Paris was found in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | परिस मेळ्ळो

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

परिस मेळ्ळो

परीस मेळ्ळो 

घाटी चढल्यावर शेवटच्या मोडणाला रात्या आंब्याखाली तानू देवळी दम खायला थांबला. बानघाटी म्हणजे मोडणा मोडणानी वर गेलेली जीवघेणी चढण. त्यात पावसाने चढणीचे दगड बुळबुळीत झालेले. सड्यावर यायला जवळची वाट म्हणून तानू या घाटीने आला. दम जिरल्यावर तो पुन्हा चालीला लागला. धारेपर्यंत आल्यावर घाटी संपली आणि सड्याची सपाटी सुरू झाली. धारेपासून पाच कोस औरस चौरस टापू म्हणजे नुसती सडावळ! कुडा, आंजण, पंचकोळी, उक्षी अशा गोड्या आणि करंदी, तोरणी, वाघेरी अशा काटेऱ्या झाळी नी अधून मधून चुकार एखादे वड, पिपंळ, सात्विण, किंजळ, कुंबया, काजरा असले झाड. चुकार थोडेसे गवत बाकी सगळा सडा ओसाड! पाच गावांच्या सीमा या सड्यावर एकमेकींना भिडलेल्या. सडा सुरू झाला अन् तानू निरखीत चालला. पावसाळी पाण्याच्या व्हावटी सोडून उंच भागात साठवलेली सकेर दिसेल तिथे तर तो बारकाईने बघायचा. पायाने सकेरीचे ढीग विस्कटून बघायचा. बुधा कातकऱ्याने सांगितल्याप्रमाणे अशा सकेरीच्या ढिगोळ्यातच टिटाटवळी अंडी घायालची. तिच्या अंड्याचा रंग सकेरीतल्या गोट्यांसारखा, निरखून बघितल्याशिवाय तिची अंडी उमगू यायची नाहीत. पाच सहा ढिगोळ्या परतून आल्या आणि तानूच्या उजवी कडच्या झाडकळीतून टिटाटवळी उठली. टिव् टिटिव् टिटिटँव् टिटिटॅव् अशी आळप झाली. तानूच्या डोक्यावर घिरट्या घालायला लागली. तानू चपळाई करुन उजवीकडे वळला. तो मनोमन हरखला.झाळीच्या तिन्ही अंगाला सकेर साठून उंच वरंडे झालेले. तिथे उकिडवा बसून तो शोधू लागला. सगळी सकेर अरतून परतून झाली पण अंडी उमगली नाही. तानू कंटाळला तिथेच सकेरीवर पाय सोडून बसला, आडकित्ता काढून सुपारी कातरायला लागला. मघाशी उठलेल्या टिटवीची आळप अजून सुरूच! आता तिच्या जोडीला दुसरी टिटवी आली. दोघीनी ओरडून ओरडून असा सकनात घातला की तानूचे डोके भणभणायला लागले. एक टिटवी मध्येच लांबच्या एका सकेरीच्या ढिगोळीवर उतरली. कुशी पडून पंख फडफडवीत, ती गोल गोल फिरू लागली. पान खाता खाता तानू लक्ष ठेवून ऱ्हायलेला. ढिगोळीवर लोळणारी टिटवी मरणार की काय अशी शंका तानूला वाटली. कदाचित ती लोळण मारते त्याच्या आसपास तिची अंडी तर नसतील ना? असाही तर्क त्याने केला.तानू टिटवीच्या रोखाने निघाला आता टिटवी हालचाल करायची बंद करून निपचित पडून ऱ्हायली. तानू टिटवीपासून वावभर अंतरावर गेला मात्र... मेल्यागत गप्प झालेली टिटवी टिट्यँव ऽऽ टिटिट्यँव करीत भुर्रकन उडाली. "बांजिंदी, माका हूल मारुन देकयल्यान्" तानू वैतागत म्हणाला, त्या जागेला शोधूनही अंडी मिळाली नाहीत. आता पुनःश्च टिटवीने दुसऱ्या ढिगोळीवर लोळण मारली. या खेपेला मात्र तानू चकला नाही. आता कुठून कुठून आणखी चार-पाच टिटाटवळ्या तिथे आल्या. तानू अंडी शोधून शोधून हैराण झाला. मध्यान्ह टळून गेली. पोटात भुकेचा डोंब उसळला. अख्खा सडाभर टिटाटवळ्यांची नुसती आळप चाललेली. चार बाजूनी ढग जमून अंधारून आले. पावसाचे चिन्ह दिसू लागल्यावर मात्र नाऊमेद झालेला तानू माघारी निघाला. तानू धारेला अगदी घाटीच्या तोंडाशी येईपर्यंत टिटाटवळ्या त्याच्या मागावर आल्या.तानूने बेड्यातून आत पाय टाकताच घरात चाललेल्या हसण्या खिदळण्याचा आवाज तानूच्या कानावर आला. बैठकीच्या खोलीत दाजी पोलीसवाला बिछायतीवर रूबाबात बसलेला. पान खाऊन लालीलाल झालेले दात दाखवित निर्लज्जपणे फिदी फिदी हसत फुला त्याला खेटून बसलेली. त्यांच्या अंगावरून तानू मागीलदारी गेला. रांधपाच्या होवरीकडून वाटपाच्या शिजवणाचा खमंग वास आला. झटझट पाय धुऊन तानू आत आला. दाजी मुक्कामाला असला की मागच्या पडवीतल्या साण्यात हुकमी बाटली ठेवलेली असायची. उभ्या उभ्या चार घोट तोंडात ओतून तानू चुलीकडे निघाला. चुलीतली लाकडे बाहेर ओढून तिथेच बाजूला पाटावर टेकलेल्या मायकडे त्याने जेवणाची मागणी केली. "दुनियेची नर्कड तुडौन इलस माज्या पुताऽऽ? बस आता. भैणीच्या कमायवर सोन्याचो घास खावक कसो येळेर टपाकलं रेऽऽ?येरे ऽऽ माझ्या कावळ्या...."निरुद्योगी तानूला माय नेहमीच असे खडसवायची. तानू वैतागाने बडबडला, "शिंदळकी करण्यापक्षी फिरलेला काय वायट्. येकदा माका तोडगो गवसॉने मगे बघच तू चल... जेवक वाड आदी." ह्याच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही हे ओळखून मायने ताट वाढून त्याच्या पुढ्यात ठेवले. तानू तडस लागेपर्यंत जेवला. जेवण झाल्यावर बचकाभर सुपाऱ्या नी पानांची चवड चंचीत भरून तो बाहेर पडला. दाजी आला की दोन दिवस डिंबी देऊन रहायचा. आता घरात राहण्यात अर्थ नव्हता. तानू देवळाकडे निघाला. घरी असे ऐरे गैरे जमले की तो नेहमीच देवळाजवळची धर्मशाळा गाठायचा. फुलाचा छिनालपणा त्याला बिलकूल आवडत नसे, पण मायचीच तिला फूस, असले नारे बंद करायला घरामध्ये खंबीर कर्ता पुरूष असावा लागतो, तो मुळी होताच कुठे?तानू आणि फुला यांच्या बापाचा खुद्द मायलाच पत्ता नव्हता त्यांचेच कशाला त्यांच्या शेजारी हारीने असलेली चारही घरे अशी बेवारशी बिनबापयांची! देवाचे सेवेकरी या नावाखाली सगळ्या गावाचीच सेवा त्यांच्या कपाळी लिहिलेली, त्या चारपाच घरात मिळून तानू आणि गोकूळ हे दोनच बापये, गोकुळ तानूपेक्षा मोठा. तो मुंबईत म्हणून गेला तो तिकडेच... देवाच्या सेवेत रूजू होईपर्यंत दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडायची म्हणून तर फुलाला देवाच्या सेवेत लावयाचा निर्णय मायने घेतला. नेमका त्याचवेळी दाजी पोलिसवाला मुंबईची नोकरी सोडून गावात रहायला आलेला, त्याच्या दोन बायका. एक लग्नाची आणि दुसरी मुंबईची कोणी पारशीण!! सक्तीच्या लष्कर भरतीत जवान दाजीला मामलेदाराने लष्करात भरती केला. तो आफ्रिका, ब्रम्हदेश असा सात समुद्रापार कुठे कुठे फिरला. पुढे युद्धात पुढच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली म्हणून त्याला मुंबईला परत पाठविण्यात आले, गोळीची जखम बरी झाल्यावर तो पोलिसात दाखल झाला.त्यावेळी त्याने गावच्या पोलिस पाटलाच्या मुलीशी लग्न केले. त्याची बायको शेतीसाठी गावीच रहायची. दाजीने मुंबईत खोली घेतली. त्याच्या बिऱ्हाडासमोरच पारशी बाबाजीची सोन्या चांदीची पेढी होती. दाजी त्याच्या पेढीवर बसायचा. त्या पारशाची तरणी पोरगी दाजीवर फिदा झाली. पुढे स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळच्या धुमश्चक्रीत पारशी बाबाजीचा मुडदा पडला नि पोरीसकट पारशाची इष्टेट दाजीच्या कबजात आली. मुंबईची पेढी विकून नोकरीचा राजीनामा देऊन पारशिणीसकट दाजी कायमचा गावात रहायला आला. गांगेश्वराकडे चक्कर मारताना गंगू देवळिणीच्या फुलावर त्याची नजर पडली. खरेतर त्यावेळी देवळ्यांच्या पोरी लग्नकार्य करून संसाराकडे वळायला लागलेल्या. पण पैशाच्या आशेने गंगूनेच पोरीला देवाच्या सेवेत रूजू करायचा घाट घातला. दाजी पोलिसवाल्याने पुढाकार घेऊन सगळा बेत पार पाडला. गोठ, तोडे, बिल्वर, चिंचपेटी असे ओझेभर दागिने घालून फुला देवाच्या सेवेत रुजू झाली.तिचा आवाज मुळातच गोड! गंगूने स्वतः तिला नाचाचे धडे दिलेले. गांगेश्वराच्या उत्सवात पायात मानाचे चांदीचे तोडे घालून फुला पालखीपुढे नाचली. चार सहा गावचे बापये फुलाचा नाच बघण्यासाठी उत्सवाला जमले. घरी कायमचीच बिछायत घातलेली. रोज गाणे बजावणे व्हायचे. पंचक्रोशीतले वतनदार, सावकार, फुलाच्या घरासमोर लाळ गाळीत रहायचे. तानूला हे रंग ढंग अजिबात पसंत नव्हते. तो करवादला की माय उलट त्याचीच खावड काढायची. "ह्यो मेलो झडगो कोलो सांगणार, भिक मागाची अक्कल नाय. तुका कामधंदो न करता दोन टायम् सोन्याचो घास मिळताहा तो सुकान खा नी गप ऱ्हव... सगळी दुनिया फुलाच्या नादात कशी पागल व्हयत बगच तू...! मायचे भाकीत खरेच ठरलेले...!खाण्यापिण्याची चंगळ असली तरी लोकात उघड उघड होणारी टिंगल, कुचेष्ठा तानूला सहन व्हायची नाही. पण लोकांना तरी कसा नी का बोल लावायचा..? फुला काय फक्त गाणे बजावणे एवढ्या वरच थांबली होती? दीड-दोन महिन्यांनी बुधा कातकरी नाहीतर त्याची बायको जानी कसली कसली पाळे मुळे घेऊन यायची मायकडे, ती कशाला? या सगळ्यातून बाहेर पडावे असे तानूला फार वाटायचे पण अंगभर कष्ट करायचे वावडे. शिक्षण जेमतेम अक्षर ओळखीपुरते झालेले! नोकरी मिळणारी नव्हती आणि धंदा काय करावा ते सुचत नव्हते. कळत्या वयापासून गांगेश्वराच्या देवळात कौल प्रसाद घ्यायला येणारे लोक तानूला दिसत. कसले आडमेळे आले, म्हस दूध देत नाय, मुंबयवाल्याचे पैसे आले नाय, सोरगत मिळत नाय, घरातला शीकपन कमी होयत् नाय... नाना प्रश्न घेऊन लोक कौल घ्यायला यायचे. भल्या गुरव उजवे, डावे कौल मागायचा, लोकांना गुण यायचा. काही रिकामटेकडे दिवसभर देवळात बसून रहायचे. बाबल्या सुतार त्यातलाच. तो कायम देवळात पडून रहायचा. पुढे त्याच्या केसात 'जट' उगवली. अवसे पौर्णिमेला तो घुमायला लागला. तीन महिन्यात डोईतली जट चांगली दोन बोट जाड जोऊन लोंबायला लागली. मग बाबल्या उतारे, तोडगे सांगायला लागला. अल्पावधीच 'जट्या सुतार' म्हणून त्याची प्रसिद्धी झाली. आठवड्यातला सोमवार, गुरुवार, शनिवार त्याच्याकडे माणसांची रीघ लागायची.कोणी म्हणे जट्या सुताराकडे गांगेश्वराचे सत्त्व जागृत झाले. त्याचा मुळवस-मूळ भूमका त्याला वश झाली. काही असो, जट्या वदेल त्याची प्रचिती यायला लागली. त्याची विभूत लावल्यावर आडमेळे दूर व्हायला लागले. गांगोच्या देवळातले कौल प्रसाद जवळ जवळ बंद पडत चालले. फुलाची शेस भरायचा दिवससुद्धा जट्या सुताराने नेमून दिलेला, फुलाला बरकत आली. माय दर गुरुवारी तांदूळ, नारळ, सव्वा रुपया जट्याकडे मांडावर धाडायला लागली. एका गुरुवारी तानू ते घेऊन जट्याकडे गेला. जट्या आंग धरुन घुमत असलेला. समोर माणसांची गर्दी, पण गर्दीतसुद्धा देवळणीचा तानू दिसताच जट्याने समोरची माणसे बाजूला केली. "माजा लेकरु मांडार इलाहा... तेचो मान आदी! चल रे देवळ्या सामनी ये...!"नारळ, तांदूळ, पैसे चौरंगासमोर ठेवून तानू भक्तीभावाने जट्या पुढे वाकला, त्याच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, "जट्या बाबा... माका बरकत येयना नाय... आवशी भैणीच्या जीवार खांवक माजा मन घेयत नाय. माजा नशिब उगडात असो कायतरी तोडगो सांग द्येवा.." त्याच्या कपाळावर विभूत टेकवून जट्या म्हणाला, "लेकरा... तुजा नशिब उगाडतला, पन तू असो टोणगो, आपले हातीन घात करशी. सोयन ऱ्हवल, हुबलाकपान कमी केलस तर हातीत माती घरशी तेचा सोना जायत... मूळ वसाचो नारळ काडून पूजेक लाय... चाळ्याक नारळाचा फळ, म्हारवसाक कोंबो देवन् राजी कर... मगे तुका परीस मेळतलोहा. कसा व्हयत, कदी व्हयत तेची फोड ह्या थळार होणार नाय... झाली, तुका उमागणार नाय... हुळगेपान करु नको... दुसऱ्या थळार खुलासो मागू नुको! तसा करशील तर गुण जायत. सांगतलो शब्द, दिला वचान याद कर... ह्या थळाक, विसरा नुको..." तानू सर्द झाला. जट्याचे शब्द हृदयात साठवीतच तो माघारी फिरला.तानूचे जसे भाग्यच उजळले. लोखंडाचे सोने करणारा परीस... तो परीस एकदाचा मिळाला की बस्स! रावणासारखी सोन्याची लंका वसवीन...तो मनोराज्यात मश्गुल झाला. त्याला रोज स्वप्ने पडायची. त्याच्या स्वप्नात कोणी दाढीवाला बाबा फकीर यायचा. मनशीळा सारखा एक खडा त्याच्या हाती देऊन म्हणायचा, "हा परीस घे याचा नीट वापर कर नी लोखंडाचे सोने करुन तुझे दुर्भाग्य बदल."पहिला भर ओसरल्यावर तानू शांतपणे विचार करु लागला. ह्या फाटक्या गावात परीस कसा नी कुठे मिळणार! तो काय हवेत तरंगत येऊन आपोआप हातात थोडाच पडेल? आपणही आपल्याकडून प्रयत्न करायला हवेत. शोध चौकश्या करायला हव्यात. एकदा वाटे जट्याने उगाच काहीतरी भगल सांगितली झाले. पण लगेच त्याचे मन सांगे, फसवायचे असेल तर अमूक कर, अमक्या ठिकाणी खणलेस तर गुप्त धन मिळेल असे सांगून त्याने वाटेला लावले असते. परीस मिळेल असेच का सांगितले? बरे मला अमूक दिलेस तर तुझे काम होईल असेही बापड्याने कुठे सांगितले? भल्या भल्यांना त्याची सामक्षा पटली म्हणून तर माणसांची गर्दी होते ना त्याच्याकडे! आपले नशीब फळफळणार आहे. शेवटी संपत्ती नशिबात असावी लागते. कोण कुठचा दाजी मर्गज... पण नशिबात होते म्हणून तो सात समुद्रापार जाऊन आलाच ना? धनदांडग्या पारशाची नक्षत्रासारखी पोर नेमकी दाजीवर फिदा झाली ना?मोठ्या भाग्याने आपले नशिब उघडणार आहे. मिळूदेच मला परीस! जट्याला टोलेजंग वाडा देईन बांधून. तो मनसुबे रची. ही वार्ता मायच्या कानावर गेली. पोराचे खुळेचार बघून एक दिवस ती कडाडली, "तान्या म्येला तू उकिरडो फुकनारो गाडाव.." फुलाच्या रुपान तुज्या घरातच परीसच इलेलो हा. तेचो नीट सांबाळ केल्लस तरी सोन्याच्या राशीर बसशीत .. पन मेल्या तुजी गतच खोटी... त्या जट्यान काय सांगल्यान तेचो अर्थ नीट लाय... कायतरी हात पाय हालय... सोदो खावन् खावन् चरबेलोहा, त्या जट्यान् सांगल्यान नि ह्यो कावळो चल्लो गरुड होवक्...! मायचे सांगणे तानू थोडेच मनावर घेणार? पण आता मात्र परीस मिळवायचा त्याला जसा ध्यासच लागला. भेटेल त्याच्याजवळ तो चौकशी करायचा. गावातला अण्णाजोशी जाणता, भविष्य सांगायचा, पुराण सांगायचा, देवादिकांच्या पोथ्या त्याने वाचलेल्या. तानू त्याला भेटला परीस कुठे मिळेल याची चौकशी केली. जोशी बुवा म्हणाले, "आता पुराणात आहेत वर्णने... अशान् असा म्हणून परीस असतो. तो लोखंडास लावला की लोखंडाचे सोने होते म्हणतात. पण देखला कोणी? मी इतकी वरसे केसरी दिखील वाचतो पण कोणास परीस मिळाल्याचे माजे वाचनात नाय. आता एक गोष्ट खरी, मिळालाच कोणास परीस तर माणूस काय आपल्या तोंडान सांगेल थोडेच?" भेटणारा प्रत्येकजण हे सांगे. परीस आहे हे सगळ्यांना दखल, पण मिळतो कुठे? शोधायचा कसा? हे कोणालाच सांगता येईना.तानूच्या चौकशीतून बुधा कातकरीही सुटला नाय. पाळे मुळे द्यायला तो मायकडे आला तेव्हा त्याला गाठून तातूने विचारले, खूप आठवण करुन मान डोलावीत बुधा म्हणाला, "हा हा माला हाये ठावं. म्हंजे परीस तसा डोल्यान् बगलेला नाय मी पण माज्या म्हाताऱ्यांन माला सांगितला ते आटवला बग." "सड्या माळावर टिटाटवळी ऱ्हाते. सड्यावर पान्याच्या व्हावटी जवळ सकेर ऱ्हातो ना साट होऊन... तर ते सकेरमदी मिरगावाच्या येळेला टिटाटवळी अंडी घालणार... तेच्या अंडीचा रंगबी सकेरी सारखाच ऱ्हायेल ना, माणूस जवळसून चालत गेला तरी तेला पत्या लागाचा नायी. रानामाळाला फिरुन आमची नदर बनलेली ऱ्हायते पक्की. त्येच्या अंड्यावर तिला सारखे काळे टिपशे ऱ्हायतेत. त्येच्या वरसुन वळकू येतो कातकऱ्याला."ती आंडी नदरे पडायलाबी भाग्य लागतो. ज्ये माणसाच्या नजरेला पडला तेचा कायतरी काम व्हयेलच. अशी वदंता हाये लोकात. तर तेची पिल्ली आंडी फोडून भायेर पडती. आशी पिल्ली नदरे पडली पोर्णिमेचे रोजाला काय मंग सूर्य मावळतीला पिल्लीच्या तंगड्याला तारेत गुंतवून सोडायचा, मंग टिटाटवळी ते बघल्यावर तंगड्याची तार सोडवायला बघणार, त्येच्या चोचीला लोखंडची तार तुटायला जमते नाय, तवा आबाळात चंद्रम उगवल्यावर टिटाटवळी परीस आनायला जातो. त्येला परीसाचा ठिकाणा उज्जू म्हायती हातेना! टिटाटवळी परीस हानून तारेला टेकवनार, मंग तार सोन्याची बनती. ते नरम हायते ना? मंग पाखरु परीस चोचीतून बाजूला ठेवतो आनि सोन्याची तार तोडते. ते वक्ती परीस धरायला भेटते पग...बुधाने सांगितलेली अद्भूत माहिती ऐकून तानू थक्क झाला. त्याला पानसुपारी देत तो म्हणाला, "च्यामारी तुमी. तुका एवढा म्हायत तर तूच परीस मेळवायचो की नाय!" आपल्याच थोबाडीत मारुन घेत बुधा म्हणला, "छ्या छ्या आमी रानचा लेकरु, येळेला लांडी लबाडी करनार. भिक मांगुन ऱ्हानार.. पन असला वंगाळ काम नाय करेल कातकरी. पोटासाठी देवाच्या करनीत ढवला ढवल करायचा म्हणजे मोठा पाप ऱ्हायते ना. आसा परीस मिळवला तर ते टिटवीचा बी आनि परीस धरेल मानुसाचा बी वस खंडते ना माझे बापा. ते टिटाटवळी बी लई हुशार.... तेचा काम झाला काय परीस जितून आणला तिथे पुन्ना न्हेऊन टाकते. विनाकष्टाची मिळकत खोटी रे माझे द्येवा. तशी बुद्या धरली तर मानुसचा बी सैनात होयेल!" फाटक्या कातकऱ्याने तानूला जशी दिव्य दृष्टी दिली.आता काहीही करुन टिटवीचे ठिव हुडकायचे, तिच्या अंड्यातून पिल्लू कधी येते यावर नजर ठेवायची आणि परीस मिळवायचा असे तानूने ठरविले. आपल्या नशिबातच परीस मिळेल असे लिहिलेले आहे. आपण थोडेसे प्रयत्न केले तरी पुरे! पाऊसकाळ सुरु होण्याची तो आतुरतेने वाट बघायला लागला. मिरगाची शितडी पडली आणि चौथ्याच दिवशी तानू टिटाटवळीची ठिवे शोधायला बाहेर पडला पण पुरी विरड वाया गेली. अवेळी जाग आल्यावर धर्मशाळेत बसल्या बसल्या तानूची योजना सुरु झाली. निवतीच्या सड्यावर त्याला टिटव्या दिसल्या म्हणजे त्यांची बसाल त्या ठिकाणी असणार यात शंकाच नव्हती. तानू साकर निरखीत निघाला त्या अर्थी तो अंडी शोधतोय हे हुशार टिटव्यांनी अचूक ओळखले म्हणून तर त्यांनी कुयेल घातली होती. हे सगळे बुधा कातकऱ्याच्या सांगण्यात नक्कीच तथ्य आहे अशी खुणगाठ तानूने बांधली. संध्याकाळभर धर्मशाळेत लोळून दिवेलागणीच्या वेळेला तानू घराकडे वळला. दाजीच्या जोडीला भाऊ खोत, बाजी सावंत, भिकू देसाई अशी मातब्बर मंडळी बिछायातीवर बसून फुलाच्या गाण्यात धुंद झाल्लेली. माया उंबऱ्यातच पाय सोडून टेकलेली. मागिलदाराने घरात शिरला! मायची ठेवरेवीची ट्रंक उघडून पाच रुपये काढले साण्यात दाजीसाठी ठेवलेली बाटली निम्मी घशात ओतून त्यात पाणी ओतून ठेऊन तानू चोरपावलांनी बाहेर पडला. दुपारी उशिरा जेवल्यामुळे पोट दब्बच होते. त्यातही गरज पडलीच तर खिशात पाच रुपये होते. चव्हाट्यापासून फेरी मारून रात्री उशीरा तानू धर्मशाळेत येऊन पडला.पहाटे पहिल्या कोम्बाद्यालाच त्याला जाग आली. बाहेर ठोम पाउस सुरु झालेला. पावळीच्या पाण्याची चूळ भरून त्याने पान खाल्ले. कडकडून भूक लागलेली पण उजाडेपर्यंत थांबणे भाग होते. मग दिवसभरातल्या कामाची आखणी करीत बसला. पायाखाली दिसण्या इतपत उजाडले. तानूने तडक तारकराचे हॉटेल गाठले. म्हातारा बाबू तारकर अजून उठल्लेला नव्हता म्हणून तो हॉटेलच्या पायरीवरच टेकला. घटकाभराने हॉटेलची कवाडी उघडली. "कोन् तानू देवळी मां ऽऽ भूतूर बाकड्यावर बस" असे म्हणत बाबू आत गेला. चुलीत विस्तव पेटवून चहाचे आधण ठेवले. नारळाची कापे, शेव आणि चांगला दोन कप चहा पिऊन तानू उठला आणि त्याने पुनश्च बानघाटीची वाट धरली. घाटी वेंधून तानू धारेवर आला. एवढ्यात टिटिव टिटिट्यँव करीत टिटवीने त्याला हेरल्याची सलामी दिली. तानूचा शोध सुरू झाला.दुपारपर्यंत सकेर हुडकीत हुडकीत निवतीच्या सड्याची पुरी उगवतीची बाजू पार करून तानू ओंम्बळीच्या शिवेपर्यंत पोचला. ओंम्बळीला त्याची मावस बहीण घरठाव करून राहिलेली. तानू जेवण वेळेला तिच्याघरी पोचला. जेवण करून त्याने पुन्हा सडा गाठला. आता मावळत्या बाजूने जात बानघाटी गाठायचा बेत त्याने योजला. तानू फिरताना दिसल्यावर पुनश्च टिटव्यांची कुयेल सुरू झाली. सकेरीच्या ढिगोळ्या शोधीत शोधीत काळोख पडताना तानू बानघाटीत पोचला. तो घाटीला लागल्यावर त्याच्या मागावर आलेल्या टिटव्या पाठी फिरल्या. दिवसभर पायपीट करून टिटवीची अंडी काही त्याला उमगली नाहीत.पंधरवडा भरात निवतीच्या सड्याबरोबर आजूबाजूच्या गावातले सडे, रान, माळ तानूने पिंजून काढले. डोके चालवून त्याने ढोरे राखायला जाणाऱ्या पोरांशी संधान बांधले. आमिषही दाखविले. चार दिवसानी घाड्याचा पोरगा दामू टिटवीच्या अंड्याची मागाडी काढून आला. त्या ठिकाणावर पोचेपर्यंत पार संध्याकाळ झाली. राखणे वाट बघून कंटाळले. रागाने अंडी फोडून निघून गेले. तानू टिटवीच्या ठिवाजवळ गेला तर टिटिव करीत नरमादी तिथून उठली अन् फोडून टाकलेल्या अंड्याच्या कपच्या बघून तानूने कपाळावर हात मारून घेतला.तानू नाराज झाला खरा, पण सड्यावर सकेरीत टिटाटवळीची अंडी मिळतात ही गोष्ट सत्य असल्याची खात्री त्याला पटली. त्यानंतर पुन्हा पंधरावडाभर तो सड्या माळावर हिंडला पण अंडी काही दिसली नाहीत. पुरा उन्हाळा संपला मिरग जवळ यायला लागला, तानू धर्मशाळेत झोपलेला असताना गवळदेवाकडेच्या झाळीशी चोचीत चम चमकणारा परीस घेऊन येणारी टिटवी दिसली अन् तानू झोपेतून खड्कन उठून बसला. बाहेर मृगाचा पाऊस सुरु झालेला. तानू स्वप्नाचा अर्थ लावण्यात दंग झाला. चोचीत परीस धरलेली टिटाटवळी दिसली आणि जाग आली तर नेमका पाऊस सुरू... झऱ्याचा अर्थ या पावसाळ्यात परीस नक्की मिळणार.सकाळी उठून तानू घरी गेला. ह्या मिरगात काही करून टिटवीची बसल शोधायचीच असा चंग त्याने मनोमन बांधलेला. मनात योजना तयार झालेली, मात्र त्यासाठी थोडी रक्कम हवी होती. पैशाची लालूच दाखवून बुधालाच हे काम करायला लावायचे असे त्याने योजले. त्याने घरात पाय ठेवला तर माय नी फुला यांचे कडाक्याचे भांडण जुंपलेले. "तू दर खेपेक माका अवशद घेवक् लावतस... माका लय तरास व्हता. आता ह्या खेपक मी तुजा आयकनार नाय... काय ता व्हव ने" फुला तरपासून म्हणाली. "एकदा अडाकल मग कोन कुत्रो दुकु येवचो नाय ... मी दुनया बगीतलली हा..." माय बोलली."माजा गाणा आयकोक खैसून खैसून ल्वॉक येतत बगतस ना तू....?" फुलाने विचारले. दोन्ही हात ओवाळीत म्हातारी येंगडावून म्हणाली, "मोटी ग्ये बाय माजी गाणारीण. भंगो तुजा गाणा. ल्वॉक काय तुजा गाणा आयकोक येतत काय गो मसण्ये? तेवड्यावर भागला आस्ता तर तुका अवशद घेवची येळच इलि नसती." मायने शोध शोध शोधले पण पाळे-मुळे कुठे गायब झालेली. तानूला जवळ बोलावून माय म्हणाली, "बाबा माजो तो...जा...जा... बुदा कातकऱ्याक बोलायलय म्हनान सांग. त्येका वांगडा घ्येवनच ये...जा..." मायने सहा रूपये काढून तानूच्या हातावर ठेवले. तानू निघाला बुधाचे खोपटे बंद होते. कातकऱ्याचा ठिकाण कोण कसा सांगणार? त्याने गावात दोघा चौघांकडे निरोप ठेवला. दुसऱ्या दिवशी भिणभिणताना बुधा हजर झाला.मायला भेटून आल्यावर त्याला तानूने हाक मारली. बुधा तानूजवळ येऊन बसला. खणखणीत पाच रूपये बुधासमोर ठेऊन टिटाटवळीच्या अंड्यांचा माग काढायची गळ तानूने त्याला घातली. उभ्या हयातीत त्याने आखबंद रूपयाही हातात धरलेला नव्हता. रूपयाची पाच नाणी हातात घेऊन बुधाने खणखण वाजवली नी तोंडाने च्यक् च्यक् करीत तो म्हणाला, "भाऊ, एवडा काम आपल्याच्यान नाय जामनार म्हनशील तर पाच रूपयासाठी जिता ढाण्या वाग बांदून तुज्या म्होरी टाकेल पर टिटाटवळ्याचा ठिकाना दावायचा पाप नोका कराला सांगू माज्ये बापा... हे नाद लय वंगाळ. तू बी या खोटेगतीच्या मागे लागू नको... टिटाटवलीचा अंडी म्हन, पिल्ली म्हन दिसायचे परतेकाच्या नसिबात लागते.आमी कातकरी अशे कंगाल हाईल पण द्येवाच्या धरमा इरूद्ध कंचा काम न्हाई करेल. झाडावरचा मदाचा पोला आमी काडते तर त्ये वखताला आमी तेच्यातला मद ऱ्हायेल तेवढा हिस्सा काढून घेईल पन समदा पोला काडून त्याईच्या ल्येकरांचा विद्वास नाय करेल. कंदी धुमरान करून माशीला पलवून लावते आमी, तरीबी येकादी दुसरी माशी ऱ्हायते ना पोल्याजवळ ती डंवस करतो ना आमाला... पर खुन्नसमदे तेचा सगला पोला जाळत नाई आम्ही कातोडी. असला वंगाळ काम पैसे दिऊन करून घियाला बगते तू? तूजा काम माला नोको, तुमी पयशाला आबरू इकनार, आनी पाच रूपयाला कातकरीचा इमान इकत घिवाले बगते का रे सावकारा....?" बराच वेळ बुधा गुढ्यात मान घालून बसून राहिला. मग उठला आणि हात जोडीत निघून गेला.पावसाळा उलगत चालला पण टिटवीची अंडी, पिल्ले याचा मागमूसही तानूला लागला नाही. शिकस्त करून हरलेला तानू सोमवार धरून जट्याकडे गेला. पाच रूपये पुढ्यात ठेऊन त्याने हटकले, जट्या बाबा आजून काय माजा नशिब उगडत नाय... नी तुजा वचन फळाक येयना नाय. त्याला पुढे बोलू न देता त्याच्या कपाळावर विभूत टेकीत जट्या म्हणाला, "जरा दम खा... तू कितीव हुळाकलस तरी त्येका ज्ये वक्ती द्येवचा आसात त्येवाच तुज्या हातीत पडताला हा... ल्येकरा इश्वास ठेव. ह्या जट्याचा वचन खोटा झाला तर ही बट कापून टाकीन नी ह्या थळ बंद करीन... जा तुजा काम व्हतलाहा...!" तानू बाहेर पडला खरा पण त्याचे समाधान झालेले नव्हते. जट्याचा होरा चुकायचा नाय खरा पण, काम आधी कसे होईल ह्याचा उलगडा त्याला होत नसावा असा संशय तानूला आला.या बाबतीत दुसऱ्या थळावर चौकशी करू नये असा इशारा जट्याने दिलेला असला तरी तानू भलताच अधीर झाला. त्याने सगळी गोष्ट भल्या गुरवाच्या कानी घातली. भल्या गिऱ्हायकाच्या शोधात. तो धोरणाने म्हणाला. ह्या बग तानू! जट्याकडे झाल्यावर गांगेश्वराचांच सत्व आसा. म्हंजे गांगोचो कौल घ्येवक कायच हरकत नाय. भल्याने सांगणे करून गांगोच्या पिंडीवर गोटे डसवले. देव कौल धरीना! ह्या आडमेळा आसात्... ती भागवनी करुक हवी... म्हारतीचा देना भागौक व्हया...... सबबी सांगून भल्याने तानूला तीस रूपयाला गंडा घातला. दिशेने वहात उगमापर्यंत येतात असे बुधा बोलला होता. प्रवाहा विरूद्ध वहात येताना परीस झीजून नाहिसे होतात असे त्याने म्हटले तरी चूकुन माकून एखादा तरी परीस डाळी एवढा का असेना उगमापर्यत पोचला असणारच... तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असे त्याच्या मनाने घेतले. एक नवा उद्योग त्याने आरंभला. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या व्हावटींच्या उगमापर्यंत जाऊन तिथली सकेर तो ढवळी. नेहमीच्या खड्यापेक्षा जरा वेगळा रंग असणारे पिवळसर, काळपट, पांढुरके खडे बाजूला जमा करी, एक एक दगड कोयत्यावर टेकून बघी. गावातल्या पाच सहा व्हावट्यांच्या उगमाजवळ परीस शोधण्यात त्याने कित्येक दिवस घालवले.पुरा उन्हाळी मोसम संपून पाऊसकाळ सुरू झाला. आठवडाभर टिटावळ्याची अंडी शोधून कंटाळल्यावर त्याने वेगळी युक्ती लढवली. कवडे पकडायच्या फासक्या सड्यावरच्या सकेरीच्या ढिगोळ्यांजवळ लावल्या. दुसरे दिवशी तो शोध घ्यायला गेला. दोन तीन टिटावळ्या तरी हमखास फारलेल्या असतील अशी त्याची खात्री! पण टिटव्या भलत्या चतुर. तानू दिवसा फासक्या लावीत असताना त्या त्याच्या डोक्यावर फिरट्या घालीत होत्या हे तानू विसरला. एकही टिटवी फारली नव्हती. तानू भलताच चिडला.फुलाकरवी रदबदली करून त्याने दाजीची ठासाची बंदुक हस्तगत केली. सगळा सरंजाम गोळा करून त्याने सडा गाठला. तानु धारेवर गेल्यापासून टिटव्या घिरट्या घालू लागल्या. पण नेम धरून बार टाकीपर्यत टिटवी ठरेना. एक झाळ गाठून तिच्या मुळाशी तानू बसला. खूप वेळ वाट बघितल्यावर त्याच्या समोरच एका ढिगोळीवर टिटवीची जोडी उतरली. मादी पंख पसरून गोल रिंगण घ्यायला लागली. तो मोका साधून मादीसमोर शांत उभ्या राहिलेल्या नरावर बंदुकीची माशी रोखून तानूने चाप ओढला. नर जागच्या जागी चोच वासून उताणा झाला. मादी टिट्यांव टिट्यांव असा भीषण सुर काढीत उडाली. तिचा आवाज ऐकून लांब उडणाऱ्या टिटव्या सुद्धा सावध झाल्या. सड्यावर कुयेल घालणाऱ्या सगळ्या टिटव्या एकदम नाहिशा झाल्या.   तानूने मेलेले पाखरूउचलले, रागाने त्याची पिसे उपटून टाकली. कोयत्याने तुकडे तुकडे करून तो घरी आला. संध्याकाळी बाटलीभर दारु पिऊन न जेवताच तो धर्मशाळेत झोपला. सकाळी घराकडून बोंबाबोंब ऐकायला आली. गडबडीने उठून तानू घराकडे धावला. फुला माय दोघीही उर बडून रडत होत्या. फुलाचा तबलेवाला साथीदार सदु कासार...तबल्याची साथ करता करता त्याने फुलाशी सुत जमविलेले...अलिकडे तो वस्तीला फुलाकडेच असायचा. फुलाच्या मायची ठेवरेक त्याला उज्जू माहिती. रात्री निजानिज झाल्यावर दोघीच्याही ट्रंकाची कुलुपे उघडून आतले दागिने, उंची कपडे हे सगळे घेऊन तो पळून गेला. फुलाच्या अंगावरचे एक दोन डाग तेवढे राहिले.अकल्पितपणे भलते अरिष्ट आले. सगळा गाव जमा झाला, दाजी पोलीसवाला तावातावात सांगू लागला, "मिया, पोलीस आंसय्... खंय जाता कासारडो बगूया... पाताळात दडॉन ऱ्हवलो तरी खनून काडतलंय त्येका..." त्याच्या वल्गना वायफळ आहेत हे लोकांना पूर्ण माहिती. पण तोंडावर कोण कशाला बोलतो! आडमार्गाने मिळवलेली कमाई आडमार्गाने गेली असे म्हणत जो-तो निघून गेला. फुला मायच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. माय मोकळे करायचे औषध घ्यायला लावील म्हणून फुला गेले चार महिने तिला फसवीत होती पण सगळी कमाई वाऱ्यावर गेली. म्हणताना फुलाने हाय खाल्ली. खरी गोष्ट तिने मायच्या कानावर घातली. कोपाला येऊन मायेने फुलाचे थोबाड फोडले. मग झाली गोष्ट निस्तरण्याच्या उद्योगाला लागली. दिवस खूप झालेले...कातकऱ्याच्या औषधाने निभणारी गोष्ट राहिली नव्हती. मायने नाऊ धनगर आणि त्याची बायको दोघांनाही बोलावून घेतले. काम अवघड. जोखमदारीचे... गुपचूप उरकायला हवे.... नाऊ नि त्याची बायको चार दिवस ठाण मांडून राहिली.तानूला काही सुचेना. रात्र रात्र त्याला नीज पडेना. दारुसुद्धा त्याला चढेनाशी झालेली. दोन रात्री सलग जाग्रणे करुन त्याचे डोके भ्रमिष्ट झाले. तशात फुलाच्या निस्तरणीसाठी त्याला नाऊबरोबर जावे लागले. खड्डा बुजवून आल्यावर ते चित्र त्याच्या डोळ्यापुढून जाईना. जट्याने भाकीत केले काय नि हे भलतेच झाले काय... परीस मेळणे दूर, उलट होते तेच हातचे गेले... नको ते पाप कर्म करावे लागले. तानू तिरमिरीसरशी उठला. त्याने तडक जट्याचे घर गाठले. आज बुधवार... आडवार असल्यामुळे जेवणखाण करुन जट्या ओटीवर लोळत पडलेला.पायताण हातात घेऊनच तानू त्याच्या समोर उभा राहिला. "काय रे सुतारड्या... लोकाच्या जीवार खावन् खावन् आरा सारको लोळत पडतस काय रे... तुझी चरबी मिया झडयतय्..." हातातल्या पायताणाने त्याने जट्याला फटकावायला सुरुवात केली! जट्याच्या घरातल्या माणसांनी बोंबाबोंब केली. शेजारचे झिलगे धावले. दोघा दांडग्यांनी कव घालून तानूला बाजूला केले. जट्या शांतपणे म्हणाला, "तानू तू काय तरी चुकी क्येलं आसशी माजो सबून खोटो जावचो नाय..." तानू उसळून म्हणाला, "माज्यो व्हानो खाल्लंस तरी तुजी शिवकळा उतरली नाय् रे सोद्या? परीस मेळात म्हनान माका हुलीवर घातलस्... तीन साल मी येडो-पिसो होऊन परीस सोदतय्... भंगलो तुजो सबूद..." जट्या शांतपणे म्हणाला, "त्या कळेत मिया काय सांगलंय ता आता मानूस कळेत माका आटावना नाय. तुका बरा भोगाने अशीच माझी विच्छा! जग दुनिया परचित घ्येवन ग्येली. तुका परचित व्हयी ना...? मिळात्... माजा सत्व पणाक लायन नि तुका परीस देकवीन.""ह्यो म्येलो बारगो परीस देकवनारो... ही पुरणिम उलगोन जावने. तवसर माका नाय मिळाली सामक्षा तर तुका जितो ठेवणार नाय." तानू तणतणत घरी निघाला. आता तो कायमच दारु पिऊन धर्मशाळेत लोळत रहायचा. कधी जेवायला घरी जायचा. कधी दारुच्या नशेत उपाशीच झोपायचा. मायने त्याचा फंदच सोडलेला. तो जगला मेला तरी तिला पर्वा नव्हती. पण फुलाची तिला काळजी वाटायची. फुलाला उठून बसण्याचे त्राण राहिले नाही. खाण्यावरची वासनाच उडाली. मायने कोणाला तरी जट्याकडे विभूत आणायला पाठवले. गेलेला माणूस विभूत न घेता परत आला, चार दिवस जट्या कुठे बेपत्ता झालेला आहे असे तो म्हणाला.पौर्णिमा उजाडली. तानू भानावर आला. जट्या काय प्रचिती दाखवणार याचा घोर त्याला लागला. त्या दिवशी तो दारु प्याला नाही. संध्याकाळी कोणाकडून तरी त्याला वार्ता कळली...चार-पाच दिवस जट्या कुठे बेपत्ता झाला आहे. बहुतेक आपल्या भीतीमुळे तो कुठेतरी लपून राहिला असेल. आठ-पंधरा दिवसांनी येईल बाहेर असे तानूला वाटले. रात्री तानूला भूक लागली म्हणून तो घरी गेला. माय फुलाच्या उशाशी बसून राहिलेली. ती बसल्या जागेवरुनच म्हणाली, "आज फुलाचा शीकपान जादा झालाहा... टोपात पेज रांधलेली हा ती घे नि उद्या तळकटात जावन् बुधाक घेवन् ये. फुलाची परिस्थिती तेका सांग, मगे तो सोयन् काय ती वषदा वांगडान हाडतलो."मध्यरात्रीपर्यंत तानू जागाच होता. त्यानंतर मात्र त्याचा डोळा लागला. त्याला झोपेत कोणीतरी ढोसले. तो खाड्ङ्कन उठून बसला. हातात माडाची चुडती घेऊन थरथरणारा जट्या पिशागती सारखा वाटला. तानूच्या अंगाला घाम फुटला. "तानू तुका परचित होयी ना? ही घे..." चुडतीच्या उजेडात उजवा हात पुढे करीत जट्या म्हणाला. काठीच्या चिमट्यात मनशीळा सारखा एक खडा चमचमला. "ह्यो परीस बग... तुजी आडकती काड भायर नी परतेक्ष सामक्षा घी...!" जट्या कडाडला. तानूने बंडीच्या खिशातून आडकित्ता काढून समोर ठेवला. आडकित्त्याच्या पात्यावर जट्याने परीस टेकवलासा करुन बाजूला घेतला. आडकित्त्याच्या पात्याच्या धारेकडचा अर्धवट भाग पिवळसर दिसू लागला. तानूने खिशातले सुपारीचे खांड काढून कातरायचा प्रयत्न केला. सोन्यात परिवर्तन झालेला धारेचा नरम भाग वळला.जट्याचे पाय धरीत तानू म्हणाला, "जट्या बाबा मिया चुकलय. तुझ्या सत्त्वाची परचित माका पटली. मी तुज्यार इस्वास ठेवलो नाय... लेकराक माफी कर... माझा वायट करु नको..." तानू गर्भगळीत होऊ लटालटा कापू लागला. "मिया तुजा भाकीत सांगला तीच चूक झाली. मिया काय सांगलय् तेचो अर्थ तुका उमागलो नाय. तुज्या कर्माची फळा तू भोगशीत... तुज्या नादाक् लागॉन मिया इरेसरीक पडलय ती माजा सत्त्व गमावन बसलय... माजा देवपान आता खल्लास झाला...! तुजो कसो इद्वास होता तेची परचित आता घेशीतच...! तुजा चांगला वायट् करनारो मी कोन? तुझा तूच क्येलस... तुजा तूच भोगशील..." जट्या निघून गेला... थोड्या वेळातच ठोम पाऊस सुरु झाला. तानूला उठून उभे रहायचेही त्राण उरले नाही. भिणभिणताना मायची बोंब ऐकू आली. पावसात भिजतच तानू घराकडे धावला. तानू समोर दिसताच माय फाटलेल्या आवाजात म्हणाली, "तानू... फुला ग्येला रेऽऽ मी रातभर जाग्या रवलय... पैलो कोंबडो झालो नि माका जरा नीज इली आनि फुलान माका फसयल्यान रेऽऽ" मायने हंबरडा फोडला. आता तानूही बोंब मारुन रडायला लागला. त्यांची ओरड ऐकून शेजारी धावले. देवळ्याची फुला वारली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.फुलाची तिरडी घेऊन बापये चालू लागले. तानू मडके हातात घेऊन निघालेला. फुलाला अग्नि देऊन आल्यावर कोणीतरी विहिरीजवळच चार कळश्या तानूच्या डोक्यावर ओतल्या. ओलेल्यानेच तानू घरात गेला. कोरडा फडका घेऊन डोके पुसता पुसता एकाएकी त्याच्या अंगात कसला संचार झाला न कळे! नेसण सोडून थयथयाट करीत "माका परीस मेळ्ळो माका परीस मेळ्ळो!" अशी बोंब मारीत त्याने खुटीला अडकवलेली बंडी हातात घेतली. तिचा बोळा करुन छातीशी धरीत "ह्यो बगा परीस... माका परीस मेळ्ळो... घरातलो किलेस गेलो नी माका परीस मेळ्ळो"... असे ओरडत बेभान होऊन तो रस्त्याने धावत सुटला.