रानभूल in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | रानभूल

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

रानभूल


मिरगाची शितडी पडली आणि पाऊस खराच झाला. पुढच्या चार दिवसात हरोहार दमदार सरी पडल्या नी सड्याशिवराची कळा परतली. काळ्या करंद कातळावर खाचाखोचातून व्हावटीचं पाणी साठल्यावर चार दिवसा गवताचं बी तरारून आलं नी आख्या कातळावर पोपटी गोधडी आंथरल्या सारखी कळा आली. व्हावटीच्या पाण्याने उन्हाळी पायवाटांचा मागमूसही उरला नाही. सड्यावरून वहात खाली मळ्यात जाणाऱ्या वहाळाला हऊर आला नी जोरगतीच्या भरतीच्या ताणावर पाणी तुंबून अर्धा मळा हौराच्या पाण्याने भरला. सड्यावरून गावदरीत येणाऱ्या ओहोळातून कुरल्या, मासे चढणीच्या पाण्यातून विणी काढाण्यासाठी सडा गाठायला लागले. एरव्ही ओसाड पडलेल्या सड्यावर इतस्तत: विखुरलेल्या दगड गोट्यांच्या आडोशाने कुरल्या पळताना दिसायला लागल्या. डबक्या डबक्यातून साठलेल्या पाण्यात बेडकानी आणि माशानी अंडी घालायला सुरुवात केली . लागोपाठ दोन तीन दिवस पाऊस झाल्यावर हवेतला धुरळा नाहिसा व्हायचा नी आमच्या घराच्या माथ्यावर उंच डगरीवरून मावळतीच्या दिशेला नजर टाकली की क्षितीजा जवळ उंच गडमठचा डोंगर अगदी स्वच्छ दिसू लागायचा.
पावसाची झड ओसरल्यावर एका संध्याकाळी अगदी काळवं पडताना आमचा वाटेली भग्या पाडावे पेट्रोमॅक्स मागायला आला. ओसरी वर घोंगडी टाकून त्यावर बूड टेकत अप्पांकडे पहात म्हणाला, "म्हंजे तुमी वळाकला असशा मी कशाक इलय तो..... आमचो बाबू नी सखो म्हणा हुते की, आज सड्यार् कुर्ल्यो धरूक जांवया....आपांकडना बत्ती (पेट्रोमॅक्स) घेवन् येवा." पाच वर्षामागे धोंडूकाका मुंबईला पोर्ट ट्रस्ट्मध्ये जातू (कायम) झाले. त्या नंतर शिमग्यात निशाणाच्या पाया पडायला नी रवळनाथाचा नवस फेडायला धोंडूकाका गावी आलेले. येताना त्यानी हौसेने नवी बत्ती आणली. त्यावर्षी सालाबाद प्रमाणे आख्खी भोवतळ वाडी पुरी केल्यावर अगदी काळवं पडताना कापड खेळे आमच्या अंगणात टिपरी मारायला आले . दरवर्षी नेहमीच अगदी शेवटी ते आमचं घर घेत. आमच्याकडे खेळल्यावर खेळे नी निशाण करी अशा पंचवीस तीस गड्याना ओसरीवर जेवायला वाढीत . आमच्या पणजोबांपासून ती रूढच होती . या वेळी खेळे येण्याआधी काकानी नवी बत्ती लावून पावळीत हुकाला लटकावून ठेवली होती. अंगणाच्या कोपऱ्यात मांडलेल्या पाटावर देवाची निशाणं ठेवल्यावर निशाणकरी नी खेळे बत्ती बघायला पुढे धावले. त्यावेळी गावात कोणाकडेच ही वस्तू नव्हती.
मराठी शाळेजवळ भावकादेवीचे देऊळ होते. पुशा पोर्णिमेला देवीची जत्रा असे त्या रात्री गिरकर मास्तर शाळेतल्या पोरांचे नाटक बसवीत. तेव्हा पुरळेतले खोत बाप्पा मराठे नी वाड्यातले बाळूकाका म्हाजन या तालेवारांकडून बत्त्या आणीत. नाटकाला आणलेल्या बत्त्या पंधरावीस मिनीटानी बागबूग करायला लागल्या की वामन मेस्त्री पुढे जावून हुकाची बत्ती खाली काढून तीची फिरकी फिरवून पिन करीत , त्या कृतीला लोक बत्तीचा कान पिळायचा असे म्हणत. मग ते थडा थडा पंप मारून हवा भरीत नी पुन्हा दोन तीन वेळा कान पिळून मेंटल चांगला फुलला की बत्ती हुकाला अडकवीत. त्या वर्षी खेळे चांगले तासभर नाचले. त्यानंतर खेळ्यांचे जेवण झाले नी खेळे घरी गेले. त्या दोन तीन तासात एकदाही हवा मारावी लागली नाही. ही गोष्ट जाणकारांच्या नजरेतून सुटली नाही. देवाला गाऱ्हाणं घालणारा लक्ष्या घाडी म्हणाला, " काकानुं .... बत्ती मतं आणलास खरी. नायतर नाटकांक हाडतत बत्तयो तेंचो घडी घडी कान पिळवटून हवा मारूक लागला. आता खेळे येवन् इतको येळ झालो पन एकदाव् बाकबूक नाय , की हवा मारलेली नाय की, कान पिळवटलेलो नाय. वस्तू मतं भारी आनलास. "
खेळे गेले नी दुसऱ्या दिवसापासून गावातले बापये, बायल माणसं, पोरं बत्ती बघायला यायची. मग एक पान खावून , एका पानाचा विडा करून तो कनवटीला खोचून अर्धा तास गप्पांचं पागूळ लावून माणसं मा र्गस्थ होत. बापं भटजी, भिकू मास्तर, सरपंच , पोलिस पाटील, मोतीराम बुवा अशी गावातली मातब्बर माणसंही बत्ती बघायला येवून गेली. त्या आठवडा भरात हजारभर खायची पानं नी चार रत्तल सुपारीच्या खांडांचा फन्ना उडाला. वाडीतली पोरंतर काळवं पडल्यावर बत्ती लावलेली आहे की काय ते पहायला आली. पहिल्या दिवशी पाच दहा मिनीटं वाट बघून मिनीट एक दोन आगाऊ पोरानी डायरेक्ट धोंडूकाकाना विचारलं, " काकानूं बत्ती लावणार हास काय? आमी बगूक थांबॉचे काय?" मग काकाने बत्ती लावायला घेतली. त्यानंतर मग आठवडाभर आम्ही संध्याकाळी बत्ती पेटवून ठेवीत असू.
बत्ती आणल्या पासून मिरग झाला की सड्यावर कुर्ल्या पकडायला, पाऊसकाळ संपता संपता खाडीच्या नस्ताला बांध घालून तुंबलेल्या पाण्यात संध्याकाळी भाराभर निवल तोडून घालीत . निवलीच्या विषारी डिंकामुळे डोळे फुटलेले मासे पागायला जाताना दरवर्षी आमचा वाटेकरी भग्या बत्ती घेवून जाई. रात्रीच्या काळोखात बत्तीचा उजेड बघून सड्यावर दगड गोट्यांचा आडोसा धरून दडून राहिलेल्या कुरल्या बाहेर येत. तासभर फिरल्यावर भग्या नी त्याचे दोन्ही भाऊ असे तिघे दीड दोन तासात तीन चार्जण ी आपापली 'झाबळीी' भरून कुर्ल्या धरून आणीत. 'झाबळी ' म्हणजे माशांची जाळी विणायच्या तंगूसाची घट्ट वीणीची, लहान घरके असलेली, मुंडा हात रुंद - दोन वीत उंच, तोंडाकडे अरुंद होत जाणारी त्रिकोणी आकाराची पिशवी विणीत. तोंडाकडच्या घरक्यात जाड दोरी ओवून तो फासरा ओढून तोंद बंद करता येत असे. ही 'झाबळी ' मासे पागताना कंबरेला बांधली की त्यात पकडलेले मासेही साठवता येत. ग्रामदैवत कुंडलेश्वराच्या उत्सवाला देवळात किर्तनं होत त्यावेळीही आणि भावकाईच्या देवळात नाटकाला वामन सुतार आमची बत्ती नेत असे.
बत्ती अणल्यावर बरेच लोक अगदी लांब लांबहून बत्ती मागायला येत . पण आप्पा कोणालाही बत्ती नेऊ देत नसत . घरातही फक्त पक्या दादा शिवाय कोणीही बत्तीला हातही लावीत नसे. बत्ती पेटवताना पंप मारून रॉकेल वर काढून ते जाळून बर्नर तापवून बत्ती पेटवीत. पण त्यात बर्नर चट्कन तापत नसे. शिवाय रॉकेलच्या धुराने काच काळी पडून उजेड कमी व्हायचा. पण आमच्याकडे स्पिरीटची बुधली केलेली होती. बर्नरच्या बुडशी खोलगट कानपा असे त्यात स्पिरीट ओतून पेटवले की बर्नर पटक्न तापे नी काचही काळी पडत नसे. टाकीत रॉकेल भरताना फनेलात दुपदरी फडक्याचा तुकडा टाकून रिकेल गाळूनच भरले जाई. आम्ही इतकी जपून बत्ती वापरीत असू. म्हणून ती आणल्यावर चार पाच वर्षात फक्त एकदा वामन सुताराकडून साफसूफ करून घेतलेली होती. एरव्ही फक्त एकदा पंप मारला नी अधे मधे अगदी क्वचित कान पिळला की तीन तीन तास, रॉकेल संपे पर्यंत बघावे लागत नसे.मेंटल तर वर्ष वर्षात बदलावा लागत नसे.
त्या दिवशीही मिरगानंतर भग्या बत्ती न्यायला आल्यावर पक्यादादाने टाकीत तोंडोतोंड रॉकेल भरले नी स्पिरिट टाकून बत्ती पेटवली. भग्या बत्ती घेवून निघाला. पाळंदीतून जाताना गडब्डीत तो पाय घसरून पडला. "आपा, पक्या लौकर येवा मी पाळंदीत पडलय......" हाकारे ऐकून ओसरीवर खुंटीला तांगून थेवलेली चार सेलची विंचेस्टर बॅटरी घेवून पक्या दादा धावत गेला. बत्ती उताराने एका बाजुला घरंगळत गेलेली होती. काच फुटलेली होती नी रॉकेल सांडत होते. पक्यादादाने पीन सैल करून हवा सोडली. भग्या भितीने लटालटा कापत होता. तो येवून ओसरीवर बसल्यावर आप्पानी त्याच्या पुढ्यात पाण्याचा तांब्या ठेवला." तू आदी पाणी खा बगू...." पाणी पिवून सावध झाल्यावर भग्या रडायला लागला. " आज पावत इतक्या येळा मी बत्ती न्हिलय तुमची , पन कडीच ढको दुकु न लावता काम झाल्यार तुमची वस्तू शाबूत घेवन् इलय.... आजच खयचो किलेस लागलो माज्या पाटी काय समजत नाय...... सोन्यासरक्या वस्तूची नासाडी झाली माझ्या कडसून ...." नी तो फडा फडा गालावर फटके मारून घेवू लागला. आप्पानी पुढे जावून त्याचे हात धरले, " खुळो काय तू...... आदी चिप ऱ्हंव बगू. बत्तीक कायव् होवने एक गेली तर दुसरी हाडू . तुका आदी खंय लागलां सवरला तां बगूया."
दरम्याने पक्या दादाने जुनेराच्या फडक्याने बत्तीची टाकी साफ पुसली. टाकीला पंप एक बारीकसा पोचा आलेला होता. बाकी बत्ती शाबूत होती. मारून बर्नर मढून रॉकेल ची धार उडते की नाही चेक केले. मग कपाटानून मेंटल नी काच आणली. व्यवस्थित मेतळ बांधून टवळं फिट केल्यावर बर्नर च्या कानप्यात स्पिरीट ओतलं. मिनीटभराने बर्नर तापल्याची खात्री करून पंप मारला. एक दोनदा कान पिळल्यावर बत्ती पेटली . मेंटल नी काच नवीन असल्यामुळे झळझळीत उजेड पडला. आप्पा म्हणाले , " बग, मी काय सांगलं हुतंय तुका..... बत्तीक काय्येक होवचां नाय..... तां खरां झालाना....? नी तू वगीच त्वांड फोडून घेवक् घितलंस की नाय, भयाक्री खैचो....!" भाग्या खुशीत हसत हात जोडून , "भावकायची किरपा ...... माका कायव लागलेला नाय, वांयच ढोपार कसकसता हा . पण बत्ती शाबूत ऱ्हवली, ह्यां मोटा " म्हणत सुपारी कातरायला लागला.
भग्याला उशीर झाला म्हणून त्याला शोधायला त्याचा भाऊ सख्या नी पोरगा धकल्या आले. त्याना झाळी गोष्ट कळल्यावर सख्या म्हणाला, " तरी नशिब, तुजो तारतो हुतो म्हनू बेतात भागला. तां जावने . आमी आयदणा घेवनच इलाव, आदीच येळ झालोहा, आता येळ न काडता निग़ॉया......." धकल्याने बत्ती उचलली नी तिघेही उठले. त्याबरोबर पायरी जवळ मुरगुशी मारून बसलेला कुत्रा टक्कन उठला नी कान ताठ करीत चालीला लागला. न राहवून आप्पा बोलले, " म्हंजे आज जातासच तुमी...... मी म्हणाहुतय........" ते पुढे काय सांगणार याचा अंदाज लागल्यामुळे त्यांना पुढे बोलू न देता भाग्या गडबडीने म्हणाला, " नाय् म्हंजे वांगडी म्हंतहत च तर जाताव आमी. आज पावसान दुकू ओकळ दिलान हा..... उद्या परत झड धरलान तर काय करशा....? " एकंदर नूर बघून आपा पुढे काही बोलले नाहीत. ते पाळंदीतून पुधे गेल्यावर आपा म्हणाले, " आज बाहेर पडल्या पडल्या नाट लागली म्हणताना आजचा बेत रद्द करा नी उद्या जावा असे सांगायचे माझ्या अगदी तोंडावर आलेले पण मला पुरते बोलूच दिले नाही भाग्याने, म्हणताना मी गप्प बसलो. एवढं महाभारत घडल्यावर माझ्यासारखा माणूस आज तरी बाहेर पडता नसता . पण पारध नी माशाचं वाण यासाठी हे कुळवाडी लाखमोलाच्या कामावर लाथ मारून जीवावर उदार होवून जाणार म्हणजे जाणार..... अगदी मुडदा सुद्धा झाकून ठेवतील नी बाहेर पडतील! माशा मटणाला भारी लबूद जात, कुळवाड्याची..... "
तिघेही घाटी चढून गेले नी स्वच्छ पाण्याचं कोंडुक बघून भाकरी खायला बसले. एका भाकरीचे चार खुटके ते कुत्र्याला घातले. चट चट आवरून ते पुन्हा चालीला लागले. मुळमांची खरी जवळ आली नी बत्तीच्या उजेडाकडे सुरु सुरु पळत येणाऱ्या कुरल्या दिसायला लागल्या. त्यानी पटा पटा एकेक कुरली पकडून झारंग्यात टाकायला सुरुवात केली. कलाक भरात माथावळीपर्यंत पोचले. तिथून पुढे चार कोसावर उगवतच्या दिशेला नावळ्यात उतरणारी घाटी होती. मावळती कडे सात आठ कोसाच्या टप्प्या पलिकडे कुरंगवण्याचा टापू नी पुढे रांबोळाचा व्हाळ लागला असता. उत्तर दिशेला मैलोन् गणती चाल मारल्यावर हातिवले तिठा नी सावंतवाडी रत्नागिरी रस्ता होता. दक्षिणे कडे घंटा भराच्या चालीवर एक फ़ाटा धुमाळ वाडीतून पुढे शिडमात गेलेला नी दुसरा त्यां च्या हरचली गावात गेलेला होता. या मधल्या सडावळीच्या मैलोनगणती भागात चिटपाखरूही नजरेला पडत नसे. सगळा ओसाड सडा. एकदा भोवतगिरी लागली असली तर चालून चालून पाय तुटले तरी मनुष्य वस्ती लागणारी नव्हती.
माथावळीला आल्यावर साधारण अंदाज करून कुरल्या साठे पर्यंत उगवतच्या दिशेने मकाण मारुया असे भाग्या बोलला. आता जरा जरा दाट झाडकळी लागायची सुरवात झाली. जरा पुढे गेल्यावर एका झाळीतून डुकरांचा कळप उठला. चार मोठे डुक्कर नी दहाबारा पिल्ली बत्तीच्या झगझगीत उजेडाने दिपावली होती. कुत्र्याने भुंकून भुंकून सकनात केला. धकल्याने झ्यो झ्यो करून कुत्र्याला जोर द्यायचा प्रयत्न केला. त्याने पुढे जावून एखादे ओझ्याचे पोर आडावले असते तर आयती सोय होणार असती. पण त्यांची संख्या बघून दबकलेला कुत्र्याला पुढे जायचे धाडस होईना. तिघेही कळपाच्या दिशेने सरकू लागताच डुकरानी मोहरा वळवला नी ने नपश्चात झाले. आता मतलय सुटलेली होती. खाडी कडून सडावळी कडे वारा वहात होता. मळभ आल्यामुळे आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती. गुडुप अंधारामुळे आता बत्तीचा रोख धरून असंख कुरल्या यायला लागलेल्या. तिघेही कुरल्या पकडून झारंग्यात टाकायच्या कामात मग्न असताना अवचितपणे कुत्रा बेजान बोंबटला. आवाज धकल्याच्या डाव्या कुशी कडून आला. बत्ती घेवून सख्या त्या रोखाने निघाला. काही क्षणातच ब्यॉं ऽऽ ब्यॉं असा आवाज आला नी कुत्र्यावर झडप घालून त्याच्या नरड्याला डास मारून ओढीत नेणाऱ्या वाघटावी काळी आकृती दिसली. सख्या बत्ती सावरीत त्यादिशेने जरा पुढे जाईतो वाघूट नाहिसे झाले.
भाग्या नी धकल्या दोघेही सख्याच्या दिशेने पुढे गेल्यावर तिघानी कुत्र्याला वाघटाने धरले होते त्या झाळीपर्यंत पल्ला गाठला. कातळावर हातातले दांडे आपटून आवाज काढले, झाळीत दगड मारून बघितले. पण काहीच झाले नाही. " कुत्रे वाघूट मगाशीच लांबवला...... पयल्यान कुत्रो वराडलो तवा मी वळून बगलंय..... ज्याम त्याम दिसा न दिसा.... वागटान झडप घालून त्येच्या नरड्याक ढास मारलान नी तेका वडीत न्हिलान..... सकोदा बती घेवन् येयसर तां बराच लांबावला हुता. वागटान धरीसर कुत्र्याक तेचो वास पण कसो इलो नाय म्हन्तय मी..... " त्यावर भाग्या म्हणाला , " वारो उलट्या अंगान हां ना.... वागटान धरीसर कुत्र्याक त्येचो पत्त्याव लागलो नाय...... आता तिगवे फारका फारक न व्हता एक्या मेळान चलॉया......" ते जसजसे पुढे पुढे चालायला लागले तसतश्या मोठ मोठ्या कुरल्या आढळायला लागल्या.
अर्ध्या तासात तिघांच्याही झाबळ्या भरत आल्या. तो अंदाज घेत भाग्या म्हणाला, " आता परतीची वाट धरुया. वापस जाताना आजून भेटती कुरल्ये......." त्याचे बोलणे संपतेय तोवर धकल्याच्या डाव्या अंगाने दोन भल्या भक्कम कुरल्या डेंगे वर करून उभ्या राहिलेल्या सख्याला दिसल्या. एवढ्या मोठ्या कुरल्या त्याने हयातीत प्रथमच बघितलेल्या. तो जोरात ओरडून म्हणाला, " धकल्या मेल्या तुज्या डाव्या अंगाहारी बघ......" धकल्या नी भाग्या चमकून बघायला लागले........ एवढ्या मोठ्या दोन वीत रुंद नी मनगटा एवढे डेंगे असललेल्या कुरल्या बघून ते सुद्धा आवाक् झाले.भाग्या म्हणाला, " एकाम धरूक जांव नुको हां ...... तुका आरेखणार नाय...... चुकॉन हात घालशी तर मनगटाचो तुकडो पडात तो कळणार पण नाय , तू दम धर, मी दांडो मारून डेंगे मोडतय तेचे..... " नी तो दांडा उगारून निघणार तो पर्यंत कुर्ल्या उलट दिशा धरून सरसरत पुढे निघाल्या. तिघेही दांडे उगारून झप झप त्यांच्या मागून सुटले . कुरल्या निमिषभर दबकत नी आता दांड्याच्या माऱ्यात आल्या आल्या म्हणेस्तोवर सरसरत पुढे जात. तिघेही त्यांचा पाठलाग करून जेरीस आले . आता भाग्या दमछाक होवून टेकीला आला. तशात ढोपरातूनही कळा यायला लागल्या. तो न राहवून वांगड्याना म्हणाला, " माज्याच्यान आता फुडे चलववत नाय...... जरा दमा..... मी हंयच बूड टेकतय्...... तुमे तेंच्या मागार जावा . पण लय लांब जाव नुको....... खचोनत त्यो कुरल्यो. जरा बगा नायतर नाद सोडा तेंचो. " नी तो खाली बसला.
सख्या नी धकल्या थांबले तशा कुरल्याही थांबल्या नी पुन्हा उलट्या फिरून बत्तीच्या रोखाने हळू हळू सरकायला लागल्या. भाग्या चे त्यांच्याकडे लक्ष होते. त्यानी आपल्या हातातला दांडा त्यांच्या दिशेने भिरकावला. त्यांच्या पासून वीत भर अंतरावर दांडा पडला नी त्या खणखणाटाने बावचळून दोन्ही कुरल्या दोन दिशानी सरसरत निघाल्या..... त्याच्या अनपेक्षित कृतीमुळे सख्या जाम भडकला. " तू मदीच नुको ती घान क्येलस.... चल रे धकल्या....... नायतर लांबावती त्यो.' ते दोघे ही मागावर निघाले . जोडीदारीण दिसेना म्हणताना एक कुरली जवळच्याच ढोपरभर उंच सकेरीतल्या ढिग़ोळीत रिगली. आता दोघेही ढिग़ोळी जवळ गेले. बत्ती सोईच्या जागेवर नीट ठेवून दोघानी दोन बाजूने दांड्याच्या टोकानी ढिग़ोळीतले दगड चाळवायला सुरुवात केली. निम्मे ढिग़ोळी चाळवून झाली तरी कुरलीचा काही मागमूस लागेना. थोडावेळ दम खावून सावढ झालेला भाग्या आता त्यांच्या मदतीला गेला.
बरेच दगड बाजुला केल्यावर कातळाला पडलेली भेग दिसायला लागली . कुरली त्या भेगेत दडून बसलेली असणार असा अंदाज करून त्यानी विरुद्ध दिशेचे दगड बाजुला करायला सुरुवात केली नी भेगेच्या सांदरीतून बाहेर येत कुरली सरसरत बाजुच्या झाळीकडे निघाली. बत्ती उचलून तिघानी ही झाळ ग़ाठी पर्यंत कुरली दिसेनाशी झाली. दहा बारा वाव लांब रुंद असलेली ती झाळ तोरणीच्या शिरड्यानी गच्च झालेली. आता कुरली कशीच मिळत नाही हे त्याना समजून चुकले. धकल्याने रागाला येवून चारी अंगाने फिरून झाळीवर सकेरीचा सडाका मारायला सुरू केला पण कुरली बाहेर आली नाही. " मगाशी दोनव कुरल्यो आयत्यो चलॉन येय हुत्यो बत्ती कडे पन ह्येना घान केल्यान ...... " बापाकडे रागाने नजर टाकीत धकल्या फिस्कारला. " धा जुनांक कालाण पुरला आसता....... " तो आणखीही वाक्ताडन करणार असता पण तेवढ्यात बत्ती बाक् बुक् करायला लागली. चपळाई करीत सख्या पुढे झाला नी त्याने तीन चार पंप मारले. मग त्याने बत्तीचा कान पिळला नी फुक्क करून बत्ती विझली. "तू फैक वंयच मी बगतय ......" धकल्या पुढे झाला . त्याने पाटलोणीच्या खिशातली माचीस बाहेर काढली. बत्तीला दोन पंप मारले नी त्याच्या लक्षात आलं. त्याने बत्ती उचलून बघितली. टाकी रिकामी झालेली होती. त्याने चावी फिरवून हवा सोडून टाकली.
बत्ती विझली नी आपण उजाडेपर्यंत इथेच अडकून या भितीने एवढे धास्तावले की कोणालाच काय बोलावं ते सुचेना. भाग्या पोक्ता पुरवता...... त्याने गुळणी फोडली. " त्या मायझयां मोट्या कुरल्यानी फसवलानी. माजा ढोपार् दुकोक लागला म्हणू मी बसलंय तवा त्येंचो नाद सोडा म्हणून सांगल हुतय...... " त्यावर सख्या बोलला, " व्हय ..व्हय..... तवा तुजा आयकतव् नी घराकडेन चलॉक लागल आस्तव तर येवड्यात घाटी उतरॉन गावदरीत पोचला असताव...... आता काय विलाज नाय. आता मुळवसाक सांगणां करुया नी उजवाडासर सावचितीन हंयच बसॉन ऱ्ह वॉया. तिघानीही हात जोडून मनोमन मुळवसाची याद केली. थोड्या वेळात अंधाराला नजर सरावली. मळभ ही जरा कमी झाले नी आजुबाजूचा परिसए अंधूक दिसायला लागला. भाग्या किलकिले डोळे करून आजुबाजुला सुरक्षित जागा टेळायला लागला. उजव्या अंगाला हाकेच्या अंतरावर दगडी चबुतरा दिसला. तिकडे निर्देश करीत तो वांगड्ताना म्हणाला, ' तां बगा , थय ब्व्हतेक देवरणा डाळलेला हा सा वाटता. पूर्वी सड्या माळाला रहदारीच्या वाटेवर साधारण कोसभर अंतरावर अडीच हात औरस चौरस नी गळाभर उंच दगडी चबुतरा बांधलेला असे. एक म्हणजे वाट ओळखायची खूण होई आणि एकटा दुकटा माणूस डोक्यावरचं ओझं त्यावर ठेवून जरा दम खात असे. पुन्हा चालायला सुरुवात करताना ओझं विनासायास घेणंही सोईचं होत असे .
तिघेही हळू हळू चालत देवरण्याजवळ जावून टेकले. कमरेची 'आकी' सोडून ठेवली नी खोळीला घेतलेल्या घोंगड्या आंथरून पाय लंब करीत देवरण्याला टेकून बसले. " आमी काळवा पडल्यावर निगालाव. बत्तीतला घासलेट सोपला म्हंजे आजून मद्यान रात झालेली नाय हा. आपून तीन घंटे चल्लव म्हटला तरी मुळमाच्या खरी पास्ना लय लांब इलेले नाय हाव...... फाटपटी जरा सुकू पडला नी चलॉक लागलाव तर उजवाडासर घर गाटता येत." सख्या धोरणाने म्हणाला. त्याचं म्हणणं बरोबर आहे हे वागंड्याना पटल नी त्यांची धास्ती बरीच कमी झाली. भाकरी खाल्ल्या पासून आत्तापर्यंत त्यानी पान सुद्धा खाल्लेलं नव्हतं. हात पाय ताणून आळस देत भाग्याने चंची काढली. तिघेही चंची बाळगून असायचे, त्यात आज रातभर सड्यावर फिरायचं होतं म्हणून तिघानीही पानं, सुपारी नेहमीपेक्षा जास्तीचीच आणलेली होती. ज्याने त्याने पान जमवलं नी गुळणा धरून नेवात बसून राहिले.
वेळ जाता जात नव्हता. थोड्या वेळातच धकल्याला जांभया यायला लागल्या. सख्या बोलला, " तुका नीज येयत् आसली तर तू नीज. मी नी भागो जागे हाव. तसाच काय वाटला तर उटवू तुका." मग सरसा होत हात दुमडून त्यावर डोकं ठेवून पाय दुडून तो कुशी वर झोपला. त्याचा लगेच डोळा लागला नी तो घोरायला लागला. बराच वेळ गेला. मधे मधे आभाळ धरून येई नी जास्तच गुडूप होई . तेव्हा काळजारलेल्या सुरात भाग्या म्हणे, " बाबा मुळवसा लेकरार म्हेरबानी कर नी उजवाडासर पावसाक आरेखून धर. आमी हय अवगाती अडकॉन पडलंव..... पावस् नाय हा म्हनू मोकळ्या अंगान बसॉक तरी मिळताहा...... तो हैवान इलो तर हाल बगूक नुको." भग्या नी सख्या घोंग़ड्यावर आडवे होवून आलकट पालकट मारीत , मधे मधे पान खात रात्र कधी संपते याची वाट बघीत चितागती बसलेले. एकूण झालेला प्रकार आठवता दोघानाही भलत्या सलत्या शंका येवू लागलेल्या . पण वांगडी घबरेल म्हणून कोणच बोलू धजावत नव्हता.
मध्येच उठून जरा बाजुला जावून सख़्या इराकतीला बसला. उठून येताना त्याला साळींदराची जोडी येताना दिसली. तो हालचाल न करता गप ऱ्हायला. मिनीट भरात दोन्ही साळिंदरं त्याच्या पुढ्यातून इतकी जवळून गेली की , हातात दांडा असता तर त्यातलं एक तरी नक्की लोळवता आलं असतं. माघारी जावून घोंगड्यावर बसल्यावर त्याने ही गोष्ट बोलल्यावर सख्या म्हणाला, " साळिंदरां चरॉन वापीस चल्ली म्हंजे पैलो कोंबडो होवची वेळ झाली." हे आयकून सख्याला बराच धीर आला, आता लौकरच भिणभिनायला लागेल. या आशेने सुखावत मनात राखून ठेवलेली शंका त्याने बोलून दाखवली. "त्यो कुरल्यो म्हंजे पिशाकती चो परकार व्हतो की काय असो माका शक येता...... इतक्यो मोट्यो कुरल्यो आसतत ह्यां आज पावत कडी कोनच्या तोंडून आयकेलेला नाय..... लयच मोटी म्हंजे दीडेक वीतीची कुरली चुकॉन कदी कोनी बगल्याचा सांगता. आमका दिसल्यो पीट मळोच्या पराती येवड्यो मोट्यो हुत्यो...... नी आमका चकवो देवन् मागसून न्हिलानी..... "
सख्याला आली तीच शंका भाग्यालाही आलेली. पण त्याला बोलायचं धाडस झालं नव्हतं. आता उजाडायला आलं म्हटल्यावर त्याला जरा धीर आला. " तू म्हंतस तो शक माकाव इलो. ती चाळेगत व्हती भौतेक...... खरां म्हनशी तर माजा ढोपार दुकोक् लागला नी मी मदीच थांबलय ना तवाच माका शक वाटलो...... ही पिशागत आसनार ..... आमचो तारतो साह्यावर म्हनू लांबसून ख्याळ करून दाकवलान त्येना. तेच्या हद्दीत गवसताव तर तिगवांक नाबूत केलान् अस्ता तेना. मुळवसाच्या किरपेन बचावलाव आपून." दोघानीही सुटकेचा सुस्कारा सोडीत मुळवसाला हात जोडले. सख्या ईशय बंद करीत म्हणाला , "सकाळी घरी ग्येलाव की, " भावकाय, रवळनात नी मुळवस तिगावांक नारळ देवया......रवळनाथाचो कौल पर्साद घितलो की काय तो उलगडो होय्यत.... याक मतं खरा आपून कदीव भायर पडताना पावळीच्या भायर् इल्यावर मुळवसाक हात जोडतांव! कलदुकू भायर पडल्यावर मी तेका राकणीचा गाराणा करून हात जोडले हुते म्हणॉन ती पिशागत लांबसूनच गेली."
थोडीशी उघडिप होवून भिणभिणायला लागल होतं. मी जरा झाड्याक् जावन् येतंय म्हणत भाग्या उठला. झाडीच्या अडोशाला विडीए उरकून देवरण्या जवळच्या कोंडकाशी जावून तोंडावर पाणी मारले. खळखळावून चुळा भरल्या नी माघारी येवून बसल्यावर सख्या गेला . सख्या माघारी येवून धकल्याला हाकारीत त्याने पान जुळवायला सुरूवात केली. धकल्याची निसूर झोप झालेली होती. दोन तीन हाका मारल्यावर तो उठून बसला. हातपाय लांब करून तो उठला नी बाहेर जावून सगळं उरकून , चूळ भरून घोंगड्यावर येवून टेकला. आता दिशा उजळायला लागल्या. झाळी बेटातून पोसावे , कुकडुंबे ओरडायला लागले, त्यांचा कुडुक् कुडुक् आवाज घुमायला लागल्यावर तिघानाही हायसं वाटल. जराशान पायाखाली दिसेल इतपत सुकू पडलं नी भाग्या उठून झाबळी उचलीत मला, "आता दिसॉक लागला, आता चाल धरुया." मग तिघेही घोंगड्या खांद्यावर टाकून , कुर्ल्यानी गच्च भरलेल्या झाबळ्या कमरेला बांधून चालायला लागले. भाग्याने चहू अंगानी निरखीत क्षितीजाकडे उजळलेली पूर्व, तिच्या उजव्या अंगाला दक्षिणे कडे त्यांचा गाव असा कयास बांधून त्या दिशेला चाल धरली. पायाखाली नीट निरखून बघीत दमादमाने त्यांची मार्गक्रमणा सुरू झाली. जरा पुढे गेल्यावर पटर्र- पटर्र ऽऽ फर्रर्र आवाज करीत सकेरीवर बसलेला ल्हाव्यांचा कळप उठला . तिघेही दचकून जागच्याजागी थांबले , नी लगेच फटर्रऽर्र करीत उडालेले ल्हावे दिसल्यावर, "काय अक्करमाशी जात तरी, आदी उमागले आसते तर दांड्यान खेपेत दो तीन तरी आडये केलं आस्तंय...... "धकल्या म्हणाला , नी ते खरंही होतं. बसून विश्रांती घेताना सात-आठ ल्हाव्हे एकामेकाला खेटून बसलेले असतात. नी दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे माणूस अगदी वावभर अंतरावर येईतो ते जागचे चाळवतही नाहीत . आणि एकदम झप्पकन एका दमाने भरारी मारतात.
आता चांगलं दिसायला लागलं म्हणेतो अवचित गार वारे वाहू लागले , अंधारून आलं नी सटासट तिरप्या धारानी पाउस कोसळायला लागला. घोंगडीची खोळ करून डोक्यावर घे ईतो तिघानाही बरंच भिजायला झालं. वाऱ्याच्याही अशा कावट्या सुटायला लागल्या की , त्याना नाइलाजाने झाळीच्या आडोशाला थांबणंच भाग पडल. घंटाभर दळवटत पिळवटत पावसाने असा काय धुमशान घातलान की बापड्याना निचिंतीने पान सुद्धा खाता आलं नाही. जराशाने वाऱ्याचा जोर कमी होवून पाऊस एका धारेने पडायला लागल्यावर आमने सामने कोंढाळ करून बसल्यावर पान खाता आलं. पहिली पिक टाकल्यावर सख्या म्हणाला, " ह्यो सैतान काय खळोची शाश्वती दिसयना नाय, आपून हळू हळू चलॉक लागोया." मग घोंगड्या घट्ट लपेटून ते चालायला लागले. मध्येच पावसाचा जोर कमी होई. आता सर ओसरेल म्हणेतो जोरदार वाऱ्याची कावटी येई नी पावसाचा जोर वाढे. बराच वेळ असा खेळ करून मध्यान्हीच्या दरम्याने पाऊस खळला. उन्हाचं किडवं आल. सूर्य माथ्यावर यायला झालेला होता म्हणजे दुपार होत आलेली होती .
त्याना रोज सकाळी न्हेरीला दोन दोन भाकऱ्या खायची सवय होती. खरं तर सकाळी ते चालीला लागले तेंव्हाच भुकेची जाणीव झालेली होती. पण घर गाठायच्या आशेने त्यानी नेट धरून चाल मारली होती. सख्या भाग्या यानी उपास काढेले होते. अगदी दहा बारा वर्षामागे आपांकडे अर्धल सुरू होईपर्यंत पाऊस काळात दोन तीन महिने अर्धपोटी रहावं लागे. फक्त लहान पोराना पोटभर घास वाढून जे अन्न असेल त्याचे माणसांच्या संख्येईतके ठाय आये लावी. न्हेरीला पेज किंवा नाचण्याच्या पिठाची आंबील असे. नव्याच्या पूर्णिमेला नवं होईपर्यंत दुवक्त पोटभर जेवण सणासुदीलाही मिळत नसे. धकल्याला पोट मारून रहाण्याची वेळच आलेली नव्हती. पाऊस ओकळल्याची खात्री झाली तशी तो म्हणाला," आता भुकेन माजो पाय फुडे पडानासो झालोहा, मी चार काटकां पेटकतय नी चार कुर्ल्यो हुलपावून खावया......." बाप नी च्य्लत्याने हो नाही म्हणायची वाटही न बघता तो झाळी जवळ थांबला. आंजणीच्या मुळातला पतेरा बाजुला लोटून विस्तव पेटवायची तयारी सुरू केली. सख्याने झाळी भोवती फिरून सुक्या काटक्या गोळा केल्या . बारीक काटक्या मोडून त्या सोयीने रचून त्याच्या मुळाशी माचिसमधली काडी पेटवून धरली. चांगला जाळ धरल्यावर जाड्या काटक्यांचे वीती वीती चे तुकडे योजून लावले नी ते पेटायला लागल्यावर वीतभर लांब सगीन काडी मध्ये मोडून त्या चिमट्यात कुर्ली पकडून चांगली हुलपावून काढली. त्याच्या बरोबर भाग्याही कुर्ल्या भाजायला लागला. दहा बारा कुर्ल्या खाल्ल्यावर धकल्याच्या पोटाला चांगला आधार लागला. बाकीच्या दोघानी पाचसा - पाचसा खाल्ल्या. मग पान खावून दक्षिण धरून त्यानी चालायला सुरुवात केली.
रात्री अवेळ पर्यंत बापये येतील म्हणून वाट बघून बायल् माणसं कंटाळली. "इतको उशिर कदी झालेलो माज्यातरी आटवणीत नाय. " भाग्या ची बायको म्हणाली. पडवीत्ल्या घोंगडी वाळवायच्या परशाखाली दोण बेतकक्या टवण्या जळत होत्या. त्याच्या उजेडात लोट्यावर भिंतीला टेकून बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला. पहिला कोंबडा झाला नी दोघीनाही जाग आली. परसा विझलेला होता. सख्याच्या बायकोने अंदाजाने चाचपीत चाचपीत साण्यातला टुका (दिवा) पेटवला. अजूनही बापये आलेले नव्ह ते . थोरली म्हणाली , बव्हतेक बत्तयेतला घासलेट सोपलेला आसणार . त्यागुना उजवाडेसर थांबॉक लागला सा वाटता माका..... सकाळी उजवाडला काय येती बापये...... " दोघीही उजाडेपर्यंत अध्ये मध्ये अंगणात पेळेपर्यंत जावून अंदाज घेवून येत. लख्ख उजाडल्यावर थोरलीने थाळीत विस्तव केला . धाकटी भाकऱ्या थापायला बसली. थोरली मागिलदारी गोठ्यात गेली. गुरांची शेणं भरली. शिंग मोडकीचा पाडा लुचायला सोडला. बाळ्या गायीच वासरू सोडून बारकी लोटीबर दूध काढलं. ओटी रिकामी झाल्यावर गायी लाथा मारायला लागल्या वर वासरं आखडून ती घरात आली नी धुवांधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या जोडीला वाऱ्या च्या कावट्या सुटल्या होत्या. धाकटीने टोपल्या खाली भाकऱ्या झाकून ठेवल्या . बापये कुर्ल्या घेवून आल्यावर कदाचित लगेच रस्सा करायला सांगितलेनी तर रात्रीच वाटप करून झाकून ठेवलेलं होतं. बाहेर येता येता म्हणाली " आता बाय माका काय सुदरानासा झाला ...."
आता मात्र त्यांचा धीर सुटत चाललेला. शेजारी त्यांच्या घरवडीतल्या बापयाना वर्दी द्यायला थोरली पावळीतलं इरलं डोक्यावर घेवून निघाली. ती गेली त्याआधीच बापये बाहेर पडून गेलेले होते. ते दुपारी कामावरून आल्यावर त्या ना हा विषय कळला. दुपारी जेवणंखाणं झाल्यावर त्यानी चौकशी केली .पण तेंव्हाही सख्या, भाग्या आले नाहीत म्हणजे नक्कीच कायतरी गडबड आहे. रात्री काळोखात त्याना रानभूल झाली असणार नी यायचा रस्ता सुधरला नसणार असा तर्क कोणीतरी बोलून दाखवला. पण सोबत कुत्रा नेलेला होता म्हटल्यावर रस्ता चुकण्याची शक्यता नव्हती. कोणाचीच काय मती चालेना. पण घडली गोष्ट काळजी करण्यासारखी होती. म्हणून वाडीत वर्दी देवून साताठ बापये सोबत चार पाच कुत्रे घेवून बाहेर पडले. संध्याकाळ पर्यंत शक्य झाला तेवढा टापू त्यानी चाळून काढला पण भग्या, सख्या, धकल्या कोणाचीच मागाडी लागली नाही. तेव्हा कदाचित ते वाट चुकल्यामुळे नावळ्यात किंवा कुरंगवण्यात उतर ले असतील तर आपण घरी जाई तो ते आलेले असतील . असा तर्क करीत शोधायला गेलेले झिलग़े काळवं पडताना परत आले. पण सख्या, भाग्या नी धकल्या परत आलेले नव्हते. शोधकरी रिकामे आले म्हटल्यावर बायका धीर सोडून रडायला लागल्या. उद्या गावात वर्दी दिवून पाच पंचवीस झिलगे चारी दिशानी मागावर पाठवायचा बेत वाडकरी मंडळीनी केला.
भाग्या, सख्या नी धकल्या पाऊस ओकळे पर्यंत चुकीची दिशा धरून चाल मारीत राहिलेले होते. पाऊस थांबल्यावर कुर्ल्या भाजून खाल्ल्यावर दक्षिण धरून ते गावाच्या दिशेला म्हणून चालत सुटले पण मुळात दिशामोडच चुकीची असल्यामुळे अगदी फुटक्या तिन्हीसांजेला चार कोस चाल मारून ते नावळ्याच्या सड्यावर पोचले. नावळ्याच्या सड्यावर डुकर कोंडी जवळ पोचल्यावर भाग्या सख्या ह्याना खूण पटली. नावळ्यात कुंभार वाडीत शिंद्याकडे त्यांच्या गावातली गणपत यादवाची बहीण विठी दिलेली होती. गावदर गाठल्यावर आपण वाट चुकल्या मुळे इकडे आलो. असं सांगून त्यांच्या गावातली व्हकल शिंद्याकडे दिलेली आहे तीच्याकडे आम्ही वसतीला थांबणार असे सांगितल्यावर घाडीवाडीतल्या पोरानी बत्तीत बाटलीभर घासलेट भरून बत्ती पेटवून त्याना विठी च्या घरी पोचविले. त्याना बघितल्यावर विठी अजाब करायला लागली. ते सड्यावर रात्र काढून वाट चुकून नावळ्यात आले हे ऐकल्यावर सगळे अवाक् झाले.
त्यानी कुर्ल्या भरलेली एक झाबळी विठीच्या हवाली केली. मग कडकडीत पाण्याने न्हावून परशा समोर बसून शेक घेत घेत त्यानी रात्री आलेले अनुभव सांगितला. त्यावर विठीचा म्हातारा सासरा म्हणाला, " तुमी रानभुलीत गवसलास. पयला म्हंजे तुमची दिशामोड चुकली. माका सांगा उगवत फुडो केलास तर तुमच्या डावे हातीक खैची दिशा? " त्याव र भाग्या म्हणाला " दक्षिन .... " नी त्यावर सख्या धकल्या यानीही माना डोलावल्या. बेरकी हसत म्हतारा बोलला , " मग तुमी नावळ्यात इलास ते बरोबर. त्तुमची दिशामोडच चुकली. दक्षिन उजवे हातीक नी डावे हातीक उत्तर दिशा येत, समाजला . नी दुसरा म्हंजे तुमी सांगतास तशी मनकटा एवडे डेंग़े आसलेली मोटी कुर्ली नसता..... दर्यात अगदी स्गिकस्तीची मोटी म्हंजे लयच तर इतभर रुंद आणि पायाच्या आंगट्या एव्ढे डेंगे असलेली कुर्ली कवचित दर्याच्या नस्तावर मिळता. तुमका दिसली ती पिशागत...... तो आट पायाचो चाळो. तुमची येळ बरी म्हनून बचवलास! आनी म्हत्वाची गोष्ट म्हनशा तर तुमच्या कमरेक झाबळीत हुती ती लक्सुमी, तेना राकलान तुमका . नायतर राती भेटलल्या रानभुलीत्सून शाबूत ऱ्हवणां लय कटीन........मासो ह्यो इष्णुचो अवतार नी कुर्ली बाय ती लक्सुमी......मिरगाच्या टायमाक चुकोन माकोन एकाद्री कुर्ली भटा बामनाच्या घरात रिगली तर भटणी तेका हळद कुकु लावन् तेची पाटवनी करतत. जर कमरेची झाबळी सोडून ठेवन् पिशागतीक धरूक ग्येला आस्तास तर आजचे दिवस दिसलो नस्तो तुमका ..... ! "
प्रा. श्रीराम काळे, देवगड
87667674641