DEWAYANI WIKAS AND KEY - 3 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३

Featured Books
  • Operation Mirror - 4

    अभी तक आपने पढ़ा दोनों क्लोन में से असली कौन है पहचान मुश्कि...

  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

भाग   3......

भाग 2 वरून पुढे  वाचा ...........

विकास पापणी न लवता एक टक तिच्याकडे बघत होता आणि देवयांनीला अर्थातच जाणीव होती की ती  आकर्षक दिसते, आणि पुरुषांच्या  नजरांची पण तिला सवय होती. पण देवयानी विचार करत होती की याची नजर किती स्वच्छ आहे. आपल्याकडे तो कौतुकानीच  बघतो आहे, वासनेचा लवलेशही दिसत नाहीये.  आज सकाळी सुद्धा कॉफी च्या बहाण्याने कुठलाही गैरफायदा घेण्याचा विचार त्यानी केला नाही. संध्याकाळी सुद्धा काम होतं म्हणून चक्क नाही म्हणाला. कुठलाही तरुण, अशी एखाद्या आणि त्यातून सुंदर मुली कडून आलेली कॉफी ची ऑफर नाकारणार नाही. साधा आहे बिचारा आणि प्रामाणिक वाटतो आहे. एवढा कामात  बिझी असतांना सुद्धा आपल्याला सोडवायला धावून आला.  आणि एकदम तिच्या लक्षात आलं की तिला तो आवडला आहे. यालाच  प्रथम दर्शनीच प्रेमात पडणं म्हणतात का? हा विचार मनात आला आणि ती गोंधळून गेली. आजवर तिच्या मनात अशी भावना कधीच आली नव्हती. ती त्याच्याकडे बघतच  राहिली. पण लवकरच भानावर आली.

“अहो असच बघत राहिलात ना तर उपाशीच झोपावं लागेल. मेस मध्ये जायचं आहे ना?” – देवयानी.

विकासचा, चोरी पकडल्यावर जसा होतो तसा चेहरा झाला त्याचा. ओशाळले पणाचं हसू चेहर्‍यावर उमटलं. एवढा मार्केटिंग वाला माणूस पण समर्पक असं बोलायला काही सुचलंच नाही. बावचळल्या सारखा नुसताच हसला.

“काय झालं, जेवायला जायचं ना?” – देवयानी.

“हो, मी कोणच्या हॉटेल मध्ये जायचं हेच बघत होतो. त्याचाच विचार करत होतो.” विकासनी सारवा सारव करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

आता देवयानी मधला खट्टयाळ पणा  जागृत झाला. शेजारीच एक कार उभी होती. देवयानी त्या कारच्या  आरशात बघून आली.

विकासला वाटलं की, ती मेक अप ठीक ठाक आहे का बघायला गेली, म्हणून त्यांनी विचारलं  

“आरशात बघताय, काय झालं? मेक अप तर ठीकच दिसतो आहे.” – विकास,

“तो ठीकच आहे, कारण मी मेक अप केलेलाच नाहीये. मी बघायला गेले होते की कोणच्या हॉटेल्स ची नावं माझ्या चेहर्‍यावर लिहिली आहेत? पण तसं काही दिसलं नाही.” आणि मिष्कील हसली.

“माय गॉड, देवयानी, तुम्ही पण ना!” असं म्हणून विकास हसला. त्याचं ते मोकळं हसू पाहून देवयानी पण त्यात सामील झाली.

क्षणातच हवेत आणि वागण्यात मोकळे पणा आला.

“मी काय म्हणते आपण हॉटेल मध्ये नको जाऊया.” – देवयानी. 

का हो? बिलाची काळजी करू नका. मी भरीन बिल. तुमचं आमंत्रण कॉफी च होतं, जेवणाचं, माझं आहे.” – विकास.

“अहो बिलाची काळजी नाहीये. पण असं बघा आत्ता नऊ वाजत आले आहेत. तिथे जेवायच्या अगोदर अर्धा तास कोणी येतच नाही. वाट पहावी लागते. मग ऑर्डर मग पंधरा मिनिटांनी स्टार्टर्स येणार. त्यानंतर वीस एक मिनिटांनी जेवणाची ऑर्डर. यायला अर्धा तास. जेवायला अर्धा पाऊण तास. म्हणजे घरी यायला साडे अकरा होणार. नको त्या पेक्षा मेसच  बरी.” – देवयानी. 

“नाही मेस नको.” – विकास. 

“अहो कारण तर सांगा.” – देवयानी. 

“सांगायलाच पाहिजे का?” – विकास. 

“अर्थातच” – देवयानी. 

“एवढा तुमचं आग्रहच असेल, तर सांगतो. असं बघा, तुमच्या सारख्या सुंदर मुलीला मी मेस मध्ये घेऊन गेलो तर तिथले लोक उद्या माझ्या तोंडात शेण घालतील. नकोच तो उपद्व्याप” – विकास. 

“कळलं मला, आणि मान्य पण. मग असं करू एखादी पाव भाजीची गाडी बघू. मला पाव भाजी फार आवडते. तिथे कोणी तुम्हाला ओळखणार नाही. प्रश्न मिटला. आणखी एक मला अहो जाहो करू नका. कसं तरीच वाटतं.” – देवयानी. 

“ओके, पण इथे जवळ नको कोणी तरी भेटण्याची शक्यता असते. जरा दूरच बघू.” विकास म्हणाला आणि मग ते दोघं डेक्कन ला गेले.

घरी तिला सोडताना घड्याळात पाहीलं साडे दहा वाजले होते.

“उशीर झाला का?” – विकास.

“नाही. इतकं चालतं.” – देवयानी. 

मग फारसं काही बोलणं न होता दोघांनी गुड नाइट केलं.

घरी पोचल्यावर कपडे बदलून झोपायच्या तयारीत असतांना त्याच्या मनात आलं की अजून थोडा वेळ मिळाला असता  तर किती बरं झालं असतं. उगाच आपण दिवस वाया घालवला. आता उद्या ती मुंबईला जाणार मग भेट तर दूरच, बोलणं पण होईल की नाही हे ही कळायला मार्ग  नाही. पण मग हे ही त्याला जाणवलं की इंस्पेक्टर साहेबांनी त्याच्या सुरक्षेच्या काळजी पोटीच सूचना दिल्या होत्या. आणि खरं काय ते कळल्यावर लगेच फोन करून कळवलं पण होतं. त्यांचे आभार मानायलाच हवेत. चला उद्या त्यांना फोन करायला पाहिजे.  मग त्याला जरा बरं वाटलं. पण मग आता देवयांनीला फोन करावा का ? जर तिला असं वाटलं की आपण इतक्या कमी ओळखीवर खूप जास्त लिबर्टी घेतो आहे तर पुढे पण ती आपला फोन उचलणार नाही. त्यांनी तो विचार मनातून झटकून टाकला. थोड्या वेळाने फोन ची टिंग टिंग वाजली. त्यांनी फोन वर मेसेज वाचला. देवयानीचा होता.

“झोपलात का? असाल तर गुड नाइट.” – देवयानी. 

“नाही. अजून नाही, तुम्हाला पण झोप येत नाहीये का?” – विकास.

“नाही न!” – देवयानी. `

“काही तरी रामरक्षा वगैरे म्हणा म्हणजे झोप येईल.” – विकास. 

“म्हणून झाली.” – देवयानी. 

“मग आता?” – विकास.

“आता काहीच नाही.” – देवयानी  

इतके सारे मेसेज एकमेकांना पाठवल्यावर विकासची भीड चेपली.

“मी असं करतो, तिथे येतो आणि अंगाई गीत गातो. चालेल?” – विकास.

“नको नको. सुर कहाँ ताल कहाँ, येणारी झोप पण पळून जाईल.” – देवयानी. 

फोन वर नमुन्या दाखल म्हणून दाखवू?” – विकास.

“इतकी खात्री आहे आवाजा बद्दल?” – देवयानी.

“मग? वाटलं काय तुम्हाला?” – विकास.

“ओके.” – देवयानी. 

विकास नी लगेच चान्स घेतला आणि फोन लावला.

“हॅलो” – विकास. 

“हाय, हं मग करा सुरवात, कोणचं गाणं म्हणणार?” – देवयानी.

“मला गाणं येत नाही. आवड पण नाही. पण नुसतं मेसेज करत काय बोलायचं म्हणून फोनच केला.” – विकास.

“मला माहीत होतं, की तुम्हाला गाणं जमणार नाही म्हणून.” – देवयानी. 

“कसं काय? अंतर्यामी आहात?” – विकास.

“नाही. निष्कर्ष.” – देवयानी. 

“कसला निष्कर्ष?” – विकास.

“अहो तुमचा आवाज  इतका दमदार आणि खणखणीत आहे की मला रजा मुरादचीच आठवण झाली. तुमचा आवाज तसाच आहे धार दार एकदम. तुम्ही काय गाणं म्हणणार?” – देवयानी.

“हा रजा मुराद  कोण, बॉयफ्रेंड?” – विकास जरा नाराजीनेच बोलला.

“छीss, मला कोणी बॉयफ्रेंड नाहीये. त्या वर्तुळातली मी नाहीये. सगळे पुरुष सारखे, कोणाच नाव घेतलं की जोडून मोकळे.” – देवयानी.

“अरे, सॉरी, राग आला?” – विकास.

“मग? राग येणार नाही का?” – देवयानी.

“सॉरी. मी सहज विचारलं. तुम्ही मुंबईच्या, बॉयफ्रेंड असणं अगदी कॉमन म्हणून. मला काय माहीत तुम्हाला एवढा राग येईल. पण असो, जर बॉयफ्रेंड नाही तर हा आहे तरी कोण? आयडिया, विडियो कॉल करू का?” – विकास.

“विडियो कॉल? का?” – देवयानी.

विकास आता बराच धीट झाला होता. म्हणाला –

“नाही म्हणजे, तुम्ही रागवल्यावर किती सुंदर दिसता ते बघता येईल. नयनसुख घेता येईल की जरा.” 

देवयानी दिलखुलास हसली. विकास तेवढ्याने सुद्धा खुष झाला. त्याची भीड चेपली. “ए विडियो कॉल करू का? तू हसताना  किती मोहक दिसतेस ते तरी बघू दे.”

दोघंही जणं एकमेकांना अहो जाहो वरुन, अग आणि अरे वर केंव्हा आले हे त्यांनाच उमगलं नाही. पण आता शा‍ब्दिक जवळीक वाढली होती आणि दोघांचीही भीड पण चेपली होती.

“नको. मी आत्ता नाइट ड्रेस मध्ये आहे आणि या ड्रेस मध्ये मी एकदम चेटकीण दिसते. मग उद्या तू माझा फोन पण उचलणार नाहीस. नकोच ते.” – देवयानी 

“अच्छा म्हणजे उद्या पण बोलायचा चान्स आहे तर.” – विकास हुरळला.

“विचार होता तसा, पण तुझं ऑफिस असेल मग तू मला आजच्या सारखीच उडवा उडवीची उत्तरं देशील त्या पेक्षा मी आता असं ठरवलं आहे रविवारीच कॉल करीन. तेच बरं पडेल न?” – देवयानी.

विकास गप्प झाला. गाडी भलत्याच रुळावर जात होती. असं होऊन चालणार नव्हतं. काय करावं याचा  विचार करत  होता.

“आजची गोष्ट वेगळी होती. उद्या वेगळी असणार आहे.” – विकास. 

“आज काय वेगळं होतं?” – देवयानी.

“ते जाऊ दे, ते एवढं महत्वाचं नाहीये. पण मला प्रश्न पडला आहे की हा रजा मुराद कोण आहे? ते तर सांग.” – विकास.

“आधी आज काय वेगळं होतं ते सांग. मग रजा मुराद.” – देवयानी. 

“आता काय सांगू तुला? तुला माझा राग येईल आणि मग बोलणार नाहीस, त्या पेक्षा हा मुद्दा सोडून बोलू ना.” – विकास.

“मग आता बोलण्यासारखं काहीच नाहीये. गुड नाइट.” आणि देवयानीनी फोन ठेवून दिला.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.