Power of Attorney - 8 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी - भाग 8

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 8

पॉवर ऑफ अटर्नी

भाग  ८

भाग ७  वरुन पुढे  वाचा

“तू अकोल्याची आहेस ?” माईंना आश्चर्य वाटलं.

“होss. का हो असं का विचारलं ?” – विभावरी.

“अग आम्ही पण अकोल्याचेच. तुम्ही कुठे राहत होता ?” – माई.

“जठारपेठेत मुकुंद मंदिर आहे न, त्याच्या  मागच्या गल्लीत.” – विभावरी.

“आमचं घर पण जवळच आहे. बघ. पृथ्वी गोल आहे. अकोल्यातली माणसं पुण्याला भेटली.” माईनी बोलून दाखवलं.

“अहो म्हणूनच आपल्या तारा जुळल्या.” आपोआप विभावरीचं अनुमोदन.

“विभावरी,” माई म्हणाल्या, “एक विचारू ? राग येणार नाही ना ? खरं उत्तर देशील का ?”

“नाही राग येणार. माई विचारा ना. आणि शेजारी टेबलावर एक पुस्तक होत, ते हातात घेऊन विभावरी म्हणाली, “ईश्वराला स्मरून फक्त आणि फक्त खरंच सांगेन, खोटं बोलणार नाही.” आणि असं म्हणून हसली.

“अग, काय हे विभावरी, हे काय कोर्ट आहे का ? मी आपलं सहज विचारलं.” – माई.

“अहो माई, परवानगी कसली घेता ? हक्कानी विचारा.” – विभावरी.  

“त्या  दिवशी तू एवढी संतापली होतीस, आणि आता बघतेय तुझा स्वभाव तर एकदम वेगळाच आहे. हे कसं काय ?” – माई.

“माई, त्या दिवशीची गोष्ट वेगळीच होती. अचानक सगळं अंगावर आलं. अमेरिकेतून आली आणि इथे आल्यावर कळलं की माझं घर माझं राहिलं नाहीये, माझ्या तर पाया खालची जमीनच सरकली. पण मग हळू हळू उलगडा झाला की हा सगळा कारभार माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीनी, सानिकानी केला आहे. माझं तर डोकच फिरलं होतं. पण मग थोडा वेळ गेल्यावर लक्षात आलं की किशोरचा काही यात दोष नाहीये आणि तो पण तोंडघशी पडला आहे म्हणून.

नंतर मी जस जसा विचार करत गेले तसा माझा किशोर बद्दलचा गैर समज दूर होत गेला. पण काकांना मात्र अजूनही असंच वाटतं आहे, की किशोर यात सानिकाच्या  बरोबरीने सामील आहे म्हणून.” विभावरी थोडी थांबली.

विभावरी पुढे म्हणाली. “मग एक दिवस किशोरनी भेटायला बोलावलं आणि त्याच्याशी बोलणं झाल्यावर तर उरल्या सुरल्या शंका पण निघून गेल्या. आणि मग तुमच्याशी भेट झाली. आता असं वाटतंय की जे घडलं ते बरंच झालं. नाही तर तुमच्याशी ओळख कशी झाली असती, नाही का ? खरं सांगू का ? तुमच्या रुपानी  मला आईच भेटल्या सारखं वाटतंय.” विभावरी जरा भाव विवश झाली.

“तुझ्या आई बाबांना काय झालं होतं ? अचानक गेले का ?” – माईंनी आत्मियतेने विचारलं.

“नाही, मी कॉलेज मधे असतांना आईला typhoid झाला.” विभावरी सांगत होती.  “आणि ती त्यातून उठलीच नाही. बाबा मी इंजीनियर झाल्यावर गेले. ते क्लब मध्ये खेळायला गेले होते. तिथेच त्यांना हॉर्ट अटॅक आला, त्यांना त्यांच्या मित्रांनी लगेच हॉस्पिटल ला नेलं पण  हॉस्पिटलला पोचायच्या आधीच ते गेले. मी त्या वेळेस  पुण्याला जॉब करत होते. खूप वाईट दिवस होते ते. मग मी सगळी आवारा सावर करून पुण्याला वापस आले. त्या वेळी तिथल्याच लोकांनी आणि मावशी काकांनी मदत केली. इथले सख्खे काका आले सुद्धा नाही. अकोल्याचं घर मग मावशीच्या सल्ल्याने विकून टाकलं आणि इथे हा फ्लॅट घेतला.”

माईंना तिची कहाणी ऐकून वाईट वाटलं.

थोड्या वेळ गप्पा झाल्यावर विभावरी म्हणाली

“मी निघते आता. बराच वेळ थांबले. बरय माई, येते.  किशोर, चालते रे.”

“अग असं कसं, न जेवता कशी जाते आहेस ?” किशोर न राहवून बोलला.

“एवढे सुंदर पोहे खाल्ले मग आता तशीही जेवायची फारशी भूक नाहीये. म्हणून निघते आता.” विभावरी म्हणाली.

“अग भूक नसेल तर निदान दही भात तरी खाऊन जा. घरून असं न खाता पिता तुला आम्ही जाऊ देऊ असं तुला वाटलच कसं ? थांब जरा. मी कूकर लावते.” – माई.  

“माई, नका हो इतका आग्रह करू, मला फार कठीण जातं हो तुमचा आग्रह मोडायला.” - विभावरी

“अग मग नकोच मोडूस. आता जेवूनच जा. बसा तुम्ही बोलत. मी तयारी करते.” असं म्हणून माई किचन मधे गेल्या.

दोघांनाही खूप बोलायचं होतं पण कोणीच बोलत नव्हतं. ती शांतता शेवटी दोघांनाही असह्य व्हायला लागली. आणि दोघांनीही एकदमच बोलायला सुरवात केली आणि एकदमच थांबले. एकमेकांकडे बघितलं आणि दोघांनाही हसू फुटलं. वातावरणातला तणाव निघून गेला होता. मग विभावरीनेच सुरवात केली.

माईंनी त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकला, आणि त्या ही समाधानाने हसल्या. चला, गाडी हळू हळू का होईना रुळावर येते आहे असाच विचार त्यांनी केला. विभावरी त्यांना सून म्हणून एकदम आवडली होती.

“माई खूपच प्रेमळ आहेत, किती काळजी करतात माझी. तशी मी न नात्याची ना गोताची. तरी पण.” – विभावरी.  

त्यावर किशोर म्हणाला. “अग आम्ही वऱ्हाडी माणसं मुळातच साधी सरळ  आणि प्रेमळ असतो. आता जरी पुण्या सारख्या शहरात राहत असलो तरी मूळ स्वभाव थोडाच बदलणार आहे ?”

“महाशय, मी सुद्धा त्याच मातीतली आहे म्हंटलं.” – विभावरी.  

हे बोलतांना विभावरीचा फणकारा विलोभनीय होता. किशोर त्यात हरवून गेला. पण तरीही त्यानी तिला खिजवलच. म्हणाला

“कोणास ठाऊक, अजून तरी तसं दृष्टीस पडलं नाही.”

“पडेल, पडेल दृष्टीस पडेल आणि पटेल सुद्धा.” – विभावरी.  

जेवणं झाली आणि विभावरी निघाली.

पुढचा संपूर्ण आठवडा विभावरीला फुरसत मिळाली नाही घरी यायची. शेवटी किशोरला आईच  म्हणाली की

“काय रे विभावरीची काहीच खबरबात नाहीये, भांडलास की काय तिच्या बरोबर ?”

“नाही ग आई, मी कशाला भांडू, ती कदाचित फार बिझी असेल म्हणून आली नाही.” किशोर म्हणाला.  

“अरे पण फोन वर काही बोलणं झालं का ?” – आई

“नाही आज वाट पाहू, नाही तर उद्या करतो.” किशोर म्हणाला.

“कर बाबा. तिची सवय झाली आहे आता. ती आली नाही तर करमत नाही.” -आई.

“हो, आई, उद्या विचारतो तिला.” किशोर नी विषय संपवला.

किशोरनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन केला.

“हॅलो किशोर बोलतो आहे.”

मीच  थोड्या वेळाने करते फोन असा मेसेज आला.

किशोरनी तो मेसेज आईला दाखवला, म्हणाला की बघ मी तुला म्हंटलं होतं ना की बिझी असेल म्हणून.

थोड्या उशीराच म्हणजे रात्री ९ वाजता विभावरीचाच फोन आला. फोन आला तेंव्हा किशोर खालच्या मजल्यावरच्या देशपांड्यांच्या कडे सोसायटी च्या मीटिंग ला गेला होता, म्हणून आईंनीच उचलला.

“हॅलो विभावरी, विसरलीस का आम्हाला ?” – माई.

“नाही हो माई, खूप काम होतं आणि मग हॉस्टेल वर आल्यावर खूप उशीर व्हायचा आणि थकायला पण व्हायचं, म्हणून फोन नाही करता आला. आज वेळेवर सुटले मग विचार केला की काकांकडे जावं म्हणून. मग तिकडे गेले होते. तुमचा फोन आला तेंव्हा मी तिथेच होते. आत्ताच येते आहे.” – विभावरी.  

मग थोडं बोलणं झाल्यावर विभावरीनी विचारलं की “किशोर ला द्या ना. कुठे आहे तो ?”

“अग तो सोसायटी च्या मीटिंग ला गेला आहे. उद्या करेल तो तुला फोन.”

किशोरला यायला उशीर झाला. आल्यावर माईंनी त्याला विभावरीचा फोन आला होता म्हणून सांगितलं.

“ठीक आहे उद्या करेन मी फोन तिला.”

एक आठवडा तसाच गेला मग एक दिवस चौकशी समिती कडून विभावरीला फोन आला आणि समिती समोर हजर केंव्हा राहता येईल यांची चौकशी करून दुसऱ्या दिवाशीची  डेट ठरवली.

विभावरीने संध्याकाळी किशोर ला फोन करून सांगितलं की उद्या तिला चौकशी समिती समोर जायचं आहे, म्हणून.

“किती वाजता बोलावलं आहे ? म्हणजे मी पण पोचतो.” किशोर म्हणाला.

“अरे, तू कशाला एवढा त्रास घेतो आहेस ? माझी काही चौकशी होणार नाहीये, माझ्या कडून फक्त त्यांच्या जवळ असलेल्या माहितीची शहानिशा करायची असेल त्यांना.” – विभावरी म्हणाली.  

“तरी पण मी येतो. तू खूप धीराची आहेस हे मला माहीत आहे. पण माझ्या समाधाना साठी मी येतो. किती  वाजता ते सांग ना.” किशोरनी मुद्दा रेटला.

“चार वाजता.” – विभावरी.

“ठीक आहे मी पावणे चार पर्यन्त पोचतो.” – किशोर.

“ठीक आहे.” – विभावरी.

रीजनल ऑफिस ला किशोर साडे तीन वाजताच पोचला. थोड्या वेळाने विभावरी पण आली. किशोरला पाहून तिला आनंद झालाच.

विभावरीच्या चेहऱ्यावर मुळीच टेंशन दिसत नव्हतं. नेहमी सारखीच प्रसन्न मुद्रा होती तिची. आणि ती पाहून किशोरला जरा हायसं वाटलं.

“अरे वा फ्रेश दिसते आहेस एकदम, all the best.” किशोरनी thumbs up  करून म्हंटलं.  

“थॅंक यू.” असं म्हणून ती ऑफिस मध्ये शिरली

समिती समोर गेल्यावर थोडं इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर प्रश्नांना सुरवात झाली.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.