कौलाची वखार in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | कौलाची वखार

Featured Books
Categories
Share

कौलाची वखार

कौलाची  वखार

                                                                         

                         

                     ध्यानीमनी  नसताना  बापूमास्तरांच्या बदलीचा हुकूम आला. मुख्याध्यापक  तांबे  म्हणाले, “पण तशी  काळजी कराय नको.एक  म्हणजे राज रस्त्यावरचा  गाव , बापूमास्तरांची बहीण त्याच गावात  दिलेली  आहे  म्हणजे  दोन वेळच्या  पुख्ख्याची सोय  आणि  मुख्याध्यापक म्हणून बढती.   अजुन आठ वर्षे आहेत  रिटायर व्हायला म्हंज्ये  नाय म्हटले तरी पगारात दरमहा  चव्वेचाळीस रुपये  नी  पेन्शन  बारा  रुपये  तरी वाढीव मिळेल. ”  “हां  म्हणज्ये डोर्ल्यात काय? मग काय सोनां  नी पाणी....  शाळा  लय मोटी,   तीनशा  पट हा... माजो   साडभाव  नाना  देवरूखकर  त्याच शाळेत हा...  तुमी काय्येक फिकीर करू नुको मास्तर.आट वर्सा  मज्येत  ऱ्हावा  डोर्ल्यात.... ”  भुर्के मास्तरानी  दिलासा  दिला. बापू मास्तरानी  ही संधी सोडू  नये  असे  सगळ्याच  सहकाऱ्यांचे मत पडले. साधक बाधक विचार करता सहकाऱ्यांचे मत  बापूनाही पटले. त्यांची चार वर्षे भरपगारी  रजा साठलेली, इथे  तांबे  मास्तराने काय धड्या गांडीन रजा मंजूर केलीन नसतीन....तो  सायबाला भ्यालेला . आपण स्वत:च मुख्याध्यापक म्हटल्यावर  भरला अर्ज नी  फर्स्ट असिस्टंट कडे चार्ज दिला  की  काम भागले. हाताखालच्या माणसाना  मुद्दाम त्रास द्यायचा नाही एवढे पथ्य सांभाळले  तरी पुरे. असा विचार करून  बापूनी  डोर्ल्यात हजर  व्हायचे ठरवले. 

             बापूंची दोन मुलं  रवी आणि  धाकटी मुलगी अलका  रत्नागिरीला  खोली घेवून कॉलेजात शिकत होती. इथे  ते नी  बायको दोघंच समाईक घरात  त्यांच्या वाटणीला आलेल्या  मागिलदारच्या  दोन पडव्यांमध्ये रहात. डोर्ल्यात बर्व्यांकडे  त्यांची  बहिण  रमा दिलेली.  ते सात  भाऊ एकत्र रहायचे  .त्या खटल्यात रहाण्या

पेक्षा  खोली घेवून बिऱ्हाड  केलं  असतं  तर मुलानाही  अधेमधे येवून जायला सोईचं  होणार होतं.त्यामुळे  उभयतानी  कातवणचं  घर बंद करून  चालचलावू  भांडीकुंडी घेवून डोर्ल्यात  बिऱ्हाड   करून रहायचा बेत नक्की केला. दुसऱ्याच दिवशी  दोघही जागा बघायला  डोर्ल्यात गेली. गावात  ब्राह्मणांचा  चाळीस  उंबरा. सगळी घरं अजून नांदती  असली तरी पाचसहा  घरांमधली  मुलं  नोकरी धंद्याला  मुंबई पुण्यात  नी  डोर्ल्यात फक्त   म्हातारे  आईबाप....त्यामुळे बिऱ्हाडाला  जागेचा  तोटा नव्हता.  रमाच्या  शेजारीच  दामले काकूचे  चौसोपी घर. तिचा मुलगा गुजरातेत नोकरीला.बापूमास्तर नी   सुधा काकू च्या   रमाशी गप्पा चाललेल्या असतानाच दामले  काकू  तिथे आल्या. विषय त्यांच्या कानावर पडताच त्या बोलल्या,“बरं  झालं  बाई  मी  आत्ता  आल्ये ती....  मी सांगत्ये  बापूमामा तुम्हाला ,  आता  हजार पंधरा विषय  नको, तुम्ही  माझ्या  घरात  ऱ्हावा.... फुटकी  पै  सुध्दा  भाडं  नको. पाच वर्सापुर्वीच  माझ्या  अरूणने  पाषाणी भिंती घालून  दुरुस्ती नी काय काय सुधारणा करून घेतल्यान  आहेत. तुम्ही आमच्या  वाड्यात रहायला  आलात तर  मला  सोबत झाली  म्हणून त्याचाही  घोर मिटेल. ”  

                     बापू , सुधा काकू  नी  रमा आत्ते   जागा बघायला गेली. दर्शनी  ओसरी पडवी नी  मुख्य  दिंडी दरवाजाच्या बाजूलाच  असलेल्या दरवाजातून आत  गेल्यावर  सलग  तीन प्रशस्त खोल्या.पहिल्या  नी  तिसऱ्या खोलीतून राजांगणाच्या  चौकात जायचा दरवाजा.   डावीकडे  देवघर  नी  त्याला लागून  मूळ घराचे स्वयंपाक घर .  त्या लगत  पुन्हा  दोन खोल्या. नी  मागच्या  बाजूला  पडवीत  न्हाणीघर  नी  अंगणातच   विहीर. ओसरीवरून जायचं दार असलेल्या  दोन खोल्या  पुरेशा  होत्या.   सुटीला मुलं आली तरी  पुरेशी  जागा होती  बाहेर ओसरी  पडवीत  बसा उठायला मायंदळ जागा....पडवीत मोठ्ठा  झोपाळा...! मुलं  जागा खुश झाली असती. दामले काकू म्हणाल्या, “ मला  संगत  सोबत  झाली .....कधितरी  सणावारी  अरुण नी त्याची बायको  मुलं  चार दिवस राहून जाणार....दोनच  कां  तिन्ही  खोल्या  वापरात  राहू  देत तुमच्या.”

                   बापू  मास्तरानी  न्यायच्या  सामानाची बांधाबांध  केली. कातवण हे  जन्मगाव म्हणून हे घर म्हणायचं  इतकच. भाऊ बंदकीत हिस्सेरशी प्रमाणे एक पडवी वाटणीला आली.  एवढ्या कुचिंदर जागेत निर्वाह होणारा  नव्हता.म्हणून जुन्या पडवीला जोडूनच जरा  प्रशस्त पडवी काढून दोन खोल्या  केलेल्या. चौघांचं मर्यादित कुटुंबअसल्यामूळे अडचण भासली नाही  इतकच. त्यामूळे आवराआवरीचा  तेगार झाला नाही.  न्यायच्या सामानाचेही नेमके  सहा सात बोजे झाले.  गाडीरस्त्याने  जायचे तर चाळीसेक मैलाचे मकाण.   पण खाडीमार्गाने  शिडाची होडी भरतीच्या ताणावर दीड-पावणेदोन   तासात डोर्ल्याच्या जेटीवर पोचायची. त्यामुळे बापूनी त्यांचा विद्यार्थी मंग्या  गाबीत, त्याची  होडी  ठरवली .जायच्या दिवशी  द्वादशी होती म्हणजे  नऊ वाजता सवारी.  त्या आधी  दोन तास  होडी सोडली की भरतीच्या वेगावर  वल्हवण्याची तकस न  घेता  डोर्ल्यात पोचता आलं असतं.तिथे  उतरणावर चिरेबंदी जेटी ब्रिटिशांच्या  काळात बांधलेली होती. तिथे  खाडीचं पात्र  भरपूर रुंद नी पाणीही खोल.बंदरासमोर मोठं  जुवं  म्हणजे बेट.  त्याना  डोर्ल्यात  तालुका  वसवायचा  होता. पण  त्याचवेळी  महायुद्ध सुरू  झालं  नी  सगळंच  आटोपलं.

                    योजल्याप्रमाणे  बापू मास्तर  नी सुधा काकू  डोर्ल्यात डेरेदाखल  झाले.भाडं - मजूरी दाखल एक पै ही घ्यायला मंग्या तयार होईना. “गुरुजी, मी पाचवीत तुमच्या हाताखाली  आस्ताना  माजी  फाटकी  पाटलण बगल्यार  तुमी माका  नयो सदरोनी पाटलोण दिलास.  मी  सातवीत साळा  सोडलय तवसर  दरवर्साक कपडे  नी पुस्तकां  तुमी देय हुतास.... आज माजे दिवास चांगले  ईले .... माज्या हाताबुडी  चार तांडेल आसत .....पन मूळ कसा इसरू? तुमी माका चारआणे द्येवा म्हंजे  माजी लक्सुमी झाली  आनी  फुकट घितला ही म्हेरबानी  तुमच्यार नुको.”   मास्तरांच्या  नी सुधा काकूंच्या पायावर डोकं  ठेवून मजूरीची पावली त्यांच्या पायाला  लावून  मग आपल्या कपाळावर टेकवून रुमालाच्या शेवाला  बांधून मंग्याने खिशात ठेवली.आलेल्या  सहा सात जणाना  रमाआत्तेने  भरपेट  कांदापोहे  नी  रवा लाडू  खायला घालून त्यांची रवानगी केली. बापू  रहायला आले  नी  बर्व्यांकडच्या  मुलामाणसांची  दामल्यांकडे  येतूक जातुक वाढली. रमाची प्रदिप नी उषा आणि तिच्या जावांचीही शाळकरी मुलं अभ्यासाला  ओटीवर  येवून  बसायला लागली. रमाचा  नवरा  नाना,  संध्याकाळी दुकानातून येताना, रात्री  जेवणं झाल्यावर  गप्पाष्टकाना  यायचे.

                 नानांचा मोठा भाऊ   मधुकाकाने  डोर्ल्यात किराणा मालाचे दुकान चालू  केलेले . त्यात नाना  आणि  धाकटा सदू  यांची  चार आणे भागिदारी होती.  दुसऱ्या  दोघांचे शेजारच्या   शेर्पे  गावात किराणा  दुकान होते. दोन भाऊ मुंबईत नोकरीला होते.भातशेती, कडधान्य, नारळ-पोफळी नी  अलिकडेच कलमांचे उत्पन्न सुरु झालेले.  घरखर्च  उभ्या राशीतूनकरून बाकीची रक्कम गावात रहाणारे पाच भाऊ समान वाटून घेत.बाकी प्रत्येकाचे व्यवहार स्वतंत्र  होते .  कामाच्या  बाबतीतसुद्धा  अगदी पूजेपासून  ते स्वयंपाक पाणी , गुराढोरांचे गवतपाणी यांच्याही  पाळ्या लावलेल्या होत्या. म्हणून खाटखूट न होता एकोपा टिकून होता.बायकांचेही  हेवेदावे  धुसफूस  होत  नव्हती. अणपूर,शेर्पे, कडावल, गावठण,जांबरूण  यांच्या  मध्यवर्ती  डोर्ले.... तरळे राजापुर रस्ता  डोर्ल्यातून जायचा. शिवाय  खाडी मार्गे खाली विजयदुर्ग  नी  वरती खारेपाटणपर्यंत वहातूकीची सोय होती. बर्व्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर  बसस्टॉप. तिथे तर आजूबाजूच्या  गावातल्या  लोकांची कायम वर्दळ  असायची. त्यामुळे  किराणा दुकान एवढे  होबेस  चालायचे की, चार नोकर  असूनही  दुपारी संध्याकाळी  सगळे टेकीला येत.

                  गप्पांच्या  ओघात  मास्तरानी  नानाना  सहज सुचवले," इथे  खारेपाटण  शिवाय जवळसार  कुठे कौलाची वखार नाही. हा धंदा  इथे जोसात होईल. तुम्ही मनावर घ्या. एकतर माल  नाशीवंत  नाही. माल  साठून राहिला तरी  वर्षाला  दर वाढतच जाणार नी  विक्रीला पण काय तकस नाही. एक ऐरा गैरा नोकर असला तरी पुरे. मी पूर्वी  विजयदुर्गला  जांभेकरांच्या  पेढीवर असताना  अनुभव घेतलेला आहे. या धंद्यात रुपयाला  चार ते सहा आणे नफा मिळतो.  कारण एकदा माल नी  रचून ठेवला की मग इतर  उस्तवारी  नी खर्च  नसतो.” नानाना  किराणा दुकानात दोन आणे भागीत  फार मोठी मिळकत नव्हती. काहीतरी धंदा उद्योगसुरु करायचा त्यांचा मानस होताच. झालेलं  बोलणं  त्यानी आत्तेच्या कानावर घातलं. त्यांचा पक्का विचार झाला.रमाआत्तेने एक सुचना केली की, ते व्यवहारात जरा ढिसाळ असल्यामूळे  त्यानी  बापूंशी भागिदारीत  हा धंदा करावा. त्यांची साताठ वर्ष नोकरी आहे . मग तेही रिकामेच असणार.तोपर्यंत धंद्यातही जम बसलेला असेल. तेंव्हा पुढच्या धोरणाने त्यानीही भागिदारी घ्यायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी तिने हा विचार बापूनाही पटवला नी  दोघानी  आठ आठ आणे भागीत  कौलाची वखार सुरु करायचा बेत पक्का केला. मात्र लोकाच्या डोळ्यावर यायला नको म्हणून बापू पेन्शनीत जाईपर्यंत त्यांचे नाव फोडायचे नाही असे ठरले.

                  लगतच्या शनिवारीच मास्तर  नानाना  घेवून  विजयदूर्गला  बाळुकाका  जांभेकराना भेटायला गेले. भेटीचा हेतू कळल्यावर त्यानी कौलाच्या धंधातली  भगवद्गीताच  विषद केली. “सगळ्या  धंद्यात  कौलाचा  धंदा  हा जोखमीचा.  धंदा  म्हटला  की  त्यात उधारी  बूड  ही आलीच.  इतर धंद्यात सर्वसाधारण  परिस्थितीत  उधारी ही  सहा महिने वर्ष दीड वर्ष  एवढ्या मुदतीत  वसूल  व्हायची  शक्यता तरी असते.  पण कौलाच्या  धंद्यात  हे गणित वेगळे असते. घर बांधणीत अगदी शेवटची खरेदी ही कौलाची. एकजात सगळे घर बांधणारे अननुभवी  असतात. घर बघावे  बांधून अशी म्हण आहे. आरंभ केल्यापासून तो  काम पुर्तावे पावत  किती खर्च होईल  यचा  अचूक नी नेमका  अंदाज ब्रह्मदेवाच्या  बापालाही सांगता येत नाही. जरा चार पैसे हातात आले  की  माणूस  घर बांधायचे बेत करतो. नियोजीत खर्च  नी  आपली  कुवत याचा  ताळमेळ  न घालता  हा वेव्हार  करणारे  मग  आरंभा  पासून प्रत्येक  कामात ज्याला त्याला टोप्या  घालतात नी  यात शेवटची  टोपी कौलवाल्याला.”

              “ घरबांधणीत सगळेच अंदाज चुकतात नी वाढता वाढता वाढे असे  होत जावून माणूस  कफल्लक अवस्थेत  कौलवाल्याकडे जातो. आतापर्यंतच्या  नानाविध  अनुभवातून  तावून सुलाखून  तो पक्का शहाणा  झालेला  नी  निर्ढावलेला असतो. येनकेन हर प्रकारेण कौलवाल्याला मथवून आपला  कार्य भाग साधला  की  काखा वर करायलामोकळा!घरहा  विषयच असा आहे  की  यातझालेला खर्च म्हणजे अक्षरश:  खाई  असते. झालेला  खर्च  वसूल  करून देणारी ही गुंतवणूक नव्हे. त्यामुळे  घरापायी कर्जबाजारी होणारा  त्याच्या सगळ्या देणेकाऱ्याना कमजास्त प्रमाणात बुडवतोच नी यातही मोठा फटका  बसतो तो  कौलवाल्याला. कारण  थोडीफार वसूली  होऊन भागत नाही.  शंभर रुपये  मजुरीवाल्याला पन्नास मिळाले  तरी तो तगतो पण कौलवाला  मात्र मरतो.   रुपयावर रुपया  नफा  ठेवून  काय कौलाचा  धंदा करता येत नाही.  रुपया  मुद्दल असेल नी  त्यातले  साठ पैसे  किंवा ऐंशी  पैसे  वसूल  झाले , तरीही  भागत नाही.... अशी  दोनतीन गिऱ्हाईके भेटली  की  धंदेवाला रसातळाला गेलाच समजा! ” 

           “काय काय   गिऱ्हाईके  अशी बिलंदर की  रक्ताचा  थेंब  न येवू  देता  अच्चळ काळिज कापून नेतिल.  आठ दिवसाने  कौलं  न्यायची आहेत तरआज तुमच्या कडे येणार. दोनशे रुपयाचा माल न्यायचा  असेल तर  पंचवीस पन्नास आगावू हातावर टेकवणार. मिठ्ठासपणे सांगणार....भाऊनु काय हा..... ह्ये कामदार डोक्या फिरवून टाकणार .....आपूण  हातातआसले काय देवन्  मोकळे  नी आयत्या येळी मुद्याच्या टायमाक खिसो  रिक्यामो.  त्ये पेक्षा आज हातात आसताना लय थोडे  देवन ठेवलेले आसलेना  की दोगवांकव बरां.  मग तो माणूस  किंवा त्याचा  भाऊ  पोरगा  कोणतरी  आठ दिवसानी गाडीघोडा  घेवूनच येणार.कौलं ,कोने हा माल उचलणार, नी  चार दिवसानी  उरलेली रक्कम पोच करायचा  वायदा  करून निघून जाणार, बरं  आगावू  पैसे घेतलेले असल्यामूळे तुम्हालाही  भिड पडते.  त्याचे चार दिवस कधिच  संपत नाहीत नी उधारी कालत्रयी वसूल होत नाही.  उधारी फेडणारा  सुद्धा ज्या क्रमाने   उधारी ठेवीत गेला  त्या क्रमाने फेडित  जाणार.... सगळ्यात शेवटचा नंबर  कौल वाल्याचा! ”

                   “जर  या धंद्यात तुम्ही पडणारच  तर  सग़ळे धोके लक्षात घेवून  कोनाच्या  भुलवणीला बळी  न पडता  ठाम रहायला हवे. आलेला  कोणीही असो  तो  समोर  नोटा मोजून देईल तेंव्हाच   त्याच्यावर  विश्वास ठेवायचा.  बापूस  पाव्हणा  आला  म्हणून रेडा दुभवता  येत नाही. कौलाचे   गिऱ्हाईक  म्हणजे  चार  आठ  आण्याचा  वेव्हार  नव्हे. चार-आठ आण्याचा  किराणा  नेलान् ....  दिलेन तर दिलेन.... बुडवलेन तर  बुडवलेन   असं  म्हणून सोडून देण्याएवढा  हा  वेव्हार  किरकोळ नव्हे.....!  तजून  रजून  वागलेत  तर या धंद्यात चार पैसे चटकन हातात  येतात . प्रचलित  बाजार रहाटीत   कौलाच्या  धंद्यात  रुपयाला सहा आणे सुटतात. ठोक  व्यापारी  तुम्हाला निम्मे  मुद्दलात  सहा  महिने  मुदतीवर  माल देतो.  फूट तूट  तोच  सोसतो.  नग एकदा तुम्ही मोजून घेतलेत की मग तुमची जबाबदारी नी जोखीम  सुरू. तो वसूलीला येईल त्यावेळी  पैसे तुमच्याकडे  तयारअसले पाहिजेत ...त्याला  खाडपट्ट्या पासून वलाटीपर्यंत  वसूली  करीत फिरून रक्कम घेवून मंगलोर गाठायचे असते. मी  पाच वर्षामागेच  हा धंदा  बंद केला.  आमची  वखार  आता  झरकर  चालवतो. तुम्ही  महिनाभरात धंदा सुरु करणार तर  आज  तुम्हाला त्याच्या मार्फतीनच माल उचलावा लागणार. तो  एक आणा  कमिशन -  दहा  रुपयामागे   खाणार. ठोक  व्यापारी  येईल  तेंव्हा  मी त्याची नी तुमची भेट घालून देईन मग तुम्हाला  मधली दलाली द्यायला नको. ”

               “ सुरवातीला  तुम्ही  अर्धं  तारू म्हणजे   दहा  हजार  एवढा  तरी माल घेणार , त्याचे  तीन हजार  रुपये होतात. तुम्हाला निम्मे रोख द्यायला हवे म्हणजे  दीड हजारात धंदा  सुरु करता येतो.  सगळा  वेव्हार रोखीने केलात तर  माल  उठल्यावर  तुम्हाला  अकराशे  पावत फायदा होईल , दलालाला  कमिशन  अठरा  रुपये मिळेल. हल्ली   काय  मी तुमच्या  डोर्ले भागात फिरकलेला  नाय पण माझा आपला अंदाज...... महिनाभरात  तुमचा माल  उठेल. यंदा  अजून पाच म्हयने  सीझन आहे.... या  मोसमात  तुम्ही  दहाएक हजार  कमावाल..... पण एकच......धंदा पहिल्या मोसमात तरी   रोखी  शिवाय करू नका.  एखाद  दुसरे  गिऱ्हाईक  गेले तरी  तुमच्या  धंद्यावर  फारसा  परिणाम नाय होणार....  तो  ज्याच्याकडे  जाणार  तो अशी दोन-तीनपेक्षा  जादा  गिऱ्हाईके   झेपवू शकत नाही.  नी  तीन गिऱ्हाईके  तुटली म्हणून खण्डीच्या गोणाला पायलीची तूट येत नाय कधि....मी  पंचवीस  वर्षं  हा धंदा केला.  किराणा  मालाच्या  धंद्यात   समोरचा  बुडवणार आहे  हे  दिसत असुनही  मी कैक  लोकाना  बिनदिक्कत माल दिला.  पण तो फटका   भुई सपाट करणारा नव्हता. काही गिऱ्हाईके  तर अशी खट की ती सामान घेवून गेल्यावर   आमचे दिवाणजी  चेष्टेने  म्हणायचे की,  ही  उधारी मी मांडूनही  ठेवीत  नाही.  जी वसूल  होण्याची  शक्यता  आहे  ती मांडून ठेवायची ...ही दिली  तेव्हाच बुडाली    मग उगाच लिहायचे तरी कष्ट कशाला? पण  कौलाच्या  धंधात  सपशेल बुडवणारा मला   भेटूच शकला  नाही . यात कायते  समजा. बाकी इतर ग़ोष्टी बापू  तुम्हाला सांगेलच. त्याच्या सल्ल्याने वागा,  तुमचं  कल्याणच होईल.” 

      बापूमास्तरानी  बाळुकाकांच्या  पायाला स्पर्श करून हात जोडले.......“बाळु काका   तुमचा सल्ला   म्हणजे  ब्रह्मवाक्य!   नी तुम्ही जो अंदाज  केलात  तोही  माझ्या  अंदाजाशी  तंतोतंत जुळतो. ह्या मोसमात  पन्नासेक हजार कौल  सहज उठेल.... आमच्या  गावात आज घडीला  सहा  घरांची कामे सुरु  झालीहेत कमी  धरली  तरी सहाअडजे  पंधरा हजार कौलाचे गिऱ्हाईक  आज गावातच मिळणारे आहे! ” बापू मास्तरांचे बोलणे ऐकल्यावर नाना अवाक्  झाले.  जेवणखाण झाल्यावर  बाळूकाका म्हणाले, “ तुमचा बेत  नक्की असेल  तर  आठवडाभरात मला  निरोप धाडा.... कदाचित  या पंधरा वीस  दिवसात  कौलाचे  तारू  यायचे  असेल  तर मी  त्याची तुमच्याशी गाठ  घालून देईन म्हणजे  तुमचे  कमिशन वाचेल   तीनसाडेतीनशे  म्हणजे  लहान-सहान रक्कम  नव्हे.  नी  माझे म्हणणे  आहे की उडी मारणारच तर मग  अर्धवट  तरी कशाला? तुम्ही पुरे  तारू  उतरून घ्या..... माल ऱ्हाणार नाय हो.....कौले  ती.... नासणार कुसणार  थोडीच? हवेतर  दोन हजार  मी तुम्हाला बीनव्याजू  देतो.... हे  बर्वे  तुझे पाव्हणे  आहेत  पण माझ्या परिचयाचे नाहीत.   तरीपण  तू आलास ....तुझ्या भरवशावर मी बिनघोर शब्द दिला म्हणजे दिला! मी तुला  पैसे  देणार  बर्व्याना  नाही. बरें हे म्हणजे डोर्ल्याचे  सात बर्वे  म्हणतात त्यांच्यापैकीच काय रे? ”  त्यावर बापू म्हणाले ,“ हो,  हे  सातां पैकी पाचनंबरचे..”नाना म्हणाले,“ माझे मेव्हणे  म्हणून नाही सांगत, पण बापूंवर आमचा  नितांत विश्वास  आहे. त्यांचा अंदाज  किती  अचूक आहे याची  प्रचीती  तुमचं  बोलणं  ऐकल्यावर  मला  आली.  खरे  तर  या धंद्यात  त्यानी  आठ आणे  भागिदारी  घ्यावी  असे माझे  म्हणणे  आहे... माझ्या  हिश्शाची रक्कम  माझ्याकडे  आहे  बापूना  तुम्ही  शब्द  दिला अहात , आता काय अडचण नाही”  नानानी  विषय   फोडल्यामुळे   बापूंची तारांबळ  उडाली. पण सावरून   घेत  त्यानी  होकार दिल्याचे नाटक  केले नी आपण नोकरदार असल्यामुळे तूर्त  ही बाब आपल्यातच  असूदे  असे सांगितले.

            “वखारीला  जेटीच्या  जवळच कायम स्वरूपी  जागा  असली  तर बरे होईल..” बापू म्हणाले  त्यावर  नाना  म्हणाले ,  “दुसऱ्याकडे  सोधायला  नको  तिथे  दामले  काकूंचेच मरड  आहे .चार  पायरीची  कलमे  दोन फणसाची झाडे आहेत  बाकी मातब्बर काय नाय...तुम्हीच शब्द टाका.” त्याच  दिवशी  रात्री  नाना  गप्पा मारायलाआलेले असताना  आपण नी  नाना   भागीदारीत   कौलाचा  धंदा  सुरु करतोय  हा  विषय फोडून बापूनी  दामलेकाकूना जागेबद्दल विचारले.“नायतरी  ते मरड  पडूनच  आहे. नी तुम्हाला दोन भांगे  जागा लागणार  ....तुम्ही साफसफाई नी बंदस्ती करून घ्या . मी हा विषय  अरूणच्या कानावर घालत्ये , व्यवहाराचे  तो बोलेल  तसे होईल . तुम्ही आजच त्याला  पत्र लिहा. मी सही  करत्ये नी उद्या रजिस्टर करा. ”  दामलेकाकू म्हणाल्या.  मग लगेच  बापूनी  अरुणला  पत्र लिहीले. नाना  आणि रमा  घरी  जायला  उठली  तेंव्हा   काकू  म्हणाल्या ,  “अरुण  माझ्या  शब्दा बाहेर नाही.  विषय  त्याच्या कानावर   जातोच आहे .  तुम्हाला  बेणणी, बंदस्ती   काय करायची  असेल तर  खुशाल  काम सुरु करा.  तुम्ही का मला परके आहात?”    बाहेर  पडता पडता   रमा  म्हणाली,  “हा  विषय सुरू झाल्यापासून  सगळ्या गोष्टी  विना अडचण  जुळून येताहेत  हा शुभ संकेत आहे....  बापू  नी सुधा वहिनी  इथे  आली   ती  आमच्या   भाग्यावर!”

     बाळूकाका  सुरुवातीला सहाय्य करणार म्हणाले   तरी आपण त्यांचा  गैरफायदा  न घेता  दोन  हजार  रुपये उभे  करायलाच हवे .घरात   दोनशेची   भर  झाली  असती . शिक्षक पतपेढीकडून  हजारभर  कर्जावू    नी  हजार  प्रॉव्हिडंट फंडातून  उचल  करून दोन हजाराची जम होणारी  होती. त्या  कामासाठी  बापू  मास्तर  रत्नागिरीला  गेले.   शिक्षण विभागात  त्यांचे जुने स्नेही  शेवरे  आता  हेडक्लार्क च्या पदापर्यंत  पोहोचलेले.....वीसवर्षं रत्नगिरीला काढूनही  त्यांचा मालवणी  बाणा शाबूत राहिलेला. “येवा   हेडगुरुजी,   म्हटला   जुनी  दोस्तदारी आता  ईसारलास की काय....  ” त्यावर  पिशवीतून  रत्तलभर  आमसोलाची  पुडी  काढून “कसे इसारनार?  ही वस्तू  नाय  तर  तुमच्या  समोर  उबे  दुकु करुचास नाय  आमका” बापू म्हणाले. तेव्हा हसत, “हां, ह्यां बरोबर   कामा व्हती  जाती... काय तां व्हयत.... आमसोला  ह्यो आमचे हकवहा....चाय घेवया घोट  घोट.”  

      कामाचं बोलल्यावर,  हसत हसत  शेवरे  म्हणाले , “ फंडात्सून उचल घ्येतास  ता   काय चेडवाचा  लगिन बिगिन काडलास की काय?   भाटकर... हेडगुरुजीं कडून  फंडातून उचलघ्यायचा  अर्ज भरून घ्या. ”  मग काहीतरी अन्य कारण सांगून त्यानी  भाटकरांकडून  अर्ज  घेवून   तो  भरून शेवरेंकडे  दिला. त्यानी  वाचून  शिफारस  लिहून सही करून मग तो ईन वर्ड करून  घ्यायला पाठवला आणि चार दिवसात रक्कम मिळेल म्हणून सांगितल. तिथून लगेच ते  गाडी तळावर  शिक्षक  पतपेढीत गेले. मुख्याध्यापक नी शाळेचा शिक्का  सोबत असल्यामुळे तिथेही  अर्ध्या तासत  काम मार्गी लागलं  नी मग ते मधल्या आळीत  खेरांच्या वाड्यात मुलांच्या खोलीवर गेले.  अलका  वाचन  करीत बसलेली होती. रवी  सायन्सला असल्यामुळे त्याला  पाच वाजेपर्यंत प्रॅक्टिकलला थांबावं  लागे. त्यानी पिशवीतून दशम्यांची पुडी काढून  दिली .“ह्या दशम्या आहेत , पण कामांची खोटी नको म्हणून खात राहिलो नाही. तू पोळ्या केल्या असशील ना? त्या दे मला. ”अलकाने  स्टोव्ह पेटवून पोळ्या  नी  भाजी गरम करून  दिली.  त्यानी  दोन पोळ्या खाल्ल्या नी, पुरे  म्हटलं. मग ते जरा आडवे  झाले . 

     “अरे बापू कधि

आले?” रवीच्या आवाजाने  बापूना जाग आली.  तो पाय धूवूनआल्या  आल्या  तिने  दशम्या  नी  लसणीची चटणी  वाढून “मी रात्री जेवताना  खाणारेय... ” म्हणत भावाच्या पुढे  ताटली ठेवली . रवी  खायला  लागला आणि बापूनी  बदली पासून तो  दामले काकूंकडे बिऱ्हाड करी पर्यंत सगळं सविस्तर सांगितलं. त्यानी आत्तेकडे  गेलेली असताना दामल्यांचा  वाडा  बघितलेला  होता.बापूना  मुख्याध्यापक पद मिळालं   याचा  मुलाना आनंद झालेला होता.  “मी    दोन दिवस  येवू शकले असते  पण रवीच्या मॅथ्सच्या  सरांनी  रविवारी   क्लास ठेवलेनी  ते  बुडवून यायच तरी पंचाईत नी   त्याला एकटा टाकून येणं मलाच बरं वाटलं  नाही ... आता  पंधरा ऑक्टोबरला  सुटी लागली की दोघही  एकदम येवू.” अलका म्हणाली. आज बापूंच्या  तोंडून सगळा  तपशिल  ऐकताना  मुलं  अगदी  रंगून  गेली. मग हळू हळूबापूनी  कौलाच्या वखारीचा विषय  सांगितला. मुलाना तो  पसंत पडला.  रवी  बोलला, “मी  सांगतो बापू,   नानांचा  खोती कारभार....  ते  बडेजावात  संपले.  तेवढं मात्र बघा.  नी आधी  लोक कुठून  आणीत होते तेव्हा  गाडी खर्च  व्हायचा  तो आता  कमी होणार तेवढे पैसे  वाढवून तुम्ही दर सांगा.” मग   अलकाही बोलली, “ नानांचा  म्हणजे  होतए  जातए  असा कारभार , त्यांच्या भलुल्या  करील  त्याची कुवत न बघता  ते उधारी देवून मोकळे  होतील. त्यांच्यावर जरा चाप  ठेवा.” बापू मनात म्हणाले की, आता आपण समजतहोतो  तेवढी  मुलं  लहान राहिलेली नाहीत. 

      आठवडा  भराने  रक्कमेची  जम झाली , नी  दोन दिवसानी  अकस्मात बाळूकाकांची चिठ्ठी घेवून स्पेशल होडी करून  माणूस  आला.  कौलाचे  तारू  आलेले  होते   म्हणून  त्यानी  ताबडतोब  भेटायला  बोलावले  होते. जांभेकरानी   स्पेशल होडी  पाठवलेली  असल्यामुळे   बोलाचाली  करून निघायला  अवधी मिळाला. त्यानी नानांची भेट घेतली.दोघांची चर्चा झाली.कदाचित  तारूवाला  लगेच येणार असेल   तरी  नानांची तयारी होती.   माल  उतरायला गडी लागले  तरी माणसं जोडलेली होती.  फक्त  बंदरावरून यायची वाट जरा  नीट करायची होती. “मी पैसे आणून देवू का? मी  आलो तर  लोकांच्या  उगाच चर्चा नी तर्क-कुतर्क चालू व्हायचे.  तेंव्हा  तुम्ही एकटेच जावा . मी देवाला  नारळ ठेवून सांगणं करून ठेवतो नी वाट  सारखी करून घेतो. तारू  माल  घेवून येईल पण काय सांगता येत नाय.” नाना  म्हणाले.  बापूंचीही  अशीच अटकळ  होती . पैसे  सोबत नेण्याची गरज नव्हती. मास्तर  शाळेत  जावून संध्याकाळची    नी  कदाचित  थांबावे लागले तर दुसरे दिवसाचीही  रजा चिठ्ठी  देवून आले . मास्तर  घरी  गेले  तेंव्हा  रोजची  देवपुजा  करणारा  दत्तंभट  आलेला होता.   गंगा काकूचे  रांधप  अजून  झालेले  नव्हते. त्यानी  रमाला  बोलावून घेतले. त्यांचे मोठे  खटले, तेंव्हा भाजी  नी  भाकऱ्या तयार झालेल्या होत्या.  कशाला   नी काय  याची शब्दानेही चौकशी न  करता ती तिघांसाठी  डबे भरून आणायमला गेली.  पंधरा मिनीटात पूजा करून निघून गेला  नी  केळीच्या पानात बांधून भाकऱ्या  नी  भाजीचा डबा घेवून रमा आली.तिनेडोके चालवून फिरकीच्या झाकणाचा  पाण्याचा गडवाही  आणलेला. नक्की  नाही  पण  कदाचित  तारू  येण्याची शक्यता आहे हे  बापू बोलले.  दामले  काकूनाही  तशी कल्पना देवून  तिला नमस्कार करून बापू बाहेर पडले. हाताने थांबायची खूण करीत ती आत गेली.  देवाला नारळ ठेवला नी  अकरा रुपये  बापूंच्या हातावर ठेवून “ही तुम्हाला धंद्यासाठी भवानी,  तुमच्या  उदिमाची भरभराट होवू दे! ”असा तोंडभर आशिर्वाद दिला.

        बापू नी गडी जेटीवर गेले  तेंव्हा  नाना  गड्याना घेवून मरडात जायची वाट बेणीत होते.  होडीवाला   लांब जावून मासे  पागीत होता. बापू नाना ह्यानी  हातातले  फडकी फलकारीत  “ होय्यत्त  होय्यत्त”  असे कुकारे मारले . “ईलय   ईलय ”  असं म्हणत  होडीवाल्याने   पाग गुंडाळायला  सुरवात केली.  बापु नी गडी होडीत चढले आणि होडी सुटली. सुकतीच्या  ताणावर  फ़ार  व्हल्हवणी  न करता  होडी  सरसरत निघाली.    होडी  घोडेपोईला पोचली  तेव्हा  सुकतीचा जोर वाढलेला असल्यामुळे मध्यभागी   दहा  वाव  खोल  भाग वगळता  दोन्ही तडीना  भाट पडलेली होती." हय   एवडी भाट पडता  ह्या माका म्ह्यायत नवता,  मद भागात   कितीसा पाणी असात  रे?" बापूनी  विचारले. होडीवाल्याने  उंडलीवर आडवी टाकलेली सर्वात लांब काठी ओढली.   ही  ताज  (काठी)  सात पुरुस    (सुमारे पस्तीस फ़ूट)  आशे..... असं  म्हणत  ताज पाण्यात सोडली  हात लांब  करून पाण्यात ओठंगून अंदाज घेत, “छ्या  ठाव  लागना   नाय .... गडापास्ना ८वर खारेपाटण बंदरा पावत  जोरगतीची  सुकती  आसली  तरी केवरा पन मोटा जहाज नी तारू  जावक्  शकता.   फक्कस प्याशींदर न्हेनारी  मोटी बोट   घोडेपोय जवल  नी  वर मणच्या जवल  जुवा हाय  तिते  फाडा   अवरूंद हाय म्हनून अडाकनार. ” 

        सूर्य  माथ्यावर आलेला  नी  अर्धं  मकण संपलेले होतं   म्हणताना  भाजी  भाकरी  खायला होडी खळवायला सांगितली. शिदोरी  सोडून वर अच्चळ  ठेवलेले  केळीचे फाळके  मांडून  बापूनी  तळची गठळी  खोलली. आठ  भाकऱ्या ,  मोठ्ठा वाडगा  भर  फणसाच्या   आठळा  घातलेली  गावठी  लाल चवळीची उसळ  नी  बचकभर   आंब्याचं लोणचं होतं.  “ गुर्जी,  लोंचा तुमी दोघानी  घेवा नी उर्लेला माला द्येवा.... माजी  मजवेली मागारीण (त्याच्या तीन बायका ... मोठी,  मधली नी  धाकटी ) पोटुशी हाये त्येला लोंचा खायन सारा झाल्ला आशे.”  त्यानी  दोघांच्या फाळक्यावर  दोन  दोन भाकऱ्या उघडून ठेवून  दोन-दोन  लोणचाची  फोडं नी  बचकभर भाजी  घालून  आपला:फाळका लावला.भाकऱ्या चाचपून बघितल्या   एका भाकरीच्या दुडतीत  मुटक्या  एवढा लोण्याचा गोळा  होता. दोघानी  लोणी नको म्हटलं. “ तुमका नाय झ्येपला तर मी न्हेन,  माजी न्हानी जोरू  लोनी‌- धय  ह्येला लय हावरी. ” होडीवाला  म्हणाला. बापूनी स्वत:ला दोन भाकऱ्या , उसळ नी  निम्मे लोणी घेवून ते बोलले, “मला एवढं पुरे ,  तुम्हाला  घ्या नी  उरलेलं  होडीवाला  बांधून न्हेईल”.  गड्याने एक भाकरीनी  थोडीशी उसळ वाढायला संगितली.   भाकरी खावून  खाऱ्या पाण्याने हात धुतल्यावर बापूनी गडवा खोलला.  थोडं  पाणी  कुळच्यात घेवून हातावर  घातलं  नी वरुन    पाणी  पिवून   गडवा दोघांकडे   दिला . होडीवाल्याने   शिदोरी  आवरून शिस्तीत बांधून पायागती माशाच्या टोपलीत ठेवली. होडी   विजयदुर्गला  पोचेतो  एक  वाजायचा  सुमार  झालेला वाटला.

              बंदरात   कौलाचे  तारू   नांगरलेले  दिसले. होडीतून उतरून  दोघेही  जांभेकरांकडे गेले.  बापूंचा अंदाज खरा ठरला. नानानी  बापू  भेटून  गेल्यावर बाळुकाकानी  मच्छीमाराना बोलून ठेवले  होते. कौलाचे तारू  लांबून दिसल्यावर ते बंदरात येण्या आधीच बाळुकाकांचा निरोप पोच झाला .  तेंव्हा तारूवाला झरकराच्या वखारीकडे न जाता  जांभेकरांकडे  आला. तारूवाला जेवून खावून काकांच्या ओसरीवर  घोरत  पडलेला होता. “ गिऱ्हाईक  नवीन नी पुरा माल  घेणारं  म्हणून हजारी सव्वा रुपया  कमी  दर  ठरवला  आहे. मागच्या  खेपी कोन्यांचा  विषय  बोलायचा राहिला. ह्याने हजार कोने आणलेले  आहेत.   नगी दोन  आणे  दर आहे. मोसमात अध्ये-मध्ये  कोने आणातातच असं  नाही. तेंव्हा  ते पण सगळेच उतरून  घ्या. रात्रीनऊ नंतर  भरतीच्या ताणावर तुम्ही सुटा.” मग त्यानी कपाट  उघडून पैसे  आणले. आपल्याकडे  भर आहे, मग  लागले तर घेईन असं बापू म्हणाले.“हे बघ, धंद्यात   पैसा कमी  असला  तर करटीतलं  लोणचं  पुरवून  खायचं अशी गत होत्ये....माझी  मुलगी नी मुलगा  मुंबईत आहेत.मुलीच्या नवऱ्याचं गिरगावात हटेल आहे. मुलगा  हायकोर्टात वकिली करतो.दोघांकडे  लोखंडी कपाटं  भरून नोटांच्या थड्या  लावलेल्या आहेत. ते  ह्या  माझ्या पैशावर थुकायचे पण नाय....तू  झालं  तरी पगारावर  कर्ज व्याम काढून धीर करणार नी  हाप्ते  सुरु झाले  की रोज कसं भागणार ह्या चिंतेत  पिचत राहणार काळजीत!  हे अडीच हजार  आहेत, मला  पाच वर्षानी  सावकाश फक्त मुद्दल  परत दे. मी तोपर्यंत मरत नाही  नी  तू ही  आज आहे त्या हलाखीत रहायचा नाहीस ,  माझा पैसा कारणी लागला ह्यात मला आनंद. धंद्याचं काय तानमान ते मधेमधे मला कळव....  ते माझं  व्याज. ” 

      चारच्या  दरम्याने तारूवाला  उठला. बाळू काकानी  त्याच्यासमोर  दरा-दामाची  उजळणी केली. कानडी असूनही   कायम  इकडच्या  भागात फिरल्यामुळे  त्याला मराठी यायचे.   काळवं पडण्या आधीच बापूनी पाण्याचा  गडवा भरून घेतला नी  तारूवाल्या सोबत  बाहेर पडले.  वाटेत लळताच्या हॉटेलातून  चार प्लेट  गरम कांदा भजी  नी दोन  रवा लाडू बांधून घेतले.बंदरावर पोचल्यावर  होडीकरून दोघेही तरवावर गेले. बापूनी  कौलं-कोने  उचलून वाजवून बघितले. त्यावेळी बी.पिंटो, बंगलोर, मंगलोर हे  तीन  छाप चालायचे.बहुतेक जण  थोडे हलके, कमी दराचे पिंटो-बंगलोर  घेत. हा माल जरा उजवा  ‘मंगलोर’ होता.  तारुवाल्याने  मुंड्याच्या  खिशातून साखळीवालं  गोल डबी सारख़ं  घड्याळ काढलंनी ‘इंटू’  म्हटलं ... बापूंचा प्रश्नार्थक चेहेरा  बघितल्यावर हसून  “आठ्ठ वाजला  .... आजून येक घंटा लागतं बगा...”  तारवावर दोन कंदिल   लावून ठेवलेले. चांदण्याच्या उजेडात  सगळं  धूसर  दिसायचं, मधूनच  किल्ल्यावरच्या  दीपगृहाचा  झोत  फिरायचा. क्षितिजावर  माडबनच्या  बत्तीचा झोत दिसायचा. तांडेल जेवायला बसले. वीतभर रुंद नी मुटकावर  उंच  जर्मनच्या ताटलीत  चेपलेला  भाताचा ढीग नी त्यावर ओतलेल्या  कालवणात  बोट-बोट लांबीचे मासे...!. बापुनी  बचकभर भजी  ठेवून बाकीची तांडेलाना दिली नी ते बाजूला जाऊन बसले. 

        तांडेल जेवून तिथेच आडवे झाल्यावर बापूनी पुडी सोडून  एक भजं  पाण्यात  टाकलं.  भजी  संपल्यावर त्यानी  एक लाडू खावून वर पाणी प्यालं,  नी ग्रह तारे  बघीत राहिले . वेळेचा नक्की  अंदाज लागत नव्हता पण तासभर  होवून गेलेला असावा.....थंडगार  मतलय  सुटली  नी  चांगली  तरतरी वाटायला लागली.  गजर व्हावा तसे खलाशी उठून बसले. तारूवाल्याने घड्याळ बघित म्हटलं , ‘ओंबतु’ बापूनी  अंदाजाने  ओळखलं  नी म्हटलं, ‘नऊ वाजले? ’ त्याने होकारार्थी मान हलवली.  तांडेलानी नांगर  वर ओढून घेवून शीड सोडलं  नी  लांब दांड्याची वल्ही मारायची सुरुवात झाली. तारू  खाडीच्या नस्ताच्या रोखाने सरकायला लागलं.  मध्ये मध्ये वारा साधण्या साठी  शीडाची दिशा बदलली जायची. थोडावेळ गेला  नी  तारवाने  वेग घेतल्याचं जाणवलं . आता त्यांचा कंटाळा कुठच्या कुठे  पळाला.  तारुवाल्याने  घड्याळ बघित म्हटल  ‘अत्तू...’ म्हंजे  दहा वाजून ग़ेले हे बापूनी ताडलं . .काळोखामुळे  कुठे आलो काय पत्ता लागेना....

      ‘‘अन्नदु ....मालक अकरा वाजलं  की ...त्ये  तुमचं जेटी येतय् की ईतक्यात्त ....” तारूवाला म्हणाला, नी काळेखात जुवं नी  जेटीची धूसर  कड बापूनी   ओळखली. तारवाचं  शीड  पाडून   खाली  उतरण्यात  आलं. जेटी कडून बॅटरीचा  झोत  हलवताना  उमगला.... म्हंजे बहुतेक  नाना  अंदाज घ्यायलाआलेले दिसतात बहुधा..... त्यांच्या मनात  आलं  नी  त्याच वेळी... “होय्यत् ss होय्यत्त ” कुकारे  ऐकू आले. मग त्यानीही  “ होय्यत्त... होय्यत्त ” करीत प्रतिसाद दिला. आता  जेटीवरच्या माणसांच्या धूसर आकृत्या दिसायला लागल्या.मिनिटाभरातच दोन  पेट्रोमॅक्स चा  झळझळीत उजेड दिसायला लागला.  खलाशानी  ताजी  टेकवीत  तारू अच्चळ  जेटीच्या कडेला  आडवं लावलं नी  वाले  घेवून जेटीवर उड्या टाकल्या. जेटीच्याकडेवर ब्रिटिशानी  किल्ल्यावरूनआणलेल्या   आठ तोफ़ा अंतरा-अंतरावर उलट्या पुरलेल्या होत्या. त्याना  दोन   टोकाच्या   दोन  वाल्यांचे  वेढे  देवून  तारू  स्थिर करून नांगर  टाकला.“आमी  झोपती.... सक्काळि  माल  उतराचे बगा.”  तारूवाला म्हणाला.

           नानाआणि दोन गडी   तारवात  चढले. “आम्ही मुहूर्ताची  अकरा कौलं  घेतो ” म्हणत अकरा कौलं  गड्यांकडे दिली. बापूंच्या हातातला गडवा पिशवी गड्यानी घेतली. वाटेने जाताना बापू सांगायला लागले , “ तुम्ही अगदी बोलावल्या  सारखे  बरे आलात .... अहो  कोन्यांचा विषय आपल्या  लक्षातच आला नव्हता.... पण काळजी नको हजार कोना आलेला आहे.”  त्यावर “ भरतीचा अंदाज  असल्यामुळे  नऊ वाजता  सवारी  लागल्यापासून  गडी पाळतीवरच होते.  दहा मिनिटापूर्वी   तरवावरचे  दिवे  दिसले . ते जवळ जवळ  यायला लागल्यावर  मला वर्दी मिळाली  नी मी  बॅटरी घेवून खाली आलो.मगाशी मी तारवावर चढलो तेव्हा मला  कोने उमगले नाय काळोखात...” नाना म्हणाले.  “सगळे घरी  आले. उद्या   बारा गडी सांगितलेहेत,  कोनेनी आहेत  ना? अणखी  माणसे  सांगू का ?”  नानानी विचारलेनी .  त्यावर  बापू  म्हणाले,   “ होय , दहा बारा  बायल  माणसे  येवू  देत, काम वेळेवर आरेखेल  नी  आपल्यालाही अंदाज  येईल....”  कौलाची  एक  जुवळी  नानानी  देवापुढे नेऊन ठेवलेनी.   रमा, सुधाकाकू ,दामलेकाकू  सगळ्यानी  कौलं  हातात घेवून उलट  सुलट निरख़ून  वाजवून बघितली. “ बापू,अरे  तू  जेवायचा  असशील ना ?” रमाने  विचारलं. “तशी चवडाभर भजी  नी एक लाडू खाल्ला होता... पण जाऊंदे  अकरा वाजले  आता उद्या सकाळी बघुया...” बापू उत्तरले.

          सगळीच  झोपेच्या तयारीला  लागली. तारू कधि  येईल भरवसा नव्हता म्हणून , रात्री विरता  जेटीवर जावं  लागल तर घरच्याना तेगार नको म्हणून नाना  नी रमा इकडेच  झोपायाला आलेली. कंदिल बारीक करून उशागती ठेवून सगळी आडवी झाली .  भिणभिणताना  माणसांची कुलकुल आयकून  सगळे उठून बसले . गडी  पैरी सांगी प्रमाणे वेळेत हजर  झालेली. “तुमी दोन कळशो पानी  नी दोन तांबये घेवा  नी होवा फुडे, आमी येतावच मागना.”  नानानी संगितल्यावर सुधाकाकूने  रिकाम्या कळशानी  तांब्ये आणून विहीरीवर भरून न्यायला  संगितल,  सगळी जेटीकडे निघाली.बापू म्हणाले,“आपणही  मशेरी लावीत खालीच जाऊया. त्यांचं  काम सुरु करून देवून मग चहा घ्यायला  येवूया. कौलं  डाळायचं काम त्यांचे  खलाशी करतील . जरा चुक झाली  तर सगळा थप कोसळेल .एकदा माहिती झाली की मग आमचे गडी करतील.मीआज आधी थांबत नाय. म्हणजे  धंदा तुमचा आहे माझा काय संबंध नाय हे  पटेल  लोकाना, मी शाळेतून आल्यावर चक्कर मारून‌जाईन."                                                                                             तारवावरचे  दोघे तांडेल  कौलं चढावायला थांबले. चौघे  थप लावायच्या कामाला  गेले. बापयाना पंधरा  आणि बायल माणसाना  दहा कौलं   चढवून खेपा सुरु  झाल्या. मरडातला  जागा  चांगला सवथळ  करून दगडगोटा  विरलल्यामुळे डाळपाचं काम सोपं  नी  घट-मुट झालं. “थप पन्नासचा लावा जादा उंच नको.” मग  नानांकडे  निर्देश करीत बापू म्हणाले , “हे मालक  नानाशेठ, तुमचं नाव? ”  “नाव म्हजा रायण्णा, राम राम   नाना शेठ, म्हाल येक्क नंबर बघा...  सगळा ठपा सारका राहतो बगा..मंग हिसाब करायला  तकलिप ऱ्हात्त न्हाई  ...तुमी कोन म्हनायच?”     बापू म्हणाले,  “मी मास्तर आहे, नी शेठचा पावणा ! त्यांचा हिशोब माझ्याकडे ऱ्हातो. हे काम  कधी पुरे होईल  काय अंदाज? ” रायण्णा बोलले,“मदी जेवायला दोनतास सोडल तर अंदाज संद्याकाळला पाच  घंटे  टाईमला संपतो बगा.” नाना म्हणाले, “चला आता चहा पिऊन येवूया .”    दोणीवर तोंड  धुवून  तिघेही  ओटीवर  जाऊन बसले.  चहा पिऊन मास्तर घरी गेले  नी  नाना, रायण्णा  कामगारांचा  चहा नी पान-सुपारी घेवून जेटीवर गेले. 

       साडेदहाला शाळा सुटल्यावर  बापू मास्तरांबरोबर सगळे शिक्षक  नी  पोरंसुद्धा  जेटीवर  निघाली.  जेटी वर अख्खा गाव जमा  झालेला. नानांचे सगळे  भाऊ मदतीला  आलेले.  बापू सोबत्याना घेवून तारवावर  जावून  फिरून आले. माणसांचा नुस्ता  गांजिवला  सुरु होता. लोकानी  काय काय प्रश्न विचारून  नानाना भंडावून सोडलेनी. दुपारी  बाराला  जेवणाची सुटी झाली. नानानी  खलाशाना ही घरी जेवायला  नेलेनी. दोन  वाजता  पुन्हा कामाची सुरवात झाली. माणसं रवाना झाल्यावर नाना हिशोबाचं  विचारायला  बापूंकडे आले. त्यानी ठरल्या प्रमाणे दोन हजार  रुपये आणून दिलेनी. रायण्णाने  हजारी सव्वा रुपया  सूट दिली म्हणून त्याचा कौलांचा पुरा हिशोब  द्यायचा  नी  कोन्यांचा  हिशोब  पुढच्या खेपेला  असं ठरलं.  लोक दरासाठी पिच्छा पुरवीत होते, मागून पुढून तरी सांगायला हवाच होता.“ खारेपाटणात हलक्या मार्क्याला  हजारी  ऐंशी  रुपये दर  आहे. तो माल  जुना  शेवाळ धरलेला. मंगलोर   मार्का  एक नंबर!  कौल जड, पूर्ण तांबडं , ताजा माल, हजारी चौऱ्यांशी  घाऊक नी  किरकोळ  साडे आठ रुपये शेकडा. कोने घाऊक- किरकोळ  नगी तीन आणे.  माल इथे  पारखून घ्यायचा  वाटेत वहातुकीत फुटतूट  आमची जबाबदारी नाय.” बापूनी  सांगितले.

            साडेपाचला  बापू शाळेतून आले तेंव्हा  काम आवरतच आलेलं . सुधाकाकू, दामलेकाकू , रमा नी   तिच्या  जावा,   मुलं  सगळी जेटीवर जमलेली होती.  मोकळ्याला  लावलेला  कौलाचा  थप  डोळे फ़ाटतील असा .....एवढा माल  तारवात रहील यावर विश्वास  बसत  नव्हता. गावातली तालेवार मंडळीही आलेली.  माल ह्या भागात कुठेच मिळणार नाय असा  उजवा. रंग, आवाज नी वजन ह्याला जोडनाय हे जाणत्यानीही मान्य केलेनी. नानांचा दुकानदार भाऊ  मधुकाका  आलेल्या  दर्दी माणसाना  अभिमानाने सांगत होता, “ही बापूमास्तरांची  पारख हो,  आम्ही पैशाचे जिम्मेदार, मास्तर  पूर्वी  विजयदुर्गात  जांभेकरांच्या पेढीवर होते. कौलाची खरेदी-विक्री सगळी ते एक हाती सांभाळीत.  त्यांच्या जीवावर आम्ही उडी मारलीए....” ऐकणारानी  माना डोलावल्या. बापूनी  बायका मंडळीना  तारवावर फिरवून आणलेनी.  या तारवात इतका सगळा माल  कसा काय राहिला ? याचे त्यानाआश्चर्यच वाटले. माल उतरून झाला  नी  बापू,नाना रायण्णाला हिशोब करायला घेवून गेले. ठरल्या प्रमाणे हिशोब मिटला. कोन्यांचा व्यवहार अर्धा अधिक माल ऊठल्यावर केला तरी  रायण्णाला चालणार होता. हा माल उठल्यावर  नवी  ऑर्डर  द्यायची तर बंदरावर पिलणकराच्या किंवा लळताच्याहॉटेलवर ‘डोर्ले  जेटीवर   माल  टाका ’ अशी रायण्णाच्या नावची चिठ्ठी ठेवायची. दर पंधरवड्याला  मंगलोरहून कोणी ना कोणी खेप करतोच. तो सगळ्यांकडेचौकशी करून निरोप पोचवतो , सगळेच एकमेकाना मदत करतात. त्याने रक्कम घेवून पोच पावतीवर सही करून दिली.

           दुसरे दिवशी आठवडी बाजार होता , नानानी  दुकानाबाहेर पन्नास कौले नी दहा कोने  मांडून  ठेवले. त्यावर  कोळशाने किंमत लिहीलेली होती. बरेचजण मरडावर जावून कौले  कोने  बघून गेले. दुपारी बापू नी नाना  माल मोजून आले. कौलं गिऱ्हाकाला देताना  कडेला कोळशाची खूण लावून  कशी मोजायची ते बापूनी नानाना  दाखवलेनी. घरी आल्यावर एका वहीत सगळा हिशोब मांडित असताना दामलेकाकूनी ओसरीवरच्या लाकडी कपाटाची चावी देवून, “हे उचलून आत खोलीत ठेवून घ्या नी तुमचे हिशोब ठेव रेव करायला वापरा ” म्हणाल्या. संध्याकाळी मास्तर शाळेतून आले  तोपर्यंत नानानी गड्यांकडून कपाट बापूंच्या खोलीत न्हेवून ठेवलेले  होते. दोन दिवसानी  चार हजार कौलं नी  सव्वाशे  कोन्याचे गिऱ्हाईक आले  व्यवहार रोखीचा पण दराला लोचटपणा करीत होतं . नाना बधेनात.... त्यानी  बापूना बोलावून घेतलं . बापूनी  तोड केली . सग़ळ्या हिशोबात गाडी भाड्यापोटी  पंधरा कमी द्या.... मात्र हे  कोणाला बोलू नका.  पहिलं गिऱ्हाईक म्हणून नाना झीज सोसतील . सौदा पटला मास्तरानी पहिली भवानी मोजून घेतली.   आठवडाभरात  पंधरा हजार कौले  नी पाचशे कोने संपले. दर कमी करून मागणाराना रक्कम कमी करण्याऐवजी पंचवीस कौलं   जादा   दिली  जायची .      दोघानीविचार करून विजयदुर्गात  माणूस  पाठवून लळताच्या  हॉटेलवर  रायण्णाला  हजार कोने नी  कौलं पाठवायला  चिठ्ठी ठेवली.  गिऱ्हाईक  वाढल्यावर  बापूनी  आपल्या वतीने  पूर्ण  दिवस   गडी ठेवला. पोरगा  उमेदवार  नी हुन्नरबाज ....  रहिल्या दिवसापासून  मन लावून काम करायला लागला. शाळा झाल्यावर बापूसुद्धा  कायम वखारीत थांबायला  लागले. पुढच्या  चारपाच दिवासात थप भसाभसा कमी व्हायला लागल्यावर गावातले  दोन घरं बांधणारे  भेटायला आले   तेव्हा जेमतेम चार हजार कौलं  शिल्लक होती. “असा काय नाना..... आमका रखडवतास काय....म्हाल सोपत इलो...आमका आदी सांगतास तर आमी म्हाल ताब्यात घितलो आसतो.” मास्तर म्हणाले, “आतासा आडा ठेवन झाला...तुजी रिप ठोकून होयसर  पंदरा दिवस जाती... तुजी खोटी करणार नाय,” हे  बोलणं  सुरु असताना  जेटीवर  तारू आलं.  दहा मिनिटानी  रायण्णा  हजर झाला... “तुमी चिटी टेवला;ते रातीच मला मिळाला  बगा. म्हाल  सगळं  आनी  सपलं म्हणा की,  ह्या खेपेला  ज्यादा भरताड करून आणलो की...”

           रायण्णा तारू घेवूनआला नी तासा भरात निरोप न पाठवताच मागच्यातले  दोघे  कामगार आले, “ तारू इलेला कळला म्हनान इलाव...दुपारपास्ना येवचा ना? ” नाना हसून म्हणाले ,“नुको ह्या टायमाक आमी भाव  नी  बायल मान्सा  तारू खाली करनार हाव.”  ह्या वेळी  कौलाची  पाच हजार अधिक भरताड होती.नाना बापूनी  कौलांचा नी  संपलेल्या  कोन्यांचा  हिशोब  भागवून टाकला.

             पुढच्याच  सोमवारी  अरुणचे  आईला  पत्र आले. त्याने बापूना मरडाचे मुखत्यार पत्र रक्कमेचा उल्लेख न करता करून द्यायला सांगितले. तो दत्तजयंतीला  आल्यावर आर्थिक बाबतीत चर्चा करणार होता. दरम्याने वाड्याच्या छपरावरचा नळानी खापरे पूर्ण बदलून मंगलोरी कौले नी कोने याच्या खर्चाचाआकडा लगेच कळवायला लिहिले होते. नाना नी बापूनी लगेच  छपराची मापे घेवून अंदाज केला. चार हजार कौले  नी दीडशे   कोने  गृहित धरून अंदाज केला रिप बदलण्याची गरज नव्हती .फक्त नळा उतरून लांब नेवून ओतायचा नी  कौले चढवायची  मजूरी काय होईल ती . असे सविस्तर पत्र  लिहून दुसऱ्याच दिवशी रवाना केले. दहाव्या दिवशी   त्याची  एक हजार रुपयाची तार मनि ऑर्डर आली.मजकूरात मुद्याच्या  चार ओळी होत्या. “नाना, बापूमामा  सवडीप्रमाणे  काम करू देत. प्रत्यक्ष  काम करताना अंदाजापेक्षा  जादा खर्च  होतो म्हणून अधिकचे पैसे पाठवले आहेत. आणखी लागले तरी कळवावे. कौलाचा दर माझ्यासाठी कमी करू नये. - अरूण”  छपराला पटई असल्यामुळे सामान हालवा हालवीचा प्रश्नच नव्हता.बापूनी दत्तंभटाला दिवस बघायला  सांगितला. 

          दत्तंभटाने  अवस झाली की  दुसऱ्याच दिवशी काम सुरु करायला  सांगितले. त्याप्रमाणे चार दिवसानी काम सुरु झाले. दोन दिवसात नळे खापरे ठिकाणात एका टोकाला ढीग मारून झाला. पुढच्या  तीन दिवसात कौले  चढवून माळवदावरची झाडलोट करून काम पुरे झाले. दामले  काकूने  स्वत:  हिशोब करून  कौला-कोन्यांची रक्कम नानांकडे दिली. मास्तरानी  पुन्हा पुन्हा सांगूनही  तिने पाच पैसेही  कमी करू दिले नाहीत. मंगलोर पडल्यावर  वाड्याचे  रूपच पालटले.   गावातले  लोक  येवून येवून  वाडा बघून खुश होऊन जात.  दोन दिवसानी  मास्तरांची   मुले रवि नी  अलका  सुटीला आली. मोठी झालेली. मुले आल्यावर पाय धूवून झाले नी चहाखाणे न घेता  त्यानी प्रदिप, उषा नी  त्यांच्या चुलत भावंडाना  बोलावून राजांगणा  भोवती  धावाधावी सुरु  केली. मग   झोपाळ्यावर बसून दणक्या झोप्या काढीत गाण्यांच्या भेंड्या सुरु केल्या.  संध्याकाळी  मास्तर  नी  नाना आल्यानंतर त्यांचा हुदूदू  जरा बंद झाला.  रवि - अलकाकडे  कटाक्ष  टाकीत नाना म्हणाले,“पाळंदिला  लागल्यावर  कान्हेर  आईकला  तेंव्हा  काय  उलगडेना  ..... आत्ता  कारण कळले.... ” 

       वदामल्यांच्या वाड्याचे काम झाले  नी  मंगलोर  घालायची साथच सुरु झाली.  दर दोन‌- तीन दिवसानी  कुणीना कुणी वाड्याचा  मालक  येवून ऑर्डर देवून जायचा.दरपंधरा-वीस  दिवसानी  कौला-कोन्यांचा  ढीग हातोहात उठायचा. वाड्याची गिऱ्हाईके  बिनबूड  नी त्यांची इतरही काय खटखट नसायची. बघता बघता  सात आठ  सिझन कधी मागे पडले  ते कळलेच  नाही. मास्तर  रिटायर झाले तो  काळ  तर  मंगलोराच्या ऐन  बहाराचा.  या काळात  सामाजिक   परिस्थिती   झपाट्याने  बदलत चालली.  लाईट  आले,  रस्ते  आले, वाहनं  आली. हलाखी  कमी  झाली  नी  लोकांच्या  हातात चार  पैसे  खुळखुळायला  लागले.  त्या काळात कोलव्याची (गवत) नी  कारवारी नळे, खापरं यांची  छप्परे असायची. बापूंच्या  उत्तरायुष्यात  मंगलोरी  कौले - कोनेयांचा  जमाना सुरु  झाला. या स्थित्यंतराचा अचूक वेध बापूमास्तरानी घेतला नी आपल्याबरोबर आपल्या  मेव्हण्याचेही भाग्य  त्यानी पालटले. ते डोर्ल्यात आले तेव्हा  सगळ्या  पंचक्रोशीतली घरं  नळ्याच्या नी कोलव्याच्या  छपराची होती. वखार सुरु  झाली . बहुसंख्य   छपरांवर  मंगलोर  चढला.

            बापूमास्तर  म्हणायचे ,  “चौदा  वर्षाच्या काळात रामायण  घडते...” तसे   डोर्ल्यात  झालेले  स्थित्यंतरही   माणूस  चकरावून जाईल  असेच! सहा  वर्षामागे   दामलेकाकू गेल्या त्या  महिनाभर  आंथरूणावर खिळलेल्या....  सुधाकाकूनी  त्यांची मुलीप्रमाणे  सेवा केली. त्यांचा  मुलगा ,सून, नातवंडे आली तेंव्हा जेमतेम  धुगधुगी  होती इतकेच. ते चित्र बघून अरुण  आवाक झाला. “ बापूमामा ...  मी  तुमच्याशी मामाचे नाते  जोडले  ते तुम्ही  शब्दश:  सार्थ केलेत.”दोनच  दिवासात काकूनी डोळे मिटले . ते एक पर्व संपले.  तसाच  बैलगाड्यांचा जमाना संपून  टेंपोचा जमाना आला. शिडाची  तारवं   गेली  आणि  डिझेल  नी पेट्रोलवर  चालणाऱ्या मोटर   बोटी  आल्या. आता भरती सुकतीच्या ताणाची वाट बघित  थांबायला लागत नसे. लळिताच्या किंवा पिळणकराच्या हॉटेलात  चिठ्ठी  ठेवायची गरज:उरली  नाही. बसल्या जागे वरून दोन मिनिटात फोनने ऑर्डर  देता येवू लागली.  आठवड्यात  पंचक्रोशीतली  चार पाच   गिऱ्हाईके  व्हायची. पूर्वी  घरं  मोठी असायची . एक गिऱ्हाईक खेपेन तीन ते  चार  चार  हजार कौले  खरेदी  करायचे. आता घरं लहान झाली.गिऱ्हाईक  दीड दोन हजार कौले  घेणारी!  पण:आता तीन चार गिऱ्हाईके  रोज  व्हायला  लागली. धंद्यावर दिवसभर ठायमूर  बसायला  लागायचं. एका नोकरावर काम भागेना म्हणून आणखी दोन नोकर ठेवायला लागले.  दर पंधरवड्याने येणारा  तारुवाला  चार दिवस उशिरा  आला तर माल  संपायला लागला.  येणारी गिऱ्हाईके  फारशी हुज्जत न घालता   सांगाल  तो दर मान्यकरून नोटा काढून टाकायला लागली.  नफा  मुद्दलाच्या दीडपट मिळायला लागला. 

          मास्तर  डोर्ल्यात  आले  तेंव्हा  गावात पाच-सहा  घरे सोडली  तर  बाकीची घरे  माणसानी  भरलेली  असायची.पण आता निम्मेघराना  कुलुपे लागली. सात बर्व्यांचे  घर तर माणसानी गजबजलेले. गावात नी जवळसार माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती  म्हणून सातवी झाल्यावर  रमाने आपली दोन्ही मुले  शिक्षणासाठी  मुंबईला दिरांकडे ठेवलेली. पण  घरात  जावांची  साताठ  मुले होती म्हणून  तीला  आपली  मुले  जवळ नाहीत याची बोच  जाणवली  नाही. सातवी झाल्यावर  पुढच्या शिक्षणासाठी म्हणून  एकेक मूल घराबाहेर पडू लागले.  हायस्कूल, कॉलेज  करून नोकरीच्या निमित्ताने मुलं  पुण्या  मुंबईला  स्थायीक झाली. आता  घरात  फक्त  म्हातारी  माणसे  राहिली.  बापू  मास्तरांचा मुलगा  नी सून  दोघेही  नोकरीला नी बड्या हुद्द्यावर लठ्ठ पगार घेणारी . पण लग्न होवून  दहा वर्षे उलटली तरी  मूलबाळ  झालेले नव्हते. ते एक शल्यच होते.    रमा  आत्तेला कसे काय सुचले कोण जाणे... त्या  वर्षी  दत्तजयंतीला रवी नी  केतकीला तिने मुद्दाम बोलावूनघेतले..  दत्त जन्माच्या वेळेस  केलेले नारळाचे  बाळ तीने  योजूनच केतकीच्या ओटीत घातले.  महिनाभराने   सुधाकाकूला   मुलाचा फोन आला,  दहा वर्षा नंतर केतकीला  दिवस गेले होते. उंच वयातले  गरोदरपण .....  डॉक्टरानी सांभाळून रहायचा सल्ला दिलेला. म्हणून  त्याने  आईला  पुण्यात यायची गळच घातली.  दोन दिवसानी  न्यायला  गाडी आली, सुधावैनी  बरोबर रमाआत्तेही   रवाना झाली.

            बाळंतपण  सुखरूप पार पडले, मुलगा  झाला. बारशाला  बापू ,नाना   रमा आत्ते पुण्याला  गेले. गजाबारात  बारशाचा  कार्यक्रम झाला.  दुसरे दिवशी  मुलाने  योजूनच  विषय  काढला.  सुधाकाकू आता डोर्ल्यात  परत जायचीच नव्हती, नी ते सयुक्तिकही  होते. नवसासायासाने  झालेला  नातू... ती  खंबीर  असताना  त्याला  बेबी कीपर कडे सोपवून  डोर्ल्यात   जायला ती तयार नव्हती आणि  तिला जावू  द्यायला मुलगा रवि  नी  सून केतकी  तर त्याहून  तयार  नव्हती .   पैशासाठी  बापूनी  डोर्ल्यात एकटे राहून कौलाचा धंदा  सांभाळण्याचीही  गरज नव्हती. धंद्यातली  भागिदारी जीवाभावाच्या  माणसाशी.... आज  तारखेला  जी  कौले असतील  त्यांची किंमत  त्यातली निम्मे  एवढेच कॅपिटल.... ते सुद्धा  न घेता  दामल्यांकडच्या   बिऱ्हाडातले  सामान अस्ताव्यस्त  राहू नये  म्हणून  आवरून वाड्याला  कुलुप  मारून डोर्ले  अध्यायाची  साङ्गता  करावी. आवरा-आवरी सुद्धा  नानांवर सोपवून त्यानी  आता  इथेच  रहावे...... असा आग्रह  अविने धरला.  बापूना  मुलाचे  म्हणणे  मनापासून  पटले. 

        वसुधाकाकू सुनेची देखभाल  करायला  पुण्यात  रवाना झाली तेंव्हाच  आपल्या  आयुष्यातले  डोर्ले  पर्व  आटोपत आले  हे त्यानी ताडलेले होते. घसा खाकरून  बापू  मास्तर  म्हणाले,  “ मी  डोर्ल्यात  हजर झाल्यावर  मला  सुचले ,   नी  मी  सहजावारी  म्हणून  कौलाच्या वखारीचा  विषय काढला.  नानानी  माझ्यावरच्या   विश्वासामुळे  मला  सोबत घेवून  धंद्यात  उडी घेतली.... लिखापढी  सोडाच वाचाबाद सुद्धा  कसल्या अटी-‌शर्थींची चर्चा, कामाची वाटणी  झाली  नाही. मी हिशोब ठेवले  ते त्यानी  कधिच  पडताळले नाहीत.  बरकत  आल्यावर  मिरगाच्या  टायमाला  सिझन  आटोपल्यावरमी  वर्षाचा ताळमेळ घेई. गंगाजळी बाजूला काढून  धंद्यातले  मर्म  बायकाना समजावे  या  हेतूने  उरलेल्या  रक्कमेच्या  दोन उभ्या  राशी  कधी सुधा तर  कधी  रमा  यांच्या  हस्ते  मी  करून घेई . आज  आम्ही  इकडे  आलो म्हणून  हिशोबाची  वही  नी  कपाटाची चावी  नानांच्या घरी त्यांच्या  भावाकडे  आहे .नाहीतर ती  कायम माझ्या  बिऱ्हाडी असायची. त्यावेळी  जसा  गोडीगुलाबीत  मुहूर्त न बघता  शुभारंभ  झाला, तशी  माझ्यापुरती  याची साङ्गता  आज या भरल्या  वास्तूत  मी  करतोहे... ” नानांचे  हात हातात  घेत बापू म्हणाले, “रवि म्हणाला  तसे, आता   मी  इथेच  राहणार, तिथली आवरासावर तुम्ही नी रमा दोघानी  करा . आज या क्षणापासून  वखारीचा  धंदा  मी  विनाअट  तुमच्या  स्वाधिन करतोहे...  पुढचे श्री  दत्तत्रेयाऽऽर्पणमस्तु!”

                                      

 

                                                    ※※※※※※※※