Dusht Chakrat Adkalela to - 5 in Marathi Thriller by Pranali Salunke books and stories PDF | दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 5

Featured Books
Categories
Share

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 5

शलाकाला पाहून साधिकाच्या मनात एक संशय येतो मात्र सध्या श्रेयाला यातून बाहेर काढणं जास्त गरजेचं असल्याने ती आजीला काही सूचना देऊन तिकडून निघते. आज रात्री श्रेयाच्या शरीरात असलेल्या आत्म्याचा नायनाट करायचा या निर्धाराने ती घरी येते व शुचिर्भूत होऊन ध्यानाला बसते. 
------------------------------------------------------------
राजाध्यक्ष घरी येताच कपाटातून काही जुने पुस्तके काढतो. त्यातल्या एका पुस्तकातील फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरतात. खरचं आंजनेय जिवंत असेल तर...आपलं काही खरं नाही..त्याला एव्हाना आपण केलेली दगाबाजी कळलीही असेल. बापरे मग आपल्याला लवकरात लवकर त्याच्याविषयी शोध घ्यायला हवाय. पण त्याच्याविषयी माहिती कुठून मिळेल? अशा सगळ्या विचारात तो असतानाच त्याला त्याच्या कपाटात एका ठिकाणी लपवून ठेवलेला साधकांचा वेश आणि दत्ताची तसबीर दिसते. ते कपडे आणि तसबीर त्याने हातात घेताच त्याला आगीचे चटके बसत असल्यासारखा दाह बसतो. तो त्या वस्तू पलंगावर ठेवणार इतक्यात त्याचा मुलगा तिथे येतो. 
राजाध्यक्ष : सत्येश...काही काम आहे का...तू खाली जा...मी येतो हे आवरून... 
सत्येश : बाबा, हे काय आहे? 
राजाध्यक्ष : काही नाही... तू का आला आहेस ते सांग..
सत्येश : ते तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे म्हणून बोलवायला आलो आहे... 
राजाध्यक्ष : बर...तू हो पुढे मी आलो... 
सत्येश : ठीक आहे... 
राजाध्यक्षच्या खोलीत दत्ताची तसबीर पाहून सत्येश विचारात पडतो कारण एवढ्या वर्षात त्याने बाबाच्या घरात कधीच देवाची तसबीर पाहिली नव्हती. खाली येऊन तो त्या माणसाला चहा देतो आणि तिथेच बसून राहतो. राजाध्यक्ष खाली येताच त्याला भेटायला आलेला माणूस उठून उभा राहतो. 
राजाध्यक्ष : सुरेश कसा आहेस... बर झालं आलास ते मी तुला बोलणार होतोच... सत्या जरा मला चहा आणतोस का? 
सत्येश : हो आणतो.. 
राजाध्यक्ष : बोल काय बातमी आणली आहेस? 
सुरेश : अरविंद आठवतोय ना तुला...
राजाध्यक्ष : तो पोस्टमन?
सुरेश : होय... 
राजाध्यक्ष : त्याचं काय? 
सुरेश : त्याला मी विश्वासच्या घराबाहेर पाहिलं... दोन ते तीन वेळेला... 
राजाध्यक्ष : म्हणजे विश्वास पण साधक आहे ? 
सुरेश : होय पण साधकांमधला दुवा...त्याच्यामार्फत अरविंद इतर साधकांना मदतीची पत्रे किंवा निरोप पोहोचवत असतो.
राजाध्यक्ष : अस्स...मला आधीपासून त्या विश्वासवर संशय होताच... तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेव पण हे काम कुणा दुसऱ्याला सांग... कारण तुला आंजनेयचा शोध घ्यायचा आहे? 
सुरेश : वेडा झाला नाहीस ना? 
राजाध्यक्ष : अस का बोलतो आहेस ? 
सुरेश : अरे आंजनेयला मरून दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे...मी स्वतः त्याचा मृतदेह पाहिला आहे...विसरलास का मीच तुम्हाला ही बातमी सगळ्यात आधी दिली होती... 
राजाध्यक्ष : मला खरच आतून असं वाटायला लागलं आहे की तो जिवंत आहे.... 
सुरेश : कशावरून ? 
राजाध्यक्ष : सुदामाचा निरोप गेला आहे साधकांपर्यंत...आमचं कवच भेदून हा निरोप जाणं शक्यच नाही...मी आणि राजेशने स्वतः मंत्र मारून ते चक्र बनवलं होतं..ते आतून नाही तर बाहेरून थोडं भेदलं गेलं आहे... 
सुरेश : आणि असं फक्त आंजनेय करू शकत होता म्हणून तू तो जिवंत आहे असा तर्क लावलास? 
राजाध्यक्ष : हो... 
सुरेश : तू हे विसरतो आहेस का? आंजनेयचे शिष्य अजून जिवंत आहेत...त्यांच्यापैकी कोणा एकाला त्याने ही विद्या शिकविली असेल तर... 
राजाधक्ष : हा अंदाज नाकारता येत नाही...पण सुदामा हा त्याचा सगळ्यात आवडता शिष्य होता नाही का? आणि त्याच्यानंतर हाच आपल्याला भारी पडला असता...म्हणून तर आपण याला कैद केलं ना... पण मग आता कोण असेल...तू एक काम कर  आंजनेय कोण होता आणि तो खरच मेला आहे का ते बघ...आणि त्याचे ताकदवर शिष्य कोण हे पण शोधून काढ.... 
सुरेश : हो मी सगळी माहिती काढतो...मला एक दोन दिवस दे...
राजाधक्ष : मला सांग... तारिणीविषयी काही माहिती आहे का तुला? 
सुरेश : हिच्याविषयी मलाच काय कुणालाच काही माहिती मिळणार नाही...अशी व्यवस्था या साधकांनी केली आहे...
राजाधक्ष : सद्या ताकदवर साधक कोण आहेत... त्यातले पण तारक.. 
सुरेश : सध्या तरी मला असे दोघेच जण माहिती आहेत...तारिणी आणि श्रीपाद...दोघेही जबरदस्त ताकदवर आहेत...
राजाधक्ष : म्हणजे नक्कीच दैवी गुण असणार... गुरू कोण आहेत यांचे याची माहिती काढ...
सुरेश : हो लागतो कामाला...
राजाध्यक्ष : हो... सावध राहून कर सगळं..राजेशला पाठवतो तुझ्या मदतीला... 
सुरेश : हो चालेल...चल येतो... 
सुरेश निघून गेल्यावर सत्येश राजाध्यक्षशी बोलायला येतो. 
सत्येश : बाबा, हा चहा घ्या...
राजाध्यक्ष : तुला काही बोलायचं आहे का ? तर बोलून मोकळा हो...
सत्येश : बाबा मी आज आईकडे जाणार आहे...इथली रजा संपली माझी... 
राजाध्यक्ष : काय चार दिवस झाले पण...मला नीट बोलताही आलं नाही तुझ्याशी... आता परत केव्हा येशील... 
सत्येश : फोन करून कळवतो बाबा... 
राजाध्यक्ष : कधी निघणार आहेस...? 
सत्येश : थोडा वेळात निघेन...
राजाध्यक्ष : चल मग बाहेर जाऊन जेवू... तुझं आवडतं हॉटेल सांग...
सत्येश : ठीके चला...मी गाडी काढतो तुम्ही या पटकन... -------------------------------------------------------
साधिका ध्यानाला बसलेली असतानाच तिला गोष्टी स्पष्ट होतात. ध्यान झाल्यावर ती तिला लागणाऱ्या वस्तू तिच्या बॅगेत भरायला घेते आणि स्वतःची तयारी करायला घेते. ती तयार होऊन खाली आल्यावर उल्का लगेच तिला जेवण वाढायला घेते. 
उल्का : ताई, जेवून जा... उपाशी पोटी गेलीस तर ताकद कमी पडेल... हात पाय धुवून ये...
साधिका : आलेच मी... 
साधिका हातपाय धुवून दत्तांच्या आणि स्वामींच्या तसबिरीसमोर बसून त्यांच्या फोटोकडे एकटक पाहते. तिच्याकडे बघणाऱ्याला वाटेल की ती दत्तांशी गूज गोष्टी करतेय. एक १० मिनिटांनंतर ती देवाजवळचे भस्म कपाळाला लावून ती काही भस्म तिच्याजवळच्या छोट्या डबीत घेते आणि जेवायला बसते. 
साधिका : उल्का, मला रात्री उशीर होईल. तू वाट बघत बसू नकोस. माझ्याकडे किल्ली आहे.. 
उल्का : ताई, तुलाही माहिती आहे की मी तू आल्याशिवाय झोपणार नाही....आणि ज्या कार्याला जाणार आहेस तिथे तुझी कसोटी लागणार आहे...तेव्हा भरपूर जेव म्हणजे जास्त ऊर्जा मिळेल तुला.... 
साधिका : हो ग, त्या आजींच्या नातीला मुद्दाम अडकवलं आहे त्यात... तिच्या शरीरात असलेली शक्तीही खूप जुनी आणि ताकदवर आहे... त्या मुलीच्या शरीरातून मी तिला बाहेर काढू शकेन पण त्या शक्तीचा नायनाट करू शकेन की नाही हे माहिती नाही...मी माझी पूर्ण ताकद लावेन त्यासाठी... 
उल्का : ताईही, मीही तुला इथून मदत करेन... चालेल ना... आता तू इथे आहेस तर मलाही तुला मदत करून दे ना...
साधिका : हो पण सावधगिरीने कर... तुझ्याकडे मंत्र साधना आहे हे बाबाच काय पण बाहेरही कुणाला काही कळता कामा नये... गुरूंचे शब्द लक्षात आहे ना तुझ्या... 
उल्का : हो ताई, मी काळजी घेईन त्याची...
साधिका : चल मी निघते आता... बाबांना फोन लाव आणि विचार त्यांना घरी यायला किती वेळ लागेल ते? 
उल्का : हो... तू स्वतःला जपून कार्य कर... 
कोणत्याही कामगिरीवर जाण्याआधी गुरूंचे आशीर्वाद घ्यायचे या शिरस्त्याप्रमाणे साधिका गुरूंच्या घरी जायला निघते. बुलेटवर स्वार होऊन निघालेली साधिका विचारांच्या तंद्रीत असल्याने ती गुरूंच्या घराजवळ कधी पोहोचली हे तिला समजलेच नाही. गाडीवरून उतरून ती जंगलाच्या दिशेने निघते. तेव्हाच कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवते. विचारांमध्ये गुरफटल्यामुळे आपला पाठलाग होतो आहे लक्षात न आल्याने ती स्वतःवरच रागावते. एक क्षण डोळे मिटून ती पाठीमागे वळते आणि सरळ त्या व्यक्तीच्या दिशेने चालायला सुरुवात करते. हे पाहून त्या व्यक्तीला घाम फुटतो. तो तिथून पळ काढणार इतक्यात साधिका त्याचा हात पकडते. 
साधिका : कोण आहेस तू? आणि माझा पाठलाग का करतो आहेस? 
तो : मी काही तुमचा पाठलाग करत नव्हतो तर मी त्या दिशेला जातो... 
साधिका : कोणत्या दिशेला? कारण इथे एका दिशेला जंगल आहे आणि दुसऱ्या दिशेला स्मशान आहे... तुला नेमकं कुठे जायचं आहे...? 
तो : अं.... 
 तो काही बोलणार इतक्यात साधिकाचे डोळे चमकल्याने घाबरून त्याची बोलतीच बंद होते...पण नंतर तो अगदी शांत होतो. तो संमोहित झाल्याचे लक्षात येताच साधिका त्याच्या डोळ्यात पाहते आणि तिला या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा हेतू तिला कळतो. तिची माहिती काढणाऱ्यांची दिशाभूल व्हावी आणि या व्यक्तीलाही त्या लोकांनी त्रास देऊ नये यासाठी काहीतरी करावे लागेल असा विचार ती करते. तिने डोळे मिटून गुरूंचे स्मरण करताच तिच्यासमोर एक तबकडी प्रकट होते. त्या तबकडीचा वापर कसा करायचा हे माहिती असल्याने ती त्या व्यक्तीच्या हातातील घड्याळ काढते व त्यात ही तबकडी बसवते. त्याने बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार होत्या. मुख्य म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात राहता येईल व त्याचे रक्षणही करता येईल. 
साधिका : ज्या व्यक्तींनी तुला इथे पाठवलं आहे त्यांना सांगायचं कि ती मुलगी जंगलात गायब झाली...मी खूप शोधलं तिला पण मला ती सापडली नाही... आणि आता जिथून आला आहेस तिथे परत जा..
ती व्यक्ती यंत्रवत उठून चालू लागते. काही सेकंदात त्याच्या गाडीचा आवाज येताच साधिका सुटकेचा निश्वास टाकते आणि गुरूंच्या घराच्या दिशेने निघते. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
- प्रणाली प्रदीप