murder mystery in Marathi Crime Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | मर्डर मिस्ट्री

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मर्डर मिस्ट्री

"हॅलो गुप्तहेर केशव देशमुख?"

"हो बोलतोय"

"त्वरित पोलीस स्टेशन ला या अत्यंत महत्वाची केस आहे."

मला इन्स्पेक्टर नाईकांनी बोलावलं. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर,

"दिल्लीतले केंद्र मंत्री पी. व्ही. सिन्हा यांची मुलगी निशा लंडन जवळच्या नॉटिंगहॅम गावात एका युनिव्हर्सिटीत शिकत आहे आणि जवळच्याच स्टुडंट हॉस्टेल मध्ये ती राहते. तिच्यावर तिच्याच मैत्रिणीच्या खुनाचा आरोप आला आहे आणि त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे की तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतेय पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत.
आता पी. व्ही. सिन्हा यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात गुप्तहेर केशव देशमुखच काहीतरी करू शकतील. या आधी अनेक गहन प्रकरणे तुम्ही सोडविल्यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नॉटिंगहॅम पोलिसांना अर्ज करून गुप्तहेर केशव देशमुख म्हणजे तुम्ही तिथे तुमच्या पद्धतीने तपास कराल अशी परवानगी घेतली आहे.

तुम्हाला फक्त तिथे प्रकरणाचा पॅरलल तपास करायचाय तिथल्या पोलिसांना काहीही अडथळा न आणता आणि काही महत्वाची माहिती कळलीच ती फक्त तिथल्या पोलिसांना सांगायचीय.",इन्स्पेक्टर नाईक

"त्यांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाणार नाही सर , आपल्या महाराष्ट्राचे नाव मी चमकवून च येईन, कधी निघायचय मला?",गुप्तहेर केशव देशमुख

"शुभस्य शीघ्रम आधी दिल्ली ला सिन्हा यांना भेटून घ्यावं लागेल",इन्स्पेक्टर नाईक

"Ok सर"

काही औपचारिक कागदपत्रे घेऊन मी इन्स्पेक्टर नाईकांचा निरोप घेऊन निघालो.

दिल्ली ला जाऊन मी पी. व्ही. सिन्हा यांची भेट घेतली,त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं,आणि त्यांनी दिलेली माहिती घेऊन मी निघालो नॉटिंगहॅम ला,सोबत माझ्या माझा विश्वासू असिस्टंट अर्जुन सुदामे देखील होता.

तिथे जाताच तिथल्या पोलिसांनी आम्हाला वेलकम केलं आणि केस ची माहिती दिली.

मी पोलिसांना निशाला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी त्यांच्या एका पोलिसाच्या उपस्थितीत प्रश्ने विचारण्यास अनुमती दिली.

"निशा मला सगळं पहिल्या पासून सविस्तर सांग, कुठलाही धागा सोडू नको,एखादी बाब कमी महत्वाची वाटली तरीही सगळं सांग ",मी

"हो गुप्तहेर केशव मी सगळं इतंभूत सांगते. त्यादिवशी हॅलोविन ची पार्टी होती, मी माझी रूम मेट रीना तिचा बॉयफ्रेंड सॅम आणि माझा मित्र नचिकेत आम्ही पार्टीला जॉईन झालो,तिथे रीना ला ड्रिंक्स चा ओव्हरडोज झाला ,आणि त्या भरात ती बडबडायला लागली,तिने माझ्याशी भांडण उकरून काढलं,मी तिच्या बॉयफ्रेंड ला जाळ्यात ओढतेय असं तीच म्हणणं होतं जे अत्यंत चुकीचं आहे कारण मी आणि नचिकेत खूप चांगले मित्र आहोत आणि भारतात परत गेल्यावर आम्ही लग्नही करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या बॉयफ्रेंड मध्ये मला काय इंटरेस्ट असणार?",निशा

"बरं! पुढे काय झालं?",मी

"नंतर तिच्या बॉयफ्रेंड सॅम ने तिला आवरलं आणि रूम मध्ये आणलं. ती गाढ झोपलीय हे बघून नचिकेत त्याच्या रूम मध्ये आणि सॅम त्याच्या रूम मध्ये निघून गेले. मी पण माझ्या बेडवर झोपून गेले. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर रीना तिच्या बेडवर अजूनही झोपली होती म्हणून मी नचिकेत आणि सॅम ला बोलावलं,ती उठली नसल्यामुळे डॉक्टरांना बोलावलं तर त्यांनी ती मरण पावली असं सांगितलं.",निशा

"मृत्यू कशाने झाला? डॉक्टरांनी काय सांगितले?",मी

"मृत्यू फूड पोईसनिंग मुळे झाला असे पोस्ट मार्टम मध्ये
कळलं, actually तिला शेंगदाण्याची ऍलर्जी होती आणि कसं कोणास ठाऊक ते तिच्या खाण्यात आले आणि तिचा मृत्यू झाला,तिचे ओठ आणि चेहरा सुजला होता",निशा

"हो मी पोलिसांनी दाखवलेल्या फोटोत बघितलं. तिला ऍलर्जी होती हे तुला माहिती होतं",मी

"हो मला पहिल्याच दिवशी कळलं कारण जेव्हा मी तिला माझ्याजवळची चिक्की देऊ केली तेव्हाच तिने मला ऍलर्जी बद्दल सांगितलं होतं,पण पोलिसांना वाटतेय की मी मुद्दामच तिला शेंगदाणे दिले कारण त्यांना माझ्या कपाटात चिक्की चे पॅक सापडले. मला आवडतात त्यामुळे नेहमीच मी माझ्याजवळ ठेवते चिक्की पण याचा अर्थ असा थोडीच आहे की मी तिला चिक्की देऊन मारलं",निशा

"रात्री तुला जाग आली होती किंवा रीना रात्री उठली होती का? ",मी

"नाही मला तर सकाळी च जाग आली आणि मी जेव्हा बघितलं तर रीना झोपलेलीच होती म्हणजे ती रात्री उठली नसावी बहुतेक",निशा

"नक्की ती रात्री जशी झोपली होती तशीच म्हणजे त्याच पोजिशन मध्ये सकाळ पर्यंत होती की काही बदल झाला होता. ", मी

"झोपताना ती डाव्या कुशीवर झोपली होती,पण सकाळी बघितलं तर ती सरळ पाठीवर झोपलेली होती",निशा

"अच्छा,बरं सॅम बद्दल काय म्हणणं आहे तुझं, म्हणजे रीना आणि सॅम चे संबंध कसे होते?",मी

"रीना आणि सॅम चे उत्तम संबंध होते, रीना सॅम वर खूप प्रेम करायची आणि सॅम सुद्धा रिनावर खूप प्रेम करायचा",निशा


"नचिकेत कसा आहे स्वभावाने,तुमची ओळख कशी झाली?",मी

"नचिकेत माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे म्हणजे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत,भारतात एकाच कॉलेज मध्ये आम्ही शिकत होतो. खूप चांगला आहे तो स्वभावाने",निशा

"ओके निशा तू सगळी माहिती मला दिलेली आहे, आता तू निश्चिन्त राहा,निर्दोष व्यक्तीला मी शिक्षा होऊ देणार नाही",मी

माझ्या म्हणण्यानुसार निशाच्या हॉस्टेल जवळच्याच एका हॉटेल मध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती,जेणेकरून माझं निशा,सॅम आणि नचिकेत वर लक्ष राहील. निशा,सॅम, नचिकेत बद्दल मी त्यांच्या हॉस्टेल च्या हेड ला विचारलं, तसेच त्यांच्या मित्र मैत्रिनींनाही विचारलं,त्या तिघांचंही वागणं अत्यंत well mannered आहे असं त्यांनी सांगितलं.
मी सॅम आणि नचिकेत ची सुद्धा चौकशी केली,पण कोणाच्याही बोलण्यात संशयास्पद आढळलं नाही.

त्यादिवशी मी हॉटेल मधल्या माझ्या रूम च्या बाल्कनीत उभा होतो तेव्हा मला नचिकेत लपतछपत हॉस्टेल मधून बाहेर पडताना दिसला,हॉस्टेल पासून काही अंतरावरच्या उभ्या असलेल्या टॅक्सी मध्ये बसून तो निघून गेला. मी आणि माझा सहकारी अर्जुन सुदामे लगेच त्याच्या मागावर बाहेर पडलो.

दुसरी एक टॅक्सी घेऊन आम्ही त्याचा पाठलाग करू लागलो,त्याची टॅक्सी छोट्या गल्ल्यांमधून जाऊ लागली,आमची ही टॅक्सी त्यामागून जाऊ लागली,त्याची टॅक्सी वेगात जात असल्यामुळे आम्ही मागे पडत होतो आणि एका गल्लीत ती टॅक्सी कुठे नाहीशी झालीं ते कळलेच नाही, बरंच शोधायचा प्रयत्न करूनही काही माग लागला नाही,शेवटी निराशा पदरी घेऊन हॉटेलमध्ये परतावं लागलं.

"कुठे गेला असेल रे तो नचिकेत? त्याचा रिनाच्या खुनाशी काहीतरी संबंध आहे असं वाटतेय",अर्जुन मला म्हणाला.

"बहुतेक असावा, घाईघाईने तो कोणाला भेटायला गेला कळत नाही,नकाशावरून इथल्या रस्त्यांची माहिती आपण काढली पण एवढ्या बारक्या गल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती नाहीय, मला तर वाटते नचिकेतला आपण त्याचा पाठलाग करतोय असा संशय आला असावा आणि म्हणूनच तो अशा गल्ल्यांमधून गेला.",मी

दुसऱ्यादिवशी मी हॉस्टेल मध्ये चक्कर टाकली,नचिकेतला मुद्दामच भेटलो त्याची reaction बघायला. तो आधीसारखा मोकळा बोलत नव्हता,बोलणं टाळत होता आणि नजर चुकवत होता.
मग मी थेटच त्याला विचारलं,
" नचिकेत काल रात्री साडे अकरा वाजता मी तुला हॉस्टेल बाहेर पडताना बघितलं,कुठे गेला होतास तू?"

"नाही मी तर हॉस्टेल वरच होतो, पाहिजे तर हॉस्टेल च्या रिसेप्शनला विचारा",नचिकेत चाचरत म्हणाला.

नंतर हॉस्टेल मध्ये चौकशी केल्यावर कळलं की नचिकेत हॉस्टेल वरच होता, मग बाहेर पडताना ज्याला मी बघितलं तो कोण होता? तेवढ्यात मी हॉस्टेलमधून बाहेर पडताना नचिकेत च्या नकळत त्याचं फोन वरचं बोलणं ऐकलं,तो कोणाला तरी जवळच्या थिएटर मध्ये कार्यक्रमात भेटण्याबद्दल बोलत होता.

सॅम तर रीना वारल्या पासून हॉस्टेलवरच जास्तीत जास्त वेळ घालवायचा,त्याच्या गर्लफ्रेंड च्या मृत्यूमुळे तो निराश झाला होता,तो कॅन्टीन मध्ये जेवायलाही येत नसे,मग त्याचे मित्रच त्याला बळजबरी जेवायला लावत.

त्या रात्री बघितलेला तरुण कोण होता, उंची आणि साधारण शरीरयष्टी तर नाचिकेतसारखीच दिसत होती मग तो होता कोण? विचार करकरून डोकं गरगरायला लागलं म्हणून मी कॉफी घेतघेत विचार करू लागलो.
विचार करत असताना न्युज पेपर वर नजर गेली,त्यात मराठी मंडळाचा कार्यक्रमाची जाहिरात होती,संध्याकाळीच तो प्रोग्रॅम होता आणि विशेष म्हणजे आमच्या हॉटेल जवळच असलेल्या एका थिएटर मध्ये तो प्रोग्रॅम होता आणि आज सकाळीच याच कार्यक्रमाबद्दल मी नचिकेतच्या तोंडून ऐकलं होतं म्हणून मी विचार केला की संध्याकाळी प्रोग्रॅम ला जावं,तिथल्या पोलिसांच्या कानावर मी हे टाकलं,त्यांच्या ओळखीने आम्हाला दोन पासही मिळाले,ठरल्याप्रमाणे मी व अर्जुन सुदामे कार्यक्रम स्थळी पोचलो.
तिथे थिएटर भर मी नजर टाकली पण नचिकेत दिसला नाही,इथे तो कोणाला भेटायला येणार होता माहीत नाही!
लवकरच तिथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी संस्कृती,तिथल्या सवयी,तिथले पदार्थ,तिथले लोकनृत्य, लोकनाट्य, साहित्य, साहित्यिक, संत, वैज्ञानिक, क्रांतिकारी, ह्या सगळ्यांबद्दल माहिती देणारं छान नाटक बसवलं होतं, त्या नंतर लेझीम नृत्य सादर करण्यात आलं,काही जणांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. कोणी अभंग,कोणी भारुड,कोणी ओव्या म्हंटल्या. कोणी गोंधळ सादर केला तर कोणी लावणी असे एकानंतर एक कार्यक्रम बघण्यात आम्ही तल्लीन झालो. शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सगळे कार्यक्रम आटोपल्यावर मराठी मंडळातर्फे रात्रीच जेवण ठेवलं होतं,मोठा बफे होता,भरपूर स्टॉल्स होते आणि प्रत्येक स्टॉल्स वर महाराष्ट्रीय पदार्थ होते,एका स्टॉल वर पिठलं-झुणका-भाकरी आणि ठेचा होतं,दुसऱ्या स्टॉल वर पुरणाच्या गरम पोळी सोबत साजूक तुपाची वाटी serve करत होते,तिसऱ्या स्टॉल वर बाजरीच्या भाकरी,मिसळीचं वरण आणि भरीत उपलब्ध होतं,चौथ्या स्टॉल वर बाकरवडी,सुरळीची वडी,कोथिंबीर वडी,बेसन वडी हे उपलब्ध होते,पाचव्या स्टॉल वर बटाटेवडे,कांद्याचे भजे,धिरडे उपलब्ध होते,सहाव्या स्टॉल वर सगळे महाराष्ट्रीय स्वीट्स नारळीभात,सगळ्या प्रकारचे लाडू,अनारसे, करंज्या,सटोऱ्या,शंकरपाळे,पाकपुऱ्या, असे सगळे पदार्थ होते, तर सातव्या स्टॉल वर वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे,चकल्या,खारे शंकरपाळे उपलब्ध होते. हे सगळं बघून आम्ही भारावून गेलो, UK मध्ये सुद्धा मराठी संस्कृती आपल्या मराठी लोकांनी जपून ठेवली होती. जेवण आटोपून मी व अर्जुन मराठी मंडळाच्या संस्थापकाचे आभार मानून थिएटर च्या बाहेर पडतच होतो तेवढ्यात कोणीतरी मला धक्का लागून अडखळलं, त्याला उभं राहण्यासाठी मी त्याच्याजवळ गेलो तर मला आश्चर्य वाटलं, तो नचिकेत होता.

" अरे नचिकेत! तू इथे कसा?",मी

"मी ते काही नाही! नाटक बघायला आलो",नचिकेत नजर चुकवून म्हणाला.

"एकटाच आलास का?",मी

"नाही, मित्रासोबत",नचिकेत

तेवढ्यात नाचिकेतचा मित्र त्याला बोलवायला आला आणि नचिकेत निघून गेला.

"काहीतरी गडबड आहे ! हा नचिकेत काहीतरी गुपित लपवतोय.",.मी अर्जुनला म्हंटल. आणि टॅक्सी करून आम्ही निघणार तेवढ्यात सॅम घाईघाईने थिएटर बाहेरच्या एका टॅक्सी मध्ये बसताना दिसला,पण त्याचा पाठलाग केल्यावर कळलं की तो हॉस्टेल वरच परतत होता,तिथे तो का आला असावा हा प्रश्नच होता,कदाचित नचिकेत सारखा तो ही कार्यक्रमाला आला असेल.

दुसऱ्यादिवशी नचिकेतला मी एकटं गाठलं.

"नचिकेत, मला बऱ्याच दिवसांपासून असं वाटतेय की तू बरंच काही लपवतोय, ही शेवटची संधी आहे जे तुला माहिती आहे ते सांग,नाहीतर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल.",मी कोरड्या आवाजात म्हणालो.

"नाही केशव सर,मी काहीच लपवत नाही,तुमचा काहीतरी गैरसमज होतोय",नचिकेत

"ठीक आहे मग,तुला शांततेने सांगायचंच नसेल तर माझा नाईलाज आहे,पोलिसांचे दणके भेटल्यावरच तू बोलशील, मला वाटलं होतं तू मराठी माणूस आहे मी पण मराठी माणूस आहे,उगीच तुला कशाला पोलिसांच्या लाथा खायला लावायच्या पण तुझी इच्छाच दिसते लाथा खाण्याची तर मी काय करणार?,तयार राहा उद्या पोलिसांचं बोलावणं येईलच तुला",मी

"सर! प्लिज असं नका बोलू,मी गुन्हेगार नाहीय,माझा खुनाशी काहीही संबंध नाही",नचिकेत

"अरे मग सारखा नजर का चोरतो तू,तुझं वागणं संशयास्पद वाटतेय",मी

"सर प्लिज मला कबुल करा की जेही मी तुम्हांला सांगेन ते तुम्ही निशाला सांगू नका,तिला मी हळूहळू माझ्या पद्धतीने सांगेन.",नचिकेत अजिजीने म्हणाला.

"ठीक आहे ते आपण नंतर ठरवू, आधी काहीही आडपडदा न ठेवता सगळं सांगून टाक",मी

"सर actually मी होमो आहे,त्यादिवशी थिएटर मध्ये भेटलेला माझा मित्र,माझा बॉयफ्रेंड आहे त्याच्याशी माझे गेल्या वर्षांपासून relation आहेत,निशाला हे माहीत नाही,ती माझ्यावर खूप प्रेम करते पण मला हे सगळं तिला सांगायचंय पण कसं सांगू कळत नाही,पण हळूहळू मी तिला सांगेन,आणि म्हणूनच मी नजर चोरत होतो",नचिकेत

"अस्स! आणि त्यादिवशी हॉस्टेलमधून रात्री साडे अकरा वाजता ज्याला मी बघितलं तो कोण होता?",मी

"ते तर मलाही माहीत नाही सर,मी लवकरच झोपतो त्यामुळे काही कल्पना नाही",नचिकेत

"त्या दिवशी तुझा बॉयफ्रेंड तुला भेटायला आला होता का?",मी

"नाही सर हॉस्टेल मध्ये तो मला कधीच भेटत नाही,नेहमी आम्ही बाहेरच भेटतो,त्याच्या रूम वर",नचिकेत

"अच्छा! मला तुझ्या बॉयफ्रेंड ची खोली दाखवू शकशील? फक्त ह्याबद्दल त्याला काहीही सध्या सांगू नको,मी तुझं गुपित निशाला सांगणार नाही,तू आपल्या मधलं बोलणं तुझ्या बॉयफ्रेंड ला सांगू नको.",मी

"ठीक आहे सर",नचिकेत

दुसऱ्या दिवशी नचिकेतच्या बॉयफ्रेंड च्या नकळत मी त्याची खोली बघून घेतली.

दुसऱ्या दिवशी सॅम ची सहज चौकशी करायला मी त्याच्या हॉस्टेल मधल्या रूम मध्ये गेलो तर मी गेल्या गेल्या सॅम ने उशीखाली काहीतरी लपवलेलं मी बघितलं. त्याची जुजबी चौकशी करून मी हॉटेलवर परतलो.

सॅम कॉलेज मध्ये गेल्याची खात्री करून घेऊन मी पोलिसांच्या मदतीने आणि हॉस्टेल इंचार्ज च्या मदतीने त्याच्या खोलीची झडती घेतली,तिथे मला ज्याचा संशय होता ती वस्तू सापडली,त्यानंतर लगेच एका ठिकाणी मी पोलिसांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी छापा मारल्यावर आम्हाला मोठ्ठा ड्रग्स चा साठा सापडला.
अचानक झालेल्या छाप्यामुळे नचिकेतचा बॉयफ्रेंड हॅरी गंगारला. आधी त्याने, आपण त्या गावचेच नाही असा आव आणला होता पण जेव्हा मी त्याच्या संपूर्ण खोलीची तपासणी केली तेव्हा एका फरशीची चौकट मला जरा उचकटल्या सारखी वाटली म्हणून मी माझ्या जवळच्या काठीने त्याला आणखी उचकटायचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या मदतीने ती फारशी बाजूला केली,तर त्या फरशी खाली ड्रग चा भरपूर साठा सापडला. म्हणजे माझा कयास खरा ठरला होता,सॅम ने उशी खाली ड्रग्स चं छोटं पॅकेट लपवलं होतं जे आजच्या झडतीत सापडलं आणि हॅरी च सॅम ला नियमित ड्रग्स पुरवत होता, म्हणूनच पाहिल्यांदाच मी जेव्हा सॅम ला बघितलं तेव्हा त्याचे डोळे बघून हा ड्रग addict असावा असं मला वाटलं होतं.

त्यारात्री साडेअकरा ला हॉस्टेल बाहेर पडणारा दुसरा तिसरा कोणीही नसून हा हॅरी होता जो सॅम ला ड्रग्स पुरवून आपल्या खोलीवर जायला निघाला होता. आणि त्याची खोली अत्यंत बारीक गल्ल्यांमध्ये होती. मी त्याचा पाठलाग करतोय हे त्याला तेव्हा समजलं नव्हतं.

हॅरी ला पोलीस स्टेशन मध्ये नेल्यावर, पोलिसी खाक्या दाखवल्यावर,त्याने सगळं कबुल केलं,एवढंच नाहीतर त्याने दिलेल्या माहितीवरून मोठं ड्रग रॅकेट उघडकीस आलं, UK, भारत आणि अजून बरीच देशात हे ड्रग माफिया तस्करी करत होते,मी भारतात संपर्क साधून ह्या बद्दल माहिती देताच अनेक ठिकाणी छापे मारून ड्रग माफियांना पकडण्यात आलं.

हॅरी ला रिनाच्या खुना संदर्भात विचारल्यावर त्याने सॅम च नाव घेतलं,त्यारात्री हलोविन च्या पार्टीनंतर रीना आणि निशाचे भांडण झाले होते,रिनाला सॅम ने तिच्या हॉस्टेल रूम वर आणून झोपवलं होतं, सॅम आपल्या रूम मध्ये आला होता,रीना काही वेळाने उठली आणि सॅम च्या रूम मध्ये आली, सॅमच्या रूम मध्ये तेव्हा नेमका हॅरी आला होता, त्यांचं बोलणं ऐकून आणि ड्रग्स ची देवाण घेवाण बघून रीना हबकली.
तिने ड्रग्स चा नाद सोडा नाहीतर पोलिसांना सांगेन अशी धमकी दिली,सॅम ला तिचा खूप राग आला,त्याला तिच्या शेंगदाण्याच्या ऍलर्जी बद्दल माहिती होतं, त्याने मुद्दामच त्याच्याजवळ असलेली चिक्की चे तुकडे कोल्ड्रिंक मध्ये मिसळून तिला नकळत दिले,आता ड्रग्स घेणार नाही असं खोटं बोलून तिला कोल्ड्रिंक प्यायला लावलं, दहा मिनिटातच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,आणि तिने प्राण सोडला.
तिला त्याने तिच्या रूम वर नेऊन झोपवून टाकलं,सकाळी ती मेल्याचे सगळ्यांना कळले आणि निशा तिची रूममेट असल्याने आणि तिच्या बॅग मध्ये चिक्की सापडल्याने तिच्यावरच पूर्ण संशय आला.

पण ह्या कबुलीजबाबमुळे निशा निर्दोष आहे हे सिद्ध झालं,पोलीस सॅम ला अरेस्ट करण्यासाठी हॉस्टेल वर गेले असता त्यांना तो त्याच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळला, पोस्ट मार्टम नुसार कळलं की ड्रग्स च्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला होता.

निशाला ती निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंदही झाला होता तर ज्या नचिकेत वर ती जीवापाड प्रेम करत होती तो गे आहे हे कळल्यावर दुःख ही झालं होतं.
नचिकेतला त्याचा बॉयफ्रेंड ड्रग रॅकेट चालवत होता हे बघून धक्काच बसला.

निशाने माझे आभार मानले.

"खूप खूप आभार ! गुप्तहेर केशव,तुमच्यामुळे दोन संकटातून मी वाचले, एक खुनाच्या आरोपातून आणि दुसरे म्हणजे नचिकेत शी लग्न करण्यापासून, माहीत नाही कदाचित नचिकेत ने लग्नानंतर जर मला हे सत्य सांगितलं असतं तर खूपच प्रॉब्लेम झाला असता. बस्स आता इथलं शिक्षण संपवुन लवकरात लवकर भारतात परतायचं आहे", निशा

"आभार मानण्याची गरज नाही मी माझी ड्युटी केली. बेस्ट लक फॉर युअर फ्युचर निशा",असं म्हणून मी तिचा निरोप घेतला.


नॉटिंगहॅम पोलिसांनी माझे अभिनंदन केले. आमचं काम झालं असल्याने आम्ही भारताकडे येण्याच्या परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवासात अर्जुन नि मला विचारलं,

" का रे केशव! तुला त्या हॅरी वर कसा संशय आला?"

"अरे जेव्हा मी त्यादिवशी थिएटर मध्ये नचिकेत सोबत बघितलं होतं ना तेव्हाच,दोघांच्याही उंचीत, शरीर यष्टीत खूप साम्य होतं तसेच त्याने नचिकेतचे जरकीन घातले होते तेव्हाच माझ्या लक्षात आलं की त्यारात्रीही ह्या हॅरी नेच नचिकेतचे जॅकेट घातलं असणार म्हणून मला तो नचिकेतच आहे असं वाटलं",मी

भारतात दिल्लीत परतल्यावर पी. वी. सिन्हा यांनी माझे आभार मानले तसेच महाराष्ट्रात मुंबईत परतल्यावर कमिशनर व इन्स्पेक्टर नाईकांनी माझे व अर्जुन चे अभिनंदन केले.

अशा तर्हेने मर्डर मिस्ट्री सोल्व झाली.

☆★☆★☆★☆★☆