Seed cock in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | बियाण्याचा कोंबडा

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

बियाण्याचा कोंबडा

         बियाण्याचा कोंबडा

                     

 

 

तीन कच्चीबच्ची पोरं काशीच्या गळ्यात टाकून लखू धनावडा मेला.दोन कलमं आणि जेमतेम पाच मण भात नी दीड दोन मण नाचणे पिकतील एवढी  तुटपुंजी जमीन....... पण काशी डगमगली नाही.  जोताचे दोन बैल, दुभती गाय नी तिची दोन वासरं असागुरांचा बारदाना ती निगुतीने सांभाळायची. त्यांच्या जोडीला सदू भटाकडून दोन रेड्या पोसणीला आणल्या.तिला ढोरा वासरांची मुळात चांगली हदन. तिची गाय लिंबासारखी टुकटुकीतअसायची. उन्हाळी सड्याशिवराला जावून ती आईन, धामण, हसाणी, बिवळा, पिंपळ असा झाडांचा वेंगाटभर पाला आणी. लांब लचक आवती काठीच्या टोकाला चारीची लखललखीत कोयती बांधून उंचावरच्या पाल्याचे टाळे कापी. पावसाळी भटांची आगरं साफ़ करून देण्याच्या बोलीवर चार कापून आणी.गिमभर दुपारच्या विरडीला सड्यावर जावून करड गवताच्या वरंडी आणून बेगमी करी. गायीच्यादुधाचा दुवक्त रतीब घाली. तिच्याकडे कायम दहाबारा कोंबडी असत. नवरा मेल्यावर तिने कोंबड्यांचीसंख्या वाढवली.

    काशीचं घर वाडीत एका बाजूला आडवणाच्या धारेबरोबर. दिवसावढवळ्या कोल्हे बाऊल येवून कोंबडी मारीत.तिने तोरणीची, करंदीच्या काटेरी शिरड्याचे भारे आणले. शिव्या भोवतळ्याला कामाला बोलावून चिव्याची शिरड  आणि  काटेरी शिरडी वापरून गच्च तटकी बांधून घेतली.दोन दिवसात सग़ळ्या आगराला तटक्यांची बंदस्ती झाली. आता कोल्ह्या बावलांना आगरात शिरायचा मार्ग बंद झाला. गावात  दिन्या गावकराकडे मोठ्या कोंबड्याची जात होती. गावठीकोंबड्याच्या दीडपट  मोठा पक्षी, आरू चार आंगळंलांब रुंद, तंगड्या बापया माणसाच्या पायाच्या आंगठ्या एवढ्या भरदम. पाखरू वजनाला जास्तभरे. लोक झटून हे इंग्लीश कोंबडे चढ्या भावाने घेत. गावठी अंडी दोन पैशाला तीन  असा दर होता. पण इंग्लीश कोंबडीची अंडी गावठी पेक्षामोठी नी  रंग लालसर दिसे. ती पैशाला एक  अशा दराने खपत. खुप लोक या कोंबड्यांची निपज करण्यासाठी पिली मागत. पण दिन्याची बाईल मागणाराना धुडबुडाऊन लावायची. “इले मोटे पिली मागनारे.....मीमाज्या म्हायारसून मुद्दम ह्या बियाणा हानला तां काय चोरापोराक वाटूसाटना नाय! माज्या बापाशीन माका सांगलेला हा..... येळेक पागून हाडलेल्या माशातले चार माशे  शेजारी पाजारी दिवचे पन खैच्या कोंडीवर पाग टाकलो तेचो ठिकानो  सांगाचो नाय.”  गावडीण एवढी सावध की त्या मटणासाठी कोंबडं मागायलाआलेल्या गिऱ्हायकाला फक्त नर कोंबडे  नी रोवणीवर बसायच्या बंद झालेल्या निबर  कोंबड्या विकी.  तलंग कधी चुकूनही  विकीत नसे, न जाणो कोणी तरी ती बाळगील नी इंग्लीसकोंबड्याची निपज होईल . काशीने कोण कोण मध्यस्ती घालून पिली मिळवायची जबर खटपट केली,चढा  दर देण्याचे आमिष दाखवले  पण  गावडीणबधली नाही.

    काशी कोयत्या पाजळायला परशा सुताराच्या शाळेत गेली होती. आंघोळीच्या न्हाणीत किंवा चुलीत विस्तव पेटत असताना ती कायम मोठे मोठे निखारे विझवून कोळसे साठवून ठेवी. ती कधीही सुतार शाळेत आयदण- हत्यार घेवून जाताना टोपुलभर कोळसे न्हेत असे. म्हणूनगेली की परशा आधी तिचं काम हातात घेई. परशा कोयत्या तापवीत असताना ‘क्लक् क्लक्’ करीत कोंबड्या अंगणात आल्या. त्यांच्या जथ्यात तीन मोराची पिल्लं होती. काशी आश्चर्यानेम्हणाली, “भावजीनू, हे मोर कशे काय मिळाले? ” त्यावर परशा म्हणाला, “ दीड म्हैन्यापूर्वी मी शिकारीक गेललय..... थय झाळीत लांडोर दिसली म्हनू बार टाकलो.  लंडोरा  थंयच पडला. तेका उकलूक गेलंय तवा झाळीच्या मुंदात तीन कवटां उमागली. तवां मी उमाजलय्..... रोवणीर बसलेली लांडोर आपून मारली. मी तीनवकवटां उकलून हानली नी कोंबडीच्या रोवणीत थेवली..... नी  हे तीनव मोर जलामले.”

“ह्या तुमी भलताच डोक्या चलवलास....... दुसरो तिसरो कोन आस्तोतर  लांडोरी वांगडान तेची कवटा दुकू  खावन् मोकळो झालो आस्तो.” दीर्घ सुस्कारा टाकीतपरशा म्हणाला,“विट्ठला देवीच्यान सांगतय काशीबाय, बार लागोन पडलेला लांडोरा उकलताना तेची कवटां दिसली ना... तवा, माज्या काळजाक् चरको बसलो. ह्यां पाप झाला आपल्या हातसून.म्हनून देवाचा नाव घेवन माफी मागली. नी ते येळेक ही कवटां कोंबडीच्या रोवणीत ठेवचा सुचला माका. लांडोर मी थयच भिक्या मोंड्याक देवन टाकली. नी पुन्ना मितीक लांडोरीवर बार टाकायचो नाय नी लांडोरीचा मटान पन खावचा नाय, अशी आण घितली. देवाच्या दयेन ही दोन मोराची पिला निपाजली, नी माजा पाप फिटला. मी ती बाळगनार!” हात जोडीत काशी म्हणाली“तुमी भावजीनू भलतेच भावरती आसास.....” कोयत्या घेवून घरी जाताना अकल्पितपणे तिला नामी युक्ती सुचली. आपणही गावडीणी कडून इंग्लिश कोंबडीची अंडी  आणून ती रोवणीत  ठेवून पिली मिळवायची! वाडीतल्या पोराला सांगून तिनेअंडी विकत आणली.

     पोराला बजावलेलं होतं, सकाळीच भिणभिणताना जायचं नी लालसर रंगाची अंडीच उचलायची. त्या प्रमाणे पोरगागेला त्या वेळी गावडीण उठायचीच होती. सकाळीच अंड्याचं गिऱ्हाईक आलं म्हणताना दिन्या गावडा सुद्धा चकित झाला. मशेरीचा खकाळा थुंकून त्याने विचारलं, “इतक्या बेगून  कसो काय इलंस? ” पोर हुषार होता त्याने लगेच उत्तरदिले. “आज आटच्या गाडयेन बाबा डबो घेवन जावचो हा.....” सोप्यालगतच्या पडवीत कोंबड्यांचीडालगी होती. दिन्या गावड्याने तिथे पोराला नेवून त्यालाच अंडी उचलायला सांगितली. त्यानेवसहा अंडी उचलली नी सहा पैसे देवून तो निघाला.

पोराने अंडी आणल्यावर काशीने त्याच्या हातावर चार बटण बिस्कुटे टेकवली. रोवणीवर बसलेल्या कोंबडीची अंडी उचलून तिने गावड्याकडून आणलेली अंडी रोवणीत ठेवली. एकवीस दिवसानी सहाही अंड्यातून सहा पिली बाहेर पडली. काशी त्या पिलांची डोळ्यात तेल घालून निगुती राखी. त्यांच्यासाठी चण्याच्या डाळीचा भरडा काढून तो तांदुळाच्या कण्यांत मिसळून त्यात अधून मधून हळद, मिरी पावडर, गूळ, अल्याचा चोथा मिसळून खाऊ घाली.दर पंधरवड्याने कोंबड्यांच्या खाण्यात समुद्रफेणीचा चुरा मिसळून घाली. पिली महिनाभराची होईतो ती बाहेर फिरत असताना एका चेडवाला त्यांच्यावर राखणीला ठेवून वेळेवारी त्याना डालग्याखाली झाकून ठेवी. दोन अडीच महिने मागे पडले नी गावड्याकडच्या पिलांचा वाण नजरेतवभरण्या इतपत दिसायला लागला. त्यात दोन कोंबडे नी सहा तलंगी निपजल्या. देवाच्या दयेनचांगला वाण मिळाला म्हणून दोन कोंबड्यातला एक तिने देवाला सोडला. देवाला सोडलेल्या कोंबड्याला डालग्यात झाकीत नाहीत, नी तो विकायचाही नसतो. तो आपल्या मनाने जिथे जाईलतिथे जाऊ द्यायचा. पण काशीने देवाला सोडलेला कोंबडा ठिकाणाबाहेर जाईना. संध्याकाळी बाकीच्या कोंबड्याना  झाकल्यावर देवाचा कोंबडा  पडवीच्या माळ्यावर  रात्रभर बसून राही.

पाच महिन्याच्या भरीला नर चांगले वाढून दमदार बांग द्यायला लागल्यावरकाशीने गावठी कोंबडे विकून टाकले. नवीन जातीच्या तलंगी आता रोवणीवर बसायला लागल्या.काशी त्याना इंग्लीश कोंबे म्हणे. आठ महिन्याच्या भरीला इंग्लीश कोंबडे ढोपरभर उंच वाढले. काशीच्या निगुतीत कोंबडे असे  माजले की, ‘एक्या कोंब्याचा मटान धा मानसांच्या कुटूंबाक पुरात’ असं  लोक कौतुकाने म्हणत. काशीने कोल्ह्या- बावलांचाआरेख केलेला असला तरी  कावळे -घारी  अधून मधून पिली पळवायला येत. पण इंग्लीश कोंबडे मोठे वाढल्यावर  कावळ्याना तर ते कळपा जवळ फिरकूहीदेत नसत. एक दोनदा घार आल्यावर  दोन्ही बकासूरघारीवर  असे तुटून पडले की कोंबड्यांचा कलकलाट  नी घारीची किचाळी आयकून  काशी  चुलीवरची भाकरी तशीच टाकून  काठी घेवून अंग़णात आली. तेंव्हा घार  जमिनीवर उताणी पडून पंख फडाफडावीत आळपत होती नी  दोन्ही कोंबडे दोन बाजूने तिला बोचीत होते. काशीला बघून कोंबडे बाजुला झाले नी तरमळत  बाजुला सरकून घार  उडाली. दोन्ही कोंबडे  तिच्या मागून झेपावले नी घार ऊंच  गेल्यावर खाली उतरले .

 वर्षभरात इंग्लीश कोंबडीची पैदास चांगलीच  वाढली. सहा नर कोंबडे  नी पंधरा वीस कोंबड्या इतके नग झाले. ही जात गावठीपेक्षा दुपटीने जादा अंडी देणारी नी वाढही झटपट होणारी. अंड्यापासून पिलगी निपजू नयेतम्हणून काशी सकाळीच विक्रीची अंडी डालग्यातून उचलून बाजूला करून ती पाण्यात ठेवून दोन-तीन दिवसानंतर विकी.काशीचा इतका चांगला जम बसला रोज पंचवीस तीस अंड्याची विक्री व्हायला लागली. आता कोंबड्याना पहिली  जागा पुरेना म्हणून गोठ्याला दुसरी पडवी काढावी लागली. काशीने ही जात कूठून कशी पैदा केली याचे लोकाना भलतेच कुतूहल! पण काशीने केलेली हिकमत ही कोणालाच उलगडणारी नव्हती. त्यानी चौकशी केल्यावर ही पिलग़ी फोंड्याच्या बाजारातूनभावाने आणून दिली म्हणून ती सांगे.  

  

                    ※※※※※※※※