Karamati Thami - 4 in Marathi Comedy stories by Kalyani Deshpande books and stories PDF | करामती ठमी - 4 - ठमीची पाककला

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

करामती ठमी - 4 - ठमीची पाककला

मागच्या प्रकरणात आपण बघितलं च आहे की कॅमेरा घेऊन ठमीने खूप करामती केल्या त्यामुळे आत्याने तिच्या हातातून कायमचा तो काढून घेतला.

पण शांत बसेल ती ठमी कुठली! तिला अचानक पाक कलेत रुची निर्माण झाली. रोज ती दुपारी एक दीड वाजता आवर्जून टीव्ही वर पाक कलेचे कार्यक्रम बघू लागली. हातात वही पेन घेऊन त्यातील साहित्य कृती लिहून घेऊ लागली.

"आई मी रोज बघते तू खूप कामं करते, घरासाठी खूप राबते(आत्याला कळेचना की ठमी एवढी कशी काय शहाणी झाली)त्यामुळे मी ठरवलंय की एक आठवडाभर तुला कूकिंग पासून सुट्टी द्यायची. "

"आणि मग कोण स्वयंपाक करणार आठवडाभर?",आत्या ने विचारलं.

"कोण करणार काय? ऑफकोर्स मी करणार मॉम!",हे ठमीचं वाक्य आतल्या खोलीतून तिच्या आजीने ऐकलं आणि लगेच त्यांच्या छातीत धस्स झालं. आजीने लगेच जवळच्या कपाटातून चूर्णाची बाटली जवळ काढून ठेवली आणि जवळच टेबल वर ठेवलेल्या कवळी कडे बघून आजीने हात जोडत म्हंटल,
"लाज राखशील ग बाई! काय पुढ्यात येणार आहे कोणास ठाऊक!"

"तू करणार ठमे! स्वयंपाकातलं तुला ओ की ठो येत नाही आणि म्हणे ऑफकोर्स मी करणार म्हणून!"

"मॉम! प्लिज डोन्ट अंडरएस्टीमेट युअर डॉटर! देवाच्या कृपेने तुला काय बहुगुणी मुलगी मिळाली ह्याची तुला कल्पना येत नाहीये! रोज पाककलेचे प्रोग्रॅम्स बघून बघून मी बरेच पदार्थ बनवायला शिकली आहे, आहेस कुठे तू!"

"मी इथेच आहे",आत्या इकडे तिकडे बघत म्हणाली.

"आज रात्रीचा स्वयंपाक मीच करणार बघ! वाटल्यास कोणाला मेजवानिला बोलवायचं असेल तर बोलावून घे! ", ठमी नाक उडवत म्हणाली.

आत्या तिच्या कडे अवाक होऊन बघतच राहिली.
खेळण्यासाठी आम्ही मैत्रिणी जमलो तेव्हा तिने एक स्टूल आणला आणि त्यावर काही बाऊलमध्ये तिने घरून काहीबाही साहित्य आणलं होतं. आम्हाला सगळ्यांना तिच्या पुढ्यात बसायला लावून ती शेफ सारखी उभी राहिली आणि मुद्दाम स्पेशल तिच्या कूकिंग क्लास साठी तिने आत्याच्या मागे लागून लागून जवळच्या टेलरीण बाईंकडून शिवलेले अँप्रन आणि डोक्यावर पांढरी उंच टोपी घातली.

"तर बघा! सख्यांनो! आज आपण एक नवीन पदार्थ बनवायला शिकणार आहोत.", आम्ही तिन्ही मैत्रिणींनी आज्ञाधारकपणे माना डोलावल्या.

"त्यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या",आम्ही आमच्या वह्यांवर पेन्सिलीने भराभर लिहून घेऊ लागलो.

"एक किलो भेंडी,एक किलो मटार, एक किलो वालाच्या शेंगांचे दाणे, एक किलो तुरीच्या शेंगांचे दाणे, थोडी हळद, थोडं तिखट आणि अगदी चवी पुरते मीठ"(थोडी हळद, थोडं तिखट आणि चवी पुरते मीठ असं म्हणताना तिने हाताच्या पंजाची अशी काही खूण केली की त्यात एकेक किलो मीठ,तिखट आणि हळद सहज मावलं असतं.)

"पण आपण कोणता पदार्थ करणार आहोत हे तर सांग",मी माझ्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं

"अगं साहित्य बघूनही तुला कळलं नाही! कमाल आहे बाई! काहीच येत नाही तुला कूकिंग मधलं! (खरंच आपल्याला काहीच येत नाही असं वाटून मी खजील झाली.) अगं! आपण भेंडीयो ही भाजी करणार आहोत",ठमी तिरपं हसत म्हणाली.

"भेंडीयो!! ते काय असते? आम्ही उंडियो ऐकली होती बा! ",आमची एक मैत्रीण म्हणाली.

"अगं उंडियो नाही उंदिर्यो म्हणतात त्याला! काहीच कसं माहीत नाही गं तुम्हाला",ठमी आमच्यावर डाफरली त्यामुळे खरा शब्द उंधियो आहे गं असं मला कळवळून सांगावंसं वाटलं पण हिम्मत झाली नाही.

"तर माझं म्हणणं हे आहे की सगळे जे करतात तेच आपण का करा! आपण जरा हटके काहीतरी केलं पाहिजे नाही का! त्यामुळे हे माझं इन्व्हेन्शन आहे असं समजा हवं तर! बोटं चाटत जेव्हा खाल तेव्हा पटेल तुम्हाला. नेहमीच्या उंदिर्यो मध्ये टाकतात वांगे आपण वांग्यांऐवजी घेऊ भेंडी म्हणजे होईल ती आपली लवकरच जगप्रसिध्द होणारी भाजी भेंडीयो!! मी।सांगते सख्यांनो तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये सगळ्यात पाहिले जर कुठल्या डिश ची डिमांड असेल तर ती म्हणजे ठमी स्पेशल भेंडीयो चीच.

जो तो म्हणेल "एक प्लेट भेंडीयो देना!"

" अहो आम्ही ना इथे फक्त ठमी स्पेशल भेंडीयो च खायला आलोय." असे कुटुंबाला घेऊन येणारे कस्टमर म्हणतील.

"आई! ते चॉकलेट केक वगैरे काही नक्को मला फक्त भेंडीयोच पाहिजे! पाहिजे म्हणजे पाहिजे " असे लहान मुलं हट्ट करतील.

"ह्या चविष्ट भेंडीयो च्या साक्षीने मी तुला सांगतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!",असं प्रेमीक प्रेमिकांना सांगतील! आहात कुठे तुम्ही सख्यांनो!",ठमी उत्तेजित आवाजात म्हणाली.

तिच्या वर्णनाप्रमाणे वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलेल्या आम्ही सगळ्या मैत्रिणी पुन्हा ठमीच्या कूकिंग क्लास मध्ये अवतीर्ण झालो आणि ठमिकडे अत्यंत कौतुकाने बघू लागलो. व्वा! काय टॅलेंटेड मैत्रीण आहे आपली! माझं मन अभिमानाने भरून आलं.

तिने भराभर कशात काय टाकायचं हे सांगून आणि कृती करून भेंडीयो कसा बनवायचा हे आम्हाला शिकवून टाकलं.

"आता बघा हा तुम्हाला मी डेमो दिला खरी रंगीत तालीम आज संध्याकाळी होणार आहे तेव्हा कोणा कोणाला भेंडीयो खायचा आहे?",ठमीने विचारलं

"मला! मला! मला!",आम्ही सगळ्यांनी हात वर केले.

"ज्यांना ज्यांना भेंडीयो खायचा त्यांनी आज संध्याकाळी सात वाजता आमच्याकडे आगमन करावे",ठमीने आम्हाला आमंत्रण दिलं होतं.

व्वा आता संध्याकाळी आपल्याला भेंडीयो खायला मिळणार! भविष्यात जगभर सर्वत्र प्रसिद्ध होणाऱ्या ह्या अनोख्या पदार्थाची चव घेण्याचा पहिला मान आपल्याला मिळणार ह्या भावनेने आम्ही जमिनीपासून दोन फूट अंतरावर तरंगतच आपापल्या घरी पोचलो.

आता कट टू स्थळ:- ठमीचे घर, संध्याकाळचे सहा वाजले आहेत. ठमीचे बाबा नुकतेच ऑफिसमधून येऊन घरात स्थानापन्न झालेले आहेत. ठमीच्या आईने त्यांना आज ठमी स्वयंपाक करणार असं सांगितल्या मुळे पाणी पिता पिता त्यांना जोरात ठसका लागला आणि त्यांच्या पोटात गोळा आला आहे. ठमीच्या आजीने चूर्णाची बाटली आणि कवळी हातात घट्ट धरून देवाची आराधना सुरू केली आणि मनात म्हंटल बरं झालं बाई हे(ठमीचे आजोबा) त्यांच्या मित्राकडे गेलेले आहेत आज.
ठमीच्या आईची घालमेल सुरू आहे. ती सारखी स्वयंपाक घराच्या दाराशी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहे.
"मॉम प्लिज डोन्ट डिस्टर्ब मी! सारखं येऊन पाहू नको मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज देऊन आश्चर्य चकित करायचंय."

"सरप्राईज तर नक्कीच मिळणार आम्हाला आज पण त्याचीच भीती वाटते",आत्या स्वतःच्या मनाशी म्हणाली.

बरोब्बर सात ला दहा कमी असताना ठमीचे सगळे पदार्थ रेडी झाले होते. तिच्या मदतीला म्हणून मी आधीच तिथे जाऊन बसली.

टेबलवर भराभर तिने मांडामांड केली.

"चला सगळेजण जेवायला! ",तिने सगळ्यांना बोलावलं. तिने असं म्हणताच आत्या मामा आणि आजी सगळ्यांच्या पोटात धस्स झालं. सगळे मनावर दगड ठेवून डायनिंग टेबल जवळ बसले.

ती एकेक पदार्थांवरचे झाकणं काढू लागली. हे बघा पुलाव, ह्या पोळ्या, हा शिरा आणि ही सगळ्यात महत्त्वाची डिश भेंडीयो!!! तिने असं म्हणताच "अरे देवा! असं म्हणतच तिच्या आजीला भोवळच आली. आत्याने आजीला लगेच सावरलं आणि थोडं पाणी प्यायला दिलं.

"थांबा मी आधी चव घेऊन बघते",असं आत्याने सगळ्यांना सावध पवित्र्यात सांगितलं.

"अगं पोळी अगदी पापडा सारखी झालीय ठमे! पोळ्या काहीच फुगल्या नाही तुझ्या",आत्या

ठमी हलकं हसत म्हणाली,"अगं त्या गर्विष्ठ नाही फुगायला! डाउन टू अर्थ आहेत त्या म्हणून फुगल्या नाही! सिम्पल!"

"आणि हा पुलाव तर काहीच शिजला नाही! कितीवेळ कुकरमध्ये ठेवला होतास तू?",आत्या

"बरोब्बर एक मिनिटं",ठमी शांतपणे म्हणाली.

"एक मिनिटांत काय तुझ्या.......",मामांकडे बघून आत्याने पुढचे शब्द गिळले.

"अगं त्या पाककलेच्या प्रोग्राम मध्ये तसंच दाखवलं होतं. त्या बाईने कुकर गॅसवर चढवला तो पर्यंत मी पाणी प्यायला आली आणि पाणी पिउन मी टीव्ही समोर जाई स्तोअर त्या बाईचा पुलाव रेडी होता खरंच!",ठमीने शपथेवर सांगितलं.

आत्याने नंतर शिऱ्याची चव घेतली आणि नाक गोळा करून ती ठमीला म्हणाली,"अरेरे! ठमे शिऱ्यात कधी मीठ टाकलेलं पाहिलं तू?"

"अगं त्याच प्रोग्राम मध्ये! हे बघ माझी रेसिपीज ची वही बघ वाटल्यास",असं म्हणून ठमीने तिला वही दाखवली.
आत्याने वहीत बघितलं तेव्हा तिला कळलं की ठमीने रव्याचा शिरा आणि रव्याचा उपमा ह्यांची रेसिपी मिक्स करून टाकली होती. तुपाच्या शिऱ्यात तिने बदाम किसमिस सोबतच हळद मीठ टाकून दिलं होतं.

"अगं ह्या दोन रेसिपीज तू मिक्स केल्या आहेत ठमे! भवाने! तू एका जागेवर बसून लिहिल्या नाहीत का रेसिपीज?",आत्याने विचारलं.

"ते मी एकाच जागेवर बसून लिहिलं पण मध्येत मी पाणी प्यायला गेली होती स्वयंपाक घरात.",ठमी निरागसपणे म्हणाली.

"ठमु ताई! ह्यापुढे एक लिटर पाण्याची बाटली घेऊनच बसत जा जवळ उगीच पुन्हा पुन्हा उठायचं काम नको. तुझ्या पाण्याने सगळं तुझं सरप्राईज पाण्यात गेलं न बाई! आणि आमच्यावर आता पाणी पिऊनच झोपायची वेळ आली ताई!",आजी म्हणाली.

ठमीचे बाबा हा सगळा वार्तालाप सुरू असताना हताशपणे हातावर डोकं ठेवून शांतपणे बसून होते.

"असे नाराज होऊ नका! माझी स्पेशल डिश अजून बाकी आहे. ती खाऊन तुम्ही बोटं चाटत बसाल",ठमी एकदम आत्मविश्वासाने म्हणाली.

"ती कोणती बाळ!",आत्ता पर्यंत शांत बसलेले ठमीचे बाबा हळूहळू मान वर करत बोलले.

"ढें ण टॅ डॅन!!!",ठमीने उत्साहाने भेंडीयो वरचं झाकण काढलं.

सगळे त्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिले.

"हे !हे !हे! काय आहे!",ठमीचे बाबा भेदरून म्हणाले.

"हे आहे भेंडीयो!!!",तिने असं म्हणताच मामांनी दोन्ही हात लांब करून धाडकन टेबल वर मान टाकली.

"अरे खाऊन तर बघा! हे माझं इन्व्हेन्शन आहे वांग्या ऐवजी मी भेंडी वापरली आहे उंदिर्यो च्या ऐवजी भेंडीयो",ठमी समजवण्याची केविलवाणी धडपड करत होती.

"क्काय! उंदिर्यो!!अरे! बापरे!",असं म्हणून तिच्या बाबांनी वर केलेली मान पुन्हा धाडकन टेबल वर आदळली.

आता आत्या मामा आणि आजी तिघेही तीन वेगवेगळ्या दिशेला बघू लागले. कोणीही ठमीशीच काय पण एकमेकांशी सुद्धा बोलायला तयार नव्हते.

तेवढ्यात घड्याळात सात टोले पडले आणि बाहेर फाटका जवळ मला आवाज आला. सगळ्या मैत्रिणी ठमीच्या आमंत्रणावर आल्या होत्या. परंतु त्या घरातला रागरंग बघून आल्या पावलीच परतल्या.

मी सुद्धा हळूच मागे मागे दाराकडे सरकत काढता पाय घेतला.
दुसऱ्यादिवशी कळलं की ठमीला खूप म्हणजे खूपच बोलणे खावे लागले आणि तिने तिच्या भेंडीयो ची चव घेतल्याने डॉक्टरांनी दिलेले कडू कडू औषधी गोळ्या सुद्धा तिला खाव्या लागल्या.

आता आत्या तिला भीतीने स्वयंपाक घरात शिरुच देत नाही. तिला जे काही हवं असेल ते तिला स्वयंपाक घराच्या बाहेरच देते.

आत्ता थोड्यावेळापूर्वी खेळताना ती मला म्हणाली,
"थोडं कमी जास्त झालं असेल साहित्य! पण म्हणून काय झालं! त्यात मी आणखी इन्व्हेन्शन करून त्याची चव सुधरवू शकतेच पण आईला हे कोण सांगणार! आईच्या अश्या हट्टी स्वभावाने भेंडीयो वर्ल्ड फेमस डिश बनता बनता थोडक्यात राहिली."

तर अशी आहे आमची ठमी
नाही कोणापेक्षा कमी
आणि अखंड गोंधळाची हमी
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★