Shubh Mangal Savadhan in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | शुभमंगल सावधान

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

शुभमंगल सावधान

शुभ मंगल ‘सावधान’

 

 

 

          निरवडे हायस्कूलमध्ये गांगण बाई हजर झाल्या आणि शाळेचे जसं नंदनवनच झालं. हेमामालिनी-  रेखा अशा सिनेनट्यांइतकी नसेल पण गांगण बाई बघितल्यावर त्याच नट्यांची आठवण व्हावी इतपत नक्की वाटायची. अगदी नावापासुन तो केशभूषा- वेशभूषा, बोलणे, मोकळेपणे वागणं हे ‘मास्तरीण’ या बिरूदाला न शोभणारी ! मास्तरीण म्हणजे काळी ढुस्स, दात पुढे किंवा विरळ तरी!क्वचित  कुंदकळ्या वगैरे असल्याच तरी त्या कुणाला न दिसाव्यात या बेतानं हसणारी (?) कुणाकडेही बघताना लेट आलेल्या- गृहपाठ चुकवणाऱ्या, उत्तरं न देणाऱ्या मुलाकडे पहावं अशी नजर असणारी, लपेटून घट्ट पदर घेणारी, मुळाकडे मुटकाभर जाड आणि टोकाकडे विरळ होत जाणाऱ्या केसांची उंदराच्या शेपटी सारखी निमुळती आणि तेवढीच लांब घट्ट वेणी (एक किंवा दोन वेण्या) घालून टोकाला रिबनचं फुल करुन रीबनची वितभर लांब टोकं सोडणारी अशीच असल्या काळातली ही गोष्ट.

          गांगण बाईंचं नावही मास्तरणीला न शोभणारं.... मधुरा गांगण हे नाव उच्चारतानाच वीणेचे सुर झणकारल्यासारखं वाटायचं.... म्हणून शाळेतल्या हेडमास्तरांपासून शिपायापर्यंत अगदी पोरंसुध्दा हौसेने त्यांचा उल्लेख 'मधुरा मॅडम' असाच करायचे. भुवया कोरुन खरं म्हणजे कपाळपट्टी भकास दिसते पण गांगण मॅडमना कोरलेल्या भुवयाच खुलून दिसायच्या. त्या जवळून गेल्या की 'इव्हिनिंग इन पॅरीसचा' मोहक गंध यायचा. पोरं म्हणायची 'आमच्यो मधुरा गांगण मॅडम लय मस्त नाय? जवळ इल्यो की असो परमळ येताsना.... माका लय आवडता....' हे मत फक्त पोरांचच नव्हतं. स्टाफवरच्या झाडून साऱ्या मास्तराना पण असच वाटायचं. अगदी रिटायरमेंट ७/८ वर्षावर आलेले, टक्कल पडलेले, कानामागच्या केसातून चंदेरी वर्ख दिसणारे, दाढा पडल्यामुळे गालफडं खपाट झालेले मोरबाळे सर सुध्दा म्हणायचे, “मधुरा गांगण मॅडम जवळ आल्या की रातराणी फुलल्यागत वाटतं....” मग स्टाफवरचे भेंकी सर म्हणायचे खरंय ते ‘म्हातारपणी निद्रानाश जडल्यामूळे तुमच्या सारख्यांना आणि झोप हरवलेल्या आमच्या सारख्या तरुणांना रातराणीच आठवते मधुरा मॅडम जवळ आल्या की ....”

     गांगण मॅडम मूळच्या उत्तर रत्नागिरीच्या पण त्यांचे वडिल पुण्याला स्थाईक झालेले. निरवड्यात  येईपर्यंत मॅडमच आयुष्य पुण्यातच गेलेलं. शहरी वातावरणात राहिल्यामुळे कायम टीपटॉप रहायची त्यांना सवय....पण इतकं व्यवस्थित रहायच असतं, रहाता येतं याची गंधवार्ताही निरवडेकरांना नसल्यामुळे गांगण मॅडमचं अप्रूप वाटायच. मॅडम बी.ए. झाल्या, मग वडिलांच्या ओळखीमुळे गव्हर्नमेंट बी.एड्. कॉलेजमधेच फी न भरता अॕडमिशन मिळाली म्हणून बी.एड्. सुध्दा झाल्या. लौकर लग्न करुन उरावरच ओझ दूर करायच ही शहरातल्या पालकांची वृत्तीच नसते. स्त्री मुक्तीचं वगैरे वारं लागल्यानं मॅडमनाही आणखी १/२ वर्षतरी लग्न टाळायचं असल्यामुळे नोकरी अन् ती सुध्दा हायस्कुल मध्ये हाच एकमेव पर्याय उरलेला.

          पुण्यातल्या शाळांमध्ये व्हेकन्सी होण्यापूर्वी वेटिंगला असंख्य उमेदवार. विविध उच्चपदस्थांच्या बायका चैनीसाठी पैसा हवा म्हणून आणि भरपूर सुट्या नी चांगला पगार मिळवून देणांर प्रोफेशन म्हणून शिक्षकांच्या पोस्टींगवर डोळा ठेऊन... मॅडमच्या वडिलांनी आपल सगळं वजन खर्च केलं पण ५/६ ठिकाणी इंटरव्यू देऊन नकार घंटा आल्यावर मॅडम अन् त्यांचे वडिल दोघेही हैराण झालेले. नू.म.वि. मधल्या रिकाम्या जागेवर वर्णी लावण्यासाठी मधुरा गांगण तिथल्या सुपर वायझर पाटणकर मॅडमना भेटायला गेली. मधुरा सहावीत असताना न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पाटणकर मॅडम मराठी शिकवायच्या. पुढे त्याना घराजवळच्याच नू.म.वि.त जॉब मिळाला अन् त्या सोडून गेल्या. आपलं काम नक्की होणार या खुशीतच मधुरा पाटणकर मॅडमना भेटली.

          पाटणकर मॅडमनी दार उघडल्या उघडल्या आत शिरुन त्याना वाकून नमस्कार करीत मधुरा म्हणाली. “मॅडम ओळखलंत का?” थोडावेळ विचार केल्यावर मॅडम म्हणाल्या, “नाव नाही आठवत.... पण तू.... न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये असलेली चिमणी ना तू ?” “मॅडम कम्माल आहे हं तुमची.... अगदी अचूक ओळखलंत मला....” मधुरा उत्तरली. “चिमणीच म्हणायचात तुम्ही मला.” त्यावर मॅडम म्हणाला, “तसंच काही नाही हं.... सगळ्याच लहान पोरीना मी चिमण्यानो असं म्हणते.... बर ते जाऊ दे... आज कशी काय आलीस ?” त्यावर पेढ्यांचा पुढा पुढे करीत मधुरा म्हणाली, “मॅडम, मी बी.एड्. झाले. आता तुमचा आदर्श ठेवून शिक्षिका व्हायचय् मला म्हणून मुद्दाम तुमचे अशीर्वाद घ्यायला आले.” पाटणकर मॅडमनी मधुराचा हेतू ओळखला. चारच दिवसांपूर्वी मराठीच्या पोस्टसाठी नू.म.वि.ची जाहिरात प्रसिध्द झालेली. मधुरा बी.एड्. पास झाल्याचे पेढे द्यायला आलेली नसून नोकरीसाठी गळ घालायला आली हे त्यांनी ओळखलं. “हे बघ, चिमणे.... काय तुझं नाव म्हणालीस ते हं.... मधुरा. आशीर्वाद देते तुला. पण आमच्या शाळेतल्या पोस्टसाठी मी शब्द टाकावा अशी गळ घालणार असशील तर ते मात्र नाही जमायचं.... डायरेक्टर ऑफ एज्यूकेशनचे पी.ए.कुंटे... माहिती आहेत ना ? त्यानी आपल्या बायकोसाठी संस्थेवर प्रेशर आणलंय.... जाहिरात हा नुसता फार्स.... मिसेस कुंट्यांच अगदी फिक्स आहे झालेलं. तुझ्या मेथडस् कोणत्या आहेत वा? म्हणजे इथे नाही जमलं तरी ओळखीत कुठे चान्स मिळाला तर तुझ्यासाठी नक्की शब्द टाकेन मी.” मधुरा खट्टू झाली पण वरकरणी तसं न दाखवता अघळ-पघळ गप्पा मारुन ती उठून गेली.

          पाटणकर बाईंची भेट मधुरा जवळ जवळ विसरलेलीच कारण त्या गोष्टीला आता दीड-पावणेदोन महिने होऊन गेले. संध्याकाळी पर्वतीकडे फिरायला जाताना अचानकपणे पाटणकर मॅडम समोर आल्या... “अगं मधुरा बरं झाल भेटलीस ते.... तुला निरोप द्यायचाच विचार करीत होते मी.... माझे मिस्टर रत्नागिरीला एज्यूकेशन ऑफिसमध्ये डेप्युटी ई.ओ.या पोस्टवर आहेत. त्यांचे एक हेडमास्तर मित्र आहेत... निरवडे म्हणून एक गाव आहे अगदी हायवेवर.... त्यांना मराठी स्पेशल मेथड असणारा शिक्षक पाहिजे. बघ बाई, पुण्यापासून जरा लांब असलं तरी गाव चांगलंय... हेडमास्तर ह्यांचे मित्र ! तुझं चांगलं जमेल.... मला विचारशील तर तुला नोकरी करायची असेल तर पुढच्या दहा वर्षात तरी पुण्यात तुला चान्स मिळणं कठिण.... जातेस का कोकणात?”

          मधुरा वडिलांसोबत रत्नागिरीला एज्यूकेशन ऑफिसमध्ये पाटणकर साहेबानाच थेट भेटली. पाटणकर मॅडम फोनवर बोलल्या होत्या अन् चिठ्ठी सुध्दा दिली त्यानी.... साहेबानी त्यांचं दिलखुलास स्वागत तर केलचं पण ऑफिसची जीप घेऊन ते समक्ष निरवड्यापर्यंत आले. हायवेवरचं गाव, हिरवी गर्द वनराई आणि शाळेची सुंदर इमारत वगैरे बघून मधुरा चांगलीच इंप्रेस झाली. थेट डेप्युटी इ.ओ.शी संपर्क, हेडमास्तर लिमये यांचं सालस, सात्विक व्यक्तिमत्व यामूळे मधुराचे वडिलही निर्धास्त झाले अन् मधुरा गांगण निरवडे हायस्कूलमध्ये हजर झाल्या.

          मधुराचं आगमन असं ग्लॅमरस पार्श्वभूमीवर झालेलं. तिचं शहरी रहाणं आणि बऱ्यापैकी रुप यामूळे ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालेली. निरवडे हायस्कूल तसं बऱ्यापैकी मोठं.... अठरा शिक्षकांचा स्टाफ... स्टाफमधली तीन जुनाट खोडं आणि चार मध्यम वयातली शिक्षक मंडळी सोडली तर निम्मेहून जास्त लोक उमेदवार ‘उपवर’ या कॅटेगिरीतले. त्यातही फर्नांडीस, मुलाणी आणि कॅटेगरीचे झावळे, गंगावणे, तांबट, सनगर वगळता उर्वरीत म्हणजे गवळी, मगदूम, भोसले, दरेकर आणि सावंत हे शिक्षक सावज टेहळीत असलेले. मधुरा गांगण मॅडम मराठा समाजाच्या नाहीत हे कळल्यावर म्हणजे त्या हजर झाल्यानंतर आठवडाभरातच.... सावंतानी त्यांचा फंद सोडला पण उर्वरीत प्रेमवीरांनी मात्र जंग सुरु केलं.

          मधल्या सुटीत स्टाफ रुममध्ये चहापान रंगलेलं... गांगण मॅडमना पुढचा तास ऑफ आहे असा चांगला मोका गाठीत मगदूम सर सरसावले. “मधुरा मॅडम.... तुम्ही मराठीच्या म्हंजे तुमास्नी काव्य आवडत आसेलच की.... न्हाई म्हंजे बायकास्नी कवितेच वावड आस्तं असं म्हंतात म्हनून म्हनल हो” यावर भुवया उंचावीत ओठांचा चंबू करीत मधुरा मॅडम उत्तरल्या.... “काय हो मगदूम सर.... कसलं गावरान बोलता तुम्ही अन् अशुध्द तर किती.... दोन साध्या वाक्यात दहा चुका केल्यात तुम्ही.... आणि बायकांना कवितेचं वावडं असतं असं म्हणणं ही अकरावी चूक.... काव्य म्हणजे मराठी साहित्याला ललमभूत झालेलं शब्द लेणं.... काव्य न आवडणं म्हणजे शुद्ध अरसिकपणा.... मी एवढी अरसिक असेन अस वाटलं तरी कसं तुम्हाला?”

          मॅडमनी बोलायला सुरुवात केली म्हणजे त्यांची मधाळ वाणी ऐकण्यासाठी सगळेच कान तत्पर असायचे तसे ते या वेळीही होते. मगदूमसरांची मधुराशी सलगी कल्पनेतही सहन न करणारे स्टाफवरच्या जुन्या खोडांपैकी एक पोईपकर सर पुढे सरसावत म्हणाले, “मधुरा मॅडम, सावध व्हा.... सावध व्हा.... मगदूमसरांच्या फासातून सुटायच असेल तर अरसिक अहात असंच कबूल करा.... अहो तुम्हाला माहिती नाहीय मगदूमसर कवी आहेत... नेहमी नवीन सावजं शोधीत असतात....” त्यावर मधुरा मॅडम गोड हसत म्हणाल्या, “असं का? खरंच कवी आहेत का मगदूम सर? मला माहितच नव्हतं...”

          पोईपकर सरांकडे जळजळीत कटाक्ष टाकीत विजयी मुद्रेने बॅगमधली कवितांची वही काढून मगदूम पुढे सरसावले. मॅडमच्या प्रतिसादाची वाट न पाहताच त्यांनी कविता वाचायला सुरुवात केली सुद्धा. कविता वाचल्यावर त्यांनी साभिप्राय मॅडमकडे बघितलं. पुढची २०-२५ मिनिटं दोघांची काव्य चर्चा चांगलीच रंगली. मगदूमांच्या एका कवितेच्या बदल्यात स्वतःच्या सहा कविता मॅडमनी ऐकवल्या. गवळी, भोसले, दरेकर त्रयींपैकी दरेकरांना ८अ वर तास असल्यामूळे त्यांना नाईलाजाने मैफिलीतून उठावं लागलं. पण इतरांनी मात्र त्या संधीचा फायदा घेऊन मॅडमच्या कवितांचं तोंडभर कौतुक करुन त्यांच्याशी चांगलीच जवळीक प्रस्थापित केली.

                    हळूहळू मधुरा मॅडम आणि चार प्रेमवीर यांचा एक वेगळाच ग्रुप फॉर्म झाला. फुलं, पेनं, वेगवेगळी रायटिंग पॅडस् अशी प्रेझेंटस् ची बरसात मधुरा मॅडमवर व्हायला लागली. चौघांचीही एक छुपी स्पर्धा सुरु झाली. मधुराच्या वागण्यावरुन कुणालाच अंदाज करता येत नसे पण प्रतिस्पर्ध्यावर मात करुन आपली वर्णी कशी लागेल? याचीच योजना चौघांच्याही मनात सुरु असायची. त्यातूनच गवळी सरनी बॅडमिंग्टनचं प्यादं काढलं. मधुरासाठी रॅकेट त्यानीच खरेदी करुन आणली. मग सकाळ संध्याकाळ बॅडमिंग्टन सुरु झालं. साडी नेसून कसं खेळणार.... खेळासाठी पंजाबी ड्रेस हवा आणि तो पांढराच हवा अशी अपेक्षा मधुरा मॅडमनी व्यक्त केली अन् दुसऱ्याच दिवशी सी.एल्. टाकून भोसलेंनी कोल्हापूर गाठलं स्वतःसाठी रॅकेट, ट्रॅक सूट, मधुरासाठी व्हाईट पंजाबी खरेदी करुन तिसऱ्या दिवशी सकाळीच भोसले रॅकेट फिरवीत बॅडमिंग्टन कोर्टवर हजर. कवी मगदूमसर आणि दरेकर यांचीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लागू लागली. मग डबल्स मध्ये एकदा मगदूम, एकदा गवळी, एकदा दरेकर, एकदा भोसले अशी चौघानाही आळीपाळीने मधुरा मॅडम कंपनी द्यायच्या.

          ईव्हिनींग वॉकची कल्पना म्हणजे खरं तर ज्येष्ठ मेंबर पणशीकर सरांची. पण पणशीकर दुसऱ्या दिवशी फिरायला बाहेर पडले तर चारही प्रेमवीर हजर ! डिसेंबर उजाडला आणि गॅदरिंगचे वारे वाहू लागले. कुणी तरी स्टाफ मेंबरनं नाटकाचं पिल्लू सोडलं. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाची निश्चिती झाली. पात्रं ठरली.... म्हणजे सतीश आणि शाम या दोन पात्रांसाठी खरी स्पर्धा.... त्यातही सतीश आणि उषा ही जोडी स्टाफवरच्याच मिस्टर मिसेस जैतापकर यांनी करायचं ठरल्यावर गीता साठी मधुरा मॅडम आणि गीताचा प्रियकर 'शाम' च्या भूमिकेसाठी चारही प्रेमवीरांची चढाओढ होणार असं चित्र दिसायला लागलं. गवळीसर पी.टी. टीचर ! शामचे संवाद पाठ करणं आपल्या कुवती बाहेर आहे हे ओळखून त्यानी वेळीच माघार घेतली. रहाता राहिले दरेकर, मगदूम, भोसले ! पैकी मगदूम सरांचा आवाज जरा किनरा.... म्हणून नाटकाचं डायरेक्शन करणारे पोईपकर! त्यांनी सरळ हल्लाबोल करून मगदूमाना कटाप केलं.

          भोसले, दरेकर कोणीच मागे हटायला तयार होईना.... मग प्रत्यक्ष तालमीच्यावेळी ज्याचं काम चांगले असेल त्याची निवड हेडमास्तर लिमये सरानींच करायची. ते देतील तो निर्णय ! यावर एकमत झालं. निर्णयाचा दिवस उजाडला. जो आधी सुरुवात करतो तो रेस जिंकतो. हे सूत्र अवलंबून भोसले पुढे सरसावले. दहा मिनिटांचा प्रवेश पार पडला. मग पाळी आली दरेकरांची. दरेकरांनी इरेला पडून तयारी केलेली. पोईपकरांकडे खेटे घालून अभिनयाचे धडे घेतलेले. त्यांनी बाजी जिंकली. सर्वांनीच शामच्या भूमिकेसाठी दरेरकरांनाच 'फिट' सर्टीफीकेट बहाल केलं.

          नाटकाच्या तालमी रंगात आल्या. एरवी स्टाफचं नाटक म्हणजे तालमीच्या नावाने बोंब. आज एक आहे तर उद्या दुसरा नाही. पण मधुरा गांगण हे आकर्षणच असं जबरदस्त की मंडळी वेळच्या वेळी तालमीना हजर राहायची. संध्याकाळी शाळा सुटल्यावर रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत तालमी चालायच्या... साहजिकच बॅडमिंटन, इव्हिनींग वॉक बंदच पडले. भोसले, मगदूम, गवळी त्रयीनी तालमीच्या वेळी रेंगाळून पाहिले. तालमी सुरु असताना काही टिप्स देऊन जवळीक साधायचा प्रयत्न केला. पण हा 'वार' फसला. भोसलेनी अशी टीप मधुराला दिली मात्र.... डायरेक्टर पोईपकर असे खवळले... "नाटाक कशाशी खातंत ता तुका कळता काय रे?" अस्सल कोकणीत पोईपकर गरजले. "मी चोर आहे मी भजी खाल्ली.... ह्या वाक्य म्हणजे बेअरींगचा असा ! ह्या वाक्याक त्वांड हातानी झाकल्यावर चेहऱ्यावरच्ये एक्स्प्रेशन कशे दिसतले.... अगदी खुळे कशे तुम्ही भोसले सर?"

          "मधुरा मॅडम म्हंजे वाटलं काय तुम्हाला.... अगदी सुरुवातीच्या तालमीलाच या वाक्याला अशी एक्स्प्रेशन्स दिली मॅडमनी की बस्स रे बस्स.... भोसले सर मॅडमचं काम वठू नये म्हणून तर तुम्ही चुकीची सूचना देत नाहीना ? की तुमची निवड झाली नाही म्हणून पोटशूळ उठला तुमचा?" दरेकरांनी खडसावलं, भोसले बिचारा चितपट.... या प्रंसगामुळे अन् दरेकरनी केलेल्या भाष्यामुळे मधुरा मॅडमचंही मत फिरलं. दुसऱ्या दिवसापासून मधुरा मॅडम तिघांशीही फटकून वागायला लागली. त्याना जळवण्यासाठी दरेकरांशी जास्त सलगी जाणीवपूर्वक करायला लागली. आता तिन्ही प्रेमवीर सूड उगवायचे बेत करु लागले.

          शाळेच्या स्वच्छता गृहात भिंत रंगली, "दरेकर मधुरा पटला सौदा" शाळाभर चर्चा झाली. दरेकर रागाने लाल झाला. "आमचे संबंध स्वच्छ असताना असले कुजके विचार ज्याना सुचतात त्यांच्या भेजात सडके कांदे बटाटे भरलेले असणार....."गवळी, मगदूम, भोसले त्रयीकडे कटाक्ष टाकीत त्यानी रिमार्क मारला. मगदूम, भोसले गप्प बसले. पण गवळी पी.टी.चा मास्तर ! त्यात हौद्यात पट काढलेला ! गुडघ्यात मेंदू असणारा तो रांगडा पैलवान गडी अनवधानाने बोलून गेला, "आता वाईच घसट व्हाय लागल्यावर लोकांच्या नदरंला कां येऊ न्हाई? गावभर चर्चा करतेत की समदं" दरेकर अस्तन्या वर करीत सरसावला.... "काय रे गवळ्या... दूधात पाणी तशी सगळ्यातच भेसळ करतोयस् काय रे चोरा?"

          गोष्ट मुद्यावरुन गुद्यावर यायची वेळ आलेली पण नेमके त्याचवेळी लिमयेसर स्टाफ मध्ये प्रवेश करते झाले आणि प्रकरण थंडावलं ! थंडावलं म्हणजे स्टाफमध्ये पानीपत रंगलं नाही इतकंच..... मधुराचा पतंग दरेकराने काटल्यात जमा ! याची खुणगाठ पटून भोसले, मगदूम, गवळी तिघेही आपापसातलं वैर विसरुन लांडग्यांसारखे एक झाले. दरेकर खेडचे.... मधुरा दरेकर प्रकरणाला कोकणी घाटी रंग आला. स्टाफवरच्या काही जेष्ठ शिक्षक मंडळीनीच पुढच्या दोन तीन तासात काय काय फुणग्या सोडून तिघांना भडकवून दिले. दरेकराला हिसका दाखवायचा ! मधुराच्या हजेरीत... तिच्या साक्षीनं दाखयावचा !! यावर तिघांच एकमत झालं आणि तशी योजनाही ठरली.

          संध्याकाळी शाळा सुटली. चहा पाणी झालं नी तालीम सुरु झाली. ऑफिसचं काम उरकून लिमये सर घराकडे निघाले. रोजच्याप्रमाणे घवाळी कारकून सरांबरोबर जायला निघाला. दुपारचं प्रकरण आणि मगदूम त्रयीचे बेत त्याने सरांच्या कानावर घातले. मुख्याध्यापक पदावर काम करुन अशी किती प्रकरणं बघितलेले आणि तडीला लावलेले लिमये सर चारही प्रेमवीरांचे कारनामे ते निरिच्छ वृत्तीने पहात होते. या प्रकरणात कुणीतरी एकाची सरशी किंवा चौघांच्याही हातावर तुरी देऊन मधुरा त्याना पुणेरी मिसळ चाखवणार असा त्यांचा शेरा. चारही माणसं कामात तर हयगय करीत नव्हते. मधुरा स्टाफवर आल्यापासून शिक्षणाधिकारी कार्यालयातली कामं चुटकी सरशी व्हायला लागलेली. ही जादूची अंगठी शाळेत राहिली तर बरंच झालं की ! एवढीच त्यांची अपेक्षा.

          घवाळीनी सांगितलेला प्रकार ऐकल्यावर लिमयेसर सिरियस झाले. या प्रकरणाचा आपल्या पद्धतीने निपटारा करायची अंमलबजावणी करुन ते वाट पहात राहिले. रात्री तालमी संपल्या. मंडळी बाहेर पडली. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे दरेकर मॅडमना रुमपर्यंत पोहोचवायला गेले. मॅडमच्या रुमची वाट गावकर वाडीतून जायची. दोघंही गप्पा मारीत निघाली. गावकरवाडी संपली की पुढे थोडा निर्मनुष्य रस्ता आणि पाच मिनीटांच्या अंतरावर मॅडमची रुम. मोक्याच्या जागी मगदूम, गवळी, भोसले त्रयी तयारीत राहिलेले. मधुरा-दरेकर सर गप्पा मारीत तिथपर्यंत आले आणि गवळीसर दंड थोपटीत पुढे झाले. "काय रे, दरेकरा कस्तान्या.... दूद पान्याची भेसळ काडतोस काय माजी ? तुला दुदाचा भाव आत्ता दाकीवतो म्या...."गवळ्यांचा गुद्दा शिताफीने चुकवून दरेकरानी त्याच्या मानेवर उजव्या हाताचा असा चॉप लगावला की गडी भेलकांडत आडवा..... अवाक् झालेल्या मधुरा मॅडमला किंचाळणं ही सुचलं नाही.

          गवळी आडवा झालेला बघताच हातातले दंडुके सरसावीत मगदूम-भोसले पुढे धावले त्याच वेळी, बाजूला दडून राहिलेले गावकरवाडीतले पोरगे बॅटऱ्या झळकवीत पुढे आले. भोसल्यांचा एक फटका दरेकरांनी खाल्ला.... बस्स.... गावकरवाडीतल्या पोरानी दोघानाही पकडून त्यांच्या हातातले दंडुके काढून घेतले. मधुरा मॅडम भान हरपून किंचाळल्या.... त्यांचं ओरडणं ऐकून गावकर वाडीतली जाणती मंडळी, बाया कंदिल-बॅटऱ्या घेऊन धावले. मगदूम, भोसले, गवळी त्रयीची शिस्तीत गचांडी धरुन झाला प्रकार हेडमास्तरांच्या कानावर घालण्यासाठी जाणते पळत सुटले. भोसल्यांच्या दंडुक्याचा फटका बसून दरेकरांच्या डाव्या मनगटाचे हाड मोडले.

          मधुरा मॅडम प्रकरणाची अखेर लिमयेसरांच्या अपेक्षे प्रमाणेच झाली. मगदूम, भोसले, गवळी त्रयीना हेमगर्भाचा वळसा दिल्यावर त्यानी माना खाली घालून सरांचे पाय धरले अन् प्रकरणावर पडदा पडला. हाताला प्लॅस्टर असलेल्या स्थितीतही दरेकरांनी नाटकातली भूमिका पार पाडली. नाटक झालं आणि दुसऱ्या दिवशी लिमये सरांनी मधुरा मॅडमना केबिनमध्ये बोलावून प्रकरणाचा उपोद्घात केला. मधुरा गांगणच्या मनात खरंतर दरेकर सरांविषयी 'तसं' काही नव्हतं. पण झाल्या प्रकारात तिच्यामुळे त्या बिचाऱ्याना निष्कारण त्रास भोगावा लागला म्हणून अन् सरांचा शब्द पाळायचा म्हणून मधुरा मॅडमनी होकार दिला. दरेकर गांगण यांचं शुभ मंगल 'सावधान' झालं अन् जादूची अंगठी लिमयेसरांच्या शाळेतच राहिली.

       **********