Hold Up - 22 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 22

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 22


प्रकरण २२
“ ठीक आहे तर,शुक्रवारी मरुशिका मतकरी यांची उलट तपासणी चालू होती. त्यांना पुन्हा बोलवा ” न्या.एरंडे यांनी बेलिफ ला आज्ञा दिली.त्याने मरुशिका च्या नावाचा पुकारा दिला.मरुशिका सर्वांकडे पहात आणि न्यायाधीशांकडे स्मित हास्य करत पिंजऱ्यात आली. पाणिनी पटवर्धन उठून तिच्या दिशेने गेला.
“ मागची साक्ष झाल्या नंतरच्या कालावधीत तुम्ही कामोद शी बोलणं केलंच असेल.” पाणिनी म्हणाला.
“ नाही सर, मी नाही बोलले त्याच्याशी.कारण साक्षीदाराने आपली साक्ष इतर साक्षीदारांशी बोलणे अपेक्षित नसते.”-मरुशिका म्हणाली.
“ पण आरुष काणेकरांबरोबर चर्चा केलीच असेल ना?” पाणिनी ने विचारलं.
“ काही विशिष्ट मुद्द्यांवर बोललो आम्ही.”
“ साक्ष देताना तू काय सांगणार आहेस याची चर्चा केलीस तू?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी त्यांची उत्तरं दिली.”
“ त्यांनी विचारलेले प्रश्न तुझ्या साक्षी बद्दल होते?” पाणिनी ने विचारलं.
“ ते प्रसंगाशी संबंधित होते. ”—मरुशिका म्हणाली.
आरुष काणेकर उठला. “ न्यायमूर्ती महाराज, मी मान्यच करतो की मी मरुशिका मतकरी यांच्या बरोबर चर्चा केली आहे म्हणून.त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार माझी चाल ठरवण्यासाठी ही चर्चा आवश्यकच होती. ”
“ पाणिनी पटवर्धन साक्षीदाराला प्रश्न विचारत होते. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय का?” एरंडे यांनी विचारलं.
“ नाही नाही, ऑब्जेक्शन असं..... म्हणजे..” काणेकर अडखळला.
“ मग खाली बसा.” एरंडे म्हणाले.
“ ओके. सॉरी युअर ऑनर.” काणेकर खाली बसला.
“ पटवर्धन पुढे चला.”
“ मरुशिका , मला दरोड्याच्या बद्दल आणखी काही माहिती हव्ये तुमच्या कडून.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे पटवर्धन.” –मरुशिका
“ त्या संध्याकाळी मिस्टर कामोद यांच्या बरोबर किती वेळ होतात?”
“ दीड तास असेन साधारण. आम्ही एकत्रच जेवण घेतलं.”
“ कुठे?” पाणिनी ने विचारलं.
“ हॉटेल वनराई मधे.”
“ काय खाल्लंत तिथे?”
“ स्टार्टर मध्ये मंचुरियन आणि बटाटा चिप्स , नंतर पंजाबी कोफ्ता.”
“ जेवण झाल्यावर दरोडा पडला त्या ठिकाणी जाताना कुठल्या रस्त्याने गेलात? लक्षात आहे?” पाणिनी म्हणाला.
“ नक्कीच मिस्टर पटवर्धन. आम्ही कॉलेज रोड ने गेलो.”
“ दरोड्याच्या घटनेचे वर्णन करू शकाल ?”
“ ओह ! युअर ऑनर ! तेच तेच प्रश्न....” आरुष काणेकर उठून म्हणाला. न्यायाधीश एरंडे यांनी खाली बसवलं त्याला. “ ओव्हर रुल्ड.”
मरुशिका हसली. “ मी सांगते पटवर्धन, आम्ही कॉलेज रोड वरून चौकात आलो. त्याच वेळी लाल दिवा लागला.सिग्नल मोठा होता, कामोद ला तल्लफ आली म्हणून तो सिगारेट पेटवणार होता.त्याच वेळी कामोद बसला होता त्या बाजूचे दार अचानक उघडलं गेलं आणि आरोपीने त्याला बंदुकीचा धाक दाखवून हात वर करायला लावले. ”—मरुशिका म्हणाली.
“ त्या वेळी त्याच्या हातात लायटर होता? ”
“ त्या बद्दल मला शंभर टक्के खात्री देता येणार नाही,पटवर्धन.पण मी म्हणेन की होता त्याच्या हातात लायटर. ”
“ आरोपीने काय केलं?” पाणिनी ने विचारलं.
“ त्याने आधी कामोद च्या कोटात हात घालून पाकीट बाहेर काढल.त्यानंतर त्यांची टाय पिन खेचून काढली आणि मग माझी पर्स. त्यानंतर त्याने दार बंद केलं आणि पळून गेला, आपल्या गाडीत बसला आणि निघून गेला.”
“ त्याच्या गाडीकडे लक्ष दिलं तुम्ही?” पाणिनी ने विचारलं.
“ पाहिलं, पण अगदी सविस्तर नाही वर्णन करू शकणार मी पटवर्धन.मला गाडीची तांत्रिक दृष्टया फारशी माहिती नाही, म्हणजे पुरुषांना असते तशी.”
“ तुमच्या पर्स मधे काय होतं?” पाणिनी ने विचारलं.
“ पाच हजार रोख होते.”
“ आणखी काय?”
“ बायका वापरतात त्या वस्तू. म्हणजे सुट्टी नाणी, लिप स्टिक,एक छोटी डायरी. पेन ”
पाणिनी पटवर्धन ने पुराव्या दाखल ठेवलेली पर्स आपल्या हातात घेऊन मरुशिका ला विचारलं, “ तुम्ही ही पर्स तुमची पर्स म्हणून ओळखली आहे.बरोबर? दरोड्याच्या वेळी तुमच्या कडे असलेली ?”
“ बरोबर आहे.”
“ ती पळवली गेल्या नंतर तुम्ही पुन्हा कधी बघितली?” पाणिनी ने विचारलं.
“ पोलिसांनी मला दाखवली ती.”
“ कधी?”
“ मी आरोपीला ओळख परेड मधून ओळखल्यावर.” –मरुशिका
“ ती तुमचीच होती? कशावरून?”
“ ती मी खास बनवून घेतली होती, त्या पर्स ला एक फ्लॅप आहे.त्याला एक आरसा जोडला आहे.त्यांची रचला अशी आहे की पर्स उघडत असतांनाच फ्लॅप ची विशिष्ठ पद्धतीने घडी होते आणि आरसा उघडला जाऊन समोर येतो. त्यामुळे पर्स उघडतानाच पटकन चेहेरा दिसतो आणि मेकअप करता येतो.”
“ तुमच्या कडे या डिझाईन च्या बऱ्याच पर्स आहेत? ”
“ वेगवेगळया डिझाईन च्या आहेत.”
“ खास तुमच्या साठी त्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यामुळे काही फरक पडणार आहे या खटल्यामध्ये?”
“ मी फक्त तुम्हाला मदत करतोय, तुमची आठवण तपासायला.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही माझा गोंधळ उडवण्यासाठी प्रयत्न करताय, पटवर्धन.”
“ मी वस्तुस्थिती शोधायचा प्रयत्न करतोय.” पाणिनी पण आपलं हट्ट न सोडता म्हणाला.
“ ठीक आहे.एका वाक्यात सांगायचं तर ती माझीच पर्स आहे आणि मी ती ओळखली आहे.”—मरुशिका
“ दरोडा पडल्या पासून पोलिसांनी तुम्हाला ती दाखवे पर्यंत तुम्ही मधल्या काळात ती अजिबात पाहिली नव्हती? ” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ त्यातल्या वस्तू दरम्यानच्या काळात तुम्हाला मिळाल्या नव्हत्या?” पाणिनी ने विचारलं.
“ नव्हत्या.”
“ त्या पर्स मधला आरसा चांगला मोठा आहे ना?” पाणिनी ने विचारलं.
“ आरसा फुटणे अशुभ असतं असं मी ऐकलंय त्यामुळे मी ऑर्डर देताना चांगला जाड आरसा बसवायला सांगितला होता.”
“ अत्ता या क्षणी तुमच्या हातात असलेल्या पर्स मधे पण असाच जाड आरसा आहे ?”- पाणिनी ने विचारलं.
“ माझ्या सगळ्याच पर्स चे आरसे तसेच आहेत.” –मरुशिका
“ आणि तुमच्या अत्ता हातात असलेल्या पर्स मधे असलेल्या वस्तू सुध्दा गुन्ह्याच्या वेळी हातात असलेल्या पर्स मधील वस्तूंसारख्या आहेत?”
“ सर्वसाधारण तशाच ” मरुशिका म्हणाली आणि बोलतानाच तिने पर्स उघडून आत नजर टाकून पुन्हा पर्स बंद केली.
“ तुम्ही सिगारेट ओढता का?”
“ कधीतरी.” –मरुशिका उत्तरली.
“ तुमचा विशिष्ठ ब्रँड आहे की कोणतीही?” पाणिनी ने विचारलं.
“ मार्लबोरो.”
“ कामोद सिगारेट ओढतात?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ त्यांचा ब्रँड कोणता आहे?”
“ मला नक्की नाही सांगता येणार पटवर्धन.” मरुशिका म्हणाली.
“ मी कामोद ला हा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला की तुम्ही मार्लबोरो ओढता आणि तो स्वतः कॅपस्टन ”
“ तो जर तसं म्हणाला असेल तर बरोबर असेल.”
“ तुम्ही कामोद बरोबर जेवलात तेव्हा सिगारेट ओढली होती?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ दरोडा पडण्याच्या कालावधीत ओढली होती तुम्ही? ”
“ मला आठवत नाही नक्की.”
“ पण जेवण झाल्यावर गाडीत बसताना ओढली होती?”
“ हो.”
“ तुम्ही नेहेमीच फक्त मार्लबोरो ओढता त्यामुळे तुम्ही स्वतःकडे तुमच्या सिगारेट्स ठेवता ? ” पाणिनी म्हणाला.
“ हो. मी रोज नाही ओढत सिगारेट पण तल्लफ आली एखाद्या दिवशी तर ओढते. पण माझ्या कडे मी माझ्या सिगारेट्स बाळगते.”
“ दाखवा मला तुमच्या जवळच्या सिगारेट्स.” पाणिनी म्हणाला.
आरुष काणेकर उभा राहिला. “ ही उलट तपासणी फारच भरकटत चालल्ये.”
“ तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय ?” न्या.एरंडे यांनी विचारलं.
“ हो. संदर्भहीन,आणि आम्ही सरतपासणीत समाविष्ट न केलेल्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत. ”
“ मी दोन मिनिटात बरोब्बर संदर्भ जोडून दाखवतो.” पाणिनी म्हणाला.
“ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड ” एरंडे म्हणाले.
“ तुमच्या पर्स मध्ये अत्ता आहेत सिगारेट्स?” पाणिनी ने विचारलं.
“ आहेत.नक्कीच.” –मरुशिका म्हणाली.
“ दाखवा मला जरा.” पाणिनी म्हणाला.
मरुशिका ने आपल्या पर्स चा फ्लॅप उघडला आणि मनाविरुद्धच आपली सिगारेट केस काढून पाणिनी च्या हातात दिली.
पाणिनी पटवर्धन ने ती जरा तपासली आणि नंतर न्यायाधीशांना दिसेल अशा पद्धतीने हातात धरली.
“ या केस ला लायटर ची सोय आहे.आणि ही बऱ्यापैकी वापरलेली दिसते आहे, ”
“ हो बरेच वर्षे मी वापरली आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला भेट दिल्ये ती.”
“ ती सतत तुम्ही आपल्या जवळ बाळगता? म्हणजे जरी तुम्ही रोज सिगारेट ओढत नसलात तरी?” पाणिनी ने विचारलं.
“ हो कायम माझ्या पर्स मधे असते ती.” मरुशिका म्हणाली.
“ तर मग कोर्टाला जरा खुलासा करा की दरोडा पडला त्या वेळी तुमच्या पर्स मधे जर ही सिगारेट केस असेल आणि पोलिसांनी ती पर्स ताब्यात घेतली असेल आणि त्यातल्या कोणत्याही वस्तू तुम्हाला परत मिळाल्या नसतील असे तुम्ही मगाशी सांगितलेत हे खरे असेल तर मग तुमच्या कडे अत्ता असलेल्या पर्स मधे हीच केस कशी आली?” पाणिनी पटवर्धन कडाडला.
मरुशिका ने ती केस आपल्या हातात घेतली. चेहेऱ्यावरील भावना दडवण्याचा प्रयत्न केला आणि पाणिनी ला म्हणाली, “ दरोड्याच्या वेळी माझ्या पर्स मधे ही केस नव्हती मिस्टर पटवर्धन. मी कधीच तुम्हाला सांगितलं नाही की होती म्हणून.”
“ तुम्ही अत्ताच सांगितलं ना की माझ्या पर्स मधे ही केस कायमच ठेवलेली असते म्हणून.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्या अत्ताच लक्षात आलं की त्या दिवशी घरा बाहेर पडताना मी ही केस घ्यायला विसरले होते.”
“ मग संध्याकाळी कामोद बरोबर जेवायच्या वेळी सिगारेट ओढताना सिगारेट कशी काय ओढलीत?” पाणिनी ने विचारलं.
“ मी केस विसरले म्हणून रस्त्यातल्या दुकानातून सुट्ट्या सिगारेट आणि काडेपेटी खरेदी केली.” –मरुशिका म्हणाली.
“ तर मग कामोद ने साक्षीत जेव्हा सांगितलं की तुम्ही सिगारेट ओढताना तुमच्या याच सिगारेट केस मधून
मार्लबोरो सिगारेट काढून ओठात धरलीत तेव्हा हे सांगताना कामोद ची चूक झाली असे कोर्टाने समजावे का?” पाणिनी ने विचारलं.
मरुशिका चा चेहेरा एकदम बदलला. एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या प्राण्या सारखी तिची अवस्था झाली.
“ माझी हरकत आहे या प्रश्नाला.वादग्रस्त विधान म्हणून.”
“ सस्टेण्ड.”
“ तुम्हाला शंभर टक्के खात्री देता येईल या कोर्टाला की त्या रात्री ही केस तुमच्या पर्स मधे नव्हती?” पाणिनी ने विचारलं.
“ नव्हती. निश्चित नव्हती.” मरुशिका म्हणाली.
“ आणि याचीही खात्री आहे की त्यावेळी तुमच्या पर्स मधे असलेल्या सिगारेट या केस मधे नव्हत्या तर सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे तुम्ही तुमची सिगारेट पेटवताना काडेपेटी मधील काडी वापरली? ”
थोडा वेळ तणावपूर्ण शातातेत गेला.
“ उत्तर देऊ शकता तुम्ही?” पाणिनी ने विचारलं.
“ मी... मला... मी जरा आठवायचा प्रयत्न करते आहे.”
“ काही वेळापूर्वी तर तुम्हाला भयंकर आत्मविश्वास होता साक्ष देताना, पण मी जेव्हा सांगितलं तुम्हाला की कामोद यांनी तुमच्याकडे चंदेरी सिगारेट केस होती असं सांगितलं साक्ष देताना तेव्हा पासून तुमचा आत्म विश्वास डळमळीत झालाय ?” पाणिनी ने विचारलं.
“ असं काहीही नाही.”
“ तुम्ही सुट्ट्या सिगारेट्स आणि काडेपेटी खरेदी केल्याचं सांगितलं ते बरोबर असल्याची खात्री आहे?”
“ हो नक्कीच.”
“ किती खात्री आहे? जेवढी खात्री तुम्हाला तुमच्या साक्षीतल्या इतर मुद्द्यांबद्दल आहे तेवढीच ? ”
“ हो.”
“ आरोपीला ओळखण्या बाबत दिलेल्या साक्षी ची जेवढी खात्री तुम्हाला आहे तेवढीच खात्री तुम्हाला सुट्ट्या सिगारेट आणि काडेपेटी खरेदी केल्या बद्दल आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ हो ” मरुशिका म्हणाली.
“ आणि जर असं सिध्द झालं की सुट्ट्या सिगारेट आणि काडेपेटी खरेदी केल्या बद्दल तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे तर आरोपीला ओळखल्या बाबत तुमचे विधान सुध्दा चुकीचं आहे असं समजायचं?” पाणिनी ने विचारलं.
आरुष काणेकर तिच्या मदतीला आला. “ हा प्रश्नच वादग्रस्त आहे.”
“ मी साक्षीदाराची स्मरणशक्ती तपासतोय फक्त.” पाणिनी म्हणाला. “ तिच्या उत्तरातली अचुकता तपासण्यासाठी मी फक्त निकष लावतोय.”
“ ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड. साक्षीदाराने पटवर्धन यांच्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं द्यावं.” एरंडे म्हणाले.

( प्रकरण २२ समाप्त)