Teri chunariya dil le gayi in Marathi Comedy stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | तेरी चुनरिया दिल ले गयी

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तेरी चुनरिया दिल ले गयी

तेरी चुनरिया दिल ले गयी
रोहन आणि छबुमावशी पनवेलला पोहोचली तेव्हा सकाळचे सात वाजत आलेले होते. सी.बी.एस्. समोर कर पार्क करून मावशी खाली उतरली. रिक्षावाल्याकडे चौकशी करता तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर बी.एड्. कॉलेज असल्याचं समजलं. मग समोरच्या वृंदावन लॉज समोर कार पार्क करून मावशी रोहनला उठवायला लागली. रोहन डोळे चोळीत आळोखे पिळोखे देऊ लागला. “उठ रे आता, आलं पनवेल”मावशी खाली उतरून काउंटर कडे जाऊ लागली. मॅनेजरने सुहास्य मुद्रेने स्वागत करून,“काय सेवा पाहिजे?” अशी चौकशी केल्यावर मावशीने डिल क्स रूम बुक केली. मॅनेजरने रजिस्टर मधल्या नोंदी केल्यावर मावशीने गिचमिड अक्षरात सही केली. लॉजवरच्या पोऱ्याला घेवून ती कार जवळ आली. ड्रायव्हरने डिकी उघडून आतल्या चार - पाच भल्यामोठ्या सुटकेसीस बाहेर काढल्या.
मावशी नी रोहन फ्रेश होईपर्यंत लॉजच्या पोऱ्याला घेवून ड्रायव्हर कॉलेजकडे चक्कर मारून आला. आंघोळी उरकून , चहा ब्रेकफास्ट घेतल्यावर ठीक दहा वाजता मावशी रोहनला घेवून कॉलेजकडे निघाली. बरोबर पाच मिनिटात कार कॉलेजच्या ग़ेट्मधून आत शिरली. कॉलेज नुकतंच नॅकच्या पर्वातून गेलेलं.... दुरूनच बी,एड्. कॉलेजचा मोठ्ठा बोर्ड दिसला. एरव्ही आर्टस्, कॉमर्स ,सायन्स कॉलेज, कॉम्प्युटर इन्स्टीट्युट , जुनियर कॉलेज , बी फॉर्मा- डी फॉर्मा डी.एड्. कॉलेज या सगळ्या जंजाळातून बी. एड्. कॉलेजचं ऑफिस शोधून काढणं चक्रव्यूह भेदण्याइतकं जिकीरीचं असायचं. पण नॅक मुळे अवर मोटो पासून ते स्टोअर रूम, कॅंटीन पर्यंत सगळीकडे चकचकीत बोर्ड लावलेले असल्यामुळे कॉलेजचा .वरलिया रंग' तरी भुलण्यासारखा झालेला होता. बी.एड्. चं ऑफिस उघडं होतं . पण आत सगळं सुनसान! अर्धा तास ताटकळत बसल्यावर रुबाबदार वेषातला एक गृहस्थ अॅटॅची सावरीत प्रवेश करता झाला. काउंटरच्या साईडचा दरवाजा उघडून आत गेला, खडखड आवाज झाला नी पाच मिनिटात भलामोठा किल्ल्यांचा जुडगा घेवून तो केबिन बाहेर आला.
“एक्स्क्युज मी हं...... आम्ही बी.एड्. ला अॅडमिशन घ्यायला पुण्याहून आलोय.......” मावशी त्याला म्हणाली. “ते ओळखलं मी . आत्ता अर्ध्या तासात सुपरिटेंडंट, क्लार्क, प्यून्स, प्राचार्य वगैरे मंडळी येतील.क्वालेजचं टायमिंग आकरा वाजताचं आस्तय..... तोवर बसा हितंच.....” असं म्हणून तो माणूस निघून गेला.त्याच्या मागोमाग मावशीही बाहेर जावून कॅरिडॉर मध्ये थांबली.
साधारण सव्वाअकराच्या सुमारास माणसांची वर्दळ सुरू झाली. पोरींचे घोळके मोठमोठ्या ब्रीफकेसिस नी काळ्या सुरनळ्या, नकाशांच्या गुंडाळ्या, पॉईंटर, पुठ्ठ्याचे बोर्ड असा जामानिमा सावरीत येताना दिसू लागले. अशाच एका मुलींच्या घोळक्यासमोर थांबून मावशी म्हणाली, “तुम्ही बी.एड्.च्या मुली ना गं?” फिदी फिदी हासत ,एकमेकींशी फिसफिसत त्या बोलल्या, “नवीन अॅड्मिशन वाटतं?”मावशीने मानेनंच होकार दिला. “तरीच... अहो काकू, बी.एड्.च्या मुली ना गं ? असं तुम्ही विचारलंत तेव्हाच आम्ह्ही ओळखलं की ही नवीन अॅड्मिशन आहे. कारण गुंडाळ फळे, नकाशांची भेंडोळी , तक्ते ही बी.एड्. च्या मुलींची व्यवच्छेदक लक्षणं, पोस्ट्मन, कंडक्टर त्यांचा सरंजाम बघूनच ओळखता येतात तद्वत बी.एड्. स्टुडंटस् सुद्धा त्यांच्या सोबतच्या वस्तूंवरून ओळखता येतात. तुमची मुलगी अँडमिशन घेतेय वाटतं? ”
“नाही, म्हणजे माझी भाची,म्हणजे रसिका भोबेची अॅडमिशन झालीय् या कॉलेजमध्ये....ती आत ऑफिसमध्ये बसलीय्.... आम्ही किती वेळच्या तिष्टंती करतोय् इथं. कुणी एक चौकशी करील तर नाव नाही. नशीब ऑफीस उघडं होतं म्हणून बसायला तरी भेटलं......” नाराजीच्या सुरात मावशी बोलली. त्यावर मुली बोलल्या,“ अहो, बी.एड्. साठी एकच प्यून आहे. तो बाहेरची कामं वगैरे उरकून बारा साडेबारा वाजेतो येईल. प्रिन्सिपॉल सुद्धा त्याच वेळी येतात. आत्ता एवढ्यात सुपरिंटेंडंट आणि क्लार्क येतील. तरी बरं आज लेसन डे नाहीये, नाहीतर अडीज वाजेतो सगळं सुनसान असतं. ते बघा सुपरिंटेंडंट डोके येतायत... जावा आत, अन् भेटा त्यांना. ते सगळं समजावून सांगतील. ” तेवढ्यात एक मध्यम वयाचा टक्कल पडलेला मनुष्य ऑफिसमध्ये शिरताना दिसला . त्याच्या पाठोपाठ मावशी लगबगीने आत शिरली.
सुपरिटेंडंटच्या मागोमाग रोहनला आत चलण्याची खूण करीत काउंटरच्या आत जावून त्यांच्या टेबलसमोरच्या खुर्चीत मावशी ऐसपैस बसली. रोहनकडे पहात म्हणाली, “बस ना गं रसिका. बस इथे.....” त्यावर ह्यॅ ह्यॅ करीत सुपरिटेंडंट डोके म्हणाले,“ अहो बसाना! असं लाजताय् काय.... आता बाई होणार ना तुम्ही? मग बसा की हितं खुर्चीवर....! ” बाई होणार ना तुम्ही ... ही काय भानगड आहे ते पटकन रोहनच्या डोक्यातच येईना. चपापून डोळे मिटीत खालचा ओठ दातानी चावल्या सारखा केल्यावर त्याच्या लक्षात आलं.डोकेना म्हणायचं होतं की तुम्ही शिक्षिका म्हणजे मॅडम म्हणजे शाळेत मुलाना शिकविणाऱ्या 'बाई' होणार..... पण वस्तुस्थिती अशी होती की , रोहन त्याची सख्खी जुळी बहिण रसिका बनून तिच्याऐवजी बी.एड्. करायला पनवेलला आलेला होता. अर्थात मुलीचा वेष करून ! म्हणजे डोक्यानी जे म्हटलं ते लक्ष्यार्थी नव्हतं तर अक्षरश: सत्य होतं. त्याला मॅडम व्ह्यायचं होतं नी त्यासाठी बाई म्हणूनही वावरायचं होतं. म्हणून 'बाई होणार ना तुम्ही?' असं डोक्यानी विचारल्यावर रोहन सटपटला होता. आता हे सगळं त्रांगडं कशामुळे झालं? तर सिनेमात दाखवतात तशीच ही सगळी स्टोरी घडली होती.
रोहन अन् रसिका ही जुळी भावंडं! रसिका ही टिपिकल इंडियन मुलगी. म्हणजे खूप नट्टापट्टा करायची हौस, अभ्यासात सो-सो वगैरे..... दहावीला जेतेम मार्क्स मिळवून उद्धरल्यावर ती आर्टस् ला गेली अन् रोहन डिस्टिंक्शन मिळवून सायन्सला गेला. दोन्ही भावंडांमध्ये कमालीचं साम्य . त्यात कालमाना नुसार केशभूषा, वेशभूषा हे स्त्री पुरुषांमध्ये बाह्यभेद करता येईल म्हणजे स्त्री पुरुष असा फरक येईल असे घटक! पण बॉय कट, टाईट जीन्स, लुज टी शर्ट ही दोघांचीही एकसारखी वेषभूषा असल्यामुळे बहिण‌-भाऊ यातला फरक बारकाईने- नीत निरखून बघितल्या ऩंतरच करता यायचा. तो सुद्धा आईलाच. त्यांचे पप्पा तर रोहन - रसिका यांच्यात भेद करण्याच्या फंदातच पडत नसत. दोन्ही मुलं आपलीच आहेत, त्यातला कुणीतरी एक रोहन आहे म्हणजे दुसरी रसिका असणार असं त्यांचं मत. दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी. गिफ्टच्या निमित्ताने वस्तूंचे स्वरुप , प्रकार यामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव करण्याची वेळ येते. पण हल्ली मुलं साधारण 6/7 वर्षाची झाली की त्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं नी मतं फुटतात. त्यामुळे वाढदिवसाला काही गिफ्ट वगैरे देवून आपल्या चॉईसचे वाभाडे कशाला काढून घ्या? असा भावरथी विचार करून सरळ काय ती अमाऊंट देवून ते मोकळे व्हायचे.
दोघांची कॉलेजिस वेगवेग़ळ नी दोन टोकाना . रसिका एस्.पी. ला नी रोहन गरवारेला . त्यामुळे तोही घोळ कधी उद्भवला नाही. दोघंही थ्रिल म्हणून दोन-चार वेळा अदलून बदलून एकमेकांच्या कॉलेजात जावून मित्रमैत्रिणी नी प्राध्यापकाना चकमा देवून आलेली.....रोहन प्रथमच एस्.पी कॉलेजला जावून रसिकाच्या मैत्रिणींमध्ये बिनधास्त वावरून दोन लेक्चर्स अटेण्ड करून आला. पण कुणालाही जराही संशय आला नाही. पण वरचेवर चिमटे घे, गळ्यात हात टाक , गालावरून हात फिरव असली थेरं रोहन करायला लागला तेंव्हा त्याच्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पहात रसिकाची मैत्रिण बरखा जैन म्हणाली, “काय गं रसिका, आज अगदी लाडात काम आलेलं दिसतय्.... कोई खास बात है क्या? अजूबा मिल गया क्या? ” तेव्हा मात्र रोहन सावध झाला. रसिकाला मात्र जरा वेगळा अनुभव आला. तिने रोहनच्या मित्रांच्या पाठीत वारंवार धपाटे घातले, उगाच हासत गळ्यात पडून बघितलं पण कुणीच काही प्रतिसाद दिला नाही. परत आल्यावर रसिका मात्र फुरंगटून म्हणाली, “रोहन, तुझे मित्र अगदीच 'हे' आहेत हं.... एकाने तरी माझ्या पाठीत धपाटा घालायचा होता....निदान मांडीवर चापट तरी.... कमसे कम खांद्याने हलकासा धक्का तरी द्यावा होता......छे ऽऽछे ! तुझे मित्र अगदी रिजीड नी बुद्दू निघाले यार. ” त्यावर रोहन बोलला, “अगं त्या बिचाऱ्याना काय कल्पना की तू मी नसून तू आय् मीन रसिका आहेस. अन् खरी बात अशी की असली थेरं कुणाशी करायची? समोरची व्यक्ति तशीच चार्मिंग असावी लागते. तू मुलगी आहेस हे कळलं असतं तरीही तुला बघून असलं आचरट डेरिंग कोण कशाला करील? ”
काहीवेळा रस्त्यात फिरताना कधितरी मित्र मैत्रिणी गल्लत करायचे. रोहनचे मित्र रसिकाला रोहन समजून खेचायचे. तर रसिकाची मैत्रिण 'हाय रसिका ' म्हणत रोहनच्या गळ्यात पडायची. कारण दाढी मिशांच्या बाबतीत निसर्गाने रोहनला बराच सॉफ़्ट कॉर्नर दाखवलेला. एस्. वाय्. ला असताना त्याच्या मिशा नजरेत भरण्या इतक्या वाढलेल्या . पण हनुवटी वगळता गालफडांवर दाढीचे राठ केस नव्हते आणि दाढी मिशांचा रंगही भुरकट. त्यात भर म्हणजे त्यावेळी हिंदी फिल्मी दुनियेत दाढी मिशा सफाचट करण्याचा ट्रेण्ड आलेला. त्यामुळे वरकरणी पहाणाऱ्याला रसिका नी रोहन यांच्यात भेद करणं अशक्य होतं. रसिका बी.ए. झाली नी रोहन कॉम्प्युटर घेवून बी.एस्सी. झाला. तो सॉफ्ट्र वेअर आणि हार्डवेअर दोन्ही मध्ये काहीतरी शॉर्ट टर्म कोर्सेस पूर्ण करून पप्पांच्या स्वामीकृपा ईलेक्टॉनिक्स मध्ये सेटल होणार हे जवळ जवळ पक्कं झालेलं. रसिकाचं मात्र काहीच ठरत नव्हतं. बी. ए.चा रिझल्ट लागला नेमक्या त्याच वेळी पप्पांचे एक मित्र रमणबाग हायस्कूलचे हेडमास्तर नाडकर्णी सर घरी आलेले. गप्पांच्या ओघात ते सहजावारी बोलून गेले. “अगं रसिका, तू असं का करीत नाहिस? सरळ बी.एड्. कर नी टिचर हो. तू बी.एड्. झालीस तर माझ्या हायस्कूल मध्ये तुझा जॉब शुअर आहे असं समज. ”
“शीऽऽ मला नाही टीचर व्हायचं......” नाक मुरडित रसिका फिस्कारली. पण नाडकर्णी सरांचे ती टीप रसिकाच्या मम्मीने मात्र चांगलीच मनावर घेतली.
एन.सी.टी.ई. ने मलिदा खावून खैरात केल्यासारखी बी.एड्./ डी.एड्. आणि नर्सिंग कोर्सेसना परमिशन दिल्यामुळे त्यावेळी महाराष्ट्रात बी.एड्. /डी.एड्. आणि नर्सिंग कॉलेजिसचं जणु पेवच फुटलेलं. गावोगावी नी गल्लोगल्ली पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांसारखी विना अनुदानित कॉलेजिस सुरु झालेली. मम्मीने आठवडाभरात बी. एड्. ची मोहिम सर केली. त्यावेळी नुकतच बी.एड्. प्रवेशासाठी गव्हर्नमेंट सी.ई.टी. चं खेकटं सुरू झालेलं अन् सी.ई.टी. च्या लास्ट डेट कधीच उलटून गेलेल्या. पण विना अनुदानवाल्यांचं रीटपिटिशन कोर्टाने मान्य करून त्यांना स्वतंत्र सी.ई.टी. घेवून प्रवेश करायला अनुमती दिली. त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयां मध्ये बी.एड्. प्रवेश मिळवायचा मार्ग मोकळा होता. मम्मीने सगळा विषय तिची बहीण छबू मावशी हिच्या कानावर घातला. छबू मावशी भलतीच चटपटीत. तिने दोन दिवसात सगळे सोपस्कार पूर्ण करून रसिकाला सी.ई.टी. ला बसवलं. रसिकाला बी.एड्. करायचंच नव्हतं म्हणून ती चक्क पेपेर कोरा टाकून उठली. पण मावशीने जिद्दीला पेटून पाण्यासारखा पैसा ओतून आणि लिटरावारी पदरचं पेट्रोल जाळून अशी काय टाईट फिल्डिंग लावलेली कि, आठ दिवसानी रसिका ५६ % मार्क्स मिळवून पास झाल्याचं पत्र फडकावीत गड सर करून आली.
अर्थात अजून दिल्ली दूरच होती. पुणे परिसरातल्या विना अनुदानित महाविद्यालयां मधल्या सगळ्या सीट जानेवारीतच पॅक झालेल्या. “आता कॅन्सलेशन मध्ये काही जमतं का बघुया ” असं पुण्यातल्या एक दोन संस्थानी मधाचं बोट लावलेलं. मम्मी नी छबु मावशी अ‍ॅडमिशन लिस्ट च्या झेरॉक्स घेवून अक्षरश: पायाना भिंगरी लावून फिरल्या. पत्ते वाचून त्यातल्या मध्यम वर्गीय पंधरा वीस मुलांच्या घरी जावून त्याना फी आणि डोनेशन च्या दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून अ‍डमिशन कॅन्सल करायची ऑफर दिली. हा आकडा दुपटीपर्यंत वाढवून देखिल एखादा मासाही गळाला लागला नाही. पैशाच्या जोरावर काहीही विकत घेता येतं हा त्यांचा आजवरचा भ्रम चांगलाच दूर झाला. नाराज झालेली छबु मावशी त्राग्याने म्हणाली सुद्धा, “काय बाई ही मिडल क्लासवाली माणस कर्मदरिद्री..... आयती लक्ष्मी आपल्या पायाने चालत उंबऱ्या पर्यंत आलेली ! पण याना मुळी भिकेचे डोहाळे लागलेले..... तीन - चार लाखांची ऑफर सरळ धुडकावून लावलेनी की मेल्यानी.... हयातभर पै पै करून साटःअवलेली पुंजी बी.एड्. मध्येच रिकमी होईल की . त्या नंतर नोकरीसाठी ट्राय करणार. पर्मनंट जॉब साठी हल्ली रिझर्व्हेशन कॅटेगिरी वाल्यांकडूनच तीन तीन लाख नी ओपनवाल्यांकडून आठ -दहा लाख घेतात घेतात संस्थेवाले..... एवढा खर्च झेपणार आहे का मिडलक्लास वाल्याना..... दैव देतं नी कर्म नेतं त्यातली ह्यांची गत . आमच्याकडून तीन- चार लाख घेवून पुढच्या वर्षी बी.एड्. केलं असतं तर असं काय वाया गेलं असतं यांचं..... पण खायची ही अक्कल लागते माणसाला..... ”
मग मम्मी नी छबु मावशीचा खल सुरू झाला. बराच काथ्याकूट केल्यावर अकस्मात छबु मावशीची ट्यूब पेटली. तिच्या चुलत नणंदेच्या भाचे जावयाचा साडू चा मावसभाऊ डायरेक्टर ऑफ एज्युकेशनच्या ऑफिसमध्ये कुणीतरी ( म्हणजे कुठल्यातरी पोस्टवर) असल्याचं तिला आठवलं. मग उलट सुलट फोनाफोनी करून त्याचा पत्ता मिळाला. तशी “ आज बाहेर जावा गिळायला सगळ्यानी. आम्ही आता छबुच्या मावस नणंदेच्या चुलत साडूच्या जावयाला रसिकाच्या अ‍डमिशनच्या कामासाठी भेटायला.......” मम्मीने फर्मान सोडलं. तिचं बोलणं अर्ध्यावर तोडीत छबुमावशी किंचाळली, “ ताईऽऽऽ अगं मावस नणंदेच्या नाही चुलत नणंदेच्या आणि चुलत साडूच्या नव्हे भाचे जावयाच्या साडूचा मावस भाऊ . एवढं सोप्पं नातं सुद्धा कसं लक्षात रहात नाही तुझ्या? ” त्यावर खो खो हसत मम्मी बोलली, “जाउ दे गं छब्ये.... एकून काय एकच. आऊचा काऊ नी मावस भाऊ. स्वर्ग गाठायला सूत मिळाल्याशी कारण......”
रागाने नाक फुलवून फिस्कारत छबु मावशी म्हणाली “ अस्सं काय...? रसिकाच्या जन्माचं कल्याण करणार तो म्हणे आऊचा काऊ काय? झक् मारीत गेलं तुझ्या पोरीचं बी.एड्. अन् तू सुद्धा. दहा दिवस मर मर हिंडल्ये मी त्याचं हे श्रेय काय? शेळी जाते जिवानिशी अन् खाणारा म्हणतो वातड. मी आपली जातेच कशी. आजची सोनू निगमच्या म्युझिकल नाईटची दीड ‌-दीड हजाराची तिकिटं ह्यांच्या क्लायंटस् नी दिलेली आहेत. पण भाचीच्या हितासाठी मिस्टराना नाराज करून म्युझिकल नाईट बुडवायला तयार झाले मी.” मग छबु मावशीच्या नाकदुऱ्या काढून थ्री स्टार मध्ये लंच आणि फर्निचर एक्झिबिशन मधलं महागडं डायनिंग टेबल नी खुर्च्यांचा सेट देण्याचं मान्य करून मम्मीने तिला मनवलं तेंव्हा कुठे लंच नी डायनिंग सेट च्या आशेने नव्हे पण “ रसिकाच्या आयुष्यातली मोठी संधी हुकायला नको माझ्या दुर्लक्षामुळे....” असे भावर्थी उद्गार काढून मावशी एकदाची राजी झाली.
डायरेक्टर ऑफ एज्युकेशनच्या ऑफिसमध्ये डिस्पॅच क्लार्क म्हणून काम करणारा आऊचा काऊ परचुरे ...... तो मात्र भलताच चुरचुरित नी स्मार्ट निघाला. सोळाशे स्क्वेअर फूटांच्या त्याच्या फ्लॅटचं दार उघडलं नी आत पाउल टाकताच सॉफिस्टिकेटेड लाईफ अंगात मुरलेल्या मम्मी नी मावशी अशा काही चमकल्या.... हॉल मध्ये घातलेल्या जाड्जूड कॉस्टली कार्पेटवर पाय टाकायचंही धैर्य त्याना होईना. तो हॉल म्हणजे साक्षात् इंद्रनग़रीच ...... मिठ्ठास हसत परचुरे पुढे आला नी मम्मी मावशींच्या पाया पडत म्हणाला,“ आज गरीबाची कशी काय आटःअवण आली मेधाआण्टी? ” छबुमावशीचं सासरचं नाव मेधा होतं) छबु मावशी हासून म्हणाली, “ ही माझी ताई. गेल्या महिन्यात आपण तुमचा पी.सी घ्यायला स्वामीकृपा ईलेक्टॉनिक्स मध्ये गेलेलो ना त्याचे मालक माझे जिजाजी... म्हणजे ताईचे मिस्टर.”
“हां हां . ते भोबे अंकल होय... म्हंजे माझ्या लक्षातच आलं नाही तुम्ही मेधा आण्टीच्या सिस्टर असाल असं इमॅजिनही करता आलं नाही मला .... ” परचुरे गडगडाटी हासत उत्तरले अन् मम्मी भलतीच खट्टू झाली. कारण छबु मावशीच्या मानाने मम्मी अंमळ श्यामल वर्णाची..... परिचयातली बुजुर्ग माणसं नेहमी हे वर्म काढायची. पण जावू दे... आपला कामाशी मतलब .... नी परचुरे देखिल अनवधानाने बोलून गेले असा विचार करून मम्मीने आपली नाराजी स्मितहास्यामध्ये बदलली.
रसिकाची बी. ए. ची आणि सी.ई.टी. ची मार्कलिस्ट, बघितल्यावर परचुरेनी फोनाफोनी सुरू केली. चार पाच ठिकाणी चौकश्या केल्यावर ट्रेस लागला. पनवेलला नव्याने सुरू झालेल्या एस्. एन्. डी. टी. च्या कॉलेजमध्ये चार सीट भरायच्या होत्या. रसिकाच्या मराठी जॉग्रफी मेथडची एक सीट व्हेकंट होती. मग उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. पुण्या बाहेर इतक्या लांब रसिकाला कसं ठेवायचं वगैरे...... पण वस्तुस्थितीची जाणीव करून देत परचुरेनी दोघींच प्रबोधन केलं की, ही शेवटची संधी गमावली तर वर्षभर पुन्हा संधी नाही. अ‍डमिशन डोनेशन वगैरे सग़ळं परचुरेंवर सोपवून दोघी स्वस्ठ बसल्या. परचुरेनी दुसऱ्या दिवशी सगळ्या फॉर्मालिटीज पूर्ण करून अ‍डमिशन फिक्स करायचं मान्य केलं. मम्मी मावशीच्या छातीवर्चं दडपण दूर झालं. पुढचे बेत आखीत थ्री स्टारमध्ये लंच करून रात्री साडे अकराला दोघी घरी आल्या.
परचुरेनी दिला शब्द पूर्ण केला नी दुसरे दिवशी संध्याकाळी पाच वाजता सतरा हजार रुपये फी रसीट घेवून पठ्ठ्या हजर झाला. “जाळाशिवाय कढ नाही नी नी मायेशिवाय रड नाही . म्हणतात ते अगदी खरं आहे. मी तुला म्हटलं होतं की नाही गं ताई....? आस्तिक आस्तिक म्हटल्यावर साप भिऊन पळतो तद्वत् परचुरेंचं नाव घेतलं की एज्युकेशन डिपार्टमेंट मधलं कसलंही संकट असूदे..... ते दूर झालंच पाहिजे. आत्तापर्यंत दोन केजीच्या नी सहा ज्युनिअर कॉलेजच्या अ‍डमिशन्स मी करून दिल्यायत् यांच्या मार्फत, नी त्याही अगदी चीप रेटमध्ये....! पदरचं पेट्रोल जाळून माझ्या शब्दाखातर कामं करून दिली हं जावई बापूनी.आत्ताचंच बघ ना..... माझ्या वरच्या विश्वासा खातर पदरचे पैसे लावून रसिकाची फी भरून रिसिट घेवून आले माझे जावईबापू ..... ” कौतुक मिश्रीत स्वरात छबु मावशी म्हणाली.
टर्म उशिरा सुरू झालेली असल्यामुळे दोन तीन दिवसात हजर व्हायचं होतं. हे सगळं इतक्या झटपट होईल अशी सुतराम् शक्यताही नसल्यामुळे खुशीत गाजरं खाणारी रसिका चांगलीच सटपटली. या परचुऱ्याची चामडी पोटटो स्लायशरने सोलून काढली पाहिजे आणि त्याला उकळत्या तेलाच्या कढईत घालून बटाते वड्यासारखं तळून काढलं पाहिजे....असले टेरर विचार तिला सुचायला लागले. पण लगेचच भानावर येत या कल्पना सृष्टित रमून आपलं अरिष्ट काही टळणार नाही. गनीम खिंड पार करून येण्यापूर्वी सुटकेचा मार्ग शोधायची मोहीम तिने मोबाईल वर सुरू केली. तिची मैत्रीण मानसी टिपुगडे कसल्या कसल्या भन्नाट आयडिया सुचवायची. रसिकाने सरळ तिला आपला प्रॉब्लेम सांगितला. मानसीने अगदी जालीम उपाय सुचवला. रात्री झोपताना कांद्याचे दोन काप करून ते काखेत धरून रसिका झोपली. सकाळी मम्मी तिला उठवायला आली..... पांघरूण बाजुला करून तिने रसिकाच्या डोक्यावरून हात फिरवला मात्र..... भीतीने तिचं अवसानच गेलं मुळी.
रसिकाला सणसण ऊन ताप भरलेला. डॉक्टर आले. इंजेक्शन देता देता ते म्हणाले . “सॉलिड टेंपरेचर आहे. आजचा दिवस बघुया नाहीतर उद्या तिला अ‍डमिट करूया आमच्या हॉस्पिटलमध्ये.” झालं! सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. . चार वेगवेगळ्या स्पेशालिस्टनी वेगवेगळी निदानं केली. सगळ्यांचा सल्ला मात्र एकच ..... हॉस्पिटलमध्ये अ‍ॅड्मिट करा. सगळ्या टेस्ट करुयात..... न जाणो डें ग्यु सुद्धा असायचा..... पेशंटला महिनाभर तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला पाहिजे नी कंप्लीट बेड रेस्ट हवी. दोन दिवस माणसांच सतत लक्ष असल्यामुळे रसिकाचा तापही हटला .तशातच तीन दिवसानी बी.एड्. कॉलेज वरून प्राचार्यांचा फोन आला. “मी अभिनव महिला अध्यापक महाविद्यालयाचा प्राचर्य जबडे बोलतोय्...... रसिका भोबेना ताबदतोब हजर व्हायला सांगा नाहीतर आम्ही अ‍ॅडमिशन कॅन्सल करू. ”
पुन्हा परचुरेंची पायधरणी करायला मम्मी, डॅडी नी मावशी तिघंही त्याना भेटली. परचुरेनी प्राचार्याना फोन लावला. “आधीच निम्मी टर्म संपत आलिय... अटेण्डन्स कसा काय पुरा होणार? प्रॅक्तिकल्स कधिची सुरू झालीयत. मला काहीही सबस सांगू नका. ताबडतोब कॅण्डिडेट हजर करा नाहीतर मी दुसरी कॅण्डिडेट भरणार....” या खेपेला परचुरेनी ही प्राचार्यांशी झालेलं बोलणं सांगून कानावर हात ठेवले. “आधीच जून ते मार्च अखेर जेमतेम दहा महिन्यांचा कोर्स. सप्टेंबर संपत आला. त्यांच काही चुक नाही. एकतर मोठ्या मुष्किलीने प्रवेश मिळालाय. विद्यापीठ, एन. सी .टी.ई., स्टेट गव्हर्नमेंट यांचे एवढे बॅन्स असतात की या बाबतीत प्राचर्य सोडाच खुद्द व्ही.सी. किंवा शिक्षणमंत्री सुद्धा काही करू शकणार नाहीत. आता हजर व्हायचं की अ‍ॅडमिशन रद्द करून आलेली संधी हुकवायची ते तुम्हीच ठरवा.” त्यानी उपोदघात केला. डॅडीनाही विशेष गांभिर्य वाटलं नाही. “ फारतर अ‍ॅडमिशनची अमौंट नाही मिळणार...... डॉनेशन तर आपण अजून भरलेलंच नाहीय् .... ”डॅडीनी काखा वर करून विषय संपवला.
कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला छबु मावशी चांगली घट्ट नी बेडर.असल्या फासक्या फुसक्या अडचणीना ती कुठली जुमानायला....! कसाटा आईसक्रीम चे लपके गिळताना हिंदी पिक्चरमध्येच शोभेल असा एक अफलातून जर्म तिच्या सुपिक मेंदूतून निघाला. “नाहीतरी रसिकाला हे बी.एड्. कितपत झेपेल हा प्रश्नच आहे. मनाविरूद्ध दांबळ6 म्हणून ही पोर उंडारत राहील पनवेलभर अन् फेल्ड इन एक्झाम असा शेरा असलेलं मार्कलिस्ट आणून अ‍ॅडमिशनचे सतरा हजार डोनेशनचे एक लाख आणि वर्षभर खर्चाचे लाख दीड लाख मातीत घालवील ही बया. नी जीजाजी तिचीच बाजू घेवून तुला नी मला मूर्ख ठरवतील ते वेगळंच.... ” या सगळ्यावर तिला सुचलेला हुकमी तोडगा मग तिने मम्मीच्या कानात सांगितला.
पनवेलला राहून बी.एड्. पूर्ण होईतो वाट्टेल तेवढा पॉकेट मनी आणि बी.एड्. परीक्षा होवून मार्क लिस्ट बघितल्यावर इंपोर्टेड कार एवढा मलिदा द्यायचे कबुल करून मम्मी नी मावशीने रोहनला पटवलं. ह्या मार्गातल्या अडचणी, धोके यावर तिघानीही रात्रभर पुन्हा पुन्हा खल करून मास्टर प्लॅन तयार केला. रसिकाला छबु मावशीच्या घरी हालविण्यात आलं . तिथे मावशीची जाऊ नी नणंद तिची देखभाल करणार होत्या. त्याना आणि मावशीच्या मिस्टरना ही गुप्त कटाची माहिती देण्यात आलेली होती. मग़ संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी तशी रोहनची रसिका करण्या साठी टर्किश टॉवेलची पॅडिंग बनवायला घेवून तयारी 'आकाराला' येवू लागली. सामानाची यादी तयार झाली. हेअर रिमुव्हरच्या पंधरा बाटल्या. दर एक दोन दिवसानी चेहेरा गुळगुळीत व्हायला हवा. न जाणो दाढी मिशांचे खुंट दिसले तर सगळंच मुसळ केरात जायचं नी वर नाचक्की ठरलेली. ते फक्त मुलींचंच कॉलेज असल्यामुळे एक मार्ग बिनबोभाट मोकळा झालेला. खेरिज रोहन हा थोडा चाबरट असला तरी पोरींच्या घोळक्यात गेल्यावर त्याची गोगल गाय होईल . शिंग रोखून शंगावर घ्यायला जायचं धाडस त्याला कालत्रयी जमणार नाही यावर दोघींचही एकमत झालं.
त्याची मम्मी मावशींच्या समोर दिवसभर रंगित तालीम सुरु झाली. तालीम कसली म्हणा डायरेक्ट 'शो'च सुरू झाला. पॅडिंग बांधून पंजाबी ड्रेस घालून रसिकाच्या वेषात रोहन सोफ्यावर मासिक चाळित बसलेला. घरगडी शिवा भाजीच्या पिशव्या घेवून आत आला. “आता बरं वाटतंय न्हवं ताई....?” सलामी देवून तो किचनकडे वळला न् मम्मी मावशीनी एकमेकीना टाळ्या दिल्या. संध्याकाळी डॅडी आले. “रसिका , बेटा जरा बरं वाटलं म्हणून लगेच फुशारक्या मारू नकोस. अगं अशी झटपट बरी झालीस ना तर त्या साळकाया म्हाळकाया तुला बी.एड्. च्या तोफेच्या तोंडी देतील बरं का.....चल चल, आत जावून बेडवर आडवी हो कशी....” दंड धरून ते रसिका रुपातल्या रोहनला बळे बळे उथवू लागले.
“नाही हं डॅडी, आय् हॅव मेड अप माय माईंड तू कंप्लीट बी. एड्. फॉर युवरसेक....... ” रसिका उत्तरली. आता मात्र डॅडी उडालेच. रसिकाच्या विचारातलं, आवाजातलं अन् इंग्रजीतलं परिवर्तन त्याना नाही म्हटलं तरी जरा खटकलंच. ते पुढे काही बोलणार तर तेवढ्यात दारा आड लपलेल्या मम्मी नी मावशी पुढे सरसावल्या. “खबरदार.... खबरदार.... माझ्या मुलीचा बुद्धिभेद कराल तर... बी.एड्. म्हणजे तोफेच्या तोंडी काय? आं काय हो ? बरे फाजील अहात की तुम्ही. इतके आत्ल्या गाटःईचे नी पाताळयंत्री असाल असं वाटलं नव्हतं मला. गेल्या तेवीस वर्षात माझी किती नी कशी वंचना केलीत ते मला नी परमेश्वरालाच माहिती गं बाई..... ” मम्मीने सूं ऽऽसूं करीत डोळ्याना पदर लावला.
रात्री रसिकाच्या ताप येण्यामागचं बिंग छबु मावशीच्या चलाख नणंदेने पाळत राखून उघडकीला आणलं. छबुमावशीचे मिस्टर मोहनकाका, यांच्या मित्राची ग़्रॅंण्ट रोडला कॉम्प्युटर लॅब होती. रोहनला एक्सपिरीयन्ससाठी वर्षभर ठेवायचंय असं पप्पाना सांगून पहाटे छबु मावशी रोहनला घेवून पनवेलला रवाना झाली. दुसऱ्या दिवशी छबु मावशी रोहनला घेवून पनवेलला रवाना झाली. “ बाई होणार ना तुम्ही ? ” हा डोके सुपरिटेण्डण्ट डोकेंचा प्रश्न ऐकून रोहन सटपटला असं पाहून त्याला सावरून घेण्याच्या गडबडीत अनवधानाने छबु मावशी म्हणाली,“हो ना , झालाय् ना तो बाई.....”माणसं सहजगत्या कशी फसतात ते आपल्या तोंडून नको तो उच्चार झाल्यावर मावशीच्या लक्षात आलं. मग सारवा सारवी करीत ती म्हणाली, “म्हंजे काय आहे बघा साहेब, ही रसिका अन् तिचा जुळा भाऊ रोहन दोघांमध्ये एवढं साम्य आहे ना परकी माणसं तर फसतातच पण मी हिची मावशी असूनही माझी सुद्धा फसगत होते पहा ना..... एकदा तो एकदा ती.....! आता तुम्ही एवढ्या इन्फ्ल्युएन्शियल पोस्ट्वर काम करणारे साहेब! एवढ्या मोठ्या माणसाशी मुलाखतीची माझी ही पहिलीच वेळ अन् त्यात हे जुळ्या भावंडांचं गौडबंगाल.....”
मावशीने आदराने उल्लेख केल्यामुळे डोके जाम खुलले. वस्तुत: मावशीने बोलताना केलेली गफलत त्याना उमगलेलीच नव्हती. कॉलेजच्या व्यवहारावर आपला होल्ड रहावा म्हणून चेअरमननी त्यांचा पित्त्या म्हणून डोकेना सुपरिटेण्डण्टच्या पोस्टवर बसवलेलं इतकच. खरंतर खर्डेघाशी करणाऱ्या कारकूनाचा तल्लख पणा रतिमात्रही नसलेला सुमार कॅलिबरचा डोके ! पण म्हणुनच संस्थेला पाणी जाळता येत होतं. हो – नाही असं नंदीबैला गत हलवण्यापुरतंच डोकं असलेला डोके केवळ या एका क्वालिफिकेशनवर सुपरिटेण्डण्ट पद सांभाळून होता. आय् कार्ड, इण्डिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन फॉर्म असल्या काय काय फॉमॅलिटीज पुऱ्या करून घेतल्यावर डोके म्हणाले, “आता हॉस्टेलचे पाच हजार भरा अन् रिसिट घेवून हॉस्टेलवर जा. तिथे रूम मध्ये सामान ठेवून मेसमध्ये जेवण वगैरे उरकून निवांत एक वाजेतो या. तोवर प्राचार्य साहेब येतिलच.”
आता आली पंचाईत..... हॉस्टेलवर रहायचं म्हणजे सगळं बिंग फुटणार की.... या भीतीपोटी धास्तावलेली मावशी बोलली, “पण काय हो, आम्ही प्रायव्हेट रुम घेवून बाहेर राहोलो तर नाही का चालणार? आमचा तसा बेत आहे.”त्यावर डोके म्हणाले “छे छे.... हॉस्टेल तर कंपल्सरी आहे. अहो नॅकच्या वेळी एवढा खर्च करून इंफ्रास्टृक्चर उभं केलंय् संस्थेनेते . साठ रुम्सचं तीन मजली हॉस्टेल बांधलं मॅनेजमेंटने ते कशासाठी? ” पण वस्तुस्थिती अशी होती कि, चेअरमनना त्यांचे चुलतभाऊ खासदार डांबरे पाटील यानी खासदार फंडातून साठ लाख रुपये मंजुर केलेले. तसेच सग़ळ्या कोर्सेस मधून मिळणारी दोन नंबरची रक्कम, अशा सगळ्या जिरवण्यासाठी ,तसेच चेअरमनचाच मुलगा बिल्डर असल्यामुळे बांधकामाचा नुसता सपाटा चालवलेला. संस्थेची चार हॉस्टेल्स होती पण जेमेतेम निम्म्या रुम्स भरलेल्या होत्या.
होस्टेलचा गुंता सोडवण्यासाठी मावशीने तडक परचुरेना फोन लावला. तेरेसचा कोपरा गाठून मावशीचं बोलणं सुरु असताना अकस्मात बॅलंस संपल्यामुळे मोबाईल डिसकनेक्ट झाला. परचुरेनी मी बघतो – बोलतो प्राचार्यांशी असं आश्वासन दिलेलं. प्राचार्य येई पर्यंत सहज टाईमपास म्हणून मावशी रोहनला घेवून हॉस्टेल बघायला म्हणून बाहेर पडली अन् द्रायव्हर मावशीचं रिचार्ज मारायला बाजारात गेला. हॉस्टेल बघितल्यावर मात्र मावशीचा बेत फिरला. बाहेर कुठेतरी रुम घेवून राहण्यात धोकेच अधिक. त्यापेक्षा प्रिमायसेस मध्ये एकट्यासाठी स्वतंत्र रुम घेवून रहायचा बेत रोहनलाही पटला. मग त्याच्या फोनवरून परचुरेना फोन करून मावशीने हा बेत सांगितला. “तुम्ही बिनधास्त व्हा मेधा आण्टी, तुम्ही रुम पसंत करून मला नंबर सांगा, मी डायरेक्ट चेअरमनना फोन करून ती रुम द्यायला लावतो त्याना. आपण डबल रेण्ट भरून एकटीसाठी बुककरू ती रोम, नो टेन्शन, बी रिलॅक्सड . काहीही प्रॉब्लेम आला तरी लगेच मला कॉन्टॅक्ट करा.”मग मावशीने एका बाजुची निवांत रूम नंबर हातावर लिहून घेतला.
एक वाजता प्राचार्य आले. केबिनमध्ये शिरल्या शिरल्या त्यानी कॉलबेल दाबली. शिपाई धावतच केबिनमध्ये गेला.“ भोबे आणि तिचे पालक थांबलेत ना? त्याना घेवून ये.” मावशी नी रोहन केबिनच्या दारात दिसताच, “येस ,येस कम इन ..कम इन. हार्टिएस्ट वेलकम तुमचं. नुकताच चेअरमन साहेबांचा फोन आल्ता.म्हणून तर जरा लौकरच आलो की मी. तुम्ही उभ्या कां? बसा ना. आनी तुबी बसकी गं मुली. काय नाव तुझ? आडीच म्हैने मागं पल्ड्यावर यॅडमिशन भेटली की तुमाला. एकूण धा म्हैन्याचं ट्रेनिंग असतंय हे. म्हणजे आल्या पेट्टाला पंचवीस टक्के बी. एड्. पुरं केलय् जणु तुम्ही.” हसण्याचा गडगडात करीत जबडे बोलले. “बोलता बोलता असे जोक मारायची ह्यॅबिटच आहे की हो आपली त्या पी.यल्. देशपांडे नी अत्रे ह्यांचा सारख़ी. म्हणजे त्याचं काय हाय की आपला सेंस ऑफ जोक (इथे खरं तर सेन्स ऑफ ह्युमर हा शब्द प्रयोग अभिप्रेत होता. पण त्यांचं इंग्लिशच ज्ञान त्यांच्या पी.यच्. डी. इतकंच वादातीत होतं) म्हणजे पावरबाज काम की एकदम. प्राचार्य झालो नस्तो तर म्हैन्याला चार चार ज्योक्सची पुस्तकं पाडली असती की ह्या पठ्ठ्याने... ”
“तरऽऽ” आवाजात मार्दव आणीत मावशी म्हणाली, “सर एक रिक्वेस्ट आहे आमची. रसिकाचे जरा प्रॉब्लेम्स आहेत. नुकतीच डेंग्यूतून उठलीय् ती. शिवाय श्रीमंत आई बापाची लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुलगी आहे ती. म्हणजे तसा एक जुळा भाऊ आहे तिला, पण ही म्हणजे लाडोबाच आहे कुटुंबात. रुम मध्ये तर हिची प्रायव्हसी जाणार , शिवाय अधे मधे मी किंवा हिची आई कधी हिला भेटायला आलोच तर तास दोन तास आम्ही हिच्या रुमवरच थांबणार. आता हिची पार्टनर असली तर ती कंप्लेण्ट करील ना आम्ही थांबलो तर..... ” तिला पुढे बोलू न देता जबडे म्हणाले, “जरूर जरूर! अहो त्या संदर्भातच फोन केला होता ना साहेबानी. देऊ की तुम्हाला शेप्रेट रूम. हाय काय त्यात. आम्ही पर्हेड पाच हजार वट्ट घेतो की, पण रुम मधी दोन पार्टनर असत्यात. तुमी आसं करा पाच हजार पावतीचं नी वरचे दहा हजार द्या नी ऱ्हावा की एकट्यानी. आसं करा दहा आम्हाकड द्या नी पाच डोक्यांकड देवून पावती घ्या. बरं डोके दुसरा काय विषय बोल्ले का तुम्हाकडं..... ”
मावशीने नकारार्थी मान हालवली. “तर फी तुम्ही भरलीय. आता डोनेशनचं दीड लाख भरा चटशिरी. आनी आसं बघा की डोनेशन ह्ये दाखवायचे दात, खायचे दात आजूनी वेगळे असतात. हा ज्योक नव्हे बरं, शिरयसली सांगतोय्. ”प्राचर्य पुढे सांगू लागले, “आता मुलीना वर्षभर लेसन घ्यायचे असतात. डायरी ठेवायाची असते.कार्यानुभव राहतोय्. कोलेजचं म्याक्झिन आस्तय. डस्टर,खदू, फळे, तक्ते, नकाशे,ल्येसन नोट्स्,झालंच तर ट्रीप...टुर्नामेंट – म्हंजे खेळाची हो, एन्. सी.टी. ई.चा व्यापच हाय तसा.... आता यवढ्या फ्यासिलिटी म्यानेज्मेंट डोनेशन मधून कशाकाय बाहेर काड्णार? बघा कि तुमीच.... प्राध्यापकाना पंचवीस तीस हजार रुपये पगार द्यायला लागतोय्. चार क्लार्क, पाच शिपाई ह्यांचे पगार... काय विचारू नका. शासन म्हणजे स्टेटचं आणि दिल्लीतलं कुणीच येक तांबडा पैसा नाय देत....मग आम्ही तरी सगळा खर्च कुठनं बाहेर काढणार हो? बघा की तुम्ही. म्हणून म्हटलं की खायचे दात नी दखवायचे दात वेगळे ऱ्हातात प्रायव्हेट कॉलेज मध्ये. तर स्टेशनरीचे वट्ट सात हजार भरा, त्याची पावती नाय मिळत, आम्ही वर्ष संपल्यावर स्टुडंटना हिशोब देतो त्याचा. आणि हां, तुम्ही मेठड कोणच्या घेणार/ फिल्ड कोणत घेणार? ”
मेथड फ़िल्ड ही काय भानगड आहे ? अशी पृच्छा मावशीने केल्यावर दबडे सरानी सगळं बैजवार समजावून सांगितलं. “म्हंजे शाळेत जे विषय ऱ्हातात त्यातले दोन स्टुडंट टीचर ना मेठड म्हणून घ्यायला लागतात नी पॉप्युलेशन, येनव्हायर्न मेंट, क्यॉम्प्युटर, आर.डी. ह्यातल एक फिल्ड निवडायचं स्टुडंटने.” रोहनने कॉम्प्युटर एज्युकेशन फिल्ड निवडलं. मग जबडे म्हणाले, “आता तुमची एक मेथड ज्यातून तुमची अ‍ॅडमिशन केली , मराठी मेथड ठरली आता हिस्टरी किंवा जॉग्रफी यातली एक मेथड तुम्हाला घ्याय मिळती बघा. ” हे ऐकल्यावर रोहन चांगलाच सटपटला. “ओ माय गॉड! मराठी...? छे छे सर मराठी नाय जमणार मला.... मी झालं तर अ‍ॅड्मिशन कॅन्सल करीन.... हं इंग्रजी जमेल मला अन् दुसरी मेथड जॉग्रफी चालेल. ”
हा म्हणजे मोठाच घोळ होवून बसला. अ‍ॅडमिशनची मेठड कशी बदलणार? मग मावशीने तिथूनच परचुरेना फोन लावून रसिकाला मराठी ऐवजी इंग्रजी मेथड हवी हा विषय सांगितला. मग परचुरेनी चेअरमनना फोन लावून मराठी ऐवजी इंग्रजी देण्याची गळ घातली. चेअरमननी हो म्हटलं आणि प्राचार्याना फोन लावला. “अहो जबडे , आपली मान्सं हैत की ती. परचुरे डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आमची कामं करतात... ही पोरगी त्यांच्या पाव्हण्यातली. द्या की त्यानला कंची मेठड हवी ती. कां तुमी आनी तानून धरताय् नी आमचं दोस्कं खाताय्? तुम्हाला प्राचार्य कशापायी केलंय् आमी? आपला मतलब डोनेशंगशी आसली पुळचट कामं आमापाशी आनाय लागलात तर रस्ता सुदरा तुमचा......स्टापवरचं दुसरं कंचबी भावलं बशिवतो की आमी प्राचार्याच्या खुर्चीवर ” नी त्यानी फोन कट केला. जबडे सचिंत होवून विचार करू लागले. त्यानी दोघीना ऑफिसमध्ये थोडावेळ थांबायला सांगून स्टाफ मधल्या डॉ. वळवईकर, डॉ. परांडे, डॉ. काळे याना घोळ निस्तरण्यासाठी सल्ला मसलत करण्यासाठी पाचारण केलं.
तिन्ही सिनीयर स्टाफमेंबर्सना सगळा विषय सांगून जबडे बोलले, “आता तुम्हीच बघा. ही पोरगी अ‍ॅडमिशन केल्याली मेथडच बदलून मागू लागलीय्. तीचं बी.ए. ला तीन युनिट मराठी आनि तीन आर. डी. हायेत. ही शीट कसंतरी मराटीत बशिवली मी. नी पोरग़ी इंग्रजी आणि जॉग्रफी मागायलीय . चेअरमन तर भलता नेट धरून ऱ्हायलेत इंग्रजी द्याच म्हणून. ” मग तिघानीही रसिकाची मार्कलिस्ट पाहिली, कॉलेजच्या अ‍ॅडशनची लिस्ट पाहिली, थोडा खल केला नी काळेसरनी तोडगा सुचवला "हिची आर.डी. ची तीन युनिट आहेत . हिची मराठी ऐवजी जॉग्रफीमधून अ‍ॅडमिशन दाखवूया नी सेकंड मेथड इंग्रजी देवूया. टी. वाय्. पर्यंत कंपल्सरी इंग्रजी आहे तिचं नी सेकंड मेथड तर आपल्याच हातात असते ..... काही अडचण नाही यायची. ”तिघानाही हा तोडगा पटला नी ते निघून गेले.
मग जबडेनी दोघीना बोलावून घेतलं. “आता हे बगा, चेरमनच्या शब्दाखातर नियम बाजूला ठेवून तुम्हाला इंग्रजी नी जॉग्रफी मेथ्ड दिलिया मी. ह्ये मोठं ट्येन्शन केलंय की तुमी आमच्या डोक्याला. ” त्यावर मावशीने रोहनला बाहेर जायची खूण करीत पर्स उघडली. दहा हजाराचं बंडल काढून देत ती बोलली, “हे घ्या! चेअरमन सायबाना पोच करा . नी रसिकाच्या डॅडिंची ईलेक्ट्रॉनिक शोरूम आहे. रोज दहापंधरा कॉम्प्युटर्स जातात , पुढच्या खेपेला एक उत्तमपैकी लॅपटॉप आणून देते कॉलेजला. ” त्यावर जबडे म्हणाले, “ठीक आहे. मी बघतो पुढं कसं काय म्यानेज करायचं ते, तुम्ही बिनघोर जावा. डोनेशनची रक्कम रक्कम डोकेंकडं जमा करा . ” किंचीत दम घेत जबडे म्हणाले, “आजून एक गोस्ट आयका. आधीच अ‍ॅडमिशन लेट झालीया. सगळी प्रॅक्टिकल पुरी करायची हईत. तवर टर्मिनल येतीय की. आता या गडबडीत पोरगी अभ्यास आणि केव्हा करणार? म्हंजे माखा काय आग्रह नाही पण चांगल्या नोटस् मिळवून देतो मी. मालिनी सिंहांच्या नोटस् वाचून सम्दे बी. एड्. स्टुडंट पास होतात. त्यांचं युनव्हर्सिटी लेव्हलला पेपर सेटर पर्यंत कनेक्श्न असतय. पाच पेपर नी दहा सेक्शन , म्हंजे दहा विषयांचे अडिजशे प्रमाणे अडिज हजार होतात. मी हिचं नाव नी मेथड फिल्ड लिहून ठेवतो. ”
हो – नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मावशीने पैसे काढून दिले. मग डोनेशनचे पैसे डोक्यांकडे जमा करून मावशी नी रोहन बाहेर पडले. दोघानाही कमालीची भूक लागली होती. कॅन्टिनमध्ये यथेच्छ पोटपूजा करून त्यानी सामानासह होस्टेल गाठलं. रूम ची जुजबी साफसफाई करून मावशीने सगळं सामान शिस्तीत लावून दिलं. कसं वागायचं, काय काय खबरदारी घ्यायचे हे पुन्हा पुन्हा ऐकून रोहन ज्याम बोअर झालेला. पण इम्पोर्टेड कार आणि बहिणीचं हयातभरचं कल्याण यासाठी सगळं मुकाटपणे सहन करणंच भाग होतं. शिवाय नेहेमीच्या एकसूरी बेचव आयुष्यापेक्षा एक वेगळाच थ्रिलींग एक्सपिरियन्स मिळणार म्हणून एक्साईटमेंटच्या भरात तो हो म्हणून मोकळा झालेला , पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र तो पुरता हडबडून गेलेला .... पण ऐन युद्ध सुरू झाल्यावर नामर्दा प्रमाणे कच खावून माघार घेणारांपैकी रोहन नव्हता. त्याने अत्यंत संयमाने धैर्य गोळा करून जीवाचा कान करून छबुमावशी देत असलेल्या सूचना हृदयात साठवून ठेवल्या. झालंच तर मुलींच्या सहवासात रहायला मिळणार ही बाब सुद्धा दिलासा देणारी होती.
साधारण सव्वापाच वाजले आणि मुलींचा घोळका होस्टेलवर जमायला लागला. काही मुली त्यांच्या रुमवर आल्या. कोण ,कुठली, मेथड – फिल्ड कोणतं या चौकशा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात एकेक अद्भुत माहिती मिळू लागली. मालिनी सिंहांच्या नोटस् होलसेल रेट्मध्ये प्रती नग मिळतात. पण प्राचार्य त्या छापिल किंमतीला विकून प्रतीमागे शंभर रुपये कमिशन मिळवतात. दिलेली स्टेशनरी कशी थर्ड क्लास आहे...... पांढरे खडू एवढे कडक की फ्ळ्यावर उमटतच नाहीत. उलट रंगीत खडू एवढे ठिसूळ की कॉलेज कडून दिलेल्या बॉक्समध्ये एक खडू अखंड मिळेल तर शप्पथ. लेसननोट न्यूज रोलच्या पेपरवर छापलेल्या, त्यावर पाठपोट लिहिलं की सगळी धुरकट खिचडी होते. रोहन जादा बोलायच्या फंदात न पडता केवळ मान डोलावून नी मोठ्या सायासाने हसरा चेहेरा करून मूक प्रतिसाद देत राहिहा. एक गोष्ट मात्र खरी की, त्यासोंग नि:संशयपणे बेमालुम वठलं होतं. आलेल्या मुलींपैकी एक जिशा फर्नांडिस.... तिला चक्क नजरेत भराव्या इतपत मिशा होत्या. झालंच तर सुचेता व्हटकर....तिच्या हाता पायांवर चक्क अर्धा इंच लांब काळी लव होती, नी आवाजही पुरुषा सारख़ा भसाडा होता. सुरेखा रांबाडे तरदिसायला चक्क पुरुषा सारखी राकट ...नी बाकी रेश्मा मिसाळ, विशाखा फलटणकर , मोहिनी साळवी या मात्र तशा बऱ्यापैकी. पण मुद्दाम्हून बोलावं असं वाटण्याइतकी चार्मिंग एकही मुलगी नव्हती.
रात्री मेसवर न जेवता रोहन छबुमावशीबरोबर बाहेर दिनर घ्यायला गेला. एक बरं होतं की पुण्यात अगदी एखाद्या खाजगी लेडिज गेस्ट हाऊसला किंवा कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहिलं तरी सात वाजल्यानंतर बाहेर रहायचं नाही असला काही बॅन नव्हता. गेटवर वॉचमन जुजबी चौकशी करायचा इतकच. मुलांची होस्टेल्स इथून खूप लांब प्रिमायसेसच्या दुसऱ्या टोकाला होती. त्यांची स्वतंत्र मेस कॅंटिन ही होतं. पण कोणीही कुठल्याही कॅंटिनमध्ये जायची मुभा होती. रात्री रोहनला होस्टेलवर सोडून मावशी पुण्याला रवाना झाली. रोहनने रुम बंद करून सगळा सरंजाम उतरला आणि फोरस्वेअरचं पाकिट उघडून दोन सिगरेटींचं धुरकाट काढल्यावर तो रिलॅक्स झाला. रात्री मस्त झोप झाली. सकाळी कोणीतरी दरवाजा खटखटावला. .... आयला काय वैताग आहे सकाळी सकाळीच असं पुतपुटत दाराकडे निघताना खुर्चीत पडलेलं पॅडिंग पाहून तो एकदम भानावर आला. “थांब हं जरा मी चेंज करतेय.....” प्रसंगावधान राखून तो म्हणाला.
“अगं मग त्यात काय एवढसं.... मुलींच तर हॉस्टेल आहे हे .... इथं दुसरं कोण कशाला येईल....? दार उघड लवकर....” बाहेरून आवाज आला. ठाकठिक होवून रोहनने दार उघडलं. “मी वैशाली दळवी, इथून दोन रूम सोडून पलिकडे राह्ते मी. अगं काल बाथरूमची खिडही उघडी राहिली नी उंदरानं माझा साबणच नेला की गं.... आता सोप न लावता वॉश कसा घेणार...? तू कालच आलीस म्हणताना तुझ्याकडे नक्की एक्स्ट्रा सोप मिळेल म्हणून आले मी. खरं तर मी मोती सॅण्डल शिवाय दुसरा सोप नाही वापरत. पण अडली वेळ म्हणजे कसलं काय घेवून बसलीस...” रोहन आवाक् होवून पहातच राहिला. गोरीपान, लांबसडक केस, टपोरे डोळे, चिंचोळी जिवणी , लाल चुटुक ओठ..... आयला ही चिकनी पोरगी फिल्म लाईनला जायचं सोडून मास्तरीन बनायला कशाला आली...... ही बॉलीवूडला गेली तर माधुरी -अ‍ॅश सकट सगळ्यांची छुट्टी करून टोप्ला जाईल की... एकदम क्युट जेम..... अरे सोप तो क्या जान कुर्बान कर देंगे तुमपर ... असं मनातल्या मनात म्हणत , “दे ते हं.... हायक्लास इंपोर्टेड सोप आहेत माझ्याकडे .” असं म्हणत टेबलवरची एक सूट्केस कालजीपुर्वक उघडून आतले दोन तीन वेग्वेगळ्या ब्रॅण्डचे सोप त्याने वैशालीसमोर टाकले. “मला एकच ब्रॅण्ड कायम वापरायला आवडत नाही. ” हे बघ वैशाली, मी चटकन ब्रश करते. तोवर तूही वॉश घे अन् मग आपण कॅंटिनला जाऊया कॉफी घ्यायला. ”
वैशालीने सोप हुंग़ून पाहिले नी त्यातला एक सोप घेवून ती निघून गेली. ब्रश करता करता रोहन विचार करू लागला. ही पोरगी साली टॉप आहे नी इनोसंट सुद्धा. अशा पोरीला घोळात घेवून गंडवणं एथिकली बरोबर नाही. दुसरं म्हणजे पहिल्याच दिवशी इतकी सलगी करून पुढे मजल गेली तर..... ती एकसारखी इथे रूमवर येवून तासन् तास बसू लागली तर....... छे छे .... इथे रूमवर कोणालाही फार वेळ एंटरटेन करणं म्हणजे आपला खड्डा आपणच खणण्यासाखं आहे की....! कुणाशीही जेवढ्यास तेवढे संबंध ठेवायचे. कुणाला तोडायचं ही नाही नी चिकटेल इतकी अती सलगी ही होऊ द्यायची नाही. तरी बरं , आपण वेळीच सावध झालोय्.... खळख्ळून चूळ भरून तोंड पुसून रोहन बाथरूम बाहेर पडला आणि कॉट खाली पडलेली सिगारेतींची राख दिसली. ओ माय् गॉड ......वैशालीच्या लक्षात आलं असेल का? पोरी सिगरेट ओढीत असतील का? क्वचित एखादीने मजा म्हणून असेलही ओढलेली....पण इतकी राख? आयला पोरगी म्हणून वावरायचं म्हणजे भलतंच अवघड काम आहे.
मग वैशालीला टाळून तो एकटाच कॅंटिनला गेला. चहा घेवून परत येताना वैशाली रोमच्या दारातच उभी दिसली. रोहन उर्फ रसिका कडे बघून हसतच ती म्हणाली,“अगं, मी आत्ताच सगळं आवरून तुला हाक मारायला येणार होते.” त्यावर रोहन बोलला,“ अं ...हो म्हणजे मला चहाची तल्लफ अगदी आवरेना.... म्हटलं तुझ आवरायला नाही म्हटलं तरी अर्धातास तरी जाणार.... मग गेले एकटीच....सॉरी हं” वैशाली म्हणाली, “अगं आत तर ये ना..... ” त्यावर रोहन म्हणाला,“ आता जाते मी...माझं अजुन सगळं आवरायचं आहे, ” तशी त्याचा हात धरून आत खेचीत नेत कॉटवर बसवून वैशाली बोलली,“ आत्ता तर कुठे आठ वाजताहेत. दहा वाजता जेवायला जायचं. अजून अवकाश आहे.”
तो बसल्यावर तिने पर्स उघडली आणि अठ्ठेचाळिस रुपये मोजून देत म्हटलं, “ हे सोपचे पैसे.... मस्तच आहे गं तुझा सोप.” ओशाळून रोहन म्हणाला, “तुझीही कमालच आहे हं .... सोप तो काय नी अगदी लगेच पैसे द्यायला हवे होते का? ” पैसे तिथेच कॉटवर टाकीत रोहन उठला. तेंव्हा पैसे त्याच्या हातात कोंबीत वैशाली म्हणाली,“अगं तू आयत्यावेळी दिलास हे थोडं झालं का?”
रूमवर गेल्यावर गीझर सुरु करून त्याने हनुवटीवर आणि मिशीच्या जागी हेअर रिमूव्हर चोळलं . मनसोक्त आंघोळ करून चेहेऱ्यावर निविया क्रीम लावून पावडरचा प फ मारला. ओठावर हलके लिपस्टिक फिरवली. व्यवस्थित पॅडिंग बसवून पंजाबी ड्रेस चढवला. सगळं ठाकठीक झाल्यावर चंदेरी दुनिया वाचीत बसला. बरोबर पावणे दहाला पर्स लटकावून त्याने मेस गाठली. त्याच्यासमोर मेसबॉयने ताट ठेवल तेंव्हा हळू हळू मेस भरायला लागली. जेवताना त्याचं सूक्ष्म निरीक्षण चालू होतं. त्याच्या समोरच बसलेली प्रिती .... (तिची पार्टनर सारखं प्रिती प्रिती करीत होती त्यावरून तिचं नाव रोहंला समजलं...) काय बोअर आवाज होता तिचा. आता निसर्गानेच तिला स्त्रीत्व बहाल केलं होतं म्हणून तिला पोरगी म्हणणं भाग होतं.....एरव्ही तिचा आवाज ऐकून ती स्त्रा आहे यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. तसंच कॉर्नर्च्या टेबलवरची ती बॉय कट केलैली लुकडी मुलगी ... ती तर अक्षरश: मुलीचं सोंग घेऊन तर आली नसेल ना अशी त्याला शंका आली. अर्थात तसं असणं शक्य्च नव्हतं पण आपल्या इतकीच तिलाही पॅडिंगची जरुरी आहे असंच त्याला वाटून गेलं.
जेवल्यावर प्रिमायसेस मध्ये चक्कर मारून अकरा वाजता तो कॉलेवर गेला. लेक्चर हॉल मध्ये सगळ्यात पुढच्या बेंचवर बसायचं त्याने ठरवेललं. खरंतर असलं डेरिंग सहसा कुणी करीत नाही. अ‍ॅकॅडेमिक कॉलेजिस मध्ये वर्गात प्रत्येक रांगेतली पुढची दोन तीन बेंचिस कायम रिकामी असतात. पण आरंभीचे काही दिवसतरी त्याला कुणाशी फारसा संपर्क ठेवायच नव्हता म्हणून त्याव्ही ही युक्ती होती. पण लेक्चरहॉलमध्ये प्रवेश केल्यावर त्याला एकदम उलटं चित्र दिसलं. पुढची सगळी बेंचेस फुल झालेली. बी.एड्. कोर्स मध्ये ते एक तंत्रच असतं. आपण फार सिन्सीअर आहोत असं जो तो दाखवीत अस्तो. सरांच लेक्चर सुरू असताना ते तद्दन रटाळ असलं तरी डोळे मोठे करून मध्येच भुवया उंचावून आपण काही मौलिक ज्ञान घेत आहोत असं भासवावं लागतं. मध्येच वहीत काहीतरी टिपून घेत असल्याचं नाटक करायचं असतं. हे सगळं एवढ्याच साठी की, बी.एड्. मध्ये क्लास मिळणं इंटर्नल असेसमेंटवर अवलंबून असतं. त्यासाठी प्राध्यापकाना खुष ठेवावं लागतं. ते खुष असले तर तोंड बघून कां होईना ते हात सोडून मार्क्स देणार.... वर्षाखेरीला होणारी युनिव्हर्सिटी एक्झाम ही निव्वळ फॉरमॅलिटी असते.
रोहनला या गोष्टी अजून समजायच्या होत्या. तो रो मधून मागे निघाला. शेवटच्या बेंच वरची मुलगी त्याला बघून बाजुला सरकली तेव्हा त्याला नाइलाजाने तिच्या बाजूला बसणं भाग पडलं. बेल झाली नी मुली उठून उभ्या राहिल्या. “ एक साथ प्रार्थना शुरू कर.....” स्पोर्टस् रिप्रिझेंटेटिव्ह ने ऑर्डर दिली. मुलीनी हात जोडून “ हंस वाहिनी सरस्वतीच्या पद कमली रमते ” प्रार्थना सुरू केली. त्यानंतर राष्ट्रगीत - प्रतिज्ञा झाली. पुन्हा एक टोल झाला नी मुली खाली बसल्या. त्यानंतर हळू आवाजात कुचकुचणं सुरू झालं. दहा मिनिटानी फडतूस चेहेऱ्याचा , जुना चुरगळलेल शर्ट पॅंटित कसातरी कोंबून इन शर्ट चा आभास केलेला , घामाने डबडबलेल्या चेहेऱ्यावरचा घाम बोटानी निपटून बाजुला छिडकावीत दुसऱ्या हातात खडू,डस्टर नी लेक्चर रेफरन्सचे कागद सांभाळीत कुणी प्राध्यापक प्रवेशते झाले. “गुड मॉर्निंग सर” मुलीनी उभं राहून सलामी दिली. . हातातलं डस्टर,खडू , कागद टेबलवर ठेवून सर म्हणाले, “सेम टू यू ...सिट डावन्” सगळ्या वर्गावर नजर फिरवीत ते टेबलच्या पुढे येवून म्हणाले..... “तर मग मागच्या तासाला आपण कुठवर आलोहोतो बरं....... हां मूल्यमापनाचे प्रकार....... ” मग त्यानी फळ्यावर एक वेडा वाकडा त्रिकोण काढला . त्यात लिहीलं मूल्यमापन. “तर फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह मूल्यमापन हे दोन प्रकार आहेत. बरं आज न्यू कमर कोण? कालच्याला नवीन अ‍ॅड्मिशन झाल्याचं वळवईकर बोलले होते” रोहन कडे अंगुली निर्देश करीत ते पुढे म्हणाले, “ हं बाळ उभी रहा बरं . काय नाव तुझं? कोलेज कोणचं? मेथड कोणच्या ? फिल्ड कोणचं घेतलं?”
नाव, कॉलेज, मेथड , फिल्ड सांगून रोहन खाली बसला. बाजुची मुलगी रजनी भोई (वहीवर ठळक अक्षरात नाव लिहीलेलं होतं) रोहनला म्हणाली ,“ हे घाटपांडे सर. यांचे आठवड्यात दोन पिरियड होतात . आज महिना होवून गेला. दरवेळी हा असा त्रिकोण काढतात नी मग अवांतर गप्पा सुरू. मूल्यमापनाच्या दोन व्याख्या झाल्या फक्त त्यापुढे काही गाडी जात नाही सरांची.....” रसिका ने एस् . पी. कॉलेज सांगितल्या मूळे पुणे हे सूत्र धरून आपण आदर्श कॉलेजला एम्. एड्. कसं केलं त्या गप्पा सुरू केल्या. मध्येच पुण्यातल्या काही खवचट दुकानदारांचे किस्से सांगितले. त्यात तास संपला नी अटेण्डन्स घेवून सर वर्गाबाहेर गेले.
घाटपांडे बाहेर गेले नी पर्वते मॅडम आल्या. त्यानीही अटेण्डन्स घेतला नी शालेय व्यवस्थापन मधला वेळापत्रकाचे प्रकार हा टॉपिक सुरु केला. पहिल्या दोन चार वाक्यातच त्यांचा आवाज तापत तापत टिपेचपर्यंत गेला. चिडक्या कर्कश आवाजात अक्षरश: किंचाळल्या सारख़ं बेंबीच्या देठापासून जोर काढून त्या बोलत राहिल्या. मध्येच आवाज फाटला की, दोन चार वाक्यं मध्यम लयीत बोलून दम खाल्ल्यावर पुन्हा त्यांचं किंचाळणं सुरू होई. तास संपल्याची बेल होवून पाच मिनिटं झाली तरी त्या थांबण्याचं चिन्ह दिसेना. कुणीतरी हळूच म्हणालं, “मॅडम , बेल झाली , आता शॉर्ट रेसेस आहे.” त्यावर वैतागत मॅडम म्हणाल्या, “ मी ऐकली बेल पण हापॉईंट प्रा करूनच मी थांबणार आहे. हे आर्टस् कॉमर्स कॉलेज नाही..... बी.एड्, आहे एथे रात्र थोडी सोंग फार अशी गत असते. हा मोठा पोर्शन नी आठवड्यात अवघी दोन लेक्चर्स.. उद्या पोर्शन पूर्ण नाही झाला तर तुम्हीच उलट्या तक्रारी कराल.......”
चौथ्या लेक्चर नंतर मायक्रो टिचींग साठी ग्रूप प्रमाणे आपापल्या वर्गाकडे निघाल्या. प्रत्यक्ष शिकविताना मुद्देसूद स्पष्टीकरण करणं, फलकावर महत्वाचे मुद्दे लिहीणं, प्रश्न विचारणं, मुलांचा प्रतिसाद मिळवणं ,लेसनची आकर्षक सुरुवात करणं ही काही महत्वाची कौशल्यं असतात त्यांचा सराव मयक्रो टिचींग़ मध्ये करायचा असतो. लेट अ‍डमिशन झालेल्याना पूर्वीच्या ग्रूपमध्ये विभागून टाकले लं. रोहनला ५ नंबरचा ग्रूप मिळाला. प्रश्न कौशल्याचे पाच पाच मिनीटांचे छोटे पाठ सुरू झाले. तीन चार मुलींचे पाठ बघितल्यावर आपल्याला हे जमेल असं रोहनला वाटलं म्हणून तो खराडे मॅडमना म्हणाला, “मॅडम मी घेऊ का पाठ?” आश्चर्याने भुवया उंचावीत मॅडम म्हणाल्या, “तू? जमेल तुला? हे बघ रुपाची लेसन नोट आहे ती पहा. तसं कच्चं टिपण करून ते मला दाखव नी मग घे लेसन.” रोहनने व्हिलेज फेअर हा घटक निवडून तेरा चौदा प्रश्नांची मालिका तयार केली नी मॅडमना कागद दाखवला. त्यानी टाचण तपासलं. “वा छान काढलीस हं लेसन नोट. आता सुरू आहे तो लेसन झाल्यावर तुझ्या लेसन नोटप्रमाणे घे पाठ.”
रोहनचा पाठ सुरू झाला.पॉलिश्ड इंग्लिशमध्ये त्याने सुरूवात केली. प्लॅन प्रमाणे नऊ प्रश्न पूर्ण झाले . पाच मिनीटांची निर्धारित वेळ संपली नी मॅडमनी लेसन थांबवला. मग फीडबॅक सुरू झाला. “ छान झाला रसिकाचा पाठ. प्रश्न विचारताना स्ट्रेस, टोन, पॉझेस, इंटोनेशन ही कौशल्यं चांगली जमली तिला. आता पुन्हा लेसन घेताना फक्त दहा प्रश्नांचं टार्गेट ठेव. ग्रुप मधल्या सगळ्या मुलीनी हे उदाहरण घ्या. रसिका आजच जॉईन झालेली. पण तिने लक्ष पूर्वक निरीक्षण करून परफेक्ट लेसन घेतला. नाहीतर या आधी तीन तीन स्किल्स चे लेसन घेतलेल्या मुली अजून खंडीभर चुका करतात. रसिका सारख़ं अ‍लर्ट असलं पाहिजे.”
चार दिवसानी प्रत्यक्ष शाळेत जावून मुलाना शिकवायचं 'प्रक्टिस टिचींग़चं' नियोजन जाहीर झालं. रोहनला सातवीवर भुगोलचा पाठ लागलेला होता. चार दिवस भरपूर कष्ट घेवून त्याने चांगली कसून तयारी केला. वैशालीची सुद्धा भुगोल मेथड असल्याने त्तिची ही मदत मिळाली. इतर चार पाच मुलींनी त्यांना लागलेल्या घटकांची कशी नियोजनं केलीत तीही नजरे खाली घातली. लेसन प्लॅन च्या नमुन्या प्रमाणे त्याला मिळालेल्या 'नदीचे कार्य' या घटकाचे प्लॅन त्याने बनवले. रात्री डिनरच्या वेळी, “प्लॅन प्रमाणे प्रत्यक्ष लेसन कसा घ्यायचा ते जरा मला समजून सांग” अशी वैशालीला गळ घातली.
वैशालीने त्याचा प्लॅन वाचला नी वर्गात गेल्यावर काय करायचं, फळ्यावर काय लिहायचं, कोणती चित्रं नी तक्ते वापरायचे ते नीट समजून सांगितलं. त्याप्रमाणे रोहनने दहा मिनीटं रंगीत तालीम करून दाखवली. मग वैशाली म्हणाली, “लायब्ररीत काही चार्ट मिळतील ते बघ. नाहीतर पुस्तकात जी रेखाटणं दिलीत तशी फुल साईज ड्राईंग पेपवर वर काढून ती पुठ्ठ्यावर चिकटवून वापरली तरी चालतात. तासाच्या शेवटी जे प्रश्न विचारणार ते गुंडाळ फळ्यावर व्यवस्थित लिहून ने. म्हणजे वर्गात आयत्यावेळी गोंधळ होणार नाही. आणि हे बघ लेसनला साडी ब्लाऊज हा ड्रेसकोड आहे. कदाचित लेसनपूर्वी युनिफॉर्मची साडी मिळेल. ”
लेसनला साडी कंपल्सरी आहे हे ऐकताच त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याचं डोकं सुन्न झालं. वैशाली गेल्यावर त्याने लगेच छबु मावशीला फोन लावला. “अग़ं मावशी , एक लफडं झालं बघ.... चार दिवसानी आमचे शाळेमध्ये पाठ लागलेत नी पाठाला साडी कंपल्सरी आहे. साडीची ही भानगड आपण विसरलोच की.....” त्यावर खळखळून हसत मावशी उत्तरली, “ तू घाबरू नकोस उद्या तुझ्या मम्मीला घेवून मी येते पनवेलला.” ठरल्या प्रमाणे सकाळी साडे नऊलाच मम्मी नी मावशी होस्टेलवर आल्या. मग साडी नेसायचं प्रक्टिकल झालं . मावशी मम्मी यापैकी कुणाचाच ब्लाऊझ रोहनला होईना. मावशी बोलली ,“तू काळजी करू नको. आम्ही संध्याकाळ पर्यंत अर्जंट ब्लाऊज शिवून आणतो.”
लेसन डे च्या दिवशी भरपूर मेहनत घेवूनही साफाईदार साडी नेसणं काही त्याला जमलं नाही. रूम बंद करून बाहेर पडल्यावर इतर मुलींकडे बघितल्यावर मात्र त्याने सुटकेचा श्वास सोडला. बहुसंख्य मुलीनी साड्या कशातरी गुंडाळलेल्या होत्या. त्याच्या सोबत लेसन असलेल्या प्रतिक्षा रानडे, अर्पिता चव्हाण याना तो म्हणाला,“ मला अजून पनवेलची फारशी माहिती नाही. आपण रिक्षा करून सोबतच जाऊया. भाडं मी भरीन, तुम्ही कॉन्ट्रिब्युट नका करू, फक्त मला कंपनी द्या.” त्यावर दोघीही खुशीने तयार झाल्या.त्या शाळेत पोचल्यावर दहा मिनीटानी प्रार्थना झाली नी तास सुरू झाले. त्याचा पाठ चौथ्या पिरीयडला होता. त्यापूर्वी इतरांचे पाठ बघितल्यावर रोहन निश्चिंत झाला. त्यांच्या पेक्षा आपण नक्की चांगला पाठ घेवू याची त्याला खात्री पटली.
रोहनचा लेसन सुरू झाला. ऑब्झर्वेशनला पर्वते मॅडम आलेल्या. रोहनने प्रथम फलकावर विषय, पाठाचं शिर्षक लिहीलं आणि शिकवायला सुरुवात केली. दोन चार्टस्, नकाशा, चित्रं अशी भरपूर साधनं वापरल्या मुळे सगळ्या वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. रोहनने नियोजना प्रमाणे अध्यापन केलं. फळ्यावर महत्वाचे मुद्दे लिहिलं. अ‍ॅलर्ट राहून वेळेत पाठातल्या सगळ्या स्टेपस् कव्हर केल्या. सुरुवातीला पर्वते मॅडम आणि चार पाच सहाध्यायी ऑब्झर्वेशनला बसल्यामुळे त्याला जरा दडपण आलेलं पण पाठ सुरू झाल्यावर ते आपोआप दूर झालं. बेल झाली आणि गृहपाठ देवून रोहन वर्गाबाहेर पडला.
कॉलेजजवळ स्टुडण्टस् बुकडेपोमध्ये चित्रं , तक्ते , नकाशे विकत मिळत. शिवाय पुस्तकात असलेली चित्रं तिथे कॉम्प्युटरवर मोठी करून प्रिंट मिळत असे. रोहनने आपल्या पाठाला लागणारी सामग्री खर्चाची काचकुच न करता जमवलेली. त्यामुळे त्याचा पाठ चांगला झाला. पर्वते मॅडमनी किरकोळ एक दोन सुचना दिल्या पण त्याचं खूप कौतुकही केलं. रोहनच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. आपल्याला बी. एड्. सहज जमेल. आपण ईझिली फर्स्ट क्लास स्कोअर करू असा कॉन्फिडन्स आला. पहिलाच लेसन सुपरटॉप झाला म्हणून बरोबरच्या सर्व मुलीनी रसिकाच्या मागे लागून कोल्ड्रिंक वसूल केलं . लेसन पूर्ण करून तो, रानडे नी चव्हाण रिक्षाने कॉलेजवर पोचली. रिक्षा थांबता क्षणीच चव्हाण खाली उतरून मागे वळूनही न पाहता चालत सुटली. पण रानडेने रिक्षाचं भाडं द्यायला पर्स उघडली. अर्थात तिच आधीच रोहनने भाडं दिलं. तरीही रानडे दोघींची कॉंन्ट्रीब्युशन घ्यायचा आग्रह करीत होती. पण रोहनने पैसे घेतले नाहीत.
कॉलेजचं रुटीन आता रोहनच्या चांगलंच अंगवळणी पडलं. सुरुवातीला आठ दहा दिवस उद्दिष्टं, स्पष्टीकरण, अपेक्षित वर्तन बदल ही बी.एड्. मधली ठरलेली 'परवचा" काही केल्या डोक्यात शिरायची नाही. ऑल रोडस् लीड तू रोम या चालीवर प्रत्येक विषयात काही ठराविक शब्द प्रयोग कॉमन असल्यामुळे भलतीच गल्लत व्हायची. पण हळू हळू सगळं काही आपोआप उलगडत गेलं. रोहन रात्री दीड दीड वाजेतो जागून वाचन करी. त्याची चांगली तयारी झाली. वर्गातल्या हुषार मुलींच्या मालिकेत त्याची मोजदाद व्हायला लागली. त्याच्या लेसनची तर भलतीच तारीफ़ सगळेच प्राध्यापक करायचे. आता मात्र काही मुली त्याच्यावर राजरोस जळायला लागलेल्या. त्यांचं टॉण्टिंग यावरून त्यांची जेलसी लक्षात यायचे. पण बिनधास्त पुरुषी खाक्यामुळे तो फ्रेश रहायचा. उलट यामुळे बहुसंख्य मुली फटकून दूर रहात. कोणाशी फार जवळीक करायची नाही हे त्याचं उद्दिष्ट त्यामुळे आपोपाप सफल झालं. मात्र कॅंटिन मध्ये चहा नाष्टा घेताना टेबलवर ज्या कोणी सोबत बसलेल्या असत त्यांच बील मात्र तो निक्षून पेड करीत असे. रुमवर गप्पांसाठी आधी फारसं कुणी येतच नसे. तरीही कारणपरत्वे कुणी मुली आल्याच, मग भले वैशाली ही असूदे चार - पाच मिनीटांपेक्षा जास्त एंटरटेन करायचं नाही हे पथ्य तो कटाक्षाने पाळायचा.
वैशाली प्रमाणे रुबी, डायस, प्रतिक्षा, मृणालिनी देसाई, अर्चना मोहिले , विशाखा फलटणकर या होस्टेल वरच्या काही मुलींशी त्याची चांगली गट्टी जमायची, लेसन नोटस्. टिचिंग एडस प्रिपरेशन मध्ये तो सगळ्याना मदत करायचा. विशाखा, दीपा, मूणालिनी या खरंतर सायन्स फॅकल्टीच्या .... पण मॅथॅमॅटिक्स, फिजीक्स, केमिस्ट्री या विषयातली त्याची हुषारी त्यांच्याही नजरेत भरायची. “रसिका, तू आर्टस् साईड ऐवजी सायन्सला जायला हवं होतं. तू उगाचच आर.डी. मराठी असले फालतू विषय घेवून बी. ए. केलंस. निदान इंग्लिश तरी घ्यायचं होतस..... ” त्यावर रोहन हसून बोलायचा,“ खर्‍ं आहे तुमचं म्हणणं..... पण सायन्सला मानेवर खडा ठेवून तीन तीन तास प्रॅक्टिकल्स करणं आपल्याला नसतं जमलं. तसंच फार अभ्यासाचं टेन्शन न को होतं मला. म्हणून सहज जमणारे सोपे विषय घेवून मी कॉलेजचं लाईफ मस्त एन्जॉय केलं. लग्नाच्या बाजारात चांगला नवरा गटवायचा तर आजकाल ग्रॅज्युएशन हे किमान क्वालिफिकेशन आहे म्हणून मी बी.ए. केलं इतकंच. नी मम्मी - मावशीनी भलतंच स्ट्रेस केलं म्हणून मी नाईलाजाने बी.एड्.ला अ‍डमिशन घेतली, इतकंच....”
त्या दिवशी जी गोष्ट इंग्लिश मेथडला तीच भूगोल मेथडलाही घडली. त्या पेपरमध्ये ही रोहनने 82 पर्सेण्ट स्कोअर केले. लेक्चर सुटल्यावर भूगोल- इंग्लिशच्या मुलीनी जोर जबरदस्ती करून पार्टी वसूल केली. रोहनला 500 रुपयाची फोडणी बसली. त्या नंतर बारा दिवसानी टर्मिनलचा रिझल्ट नोटिस बोर्ड ला लागला. पहिला नंबर दीपा रावळने , दुसरा वैशाली दळवीने आणि तिसरा रसिका भोबेने पटकावला. तिघींच्याही गुणांमध्ये फार डिफ्रन्स नव्हता. रसिका लेट अ‍डमिशन असूनही तिने एवढा स्कोअर घेतला त्याअर्थी अ‍ॅन्युअल मध्ये ती सोबतच्या दोघीनाही मागे टाकणार असं खुद्द प्राचार्यानीच वर्गात सांगितलं. आता वर्गातल्या मुलीनी त्याना तीन देवियाँ ही उपाधी दिली. त्यांचं नाव न घेता देवी नंबर वन, देवी नंबर टू, देवी नंबर थ्री असा त्यांचा उल्लेख व्हायला लागला.
आता वर्गात रोहनचा भाव भलताच वधारला. हॉस्टेल वरच्या मुली तिच्याशी घसण वाढवण्यासाठी काहीना काही निमित्त काढून वरचेवर तिच्या रुमवर हेलपाटे घालायला लागल्या. नोटस् दे, या टॉपिकवर डिस्कशन करुया......याना त्या निमित्ताने रसिकाशी सलगी करण्याची जशी स्पर्धाच सुरू झाली. रोहनची भलतीच गोची व्हायला लागली. यापूर्वी रात्री मेसवरून जेवून आल्यावर दार बंद केलं की ड्रे्स काढून टाकून दुसरे दिवशी सकाळ पर्यंत नुस्त्या अंडर वेअरवर राहून त्याला जरा रिलॅक्स होता येई . पण आता कोण कधी येईल याचा भरवसाच राहिला नव्हता. मग रोहनने नवीन आयडिया काढली. रात्री जेवण झाल्यावर तो अर्धा पाऊण तास प्रिमायसेस मध्ये वेळ काढून उशिरा रूम वर जावू लागला. कोण आलं की, कपडे धुण्याचं निमित्त करून तो बाथरूम मध्ये वेळ काढायला लागला. तर कधी कोणाचा फोन आल्याचं निमित्त करून खोटं नाटक करीत टाईमपास करायला लागला. मग हळू हळू येणारांची रिघ कमी व्हायला लागली.
प्रॅक्टिस लेसन्स, इंटर्नशीप, रिसर्च प्रोजेक्ट, वन डे ट्रिप, सोशल वर्क या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिज्मध्ये दिवस भरभरा संपले नी नाताळ जवळ आला. नाताळची आठवडाभर सुटी मिळणार होती. तेवीस ला प्राचार्यांच लेक्चर सुरू झालं. ते आले नी पाठोपाठ शिपाई येवून कसल्याशा फॉर्म्सचा गठ्ठा ठेवून गेला. सर बोलायला लागले, “उद्यापासून ते एक जानेवारी पर्यंत कॉलेजला सुटी राहिल. आठ दिवस मस्त एंजॉय करा. चोवीसला मॉ र्निंग सेशनला चार लेक्चर्स घेवून कॉलेज सुटेल. ” मुलीनी बाकं वाजवून आनंद व्यक्त केला. सरानी बंडलमधले 2-2 फॉर्म्स वाटायला सांगून ते पुढे बोलू लागले,“आपलं दीपस्तंभ मॅग्झिन काढायचं आहे. साधारण शंभर पानी अंक छापायचा तर 40,000 खर्च येतो. आपल्याकडे फीचे दहा हजार रुपये जमा आहेत. त्याबाहेर 30,000 रुपये जादा लागणार . त्या खर्चासाठी प्रत्येकीने तीनशे रुपयांच्या जाहिराती गोळा करायच्या. फॉर्म नीट वाचा. सदिच्छा जाहिरात शंभर रुपये, हाफ पुज दोनशे, फुल पेज पाचशे, कलर पेज एक हजार,बॅक पेज पाच हजार असे दर आहेत. रसिका तुझ्या बाबांची इलेक्ट्रॉनिक फर्म आहे. तू बॅक पेज साठी पाच हजारांची अ‍ॅड घे बाबांकडून ”
डिसुजा उभी राहिली,“सर, अ‍ॅडचं कंपल्श्स्न नको हं. तीनशे म्हणजे फार होतात. प्रत्येकीलाच तेवढे शक्य होतील असं नाही. जिला जसं जमेल तसं कलेक्शन होईल.” सर शांतपणे म्हणाले, "बाकीच्यांचं नंतर बघू....तुला काय जमेल ते सांग..... हे कंपल्शन नाही. हं बोल पट्कन.” डिसुजा अडचणीत आली. “सर, मी पाचशे रुपये कलेक्ट करेन” सर म्हणाले,“बघा, हिचं उदाहर्ण घ्या सगळ्यानी. प्रत्येकीने किमान तीनशेचं टार्गेट ठेवा. एकतर जाहिरात मिळवा नाहीतर तुम्ही आपल्य्य कुटूंबीयांच्या नावाने द्या ...... हे कॉलेजचं ऋण आहे असं मानून काम करा..... ”
कॉलेज सुटलं नी मुली खुषीतच हॉस्टेलवर निघाल्या. रोहनने बाहेर आल्या आल्या मम्मीला रिग करून चोवीस तारीखला दुपारी कार पाठवायला सांगितली. सगळीकडे खुषीचा महोल होता. कुणी कुणी रुमवर आल्या आल्या वह्या पुस्तकं कॉटवर टाकून त्याच पावली रुम बंद करून फिरायला बाहेर पडल्या. वैशालीच्या रुमला लॉक दिसलं. खोलीत शिरल्यावर रोहनने तात्काळ फोर स्क्वेअरचं पाकीट काढलं. सिगारेट ओढता ओढता ड्रेससह सगळा सरंजाम कॉटवर ताकून आंघोळ करायला तो बाथरूम मध्ये शिरला. खुशीत येवून “तेरे चुनरिया दिल ले गयी ” ची तान सोडून धो धो नळ सोडून तो धारेखाली बसला.टॉवेलने अंग पुसता पुसता आज बाहएर जावून मस्तपैकी नॉनव्हेज खायचा बेत करून तो तयारीला लागला. ड्रेस वगैरे करून खांद्याला पर्स लटकावून तो दाराजवळ गेला, तर दाराला आतून कडीच घातलेली नव्हती . त्याने चमकून दार उघडायचा प्रयत्न केला ......दाराला बाहेरून कडी..... आपण दाराला कडी न लावताच आंघोळीला गेलो बहुतेक. आपण आंघोळ करीत असताना कुणीतरी आत येवून गेलं बहुतेक....त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
जी कोण आत आली असेल तिने ड्रेसजवळ पडलेलं पॅडिंग पाहिलं असणार बहुधा...... आपलं बिंग फुटलं हे लक्षात आणून देण्यासाठी तिने मुद्दाम दाराला बाहेरून कडी घातलेली असणार बहुधा ..... पुढे नेमकं काय होणार? त्याला काहीच तर्क करता येईना! त्याचं डोकंच बधीर झालं. थोडावेळ शांत रहिल्यावर त्याने विचार केला की , आपण पॅदिंग वापरतो म्हणून माघारी थट्टा होईल फारतर..... आपण बिलकूल टेन्शन घ्यायवं नाही . कोण काय आक्षेप घेईल त्यावेळी काय ते पहायचं. बरं अगदीच प्रकरण अंगलट येतयसं वाटल तर सरळ तॅक्सी करुन पुणं गाठायचं . पक्का निर्धार करून त्याने खडखडावलं .... एकदा, दोनदा.... चारदा प्रयत्न करूनही दार उघडेना तेंव्हा त्याने खिडकीत जावून ग्राऊंडच्या दिशेने तोंड करून हाका मारल्या,“ रुबी, वैशाली ....प्रतिक्षाऽऽ कुणीतरी या लौकर.... कुणीतरी दाराला बाहेरून कडी घतलेय.... मी आत अडकून पडलेय.......” लागोपाठ हाका मारूनही प्रतिसाद मिळाला नाही . पण तेवढ्यात त्याला युक्ती सुचली. उघड्या खिडकीतून बाहेर उतरून स्लॅबच्या कडेवरून चालत तो व्हरांड्यातल्या कठड्यापर्यंत गेला नी तिथून आत उतरून आपल्या रुम समोर येवून दार उघडून आत गेला.पाच मिनिटात दारावर टक टक झाली नी दार उघडलं. समोर वैशाली होती.
रोहन कमालीचा हादरलेला पण कसबसं स्वत:ला सावरीत म्हणाला, “अगं, मी कॉलेजवरून आले तेंव्हा तुझ्या रुमला लॉक होतं. कुठे गेली होतीस? मी आंघोळ करून बाहेर आले नी फिरायला जायची तयारी करून दार उघडायला गेले तर दारच उघडेना.....किती वेळ दार खडखडावलं पण छे.... कुणीच दार उघडेना. मग मी सरळ खिडकीतून उतरून स्लॅबच्या बाहेरच्या कडेवरून चालत तुझ्या रुम समोर बाल्कनीच्या कठड्यावरून उतरून आले नी दाराची कडी काढली. आता आंघोळीला गेलेली असताना कुणी आलं असेल तर जरा वाट पहायची ना.... दाराल बाहेरून कडी घालायची ही काय पद्धत झाली होय? काय तरी अघोचरी चावटपणा करतात या मुली.....मी सरळ कंप्लेंट करणार प्राचार्यांकडे..”
स्मितहास्य करीत वैशाली म्हणाली, “सॉरी हं रसिका, मीच केली ही आगळीक. मीच आले होते तुझ्याकडे. बराच वेळ टकटक करूनही तू दार उघडलं नाहीस की आतून काही प्रतिसादही दिलास नाही म्हणून म्हटलं जरा गम्मत करुया. खुप वेळ वाट पाहून कंटाळून मी ग्राउंड फ्लोअर्वर मयुरीकडे गेले. त्या नादात तुझ्या दाराला कडी घालून आले हेच विसरले की मी. तुझी बोंबाबोंब ऐकल्यावर माझी चूक लक्षात आली माझ्या.प्लीज रागावू नकोस हं....” रोहनचा जीव भांड्यात पडला. दीर्घ सुस्कारा सोडीत तो म्हणाला, “तुझीपण कमालच आहे की गं.... अगं मी दाराला आतून कडीच घातली नव्हती...... पण आज तुरुंगात डांबून ठेवलेल्या कैद्याला काय वाटत असेल याचा फील आला मला. चल आज नॉनव्हेज खायचा मूड आहे. चल तू पण.”
वैशाली कां कू करायला लागल्यावर तिचा हात धरून ओढीत रोहन बोलला, “आता तू मुकाट्यानं येतेस की करू कंप्लेंट प्राचार्यांकडे?” रुमवर जावून पर्स लटकावून वैशाली बाहेर पडली. लंच उरकून होस्टेलवर आल्यावर वैशालीने रुमच्या दारवर टक टक केलं. पार्टनरने दार उघडल्यावर 'गुड नाईट' म्हणून रुम मध्ये जावून दार लावता लावता वैशालीने लकेर छेडली. “तेरी चुनरिया दिल ले गयी.........”रोहनचं पाउल अडखळलं. हॉटेल मध्ये जावून परत येई पर्यंत वैशालीने झाल्या प्रकाराबद्दल एक अक्षरही काढलेलं नव्हतं. आपण आंघोळ करीत असताना ती आली होती तेंव्हा ती दार उघडून आत तर येवून गेली नसेलना? तसं असतं तर तिने पॅडिंगबद्दल काहीच कसं विचारलं नाही? बरं नाही म्हणावं तर नाताळ सुटीत काय काय करणार त्या बद्दल अगडी भरभरून बोलत होती की ती...... तिला काही खटकलेलं असतं तर तिच्या वागण्या बोलण्यात कुठेच तुटकपणा दिसला असता. हॉटेलचं बील मी दिलं त्यावेळी पण तिने फार लावून धरलं नाही. पण मग रुम मध्ये जाताना ,बाथरूम मध्ये आपण जे गाणं म्हणत होतो नेमकं तेच गाणं कां बरं म्हणून दाखवलं असेल वैशालीने? तिला नेमकं काय सुचीत करायच असेल बरं? रोहनला काहीच गूढ उकलेना. आता वैशाली आपण होवून कधि हा विषय काढील तेंव्हा ती काय बोलेल ते ऐकून आपण बाजू मारून न्यायची असा सूज्ञ विचार करून त्याने तो विचार डोक्यातून काढून टाकला.
चोवीस जानेवारीला रोहनचा शेवटचा लेसन लागला. या वेळी प्रथमच त्याला नी वैशालीला एकच शाळा मिळालेली. लेसन डिपार्टमेंटच्या परांडे सराना सांगितलं असतं तर त्याला नी वैशालीला एक्च शाळा मिळाली असती. पण रोहनने कधी तसा विचारही केला नव्हता. पहिला लेसन घेतल्यावर त्याला कधीच लेसनचं टेन्शन वाटलेलं नव्हतं. पण यावेळी वैशाली आहे... ती नक्की लेसन ऑब्झर्व करायला येणार ... या विचाराने त्याच्यावर जरासं दडपण आलं. त्याने अगदी कसून तयारी केली. चित्रं, तक्ते, फ्लश कार्डस् असं भरपूर मटेरियल जमवलं. टॉपिक पुन्हा पुन्हा वाचून अगदी मुखोद्गत केला. लेसनचा दिवस उजाडला. सकाळी आठ वाजता दारावर टक टक झाली. वैशाली आलेली होती.
“गुड मॉर्निंग वैशाली , आज सकाळी सकाळीच काय काम काढलंस? ” रोहन म्हणाला. त्यावर वैशाली बोलली, “म्हटलं तुझं कुठपर्यंत आवरलंय ते पाहुया. चल मस्तपैकी कॉफी घेवूया”. जिना उतरता उतरता वैशाली म्हणाली, “एक रिक्वेस्ट करू का गं रसिका? प्लीज तू माझा लेसन पहायला नको येवूस . खरंतर तू माझी फास्ट फ्रेण्ड . पण कां कोण जाणे तू समोर दिसलीस तर मी दिस्टर्ब होईन...... प्लीज गैरसमज न्को करून घेवूस हं.” रोहन बोलला, “एवढंच ना , डोण वरी. तुला टेंशन येणार असेल तर मी नाही येणार. पण तू मात्र माझ्या लेसनला नक्की ये हं. तुझ्या सारखी स्कॉलर ऑब्झर्वेशनला येणार म्हणून मी अगदी फुल्ल स्पीद्मध्ये तयारी केलीय. तु बघ माझा लेसन नी तुझा रिमार्क पण नंतर मला सांग. ”
प्रिलिम झाली . यावेळी वैशालीने बाजी मारलेली. सेकण्ड रॅन्क अगदी अनपेक्षितपणे गीता धुरतने मिळवलेली. अर्थात तिला स्कोअर मिळाला त्यात तिने मॅगझिन साठी बावीस हजारांच्या अ‍ड मिळवून दिल्या त्याचा करिष्मा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. रोहनला सातवा नंबर मिळाला. अर्थात टर्मिनल पेक्षा त्याचा स्कोअर दोन पर्सेण्टने वाढलेला होता. त्याने फार सिरियसली मुलींसारखी मान मोडून तयारीही केलेली नव्हती. आता सेल्फ स्टडी साठी लेक्चर्स बंद्च झालेली होती. पंधरा दिवस इथे कशाला रहा असा विचार करून रोहन सरळ पुण्याला गेला. बाकी सगळ्या मुली मात्र घरी अभ्यास होत नाही म्हणून होस्टेलवरच थांबलेल्या होत्या. पुण्यात गेल्यावर पंधरा दिवसात त्याने एकदाही नोटस् उघडून वाचायची तसदी घेतली नाही. 23 ते 28 मार्च अ‍ॅन्युअल व्हायची होती नी 22ला हॉल रिसिट मिळायची होती. म्हणून रोहन रिसिट मिळनार त्या दिवशी परत आला.
रोहन रिसिट घेवून रुमवर आला तेव्हा होस्टेल वर पिनड्रॉप सायलेन्स होता. रात्री मेसवर जेवायला गेल्यावरपाहिलं तर एकेकीचा अवतार अगडी बघण्यासारखा झालेला. लाल डोळे, अस्ताव्यस्त केस, चुरगळलेले कपडे. रोहनला त्यांचा सिरियसनेस पाहून हसूच आलं. आज जेवताना हसणं खिडळणं बंद. एकेक जण मुकाट्याने पटपटा जेवून उठून गेली. आज मेसला त्याचा आवडता टोमॅटो बटाटा रस्सा केलेला. रोहन दणकून जेवला. मग प्रिमायसेस मध्ये चक्कर मारून आरामात रोमवर गेला. सगळा सरंजाम उतरून तासभर नोटस् चाळल्या नी मस्त ताणून दिली. पेपरचं टायमिंग अडीज ते साडेपाच होतं. रोहन पावणे दोनला हॉलवर गेला. ग्रुपमधल्या फ्रेण्डसना बेस्ट विशेस दिल्या. प्र्पर सूटल्यावर सगळ्या मुली मुकाट्याने रुमकडे निघाल्या. एरव्ही पेपर सुटल्यावर उत्तरांची चर्चा करणं, मार्कस् टॅली करणं, प्रश्नपत्रिकेवर शेरेबाजी करणं असतं तशी काही म्हटल्या काहीही चर्चा रंगली नाही. एवढं टेन्शन घेण्यासारखं या परीक्षेत काय आहे ते गौडबंगाल रोहनला उलगडलं नाही.
शेवटचा पेपर झाला आणि वातारण एकदम बदललं. हॉल बाहेर आल्या आल्या मुलींच हसणं खिडळणं..... खेचखेची पूर्ववत सुरू झाली. निरोपा निरोपी, सरांच्या पाया पडणं ...एकमेकींचे फोन नंबर्स पत्ते देणं घेणं सुरू झालेलं. रोहन मात्र या सग़ळ्या पासून पूर्ण अलिप्त रहात तडक रूमवर गेला. रुमला न विसरता कडी घालून तो रिलॅक्स झाला. आरामात सिगारेट ओढून झाल्यावर त्याने बी.एड्.च्या नावाने आंघोळ केली . मस्त बॉडी स्प्रे फवारला अन् ड्रेस चढवला तेवढ्यात दारावर टक टक झाली. बाहेर चाललेल्या कलकलाटा वरून त्याने ओळखलं की रुबी,वैशाली , प्रतिक्षा, मृणालिनी,अर्चना, विशाखा असा ग्रूप आलेला आहे.
मैत्रिणी धडधडा आत घुसल्या. “रसिका तू मात्र ग्रेट आहेस हं..... आम्ही कॉलेजवर किती शोधलं तुला. सगळी डिपार्टमेण्टस्, कॉमन रूम. लायब्ररी कुठेच तुझा पत्ता नाही. मग वाटलं कॅण्टिनला असशील. पण तिथेही नाही दिसलीस तू. कम्मल आहे हं तुझी. तरी नशिब लगेच रूम सोडून पुण्याला नाही गेलीस. ” रोहन सावरून घेत म्हणाला, “मी तर जाम बोअर झालेली.... कधी एकदा रूमवर येते नी बी.एड्.च्या नावाने आंघॉल करते असं झालं होतं मला. चला सुटले एकदा ..... कित्ती कित्ती मोकळं वाटतय् मला. आज सर्वाना माझ्यातर्फे फेअरवेल पार्टी. कुणीही कसलीही सबब सांगायची नाही. चला आवरा पटकन्..... नी जाऊया बाहेर. ”
एरव्ही रेंगाळणाऱ्या रुबी नी अर्चना अगदी वेळेत तयार होवून बाहेर पडल्या. हॉटेल मध्ये पावभाजी येईपर्यंत मोकळेपणी खिदळणं सुरु होतं. एकमेकीना पत्ते देणं घेणं सुरु झालं. रोहनने आजपर्यंत कटाक्षाने ही गोष्ट टाळलेली होती. आपण पुण्यावे आहोत यापलिकडे जादा तपशील त्याने कधीच दिलेला नव्हता. या वेळीही त्याने पद्धतशीर बगल दिली. आपण पुण्यात राहतो ही बाब कायमची निकाली काढण्यासाठी त्याने लोणकढी थाप मारली. “म्हंजे असं आहे नं डॅडीनी कांजूरमार्गला कुठेतरी आमच्या फर्मची ब्रॅन्च सुरू केलीय . लौकरच आम्ही बॉम्बेला शिफ्ट होतोय. रहाण्यासाठी बोरीवलीला कुठेसा फ्लॅट घेतलाय म्हणे. एक्झॅक्ट अ‍ॅ‍ड्रेस मलाच माहिती नाहीये......” तेवढ्यात वेटरने प्लेट लावायला सुरुवात केली.
रात्री जेवण करून आल्यावर ग्रूप मधल्या सगळ्या मुली पुन्हा वैशालीच्या रूमवर जमल्या. रोहनलाही नाईलाजाने जावं लागलं. होस्टेलला आल्यापासून ते आज पर्यंत तो जेमतेम दोन ते तीन वेळा वैशालीच्या रुमवर गेला असेल. त्यावेळी दर खेपेला मुद्याचं बोलून तो दोन मिनीटात बाहेर पडायचा. यावेळी मात्र पाऊण तास त्याला थांबावच लागलं. तरीही गप्पाष्टकात त्याचा सहभाग अगदी सावध होता. त्याने फक्त श्रोत्याची भूमिका निभावली. तासभर झाल्यावर मात्र ओढून ताणून जांभया देत, आळोखे पिळोखे देऊन आपल्याला झोप येत असल्याचं नाटक करत तो बोलला,“आता मी जाते हं, मला कमालीची झोप यायला लागलीय्.” नी बाय् बाय् करीत त्याने रूम गाठली. दहा पंधरा मिनीटं सामान वगैरे आवरून तो सगळा सरंजाम उतरणार तेवढ्यात दारावर टक टक झाली. त्याने नाइलाजानेच दार उघडलं. समोर वैशालीला पाहून तोहसत म्हणाला, “ तू होय, मला वाटलं, कोण ही नकोती ब्याद आली कडमडायला.....”
रूममध्ये येवून कॉटवर टेकत वैशाली बोलली,“ उद्या पहाटे पाच वाजता मी होस्टेल सोडणार. सहाची बस आहे माझी. अगदी राहवेना म्हणून जाण्यापूर्वी तुझा निरोप घ्यायला आले. माझा पत्ता आहेनं तुझ्याकडे? बोरिवलीला आमचा फ्लॅट आहे. तुम्ही शिफ्ट झालात की मला फोन कर नी. मी येईन तुला न्यायला. तुम्ही बोरीवलीला शिफ्ट होताय ना , म्हणून तुला स्पेशल इन्व्हिटेशन द्यायला आले मी.” जास्त वेळ न काढता वैशाली उठली. दारवाजात गेल्यावर जरा थांबून तिने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते.“ रसिका, तू खरंच खंच स्त्री आहेस की नाही याचाच संशय येतोय् मला. एवढं पॅसिव्ह राहणं नाही जमत स्त्रीला, म्हणून म्हंटलं मी. गेले गेले सहा साडेसहा महिने एकत्र राहिलो आपण...... एकमेकींशी मोकळेपणी गप्पा मारल्या, फिरलो. कितीतरी वेळा एकत्र कॉफी प्याली, लंच घेतलं..... पण आज जायची वेळ आल्यावर तरी आपण पुन्हा कढि भेटूया? मला तुझी कायम आठवण य्र्त राहिल असं निदान तोंडदेखलं तरी तू म्हणशील, नव्हे तसं म्हणावंस अशी माझी अपेक्षा होती........ पण माझा भ्रमनिरास झाला....... एतके कॅज्युअल संबंध आहेत का गं आपले...? अर्थात तुला माझ्याबाद्दल ओढ - जिव्हाळा वाटावा असं फारसं काही मी केलेलं नाही म्हणा तुझ्याशी...... आपण नॉनव्हेज घ्यायचो तेंव्हाही हार्डली दोंन वेळा मी बील दिलं असेल, इतर असंख्यवेळा तूच बील पेड केलेलं आहे...... शेवटच्या क्षणी तुम्ही बोरीवलीला शिफ़्ट झाल्यावर मला कळव असं मी म्हंतल त्यावरही तू कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीस, ही गोष्ट मात्र जिव्हारी लागली माझ्या..... पण निदान फॉर्मॅलिटी म्हणून सुद्धा तू हो म्हंटलं नाहीस.....” दार ओढून घेत वैशाली निघून गेली.
आता मात्र रोहन अंतर्बाह्य ढवळून निघाला. बी.एड्. ला येताना स्त्री वेशात वावरायचं केवढं मोठं चॅलेंज स्वीकारून गेले सहा महिने थ्रिल, भीती, दडपण या खाली आपण वावरलो त्याची आठवण आल्यावर एक वेगळाच थरार त्याला जाणवला. या सगळ्यात नाही म्हटलं तरी रुबी, वैशाली , प्रतिक्षा, मृणालिनी,अर्चना, विशाखा यानी त्याला मोठा दिलासा दिलेला..... पण आपण मात्र निरोपाच्या अगदी रिझर्व्ह वागलो त्यांच्याशी. आपल्यावर एक वेगळं बंधन होतं ही गोष्ट वेगळी, पण स्त्रीत्वाचं नाटक वठवलं तसं आपण त्यांच्यात एंवॉल्व्ह झालोय् असं नाटकही करायला हवं होतं. पण ते नाही सुचलं आपल्याला, याची मोठी खंत आता वेळ गेल्यावर त्याला वाटायल लागली. आपण कितीही प्रयत्न केले तरी या ग्रूपला आणि खास करून वैशालीला विसरू शकू का? रसिका बनून रहायचं चॅलेंज आपण स्वीकारलं तेंव्हा कुठेही, कुणाच्यातही गुंतायचं नाही असं आपण ठरवलेलं, तसा शिकस्तीचा प्रयत्न्ही आपण केला पण हे जमलं का आपल्याला? या साऱ्याची श्री शिल्लक काय? आत्मवंचना....... ही मी माझीच फसवणूक केली की..... उलट सुलट विचारांचं एवढं काहूर माजलं की आज रोजच्या प्रमाणे पॅडिंग सोडून रिलॅक्स व्हायचंही सुचलं नाही त्याला.
तो रात्रभर विचार करीत चक्क जागा राहिला. आपलं रहस्य वैशालीला सांगावं का? हे भीषण सत्य ती कितपत स्वीकारील? नी हे सगळं ऐकल्यावर तिच्या मनात आझ्या बद्दल आदर, विश्वास कितपत शिल्लक राहील? बरं न सांगावं तर तिची वंचना केल्याचा सल आपल्या हृदयात कायम खुपत राहील...... काय करायचं.....? उलट सुलट विचारांच्या आवर्तनात पाच कधी वाजले कळलंच नाही. आता वैशाली रूम बाहेर पडणार, अजून संधी आहे..... कसंबसं धैर्य गोळा करीत त्याने मोबाईल उचलून वैशालीला मेसेज केला,“ आय वॉण्ट टू मीट यू, आय् वॉण्ट टू डिस्क्लोज वेरि इम्पॉर्टण्ट मॅटर..... प्लीज कोम टू माय रूम. ” मेसेज सेण्ड झाला नी काही सेकंदातच उत्तर आलं, “ सॉरी, इटस्स टू लेट नाऊ....”
आज त्याला चहा प्यायची तल्लफ आली नाही की एकदाही सिगारेट ओढाविशी वाटली नाही. ड्रायव्हर कार घेवून रात्रीच पनवेलला येवून लॉजवर थांबलेला होता. तो आठ वाजता यायचा होता पण आता एक क्षणभरही इथे थांबण त्याला नकोसं झालेलं. त्याने ड्रायव्हरला फोन लावला. तोही उठलेला होता नी त्याचं आवरलेलंही होतं. तो लगेच येतो म्हणाला. चार सूटकेसिस नी बेडिंग एवढं सामान दोन ट्रीप मारून ग्राउंड फ्लोअरला जाता जाता त्याने वैशालीच्या रूम कडे नजर टाकली. आत लाईट दिसत होता. सामान पोर्चबाहेर ठेवताना कुणाच्या तरी दोन सुटकेसिस नी बेडिंग बाजूला ठेवलेलं दिसलं पण जवळ कोणी मुलग़ी दिसली नाही. त्याने रुमची किल्ली सिक्युरिटी कडे दिली नी तो माघारी आला. तेवढ्यात मेन गेट मधून आपली कार आत अल्याचं त्याला दिसलं.
कार होस्टेल समोर येवून थांबली. द्रायव्हर खाली उतरला. त्याने डिकी उघडून सामान आत टाकल. रोहन कारचा दरवाजा उघडणार तेवढ्यात वैशाली नी तिची पार्टनर येताना दिसली. त्याला हाताने थांबायची खूण करीत पुढे येवून वैशाली म्हणाली, माझा रिक्षावाला अजून आलेला नाही. मला सी.बी.एस. ला ड्रॉप कर. तिचं बेडिंग नी सूटकेस पुढी ड्रायव्हरच्या बाजूला ठेवून दोन सुटकेस मागच्या सीट वर ठेवून रोहनने वैशालीला आत बसायची खूण केली. मग स्वत: आत जावून कारचं दार ओढून घेत तो ड्रायव्हरला म्हणाला,“कार सी,बी.एस.ला घे.....” कार गेटबाहेर पडता पडता रोहन अजीजीच्या सुरात म्हणाला,“मला माफ कर वैशाली, पण एक गोष्ट अगदी खरी खरी कबूल करणार आहे मी.....”
त्याला पुढे बोलू न देता वैशाली वेडावत बोलली, “ म्हणे म्यॅफ़ कर... मोठा सत्यवचनी हरिश्चंद्रच लागून गेलास की तू.... स्वत:ला फार शहाणा समजतोस नव्हे तू ...... तुझं सोंग मी कधीच ओळखलंय मी....... मी प्रथम रुमवर आलेले तेव्हा सिगारेट्चा वास आला मला नी कॉत जवळ राख दिसली मला....... हे काहीतरी गौड बंगाल आहे असा संशय मला त्याच वेळी आलेला. फर्स्ट टर्म संपण्या पूर्वी पंधरा दिवस ....... नेमकी तारीख नाही आठवत ... मी रात्री रूमवर आलेली तुझ्या ...... दार खडखडावूनही उघडलं नाही म्हणून जरा जोराने लोटलं तर सताड उघडलं की दार...... नी समोर जे दृष्य दिसलं ते पाहून माझी दातखीळ बसायची वेळ आली. तू चक्क इनर वेअर घालून झोपलेलास...... गावून अन् पॅडिंग खुर्चीत टाकलेलं...... खरं तर घाबरून बोंब मारणार होते मी पण कसंतरी सावरलं स्वत:ला . दाराला आतून कडी घतली नी खिडकीतुन उतरून फुटभर रुंदीच्या स्लॅबच्या कडेवरून जीव मुठीत धरून चालत मी व्हरांड्यातल्या ओपन पॅसेज समोरच्याबाल्कनीच्या कठड्यावरून आत गेले. मोठ्या शिताफीने केवढं तरी दु:साहस मी केलं होतं.... मी असं कां केलं? तुझ्याबद्दल एवढी सहानुभूती मला कां वाटावी? दुसरी कोणीही मुलगी असती तरी तिने सग़ळं होस्टेल डोक्यावर घेवून तुझं बिंग उघडं पाडलं असतं.... त्याचे किती गंभीर परिणाम झाले असते याचा तू विचार कर, मूर्ख..... बेअक्कल.... कृतघ्न माणसा... मी कशा साठी एवढा धोका पत्करून वाचवलं तुला? ”
हे ऐकल्यावर रोहनला घाम फुटला. “वैशाली यू आर रिअली ग्रेट....पण एवढी गंभीर बाब उघडकीला आली तरी.......” त्याचं बोलॉणं अर्धवट तोडीत वैशाली म्हणाली , “मी गप्प कां बसले? असंच ना..... असा स्त्री वेष घेवून तू बी.एड्. कां करतोयस् ते तर्काने ओळखलं मी. तुला जुळा भाऊ आहे हे महिती होतं मला. तो जुळा भाऊ म्हणजे तूच आहेस नी आपल्या बहिणीचा काही प्रॉब्लेम असणार म्हणून तू तिचं सोंग घेवून बी. एड्. करतोयस् हे तर्काने ओळखलं मी. या नाटकात तुझी आई , मावशी ही सामिल आहेत म्हणजे तसंच काही गंभीर कारण असेल असं वाटलं मला. अन् बहीणीसाठी हे प्रचण्ड मोठं धाडस तू पत्करलंस म्हणून तुझ्याबद्दल मोठा सॉफ्ट कॉर्नरही निर्माण झाला माझ्या मनात.” किंचीत पॉझ घेत दीर्घ सुस्कारा सोडून ती पुढे बोलू लागली.“ आणख़ी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू दाखवलेला संयम. कायम मुलींच्या सहवासात राहून मोठी संधी मिळालेली असूनही कधीच कुणाशीही लघळपणा, लगट करणं असं गैर कृत्य तुझ्या हातून घडलं नाही. चुकूनही अगदी किंचित संशय यावा अशी आगळीकही तुझ्याकडून कधी झाली नाही. माझं अगदी बारीक लक्ष असायचं. तुझं वर्म कळल्यावर तर मी भलतीच जागरूक राहून तुझ्यावर लक्ष ठेवून होते. तू अगदी बारीकसंही गैरकृत्य केलं असतंस ना तर तुला जन्मातून उठवला असता मी.... ”
“ नातळ सुट्टी पूर्वी बेफिकीरीने दाराला आतून कडी न घालण्याची चूक तू दुसऱ्यांदा केलीस तेव्हा तुला कायमची अद्दल घडावी नी अशी गाफिली पुन्हा होवू नये म्हणून मी मुद्दामच बाहेरून कडी घातली नी तुझ्या हाका ऐकून ही दुर्लक्ष केलं. तु झक् मारीत खिडकीतून उतरून बाल्कनीत येवून व्हरांड्यात उतरून कडी काढणार हे माहिती होतं मला. त्यावेळी मी बाहेरून कडी घातली ते बरंच झालं कारण मी बाहेर आल्यावर दोन मिनिटानी मयुरी काहीतरी कामासाठी आलेली तुझ्या रुमवर. पण बाहेरून कडी पहिल्यावर ती निघून गेली. ”
रसिकाचं बोलणं संपत आलं नी दोन मिनीटानी सी.बी. एस. आलं कार थांबली. रोहन ड्रायव्हरला म्हणाला, “प्रेमभैया, कार मुंबई कडे घे. या माझ्या मैत्रिणीला बोरीवलीला सोडून मग पुण्यात जायचं आहे आपल्याला. ” वैशाली ओशाळून बोलली, “मी गेले असते की बसने.... तुला उगाच कशाला त्रास.....” रोहन हसत म्हणाला,“ वैशाली एवढं सगळं ऐकल्यावरही स्वत:ची कार असताना तुला सी.बी.एस. वर सोडून निघून जाण्याएवढा 'हा' वाटलो का मी तुला? मी थोडा बेमुर्वतखोरपणे वागलो तुझ्याशी पण ते सकारण होतं, नी समर्थनीयही होतं. पण मी कृतघ्न मुळीच नाही. काल रात्री तू डोळ्यात पाणी आणून जे वाक्ताडन करून गेलीस ना, त्यानंतर मला एवढं गिल्टी वाटत होतं ना की, पहाटेपर्यंत मी टक्क जागा होतो. तू जे उपकार केलेसना माझ्यावर नी त्यापेक्षाही मला जे समजून घेतलंस ना त्याला तोड नाही. मी तुला बोरीवली पर्यंत लिफ़्ट देतोय् त्या मागचं कारण जरा वेगळं आहे......”
भुवया उंचावीत ओठांचा चंबू करून वैशाली म्हणाली, “असं आणखी कोणतं कारण आहे बुवा?” त्यावर तिच्या नजरेत नजर घालून रोहन म्हणाला, “ मला तुझा अ‍ॅड्रेस माहिती करून घ्यायचा आहे. आम्ही इकडे शिफ्ट होणार ही चक्क थाप मारली होती मी. कारण मला या विषयातले सगळे धागे दोरे तोडून टाकायचे होते. आम्ही पुणं सोडून कुठेही नाही जाणार. त्यामुळे तुझी आठवण आली की मला बोरिवलीला तुला भेटायला यायचं तर तुझं घर बघून ठेवलेलं बरं. मला मोठंच सरप्राईझ दिलंस की तू ...... बायकांच्या तोंडात तीळही भिजत नाही ही म्हण कोणा मुर्खाने कां रुढ केली समजत नाही मला. आता मीही तुला सरप्राईझ देणारेय्....... ” प्रश्नांकित मुद्रेने अधीर होत वैशाली म्हणाली, “अजून आणि कसलं सरप्राईझ शिल्लक आहे बाबा . सांग लौकर सांग...... माझे प्राण कंठाशी आलेत आता.” त्यावर वैशालीचा हात हातात घेवून कुरवाळीत रोहनने दमदार शीळ घुमवली, “तेरी चुनरिया दिल ले गयी...... ”

** ** ** ** ** **