्ये होती. तेवढे दिवस त्या सगळ्यांना खूप त्रास झाला आणि खूप काळजी घ्यावी लागली. वेळेआधी बाळंतपण झाल्याने रीमाच्या अंगावर दूध ही पुरेसं येत नव्हतं. शेवटी रीमाला तिच्या मुलीला पावडरचं दूध द्यावं लागे.
शेवटी, एकदाचा रीमाला आणि तिच्या बाळाला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर काही दिवसांनी तिचे बारसे झाले. रीमाची मुलगी रिया दिसामासे वाढू लागली. पण रियाची प्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्याने ती वारंवार आजारी पडायची याउलट सीमाची मुलगी कमी आजारी पडायची.
अश्या तर्हेने वेळे आधी सिझेरियन करण्याचा अविचार केल्यामुळे रीमाला त्याची काही ना काही प्रमाणात किंमत मोजावी लागत होती. त्याचा तिला पश्चाताप सुद्धा होत होता पण वेळ निघून गेली होती.