Madhukari in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | माधुकरी

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

माधुकरी

 माधुकरी

राणे वाडीत पहिल्या कोबंड्याने खच्चून दिलेली बांग कानात पडली अन् बाया विंचू डसल्यासारखी अंथरूणात उठून बसली. उत्तररात्री पर्यंत टक्क जागी असलेली बाया चुरचुरणारे डोळे मुठीने चोळत चोळत 'रामा रामा रामा पांडुरंगा' असं देवाचं नाव घेत उठून उभी राहिली. कार्तिकातली चावरी थंडी आणि उभे लावण्याचा एक धडपा जमिनीवर अंथरून मुटकुळं करून झोपलेल्या, संसाराच्या चिंतेने काळजारलेल्या बायाचं अगं ठणकायला लागलेलं! अलीकडे भविष्याचा घोर आणि अर्ध्या संसारातून निघून गेलेल्या नवऱ्याचं दुःख यामुळे बायाला नीज अशी येतच नसे पण राम लक्ष्मणासारखे अश्राप मुलगे आणि त्यांच्या पाठीवरची अजाण सुशी ही तीन पोरं अन्नाला लागेपर्यंत तरी हा देह जगवायला हवा इतक्या निरिच्छ बाण्याने बाया आला दिवस ढकलायची एवढच! त्यात आज चाव दिवस! पहाटेच सगळ्यांच्या आंघोळी व्हायला हव्या, देवावर फुलं पडायला हवी म्हणून अंधारातच चाचपडत बाया माजघर आणि ओटीच्या दरम्यान असलेल्या चौकडीजवळच्या कोनाड्यातला लामणदिवा आणायला गेली. दिवा हाताशी आल्यावर सावध पावल टाकत ती स्वयंपाक घरात गेली.रात्री जेवणखाण होऊन झाकपाक झाल्यावर चुलीतल्या मुंबरात ओल्या शेणाचा गोळा ठेवायचा म्हणजे पहाटेपर्यंत तो आमसुखा होऊन किटळ धरतो आणि उजाडत विस्तव जिवंत करता येतो. रोज रोज विस्तव पेटण्यासाठी काडी जाळायची चैन बायाला परवडणारी नव्हती. चुलीसमोर दिवा ठेवून तिने मुंबरातला शेणगोळा बाहेर काढला आणि फुंकरून फुंकरून ज्वाळ धरल्यावर दिवा लावून घेतला. मग लामण दिव्याच्या वातीसमोर हाताचा आडोसा धरून ती मागील दारी गेली आणि थाळीतील राख भरून नवीन विस्तव केला आणि हंड्यात भर घातली."विठू ऽऽ, सदू ऽऽ अरे उठा रे! आज चाव दिवस ना? सूर्योदयापूर्वी आंघोळ, पूजा व्हायला हवी!" बायाने साद घातली. विठूची झोप सावध! जेमतेम दहा वर्षाचं वय! पण बाप गेल्यावर परिस्थितीने त्याला जाणत्या बापयासारखा शहाणपणा आलेला! बायाच्या हाकेसरशी तो ताडकन उठून बसला. जमिनीला वंदन करून 'समुद्र ऽऽ वसने देवी पर्वतःस्तन मंडले । विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ।।' हा श्लोक म्हणत त्याने सदू-सुशीला उठवून घातलं. मुलांच्या आंघोळी, संध्या, देवपूजा होईपर्यंत बाहेर भिणभिणायला लागलेलं. "विठू, बाहेर जरा दिसायला लागेपर्यंत सदूला महिम्न शिकव. मग दोघांनी पायाखाली बघीत उंबरा-पिंपळावर पाणी घालून या. मग फराळाचं देते." घागर घेऊन विहिरीवर जाता जाता बाया म्हणाली.सदू-सुशी थंडीची थाळीपुढे शेकत बसलेली. आईचं बोलणं ऐकल्यावर सदू समंजसपणे विठू समोर येऊन बसला. महिम्न म्हणून झाल्यावर भाऊ-भाऊ उंबर-पिंपळ यांची पूजा करून आले अन् झोपाळयावर बसले. बायाने स्वयंपाक घरात केळीची चार पाने मांडून त्यावर मूठ-मूठ वऱ्यांच्या लाह्या आणि गुळाचा खडा असा फराळ मांडून मुलांना फराळाला हाक मारून देवाला नैवद्य दाखवला, तुळशीपुढे गुळ लाह्या ठेवून झालेवर मुलं फराळाला बसली. "आई, तुझं पान कुठे ऽ?" समजस विठू म्हणाला, "तुमचं झाल्यावर मग बघीन आणि जेमतेम दोन तीन मुठीच लाह्या शिल्लक आहेत. म्हार-कातकरी फराळ मागायला आले तर त्याना चिमटी चिमटी तरी द्यायला नको का? आज त्यांचा हक्काचा दिवस! आमच्या कपाळालाच मुळी दळिद्र पुजलेलं आहे. दारात आलेल्याच्या पुढे का हे गाऱ्हाणं सांगायचं आहे? घ्या तुम्ही!" तिन्हीसांजेबरोबर चार पळ्या पातळ भात खाऊन निजलेल्या पोरांच्या पोटात भुकेचा वडवानल उठलेला. सुशी-सदूनं बघता बघता बकाणे मारून केळीच्या फाळक्यांवर चुकार राहिलेल्या लाह्याही टिपून टिपून खाल्ल्या. दिवाळीच्या दिवशीही आई दाढेत आवळा धरुन राहिलीय ही गोष्ट विठूच्या जिव्हारी लागलेली. पोटात उठलेला भुकेचा डोंब आणि गूळ लाह्याने तोंडाला सुटलेले पाणी आवरून विठूने प्रथम पाण्याचा घोट घेतला. लाह्यांचा बकाणा मारायची त्याची इच्छाच मेली. अधाशीपणे गूळ लाह्या खाणारी भावंडं आणि तोंड मिटून गप्प राहिलेली आई या चित्राने विठूच्या पोटात उमळून आलं. दुःखाचा अनावर आवेग आणि मेलेल्या बापाची आतडं पिळवटणारी आठवण, यामुळे आलेला कढ जिरवण्यासाठी आवंढा गिळून घोटून, आलेला आवेग शांत होईपर्यंत बसून राहिला. पानातल्या उरल्यासुरल्या लाह्यांचे कण टिपून खाणारी भावंड बघून त्याला अकाली प्रौढत्व आलं. त्याची भूकच मेली अन् आपल्या वाटणीच्या लाह्या भावंडांना घालून तो उठला.शेजारच्या दाते, देवधर, भावे यांच्या घरात चाललेल्या जल्लोषाचे आवाज कानावर येत होते. बायाच्या घरभाटाला लागूनच देवधरांचं घर! त्यांच्या उंबऱ्यात बसलेलं माणूस बायाच्या ओसरीवर ओळखू यावं इतकं नजीक! देवधरांची बगी कडबोळी खात खात बाहेर आली. बगी सुशीच्याच वयाची. बायाच्या पावळी जवळच्या बेड्यात येऊन तिने सुशीला हाक मारली. सुशी धावतच बाहेर गेली. न्हाऊन माखून नवीन गवंज घातलेल्या डोक्याच्या खोप्यात सोन्याचं फूल माळून कडबोळं खाणाऱ्या बगीकडे सुशी बघतच राहिली. "तुमचा फराळ करून झाला की नाय? आमच्याकडे चकल्या, कडबोळी, अनारसे, करंज्या किती किती फराळाचं केलेलं आहे!" बगी उत्साहाने सांगू लागली. सुशी आशाळभूत पणे बगीच्या हातातील कडबोळ्याकडे बघत राहिली. तिने एक तुकडा मागितलाही असता पण तेवढ्यात बाहेर येऊन विठूने डोळे मोठे करून दाखवले म्हणून फुरंगटलेली सुशी पाय आपटत घरात आली. आई समोर हात वेळावत ती म्हणाली, "आय्य ऽऽ बगीकडे किती किती फराळाचं केलेलं आहे नि तू कायपण केलसं नाय!"विठूने मागून येऊन तिचा बुचडा धरून तिला बाजूला फरफटत नेलं नि म्हणाला, "आपले तात्या देवा घरी गेले ना? तुला काय सुद्धा अक्कल नाय अगोऽऽ घरातलं माणूस गेलं की मग वर्षभर काय गोड धोड करायचं नसतं. चल, पाढे म्हणायला बस!" सुशीचा चांगलाच हिरमोड झालेला. तिचं बालमन स्वस्थ बसेना. ती पुन्हा आई समोर गेली आणि म्हणाली, "आय्यऽऽमग फोडणीचे पोहे तरी कर ना ग्ये! मला पोहे हवे म्हणजे हवे!" आणि तिने भोकाड पसरलं. बायाला कसनुसं झालं. जेमतेम दहा मण भात खंडाचं आलं. चार तोंडं खाणारी. ती स्वतः नवरा गेल्या पासून एकभुक्तच राहायची. एक वेळेला सुद्धा फक्त जीव जगेल एवढाच चार पळ्या पातळ भात खाऊन ती रहायची. एवढा पहाडा सारखा खंबीर नवरा... किती किती बेत केलेले... कुठून कुठून शोध घेऊन उत्तम धरत्या माडा-पोफळींचे नारळ-सुपाऱ्या रूजवून आवण काढलेले आणि सगळ्या घरभाटात दोनशे माड, पाचशे पोफळी लावून नुसतं नंदनवन केलं. एवढं शिंपण एकट्याने करायचं.वळकुवातल्या मोरोपंत गोगटयांकडे त्याचं उठणं बसणं. तिथे जे-जे बघायचे त्याप्रमाणे घरी आल्यावर उद्योग सुरू. धारेवरचं पडण बेणून तिथे हापूस-पायरीची कलमं लावायचं मनातं आलं. एवढा आवाका घ्यायला हात अपुरे पडले. मग बन्याबापू कडून अडीचशे रूपयांचं कर्ज काढलं. चार वर्ष मुदतीत कर्जाची परत फेड करायचा कागदही करून दिला. पडणात ही थोरली ऐन, किंदळ, नाणा, शिवणीची झाडं. ती तोडून त्यांचा सिलीपाट विकायला काढला. त्याचं हे भीमकृत्य बघून गावातले लोक, शेजारीपाजारी टिंगल करायचे ... "कुठे मोरोपंत आणि कुठे हा SS! अशाने भिकेला लागेल!" पण सिलिपाट विकूनच तीनशे रूपये उभे झाले तेव्हा कशी सगळ्यांची तोंड काढेचिराईत घेतल्यासारखी झाली.बन्याबापूला मुदतीपूर्वीच चारशे रूपये वाजवून देऊन एकहाती मोकळा केला. कलमं दिसामाजी नजरेत भरायला लागली. स्वतः मोरोपंत सुद्धा मुद्दाम येऊन बघून गेलेले. ही बागशाही द्यायला लागली की घरावर सोन्यांची कौलं पडतील असं त्यांनीसुद्धा कबूल केलं. पण ते वैभव बघायचं काही तात्यांच्या नशिबात नव्हतं हेच खरं. बन्याबापूला लिहून दिलेल्या प्रॉमिसरी नोटेची मुदत भरल्यावर पंधरा दिवसांनी वकिलाची नोटिस आली आणि तिरीमिरीतच तात्या बन्याबापूकडे गेले. "तीन वर्ष व्हायच्या आतच एक रकमी साडेचारशे रूपये देऊन तुझं ऋण भागवलं आणि हे आता काय?" हातातली नोटीस त्याच्यासमोर आपटून तात्या रागात म्हणाले.बन्या पक्का निर्लज्ज. "तुला जे काय सांगायचं ते असेल कोर्टात सांग. मुद्दल राहोच पण व्याज भागवलं असतेस तरी मला कोर्टात जावे लागले नसते पण बागशाहीच्या नादात तू टकल्याने चालायला लागलास. दोन तीन निरोप देऊनही दाद दिली नाहीस मग माझाही नाईलाज झाला." बन्याबापूने आपल्याला तोंडघशी पाडलं हे आता तात्यांना उमगलं. कर्जफेड करतानाच प्रॉमिसरी नोट परत घ्यायला हवी होती. आपण फार मोठी चूक करून 'चुडीन वाघ घरात घातला' असं तात्यांना वाटलं. तात्या घरी आले ते अंगात ताप घेऊनच. या झेंगटातून आता आपल्याला परमेश्वरही वाचवू शकणार नाही. बन्याबापूची बुद्धी फिरली. आता आपली पत रहात नाही. एवढी रक्कम कुठून देणार? बेअब्रूच्या भीतीने तात्या आणि बाया दोघांनी अक्षरशः मरणभोग भोगला. बायाने गडी पाठवून दादा काळे यांना बोलवून घेतलं. ते त्यांच्याच वकलातले. हुशार माणूस! लांब लांबून त्यांना पंच म्हणून पाचारलं जायचं. ते आले, तात्यांकडून त्यांनी सगळी हकीकत विचारून घेतली. ते सुदधा हतबुद्धच झाले. पुरावा तात्यांच्या पूर्ण विरोधात. आता चार शहाण सुरते जमवून आपापसात समझोता करून बेअब्रू जप्ती टाळायची हाच एकमेव पर्याय उरला. मग दादा काळे, सदू जोशी, अंतू मराठे असे पंच बसले. कर्जाच्या पोटी माडपोफळी लावलेला घरभाटाचा तुकडा आणि बामणकोंडी जवळची चार खंडी भात पिकणारी शेतजमीन बन्याबापूच्या घशात घालायची अशी तडजोड झाली. तसा समजुतीचा कागद होऊन पंचांसह तात्या-बन्याबापू यांच्या सह्या झाल्या. तात्यांची बेअब्रू वाचली खरी पण तात्या गाजीचा पाजी झाला.तात्या घराबाहेर पडेनासा झाला. त्याला रोजच ताप यायला लागला. दोन तीन वैद्य झाले पण ताप हटेना. मग मग अन्नही तुटलं. एवढा दांडगा तात्या पण हा घाव त्याच्या वर्मी लागला. जेमतेम चार महिन्यांतच तो हाय खाऊन मेला अन् बायाच्या दुर्दैवाला सुरूवात झाली. मोरोपंत स्वतः पाचारायला आले, मदतही देऊ केली पण मानी बायाने त्यांना शप्पथ घातली. "हे माझे भोग आहेत... मला भोगले पाहिजेत. देवाला जर काय लाज असेल तर तोच माझ्या सहाय्याला येईल. तुम्ही कोणाचे कोण... पण ह्यांना भावासारखं सहाय्य केलंत. तुमचे उपकार आहेत तेच या जन्मात फिटायचे नाय. सोन्यासारखा माझा पती गेला तेव्हाच माझी माती झालेली आहे. तुम्ही आपुलकीने मदत करायला आलात तेवढा आधार मला पुरे आहे. घरात अगदीच चूल पेटायची नाही त्याचवेळी तुमच्याकडे पदर पसरीन पण तुम्ही कितीही दिलंत तरी माझं प्राक्तन काही चुकणार नाही."यावर मोरोपंतही निरूत्तर झाले. मानी बायाने गाठीला गाठ मारून आला दिवस साजरा करायची मनाची तयारी केली. आभाळचं फाटलेलं! ठिगळ कुठे नि किती लावायचं? विचार करून डोक्याच्या चिंध्या चिंध्या व्हायची वेळ यायची. मग बायाने अक्षय देवाचा जप सुरू केला. तोंडाने देवाचं नाव आणि दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत काम असा तिचा नेम सुरू झाला. खाजणाच्या कडेला दहा वीस भांगे होते. त्याचा सहा मण भाताचा खंड! तेवढाच पुरवून पुरवून खायचा. वर्षभर काळ मागे पडला म्हणजे गावात कुणाचं दळण-कांडण करून दे, धुणी-भांडी कर, काही करून पोरांना जगवायचं. देवाला किती सत्वपरीक्षा बघायची असेल तेवढी बघू दे! असा तिने चंगच बांधला. बिचारी पोरंही पानात पडेल ते अन् तेवढं खाऊन राहायची. नाही म्हणायला आजच सुशीने जरा हट्ट केला. हे भवजळ त्या अश्राप बाल जीवाला कसं उमजावं. लाडा-कोडात वाढलेलं, खाल्लं प्यायलेलं लेकरू. दारिद्रय काही बघितलेलंच नाही. नशिबाचे फेरे उलटे पडले म्हणून पोट मारून रहायची वेळ आली. बायाला भडभडून आलं. शेजार घरून दोन पसे पोहे उसने मागून आणायचे म्हणून तिने अर्धी रोवळी भात घेतलं अन् मागील दाराने ती सावित्री देवधरणीकडे जायला बाहेर पडली.बेडं ओलांडून बाया सावित्रीच्या मागील दारी गेली. बाया आलेली बघितल्यावर सावित्रीच्या मनात आलं की ही अवदसा अशा सणावाराच्या दिवशी पांढरं कपाळ घेऊन माझ्याकडे कशाला येत्येय? आजपर्यंत कधी आली नव्हती खरी पण आता धीर चेपला की रोज उधारी उसनवारीला ही कपाळफुटकी सतावत राहणार. मग बाया उंबरा चढून आत येण्यापूर्वी सावित्रीच उंबऱ्यात जाऊन उभी राहिली."सावित्री काकूऽऽ, सणासुदीला तोंड वेंगाडीत येऊ नये खरं, पण सुशी अगदी हट्टच धरून बसली. मला दोन पसे पोहे द्या. असेच नको मी रोवळीतून थोडं भात आणलं आहे त्याच्या बदली द्या." बायाचे शब्द ऐकल्यावर सावित्रीचा जीव जरा भांड्यात पडला. "तुम्ही इथेच आड रहा. उगीच पुरूष माणसांच्या डोळ्यावर यायला नको. मी पोहे घेऊन येते." असं सांगून ती आत गेली. सावित्री स्वयंपाकघरात पोचली तेवढ्यातच सावित्रीची सासू म्हणाली, "मागील दाराशी कोणाशी गो कुचुकुचू करत होतीस? कोण आलं आहे?"त्यावर सावित्री म्हणाली, "कपाळपुसकी बाया भात देऊन त्या बदली पोहे मागायला आलीय. "सास्वेचं तोंड मोठं फटकळ!" बरी सदला बदली करायला आलीऽहे. आपलं सोपवून झालं आणि आता दुसऱ्याकडे मानभावीपणा करायला आली आहे. म्हणे भाताच्या बदली पोहे हवे. अगो, आज सणासुदीचा दिवस. दारातल्या भिकाऱ्याच्याही हातावर खमंग टमंग जिनसाचा तुकडा पडणार. कोण काय नुसते पोहे देणार नाही. दोन फराळाचे जिन्नस लाजेकाजेने का होईना कोणी देणारच म्हणून आलीय भीकमागी तर करंजीची टोक नि एखादं कडबोळं टाक. उगीच वांछा राहायला नको."सावित्रीच्या सास्वेचे हे शब्द कानात पडताच आपल्या मस्तकावर कुणीतरी घावच घालत आहे असं बायाला वाटलं. एवढी खंबीर बाई पण हा आहेर ऐकल्यावर तिच्या काळजाला भगदाड पडलं आणि रड्याचा बांध फुटण्यापूर्वी घर गाठावं म्हणून ती लगबगीने घरी परतली. घराचा उंबरठा ओलांडून आत पाय टाकल्याबरोबर बाया जवळ जवळ खाली कोसळलीच. हे जग दुष्ट आहे खरंच पण इतकी निष्ठुर निर्दयी माणसंही या जगात आहेत याचं पहिल्यानेच बायाला प्रत्यंतर आलं. आपणच सणासुदीला निर्लज्जासारखं त्यांच्या दारात जाऊन आपल्या हाताने आपलं नाक कापून घेतलं याचं शल्य बायाच्या काळजात अधिक खुपलं. बाया हमसाहुमशी रडायला लागली. आईला अशी रडताना बघितल्यावर पोरंसुद्धा सैरभैर झाली. विठूने प्रसंगावधान राखून कथलीतून पाणी आणून आईच्या पुढ्यात ठेवलं.तेवढ्यात पुढील दारातून हाक आली, "अहो विठ्ठलपंतऽऽ, घरात कुणी आहे का रे बाळा?'' "अरे बापरे! दादा काळे आले वाटतं?" या विचारासरशीच बायाने रडं आवरलं आणि खुणेनेच विठूला 'पुढील दारी जा!' असं सुचवलं. तात्या वारले म्हणून रिवाजाप्रमाणे फराळाचा डबा घेऊन दादाकाळे आलेले! पंचाच्या धडप्यात बांधलेला डबा विठूच्या हाती देत दादा काळे विठूला म्हणाले, "जा बाळ, आत जाऊन आयशीकडे दे आणि मला तांब्याभर पाणी घेऊन ये." विठू पाणी घेऊन बाहेर आला. त्याला शेजारी बसवून दादांनी चौकशी केली. शेजारी देवधरांकडून वगैरे फराळ आला की नाही हे त्यांनी काढून घेतलं. मग खंडाचं भात आलं की नाही वगैरे चौकशी करून "काही लागलं सवरलं तर निःसंकोच सांगा. आम्ही नी तुम्ही बारा दिवसातलेच. तुझ्या बापसाने काय कधी कोणाचं वाईट चिंतलेलं नाय. बन्याबापूने नर्क खाल्ला, अंगाला भगे पडतील भगे!" असं बोलून ते उठले. दारात गेल्यावर जरा थांबून ते बायाला उद्देशून म्हणाले, "वैनीऽ, ही पोरं सोन्यासारखी आहेत. तुमचे पांग ती फेडतील. आपण देवावर भार टाकून त्याचं नाव घेतं राहावं. हेही दिवस जातील. पापाचे घडे भरल्याशिवाय राहणार नाहीत. दुसऱ्याचं असं निर्दालन करून पोराबाळांच्या तोंडाचा घास काढून घ्यायचा हे कसायाच्या पुढचं काम! ज्याचं त्याला निस्तरायला लागेल. जगलो वाचलो तर त्यावेळी बन्याबापूला चौघात्री नाही सुनावलं तर मी नावाचा दादा काळे नव्हे."संध्याकाळी बायाचा नरसोबाच्या वाडीत राहणारा एकुलता एक भाऊ गोविंदा आला. तात्यांचे दिवसवार झाल्यावर त्याला कळलं तेव्हा तो एक वस्ती राहून गेलेला. आज मुद्दाम बहिणीला दिवाळीचा फराळ घेऊन लांबचा पल्ला मारून तो तंगडतोड करत आलेला. बायाने पटकन पाण्याचा मोघा चुलीवर ठेवून पाणी गरम करून गोविंदाला पाय धुवायलं दिलं. आड करून ठेवलेले नाचणे भाकरी भाजण्यासाठी दळायला घेतलेले. रात्री जेवण-खाण झाल्यावर मुलं झोपल्यावर बाया भावापुढे मन मोकळं करायला लागली."इथे चरितार्थाचं काय साधन नाय. तीन तोंडं खाणारी! त्याना जाऊन वर्ष होईपर्यंत कोणाचं दळण कांडण करायला जायचं तरी चोरी. उपासमारी बरोबर तोंड दडवून दिवाभीताप्रमाणे रडायचं त्यापेक्षा मला तुझ्याबरोबर ने. मी तिथे चार घरची धुणीभांडी करीन, स्वयंपाक करीन, वाटेल ते कष्ट करीन. विठू चार घरी माधुकरी मागेल माझा भार तुझ्यावर टाकणार नाही. पण मला आधार दे. इथे शेजारीपाजारी आम्हांला जगू द्यायचे नाहीत. पोरं तुझ्या छत्राखाली वाढतील. सन्मार्गाला लागतील. नाही म्हणू नको." असं सांगून बायाने भावाचे अक्षरशः पाय धरले. काय करावं? मोठा पेच गोविंदापुढे पडला. त्याची काय जहागिरी नरसोबाच्या वाडीत उतू जात नव्हती. सागव्यासारख्या कुग्रामात पोट जळत नाही. म्हणून बापाच्या माघारी घर बंद करून तो कोणाच्यातरी आश्रयाला गेलेला. काशीकर सावकरांच्या वाड्यात मागील बाजूला एका पडवीत तो, बायको आणि त्याची चारं मुलं कसेबसे दिवस ढकलायची. तीर्थक्षेत्र असलं तरी तिथेही पोटार्थी ब्राह्मणांचा सुकाळ, केवळ उपाशी रहावं लागत नसे एवढीच जमेची बाजू. तरीही बहिणीचं आर्जव ऐकल्यावर त्याच्याने नाही म्हणवेना.घर बंद करून जमीन कसणाऱ्या कुळाकडेच धारेवर पडणात लावलेल्या कलमांची देखभाल सोपवून, दादा काळ्यांना लक्ष ठेवायला सांगून बाया गोविंदाच्या बिऱ्हाडी डेरेदाखल झाली. एक दिवस गेला आणि विठूने रोज माधुकरी मागून आणावी असं बायाने योजलं. गोविंदाबरोबर पाठवून विठूच्या डोईवर भोवरा ठेवून चकचकीत हजामत करवून घेतली. संध्याकाळी नरसिंह सरस्वतीच्या समाधी समोर जाऊन बाया नी विठू समाधीच्या पाया पडली. नदीकाठी धर्मशाळेत बसून बाया विठूला समजावून सांगू लागली, "उद्यापासून चार घरी जाऊन तू माधुकरी मागून आण. हा आपला धर्म आहे आणि त्यात काय कमीपणा नाही. मामा तुला कुणाकडे तरी भिक्षुकी शिकवायला ठेवील. तू मन लावून शिक आणि मोठा हो. एकदा तू आपल्या पायावर उभा राहिलास की आमचं दैन्य संपेल. एवढे मोठे दत्तगुरू पण ते सुद्धा भिक्षा मागून खातात. कोणाची चोरीमारी, अपहार करणं यापेक्षा अन्नाची भिक्षा मागणं, तीसुद्धा अशा पुण्यक्षेत्रात हे आपलं भाग्यच समज! देव आपली सत्वपरीक्षा बघतोय. हे दिवस जातील, मग भिकेच्या अन्नावर जगायला नको. मामाची परिस्थिती काय आहे हे दिसतंच आहे त्यांच्यावर किती भार घालायचा? तू विचारी आहेस."आईचं बोलणं ऐकल्यावर समोर कृष्णेच्या पात्रात उडी मारून जीव द्यावा असं विठूला वाटलं. दुपारी चौपदरी हातात घेऊन निसगेपणाने 'ओम भवति भिक्षांदेही' करत फिरणारे माधुकरी दिसल्यावर तो मनात कुचेष्टेने हसलाही होता. पण उद्यापासून आपणही त्यांच्या माळेत उभं रहायचं हे सत्य त्याला पचवणं अवघडं वाटलं. काहीही न बोलता तो विषण्णतेने बसून राहीला. उद्याच्या विचाराने रात्री विठूला घास गिळवेना. अन्न तोंडात फिरायला लागलं. अन्न टाकून तो उठला. रात्री तर त्याच्या डोळ्याला डोळा लागेना.सगळी झोपल्यावर गुपचूप बाहेर जाऊन कृष्णेच्या पाण्यात उडी मारायची असा निर्धार करून तो टक्क जागा राहिला. ताटकळून ताटकळून अखेर उत्तररात्री त्याचा डोळा लागला. स्वप्नात तो माधुकरी मागायला रस्त्याने चाललेला अन् थोरा मोठ्यांची मुलं फिदी फिदी हसत त्याच्याकडे बोट दाखवित राहिलेली. 'अरे, तो बघ भिकाराडा! मोठा स्वाभिमान दाखवत होता ना! पण आता बघ अन्नासाठी कसा भिक्षां ऽऽ देही करत फिरतो आहे बघा!' त्यांच्या या उद्गारासरशी आपला निर्धार आठवून विठू उठून बसायला लागला पण कोणाचा तरी बळकट पंजा त्याच्या मस्तकावर दाबला गेला. विठू चमकून बघायला लागला. भगवी छाटी घातलेला कोणीतरी गोसावी... त्याने विठूला बळेच दाबून धरलेलं. छाटीधारी म्हणाला, "बाळ, आईने काय सांगितलं ते विसरलास? मुंजीत भिक्षा मागितलीस की नाही......? त्यापूर्वी भटजींनी काय सांगितलं आठव... यापुढे भिक्षा मागून आपलं पोट भरायचं. आपला भार दुसऱ्यावर टाकायचा नाही. ब्रह्मकर्म शिकायचं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचं सामर्थ्य मिळवायचं. तू आणि तुझी भावंडं यांची जबाबदारी कुणावर टाकून तू जीव द्यायला जाणार आहेस? तू गेल्यावर आईचे, भावंडांचे काय हाल होतील याचा विचार केलाहेस? शांत हो... अविचार करू नकोस."दुसऱ्या दिवशी मध्यान्हीला चौपदरी घेऊन विठू घराबाहेर पडला. मामाने सांगितलेल्या वाटेने चालत निघाला. पहिलाच वाडा दिसला तिथे दिंडी दरवाजातून आत जाऊन ओसरी समोर थांबून त्याने खणखणीत आवाजात भिक्षेची याचना केली, 'ओम् भवति भिक्षांऽऽदेही!' तो वाडा नारायणशास्त्री दिवेकरांचा! नारायणशास्त्री हे व्युत्पन्न पंडित आणि ख्यातनाम वैद्य. ते ओसरीवर कुणा रुग्णाची नाडी बघत बसलेले. विठूचे 'ॐभवति भिक्षां देही' हे खणखणीत बोल कानात पडताच त्यांनी चमकून समोर पाहिलं. अत्यंत तेजःपुंज गोरापान असा ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे साक्षात श्रीनृसिंह सरस्वती दतात्रेयच बालरूपात भिक्षेसाठी आल्याचा प्रत्यय येऊन ते सद्‌गदित झाले. नारायणशास्त्रींना काय प्रेरणा झाली कोण जाणे? ते तसेच उठले अन् दरवाजापाशी जाऊन त्यांनी पत्नीला हाक मारली, "अहो, आतला कमंडलू घेऊन बाहेर या."त्यांच्या हाकेसरशी लक्ष्मीबाई लगबगीने कमंडलू घेऊन बाहेर आल्या. अंगणातला गोंडस, तेजस्वी मुलगा बघताच त्या चकित झाल्या. नारायण शास्त्रींनी खूण करताच त्यासुद्धा त्यांच्या मागोमाग अंगणात आल्या. पती-पत्नींनी विठूचे पाय धुतले अन् स्वतःच्या उपरण्याने शास्त्रीबुवांनी त्याचे पाय पुसून त्याला चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि आत चलण्याची विनंती केली. विठूला आत नेऊन त्यांनी चौरंगावर बसवलं. दोघांनीही त्यांच्या अंगठ्याचं तीर्थ घेतलं अन् तो कोण, कुठचा, कशाला आला याची चौकशी केली. भांबावलेल्या विठूने नाव सांगितलं, "विठ्ठल दामोदर काळे. मी कोकणातून आलो. उपळे माझं गाव. मी, माझी आई, लहान भाऊ आणि बहिण मामाबरोबर इथे आलो." शास्त्री म्हणाले, "बाळ, तुझे गोत्र, प्रवर सांगता येईल?" विठू म्हणाल, "हो! मी शांडिल्य गोत्री, पंचप्रवरी यजुर्वेदी शाखेतला." पत्नीकडे वळून शास्त्री म्हणाले, "शंकाच नाही! अहो, हा बाळ साक्षात नृसिंह सरस्वतींच्या कुळातला. हे तेज, हा बाणा हा त्यांचाच वारसा आहे."मग विठूची साद्यंत चौकशी करून शास्त्रीबुवा आणि पत्नी त्याच्या मामाच्या बिऱ्हाडपर्यंत आले. बायाला तिच्या मुलांसह शास्त्री बुवांनी आपल्या वाड्यात रहायला यायची विनंती केली. बायाचे कर्मभोग आता फिटल्यातच जमा झाले. नारायणशास्त्रींच्या आधाराने बायाच्या मुलांचा विद्याभ्यास सुरू झाला. सहा सात वर्षांनी उपळ्यातल्या कलमांचे साली १०/१२रूपये उत्पन्न सुरू झाले. हळू हळू उत्पन्न वाढत वाढत ठोक ऐंशी शंभर अशा मोठ्या रक्कमा लागल्या. दादा काळे हिशोबाचा कागद नी रक्कमा पाठवित. जवळ जवळ सोळा वर्षाचा काळ मागे पडला. विठू नारायणशास्त्रींचा रुग्ण चिकित्सेचा वसा पुढे चालवू लागला. दूरदूरचे रूग्ण विठूच्या औषध योजनेने रोगमुक्त व्हायला लागले. सुशी नृसिंह वाडीतल्याच जोगांच्या घरात पडली, तर श्रीरंग बी.ए. पर्यंत शिकून पुण्याला सर परशुराम कॉजेलात नोकरीला लागलेला. लक्ष्मीसारखी सून आणि नातू यांच्या कौतुकात बायाला दिवस पुरेना. अठरा वर्षात कुणीच गावाकडे फिरकलं नाही की तिथल्या लाजिरवाण्या जिण्याची स्मृती उगाळलेली नाही. पण एके दिवशी आईबरोबर दत्तात्रेयाच्या पादुकांचे दर्शन घेऊन नदीकाठी पायऱ्यांवर बसल्याबसल्या विठू म्हणाला, "आई ऽऽ अलीकडे तात्या एकसारखे माझ्या स्वप्नात येऊन घरी चल म्हणताहेत. घरच्या देव्हाऱ्यातलं पंचायतन मला दिसतं. एक सुलक्षणी श्वेत धेनु आमच्या घरासमोर अंगणात उभी राहून हंबरताना मला दिसते. आई, मला घरी उपळ्याला जाऊन रहावंसं फार वाटतं. माझं भाग्य तिथल्या मातीतच आहे." विठूने एवढं सांगितल्यावर बायाला काही शंका-कुशंका काढायला वावच राहिला नाही. फक्त विठूत जीव गुंतलेल्या नारायण शास्त्रींची अनुज्ञा मिळणं बाकी राहिलं.दिवसवार बघून बाया, विठू, श्रीरंग त्यांच्या बायका आणि विठूचा मुलगा असा सगळा गोतावळा मूळ गावी जायला निघाला. घरी पोचेपर्यंत संध्याकाळ होत आलेली. घराच्या पडव्यांची पडझड झालेली पण माजघर मात्र शाबूत राहिलेलं. परांगदा झालेली काळ्यांची माणसं परत आली हे ऐकल्यावर सगळा गाव जमा झाला. देवधरानी घर दुरूस्ती होईपर्यंत त्यांच्याकडे राहायचा आग्रह केला तरीही काळे मंडळी निग्रहाने माजघर बेणून तिथेच राहिली. दुसरे दिवशी दादा काळ्यांचा मुलगा जगू नी कलमांची देखभाल करणारा भिकू शेवरे आला. मग भाऊ-भाऊ कलमांच्या बागेत फिरु लागले. तात्यांचे कष्ट कलमांच्या रुपाने फळाला आले याचं प्रत्यंतर त्यांना आलं. घर दुरूस्तीचा बेत ठरवून श्रीरंग आणि त्याची बायको पुण्याला निघून गेली. चार दिवसांतच घर दुरूस्तीचं काम सुरू झालं. बायाने पदर खोचून सगळं आवार आरशासारखं लख्ख बेणून काढलं. गडी माणसांची लगबग सुरू झाली. एके दिवशी दुपारची जेवणं झाल्यावर विठ्ठलशास्त्री झोपाळ्यावर बसलेले असताना बन्याबापूंची सून काळ्यांकडे आली. आल्याआल्याच विठ्ठलशास्त्रींना नमस्कार करून ती बाई घो घो रडायला लागली. तिचा नवरा-बन्याबापूंचा थोरला मुलगा दिनकर आसन्नमरण अवस्थेत शेवटच्या घटका मोजीत असलेला! त्याच्यावर उपचार करण्यासाठी विठ्ठलशास्त्रींना बोलवायला ती आलेली. शास्त्रीबुवा लगेच उठून तिच्याबरोबर बन्या बापूंच्या घरी गेले. जलोदराने पोटाचा नगारा झालेला दिनकर यातून वाचत नाही हे शास्त्रीबुबांनी त्याला पहाताक्षणी ओळखलं. आपण उपचार करून उगाच अपयशाचे धनी होण्यापेक्षा असंच माघारी जावं असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण दिनकराच्या बायकोचा उजळलेला चेहरा बघून तिच्या समाधानासाठी तरी काही उपचार करून बघावे असं त्यांनी ठरवलं. तसंच नारायणशास्त्रींनी त्यांना केलेला उपदेशही आठवला- 'वैद्याने केलेली चिकित्सा अगर औषध योजना ही केवळ निमित्तमात्र असते. कोणाही रूग्णाची आयुष्यरेषा विधात्याच्या हातात असते. म्हणून अपयशाला भिऊन उपचार न करणं हे वैद्याच्या पेशाला लांछन आहे. रूग्ण जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत उपचार करणं हे वैद्याचं आद्य कर्तव्य आहे.' नारायणशास्त्री आणि श्री नृसिंह सरस्वतीचं स्मरण करून विठ्ठलशास्त्रींनी दिनकराची नाडी धरली आणि औषधयोजना नक्की केली.जवळ जवळ पाऊण महिना रोज तीन खेपा घालून शास्त्रीबुवा जातीनिशी औषध द्यायचे. दिनकरचं फुगलेलं पोट हळूहळू ओसरू लागलं. दुखण्याला उतार पडू लागला तसा शास्त्रीबुवांचा आत्मविश्वासही वाढला. दिनकराची आयुष्यरेषा बळकट होती की शास्त्रीबुवांचा हातगुणही थोर होता श्री दत्तगुरू जाणे! पण दीड महिन्यांनी दिनकर हिंडू फिरू लागला. दिनकर शास्त्रीबुवांच्या उपचाराने असाध्य व्याधीतून बरा झाला हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला. शास्त्रीबुंवाकडे नानाविध रूग्णांची रीघ लागली. दिनकर, त्याची बायको यांनी वारंवार विनवणी करूनही शास्त्रीबुवांनी आपल्या उपचाराचा मोबदला सांगितला नाही. उलट 'तुमच्या सद्भाग्यामुळेच माझ्या उपचाराला गुण आला. जनलोकात मोठा लौकिक मिळाला' असं शास्त्रीबुवांनी सांगितलं. नाही म्हटलं तरी बन्याबापूच्या दुष्ट कृत्याची उगाळणी लोकांनी केलीच. काही लोकांनी तर त्याला तोंडावरही आडपडद्याने सुनावलं. त्यात भर म्हणजे शास्त्रीबुवांनी उपचारादाखल एक पैसुद्धा घेतली नाही. प्रत्यक्ष सुनेने आणि मुलानेसुद्धा बन्याबापूला ऐकवलं, "तात्यांना फसवून तुम्ही त्यांचं सोन्यासारखं घरभाट गिळंकृत केलंत अशी वंदता आहे. पण विठ्ठलशास्त्रींनी मनात डूख न धरता दिनकरला जीवदान दिलंच पण त्याचा मोबदलाही घेतला नाही.""कसायालासुद्धा दया यावी, एवढा देवतुल्य मनुष्य! अजूनही तुमचं मन तुम्हाला खात असेल, त्या केल्या कृत्याची शरम वाटत असेल, तर त्याचं ठिकाण त्यांना देऊन टाका! तुमच्या पापाची फळं पुढच्या पिढ्यांना नका भोगायला लावू." बन्याबापू कानकोंडा झाला. केलं कर्म त्याला खायला येऊ लागलं अन् तिन्हीसांजेला तो विठ्ठलशास्त्रींना भेटायला गेला. दिनकरच्या आजाराबद्दल आभाराचं बोलून झाल्यावर बन्याबापू म्हणाला, "तुम्ही गेल्यानंतर दहा बारा वर्षे माडा-पोफळीचं उत्पन्न मला मिळालं. माझं ऋण फिटलं. आता तुमची ठेव तुम्हाला परत द्यावी असं सून-मुलगा सांगताहेत तेव्हा आता तुमचं ठिकाण शेतजमीन नी घरभाट तुमच्या ताब्यात घ्या. मी तुम्हांला बक्षीसपत्र करून देतो."विठ्ठलशास्त्री शांत, संयमी आवाजात म्हणाले, "बन्याबापू, तुम्ही मला वडिलांसारखे! तुमचा उपमर्द करण्याची माझी इच्छा नाही. पण जे काय त्यावेळी झालं त्याचा साक्षीदार माझी आई अजून जिवंत आहे. जे झालं ते झालं. आमच्या नशिबात वनवास होते. आता दत्तात्रेयाच्या कृपेने बरे दिवस आले आहेत. मला काही कमी नाही. ठिकाण आमच्या तात्यांनी तुम्हांला दिलं ते दिलं. मला त्याची अभिलाषा नाही. देणारच असाल तर ठिकाण सोडून दुसरी एक गोष्ट मागेन म्हणतो म्हणजे माझा तसा आग्रह नाही पण...." शास्त्रीबुवांचं बोलणं अर्धवट तोडत बन्याबापू उतावळेपणाने म्हणाला, "मागा... मागा माझ्या मुलाला तुम्ही जीवदान दिलंत. पूर्वीच्या घटनेबद्दल मनात अढी न धरता तुम्ही जातीनिशी खेपा घालून दिनकरवर उपचार केलेत म्हणून तो वाचला. मुलाच्या आयुष्यापुढे मला कोणतीच गोष्ट मोठी नाही. तुम्ही काय मागाल ते देईन. लक्ष्मी येण्याच्या तिन्हीसांजेच्या वेळी मी दिला शब्द फिरवणार नाही. निःशंक मनाने मागा. तुम्ही मागाल ते द्यायचे वचन मी तुम्हाला देतो."शास्त्रीबुवा काय मागतात हे त्यांची पत्नी आणि आई कानात प्राण आणून ऐकू लागली. घसा खाकरून आवंढा गिळत शास्त्रीबुवा म्हणाले, "बन्याबापू, तुमच्याकडून कर्जाऊ घेतलेली रक्कम ठरलेल्या व्याजासह तात्यांनी दिली होती. फक्त प्रॉमिसरी नोट त्याच वेळी परत मागून घेतली नाही ही त्यांची चूक झाली, असं आई म्हणते. कायदा वस्तुस्थिती जाणत नाही... पुरावा जाणतो. पैसे दिल्याचा पुरावा तात्यांकडे नव्हता हीच त्यांची चूक झाली. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. माड पोफळी लावलेल घरभाट नी शेतजमीन त्यांना तुमच्या हवाली करावी लागली. ही गोष्ट खरी आहे की नाही? एवढंच सांगा... सत्य आहे तेच सांगा... मी हेच मागणं मागतोय तुमच्याकडे... द्यायचं असेल तर द्या..."अवाक झालेला बन्याबापू मान खाली घालून म्हणाला, "होय, सत्य आहे... मी झक मारली, कर्जाऊ घेतलेली रक्कम ठरलेल्या व्याजासह तात्यांने दिलीन होती. माझी बुद्धी त्यावेळी फिरली खरी..!"