Vatamargi in Marathi Horror Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | वाटमार्गी

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

वाटमार्गी

वाटमार्गी 

 

     शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट दिसायला लागली. या गोष्टीची गावात बोलवा फुटली नी  कैरी, हापूस आंबा व्यापारीचकरा मारायला लागले. तांबोळ तासभर चालीच्या अंतरावर गावाच्या एका टोकाला, अर्ध्या मकाणा पर्यंत बैल गाडीचा रस्ता होता. तिथून माल काढून आणणे दुरापास्त. आलेले व्यापारी ही सगळी रड लावून चार- पाच रुपयाची बोली फोडीत.त्याच्यापुढे कोणच जायला तयार होईना नी रक्कमही सीझन पुरा झाल्यावर द्यायची अट घालीत . तिथे  दोनशे कलम होती नी फूट घावूक  आहे  हीगोष्ट भाऊ – बाबुंच्या  कानावर गेली. हे जुळेभाऊ गावातले  सधन  नी  चारपैसे  बाळगून  असणारे पतवान  म्हणून ओळखले जात. त्याना बातमीकळल्यावर दोघानीही समक्ष खेप करून बागेवर नजर टाकली. फूट बघून त्यांचेही डोळे चक्रावले.त्यानी बारा रुपयाची बोली फोडली. पंधरा रुपयाला सौदा ठरला नी पाच रुपये बयाणा देवूनभाऊ बाबु नी बाग करारावर घेतली.  गुढी पाडव्याला मुहूर्तालाच वीस पेट्या तुटल्या. पुढच्या पाऊण महिन्यात छल्ला बाजार झाला . तांबोळात देवधरांच्या ठिकाणा पलिकडे दातारांची  आड होती.तलाठ्याकडे शोध चौकशी केली असता मळ्यात सात एकर नी आड  चौसष्ट एकर एवढी एक क्षेत्री भूमी  होती. अर्ध्या मळ्यात परभु भात पिकवीत. अर्धा मळा सखलवटीचा असल्यामुळे पावसाळी खाडीच खारं पाणी भरे म्हणून पडच होता. आडीतली जागा कलमलागवडीला लायक. आड नी मळा यांच्या दरम्याने तांबळवट मातीचा थोडा भाग सोडला बाकीची जमिन पिकदाऊ नी गोडं पाणी दहा हातावर.

        भाऊ बाबुनी विचार करून जागा घ्यायचा बेत केला.दातारांकडे चार पाच चकरा मारून तासंतास व्यवहाराचं मळण घातल्यावर साडेतीन हजाराला  रुपयाला सौदा तुटला. त्याच वर्षी सराईला बेणणावळ करून लागवड सुरु झाली. भाऊची सासरवाड  कुंभवड्यात,नी बाबुची  तारळेत दोन्ही ठिकाणी अन्नान्न दशा...... तिथून पाच  गडी बायकांसह कायम रोजंदारीच्या बोलीवर आणून  पाचही गड्याना आडीत मांगर बांधायला दोन दोन  गुंठे नी मळ्यात दहा  गुंठे भात शेतीची जागा  मोफत नी कायम रोजंदारीच्या बोलीवर द्यायची लालूच दाखवल्यावर पाचही कुटूंब स्थाईक झाली.त्याना जमीन खंडून देवून मांगर  बांधून दिले.दहा वर्षात जागेच रूप पालटलं. चारशे कलमांची बाग उठली. घसारीची जागा, दिवसभर ऊन्ह नी खाडीकडून येणारा खारावारा...... कलमाना मानवणारी नैसर्गिक परिस्थिती. बाग उत्पन्नालालागली. गड्याना  बोलीप्रमाणे जमिनी  नावावर करून दिल्यामुळे गडी आंग मोडून काम करीत.भाऊ- बाबुनी अर्ध्यापर्यंत असलेला बैलगाडी रस्ता ठिकाणा पर्यंत नेला. स्वत:च्या चार बैल गाड्या जुपी केल्या. गड्यांचा कायम रहिवास झाल्यामुळे  तिथला राबता वाढला नी  तांबोळाला उर्जितावस्था आली.  शिदुच्या बाकीच्या भाउबंदानीही आपापली ठिकाणं बेणून कलमांची लागवड सुरू केली. तांबोळात माणसांचा राबता वाढला.  

         भाऊ- बाबुंचे वाडीत बेताचे चारखणी घर होते. घरामागे गोठा, त्या बाहेर कवड्याचे पाऊलभरही जागा नव्हती म्हणून गावदेवाचा कौल प्रसाद घेवून त्यानी तांबोळात घर बांधून तिथे रहायला जायचा निर्णय घेतला. दसऱ्याच्या मुहूर्तावर चरी मारून मागे पुढे ओसरी पडवी असलेले चौदा बारांचे टोलेजंग घर उभे रहायचे होते. दोन मोठी बांधकाम करणारी  फैलं रोजंदारीवर कामाला लागली. पंधरा दिवसात चौथरा पुरा होवून भिंती उठायला लागल्या. भिंतीचे काम कमरभर उठले नी अकल्पित पणे मावळतच्या  कोपऱ्यात भिंतीला  बोटभर रुंद उभा तडा गेला. बांधकामकरांसह सगळेच आश्चर्यचकित झाले. तडा बघितल्यावर हा कामगारांचा दोष नसून यामागे काहीतरी वेगळे कारण आहे हे भाऊ-बाबूनीओळखले, कामगाराना चार दिवस बांधकाम स्थगित करून चिरे तासायचा हुकूम देवून दोघेही देवस्थानांकडे कौल लावून चौकशीला लागले. पण काय अडथळा आहे याचा उलगडा होईना.  तारळेतल्या गड्यानी राजापूर ओणीत कर्णपिशाच्यवाल्या दाजी रेग्याची माहिती दिली. त्यातल्या एकाला सोबत घेवून भाऊ- बाळुनी ओणी गाठली. रेग्याकडे पन्नास माणसे जमलेली. या गर्दीत कसा काय पाड लागणार? त्यानी डोकं चालवून दाजीच्या भावाला बाजुला घेवून आम्ही खूप लांबून विजयदुर्गा जवळून आलोत. आमची अडचण मोठी आहे , कायतरी मेहेरबानी करा अशी गळ घालून दोन रुपये त्याच्या मुंड्याच्या खिशात टाकल्यावर त्याना लगेच आत प्रवेश मिळाला. दाजी गलप बांधून गालीच्यावर पालथा पडून 'हूं हूं ' करीत आलेल्या माणसाची ओळख सांगे. भाऊ -बाबू समोर बसून पाया पडल्यावर ते कोण कुठले नी त्यांची नड काय  हे बिनचूक सांगितल्यावर मान डोलावून हात जोडीत बाबु म्हणाला, “बाबा, आमची नड येण्या मागचा कारण खोला नी तेच्यार काय तो उपायसांगा.....”     

    रेग्याच्या कर्णपिशाच्चाने कारण फोडले  नी उपायही सांगितला .  त्या कोपऱ्यावरून वाटमार्गी  जातो. ती त्याची पुरातन वहिवाटीचीवाट आहे. ती तुम्ही अडवलीत.  किती शिकस्त केलीततरी भिंत टिकणार नाही यावर उपाय म्हणाल तर सुक्या खोबऱ्याची वाटी नी गूळ ठिकाणाच्यादक्षिणेला ठेवून माफी मागा नी  कोपऱ्यातले  चार हात बांधकाम मागे हटवा. पुन्हा कधीही त्या जागेत  अडथळा  ठेवूनका.  वर्षातून एकदा  अवसेला कोंबड्याचं देणं द्या.  देणं  दिल्यावर ते ठिकाणाच्या दक्षिणकोपऱ्यात  पुरून टाकायचं. वाटमार्गी  तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही.” दाजीच्या पाया पडून उदा-धुपासाठी पाच रुपये मानवून  भाऊ-बाबु उठले.

       गलप सोडून उठल्यावर रेगे म्हणाले, “गावागावानी देवचार,  वाटमार्गी नी राखणदार यांच्यापुर्वापार ठरलेल्या  वाटा असतात त्यात अडथळा  आणलात तर त्यांचा कोप होतो. प्रसंगी  तुमचा जीव घ्यायलाही ह्या शक्ती मागे हटणार नाहीत.तुमच्या ठिकाणातून जाणारा वाटमार्गी कधितरी वर्षा दोन वर्षानी  फेरी करतो. तुमचं नशिब की  कमरभर बांधकाम झाल्यावर त्याची नेमकी फेरी झालीनी तुम्हाला ठोकताळा देण्या साठी  तो फक्त तडापाडून थांबला. कदाचित  घर पुरं होईतो त्याचीफेरी झाली नसती तर तुम्हाला तो कायम सतावीत राहिला असता. त्यांची फेरी असताना गुरू-ढोरू , माणूस कोणी आडवं आलं तर  देवचार, राखणदारनी वाटमार्गी त्याना  कधी शिक्षा दिल्याशिवाय सोडीत नाहीत. त्यांचे तोडगे फार मोठे नसतात. गूळ खोबरं, गुंतवळ मिर्ची, कोंबडं नायतर भाताचं ढिकळ त्रास होणाऱ्या  माणसावरून ओवाळून  काढून  दक्षिणेकडे टाकून सांगणं केलं की त्यांचा त्रास बंद होतो. पण या गोष्टींचा उलगडा होणं महाकर्म कठिण...... काही कौल प्रसाद देणारी थळं कारण खोलीत नाहीत पण नारळ, कोंबडं उतरून टाकायचातोडगा सांगतात.” घरी गेल्यावर वाटमार्ग्याचे देणे देवून  मावळतच्या बाजुचे पाच हात  बांधकाम पायासह हटवून  ती जागा भर घालून सवथळ केली. तेवढा भाग उगवतच्या दिशेने वाढवला. मग मात्र घर पुरे होईतो काही अडचण आली नाही. ‘‘पण ही घाण कायमची आमच्यामागे लागली......’’ भाऊ ही सल बोलून दाखवायचा. विचार करता करता यावर हुकूमी तोडगा त्याला सुचला.

      गावदेवाचे पुजारी मामा लळित भविष्य बघित. त्याना भेटून भाऊ बाबूनी  तोडगा सांगितला. वाटमार्ग्याच्या यायच्या दिशेकडे तोंड करून मारुतीचा पाषाण स्थापन करून लहानशी घुमटी बांधायची. म्हणजेवाटमार्गी यायचा बंद होणार. मामा म्हणाले,‘‘ही अगदी नामी शक्कल काढलीत तुम्ही. हनुमंताचे देवस्थान सात्विक. कोणातरी भटाला नित्य पुजेचा मक्ता द्या. भूत प्रेत पिशाच्च कसलीचबाधा त्या ठिकाणात होयची नाय. येत्या हनुमान जयंतीपूर्वी घुमटी बांधा नी पाषाण बसवूनटाका.’’ फणसगावात विठ्ठलादेवी वाडीतला सुतार देवाचे पाषाण घडवी. त्याच्याकडून मारुतीचापाषाण घडवून आणला. ज्या कोपऱ्यात भिंतीला  तडागेला होता ती  जागा मुर्ती बसविण्या साठी मुक्ररकरून  त्याच्या भोवती सहा हात रुंद नी अकरा हात लांब आय असलेले छोटेखानी देवूळ बांधायला घेतले. काम सुरु असताना  देवाचा पाषाण वाटमार्ग्याच्या येण्याच्या  दिशेकडे तोंड करून पत्र्याच्या पिंपात पाणी भरून  त्यात बुडवून ठेवलेला होता. घुमटीच्या कामात काहीहीअडचण आली नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी धूमधडाक्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करून गावजेवण घातले. येसू देवधराला नित्यपूजेचे वर्षासन दिले. दरवर्षी हनुमान जयंतीचा सोहोळा साजरा होतो. वाटमार्ग्याची फेरी कायमची बंद झाली.        

         वाणी वाडीतली रंगू भिणभिणताना उठायची. उठल्यावर मळ्यात सोहोनी, भिडे, पाध्ये यांच्या माडांच्या बागेत फेरी मारून पडलेल्या सावळ्या,सुके नारळ पुंजावून आणी. दिवसाडी पात्यांचे हीर काढून केरसुण्या बांधून घेवून विकी.पिढे सुकवून त्याचं सर्पण वापरी. उन्हाळी आंबे पिकायला लागल्यावर तर रात्री बेरात्री फेऱ्या मारून आंबे पुंजावून आणी. पडीचे आंबे मुसलमान वाडीत खपत. रंगूचं अगदी बारीक लक्ष असे. आंबे ओवळुन पडायला लागले की मालकाच्याही आधी ती सादर असे. उजेडासाठी  काचेची दिवली नी ओटीत काडेपेटी घेवून ती वेळी अवेळी फिरून आंबे पुंजावून आणी. मराठ्याच्या कोनीत बिटकीचे आंबे पिकून पडायला लागलेनी रंगू कोनीत चकरा मारायला लागली. कोनीत जाताना दोन गडग्यांच्या मधून तीसेक वाव चिंचोळीवाट होती. त्यावाटेने वाटमार्ग्याची फेरी असे. एकदा बिटक्या पुंजावून येताना रंगू दोन गडग्यातल्या पाजोटीत निम्म्यावर आली  नी अवचित गार वारा सुटला नी दिवली विझली. रंगू खाली बसली. ओच्यातली काडेपेटी काढली नी दिवलीची काच काढून कांडी पेटवीपर्यंत वाटमार्गी आला. त्याने  रंगूला उचलली .  

      कोणीतरी आपल्याला उचलीत आहे याची जाणीव झाल्यावर रंगूची पाचावर धारण बसली. नकळत तिच्या तोंडातून वाण्यांची कुलदेवी भगवतीचे नाव आले. ‘वाचव ग्ये  भगवती ’ तिने देवीचे नाव उच्चारल्या बरोबर वाटमार्ग्याने तिचा मोधळा गडग्या खाली टाकून पळकाढला.  पुरुषभर उंचीवरून दगडधोंड्यात पडल्यामुळे रंगूचे आंग ठेचकाळून निघाले  नी त्याही पेक्षाभीतीने तिची बोबडी वळली . घशाला कोरड पडली. अंगात उठून बसायचेही त्राण राहिलेले नव्हते.ती भगवतीच्या नावाची आळपणी  करीत  तशीच पडून राहिली. सकाळी वाडीतल्या बायका  खालच्या मरडात बहिर्दिशेला आल्यावर रंगूची परवणी त्यानी ऐकली. वाडीतल्या बापयानी  तिला घरी पोचवले.

        पण रंगूने अंथरूण धरले ते धरले. ती  दिवसाडी जेमतेम दोन घास खाई. रात्री झोपेत ‘ माकावाटमार्ग्यान धरलान्..... त्येचा देणां देवा...... ’ असं काहीबाही बरळत दचकून उठे.पोरानी मुंबईतल्या मावळ्याला पत्र लिहून झाली गोष्ट कळवली. पत्र वाचल्यावर भाऊ गावी कोटकामत्याला आला. तिथले   भगवतीचे जागृत देवस्थान.भगवतीच्या थळावर कौल प्रसाद घेतल्यावर देवीने दोन कवटं नी नारळ तिच्यावरून ओवाळून काढूनतीन तिठ्यावर न्हेवून टाकायचा तोडगा सांगितला , नी तो केल्यावर  लावायला विभूत दिली. विभूत घेवून भाऊ रंगूच्या घरी गेला. कवटं नी नारळ उतरून टाकून  देवीची विभूतलावल्यावर रंगूला उतार पडला. चार दिवसात ती हिंडाफिरायला लागली. ऐन मोक्याच्या क्षणीआपण भगवतीला हाक मारली . भगवतीचे  सत्व साह्यालाआले म्हणून वाटमार्ग्याच्या तावडीतून आपण वाचलो असे ती मोठ्या भक्तीभावाने लोकाना सांगेनी ते खरेच होते.

         बापू सुताराच्या अंगणातल्या कोपऱ्या वरून अमावस्ये पौर्णिमेला देवचाराची फेरी असे. मधल्या वाडीत सड्यावरून येणाऱ्या घाटीने देवचार घसघसत तो येई नी  साबाजी धनावड्याच्या गोठ्याजवळून खालच्या मरडात उतरे तिथून पुढे सोनाराच्या घरामागून घाडमळीतल्या बांधावरून पुढे येवून बापू सुताराच्या अंगणातल्या कोपऱ्या वरून  पुढे जावून पाळंदीतून तरीच्या उतरणापर्यंत जाई.उतरणावर  वावभर  गोलाई असलेली गुळगुळीत जांब्या दगडाची पाथर होती. तिला देवचाराची पाथर असेच म्हणत. त्या पाथरीवर बसून खाऱ्या पाण्यात न्हाऊन तो पुन्हा आल्या वाटेने परत जाई. असा त्याच्या फेरीचा मार्ग असल्याचे  ईश्वराच्या देवळाचे पुजारी मामा लळित सांगत.  बापू सुताराचा चुलत मेव्हणा आलेला होता.तो रात्री  इराकतीला म्हणून नेमका अंगणातल्या देवचाराच्या फेरीच्या कोपऱ्यात बसला. तो इराकत करून उठताना त्याला ठंडीची शिळक जाणवली.घरात गेल्यावर आंथरलेली  घोंगडी  पांघरल्यावर थंडी  कमी होवून त्याला नीज पडली. दुसरे दिवशी तो घरीगेला. त्या दिवशी  देवचाराची फेरी  झाली. त्याच्या वाटेत इराकत केलेली बघितल्यावर देवचार कोपला.

           देवचाराचा कोप झाला नी इराकत करणारा पाव्हणा:घाबरून ओरडत जागा झाला. त्याला सणकून ताप भरला. औषध पाणी ,अंगारे धुपारे करूनही गुण येईना. कुठेतरी चुक झाली त्यामुळे बाधा आहे या पलिकडे काही उलगडा होईना.  तो महिनाभर अंथरूणावरचा  काय उठला नाही. नुस्ता हाडांचा काठांबरा राहिलाहोता नी तोंडावर प्रेतकळा आलेली होती . त्या दरम्याने बापूच्या मेव्हणीला मागणे आले.त्या निमित्ताने बापू सासरवाडीला गेला. त्यावेळी चुलत मेव्हण्याशी बोलताना सहज विषयझाला तेव्हा आपण रात्री इराकतीला जावून आल्यावर थंडीची शिळक आली म्हणून अंगाखालची घोंगडी पांघरली नी घरी आल्यावर त्याच रात्री  आपल्यालाथंडी खावून ताप भरला ही गोष्ट  पाव्हणा बोलला.आताबापूला अंधूक अंधूक आठवले.सकाळी:तोंड धुताना  गेल्यावर आंगणाच्या कोपऱ्यात फेरीच्या जागेवर त्याना ओल दिसली होती. कोणीतरी तिथे हात-बीत धुतले असतील असे त्याला वाटले. कारणत्या कोपऱ्यात कोणी चूळ सुद्धा  थुकत नसे. हेआठवलं नी सगळा उलगडा झाला. घरी गेल्यावर नारळ ठेवून  माफी मागायची असे बापूने ठरवले.संध्याकाळी पाहुणे येवून गेल्यावर बापू  घरीगेला. त्याच रात्री  मेव्हणा  कायमचा आटोपला.  

          गिरावळीत नवीन हायस्कूल सुरू झाले. चार-पाच वर्षात दोन हेडमास्तर बदलले.  तिसऱ्या वेळेला विट्याचे मुतालिक हेडमास्तर म्हणून आले. माणूस जहांबाज होता. त्यांचा मेहुणा समाज कल्याणअधिकारी महोता. मुतालिकानी शाळेला वसतीगृहाची परवानगी आणली.  शाळेतली मागास वर्गाची पोरं वसतीगृहात  दाखवीत. प्रत्यक्षात  बाहेर गावाहून येणारी  दहाबारा मुलं सोमवार ते शुक्रवार रहायची  नी शनिवारी दुपारीशाळा सुटल्यावर  घरी जायची. गावातली पोरंफक्त दुपारी  दुपारी मेसमध्ये जेवत. मुतालिकानी समाज कल्याण विभागाकडून  ग्रॅण्ट मिळवून मोठाहॉल  बांधून घेतला. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळेअध्यक्षांसह संस्थेतले सगळेच पदाधिकारी त्याना टरकून  रहात. प्राथमिकचे पाचवी, सहावी, सातवीचे वर्ग सुरू केल्यावर  शाळेचा पट वाढला तसे शिक्षक वाढलेआणि रात्रपाळी शिपाई मंजूर झाला. गावातलाच धनगर शिपाई निम्मे पगार संस्थेला देण्याच्याअटीवर नेमून घेतला. त्याला रात्र पाळीला तसे काहीच काम नव्हते. रात्र पाळीला शाळेच्या  मेसमध्येच त्याच्या जेवणाचीही सोय होई. सकाळी शाळेच्याआवारातल्या  झाडांचे शिंपणे आणि मुतालिक सरांच्याघरी भांडी घासून देणे ही  कामे तो आनंदाने करी.  रात्री तो मेन  गेट समोर  बसे  नीअधून मधून आवारात चक्कर मारी. उन्हाळा  सुरु झाल्यावर भयंकर  उकाडा व्हायला लागला. मग तो  मागच्या बाजुला प्रयोग शाळेचा व्हरांड्यात बसायलालागला. तिथे खाडीच्या नस्तातून थंड वारा यायचा. शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांची ती बसायची जागा होती. प्रयोग शाळेतले टेबल बाहेर घेवून रात्रपाळी शिपाई तिथे बसला. उत्तर रात्री गार वाऱ्यावर त्याला झोप लागली. काहीवेळाने  मेस जवळ  वळचणीला बसलेले कुत्रे जोरजोराने  भुंकायला लागले.तो अर्धवट जागा असताना कोणीतरी टेबल खराखरा बाजुला  ओढून त्याला खाली ढकलून घातले.  तो जागा होवून पहातो तर टेबल कडेला ओढलेले होतेनी तो खाली पडलेला होता.

         त्या नंतर दोनदा हाच अनुभव आल्यावर तो घरीआपल्या बाबाला हे गोष्ट बोलला. त्यावर बाबा म्हणाला,“ ततं वाटमार्ग्याची फेरी हाय ह्ये माना आयकून म्हायती  हाय.  तेच्या वाटेत तू आडवा आला म्हणून त्याने तुजा टेबाल तेच्या रस्त्यातून बाजूला  वडले. ह्येच्या फुडे  तिते बसू नग़ं..... त्येना  दोन टायम समज दिल्यालीहाय..... ह्येच्या फुडे  जबर फटका द्येईल तो......” शिपायानेतिथे बसणे बंद केले. त्यावर्षी जुन मध्ये संस्कृत साठी नाट्याच्या पाध्ये सरांची नेमणूक झाली. मुतालिकानी त्याना वसतीगृहाचे रेक्टर म्हणून नेमले नी वसतीगृहातच त्याना  रहायला खोली दिली.  गप्पा मारताना शिपायाने त्याना आपल्याला आलेला अनुभव सांगितला. सगळं ऐकून घेतल्यावर पाध्ये सर म्हणाले, “ मी त्याची वाटच बंद करून टाकतो. तू मजा बघित रहा. ”

        शिपायाने  त्याच्या बापाने सांगितलेली गोष्ट ऐकवून सराना परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला. पण सर ऐकले नाहीत. त्या रात्री तिथेच टेबल टाकून त्यावर आपले अंथरूण घातले. उत्तर रात्री  कुत्रे जीव खावून भुंकायला लागल्यावर पाध्ये सराना इशारा समजला नी त्यानी खणखणीत आवाजात रुद्र म्हणायला सुरुवात केली, त्याबरोबर जोरजोराने दांडे आपटल्याचे आवाज झाले, वाटमार्गी मोहरा वळवून किंचाळत पळायला लागल्यावर मेसजवळ थांबलेले कुत्रे त्याच्या  मागे लागले. थोडे अंतर जावून कुत्रे परत आले. रुद्र पाठ झाल्यावर सरानी शिपायाला  हाक मारली. तो खडबडून जागा झाला. सर म्हणाले, “तुझा वाटमार्गीआल्यावर मी शंकराचे स्तोत्र म्हणायला लागल्यावर तो पळाला. ” दुसरे दिवशी शिपाई  व्हरांड्याच्या विरुद्ध टोकाला  कडेच्या खांबाला टेकून बसला. आज तो सावध राहिलेला होता. उत्तर रात्री कुत्रे भुंकायला लागल्यावर सरानी कालच्याप्रमाणे रुद्राचा पाठ सुरु केला. वाटमार्ग्याने दणादणा  दांडे आपटले नीजोराने किंचाळ्या मारीत तो मोहरा फिरवून धावत सुटला. आजही कुत्रे  भुंकत त्याचा पाठलाग करीत धावले. सरांचा रुद्रपाठ पूर्ण झाल्यावर शिपायाने त्याना नमस्कार केला. तिसऱ्या  दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. आज लांब अंतरा वरून  खूप वेळ हेल काढून रडल्याचे आवाज येत राहिले होते.पाठ पूर्ण झाल्यावर सर म्हणाले,“आता या नंतर तुझा वाटमार्गी  या वाटेने कधीच:येणार नाय. ह्यावेळी:त्याला त्याच्या फेरीत खंड पडला, त्याचा रिवाज मोडला.   त्याला एकतर आपली फेरी बंद तरी करावी लागेल नाहीतर मार्ग तरी बदलावा लागेल. मीआठवडाभर रोज इथे लक्ष ठेवून राहणार आहे. ” सरानी पुढे चार दिवस फेरीची वेळा साधून रुद्राचे पाठ सुरू ठेवले होते. पण यावेळी कुत्रे भुंकले नाहीत कारण वाटमार्गी तिकडे फिरकलाही नाही त्याने बहुतेक फेरीचा मार्ग बदलेला असावा. 

                      **********