जंबारी शाळा in Marathi Comedy stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | जंबारी शाळा

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जंबारी शाळा

जंबारी शाळा



म्हापणकर बाईना शाळा तपासनीस म्हणून बढती मिळाली आणि बऱ्याच शिक्षकांची चरफड झाली. बाई वक्तशीर आणि कडक शिस्तीच्या, त्यात अविवाहीत! नि:स्पृह आणि त‌ऱ्हेवाईक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध! इन्स्पेक्शन घ्यायला आलेल्या शिक्षणाधिकारी गवळी साहेबानी पायताणं घालून सातवीच्या वर्गात प्रवेश केल्यावर बाईनी हात जोडीत त्याना उंबऱ्याजवळच अडवलेनी. अत्यंत विनम्र शब्दात त्या म्हणाल्या, “साहेब, माफ करा..... मुलं जमिनीवर बसलीहेत. कृपया पायीचे जोडे बाहेर काढून ठेवा नी मग आत या. ” साहेब चांगलाच खजिल झाला. वरकरणी दाखवले नाही तरी तो मनातून चांगलाच संतापलेला होता. त्याने मुलांची कसून परीक्षा घेतली. अ‍ॅपण अगदी अवघड गणितं ही वर्गातल्या निम्मे मुलानी बिनचूक सोडवून दाखवली. बाई मुख्याध्यापिका असल्याने कुठेतरी कचाट्यात गावतील असा त्याचा अंदाज होता पण कागदोपत्री अगदी बारिकशी चुकही साहेबाला काढता आली नाही. ते राहोच पण त्या स्त्री आणि अविवाहीत असूनही आलेल्या अधिकारी वर्गाची चहा फराळ, जेवणाचीही चोख़ व्यवस्था त्यानी केलेली.... म्हणताना साहेबाला चारी मुंड्या चीत होवून निघून जावे लागले.
त्यावेळी पदोन्नत्ती दिलेल्या शिक्षकाला दुसऱ्या जिल्ह्यात नेमणूक देत. पण ! या जिल्ह्यातली शिक्षक मंडळी भांडखोर आणि कायद्यात वागणारी अशी त्या काळी अख्ख्या राज्यात ख्याती. म्हणून अन्य जिल्ह्यातली माणसं रत्नागिरी जिल्ह्यात यायला तयार नसायची. एकतर हा जिल्हा दुर्गम, वाहतुकीच्या साधनांची वानवा त्यात राजापुर तालुका तर अती गैरसोईचा. काही गावांमध्ये फक्त एकच एस्टी जाणारी. ती संध्याकाळी राजापुरातून सुटायची नी रात्री मुक्कामी थांबून दुसरे दिवशी सकाळी सात वाजता राजापुरला परत यायची. ओशिवरे, जुवाटी, खाजणतड, जंबारी, बाकाळे, गोठिवरे, दत्तवाडी, बुरंबे, नावळे, आंगले, गव्हाणे आणि कुवेशी हे काही गाव तर अती दुर्गम ! त्या गावाना एस्टी गाडीच जात नसे. मुख्य रस्त्यापासून दोन ते अडीच तास चाल मारून ते गाव गाठावे लागत. या गावानी जायचं तर जीव घेण्या घाट्या डोंगर नी चढ उतार पचवून मैलोन् गणती रपेट मारून मुक्काम गाठावा लागे. बहुतांश मार्ग झाडा पेडांच्या गचकटीतून जाणारे निर्मनुष्य असल्याने कोणीही अधिकारी राजापुरात बदलून यायला तयार नसे. म्हणून म्हापणकर बाईना शाळा तपासनीस पदी पदोन्नत्ती मिळवूनही जिल्ह्याबाहेर सोडाच पण तालुक्या बाहेरही जावे लागले नाही.
जंबारी नी खाजणतड हे आवळे जावळे गाव खाडी किनारी वसलेले. तालुक्यातले अति दुर्गम नी भानगडी गाव म्हणून प्रसिध्द. ह्या गावांमधून होडीने विजयदुर्ग दोन घटकेच्या अंतरावर. ह्या गावांचा राजापुर पेक्षा विजयदुर्गशी घनिष्ट व्यापार संबंध. जंबारीत प्रचंड मुस्लिम वस्ती. तिथे सात यत्तांपर्यंतची उर्दुशाळा ही भानगडीची शाळा म्हणून प्रसिद्ध. त्याच गावचा पटेकर मास्तर हेडमास्तर झाल्यापासून त्याच्याविरुद्ध गावकऱ्यांचे असंख्य तक्रार अर्ज जिल्हा स्कूल बोर्डाकडे आलेले. पटेकर मास्तर हा कॉन्ग्रेसचा कार्यकर्ता. त्याच्या तीन बायका. त्याची मच्छिमारीची पात (होडी ) ही खूप मोठी , बारा तांडेल असलेली. त्याची मोठी बाईल फातु कायम विजयदुर्ग बंदरात मासे विकायला असायची. ती हप्त्यातून एकदा फक्त जुम्म्याला जंबारीत यायची. तिच्या कडोसरीला खोवलेल्या पानाच्या चंचीत बारीक बारीक घड्या केलेल्या रुपया,दोन रुपये, पाच रुपये नी दहा रुपयांच्या नोटा चोंदून चोंदून भरलेल्या असत. फातु आली कि दात्यांच्या पेढीवर जायची. हप्त्याभरात घरच्यानी नेलेल्या सामानाची आणि नवऱ्याची उधारी फेडायची. बापु दाते तिला चवडाभर पाने, मुठभर सुपारीची खाण्डे नी तंबाखू देत. दोन पाने जुळवून चुना लावण्यासाठी पुढे केल्यावर बापु अडकित्त्याच्या दांडीने ढेपसाभर चुना देत. पानाला फासून उरलेला चुना ती कडोसरीच्या डबीत भरून आंग़ठ्याचा चुना जिभेने चाटून ओला आंगठा नेसूच्या साडीला पुसून कोरडा करी.
पटेकर मास्तराचा फातुशी निका लागला,पण लग्न होवून चार वर्ष झाली तरी फातु पोटुशी राहिना म्हणताना मास्तराच्या आयशीने त्याचा दुसरा निका लावायचा धोशा घेतला. फातुचा बाप विचारी, दुसरी घरवाली आली की फातुचे हाल सुरु होणार म्हणून त्याने आपलीच पोरगी आयेशा मास्तराला दिली. कर्म धर्म संयोगाने आयेशा च्या मागोमाग फातुही पोटुशी राहिली. आयेशाला मुलगी झाली नी फातुला मुलगा झाला. त्याच दरम्याने पटेकर मास्तराने पतपेढीचे आणि जमातीचे कर्ज काढून स्वत:ची पात बांधून मच्छिमारी सुरु केली. तो धंदा फातु सांभाळी. दीड वर्षाचा मुलगा सवतीच्या लगामी लावून ती घराबाहेर पडली. हप्ताभर विजयदुर्ग बंदरात मच्छिमारी चाले. फातु रोज स्वत: डोकीवर फाटी घेवून म्हावरं विकी. घावूक माल बंदरावरचे आडते उचलित. त्यांचा नी होडीवरच्या तांडेलांचा व्यवहार पटेकर मास्तर सांभाळी. म्हणजे व्यवहार सग़ळा फातुच्या जिभेवर असायचा, मास्तर आपला आबधाक असावा म्हणून फातु सांगेल त्याप्रमाणे तोड करण्यापुरता.दोन सिझनमध्ये कर्जव्याम फिटून धंद्यात चांगला जम बसला.
पटेकर मास्तर सकाळी अगदी वेळेवर शाळेत जाई. प्रार्थना, परिपाठ आटोपायच्या दरम्याने , पुर्षा भंडाऱ्याचा गडी चहाची किटली नी बटर किंवा लिमज्या घेवून शाळेत जाई. शाळेतल्या सगळ्या मास्तरांचे मच्छिमारीचे जोड धंदे असल्याने सगळेजण चार पैसे बाळगून असत. म्हणून सकाळी चहा बटर, साडे दहाला चहा, दुपारी अडीज वाजता चहा नी संध्याकाळी कधि भजी नाहीतर फरसाण नी चहा मागवीत असत. नाहीतर बहुतांश शाळा मास्तर हे त्यावेळी कंगाल असल्यामुळे दोन वेळा शाळेतच चहा करून प्यायची पद्धत असे. सकाळचा चहा झाला कि, पटेकर मास्तर जो बाहेर पडे तो दुसरे दिवशी प्रार्थनेपर्यंत शाळेकडे फिरकत नसे. शाळेतून बाहेर पडल्यावर तो बापू दात्यांच्या पेढीवर जावून बसायचा. तिथे रोज एक चार मिनार सिगारेट्चं पाकिट घेवून गप्पा मारीत सिगारेट ओढित बसायचा. आता बंदरावर वर्दळ सुरु होई . पेढीवर गिऱ्हाईकांची गर्दी व्हायला लागलेली असे. मग तिथून उठून पटेकर मास्तर आबा सोडयाची कौलाची वखार गाठायचा.
वखारीमागच्या पडवीत आबा सोडये, दारूवाला कांतु मयेकर, पटेकर मास्तर, मुंबईतून फंड घेवून गावात आलेले सख्या गोडकर नी धाकु बंडबे पैसे लावून तीन पत्ती खेळत. कधी कधी तरी पलिकडच्या शेजवलीतून हसन काजी, उस्मान बुडया, चांदवणातला शितू परब यायचे. अशावेळी सगळ्यांसाठी माशाचं कालवण नी भात आबाचा गडी वखारीतच रांधायचा. काही वेळा बुधवार आयतवारी पुर्षाच्या खानावळीत मटणाच्या जेवणाची वर्दी जाई. साताठ जणांसाठी जेवणाचे टोप वखारीत पोच होत. दारू कांतुच्या भट्टीवरून मोफत येत असे. पण सग़ळे तीन पानीचे नादी असल्यामुळे कोणीच पिऊन फीस होत नसे. खेळ रोखीवर व्हायचा. त्यांचे काय नियम होते त्याप्रमाणे सगळेजण चटाचट पैसे काढून समोर टाकीत. शेवटी जो जिंकेल तो गल्ला पुंजावायचा.बहुसंख्यवेळा सख्या नाहीतर धाकु जिंकायचे. कधितरी कांतु बाजी मारायचा. एखाद वेळी पैसे संपले , की पटेकर मास्तर कांतुकडून जुम्म्याला परतफेडिच्या बोलिवर उधर पैसे घ्यायचा.
कांतुची उधारी असली की जुम्म्याच्या दिवशी भिणभिणताना तो पटेकर मास्तराला सोबत घेवून बंदरावर फातु ची वाट बघित थांबायचा. फातु होडीतून उतरली की, “बेगम इस हैवानका पिछा छुडाओ...... ” असे म्हणत पटेकर मास्तर कांतुकडे बोट दाखवायचा. मग तिथेच बसकल मारून फातु फाटीतला फडका पसरून कडोसरीची चंची खोलायची नी , “कित्ते रुपये लिये है ....” असे म्हणत चंचीतल्या नोटांच्या घड्या काढून टाकायची. पटेकर मास्तर तत्परतेने घड्या खोलून सप्पय करायचा नी पैसे मोजून कांतुला द्यायचा. “ देखो कांतु भाई, इस वखत दे रही हूं मगर आईंदा कभी मेरे भरोसे जुव्वा खेलने पैसा मत देना इनको .... ” फातु दम द्यायची. कांतु चिमटीने गळ्याची चामडी पकडून शपथ खात सांगे, “आयच्यान सांगतय फातु, ही जुगाराची उदारी नाय हां.... ते रोजा मैमान इलेले, तुज्या धकल्या सवतीचो बापूस..... ते चारजुन आनी वांगडान तुज्या वाडीतले फुकटे....तेंच्या दारयेचा बील ऱ्हवलेला .... जुगारात इतकी कामाय झाली आस्ती तर दारु खेका विकली आस्ती.... आज मच्छी काय हाडलस?” त्यावर फ़ातु सांगे “तांबवशी आशे.... देंव?” पटेकर मास्तर चार मिनार शिलगावीत वखारीकडे निघायचा. कांतु पाच फडफडीत तांबवशा उचलून म्हणाला, “आज काजुची इलेली हा…. ” फातुला काजुची दारू आवडायची. “तांबवशीच्या बदल्यात तीन बाटल्यो पाटव घराकडेन ... आणि मांका एक डबो फाल्यां उजवाडण्याच्या आदि हंय होरक्यात ठेन जा.... ” त्या काळी तेलाच्या रिकाम्या डब्यात दारू ठेवीत नी चिव्याचा वीतभर तुकडा तासून त्याचे घट्ट बूच ठोकित. कांतु एक डबा वीस रुपयाला विकी पण फातु त्याला कमी दरात म्हावरं देई म्हणून तिच्यासाठी दोन रुपये कमी करीत असे.
मुसलमान वाड्यातला सुलेमान सिलिपाटाचा नी पावसाळी चिव्याच्या काठ्यांचा धंदा करायचा. त्याची सासरवाड खाजण तडीत. त्याची मेव्हणी चांदु ! खाजणतडीत पिराचा उरुस होई त्या वेळी पटेकर मास्तराची चांदुवर नजर पडली. त्याने चांदुच्या बापाशी संधान बांधले. त्याला दारु ‌-मटण खिलवून काय ना काय निमित्ताने हातखर्चीला पैसे देवून वश करून घेतला. तसा सुलेमानही चांदुवर नजर ठेवून होता. सासरा पटेकर मास्तराकडे खेटे मारायला लागल्यावर त्यानेही सासऱ्याशी घसण वाढवायची सुरुवात केली. पण त्याची बायको खाष्ट .... सुलेमानचा हेतू ध्यानात आल्यावर तिने बापाचे कान भरून चांदुचा पटेकर मास्तराशी निका लावून दिला. सुलेमान त्यामुळे मास्तरावर खार खावून होता. कोणा कोणाशी सल्लामसलत करून त्याने मास्तराच्या विरुद्ध स्कूलबोर्डाकडे तक्रार अर्ज करायची सुरुवात केली. मास्तर काही काम न करता फुकटचा पगार खातो, मासळीच्या धंद्यात बरी कमाई करतो म्हणून त्याला पाण्यात बघणारे ग्रामस्थ सुलेमानच्या अर्जावर राजरोस आंगठे देत.
विजयदुर्गातले बाप्पा परुळेकर जिल्हापरिषदेचे मेंबर, मास्तर फातुकरवी आठवड्यातून दोन तीन वेळा ताजी मासळी त्याना पोच करी. त्यामुळे मास्तराविरुद्ध अर्ज परभारे निकाली काढले जात. मुळात जंबारी सारख्या अतिदुर्गम गावात वार्षिक शाळा तपासणीला सुद्धा येणं साहेब लोक टाळीत. जंबारी आणि खाजणतड दोन गावात दोन सात यत्तां पर्यंतच्या आणि सहा चौथी पर्यंतच्या मराठी शाळा आणि जंबारीची उर्दु शाळा याना कोणीच प्रत्यक्ष भेट देवून तपासणी करीत नसे. तिथल्या मास्तराना साहेब लोक दप्तर घेवून तालुक्याला किंवा अन्य शाळांमध्ये बोलावून कगदोपत्री तपासणीचे सोपस्कार पुरे करीत. सतत तक्रार अर्ज आल्यावर पटेकर मास्तराच्या चौकशीचाही फार्स करून प्रकरण निकाली काढण्यात आले.
जिल्हाबोर्डाकडे अर्ज करून मास्तराचा बालही बाका झाला नाही. उलट मास्तर संध्याकाळी ‘घेतल्यावर’ त्याच्याविरुद्ध अर्जावर सह्या आंगठे करणांना नावं घेवून शिव्या घालायचा. त्याची चौकशी झाली त्यानंतर दोन दिवसानी फातु जुम्म्याला आलेली असताना संध्याकाळी फुल्ल झाल्यावर नवरा बायकोनी सुलेमानच्या दारात जावून धमक्या दिल्या. “माज्या अर्ध्या वयाच्या दादल्यान तुजा नाक कापून तुजी आसमानची चांदनी कशी म्हेवनी तिसरी जोरू करून घेतली .... तुजी औकात नाय......” फातुने गळा फाड फाडून सुलेमानच्या मायबहिणींचा उद्धार केला. मास्तरासोबत कांतु भंडाऱ्याच्या गुत्त्यावर काम करणारे तरणेबाण्ड गडी असल्यामुळे फातुला तोंडी धमकावणे दूरच सुलेमान दार बंद करून दडी मारून बसला.
त्यानंतर दोन दिवसानी राजापुरच्या पोलिस ठाण्यातून पटेकर मास्तराला समन्स आले. मास्तराने तालुक्यातला नामांकित गव्हाणकर वकिल केला. पोलिसाना पैसा चारला नी थातुर मातुर चौकशी करून सुलेमानची पोलिस केसही निकाली निघाली. मात्र त्यानंतर सुलेमानच्या दारात जावून शिवीगाळ करणे मास्तराने बंद केले. त्याच दरम्याने सुलेमान काठ्यांचा ट्रक भरून सांगलीच्या व्यापाऱ्याकडे माल घालायला गेलेला असताना बोलण्या बोलण्यात सहज विषय निघाला नी आपला पाव्हणा राज्याचा शिक्षण मंत्री आहे त्याच्या मार्फत पटेकर मास्तराला चांगली अद्दल घडवतो असे तो व्यापारी बोलला. त्याच्याशी सल्ला मसलत करून त्याने सांगितल्या प्रमाणे पन्नास ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रार अर्ज आणि पूर्वी स्कूलबोर्डाकडे केलेल्या सहा अर्जांच्या स्थळ प्रती चार दिवसात सुलेमानने नेवून दिल्या.
या वेळी मात्र झराझर चक्रं फिरली. शिक्षणाधिकाऱ्यानी समक्ष चौकशी करायचे आदेश होते. पण तालुक्याला येवून चौकशी केल्यावर हे गाव किती दुर्गम आहे आणि पडत्या पावसात अडीज तीन तास पायपीट करून पल्ला गाठायचा म्हणजे जीवावर उदार होवूनच बाहेर पडायला हवं, असं जाणत्यानी सांगितलं. मुळात साहेब सोलापुर कडचे. रत्नागिरीतला पाऊस भीषण असतो याचा त्यानी अनुभव घेतलेला होता. मग पूर्ण विचार करून अत्यंत कडक म्हणून ख्याती असलेल्या म्हापणकर बाईंचे नाव जाणत्यानी सुचविले. मग साहेबानी त्याना आपले प्रतिनिधी म्हणून विशेष चौकशी अधिकारी म्हणून अधिकार पत्र दिले. या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश खुद्द शिक्षण मंत्र्यानी दिलेले असून कोणाचीही गय न करता वस्तुस्थितीची पडताळणी करून तसा अहवाल लौकरात लौकर सादर करायची सुचना त्यानी दिली. चौकशी कशी करावयाची याची तपशीलवार माहितीही साहेबानी बाईना दिली. चर्चा सुरु असता म्हापणकर बाई या कामी अगदी सुयोग्य असल्याची खात्री साहेबाना पटली.
त्यावेळी राजापुर नजिक हर्डीच्या शाळेत सोडये गुरुजी आणि पंचायत समितीतला शिपाई भगवान वरक हे जंबारीतले माणूस म्हणून त्याना सोबत घ्यायचा सल्ला तालुका मास्तरानी दिला. पावसाळी सुटी संपून नुकत्याच शाळा सुरु झालेल्या. तो सिझन म्हणजे ठोम पावसाचा. प्रवास पूर्ण पायी कातळी सड्यावरून करायचा. वारा पावसाचा जोर झाला तर वातावरण निवळेपर्यंत कुठेतरी झाळीच्या किंवा गडग्याच्या आडोशाने बसून रहावे लागते. पाऊस उभा आडवा सैताना सारखा झोडून नखशिखान्त भिजवून काढतो.म्हणून कागदपत्रे, कपडे शाबूत राखण्यासाठी कांबळ्याच्या रकट्यात गुंडाळून पिशवीत भरावी लागतात. अशी माहिती सोडये गुरुजीनी दिली. त्याप्रमाणे सगळी जय्यत तयारी करून सोडये गुरुजी, वरक शिपाई, म्हपणकर बाई आणि गुरव कारकून सकाळी लौकर उठून मार्गस्त झाली.
धोपेश्वराची घाटी चढून सडावळीची वाट सुरु झाली आणि पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा तर असा जोर होता कि पुढे पाऊल टाकणेही मुश्किल झाले.घटकाभराने वाऱ्यापावसाचा जोर कमी झाल्यावर मंडळी मार्गक्रमणा करू लागली. आभाळ धरलेलेच होते आणि नऊ वाजताच्या सुमाराला संध्याकाळ झाल्यासारखे काळवे दाटून आलेले होते.मध्येच सूं सूं आवाज करीत वाऱ्याची कावटी येई. वाटेने चिटपाखरूही नजरेला पडले नाही. बाईंच्या संथ चालीने वाट तुटता तुटत नव्हती. तरी वाटेत फक्त एका ठिकाणी नैसर्गिक विधीच्या निमित्ताने बाई थांबल्या. वरक शिपाई जातीचा धनगर, सड्यामाळाला शेरडांच्या मागून फिरलेला. त्याने थांबून जरा अंदाज घेतला नी तिसऱ्या हिश्श्याने अंतर तुटले असा आडाखा बांधला. आणखी अर्ध्या घंट्यात ओशिवऱ्याचा सडा संपून जंबारीच्या सडा सुरु होईल असे तो म्हणाला. बाईनी बगल बॅगेतली लिमज्यांची पुडी बाहेर काढली. कांबळ्याच्या रकट्यात गुंडाळून ठेवल्यामुळे पुडी सर्दावली नव्हती. पाणी पिवून मंडळी चालायला लागली आणि दहा बारा मिनिटात ओशिवऱ्याचा रनर टपालाची बॅग घेवून येताना दिसला. जरा पुढे गेल्यावर गुरे चरताना दिसली. डाव्या अंगाला खरीत तीन जोतये आणि लावणी लावणारी माणसं दिसली. माणसांच्या दर्शनाने बाईना जरा हायसं वाटलं .
अजूनही दिशा मोकळ्या झालेल्या नव्हत्या. पावसाळी पाण्याच्या असंख्य व्हावट्यांमुळे मूळ वाट कुठची नी फसवी व्हावटी कुठली हे ही नवख्या वाटसरूला कळले नसते. मंडळी जंबारीच्या दिशेने वळली आणि भणा भणा वारा सुरु झाला. सोडये गुरुजी म्हणाले, “जंबारीच्या नस्तातून बारा महिने बत्तीस काळ कायम अशा वाऱ्याच्या कावट्या सुटतात.” आता पुन्हा पावसाची सर सुरु झाली. हा पाऊस वाऱ्याच्या जोरामुळे तिरपा पिळवटत येत होता. वाऱ्याचा जोर वाढायला लागला नी म्हापणकर बाईंच्या हातातली छत्री सुटली. नशिबाने जवळच उक्षीच्या झाळीत छत्री अडकली म्हणून ठीक नाहीतर सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर ती कुठच्या कुठे उडून गेली असती नी हाती लागली नसती. सोडये गुरुजीनी तत्परतेने पुढे होत आपली छत्री बाईंच्या डोक्यावर धरली. दरम्याने वरकाने धावत जावून उक्षीच्या झाळीत अडकलेली छत्री अच्चळ सोडवून आणली. कसनुसा चेहेरा करीत बाई म्हणाल्या, “गुरुजीना माझ्यामुळे भिजावं लागलं...” त्यावर ते बोलले ,“मगाचच्या कावटीत भिजलोच होतो, फक्त डोकं थोडं कोरड होतं इतकच...पाऊसकाळात कधिही गावी जाता येताना मध्येच पाऊस आला तर नखशिखांत भिजणं हे आम्हाला नवीन नाही. ”
वाऱ्या पावसाचा जोर वाढायला लागल्यावर मंडळीनी एका गोठणी लगत कुंभ्याच्या चवधार झाडाखाली बसल घेतली. वाऱ्याचे सों ऽऽसों आवाज येत होते. वाऱ्याच्या जोराबरोबर पावसाच्या किरांगळी एवढ्या धारांचे सपकारे बसायचे. ऊंचावरचा टापू असल्यामुळे दिशा गुडुप काळोखात झाकलेल्या नव्हत्या. “ पावसाचं इतकं रौद्र भीषण तांडव मी पहिल्यानेच पहातेय... ” बाई बोलल्या. त्यावर वरक म्हणाला, “तरी ह्यां काय जोवूळ (वादळ) न्हूय. आमच्या सड्यावर खाडीच्या नस्तारसून बारमाही असो वारो व्हावता. आत्ता तुमी हास म्हनून आमी थांबलाव.... नायतर आमी चाल मारली आसती.” खूप वेळानंतर पावसाचा जोर जरासा कमी झाला. एकूण रागरंग पाहता पाऊस थांबण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. बराच वेळ बसून कंटाळायलाही झाळं होतं म्हणून बाई धीर करून उठल्या. “चला मंडळी, पाऊस जरा ओसवला आहे . तो थांबण्याची वाट बघित राहिलं तर इथेच संध्याकाळ होईल. ”
परिस्थितीला सरावल्यामुळे बाई नेटाने चालसूर झालेल्या. वाटेत फक्त एकदाच दोन मिनिटं त्या पाणि पिण्यापुरत्या थांबल्या. अधून मधून सोडये गुरुजी , वरक जरा दम घेवूया का विचारायचे पण बाईनी निर्धाराने नकार दिला. सड्या माळावरून छत्री सांभाळीत चालायचं एक वेगळं तंत्र असतं ते आता बाईना चांगलं अवगत झालेलं ... त्यामुळे अधून मधून सोसाट्याच्या वाऱ्याच्या कावट्या आल्या तरी बाईनी छत्रीवरची पकड निसटू दिली नाही. किती वेळ झाला .... अजून किती चालणं बाकी आहे हे प्रश्न बाईनी मोठ्या निग्रहाने ओठाबाहेर येवू दिले नाहीत. एक मोडण घेवून पुढे गेल्यावर किंचीत थांबून अंगुली निर्देश करीत वरक म्हणाला, “तो बगा.... आमचो मांगर, आपून थय जरा दम खावया..... ” आता सगळ्यानाच जरा हायसं वाटलं. पाचेक मिनिटात सगळेजण वरकाच्या मांगरात शिरले.
पावसाळी दिवसात दुपारी नी संध्याकाळी शेतकरी हंड्यावर कायम पाणी तापत असतं. वरकाच्या आयेने जर्मनचं भगुलं भरून गरम पाणि आणलं. दोन तीन लोटे शेकत शेकत ओतल्यावर शीणभाग कमी झाला. ओसरीवर परसा होता त्या खाली विस्तव पेटलेलाच होता. कोपऱ्यातल्या भाताच्या मोटा पुढी ओढून मंडळी त्यावर टेकली. वरकाच्या आईने सगळ्यांना दुधाचे पेले आणि सोबत न्हाणीवर मुंबरात भाजलेल्या फणसाच्या आठिळा आणून ठेवल्या . चुलीवर खरपूस तापलेलं शेरडाचं घण दूध खूपच चविष्ट होतं. घरातली सगळी माणसं तिकडे लांब खरीत लावणी लावायला गेलेली होती. त्यांचं जेवण तिकडेच पोच करायचं होतं. वरकाने मंडळीना जेवायचा आग्रह केला. पण अजून पाऊण तास पल्ला गाठणं बाकी होतं आणि पावशेरी भांडं भरून प्यालेलं दुध आणि खरपूस भाजलेल्या आठिळा यामुळे पोटाला चांगला आधार मिळाला होता. अधिक वेळ न करता मंडळी बाहेर पडली.
अर्धा घंटा पल्ला गाठल्यावर नावळ्याची घाटी सुरु झाली. आता पाऊसही ओसवला होता. मोडणा मोडणाची जीव घेणा चढ असलेली ती घाटी आसमंतात प्रसिद्ध होती. अर्थात या खेपी उतरून जायचं असल्याने विशेष कठिण नव्हतं. सडावळीचं पाणि वेगाने वहात होतं. अध्ये मध्ये व्हावटीमुळे चार पडले असले तरी संपूर्ण घाटी बांधीव असल्यामुळे चालायला अडथळा येत नसे. पाऊण घाटी उतरल्यावर कोंबड्याच्या आरवण्याचे आवाज सुरु झाले. गावदर जवळ आली.... या विचाराने बाईना हायसं वाटलं. पंधरा मिनिटात माणसं जगुभाऊ दातारांच्या वाड्यात पोचली. गावात येणारे जगुभाऊ गावचे खोत असल्याने सरकारी अधिकारी मुक्कामाला त्यांच्याकडे थांबायचा प्रघात होता. वरकाला पाहिल्यावर कोणीतरी सरकारी अधिकारी असणार हे ताडून जगूभाऊ हसतमुखाने स्वागताला पुढे आले. लगेच ओसरीवरच्या घंगाळात गड्याने गरम पाणी आणून ओतले.
शाळा तपासणीसाठी बाई आल्या आहेत हे कळताच खोतीण बाई ओसरीवर आल्या आणि हात जोडून त्यानी म्हपणकर बाईना आत न्हेलं. पावसात चिंब भिजलेल्या बाईना त्यानी सरळ न्हाणी घरात न्हेलं . त्याना हो नाही म्हणायची सवडच दिली नाही. चुरचुरीत वाळलेले दोन पंचे दांडीवर होते. बाईंची आंघोळ झाल्यावर कामवालीने त्यांचे कपडे पिळून मागच्या पडकीत बायका माणसांसाठी असलेल्या परशावर वाळत घातले. मंडळी वाड्यावर पोचली तेंव्हा सव्वाबारा वाजले होते.
तिथून जवळच्याच गुरव वाडीत जंबारी नंबर एक च्या शाळेचे मुख्याध्यापक राणे गुरुजी बिऱ्हाड करून रहात त्याना भाऊंच्या गड्याने वर्दी दिली नी आश्चर्याने थक्क होत दहाव्या मिनीटाला राणे गुरुजी वाड्यात दाखल झाले. सोडये गुरुजींच घर चिवार वाडीत होतं. राणे गुरुजी आले, नी म्हापणकर बाईंशी त्यांची बोलाचाली झाल्यावर सोडये गुरुजी घरी जायला बाहेर पडले. पण खोतानी त्याना आग्रह करून जेवायला थांबवून घेतलं.
दुपारी अडीज वाजता उर्दू शाळेत चौकशी सुरु करायची होती. प्रोसिजर प्रमाणे गावचे सरपंच , पोलिस पाटील आणि तीन ग्रामस्थ पंच म्हणून असणे बंधनकारक होते. जगूभाऊ स्वत:च पोलिस पाटिल होते. तीन पंचांपैकी एक राणे गुरुजी होते. अन्य दोघे आणि सरपंच दादा प्रभु याना जगुभाऊनी गड्या मार्फत निरोप दिला. मंडळींची जेवणं उरकताहेत तोपर्यंत दादा प्रभु आणि दोन पंच वाड्यावर दाखल झाले. ते आले आणि सगळा लवाजमा उर्दु शालेकडे रवाना झाला. ते मुसलमान वाड्यात पोहोचले त्याच वेळी शाळेची घंटा ऐकू आली. मंडळी शाळेत पोहोचली तेंव्हा शाळेत वर्षभरापूर्वी उमेदवार म्हणून दाखल झालेला इंगळवाडीतला अली मास्तर जाग्यावर. बाकी मुख्याध्यापकांसह सहा शिक्षकांपैकी एकही महभाग हजर नव्हता. जगूभाऊनी म्हापणकर बाईंची ओळख करून दिली आणि मुख्याध्यापकांविरुद्ध ग्रामस्थांचा तक्रार अर्ज गेल्यामुळे शिक्षण मंत्र्यांमार्फत चौकशी कारवाई होणार आहे असं सांगताच. अलीमास्तर अक्षरश: थरथर कापायला लागला. पोरानी कुतुहलाने आलेल्या माणसांभोवती कोंढाळं केलं होतं. पोरं अली मास्तरांची अवस्था बघून खो खो हसायला लागताच राणे गुरुजी आणि सोडये गुरुजीना मुलाना बाजुच्या वर्गांमध्ये गप्प बसवून ठेवायला सांगितल. पुढच्या पाच मिनीटात शिक्षकी पेशात मुरलेल्या त्या गुरुजीनी सगळा कोलाहल शांत केला.
अली मास्तराना समजावल्यावर बाईनी त्याना शाळेचा मस्टर आणायला सांगितला. शाळेच्या मस्टरवर सात शिक्षकांची नांव होती त्यापैकी फक्त एक शिक्षक हजर होते. पैकी चार शिक्षकांच्या त्या दिवशी सकाळ सत्रापर्यंत सह्या होत्या. दोन शिक्षकांच्या तीन दिवसापूर्वी पर्यंत सह्या नव्हत्या. आणि मुख्याध्यापकांनी जुलै सुरु झाल्यानंतर एकही दिवस सही केलेलीच नव्हती. बाईनी अली मास्तराना दुपार सत्राची सही करायला सांगून बजावले, “तुम्ही उमेदवार अहात आणि वेळेवर शाळा उघडलात, आम्ही वाडीत आलो तेंव्हा आम्हाला शाळा उघडल्याचा गजर ऐकू आला म्हणून सही करायची मुभा देते. पण यापुढे कटाक्षाने ध्यानात ठेवा, शालेत वेळे आधी पाच मिनीटे यायचे आणि आल्याबरोबर मस्टरवर सही करायची. ” त्यांची सही करून झाल्यावर त्या म्हणाल्या, “आतामी काय सांगते ते लक्ष पूर्वक ऐका. चौकशी अधिकारी म्हणून मी तुम्हाला जे प्रश्न विचारीन त्याची सत्य आणि सत्य उत्तरेच द्यायची. कोणाची तरफदारी करण्यासाठी कोणाला वाचवण्यासाठी खोटे सांगाल तर गुन्हेगार बाजुला तुम्ही निष्कारण अडकाल. उमेदवार अहात, तुमची नोकरी जाईल. एखादी बाब उघड करून आपण अडचणीत येवू असे वाटले तर या प्रश्नाचे उत्तर मला देता येत नाही... नीटसे आठवत नाही असे सांगून निभावून नेता येईल पण कोणासाठी तरी खोटी दिशाभूल करणारी माहिती देवू नका.” मग प्रोसिजर प्रमाणे चौकशीचे काम सुरु झाले.
मुख्याध्याकांसह ज्यांच्या सह्या नव्हत्या त्या पैकी एकाचाही अर्ज दप्तरी नव्हता. सहा अनुपस्थित शिक्षकांपैकी तिघेजण सकाळ सत्रात हजर होते. दोन जण आदल्या दिवशी हजर होते. मात्र त्यानी आज रोजीचा रजा अर्ज किंवा अनुपस्थिती बाबत तोंडी निरोपही देलेला नव्हता. अली मास्तरांकडे दुसरीचा वर्ग दिलेला होता . त्या वर्गाची आज अखेर उपस्थिती नोंद केलेली होती. मात्र इतर सर्व वर्गांचे बाबत जुलै आरंभी तीन चार दिवस वगळता उपस्थिती नोंद केलेली नव्हती. जनरल उपस्थिती पट लेखन अली मास्तर कडे सोपविलेले असले तरी इतर वर्गांचे पट अपूर्ण असल्याने त्याना जबाबदार धरणे अयोग्य ठरले असते. इतर दप्तराबाबतही जुलै महातील नोंदी पूर्ण नव्हत्या. हे सगळे रामायण घडत असता शाळा वाडीत मध्यवर्ती जागी असल्यामुळे पटेकर मास्तराच्या चौकशी साठी मोठ्या बाई आल्या आहेत ही बातमी फुटली आणि वाडीतल्या लोकांची झुंबड शाळेभोवती जमली.
मुख्याध्यापक पटेकर मास्तर त्याच दिवशी पहाटे विजयदुर्गात गेलेले होते. मात्र वाडीतच होते. साहेबीण बाई चौकशीला आल्याचे वृत्त कळताच रशीद मास्तर, हरून मास्तर, आबिद मास्तर, मुसा मास्तर आणि जैनु मास्तर घाबऱ्या घुबऱ्या शाळेकडे धावले. मुसा आणि जैनु मास्तर बाईना ओळखणारे...... त्यानी निर्लज्जपणे बाईना दंडवत घालून हस्त हसत , “तुमी इलाव होय..... आमाशी वाटला का कोन मोटे सायब आयलेसत का काय..... ” त्यावर जरबेच्या आवाजात म्हापणकर बाई म्हणाल्या , “कोण तुम्ही? इथे काय काम आहे तुमचं? ” त्यावर दोघेही वरमले . सरपंच दादा प्रभु म्हणाले, “हे या शाळेतले गुरुजी जैनुद्दिन काजवे आणि इम्तियाज मुसा.” त्यावर बाई म्हणाल्या, “अस्सं ..... कायहो गुरुजी दुपारी शाळा किती वाजता उघडते हो? ” त्यावर ओशाळं हसतमुसा मास्तर बोलले, “नाय म्हंजे आमाला उशीर झायलाशे.... म्हंजे तेचा काय कि माजा बाबा दोन रोज झाले बीमार हाय... तेचा दोपारी जरा जास्त झाला म्हंताना जैनु मास्तर माज्ये घरी बाबाला भेटुला आयले.... नायतर अल्ला कसम आमी कदीच उसरा न्हाय येते.” आदल्या दिवशीच्या अनुपस्थिती बाबतही मुसा मास्तरानी थातुर मातुर स्पष्टीकरण देवून एक बार गलती माफ करो अशी आर्जवं करून पाहिली . त्याना जरबेत घेत बाई म्हणाल्या, “ मी शिक्षणाधिकारी साहेबांचे खास अधिकार पत्र घेवून चौकशी साठी आलेली आहे. तुम्ही तमीज सांभाळून बात करा. तुम्ही आज हजर होणार असाल तर आधी मस्टरवर सही करा.”
त्यांच्या सही पुढे बाईनी लेट मार्क केला आणि त्याना त्यांच्या वर्गासह शाळेची उपस्थिती घेवून मुलाना घरी सोडायची सुचना दिली. दरम्याने या नाट्याचा कर्ता करविता सुलेमान शाळेत आला. तक्रार अर्जाची शहनिशा करून घेवून तसा रिपोर्ट कार्याकडे द्यायचा असल्यामुळे बाईना त्याच्यासह संबंधित अर्जावर सह्या आंगठे देणारांपैकी जमेल तेवढ्या लोकांची भेट घेवून त्यांचे जबाब नोंद करून घ्यायचेच होते. हे समजल्यावर दुसरे दिवशी दुपार पर्यंत संबंधितांना हजर करायची जिम्मेदारी त्याने घेतली. मग जाब जबाब सुरु झाले. सर्वात आधी उमेदवार अली मास्तराचा जबाब झाला. बाईनी दिलेली सुचना तंतोतंत पालन करीत त्याने बाईनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आदल्या दिवशी उशिराने आलेल्या शिक्षकानी थातूर मातुर स्पष्टिकरण दिले. तीच री चौकशीच्या दिवसापूर्वी तीन दिवस अनुपस्थित असणारानीही ओढली. मुसा मास्तराने त्यातल्या त्यात शक्कल चालवून आपण टेबलाच्या ड्रॉवर मध्ये रजेचा अर्ज ठेवला होता. अली मास्तराना ही गोष्ट सांगितली होती पण त्यानी घाबरून काही सांग़णे टाळले. अशी मखलाशी करीत पंचांसमोर टेबलाच्या खणातून अर्ज आणून दाखवला. पण अली मास्तरानी ही बाब साफ नाकबूल करीत मुसा गुरुजीनी तो अर्ज गुपचुप ठेवून हा बनाव रचून तशी जबानी द्यायची आपल्याला गळ घातली असे सांगून मुसा मास्तराचे पितळ उघडे पाडले.
जाब जबाब सुरु असताना गुरव कारकून आणि स्वत: बाई टिपण गेवून ठेवीत होत्या. रिपोर्ट लिहायला बसवला. बाई एकेक मुद्दा सांगत होत्या आणि गुरव तो टिपून घेत होता. शिक्षकांचे आणि वरच्या वर्गातल्या काही मुलांचेही जबाब घेतले. गुरव कारकून अहवालाची कच्ची टिपणी करायला बसला. दरम्याने शाळेच्या इतर दप्तराची तापासणी बाईनी सुरु केली. शिक्षकानी आपापले उपस्थिती पट आणि इतर अपूर्ण रेकॉर्ड पूर्ण केले. हे काम रात्री उशिरा पर्यंत जागून एक हाती पूर्ण होणे गरजेचे होते ही कल्पना राणे गुरुजी अनुभवी असल्याने त्याना होती. म्हणून त्यानी सरपंचाना कल्पना देवून दोन पेट्रोमॅक्स आणवून घेतल्या. तसेच बाईंच्या रात्रीच्या जेवणखाण निवासा ची सोय जवळच्या बाबा ठाकुरांच्या घरात केली. त्यांचा अंदाज खरा ठरला. रात्री दोन वाजता काम पूर्ण करून बाई झोपल्या.
दुसरे दिवशी सकाळी सात वाजेतो आंघोळ वगैरे आवरून बाई तयार झाल्यावर ठाकरीण काकूनी केलेल्या कांदा पोह्यांचा नाष्टा करून साडे सातला शाळा उघडण्यापूर्वी सगळा लवाजमा शाळेत पोहोचला. आज मुख्याध्यापकां सह सगळे शिक्षक हजर होते. मस्टरसह सगळे दप्तर ठेवलेल्या वर्गाची चावी बाईंकडे होती ती घेवून वरक शिपायाने ती खोली उघडली. मग शिरस्त्याप्रामाणे प्रार्थना परिपाठ झाला. आजही चौकशी कामी जाब जबाब व्हायचे असल्यामुळे हजेरी घेवून मुलाना घरी सोडायची सुचना बाईनी दिली. मुले घरी गेल्यावर सर्व शिक्षकाना बोलावून बाईनी मस्टरवर आजच्या सह्या करायला सांगून मस्टर पुन्हा ताब्यात घेतला. मग पंचांसमक्ष गुरव कारकूनाने रिपोर्ट वाचून दाखवला. मस्टर आणि इतर रेकॉर्ड संदर्भात रिपोर्ट मधल्या नोंदी वाचल्यावर त्या यथातथ्य आहेत का ? याची खातरजमा करून घ्यायची सुचना पंचाना दिली. दप्तरविषयक अहवालावर मुख्याध्यापकांच्या आणि पंचांच्या सह्या झाल्यावर सर्व रेकॉर्ड हेडमास्तरांकडे सुपूर्द करण्यात आले.
मग ग्रामस्थांचे जाब जबाब घ्यायचे काम सुरु झाले. तक्रार अर्जात उल्लेखित तीन चार अपवाद वगळता झाडून सगळे लोक हजर होते. निगरगट्ट पटेकर मास्तराला दणका देणारी कोण ही बाई ? तिला बघायलाही बाया पुरुष मंडळी आलेली होती. गावाच्या आजपर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्यपूर्व काळात फक्त एकदाच सारा माफीच्या प्रकरणी मामलेदार खारेपाटण मार्गे लॉंचने आले होते. बाकी कोणीही सरकारी अधिकारी कसल्याच कामाला गावात आलेला नव्हता. शाळांमध्ये तर नवीन बदली होवून आलेले गुरुजी वगळता शिक्षण विभागातला एकही अधिकारी कधिच इकडे फिरकलेलाही नव्हता. त्यामुळे पटेकर मास्तराची चौकशी ही ग्रामस्थांसाठी सनसनाटी घटना होती. अर्जदारांचे जाबजबाब झाल्यावर अर्जातील तक्रारदारानी नोंदलेल्या मुद्यांप्रमाणे शिक्षकांचे जाबजबाब सुरु झाले. ग्रामस्थांचे जबाब सुरु असताना पटेकर मास्तरांनी काही ग्रामस्थाना धमकावण्याचा प्रयत्न केल्यावर बाईनी त्यांना कडक शब्दात वॉर्निंग दिली. तसेच सरपंच , पोलिस पाटील दोन्हीही गावातल्या वजनदार असामी असल्यानी त्यानी त्याला बाजूला घेवून हिंगाष्टक दिल्यावर मात्र चौकशी पूर्ण होईतो पटेकर मास्तर गुळणी धरून गप्प राहिले.
पटेकर मास्तराने तर कालचा चौकशीचा दिवस वगळता त्या पूर्वीच्या सर्व कामकाजाच्या दिवशी आपण हजर होतो. मात्र सह्या करायचे विसरून गेलो. या संदर्भात आपल्या सहकारी शिक्षकाना, ग्रामस्थाना विचारून शहानिशा करून घेण्याची विनंती केली. आदल्या दिवशी केलेल्या चौकशीत काही मुलानी मुख्याध्यापक कधितरी फक्त प्रार्थनेच्या वेळी शाळेत असतात नी त्यानंतर ते दात्यांच्या पेढीवर आणि उरलेला दिवसभर कौलाच्या वखारीत पत्ते खेळत बसतात असे सांगितले होते. तसेच तक्रारदार ग्रामस्थानीही अशीच माहिती अर्जात आणि प्रत्यक्ष चौकशीच्या वेळीही सांगितली. त्यांच्या सहकारी वर्गानेही प्रार्थना झाल्यावर आम्ही आपापल्या वर्गावर असतो त्यामुळे मुख्याध्यापक पूर्णवेळ शाळेत असतात की नाही सांगू शकत नाही, असेच जबाब नोंदवले. त्यामुळे पटेकर मास्तर खोटे स्पष्टिकरण देत आहे हे सरळ सरळ सिद्धच झाले. तरीही म्हपणकर बाईनी त्यावर कसलेच भाष्य न करता पटेकराना सांगितले, " हे पहा पटेकर गुरुजी, पूर्वीच्या सर्व कामकाजाच्या दिवशी तुम्ही हजर होता ही गोष्ट उपस्थितांपैकी कोणीही ठामपणे मान्य करीत नाहीत . अगदी तुमचे सहकारी सुद्धा त्याना माहिती नाही असेक्ह सांगतात. त्यावर पटेकर मास्तर बोलले, " माजी बीबी मच्छिचा धंदा करून चार पैसे कमावते म्हणून सगले लोक माज्यावर जलत सासतात. म्हणून मल अडचणीत आणायच्या साटना सगळे लोक खोटा बोलत आहेत. तुमी तेंच्यावर इस्वस ठेवू नका. अल्ला कसम मी पुरावेळ शालेत हजर आसतो. शालेच्या टायमात कुटेबी भायेर जात नाही. "


दरम्याने पट्टेकर मास्तरांच्या दोन्ही पत्नी शाळेत आल्या . मास्तरानी अंगुली निर्देश केल्यावर पुढे होवून त्यानी बाईंचे पाय धरले. मेव्हणीशी लग्न केल्याचा राग धरून सुलेमान ने बदला घेण्यासाठी हा खोटा अर्ज केलेला आहे, आमचा मच्छीचा धंदा आहे तो लोकांच्या डोळ्यावर येतो. अर्ज करणारांची आमच्याशी दुष्मनी आहे. असे गाऱ्हाणे नोंदले.
संध्याकाळला चाळीस पानी पक्का अहवाल तयार करून त्यावर पंचांच्या सह्या झाल्यावर चौकशीचे काम आटोपले. रात्री पटेकर मास्तर फ़ातुला घेवून खोतांकडे रदबदली करायला आलेला. मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवून त्याने खोताना गळ घातली. ते पोलिस पाटील असल्यामुळे अशा प्रकरणात या स्टेजवर गेलेले प्रकरण दाबता येत नाही. तसा काही प्रयत्न केला तर बाई निस्पृह आहेत.... गोष्ट आंगलट येईल . एकूण प्रकरणाचा विचार करता पटेकर मास्तराची बाजू नमती आहे. काही तरी खोटे नाटे स्पष्टीकरण देवून अधिक अडकण्या पेक्षा खात्यामार्फत काय कारवाई होते हे कळेपर्यंत दम काढणे शहाणपणाचे ठरेल असा सल्ला देवून त्याला वाटेला लावला. दुसरे दिवशी सकाळी चौकशी कामी आलेली मंडळी मार्गस्त झाली. नशिबाने परतीच्या प्रवासात पावसाने दडी मारल्यामुळे तंगडतोड या व्यतिरिक्त काही त्रास झाला नाही.
शिक्षणाधिकारी साहेब म्हापणकरबाईनी दिलेला चौकशी अहवाल वाचून कमालीचे खूष झाले. त्यानी पुढच्या कार्यवाहीचे आदेश दिले. संबंधितांचे अनुपस्थित दिवस बिनपगारी करून वेतन कापण्यात आले. तीनही शिक्षकांची शिक्षेदाखल मंडणगड / खेड तालुक्यातल्या टोकाच्या शाळांमध्ये बदली करण्यात आली. पटेकर मास्तराची एक वेतनवाढही प्रलंबित करण्यात आली. दरम्यानच्या काळात कोणा कोणाशी सल्ला मसलती करून तिघाही शिक्षकानी योग्य मार्ग निवडले होते. बदली झालेल्या शाळेत हजर होवून तिघानीही दीर्घ मुदतीच्या रजा घेतल्या. पटेकर मास्तराना मिळालेली शाळा जंबारी सारखीच एका बाजुला, संपर्क करायला दुस्तर होती. पाच वर्षात पटेकर मास्तर जेमतेम पंचवीस दिवस त्या शाळेत हजर असतील नसतील ...... महिन्याचा पगार घ्यायला मात्र ते हुकमी खेप घालीत. पाच वर्षे खेड मधली शाळा फाट्यावर मारून कधी जंबारीत तर कधी विजयदूर्गात ते राजरोस फिरायचे. पाच वर्षानी जिल्हा डिस्ट्रिक्ट बोर्डात पटेकर मास्तरांच्या खालाचे जमाई , मुसाकाजीचे बदरुद्दिन होडेकर मेंबर झाल्यावर आठ दिवसात पटेकर मास्तरांच्या बदलीचा हुकुम निघाला आणि मास्तर पुन्हा जंबारी उर्दू स्कूलात मुख्याध्यापक म्हणून हजर झाले.
※※※※※※※※