Murder Weapon - 7 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 7

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 7

मर्डर वेपन
प्रकरण ७
सँडविच खाऊन झाल्यावर सौंम्या सोहोनी गती च्या खुर्चीवर जाऊन बसली आणि दहाच मिनिटांनी पाणिनी चा इंटरकॉम वाजला.
“ मी रिसेप्शनिस्ट सौंम्या बोलत्ये,” मुद्दामच ती मिस्कीलपणे म्हणाली. “ बाहेर अंगिरस खासनीस नावाचे गृहस्थ आलेत.त्याचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना बोलावलं आहे.”
“ घेऊन ये त्यांना आत.”
एक उंचपुरा,पस्तीशीचा माणूस, अंगात गडद रंगाचा सूट घातलेला,काळेभोर केस, पाणिनी समोर आला.दोघांनी शेक हँड केला.
“ बसा.” पाणिनी म्हणाला. तो पाणिनी समोरच्या गुबगुबित खुर्चीत बसला.
“ मला काही माहिती तातडीने हवी होती.मला वाटतंय तुम्ही त्यासाठी अगदी योग्य माणूस आहात.” पाणिनी म्हणाला.
“ नक्कीच.मला शक्य ती सर्व माहिती देईन.” अंगिरस म्हणाला.
“मला वाटतं तुम्हाला बरीच चौकशी करायची असेल पण साहेब अचानक गेल्याने मला आज ऑफिसात बरीच कामं मार्गी लावायची आहेत,पटवर्धन साहेब,त्यामुळे जेवढं लौकर मोकळं करता येईल मला तेवढं करा.”
“ मी समजू शकतो.” पाणिनी म्हणाला. “ मला सांगा, तुम्ही रायबागी कडे किती वर्षं काम करताय?”
“ जवळ जवळ बारा वर्षं.” अंगिरस म्हणाला.
“ तुम्हाला त्याची पहिली पत्नी माहिती असेलच.”
“ हो.”
“ ती वारली?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ आणि दुसरी?”
“ ती मैथिली” अंगिरस म्हणाला.
“ तिलाही ओळखता?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ तिच्या बद्दल तुमचं मत काय आहे? सांगाल?” पाणिनीनं विचारलं
“ नाही.” अंगिरस तुटकपणे म्हणाला.
“ मला समजलंय की मैथिली ने रायबागी शी केलेलं लग्न हे त्याच्याशी जीवनसाथी म्हणून केलं नव्हतं तर पैसे मिळवण्याच्या दृष्टीने केलं होतं? ” पाणिनीनं विचारलं
“ तुम्ही म्हणू शकता तसं.तिला घटस्फोटात मोठाच आर्थिक फायदा झालाय.” अंगिरस म्हणाला.
“ ती कुठे आहे सध्या? तुम्ही संपर्कात आहात?” पाणिनी म्हणाला.
“ ती फोन करते मला अधून मधून.तिला रायबागी कडून रोख रक्कम आणि काही स्थावर मालमत्ता पण मिळाल्ये.त्याबद्दल माहिती घ्यायला ती अधून मधून फोन करत असते.”
“ तिचं वागणं कसं आहे?” पाणिनीनं विचारलं
“ आमचे संबंध कधीच ठीक नव्हते आणि नाहीत.आमच्या कंपनीतला जनरल मॅनेजर कणाद मिर्लेकर हा तिचा खास माणूस आहे. ” अंगिरस म्हणाला.
“ त्या दोघांचे संबंध मैत्री पेक्षा वेगळे आहेत?” पाणिनीनं विचारलं
“ अशा बाबतीत अंदाज व्यक्त करणं धाडसाचं आहे पटवर्धन. ती फक्त पैशांवर प्रेम करते.”
“ अत्ता मैथिली कुठे राहते?”
“ ती इथे आणि केरशी दोन्ही ठिकाणी येऊन जाऊन असते.मन मानेल तशी भटकते मित्रांबरोबर”
“ इथे काय घडलंय ते समजलं असेल तुम्हाला.एक बाई इथे येऊन रिव्हॉल्व्हर असलेली बॅग ठेऊन गेली.”
“ कानावर आलंय माझ्या.”
“ पण तिने मोठा गॉगल घातल्यामुळे तिची ओळख पटवण्यात अडचण आल्ये.” पाणिनी म्हणाला.
“ हो.समजलंय मला.”
“ ही बाई म्हणजे मैथिली असण्याची शक्यता आहे?”
“ ती खूपच चतुर, युक्तीबाज,आणि बिनधास्त आहे.जर ती अशा कृत्यात गुंतली असेल तर तिने ते अत्यंत बारकाव्यानिशी आणि नियोजन बद्ध केलं असेल.”
“ तसचं जमवलं होतं ते.” पाणिनी म्हणाला.
अंगिरस खासनीस ने काही उत्तर दिलं नाही.तेवढ्यात इंटरकॉम वाजला.
“ बाहेर मालुसरे बाई आल्या आहेत. त्यांना आत पाठवू?” सौम्या ने विचारलं.
“ हो.” पाणिनी म्हणाला. त्याने आपल्या ड्रॉवर मधून एक गॉगल काढून अंगिरस च्या हातात दिला. “ हा घालाल का जरा? ” त्याने विचारलं.
“ का? कशासाठी?” आश्चर्याने अंगिरस उद्गारला.
“ तुमच्या व्यक्तीमत्वात यामुळे काय फरक पडतोय का याची मला उत्सुकता आहे.” पाणिनी म्हणाला.
अंगिरस ने तो घातला. त्याच क्षणी मालुसरे बाई आत आली.ती एक पन्नाशीची जाडसर अशी स्त्री होती.ती आत येताच अंगिरस ने घाईघाईत आपला गॉगल काढला.मालुसरे बाईचं त्याच्याकडे लक्ष जाताच ती एकदम ओरडली,
“ हे काय पटवर्धन, तुम्ही गावाला जाणार होतात ना? नाहीच गेलात का?”
अंगिरस एकदम थकून गेल्यासारखा झाला. “ हे पटवर्धन आहेत, मी अंगिरस खासनीस आहे.”
“ काय? तुम्ही... म्हणजे..तुम्ही सकाळी..आला मला...” मालुसरे बाई एकदम उद्गारली.
पाणिनी त्याच्याकडे वळून कडाडला,“ आज सकाळी माझ्या या ऑफिसात तुम्ही नेमकं कशासाठी आला होतात आणि माझ्या कपाटाच्या ड्रॉवर मधून तुम्ही घेतलेल्या रिव्हॉल्व्हर चं काय झालं ते मला हवंय ” नंतर मालुसरे बाईकडे वळून तो म्हणाला, “ थँक्स.मनापासून.तुमच्याकडे एवढंच काम होतं.बाहेर रिसेप्शन मधे माझी सेक्रेटरी सौंम्या आहे तिला भेटा.तुम्ही मला जी मदत केल्ये इथे येऊन त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल.”
अंगिरस खासनीस कडे एक तिरस्कार युक्त कटाक्ष टाकून मालुसरे बाई बाहेर पडली.
पाणिनी ने त्याच्याकडे बघून शांतपणे एक सिगारेट पेटवली.त्याला काहीही न विचारता फक्त बघत राहिला.ती शांतता त्याला सहन झाली नाही.
“ माझी फार मोठी चूक झाल्ये पटवर्धन साहेब.रती ला मदत करण्याच्या नादात मी स्वत:ला चांगलंच अडकवून घेतलंय.” खासनीस म्हणाला.त्याचा चेहेरा पार पडला होता.
“ तुमचे आणि रती चे संबंध कुठल्या थरापर्यंत आहेत नक्की?” पाणिनीनं विचारलं
त्याची मान खाली झाली. “ माझं प्रेम आहे तिच्यावर.”
“ कधीपासून? ”
“ खरं तर ती आमच्या ऑफिसात नोकरी साठी आली त्या पहिल्याच दिवसापासून माझ्या मनात भरली होती.ंम्हणजे अगदी पहिल्याच नजरेत प्रेम म्हणतात तसंच.”
“ तिच्या बरोबर डेटिंग?” पाणिनी म्हणाला.
“ बॉस तिच्यावर प्रेम करत असताना ही संधी मला कशी मिळेल पटवर्धन?”
“ ते तिच्यावरही अवलंबून होतं.” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत,तिला त्यावेळी माझं प्रेम कळलं असेल.” अंगिरस म्हणाला.
“ आता कळलंय?”
“ माहित नाही मला.मी तिला थेट शब्दात कधीच सांगितलं नाही.पण ती माझ्याशी खूपच चांगली वागत्ये.”
“ आणि तिने तुम्हाला सांगितलं, हँड बॅग आणि रिव्हॉल्व्हर बद्दल?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ रिव्हॉल्व्हर कुठे असेल याचा अंदाज तुला कसा आला?” पाणिनीनं विचारलं
“ रती ने सांगितलं मला.”
“ म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही इथे येऊन ते घेणार आहात हे तिला माहिती होतं?”
“ अजिबातच नाही.तिला थोडी सुद्धा कल्पना नाहीये मी हे केलंय म्हणून.तिने मला काय घडलंय ते सांगितलं आणि पुढे काय करायचं असं विचारलं.” अंगिरस खासनीस म्हणाला.
“ माझ्या ऑफिसात तीच हँड बॅग ठेऊन गेली होती असं म्हणाली ना ती तुम्हाला?”
“ छे हो ! तिने मला ठामपणे सांगितलं की तिची बॅग चोरीला गेली तेव्हा त्यात रिव्हॉल्व्हर नव्हतं.त्या नंतर जेव्हा ती बॅग तुमच्या ऑफिसात सापडली तेव्हा त्यात रिव्हॉल्व्हर होतं. स्वत:लारती रायबागीम्हणवणाऱ्या बाईने ते तुमच्या इथे ठेवलं.माझ्या लगेच लक्षात आलं की तिला अडकवण्याचा रायबागी प्रयत्न झालाय.”
“ त्यावेळी तुम्हाला रायबागीच शव सापडलं नव्हत?” पाणिनीनं विचारलं
“ नव्हतं.”
“ ठीक आहे रिव्हॉल्व्हर कुठे आह ते?” पाणिनीनं विचारलं
“ कुणाच्याच नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी आहे ते.”
“ तुमच्या लक्षात येतय का? खुनातला मोठा पुरावा आहे तो.मी पोलिसांना सांगितलंय की माझ्या कपाटात मी ते ठेवलं होतं आणि इथून ते चोरीला गेलंय. मी आता पोलिसांना सांगितलं की तू ते चोरलं आहेस तर पुरावा दडवल्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होईल. माझ्या समोर ते रिव्हॉल्व्हर तातडीने हजर कर.” पाणिनी म्हणाला.
खासनीस ने मान डोलावली. आपल्या ऑफिसात फोन लावला.
“निवेदिता ? एक तातडीने काम कर.माझी तिजोरी उघड.त्यात तुला एक खाकी पाकिट दिसेल.त्यावर असं लिहिलेलं आहे की या पाकीतातली वस्तू पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिसातून सकाळी सहा वाजता आणण्यात आली आहे.ते पाकीट घेऊन पटवर्धन पटवर्धन यांच्या ऑफिसात लगेच ये.पाकिटावर पत्ता लिहिला आहे.मी त्याच ठिकाणी पटवर्धन यांच्याबरोबर बसलोय. ”
“ पाकिटावर असा मजकूर लिहायचे कष्ट कशासाठी?” पाणिनीनं विचारलं
“ मला जर काही झालं,तर इतर कुणाला ते मिळू नये आणि रती ने ते केलंय असं कुणाला वाटू नये म्हणून.” अंगिरस म्हणाला.
“ तुम्हाला काही होईल असं का वाटलं?” पाणिनीनं विचारलं
“ सहजच.हल्ली पावलो पावली धोका आहे जीवनात.”
“ तुम्ही जेव्हा रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलंत तेव्हा त्यावरचा नंबर लिहून ठेवलात?”
“ नाही.मी का करायला हवं होतं तसं?” अंगिरसने विचारलं.
“ रती च्या रिव्हॉल्व्हर च्या जागी कोणी खुनात वापरलेली रिव्हॉल्व्हर ठेवणार नाही याची काळजी घेण्यासाठी.” पाणिनी म्हणाला.
“ नाही केलं मी तसं.पण मी ते टिश्यू पेपर मधे गुंडाळलं नंतर एका जाड खाकी पाकिटात टाकलं,ते सील केलं.”
“ लक्षात घे, रायबागी चा खून दोन गोळ्या झाडून केला गेलाय.घराचं दार किंवा खिडकी तोडून कोणी आल्याचं आढळलं नाहीये.साहजिकच पोलीस असाच निष्कर्ष काढतील की ज्याने खून केलाय तो किल्लीने दार उघडूनच आत आलाय.मला समजल्यानुसार घराच्या दोन किल्ल्या होत्या,एक ऑफिसात इमर्जन्सी म्हणून ठेवली होती आणि एक रतीकडे.आणखी एखादा सेट मैथिलीकडेअसायची शक्यता आहे का?”
“ नाही.तिने तिच्याकडची किल्ली घटस्फोटाच्या वेळी परत केली रायबागी ला.एक खवचट पत्र लिहून.मला ते पत्र रायबागी ने दाखवलं होतं.” अंगिरस म्हणाला.
“ मैथिलीची घटस्फोटाच्या वेळची तडजोड कोणी केली? केरशी मधल्या वकिलाने?” पाणिनीनं विचारलं
“ नाही रायबागीनेच स्वत: तो त्या बाबत एकदम तयारीचा माणूस आहे.... म्हणजे होता.”
“ आपला मगाशी एक विषय अर्धवट राहिला, समजा रती चे रिव्हॉल्व्हर ने खून झाला नसेल पण तू माझ्या ऑफिसातून तिचे रिव्हॉल्व्हर घेऊन जेव्हा तुझ्या ऑफिसातल्या तिजोरीत ठेवलेस तिथून कोणीतरी ते बदलून त्याजागी खुनात वापरलेले रिव्हॉल्व्हर ठेवले असेल तर काय अवस्था होईल याचा विचार कर. ” पाणिनी म्हणाला.
आता अंगिरस खासनीस च्या चेहेऱ्यावर भीती स्पष्ट दिसायला लागली.“ तुम्ही फारच नकारात्मक विचार करताय.” तो म्हणाला. “ एकतर माझ्या तिजोरी पर्यंत कोणी पोचायची शक्यता नाही.शिवाय मी ते खाकी पाकिटात घालून सील करून त्यावर माझी सही करून ठेवली आहे. हे सगळ जसंच्या तसं ठेवून फक्त आतले रिव्हॉल्व्हर कसं बदलता येईल?”
पाणिनी काहीतरी बोलणार होता एवढ्यात त्याचा फोन वाजला. अॅडव्होकेट भोपटकर होता.
“ पटवर्धन, मगाशी आपला फोन झाला तेव्हा तुम्ही मला विचारलं की मी जे काही सांगतोय ते रायबागी शी बोलूनच सांगतो आहेस ना.”-भोपटकर म्हणाला.
“ बर मग?” पाणिनीनं विचारलं
“ मी त्याच्याशी बोलूनच तुम्हाला सांगतोय अशीच माझी प्रतिक्रिया असेल हे तुम्हाला माहित होतं.”
“ तुम्ही खोट बोलाल याची मला कल्पना नव्हती.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला सापळ्यात अडकवलंत,पटवर्धन. मी खरं तर दुसऱ्या कामासाठी फोन केला होता अत्ता पण माझ्याशी असा खेळ केलेला आवडत नाही मला. ”
“ तुम्हाला आवडतं की नाही हा माझा विषय नाही.पण वेगळ्या कोणत्या कामासाठी फोन केलाय अत्ता?” पाणिनीनं विचारलं
“ हेच सांगायला की मैथिली रायबागी ने मला फोन करून सांगितलंय की मी तिचं वकीलपत्र घ्यावं. मैथिली म्हणजे पद्मराग ची दुसरी पत्नी.घटस्फोटित.” भोपटकर म्हणाला.
“ कुठल्या विषयात तुम्ही तिचं वकीलपत्र घेणार आहात?” पाणिनीनं विचारलं
“ रायबागीच्या प्रॉपर्टी वाटणी बद्दल सर्व.”
“ घटस्फोट होण्यापूर्वी प्रॉपर्टी वाटणी विषयी तडजोड झाली नव्हती? ” पाणिनीनं विचारलं
“ तुम्ही चांगले जाणते वकील आहात.तुम्हाला माहित असायलाच हवं की जेव्हा एखाद्याचा खून होतो तेव्हा त्याचा खून करणाऱ्या व्यक्तीला मृताच्या मिळकतीमध्ये काहीही हक्क राहत नाही. ” भोपटकर म्हणाला.
“ अस्स, म्हणजे रती ही खुनी आहे असं तू सिद्ध करणार आहेस तर.” पाणिनी म्हणाला.
“ मी शांत बसून राहणार आहे.पोलिसांनाच काय ते सिद्ध करूदे.मी मैथिलीचा वकील आहे.त्यात अनैतिक असं काहीच नाहीये.कायदा सुद्धा मला अडवू शकत नाही. तुमच्या माहिती साठी फक्त हे सांगितलंय.”
“ठीक आहे मला कळलं.” पाणिनी म्हणाला.
“ रायबागी मेलाय हे न सांगून तुम्ही माझ्याशी शी खेळी खेळलात ती बिलकुल आवडली नाही मला.”
“ तुझा प्रामाणिकपणा पहायचा होता मला.” पाणिनी म्हणाला.
“तुमचं समाधान झालं? ” भोपटकर ने चिडून विचारलं.
“ शंभर टक्के.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने फोन बंद केला.
“ भोपटकरचा फोन होता.तो मैथिलीला वकील म्हणून राहतोय. ” खासनीस कडे वळून पाणिनी म्हणाला.
“ मला त्या बद्दल थोड सुद्धा आश्चर्य नाही वाटत. अर्थात माझ्या म्हणण्याला पुष्टी देणारा पुरावा नाहीये माझ्याकडे.” अंगिरस खासनीस म्हणाला.
“ पुरावा नसला तरी काहीतरी कारण असेल,तू असं म्हणतो आहेस त्याला.”
“ भोपटकर कधीच विश्वासार्ह नव्हता,तरी पद्मराग ने त्याचेवर फारच भरोसा ठेवला.अर्थात त्यात त्याची चूक नाहीये.मध्यंतरी तो जेव्हा बऱ्याच काळासाठी परगावी होता तेव्हा एक कायदेशीर पेच निर्माण झाला होता तेव्हा कणाद मिर्लेकर ने प्रथम भोपटकर ला आणालं.नंतर त्याने सगळ्याच गोष्टीचा ताबा घेतला.”
“कणाद मिर्लेकर कोण आहे हा? ” पाणिनीनं विचारलं
“ तुम्ही माझ्याकडून सगळंच काढून घेताय पटवर्धन.”
“ रतीला मदत करायची आहे ना तुला? माझी ती अशील आहे आणि मलाही तिला मदतच करायची आहे.पण त्यासाठी मला माहिती लागणार.आणि तुझ्याशिवाय दुसरा योग्य माणूस नाही. ” पाणिनी म्हणाला.
“मिर्लेकर हा माझा बॉस आहे.म्हणजे पद्मराग नंतर कंपनीत त्याचाच अधिकार आहे.आता पद्मराग गेल्यामुळे मिर्लेकर कडेच सगळं काही आलंय.”
“ पद्मराग चा धंदा म्हणजे कंपनी आहे की ......” पाणिनीनं विचारलं
“ नाही,नाही.खाजगी फर्म आहे.प्रोप्रायटरी.”
“ तर मग कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणीही बाहेरचा माणूस मालकाचे अधिकार घेऊ नाही शकत.” पाणिनी म्हणाला.
“ ते ठीक आहे पण मिर्लेकर हा धूर्त, हुशार माणूस आहे.जबाबदारी स्वीकारणारा,धाडसी आहे. शिवाय त्याला पद्मराग च्या धंद्याची इत्यंभूत माहिती सुद्धा आहे.”
“ माहिती तर तुला सुद्धा आहे.नाही का?” पाणिनीनं विचारलं
“ बऱ्यापैकी आहे.अगदी त्याच्याएवढी नसली तरी.” खासनीस म्हणाला.
“ पुन्हा आपण भोपटकर कडे वळू.तुझं काय मत आहे त्याच्याबद्दल?” पाणिनीनं विचारलं
“ त्या आधी मी तुम्हाला विचारतो, तुम्ही त्याच्या सेक्रेटरी ला, सूज्ञा पालकरला भेटलाय?”
“ भेटलोय.तिचं काय?”
“ ती कणाद मिर्लेकर. ची खास मैत्रीण आहे. ”
“ अरे ! मला वाटत होतं, भोपटकर आणि तिचं लफड असेल.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुम्हाला सांगितलं त्या नुसार फार्म मधले लहान मोठे कायदेशीर पेच स्वत: पद्मराग हाताळायचा.एकदाच तो बऱ्याच दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता तेव्हा एक लफड झालं आणि ते मिटवायला आपण एखाद्या वकिलाची मदत घेऊ असं मिर्लेकर ने पद्मरागला सुचवलं. नाईलाजाने पद्मराग ने हो म्हंटल आणि भोपटकर चं नाव सुचवलं. त्याने ते प्रकरण हाताळलं पण छान. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा काही कायदेशीर इश्यू आले तेव्हा ते भोपटकर कडेच दिले जायचे. अशा प्रकारे भोपटकर ची वर्णी कायमची लागली.पुढे पुढे तर भोपटकर स्वत:च अशी परिस्थिती निर्माण करायला लागला,पद्मराग समोर की, भोपटकर वाचून जगणं ही गोष्टच पद्मराग ला अशक्य होवून बसली. ” खासनीस म्हणाला.
“ असा का धूर्त भोपटकर आता मैथिलीचं वकीलपत्र घेतोय.” पाणिनी म्हणाला. “ खरंच अंगिरस,तू ते रिव्हॉल्व्हर माझ्या ड्रॉवर मधून घेतलं नसतंस तर बर झालं असतं असं मला वाटतं.” पाणिनी म्हणाला.
“ ते तुमच्या ड्रॉवर मधे जेवढं सुरक्षित राहील असतं तेवढंच माझ्याकडे आहे. मी कोर्टात जाऊन साक्ष देऊ शकतो की हे तेच रिव्हॉल्व्हर आहे.” अंगिरस खासनीसने ठाम पणे सांगितलं.
“ अशा करूया की ते बदललं गेलं नाही.किंवा त्यावर कुठल्याही प्रकारे छेडछाड केली गेली नाही.” पाणिनी म्हणाला. तेवढ्यात सौंम्या आत आली. तिला पाणिनी म्हणाला, “ आपण पद्मराग रायबागी च्या सर्व मालमत्तेसाठी कोर्टाने प्रशासक नेमावा म्हणून रती ला अर्ज करायला लावू.त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र तयार कर.”
“ करते, पण सर, रायबागी ने इच्छापत्र केलं नाहीये? ”
“ माहित नाही आपल्याला ते.आणि केलं असलं तरी ते भोपटकर कडे असणार.आणि भोपटकरने आता मैथिलीचं वकीलपत्र घेतलंय.एकंदरित परिस्थिती क्लिष्ट झाल्ये.तू पटकन रतीचे नावाने अर्ज तयार कर,रायबागी च्या मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी तातडीने तिला प्रशासक म्हणून नेमले जावे म्हणून. ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही फारच घाईत कार्यवाही करताय ही. विरुद्ध बाजूचे किमान अंत्यसंस्कार होई पर्यंत तरी थांबतीलच की.” खासनीस म्हणाला.
“ ही नेहेमीची साधारण केस नाहीये. खासनीस, कुठे उतरल्ये ती? म्हणजे कुठल्या हॉटेलात?” पाणिनी म्हणाला.
“ कंदील हॉटेल. ”
“ ती या शहरात येते तेव्हा साधारण तिचं उतरायचं ठिकाण हेच असतं?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ परवा रात्री मात्र ती रायबागी च्या घरात राहिली.” पाणिनी म्हणाला.
“ हो,माहित्ये मला.तुम्हाला सांगतो पटवर्धन, रायबागीनेच तसा आग्रह धरला.एकतर खूप मोठ घर आहे त्याचं. दुसरं म्हणजे त्याला हल्ली एकाकी वाटत होतं.त्याला कळून चुकल होतं की रती ला घटस्फोटाचा आग्रह करून आपण फार मोठी चूक केल्ये.त्याला परत जुळवायचे होते.”
“ आणि तू काय बाजूला बसून गंमत बघणार होतास?” पाणिनीनं विचारलं
“ माझं तिच्यावर एवढं प्रेम आहे की तिच्या च्या हिताचे जे असेल ते मी तिला करू देणार होतो. रायबागी तिला हवं ते भौतिक सुख देऊ शकणार होता , मला ते शक्य नव्हतं. ”
“ तिचंही त्याच्या पेक्षा तुझ्यावर प्रेम आहे?” पाणिनीनं विचारलं
“ माहित नाही.”
“ तुझ्यासाठी त्याच्या संपत्तीवर लाथ मारायला ती तयार झाली असती?” पाणिनीनं विचारलं
“ माहित नाही.”
“ त्याच्या मृत्युनंतर त्याची संपत्ती तिला आणि रती तुला मिळाली तर दोन्ही गोष्टी तुला मिळतील त्यामुळे त्याच्या मृत्यूने तुझा फायदा आहे हा विचार पोलीस करतील हे तुझ्या मनात आलं नाही? ” पाणिनीनं विचारलं आणि खासनीस हादरला.
( प्रकरण ७ समाप्त.)