Power of Attorney 2 - 1 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

पहिल्या पर्वाचा सारांश.

विभावरीच्या फ्लॅट मधे, विभावरी आणि तिची मैत्रीण सानिका राहात असतात. विभावरीला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागतं. सानिकाला तिच्या ऑफिस मधे एक राम नावाचा तरुण भेटतो, आणि त्यांची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. राम तिला खोट्या भूल थापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतो. मग त्याचा थापांना फसून खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार करून विभावरी अमेरिकेत असतांना, तिचा फ्लॅट किशोर ला विकून टाकतात. पैसे हातात आल्यावर दोघेही जणं हुबळीला पळून जातात. सानिकाचा फोन स्विच ऑफ करून राम लपवून ठेवतो, त्यामुळे विभावरीचा सानिकाशी कॉनटॅक्ट तुटतो.

वर्ष झाल्यावर विभावरी भारतात वापस येते आणि आपल्या फ्लॅटवर जाते. तिथे तिला तिचा फ्लॅट किशोरच्या ताब्यात गेलेला आढळतो. बरीच वादा वादी झाल्यावर लक्षात येतं की हा सगळा उपद्व्याप सानिकांनी केला आहे. मग किशोर आणि विभावरी जाऊन पोलिसांत तक्रार करतात. किशोरनी बँकेतून घरा करता कर्ज घेतलेलं असत. बँक त्यांच्यावर चौकशी समिती बसवते. विभावरीचं घर गेलेलं असतं आणि किशोरला २० लाख बँकेला परत कारायचे असतात. या गोंधळाला निपटवण्यासाठी दोघांच्या भेटी गाठी होत असतात. त्यातच विभावरीला किशोरचा साधा  स्वभाव भुरळ घालतो आणि दोघांचं  प्रेम फुलतं.

पोलिस सानिकाला शोधून काढता आणि त्यांच्याकडून २२ लाख रुपये जप्त करतात. सानिकानी फ्रॉड करून घर विकलं असत, तो व्यवहार कोर्ट रद्द करतं आणि विभावरीला फ्लॅट वापस मिळतो. किशोरला सुद्धा कोर्टाचा निकाल आल्यावर २२ लाख मिळणार होते, तसं त्यांनी बँकेत कळवलं होतं. आता विभावरीचं आणि किशोरचं लग्न व्हायला काहीच अडचण उरली नसते.

याच्या पुढील कथा वाचा द्या पासून दुसऱ्या पर्वात. हे दुसरं पर्व देखील तुम्हा वाचकांना आवडेल अशी आशा करतो. धन्यवाद.

दिलीप भिडे.

 

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

भाग 1

किशोर आणि विभावरीच्या लग्नाचा मार्ग तर मोकळा झाला होता, पण किशोरची आर्थिक परिस्थिती बघता हे लग्न लवकर होईल असं वाटत नव्हतं. विभावरीच्या काकांना  लग्नाची बोलणी करण्यासाठी, केंव्हा बोलवायचं यावरच गाडी अडली होती. विभावरी रोज संध्याकाळी यायची आणि ती, किशोर आणि माई, यांची मीटिंग भरायची. किशोरचं म्हणण असं होतं की सध्या त्याची सर्व गंगाजळी घर घेण्यात संपून गेली आहे आणि कोर्टा कडून पैसे मिळाल्या शिवाय लग्नाचा खर्च करणं शक्य नाही. आणि त्याच्या या बोलण्यात तथ्य आहे, हे विभावरीने सुद्धा मान्य केलं होतं.

“किशोर, हा पैशाचा तिढा लवकर सुटेल असं वाटत नाही. कोर्ट, कचेरीच्या कामांना किती वेळ लागेल यांचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण मग मला सांग, आपल्या आयुष्यातले हे दिवस आपण फुकट घालवायचे का ?” विभावरीने प्रश्न उपस्थित केला. “माई, तुम्ही सांगा, काय करायचं ?”

“मी तर किशोरला सुचवलं होत, अकोल्याचं घर विक आणि लग्नासाठी पैसे उभे कर म्हणून” माई म्हणाल्या. “पण त्याला अजून पटत नाहीये.”

“नाही हो माई, माझ्या जवळ मी थोडे पैसे साठवले आहेत, ते वापरू की आपण. तुमचं काय मत आहे?” – विभावरी.

“’अग, असं कसं? लग्न होईपर्यंत दोन्ही कडचे खर्च वेगवेगळे असतात, तुझे पैसे कसे वापरणार आपण?” – माई.

माई बोलल्या त्यात तथ्य होतं. विभावरीला काही सुचेना. ती पुन्हा त्याच मुद्द्यावर आली. “किशोर, आपल्या आयुष्यातले हे दिवस आपण फुकट घालवायचे का? या प्रश्नावर तू काहीच बोलत नाहीस, मग हा तिढा कसा सोडवायचा?”

“हे बघ विभावरी, मला तुझं म्हणण पटतंय, आईला सुद्धा पटलंय, पण आमच्या जवळ तोडगा नाहीये. तू जरा समजून घे.” किशोरनी अडचण सांगीतली.

विभावरी हिरमुसली झाली. “मी किती दिवस अशी हॉस्टेल वर राहू? सांगा ना माई”

माईंना पण त्यांच्या लग्नाला होणारा विलंब फारसा पसंत नव्हता, पण किशोरचं म्हणण सुद्धा चूक नव्हतं, काल पासून त्या विचार करत होत्या, शेवटी तो विचार पक्का करून त्या म्हणाल्या,

“विभावरी, किशोर, माझ्या डोक्यात एक विचार आला आहे बघा  तुम्हाला पटतो का? आपले काही खूप असे नातेवाईक नाहीयेत, आणि अकोल्याहून कोणी येण्याची शक्यता नाहीये, तेंव्हा तुम्ही दोघं कोर्ट मॅरेज का करत नाही? म्हणजे कमीत कमी खर्चात काम होऊन जाईल. मग नंतर जंगी रीसेप्शन द्या.”

किशोर आणि विभावरी माईंच्या कडे पहातच राहिले. माई कडून असा काही प्रस्ताव येईल हे जरा अनपेक्षितच होतं. माई असं काही सुचवतील असं त्यांना वाटलंच नव्हतं. त्यांनी एकमेकांकडे पाहीलं किशोरचा चेहरा फुलला होता. तो म्हणाला “ अग आई, तुलाच काय वाटेल म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो, पण आता तूच परवानगी दिली आहे म्हंटल्यांवर कसलाच प्रश्न नाही. उद्याच जाऊन नोटिस देऊन येतो., काय विभावरी, तुला फक्त तुझ्या काकांना पटवावं लागेल.” विभावरी काही बोलली नाही, विभावरीचा चेहराच सांगत होता की तिला आयडिया एकदम मान्य आहे म्हणून. तिला काही बोलणं शक्य झालं नाही इतका आनंद झाला होता, तिने नुसतीच मान हलवली.

मग साधारण रूपरेषा काय असावी यावर बऱच  बोलणं होऊन विभावरी आनंदांनी हॉस्टेलला परतली. आता तिच्यापुढे काकांना सांगून त्यांचं मन वळवण्याचं एक मोठं काम होतं. पण त्याचं तिला काही टेंशन नव्हतं. खर्च कमी होतो आहे याची कल्पना आल्यावर, ते लगेच हो म्हणतील याची तिला खात्री होती. उगाच चार दोन आढे वेढे घेण्याचं नाटक करतील बस. शनिवारी काकांच्या कडे जायचं मनात नक्की करून तिने किशोरला तसा फोन केला.

शनिवारी, काकांच्या कडे विशेष असं काही घडलं नाही. विभावरीचा जसा अंदाज होता, त्याप्रमाणेच काकांनी थोडे आढे वेढे घेऊन, थोडी नापसंती दाखवून तिच्या बेताला संमती दिली.

पुढच्याच शनिवारी, किशोर आणि माई काकांना भेटायला गेले. विभावरी होतीच तिथे. लग्नाची बोलणी अशी काहीच नव्हती, फक्त मान पानांचं, आणि देण्या घेण्याचं  बोलणं होऊन बैठक संपली.

किशोरनी आधीच नोटिस दिली असल्याने,  त्या तारखेला लग्न पार पडलं. आता त्या दिवसांपासून विभावरी अधिकृत रित्या फ्लॅटवर राहायला आली. विभावरीच्या इच्छे नुसार दोघंही कुलू मनाली जाऊन आले. आता रुटीन सुरू झालं. सहा महीने कसे उडून गेले हे दोघांनाही कळलं नाही.

एक दिवस विभावरीने काही पुस्तकं आणली. किशोर आल्यावर त्यानी टेबलावर ठेवलेली पुस्तकं बघितली, त्याला कळेना ही बँकेच्या परीक्षेसंबंधी पुस्तक विभावरीने का आणली असावी?

“काय ग ही पुस्तकं तू आणलीस?” किशोरनी विचारलं.

“हो” विभावरी म्हणाली “आणि आज पासून तू अभ्यास सुरू करायचा.”

“आता हे काय नवीनच? मी काय आता अभ्यास करू शकणार आहे का?” – किशोर.

“करायचाच आणि परीक्षा देऊन पास पण व्हायचं. तुला ऑफिसर झालेलं बघायचं आहे माईंना.” विभावरीचं फायनल उत्तर.

“खरंच, तू एवढा हुशार, पण परिस्थितीमुळे तुला कारकुनाची नोकरी पत्करावी लागली, हे माझ्या मानाला फार लागत होतं. माझी खरंच इच्छा होती की तू ऑफिसर बनावं  म्हणून.” – माई आता जरा भाव विवश झाल्या होत्या.

“अग दिवसभर बँकेत डोके फोड करून रात्री आल्यावर अभ्यास करायचा, अग शिणलेल्या डोक्यात काय शिरणार आहे? ही विभावरी काहीतरी तुझ्या डोक्यात भरवत असते, आणि तुला तिने सांगीतलेलं सगळंच पटतं.” – किशोर वैतागून बोलला. विभावरी सारखी, कल्पनाही केली नव्हती अशी सुंदर आणि प्रेमळ बायको मिळाली असतांना, रोमान्स करायचं सोडून अभ्यास करायचा? त्याला काही हे पटत नव्हतं.

“माई, हा माझ्यावर का बिलं फाडतो आहे? तुम्हीच सांगीतलं म्हणून मी पुस्तकं आणली. आता तुम्हीच समजंवा त्याला.” – विभावरी फणकार्‍याने म्हणाली.

“तूच सांगीतलं असणार. कोणी तरी विचारलं असेल की नवरा काय करतो म्हणून? मग कारकुन आहे म्हणून सांगायला लाज वाटली असेल, नाही तर आज पर्यन्त कधी माईनी  विचारलं नाही मला परीक्षा देतोस का म्हणून?” – किशोर चिडून म्हणाला.

विषयाला वेगळाच वळण लागलं होतं. माई गप्प बसल्या. त्यांनी विभावरीला खूण केली. विभावरी काही उत्तर देणार होती पण माईच्या साठी ती पण चूप बसली.

काही न बोलताच जेवणं पार पडली. किशोर धुमसतच होता, पण बाकी दोघी काही बोलतच नव्हत्या. त्यामुळे तो अजूनच चिडला. आणि जेवण झाल्या झाल्या  तडक बेडरूम मधे झोपायला गेला.

“माई, सगळं उलटंच झालं हो, खूपच चिडला आणि वरतून मला वाटेल तसं बोलला. आता काय करायचं?” – विभावरी.

“अग असाच आहे, तो सहसा चिडत नाही पण चिडला की आपण काय बोलतो आहे, याचं त्याला भान राहत नाही. तू मनावर घेऊ नकोस, पण तू दुखावली गेली आहेस, हे मात्र त्याच्या नजरेस आणून दे. थोडा वेळ विचार केल्यावर त्याचं त्यालाच पटेल की तो चुकीचा बोलला ते. मग तू तुझं कौशल्य वापर आणि त्याला तयार कर. पण आता हे तुझ्याच हातात आहे. जा, ऑल द बेस्ट “  माईंनी समजावलं.

रात्री सगळी आवारा सावर करून विभावरी बेडरूम मधे आली तेंव्हा किशोर जागाच होता. विभावरी त्यांच्याकडे पाठ करून झोपली. थोडा वेळ तसाच गेला. किशोरला आता त्यांच्या बोलण्याचा पश्चाताप होत होता. काय  बोलावं हे सुचत नव्हतं. विभावरी सहजा सहजी मानेल अशी शक्यता नव्हती. तो स्वत:लाच दोष देत होता. माफी मागण्यावाचून गत्यंतर नव्हत.

“विभू, सॉरी मी असं बोलायला नको होतं.” – किशोर. विभावरीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

“विभू, असं काय करतेस? चिडू नको ना. मी आता सॉरी बोललो ना.” – किशोर.

“ए चुकलं माझं, तुझा राग मी समजू शकतो, पण सोड ना आता, बघ ना माझ्याकडे.” आता किशोर परोपरीने आळवणी करत होता. व्याकुळ  झाला होता बिचारा.

पांच मिनिटं झाली, विभावरीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. किशोर अस्वस्थ झाला. स्वत:लाच दोष देत तो विभावरीची समजूत कशी काढावी याचाच  विचार करत होता.

“ए चिडू नकोस ना इतकी, मी सॉरी म्हंटलं ना आता.” – किशोरचा फायनल प्रयत्न.

आता विभावरी उठून बसली. त्यांच्याकडे बघून हसली. म्हणाली “ अरे मी चिडले नाहीये. मी विचार करत होते आणि मला पटलंय आता.” किशोर गोंधळला. त्याला कळेना की काय पटलंय हिला? त्यांनी विचारले “काय पटलंय?”

“हेच की माझा नवरा कारकुन आहे, हे सांगण्यात लाज वाटण्यासारखं  काहीच नाहीये. उलट ही एक अभिमानाची गोष्ट आहे.” – विभावरी.

किशोर विभावरीच्या बोलण्याचा अर्थच लागला नाही. तो वैतागला. म्हणाला “ तुझा राग अजून गेला नाहीये. मी काय करू म्हणजे हा राग जाईल?”

“मी मुळीच रागावले नाहीये. मला विचारांती एक गोष्ट कळली आहे. आता मी काय सांगते ते ऐक.” – विभावरी.

“सांग, ऐकतो आहे मी.” – किशोर.

“तुला गझन पिन माहीत आहे?” – विभावरी.

“आता तुम्ही बायका इतक्या प्रकारच्या पिना वापरता, मला कशी पीनांची नावं माहीत असणार?” किशोरनी आपलं अज्ञान समोर केलं.

“ही तसली पिन नाहीये, कुठल्याही ऑटोमोबाइल इंजिन मधे पिस्टन आणि बाकीचं  इंजिन यांना जोडणारा एक दुवा म्हणजे गझन पिन. ही एक बारीकशी  कडी असते. हा खूप महत्त्वाचा पार्ट  असतो, ही पिन जर तुटली, तर तुझी स्कूटर चालणारच नाही. आता तू स्कूटर वर्षानुवर्ष चालवतो आहेस, पण तुला गझन पिन माहितीच नाही कारण ही पिन आपलं काम व्यवस्थित करते आहे.” – विभावरी थांबली, किशोरला कितपत कळलं आहे याबद्दल जरा साशंकच होती, म्हणून तिने किशोरकडे पाहीलं.

“आलं लक्षात माझ्या. ही पिन खूप महत्त्वाची असते, पण आत्ताच्या विषयाशी यांचा काय संबंध आहे हे लक्षात येत नाहीये, तेंव्हा जरा फोड करून सांग.” – किशोरनी आता शरणागती पत्करली.

“सांगते.” विभावरी म्हणाली, “अख्ख्या देशाचा कारभार चालतो तो या कारकुनांच्या भरवशांवर. त्यांनी केलेल्या प्राथमिक कामावर मग सर्व इमारत बांधण्यात येते. कारकुन हा गझन पिन सारखा असतो. गझन पिन तुटली तर तुझी स्कूटर बंद पडेल. एक इंचही समोर सरकणार नाही. विचार कर, देशातल्या सर्व कारकुनांनी जर एकाच वेळी, काम न करण्याचं ठरवलं, तर काय होईल? अराजक माजेल. इतका महत्त्वपूर्ण वर्ग असून त्यांच्याकडे आपण सर्व हेटाळणीच्या नजरेने पाहतो. हा वर्ग गझन पिन सारखाच  अतिशय मेहनतीने आणि बिन बोभाट काम करतो आहे, म्हणून देशाचा गाडा  व्यवस्थित चालू आहे. म्हणून तू कारकुन आहेस याचा मला अभिमानच वाटतो आहे. आता यापुढे मी लोकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊ शकेन.

किशोरच्या मनातलं गोंधळ अजूनच वाढला. विभावरी कौतुकानी बोलते आहे की काही वेगळाच तिच्या बोलण्याचा अर्थ आहे हेच त्याला उमजेना. काही का असेना, विभावरी रागवली नाहीये, एवढंच त्याला कळलं. दोघांमध्ये समेट तर झाला, विभावरीने त्याला निराश नाही केलं. पण विभावरी झोपल्यावर बराच वेळ तो जागा होता आणि विभावरीच्या बोलण्याचा विचार करत होता. शेवटी तो एका निष्कर्षावर आला की विभावरीने त्याला समजून घेतलं आहे तेंव्हा त्याला सुद्धा तिचं मन राखायला पाहिजे. उद्या पासून अभ्यास करायचा असा मनोमन निश्चय केल्यावर, मगच त्याला शांत झोप लागली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.