Mala Space havi parv 1 - 47 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४७

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४७

प्रियंका जाऊन आता वर्ष झालं.निरंजन आता बराच सावरला होता.ऑफीसमध्ये जायला लागला होता. प्रियंकाला कॅंन्सर झाला आहे हे कळून ती हे जग सोडून गेली तेव्हा पर्यंतची दोन अडीच वर्ष दोन्ही कुटुंबांना खूप धकाधकीची गेली. यात नेहाचीपण बरीच धावपळ झाली. आता पुढे काय होणार हे बघू.

नेहा ऑफीसमध्ये निघताना ऋषी तिला येऊन बिलगला.

“काय रे पिल्लू? काय झालं? मी ऑफीचला जाऊ नं?”

ऋषीसारखं नेहाने बोबड्या भाषेत म्हटलं.

“आई तू तदी येनाय धरी?”

ऋषीला बरेच शब्द अजून बोलता यायचे नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना तो काय म्हणतो ते कळायचं नाही. घरचे मात्र खूप हसायचे.

“पिल्लू आई आता संध्याकाळी येईल.”

“म्हनदे कदी? तिती वादता?( म्हणजे किती वाजता?)

“तू आद लोतर येछील?( तू आज लवकर येशील?)”

“कारे पिल्लू?”

नेहाने पायात सॅंडल घालता घालता विचारलं.

“अगं मी रोज बागेत घेऊन जाते नं तिथे पागनीस नावाच्या आजी येतात. त्या ऋषीला म्हणाल्या तुझ्या आईला घेऊन येशील का? माझी ओळख करून देशील का? म्हणून तो तुला असं विचारतोय. “

सुधीरच्या आईने ऋषीच्या प्रश्न विचारण्यामागची हकीकत सांगितली.

“अच्छा.असं म्हणाल्या तुला त्या आजी.”

“हो. तू येतील ता?”

“हो येईन.मी ऑफीसमधून निघाले की मी नंदा आजीला फोन करीन मग तू त्या आजीला सांग”

यावर ऋषी लगेच सुधीरच्या आईला म्हणाला,

“नंदाआजी तू तांगशील मला आईंचा फोन आला की विचऊ ( विसरू) नको.”

“नाही विसरणार.”

नंदा आजी हसत म्हणाली.

“मी जाऊ पिल्लू आता ऑफिसला?”

“हो.’

“नंदा आजी एका मुलाने एका गालात गुलाबजाम लपवलाय आणि एका गालात पेढा लपवलाय आहे तुला माहित आहे का?”

“नाही बाॅ मला नाही माहित. कोण आहे ग तो मुलगा?”

“नंदा आजी मी आहे तो मुदगा”


ऋषी खुर्चीवरून खाली टुनकन उडी मारत म्हणाला.

“अगो बाई हो का मग मला पण गुलाब जाम आणि पेढा देशील का?”

“हो पण आदी आईला.”

“कारे मला का नाही देणार आधी?”

“आजी आई हापीतमधे जाते नं म्हनून.”

या त्याच्या वाक्यावर नेहा आणि नंदा आजी दोघीही हसायला लागल्या.

ऋषीने आपल्या गालात लपवलेले गोड गुलाबजाम आणि पेढा नेहाला दिला नंतर तिच्या गळ्यात हात टाकून नेहाला मिठीत मारली आणि तिच्या गालाची पापी घेतली.

नेहा हसतच हा ऋषीच्या मायेचा सुगंधित दरवळ अंगभर पेरून ऑफिसला निघाली.

****

नेहा ऑफीसला आली आणि रोजच्या कामाच्या धबडग्यात बुडून गेली.

लंचटाईम मध्ये नेहा आणि रंजना आपल्या नेहमीच्या जागेवर आल्या. डबा उघडताना रंजना म्हणाली,

“नेहा मी आठवड्यापासून बघतेय तू नेहमी सारखीच बोलतेस, काम करतेस पण तरी मला मनातून वाटतंय की तुझं काहीतरी बिनसलं आहे. तू दाखवते आहेस वरवर सगळं छान आहे पण मला वाटतं तसं नाही. तुझ्या मनात वेगळेच काहीतरी आहे.काय झालं आहे सांगशील?”

रंजनाचा प्रश्न नेहाला अनपेक्षित होता त्यामुळे ती दचकली. रंजना म्हणाली तसं नेहाच्या मनात वेगळेच विचार चालू होते.पण ते रंजनाला कसं कळलं याचं तिला आश्चर्य वाटलं.

“नेहा अशी काय बघतेस माझ्याकडे मी तुला काही तरी विचारलय?”

रं”जना तू बरोबर ओळखले. गेले दोन तीन वर्षांपासून इतकी धावपळ झाली आहे माझी. शारीरिक, भावनिक दोन्ही बाजूंनी. त्यात ऑफीसच्या ताण वेगळाच असायचा. या सगळ्यामुळे मी खूप थकले.”

“खरय खूप धावपळ झाली तुझी. तू थकली असशील मग जरा दोन तीन दिवस सुट्टी घे आणि आराम कर.”

“माझ्या फार सुट्ट्या शिल्लक नाहीत. ऋषीसाठी सुट्टी वाचवून ठेवावी लागते. मला पण कधी बरं नाही असं होऊ शकतं.”

“मग आराम कसा करशील?”

“मला तेवढा आराम पुरेसा नाही. अगं प्रियंकाला जाऊन वर्ष झालं तरी अजून कुठून कुठून नातेवाईक येतात आईबाबांना भेटायला.”

“अगं नेहा तुमचं गोतावळा किती आहे ! तुझ्या लग्नात बघीतलं. “

“आऊचा काऊ तो माझा मावसभाऊ कितीतरी नातेवाईक असे आहेत. पण ते आले की इतके सख्खे नातेवाईक होतात की काही विचारू नकोस.”

“बरं बाई नाही विचारत.”

हे म्हणताना रंजना किंचीत हसली.

“ऐ गंम्मत कसली सुचतेय तुला? मी एवढा महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलतेय.”

“साॅरी. मला वाटलं थोडं विनोद केला तर तुझा ताण जरा हलका होईल म्हणून बोलले.बोल तू.”

“अगं परवा जबलपूरचे कोणी आते मामे भाऊ का कोण ते आले होते. अग मला अजून त्या नात्यातील गुंतागुंत कळत नाही. कोणाचा कोण? येतात राहतात चार पाच दिवस. बरं राहण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण ते असेपर्यंत प्रियंकाचा विषय संपतच नाही. प्रियंका नाही या दु:खातून आईबाबा दोघं जरा बाहेर यायला बघतात तर हे आलेले पाहुणे पुन्हा त्यांना या दु: खाच्या दरीत ढकलतात. वैताग आलाय.”

“खूप जणांना कळत नाही की वारंवार त्या दुःखद घटनेबद्दल बोलून आपण ज्यांच्यावर हा प्रसंग आलाय त्यांना अजून दुःख देतो. पण यावर काही उपाय नाही.”

“रंजना हे पाहूणे गेले की आठ दहा दिवस आईबाबा त्या दुःखाच्या ऊन्हात असतात. त्यांच्या मनाला पूर्ववत करण्यासाठी मला आणि सुधीरला इतके कष्ट घ्यावे लागतात. ऋषीचं आणखी वेगळं काही तरी असतं.”

‘अगं या सगळ्यात ऋषीचा त्रास काय आहे?”

“ते पाहुणे बडबड करताना बघत नाही आजुबाजुला ऋषी आहे. तो लहान आहे. त्याला काही कळत नाही. तो त्यांच्या तोंडून काहीतरी ऐकतो त्यातले काही शब्द अनोळखी वाटले की मला विचारतो. त्यांचा अर्थ आपण सांगीतला नाही की रडरड करतो.”

“अगं मला एक गोष्ट आठवली. आमच्या शेजारी राहणारे काका अचानक गेले. हार्टॲटॅकने गेले. खरंतर त्या काकूंचीच तब्येत मधे ठीक नव्हती. जवळपास महिनाभर दवाखान्यात होत्या. त्या काकूंचं सांत्वन करायला त्यांच्या भीसीतील बायका आल्या होत्या. हताश बसलेल्या काकूंजवळ बसल्या. त्यातली एक काकूंना धीर देण्याऐवजी काय म्हणाली कसहो देवांनी तुमच्या मिस्टरांना नेलं? इतके ठणठणीत होते. तुम्ही जायच्या ऐवजी तेच गेले.”

“काय? अगं असं म्हणाली ती बाई?”

‘अगं मी तिथेच होते मला त्या बाईचं बोलणं ऐकून इतका धक्का बसला.काकूंना सुद्धा धक्का बसल्या त्या बघतच बसल्या आपल्या मैत्रीणीकडे. बघ लोकांना असं भान रहात नाही बोलतांना”

“कठीण आहे.पण रंजना मी खूपच कंटाळले आहे या नातेवाईकांना.”

“कंटाळून करशील काय? सांत्वनासाठी येणा-या नातेवाईकांना येऊ नका असं कसं म्हणू शकतो?”

“म्हणून तर सगळा प्रश्न येतो. महिन्याचं बजेटपण बिघडलं. ते पाहुणे गेल्यानंतर मी आईंना काही बोलू शकत नाही कारण आईबाबा दोघंही प्रियंकाच्या आठवणीत बुडालेले असतात. ऋषीमुळे घरातील वातावरण चांगलं हसतंखेळतं होत न् होतं तोच पुन्हा कोणीतरी येतं.”

“नेहा तुझ्या सासूसास-यांनीच जर स्पष्टपणे सांगितलं की आता कोणी सांत्वनासाठी येऊ नये. तरच कोणी येणार नाही. पण हे ते सांगतील का?”

“काय माहिती !”

“सुधीरला सांगून बघ आईबाबांना सांगायला.”

“हं. हल्ली या पाहुण्यांमुळे आम्ही दोघं स्वस्थपणे एकमेकांना भेटतच नाही. सुधीरही वैतागला आहे. प्रियंकाच्या आजारपणात एवढी धावपळ होऊन जितकं आम्ही शारीरिक आणि भावनिक थकलो नाही तेवढं या नातेवाईकांची ऊस्तवारी करताना थकलोय.”

“नेहा सुधीरला सांगणं जमतय का बघ. एकदम हताश होऊ नकोस.”

“या सगळ्यामुळे मला ऋषीकडे लक्ष देणं जमत नाही. ऋषी किती लहान आहे पण खूप समजूतदार आहे. काही हट्ट करत नाही. त्याला कळत होतं प्रियंका आत्याला काहीतरी झालं आहे. प्रियंका खूप लाडाची होती ऋषीची. प्रियंकाचा पण खूप जीव होता ऋषीवर.”


“प्रियंकाचं खूपच शाॅकींगच होतं. कान काय दुखतो आणि त्यातून कॅंन्सर काय निघतो सगळंच अघटीत घडलं.”
रंजनाने बोलल्यावर एक नि: श्वास सोडला.

“होनं. रंजना तुला सांगते मी लग्न होऊन आले तर प्रियंकाने मला इतकं छान समजून घेतलं. नणंद हे कॅरेक्टर खूप त्रासदेऊ असतं हेच मी बहुतेकांकडून ऐकलं होतं.”

“प्रियंकाला मी फक्त एकदोनदाच भेटले . खूप चुलबुली वाटली पण तरी अगाऊ नव्हती.”

“अजीबात अगाऊ नव्हती. मी सगळी माहेरची माणसं सोडून आले म्हणून मला इतकं समजून घेतलं. एकदोनदा असं झालं की मला आईबाबांची खूपच आठवण येत होती. वरवर मी हसत होते,बोलत होते. मनातून आईंना विचारावं वाटत होतं की मी माहेरी जाऊ का? पण माझी हिंमत नाही झाली.”

“मग? माहेरी गेलीच नाही का?”

“प्रियंकाने ओळखलं. मला विचारलं आईकडे जावसं वाटतंय का? मी क्षणभर काहीच बोलले नाही. तशी ती म्हणाली मी सांगते आईला. तू जाऊन ये चार दिवस. आईची काही हरकत असणार नाही पण सुधीरचं बघ बाई. आणि माझ्याकडे बघून हसली.”

“सासूबाईंनी दिली का परवानगी?”

“हो. कशी परवानगी दिली माहिती?”

“कशी?”

“आम्ही रात्री सगळे जेवायला बसलो तेव्हा सासूबाई सुधीरला म्हणाल्या सुधीर मी नेहाला चार दिवसांसाठी माहेरी पाठवतेय. त्यांनी इतक्या स्पष्ट सांगितलं की सुधीरलाच काय मला पण आश्चर्य वाटलं.”

“खरय सासूबाई आपणहून म्हणणं ही नवलाची गोष्ट आहे.”
रंजना आश्चर्य चकित स्वरात बोलली.

“ऐक नं पुढे. सुधीर कसा म्हणाला आई आत्ता काय आहे? सण वगैरे तर काही नाही मग कशाला नेहाला माहेरी पाठवायचय?”

“असं म्हणाला?”

रंजनाच्या चेह-यावर हसू होतं.

“होनं. सासूबाई म्हणाल्या ते घर तिचं माहेर आहे. तिला जावसं वाटणारच. नेहा जा तू आईकडे तुला जेव्हा यायचं तेव्हा ये. रंजना हे वाक्य सुधीरकडे बघून नंतर माझ्याकडे डोळा मिचकून बघत म्हणाल्या. सुधीरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.”
यावर रंजनाला हसायला आलं तर नेहाच्या डोळ्यासमोर सुधीरचा तेव्हाचा चेहरा आला आणि तिलाही हसायला आलं.

“तुझी सासू मोकळ्या स्वभावाची आहे हे तुझं नशीब.”

“हो. सासू सासरे नणंद तिघही माझ्या नशिबाने खूप समजूतदार मिळाले. प्रियंकाचा सहवास मात्र मला फार काळ मिळाला नाही. रंजना मी या तीन वर्षांत कंटाळले. जास्त या वर्षभरात कंटाळले. नातेवाईकांच्या घोळक्यातून बाहेर पडून लांब पळून जावं वाटतं.”

“ जाऊन जाऊन कुठे जाणार? लग्न झाल्यावर बाईचा मुक्काम तिचं घरचं असतं. कुठेही जाण्याची तिला परवानगी नसते. “
डबा बॅगेत ठेवताना रंजना म्हणाली.

“नातेवाईकांची घर नसतात का? त्या बायका फेविकॉल सोबत घेऊन येतात असंच वाटतं मला.”

नेहाने नातेवाईकांच्या बायकांना फेविकॉलची उपमा दिलेली ऐकून खूप हसायला आलं.हसता हसता शेवटी तिला ठसका लागला.
“ पाणी घे.ठसका लागला आहे तुला. तुला हसायला येतय. मला शिक्षा असते हे नातेवाईक आले की.रंजना खरच मला पळून जावसं वाटतंय कुठेतरी.”

“चला लंचटाईम संपला.तुला कंटाळा आला असला तरी ऑफीस सोडून पळतात येणार नाही. चल डबा बंद कर.नेहा तू आज डबा संपवला नाही.”

“ खायची इच्छा नाही.ऊद्या ते अकोल्याचे कोणी पाहुणे येतात आहे.”

नेहाचा चेहरा वैतागलेला होता.

“ काय? पुन्हा पाहूणे येतात आहे?”

रंजना खुर्चीवरून उठलेली पुन्हा धपकन खुर्चीवर बसली.

“ बसला नं तुला शाॅक? असेच शाॅक मला बसतात.”

“ अगं तुमचे येणारे पाहुणे कधी संपणार की नाही?”

“ काय माहिती.”

“ अख्ख्या जगात यांचे नातेवाईक आहेत का?”

“ तेही माहीत नाही.”

“ नेहा मी समजू शकते तुझी मनस्थिती. पण चल ऊद्या बोलू लंच टाईम मध्ये.”
रंजना म्हणाली.

“ स्वयंपाकाला सरस्वती बाई आहेत म्हणून माझी ठाकूरकी आहे. नाहीतर मला किती सुट्या घ्याव्या लागल्या असत्या. सरस्वती बाई नसत्या तर कदाचित मला ऑफीसने पर्मनंट सुट्टी दिली असती.”

“हं खरय.चल”

दोघी डबा घेऊन कॅंटीनबाहेर पडल्या.

_________________________________
कथा मालिका हळूहळू पुढे सरकते आहे.बघू पुढे काय होईल ते.