चालता चालता in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | चालता चालता

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

चालता चालता

चालता चालता....
सकाळी बागेत फिरायला जातो तेव्हा अनेक ओळखीच्या चेहऱ्यांबरोबरच काही अनोळखी चेहरेही नियमीतपणे दिसत असतात. खास व्यायाम म्हणून दररोज नित्यनेमाने फिरणारे सराईत लगेच ओळखू येतात.
काही लोक अधूनमधून आठवण आली की फिरायला येताना दिसतात.शनिवार रविवारी सुट्टी म्हणून फिरायला येणारे, डॉक्टरने 'सकाळी फिरत जा; नाही तर तुझे काही खरे नाही ' म्हणून नाईलाजाने फिरत असलेले लोक लगेच ओळखता येतात.
काही महिला आपल्या चिमुकल्याला स्ट्रोलरवर टाकून कोवळ्या सूर्यकिरणात त्याला फिरवत असतात.एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बाळाची गाडी रेटत यांचा फेरफटका चालू असतो.बाळ आजूबाजूला फिरत असलेल्या लोकांकडे टकमका बघत असते.दररोज दिसणारे चेहरे समोर आले की काही दिवसातच बाळ छानसे स्माईल द्यायला लागते, हात हलवून टाटा बाय बायही सुरु होते.
काही लोक मुख्यत्वे हिवाळ्यात आवर्जून फिरायला बाहेर पडतात.असे सिझनल हौशी लोक खास तयारी करुन आलेले असल्याने लगेच ओळखता येतात.यांचा उत्साहही आरंभशूर टाईप असलेला दिसतो.एक दोन दिवसानंतर सहसा हे लोक इकडे दिसत नाहीत,
काही काही लोक मात्र फिरायला येतात की 'घरात फोनवर बोलता येत नाही' म्हणून फोनवर बोलायला म्हणून मॉर्निंग वॉकला आलेले असतात तेच कळत नाही.यांचे लक्ष चालण्यात कमी आणि बोलण्यात जास्त असलेले दिसते.
काही महिला समूहाने गप्पा मारत फिरत असतात त्यांच्या गप्पा जास्त आणि चालणे कमी अशी परिस्थिती असते.
काही लोक मात्र दररोज नियमित वेळेत बागेत येऊन व्यायाम आणि ध्यान धारणा करताना दिसतात.त्यात काही वेळेचे एवढे परफेक्ट असतात की त्यांच्या हालचालीवरून घड्याळ लावले तरी चालेल!
दररोज फिरायला येणारे काही लोक आवरजून हातात एक छोटी पिशवी घेऊन आलेले असतात.यांची नजर बागेतल्या फुलझाडांवर अक्षरश: भिरभिरत असते.हे लोक झाडांवरची फुले शोधण्यात एवढे मग्न असतात की आपल्या आजूबाजूला माणसे चालत आहेत हे त्यांच्या गावीच नसते!, 'दिसले फुल की तोड आणि पिशवीत टाक' अशी ' हात घाई' चालू असते.
अशा बागेतून फिरता फिरता फुले तोडणाऱ्या लोकांच्यातही एकमेकांशी एक सुप्त अशी स्पर्धा चालू असते.कमीत कमी वेळात, बाकी सर्वांच्या आधी, बागेतल्या सर्व फुलझाडांना भेट देऊन जास्तीत जास्त फुले आपल्या पिशवीत कशी येतील याकडे यांचे सगळे लक्ष लागलेले असते.अशा लोकांची सकाळची ही लगबग बघण्यासारखी असते! फुले पाने तोडताना वेळ पडली तर झाडावर चढून,झाडांच्या फांद्या गदागदा हलवून फुले पाडणारे आणि ती गोळा करणारे दिसले की त्यांना विचारेवेसे वाटते की “ बाबा रे झाडांचे असे हाल हाल करुन आणलेली फुले तुझ्या देवाला तरी आवडत असतील का?”
काही नव्याने फिरता फिरता फुले तोडणाऱ्या लोकांच्या तोंडावर मात्र अपराधीपणाची छटा असते आपण करत असलेला गुन्हा कुणी बघत तर नाही ना याची खात्री असे लोक करत असताना दिसतात, सवयीने असे लोक आपल्याला ओळखता येतात.
दररोज ठरविक वेळी ठरवून भेटणारे आणि भेटल्यानंतर विविध विषयांवर तारस्वरात गप्पा मारत फिरणारी मंडळीही बागेत असतात.'नाही ऐकायचे' म्हटले तरी त्यांचे गप्पांचे विषय कानावर आदळत असतात.यातले अनेकजण तर पट्टीचे राजकीय तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावात राजकारणावर आपाआपली मते व्यक्त करताना दिसतात. यांचे 'फिरणे कमी आणि वाद जास्त ' अशी परिस्थीती असते, बागेत फिरता फिरता टीव्हीवर एकमेकांवर ओरडून तावातावाने राजकीय पुढाऱ्यांची चर्चा ऐकत असल्याचा फील येतो आणि आपण नक्की मॉर्निंग वॉकलाच आलोत ना असा प्रश्न पडतो.
काही लोक मात्र आपण भले आणि आपले फिरणे भले अशा पद्धतीने कानावर हेडसेट लावून गाणी ऐकत आपले मनाशी ठरवलेले 'वॉकिंग टार्गेट' पूर्ण करण्याच्या मागे असतात.हे लोक वेळेचे खूपच पक्के असतात.आपला ठराविक चालण्याचा कोटा पूर्ण झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात...यांच्यासमोर दिवसभरासाठी विविध टार्गेटस् आ वासून उभी असणार!
आमच्यासारखे काही रिटायर्ड लोक मात्र मॉर्निंग वॉक मस्त एन्जॉय करत फिरत असतात,फिरून झाले की हमखास एखाद्या नेहमीच्या कट्ट्यावर गप्पांची महफीलही जमलेली बघायला मिळते...
(सहज एक निरीक्षण)
©प्रल्हाद दुधाळ.