Hartalika in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | हरतालिका

Featured Books
Categories
Share

हरतालिका

हरतालिका व्रत करून पार्वतीने शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते .

माझ्या माहेरी हरतालिकेचा उपास कडक नव्हता .

आई खिचडी, दुध फळे असे काही खाऊन उपास करीत असे .

मी अगदी हट्टाने अगदी निर्जळी उपास करीत असे .मी रात्री झोपी जात असे पण आई मात्र जागी राहून बारा वाजता मला उठवून दुध प्यायला देत असे .

या हरतालिकेच्या दिवसाची एक आठवण मात्र कायम येतेच .नुकतीच मी नोकरीला लागले होते .अजुन लग्न व्हायचे होते .आणि ऑफिसकडून तीन महिन्याच्या ट्रेनिंगची ऑर्डर आली.

मात्र हे ट्रेनिंग नाशिकला होते .आई वडील जरा बिचकले .ते दिवस "सातच्या आत घरात "या पठडीतले होते.मुलींवर बरीच बंधने असत.

नाशिकला ना कोण ओळखीचे न नात्यातले .एकट्या अविवाहित मुलीला तिकडे कशी पाठवणार आणि तेसुद्धा तीन महिने .आई वडिलांना कोडे पडले

आमच्या शेजारच्या वहिनींना हे जेव्हा कळले तेव्हा त्या म्हणाल्या काही काळजी करू नका .माझे माहेर आहे नाशिक .

खुप मोठा वाडा आहे आमचा आणि सख्खे चुलत काका सगळे एकत्र राहतात आमच्या घरात ..ही तिकडे बिनधास्त राहू शकते .हिच्या वयाच्या माझ्या तीन बहिणी आहेत घरात .आरामात सोय होईल हीची तिकडे मी कळवते माझ्या घरी ही तिकडे येणार आहे असे .

आई वडील हे ऐकुन थोडे निष्काळजी झाले .मग वहीनीनी पत्र घालुन घरी कळवले माझ्या येण्याविषयी .माझ्या ट्रेनिंग विषयी आणि तीन महीने मुक्कामा विषयी तिकडून सुद्धा आनंदाने होकार आला मी नाशिकला गेले .

खरोखर माझी मस्त व्यवस्था झाली त्यांच्याकडे .मोठे व्यापारी असलेल्या वहिनींच्या वडिलांचा खुप मोठा वाडा अगदी भद्रकाली देवीच्या देवळाशेजारीच होता घरात नोकर चाकर मिळुन तीस चाळीस लोक होते माझ्या वयाच्या आणि लहान मोठ्या मिळून दहा बारा मुली होत्या .

श्रीमंत कुटुंब असल्याने घरच्या मुली नोकरी वगैरे करीत नव्हत्या .त्यांच्यावर स्वयंपाक पाणी किंवा इतर कसलीही जबाबदारी नव्हती .फक्त मजेत राहणे आणि शिकणे .

. त्यामुळे मी एकटी इतक्या लांबून नोकरी साठी येते आणि राहते याचे त्यांच्या घरातील सर्वांना भारी कौतुक वाटले होते.

ट्रेनिंग सेंटर बरेचं लांब होते.मी सकाळी नऊला बाहेर पडत असे ते बस वगैरे मिळून संध्याकाळी सातला घरी येत असे .मी घरून निघण्याच्या वेळी..इतक्या सकाळी त्यांच्याकडे फक्त चहा झालेला असे .स्वयंपाकी यायला अजुन उशीर असे .

त्या घरच्या वहिनी माझ्यासाठी रोज उप्पीट किंवा पोहे करून माझ्या डब्यात देत असत .त्या काळात ऑफिस जवळ चहा काय...काहीच मिळत नसे अख्खा दिवस तेव्हढ्या डब्यावर काढायला लागत असे 

मला पोळी भाजीचा डबा देता येत नाही याचे वहिनींना फार वाईट वाटे .त्यांची अडचण मला पण समजत असे पण माझी काहीच तक्रार नव्हती मी मजेत होते 

संध्याकाळी मात्र घरी गेल्यावर चहा सोबत काहीतरी मस्त खाणे तयार असे .रात्री जेवण पण सगळ्यांच्या सोबत गप्पा करीत होत असे .त्यांच्या घरात आजी आजोबा होते घरची सर्वच मंडळी अतिशय श्रद्धाळू असल्याने देवधर्म ,पूजा ,अर्चा ,सोवळे, ओवळे अतीशय कडक पाळले जात असे .मासिक धर्माच्या वेळेस वापरायला घरच्या मुलींसाठी एक स्वतंत्र खोली होती.रोज सकाळी आधी आंघोळ केल्या शिवाय काहीही खाणे पिणे वर्ज्य असे 

त्या दिवशी हरतालिका होती .सर्व मुलींचा व बायकांचा उपास म्हणून घरात असंख्य फळे ,सुका मेवा आणला होता .सकाळीच भले मोठे दुध आटवायला ठेवले होते मी आदल्या दिवशीच घरी सांगितले होते की माझा कडक उपास आहे असे... .

ते समजल्यावर सगळे माझ्याकडे आणखीनच आदराने पाहु लागले 😊आजीनी माझ्या कानशिलावर बोटे मोडली ❤️मी सकाळी नेहेमीप्रमाणे ट्रेनिंगला गेले .दिवसभर उपास होताच ,शिवाय त्या दिवशी घरी यायला सुद्धा बराच उशीर झाला होतादिवसभराचा उपास आणि नोकरीची दगदग यामुळच मी दमून गेले होतेघरी पोचताच माझा कोमेजलेला चेहरा बघुन घरच्या सर्वांना वाईट वाटले .

अग इतर वेळेस तु कडक उपास करीत असशील पण आता नोकरी आहे , दगदग आहे तेव्हा काहीतरी फळे खा किंवा दुध पी असा आजींसकट सर्वांनी आग्रह केला .शिवाय रात्री जागरणाचा कार्यक्रम पण ठेवला होता .सखी पार्वतीची पूजा झिम्मा फुगडी गप्पा गोष्टी खेळ वगैरे ..पण मी माझ्या मताला ठाम होते

माझा उपास कडकच असणार होता .,😊तेव्हा मात्र घरच्या सगळ्या मुलींना आजी म्हणाल्या ...बघा ग तुम्ही दिवसभर खा खा करताय ही मुलगी सुध्दा तुमच्या एवढीच आहे तरी पण पण दिवसभर उपास केलाय शिवाय ऑफिसला जाऊन आलीय .

.इतका कडक उपास निभावल्या बद्दल रात्री खेळ वगैरे झाल्यावर बरोबर बारा वाजता आजींनी मला कौतुकाने सखी पार्वती शेजारी चौरंगावर बसवले आणि कुंकू लावुन गरम मसाला दुध मला स्वतःच्या हाताने पाजले ❤️आणि उपास सोडायला लावला .

सर्व बायकांना माझ्या कडक उपासा विषयी सांगितले जमलेल्या शेजार पाजारच्या पन्नासभर बायका माझ्याकडे कौतुकाने पाहत होत्या .इतक्या लोकांच्या समक्ष झालेला हा सन्मान मला फार आवडला.❤️

अजूनही त्यांच्या घरी हरतालिकेला माझी आठवण निघतेच .😊😊इतका कडक उपास करून माझा शंकर मला मिळाला  .🙂🙂

यथावकाश मझे लग्न झाले देवीच्या कृपेने मला उत्तम पती मिळाला लग्नानंतर मात्र मी खिचडी ,फळे वगैरे खाऊन उपास करू लागले .दर वर्षी सखी पार्वती ची मूर्ती आणून पूजा करतेदुध साखर आणि फळांचा नेवेद्य दाखवते गौरी गणपती सोबत त्यांचे ही विधिवत विसर्जन करते