Mala Space havi parv 1 - 14 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग १४

Featured Books
  • DIARY - 6

    In the language of the heart, words sometimes spill over wit...

  • Fruit of Hard Work

    This story, Fruit of Hard Work, is written by Ali Waris Alam...

  • Split Personality - 62

    Split Personality A romantic, paranormal and psychological t...

  • Unfathomable Heart - 29

    - 29 - Next morning, Rani was free from her morning routine...

  • Gyashran

                    Gyashran                                Pank...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १४

मला स्पेस हवी भाग १४

मागील भागात आपण बघीतलं की नेहाला सुधीरच्या बाबांचा फोन आला होता . बघू नेहा फोन उचलते का?


" हॅलो बाबा बोला ."

" अगं कशी आहेस? पोचलीस नं व्यवस्थित?"

सुधीरच्या बाबांनी नेहाला विचारलं.

"हो पोचले. हाॅटेलही छान आहे."

सुधीरच्या बाबांनी अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून आधीच नेहाने हाॅटेल बद्दल सांगितलं.

" हो का. बरं. हे घे ऋषीशी बोल."

"हॅलो आई तू कशी आहे?"

ऋषीचा गोड आवाज कानावर पडताच नेहा थोडीशी हळवी झाली.

"मी छान आहे."

"आई मी आजी आजोबा आणि बाबांना त्रास देत नाही."

"वा! छान."

"आई तू काल घाबरली नाही नं?"

ऋषीच्या आवाजात नेहाला तिच्या बद्दल काळजी जाणवली.

"नाही."

"आज नं माझी एक्झाम झाली."

"हो का! "

"हो. आई परवा स्पीच काॅम्पीटीशन आहे. त्यात नं 'माझी आई' वर सांगायचं आहे."

नेहा यावर काहीच बोलत नाही.

"आई तू ऐकतेय नं?. मी स्पीच तयार केलं आहे. मी कोणाची हेल्प नाही घेतली. तुला म्हणून दाखवू?"

नेहा काहीच बोलू शकली नाही की फोन कट सुद्धा करू शकली नाही. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या पण तरीही ती पूर्वी सारखी मनमोकळेपणाने ऋषीशी बोलू शकली नाही. पुन्हा तिच्या मनाची रस्सीखेच सुरू झाली. तिला भीती वाटली की जेव्हा हे बंगलोरला येण्याचं पाऊल आपण ऊचललं तेव्हा खूप मनाची तयारी करावी लागली. आता आपण कुठे कमी पडलो तर सगळं विचित्र होईल.

"आई तू ऐकतेय नं? मी म्हणून दाखवू तुला?"

"हो म्हण."

कसाबसा हुंदका दाबून नेहा म्हणाली.

" आई मी सांगतो ऐक हं 'माझी आई ' मी माझ्या आईबद्दल तुम्हाला सांगणार आहे. माझी आई खूप हुशार आहे. ती माझी खूप काळजी घेते. माझा अभ्यास घेते. माझी आई मला खूप छान गोष्टी सांगते. माझी आई ऑफीसमध्ये जाते. ती ऑफीसमध्ये खूप काम करते तरी पण ती माझा अभ्यास घेते, मला बगीच्यात घेऊन जाते, मला आवडतो तसा शीरा करून देते. माझी आई मला खूप आवडते. आई आवडलं मी आपल्या मनानी लिहीलं.आई बोल नं!"

नेहाच्या डोळ्यातून अविरत अश्रू धारा वाहू लागल्या. क्षणभर ती द्विधा मनस्थितीत अडकली की एवढ्या छोट्या मुलाला सोडून आपण स्पेस शोधण्याचा निर्णय घेतला तो चुकला का? तिला कळेना. ऋषी तिला हाक मारत होता शेवटी ती कसंबसं बोलली.

" खूप छान लिहिलंय ऋषी तू."

" आई परवा मदर्स डे ला बोलायचं आहे."

" ऑल दी बेस्ट. ठेवू फोन."

" हो. आई तू एकटी झोपायला घाबरू नको हं. माझी आई स्ट्राॅंग आहे."

" नाही घाबरणार. ठेवू फोन."

" हो." म्हणत ऋषीने फोन ठेवला.

नेहा फोन ठेवताच धाय मोकलून रडली. तिला आपला निर्णय बरोबर का चूक तेच कळेना. बराच वेळाने तिचा आवेग शांत झाला. आवेग शांत झाला तसं तिच्या लक्षात आलं की गेले पंधरा दिवस तिच्या मनावर प्रचंड ताण आलेला होता. हा ताण तिला मोकळं करायला ऋषीचा फोन येणं हे निमित्त ठरलं.


क्षणभरासाठी नेहा 'टुबी ऑर नाॅट टूबी' या द्विधा मनस्थितीत अडकली होती. सुधीर बद्दल मनात हळूहळू निर्माण झालेली ऊदासीनता, इतर नात्यांच्या वलयातही जाणवणारं एकटेपण या सगळ्या गोष्टी ख-याच आहेत. हे नेहाच्या लक्षात आलं. मला आता स्वतःसाठी स्वतंत्र वेळ आणि जागा शोधलीच पाहिजे.

बराच वेळाने नेहा नाॅर्मल झाली. नेहा स्वच्छ चेहरा धुवून आली आणि तिने लॅंडलाईन वर नऊ नंबर डायल केला. तिकडून विचारणा झाल्यावर तिने जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येईपर्यंत टीव्ही लावून जे डोळ्याला दिसेल ते बघत बसली. आवडलं नाही की चॅनल बदलवत राहिली.

****

नेहाला फोन केल्यावर तो काय बोलतो याकडे सुधीरच्या आईबाबांचं लक्ष होतं.

" ऋषी आई काय म्हणाली?"

बराच वेळ ऋषी काही बोलला नाही म्हणून सुधीरच्या आईने विचारलंं.

" आईनी माझं भाषण पूर्ण ऐकलं."

ऋषीच्या चेहे-यावर खूप आनंद दिसला तो बघून सुधीरच्या आईबाबांनी ऋषीला फार काही विचारलं नाही. आई फोनवर बोलली या आनंदात ऋषीने वांग्याची भाजी सुद्धा खाल्ली. तिघांचं जेवण झालं आणि ऋषी खोलीत झोपायला गेला. सुधीरची आई स्वयंपाकघरातील मागचं आवरून ऋषीला गोष्ट सांगण्यासाठी खोलीत आली.

" आज एक मुलगा खूप खूश दिसतोय."

ऋषीकडे बघत सुधीरची आई हसत म्हणाली.


"हो आजी. आज आई माझ्याशी खूप बोलली. मी लिहीलेलं भाषण आईने ऐकलं आणि म्हणाली ऋषी तू भाषण खूप छान लिहिलंय. आजी मला माझी आई खूप आवडते."

" होनं. ऋषीची आई आहेच छान. आता गोष्ट सांगू?"

" नको आज गोष्ट नको."

" का? आज गोष्ट का नको?"

" असंच."

असं ऋषी आजीकडे बघून हसून म्हणाला आणि झोपेपर्यंत तो आपल्या आईविषयीच आजीला सांगत होता. ऋषीचा निरागसपणा बघून सुधीरच्या आईचं मन गदगदलं. त्यांनी मनाशी ठरवलं की ऋषीचं मन आपण जपायचं. आता नेहाची जबाबदारी आपली आहे याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली.

बोलता बोलता ऋषी झोपला. तो गाढ झोपला आहे याची खात्री करून घेऊन सुधीरच्या आईने त्याच्या अंगावर पांघरूण घालून त्या हळूच पलंगावरून उठल्या आणि खोलीबाहेर आल्या. समोरच्या खोलीत आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते बघून सुधीरच्या बाबांनी विचारलं,

" काय ग काय झालं? ऋषीने काही त्रास दिला का?"


"नाही हो. तो फार शहाणा मुलगा आहे. आज मला म्हणाला गोष्ट नको सांगू"

" कसं काय? त्याला तर गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही."

सुधीरच्या बाबांना हे ऐकून आश्चर्य वाटलं.

" हो. पण आज तो त्याच्या आईबद्दल बोलत होता. त्याला आई किती आवडते हे तो सांगत होता. "

"या वयात मुलांना आई खूप प्रिय असते.आई रागावली तर थोड्या वेळ रूसून बसतात पण जर भूक लागली तर आईचं हवी. झोप आली तर आईचं हवी. तेव्हा मुलं आई रागावली हे विसरून जातात. किती निरागस मन असतं या मुलांचं. मला सुधीर आणि प्रियंका दोघांचा अनुभव आहे. आई कितीही रागावली तरी आईचं प्रिय."

हे बोलून ते हसायला लागले.


" खरय. नेहा बंगलोरला गेली याचा आपल्या तिघांना किती राग आला पण ऋषी? त्याला वाटतंय आपली आई हुशार आहे म्हणून बंगलोरला गेली."

"हाच विचार आपण मोठे असून करू शकलो नाही. आपण ऋषीचा विचार करून नेहावर रागावलो पण या मुलाने तिच्यातल्या हुशारीला ओळखलं. आपल्या पेक्षा ऋषीकडेच सकारात्मक दृष्टिकोन आहे."

सुधीरचे बाबा म्हणाले.

" अगदी बरोबर बोललात. सुधीरला आल्यावर ऋषीचा समजूतदार पणा सांगायला हवा.आजकाल रोजच सुधीरला उशीर होतोय. किती थकलेला दिसतो. अशाने पोराची प्रकृती बिघडेल."

सुधीरची आई काळजीने म्हणाल्या.

" मला वेगळीच शंका येतेय."

" वेगळी शंका?"

आईच्या स्वरात आश्चर्य होतं.

" नेहा जाण्यापूर्वी हा उशीरा यायचा तेव्हा पहिल्या एकदोन वेळेस मला खरं वाटलं पण नंतर रोज उशिरा येऊ लागला तर दोघांमध्ये भांडण झालं का ही शंका येऊ लागली. "

" मलापण तसंच वाटलं. नेहा बंगलोरला गेली त्या दिवशी सुधीर किती अस्वस्थ झाला होता हे तुम्हाला आठवतंय नं?"

"हो. पण नेहा गेल्यानंतरही तो ऊशिराच येतोय. आठवड्याभरात जास्तीचं काम संपेल म्हणाला होता. आज विचारायलाच हवं.,"

"माझ्या मनातलं बोललात. आज विचारांचं. हे चांगलं नाही. ऋषीकडे बघ म्हणा तुझ्यापेक्षा तो लवकर सावरला. नेहाच्या बंगलोरला जाण्याच्या गोष्टीला ऋषीने केवढा सकारात्मक दृष्टीने घेतलं. माझा नातू एवढा समजूतदार आहे याचा मला खूप आनंद होतो."

" मला वाटतं सुधीरचा नेहाने बंगलोरला जाण्याला आक्षेप असेल पण तेवढंच कारण त्याच्या या अस्वस्थ होण्यामागे नसावं असं मला वाटतं."

" मग अजून काय कारण असू शकतं? तुम्हाला त्याच्या वागणूकीतून काही जाणवलं का?"

" त्या दिवशी मी सुधीरला काहीतरी विचारायला त्याच्या खोलीत गेलो होतो. काय विचारायला गेलो हे त्याचं फोनवर बोलणं ऐकल्यावर विसरलो."

" काय बोलत होता सुधीर की तुम्ही तुमच्या कामाचं विसरलात?"

" तो त्याच्या मित्राला म्हणाला की नेहा आमच्या संसारात परत आली नाही तर मी माझ्या आईबाबांना काय सांगू? मला नेहा परत यायला हवी आहे. आणि सुधीर रडायला लागला. नंतर मी तिथे मी उभा राहूच शकलो नाही."

" अहो पण तेव्हाच तुम्ही विचारायचं त्याला. उगीच इतके दिवस त्याच्या मनावरचा ताण का वाढवला? उगीच आपल्या समोर तो चेहरा नीट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला तरी तेव्हा बोलायचंं"

" हं तू म्हणतेस ते बरोबर आहे. चुकलच माझं. आता काय करायचं?"

"आज जेवण झालं की त्याला विचारू आपण आणि तो कसल्या अडचणीत असेल तर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू."

" हो तसंच करु. सुधीर यायची वेळ झालीच आहे.आज जेवायला थांबू आपण."

" हो. मला वाटतं त्याला आपण जेवताना काही प्रश्न विचारू नये म्हणून तो आपल्याबरोबर जेवायला येत नसावा आणि तुम्ही वेळेवर जेवा. दोघही डायबेटिक पेशंट आहात. मुद्दाम तो घरी उशीरा येत असावा."

सुधीरची आई म्हणाली.

" तशी शक्यता आता मलाही वाटायला लागली आहे. आज सोक्षमोक्ष लावूच."

" हो पण तुम्ही लक्षात ठेवा. जेवताना अजीबात नेहाचा विषय काढायचा नाही. वेगळ्या विषयावर बोलूया. जेवताना जर नेहाचा विषय काढल्यावर त्रासला तर तो नीट जेवणार नाही आणि खरं काय आहे ते आपल्याला सांगणार नाही. कळलं?"

" हो ग बाई कळलं. लक्षात ठेवीन."

सुधीरचे बाबा एवढं बोलून टिव्हीवर बातम्या ऐकायला गेले. सुधीरची आई देवापुढे डोळे मिटून बसली पण त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.

__________________________________
आईबाबांनी विचारल्यावर सुधीर खरं सांगेल का?
बघू पुढील भागात.