Mala Space havi parv 1 - 23 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २३

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २३

मला स्पेस हवी पर्व १ भाग २३

मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन येतो.आज बघू ऋषीशी नेहा बोलतेय का?

लंचटाईम झाला तसं अपर्णाने नेहाला फोन केला. आपल्या टेबलावरचं आवरून ड्राॅवरला कुलूप घालत असतानाच अपर्णाच्या फोन आला,
" मॅडम लंच टाईम झाला."

" हो निघुया."

"ठीक आहे.मी येते."

नेहा आणि अपर्णा दोघी कॅंटीनमध्ये गेल्या.

"मॅडम तुम्हाला आवडतो तसा रस्सा आणलाय आज मी."

"स्कुटीने येतेस नं ?रस्सा भाजी आणलीस डब्यात?"

"हो "

"अगं तू टूव्हिलरने येतेस तर डबा हिंदकळत नाही?"

"मी डिकीत ठेवते. डब्याच्या बाजूला भक्कम पॅकींग देते. मी नेहमी डबा तसाच आणते."

"मागच्या वेळी मी तू आणलेला रस्सा खाण्यातच इतकी मग्न झाले होते की रस्सा भाजी डब्यात कशी आणलीस हे विचारायची विसरूनच गेले."

नेहा हसायला लागली अपर्णाला पण हसू आलं. हसता हसता नेहा म्हणाली,

"मी जाम खादाड आहे अपर्णा. इतके एकसेएक पदार्थ जर तू डब्यात आणशील तर तुला माझा बेचव डबा खावा लागेल"

"काहीतरी काय मॅडम तुम्हीपण स्वयंपाक छान करता."

"मी खादाड असली तरी वेगवेगळे पदार्थ मात्र ऋषी आणि सुधीरच्या आवडीचेच होतात."

नेहा हे बोलली आणि तिला जोरात ठसका लागला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अपर्णाने झटकन पाण्याचा ग्लास पुढे केला. अपर्णा तिच्याही नकळत ऊठली आणि तिने नेहाच्या पाठीवर चोळायला सुरुवात केली. बराच वेळाने नेहाला लागलेला ठसका कमी झाला.

"बरं वाटतंय का मॅडम.?"

अपर्णाने नेहाच्या पाठीवर चओळतच विचारलंं.

"हो. तू बस आता. "

"मॅडम पाच मिनिटे थांबा.लगेच जेऊ नका."

मानेनेच नाही म्हणत नेहा विचार करू लागली. ऋषी आणि सुधीरचं नाव निघताच मला एवढा ठसका का लागावा? मी सगळी नाती लांब ठेऊन बंगलोरला आले तरी ही नाती प्रत्यक्षात दूर झालीच नाही का? मी या नात्याच्या विळख्यातून बाहेर येऊ शकणार आहे की नाही? मला मुक्त जगायचंय म्हणून इथे आले. मी माझ्या बाजूने सगळी नाती एका तिरोजत बंद करून आली तर मग हा ठसका लागायला नको. का मनाचं दार थोडं किलकिलं उघडं राह्यलं आहे म्हणून हा ठसका लागला. नाही असं व्हायला नको मला पूर्णपणे मोकळीक हवी आहे.

"मॅडम बरं वाटतं आहे नं की?"

"साॅरी मला ठसका लागल्यामुळे तुझ्या जेवणाचा विचका झाला."

"नाही हो मॅडम तुम्ही असा का विचार करता. ठसका कधी सांगून लागतो का"

"तेच तर ठसका सुद्धा आधी वाॅर्निंग देऊन आला पाहिजे."

"मॅडम तुम्ही हे मजेशीर बोललात."

"अगं हो. खरंय. महत्वाच्या मिटींग मध्ये जर असा ठसका लागला तर?"

"मॅडम जेवा आता. ठसका गेला असेल आता."

"हौ"

"मुलाची आणि मिस्टरांची आठवण आली असेल म्हणून ठसका लागला."

अपर्णा म्हणाली पण यावर काही न बोलता नेहा फक्त हसली. दोघीही जेऊ लागल्या

"मॅडम तुम्हाला सांगू मी आमच्या आदूशिवाय कुठेही गेले ना तरी त्याची फार आठवण येते. "

"किती वर्षांचा आहे?"

"आठवीत आहे."

"अरे बराच मोठा आहे."

"हो तेच नं आमच्या युवराजांना आता अक्कल फुटली आहे म्हणतो कसा ममा मी आता मोठा झालोय. ज्युनिअर केजीचा फिल नको आणू मला. हे बोलताना असा काही चेहरा करतो नं!"

एवढं बोलून अपर्णा खूपच हसायला लागली. नेहाला मात्र हसू आलं नाही ती ऋषी आणि अपर्णाच्या आदूच्या वयाची तुलना करू लागली.

ही अपर्णा तेरा वर्षांच्या आपल्या मुलाशिवाय राहू शकत नाही मी कशी राहू शकते आपल्या पाच वर्षाच्या मुलाशिवाय? मी खरंच राहू शकते आहे की मला ते जमत नाही आणि ते जमविण्यासाठी माझी धडपड चालू आहे? काय आहे नेमकं सुधीरच्या फोनच्या कल्पनेनेही मला नको तो फोन असं का वाटतं मग आत्ता हा ठसका का लागला?

"मॅडम पुन्हा कसल्या विचारात गुंतलात?"

"अं"

नेहा आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.

"जेवण राह्यलय. थोड्याच वेळात लंच टाईम संपेल."

"साॅरी."

दोघी मुकाट्याने जेऊ लागल्या. अपर्णाला जाणवलं की ठसका लागल्यापासून मॅडमचं काहीतरी बिनसलं आहे. काय बिनसलं असावं या प्रश्नाभवती अपर्णाच्या विचारांची गाडी गोल गोल फिरत होती. ऊत्तर सापडत नव्हतं. ती निमुटपणे नेहाच्या चेहे-याचं निरीक्षण करत होती.

नेहाचे हात यांत्रिक पुणे पोळीचा तुकडा तोडत होते आणि भाजीत बुडवून तोंडात कोंबत होते. अपर्णाला नेहाची त्या क्षणाची हालचाल बघून घास खाते च्या ऐवजी कोंबते आहे हाच शब्द बरोबर वाटत होता. कारण नेहाच्या जेवणामध्ये कोणतीच प्रसन्न आणि आनंददायी हालचाल वाटत नव्हती. या मागचं कारण काय असेल हे शोधण्याचा अपर्णा प्रयत्न करत होती.

लागलेला ठसका की मी माझ्या आदूची आठवण सांगितली ते कारण असेल? विचार करून अपर्णाच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. अपर्णा नेहाला आत्ता आठ दिवसांपासून तर ओळखतेय. नेहाचा स्वभाव नेमका कसा आहे हे कसं कळेल जाऊदे. आपण ऑफीसच्या कामाशी काम ठेवावं हा विचार अपर्णाने केला आणि बंद करत म्हणाली,

"मॅडम चालायचं?"

"हो चल."

नेहानेही आपला डबा बंद केला. दोघीही उठल्या. त्यात नेहाच्या शरीराला खूपच मरगळ आली. आता काम कसं करावं याची विवंचना तिला पडली.नेहा गुपचूप असल्याने अपर्णाही गुपचूप चालत होती. दोघीही आपापल्या जागेवर गेल्या.

****

नेहा आपल्या जागेवर आल्यावर खुर्चीवर मागे डोकं टेकवून बसली आणि डोळे मिटून घेतले. अचानक तिच्या मनाला प्रचंड मरगळ आली. 'घर' की आपली 'स्पेस' या कात्रीत नेहा सापडली. तेवढ्यात नेहाचा फोन वाजला. काही रिंग वाजल्या पण नेहाच्या लक्षात आलं नाही.

फोन वाजून बंद झाला.पुन्हानेहाच्या फोनची रिंग वाजली. नेहाने कष्टाने डोळे उघडले आणि फोन बघीतला. फोनच्या स्क्रीनवर सुधीरच्या बाबांचं नाव दिसलं. तिने फोन घेतला.

"हॅलो"

महत्प्रयासाने नेहाने आपला आवाज नाॅर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला.

"नेहा मी सुधीरचा बाबा बोलतोय.आत्ता लंचटाईम होता म्हणून फोन केला. ऋषीला तुझ्याशी बोलायचय."

"हो "

"फोन त्याला देऊ का?"

"हो द्या नं."

"कामात आहेस का कामात असलीस तर रात्री करीन."

"आहे वेळ."

"हॅलो आई तू कशी आहे?"

"मी छान आहे तू?"

"मीपण छान आहे. मी तुला काल रात्री फोन करणार होतो पण बाबा म्हणाले की आई थकली असेल ऊद्या शाळेतून आल्यावर आजोबा तुला फोन लावून देतील तेव्हा आईशी बोलत.आई मी बाबांचं ऐकलं आत्ता फोन लावा म्हणून हट्ट नाही केला. मी शहाण्यासारखं वागलो नं ?"

"हो तू खूप शहाणा आहेस."

"आई मी तुला आवडतो ?"

ऋषीच्या या प्रश्नाने नेहा भांबावली. तिकडे सुधीरच्या बाबांच्या मनात कालवाकालव झाली. त्यांनी सुधीरच्या आईकडे बघीतलं त्यांचाही चेहरा ऋषीबद्दल वाटणा-या कणवेमुळे व्यथित झाला.

"आई मी माझी आई वर स्पीच दिलं नं ते आमच्या टिचरला खूप आवडलं."

"हो का शाब्बास."

या शब्दांमध्मे ऊस्फूर्तता आणि कानकोंडलेपणा हे दोन मिश्र भाव नेहाच्या आवाजात होते.

"आई तू ऑफिसमध्ये आहे."

"हो."

"तुझं ऑफीस दाखव नं."

"असं ऑफीस दाखवता येत नाही."

"तुझे साहेब रागावतील?"

"हो."

"आई तुझे साहेब तुला खूप रागावले नं तर तू आपल्या घरी येऊन जा. तू तिथे एकटी रडत नको बसू."

ऋषीच्या या बोलण्याने सुधीरचे बाबा इतके कळवळले की त्यांना पुढे ऋषीचं बोलणं ऐकवेना.

"ऋषी बाळा आई ऑफीसमध्ये आहे.फोन ठेवतोस का आता?"

"हो. आईला साहेब रागावतील."

"हो आई काम करतेय नं. तू जर होमवर्क केला नाही तर तुझ्या टीचर तुला रागावतात नं?"

"हो "

"मग आईला तिचे साहेब रागावतील. फोन ठेऊन दे."

"हो. आई "
"बोल."

नेहाने एक मोठा आवंढा गिळला.

"आई मी फोन ठेवतो नाही तर तुझे साहेब रागावतील"

"हो ठेव."

ऋषीने फोन ठेवल्यावर नेहाने येणारा हुंदका आवरला.
तिला आता काम करणं अशक्य वाटू लागलं खूप मोठ्या भावनिक वादळात नेहाच्या मनाची नौका सापडली होती. ती या वादळातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्न करत होती.

स्पेस हवी म्हणून आपण घेतलेला निर्णय चुकीचा नाही हे तिला पटत होतं पण आईच्या मनात आत्ता पर्यंत निकराने दाबून ठेवलेला ममत्वाचा हुंकार आता खूप वेगाने रेटा देऊन लागला होता.

आजवर याच हुंकाराच्या रेट्यात तिने स्वतःला हवीशी वाटणारी स्पेस गाडून टाकायचा प्रयत्न केला होता पण तो सफल झाला नाही. तेव्हाही नेहाची फरफट झाली होती आताही नेहाचीच फरपट होतेय. पण यातून मार्ग काढायला हवा. स्पेस हवी म्हणून जो निर्णय घेतलाय तोच नेटाने राबवायला हवा. सातत्याने या भावनिक भोव-यात अडकत राहिले तर संपून जाईन.

या विचारसरशी नेहा थोडी सावरली. तिला आत्ता या क्षणी मोकळ्या आणि शांत मनाने तिने सुचवलेल्या कल्पनांवर विचार करता येणं शक्य नव्हतं.

तिने सरळ ताम्हाणे सरांना फोन लावला.

"हॅलो"

"सर मला जरा बरं वाटतं नाही.मला रजा हवी होती."

"ठीक आहे. आराम करा. खूप बरं वाटतं नसेल तर वेळेवारी डाॅक्टरकडे जाऊन या."

"हो सर."

नेहाने फोन ठेवला आणि तडक आपलं टेबल आवरलं. पर्स घेऊन निघताना अपर्णाला फोन केला.

"अपर्णा मी घरी जातेय मला बरं वाटत नाही."

"ठीक आहे. काळजी घ्या."

"हो बाय."

"बाय."
फोन ठेऊन नेहा निघाली . अपर्णाला तिच्या जागेवरुन अस्वस्थ नेहा जाताना दिसली.
—------------------------------------------------------
पुढे काय होईल बघू पुढील भागात.