Power of Attorney - 11 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी - भाग 11

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 11

पॉवर ऑफ अटर्नी

भाग  ११  

भाग १०  वरुन पुढे  वाचा

“पण तुमचं यात नुकसान आहे. पुढे मागे जर तुम्हाला फ्लॅट विकायचा असेल तर बँकेच्या फ्लॅट वर असलेल्या चार्ज मुळे  तो तुम्हाला विकता येणार नाही.” – सदस्य 

“चालेल मला. तसंही मला तो विकायचा नाहीये.” विभावरीने मोहोर उठवली. 

“तुमची तयारी असेल तर बँक lenient view घेऊ शकते. पण खात्रीपूर्वक असं काही आत्ताच सांगू शकत नाही. तो फ्लॅट तुमचाच आहे हे पण सिद्ध व्हायला पाहिजे.” सदस्य अजून ऐकायला तयार नव्हता.

“अहो तो फ्लॅट जर किशोरचा नाही यावर विश्वास ठेऊन तुम्ही कारवाई करता आहात, तर तो माझा आहे हे पण अॅक्सेप्ट करायला पाहिजे तुम्ही.” विभावरीचं उत्तर

“विभावरी मॅडम, आम्हाला तुमचं कौतुक वाटतंय. खरं तर यात तुमची घोर फसवणूक  झाली आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही किशोरची मदत करायला पुढे आला आहात, ही गोष्ट साधी सुधी नाहीये. आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आम्ही बँकेला तसा रीपोर्ट पाठवू, शिफारस पण करू. पण आत्ताच काहीही प्रॉमिस देणं शक्य नाही.” सदस्यांनी तिची एक प्रकारे तारीफच केली, मग थोडं थांबून ते म्हणाले की

“विभावरी मॅडम असं बघा, अजून तरी बँकेनी किशोर चं लोन कॉल ऑफ केलेलं नाहीये. कारण जो पर्यन्त अधिकृत रित्या हे कळत नाही की किशोरनी केलेला व्यवहार रद्द झाला आहे, तो पर्यन्त बँक काही करणार नाही. त्या नंतर तुमच्या विनंती वर विचार केल्या जाईल. त्या मुळे सध्या तरी तुम्ही निश्चिंत रहा.”

“माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच. जर पॉजिटिव काही कळलं तर मला इन्फॉर्म कराल का ? का मीच फोन करू तुम्हाला आठ दिवसांनी ?” विभावरीने विनंती केली

“आम्ही कळवूच पण तुम्हीही फोन करायला हरकत नाही.” – सदस्य 

विभावरी मग सरळ किशोरच्या घरी गेली. तिला हे सगळं माईंना सांगायची घाई झाली होती.

दरवाजा किशोरनी उघडला.

“माई कुठे आहेत ?” – विभावरी

“का ग ? एकदम माई, माई करतच आलीस ?” – किशोर

“माईंना एक गोष्ट सांगायची आहे.” विभावरी म्हणाली.

“माई बाहेर देवळात गेली आहे. मला सांग न, मी सांगीन माईला”.-किशोर

“तुला कशाला सांगू, तू उगाच फाटे फोडशील”. असं म्हणत ती डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली. मग किशोर पण बाजूची खुर्ची ओढून त्यावर  बसला. म्हणाला

“नाही फोडणार. सांग.”

मग विभावरीनी सांगितलं की ती बँकेच्या रीजनल ऑफिस मधे गेली होती.

“का ग ? बोलावलं होतं का ?”

“नाही मीच भेटीची वेळ मागून घेतली.” -विभावरी.

“कशाला ? काय कारण” किशोरचा प्रश्न. त्याला जरा आश्चर्यच वाटलं

मग विभावरीनी बँकेत काय झालं ते सांगितलं. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे किशोरला कळेचना, तो विचार करत होता की ‘ही पोरगी, न नात्याची ना गोताची, आपल्या साठी तिची प्रॉपर्टी mortgage करायला निघाली आहे, उद्या जर काही कारणांनी EMI चुकले तर तिच्या प्रॉपर्टी वर टाच येऊ शकते. ते त्याला नको होतं.’ तो म्हणाला

“नाही विभावरी, हे चूक आहे. उद्या काही कारणांनी जर EMI चुकले, तर तुझी प्रॉपर्टी धोक्यात येऊ शकते.”

“किशोर सर, मी सांगते, असं काहीही होणार नाहीये. खरं सांगायचं तर मी होऊच देणार नाही, मग तर झालं ?” विभावरी ठामपणे म्हणाली.

“नाही, नाही मी का घ्यावी तुझी मदत ? आणि तू सुद्धा “होऊच देणार नाही” असं कसं  म्हणते आहेस ? कशाच्या आधारा वर ? हे बघ मला खात्री वाटत नाही.” किशोर चं ठाम उत्तर.

आता प्रत्युत्तर देण्याची विभावरीची पाळी होती. तिने क्षणभर विचार केला आणि वेगळीच wave length पकडली. मग उठली आणि किशोरच्या गळ्यात हात टाकून त्याच्या कडे मधाळ नजरेने पहात म्हणाली-

“आता पटली खात्री ?”

“अग हे काय ? आई आहे आत मधे. तिने पाहीलं तर काय वाटेल तिला.” – किशोर

“तूच म्हणालास न की त्या देवळात गेल्या आहेत म्हणून, मग ?” विभावरी म्हणाली आणि ती अजून जवळ सरकली.

तिची जवळीक त्याला सुखावून गेली. तो तिच्याकडे खुळ्या सारखा पहातच राहिला. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून विभावरीला अजूनच चेव चढला. त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली

“बोल ना. असा हरवल्या सारखा काय बघतो आहेस माझ्याकडे. ? आता तरी पटली का खात्री ?”

तिच्या शब्दांनी किशोर भानावर आला. त्यांनी हलकेच तिला दूर केलं, त्याला काही बोलायचं होतं पण शब्दच सुचेना. विभावरी त्याच्याच टक लावून कडे बघत होती, भुंवया उडवून म्हणाली

“आता बोल ना.”

किशोर तिच्याच कडे अनिमिश नेत्रानी बघतच राहिला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. ती इतकी जवळ होती की काय बोलायचं आहे हेच तो विसरून गेला. पण दोन मिनिटांनी किशोर सावरला आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला. 

“विभावरी ...”

विभावरीला त्याच्या आवजातला बदल जाणवला. तिने एक झकास स्माइल दिलं, आणि किशोरच्या केसांतून हात फिरवून त्यांचे केस विस्कटून टाकले. किशोर वेडाच झाला. प्रथमच एका विलक्षण सुखाची अनुभूति तो घेत होता. हा क्षण संपूच नये असच त्याला वाट राहीलं. पण मग त्यानी स्वत:ला सावरलं, आणि घसा साफ करून म्हणाला  

“विभावरी, हे काय ? अग हे शक्य नाहीये, हे कळतंय का तुला. ?”

“का शक्य नाही ? माईंना मी चालणार नाहीये का ?” – विभावरी

“छे, छे  तिला तर खूपच आनंद होईल. ती तर डोळे लावूनच बसली आहे तुझ्याकडे.” किशोरनी घाई घाईने बाजू सावरली.

“मग तुझे आधीच कुठे सुर जुळले आहेत का ?” -विभावरी

“अग माझ्या आयुष्यातली तूच पहिली मुलगी आहेस.” – किशोर

“मग मी आवडत नाही का ?” विभावरीने विचारलं.

“खूप आवडतेस, अग पहिल्याच दिवशी एकदम मनात भरलीस. तुझा इतका संताप संताप झाला होता तरी सुद्धा तू माझं मन व्यापलं होतंस. अग मीच काय , कुणालाही आवडून जाशील अशीच आहेस तू.” किशोरनी कबुली दिली.

“एवढं सगळं आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे ?” विभावरीची प्रश्नार्थक मुद्रा

“अग तुझ्या आणि माझ्या मध्ये किती तफावत आहे, केवढा level difference आहे. तू सॉफ्टवेअर इंजीनियर, मी साधा M.Sc. तू एवढी मोठी पगारदार, माझा पगार तो किती, साधा बँकेतला कारकुन आहे मी. लोकं काय म्हणतील ?” किशोरनी बाजू मांडली.

“काय म्हणतील लोकं ? ऐकू दे की जरा” - विभावरी.

“आपली जोडी कोणाच्याच पचनी पडणार नाही. म्हणतील की कशी काय भुरळ घातली या पोरानी इतक्या सुंदर मुलीला देव जाणे, अश्या काय भुलथापा दिल्या या मुलाने, की इतक्या सुंदर आणि पगारदार मुलीला भुरळ पडली, आणि फसली बिचारी. याच्या पेक्षा कितीतरी उजवा मुलगा मिळाला असता तिला. काय पाहिलं या मुला मधे कळत नाही. असंच  काही तरी म्हणतील.” किशोर नी एकदाचं सांगून टाकलं.

“ओके. तू म्हणशील तसं. आता तू नाहीच तयार म्हंटल्यांवर, मी तरी काय करणार मग ? बघेन मी कोणी दूसरा मिळतो का चांगला मुलगा. बरं आता चलू मी ? see you, बाय.” विभावरी उठली आणि चालू पडली.

आता मात्र किशोरला राहवलं नाही. त्यानी तिचा हात धरला आणि थांबवलं.

“आता का थांबवतो आहेस ? आपलं जुळणं शक्य नाही असच म्हणाला होतास ना तू मघाशी ? मग जाऊ दे की मला.” विभावरी खोट्याच पण रागाने म्हणाली.

“अग इतक्या तडका फडकी कुठे निघालीस ? काही तरी माझ्या मनाचा विचार कर” किशोर विनवणीच्या स्वरात म्हणाला. “थांब न जरा.”

“थांबून काय करू ? काय निष्पन्न निघणार आहे ?” विभावरीच्या नाकावर अजून राग होताच.

“सांगतो ना. तू बस तर आधी.” किशोरची अजिजी.

“आधी सांग मला, पटलं तर मग बघेन बसायचं का ते.” विभावरी अजून रागातच

“अरे, ही काय हुकुमशाही आहे ?” किशोर वैतागला.

“आहेच मुळी. काय म्हणायचं आहे तुला ? सोड मला, निघते मी. सांग माईंना मी येऊन गेले म्हणून.” विभावरीचा राग अजून कायम.

“आता काय सांगू तुला, दिवस रात्र तुझाच विचार असतो माझ्या मनात. माझं मन इतकं गुंतलंय तुझ्या मधे, की डोळ्या पुढे तुझाच चेहरा असतो कायम, त्यामुळे कामात चुका व्हायला लागल्या आहेत. लोकांना वाटतंय की घराच्या भानगडी मुळे मी अस्वस्थ आहे. सांभाळून घेतात मला बिचारे.” किशोरनी आपली व्यथा विभावरी समोर मांडली 

“मग हे आधी का नाही बोललास ?” -विभावरी. राग कायम.

किशोर बसल्या जागीच खुर्चीवर चुळबुळत होता. शेवटी सगळं धैर्य एकवटून बोलला. “अग कसं बोलणार ? आपल्या मधे इतका level difference आहे की भीती वाटायची. तुला राग आला तर ? आणि तू घरी येणंच थांबवलं तर ? मग तुझा जेवढा सहवास मिळतो आहे, तो पण नाही मिळणार. तुझा तेवढा सुद्धा सहवास मला गमावायचा नव्हता, म्हणून जीव कासावीस होत होता.” किशोर नी बाजू मांडली. 

आता विभावरीला त्याची कीव आली. मग तिने जास्त ताणून धरलं नाही. त्याच्या समोर आली आणि किशोरच्या गळ्यात हात टाकून त्याच्या अधिकच जवळ गेली. पण या वेळेला किशोर उठला. आणि तिला मिठीत घेतलं. स्वर्ग सुख म्हणजे काय ते किशोर अनुभवत होता. या सुखाची चव किशोर प्रथमच चाखत होता. पण हे सुख जेमतेम  अर्धा मिनिटच  टिकलं. विभावरीने त्याला दूर ढकललं, आणि जरा मागेच सरकली.

“हुश्श, जीव गुदमरला की माझा. किती जोरात आवळलं ?” विभावरी किंचाळली.

“अग पहिलीच वेळ आहे माझी. मला सवय नाहीये, खूप जोरात झालं का ? ओके. आता हळुवार पणे करतो.” किशोरनी सफाई दिली.

“नको नको, धाप लागली मला शहाण्या. तू दूरच ठीक आहेस. आणि आत्ता माई देवळातून येतील, तू बस इथेच,” मी चहा करते.

विभावरी चहाच्या बहाण्याने किचन मधे धावली, किशोर तिच्या मागे, मागे. पण तेवढ्यात कॉल बेल वाजली, मग किशोरचा नाईलाज झाला. विभावरीने तेवढ्यात त्याला चिडवलं त्याला अंगठा दाखवला, आणि खळखळून हसली.

क्रमश:........

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.