Shalinich Kaay Chunkal ? - 1 in Marathi Drama by Dilip Bhide books and stories PDF | शालिनीच काय चुकलं ? - भाग १

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

शालिनीच काय चुकलं ? - भाग १

 शालिनीचं काय चुकलं ?

भाग १

मार्च  महिन्यातले दिवस. सर्व साधारण पणे वार्षिक परीक्षेचे दिवस. आज रवीशंकर शाळेमध्ये वार्षिक पारीक्षेचा शेवटचा दिवस होता. ९ वी च्या वर्गात फिज़िक्स चा पेपर चालू होता. शालिनी मॅडम वर्गावर होत्या. वर्गावर त्यांची बारीक नजर होती. तिसऱ्या रांगेतल्या निलेश कडे त्यांची नजर गेली आणि त्यांना काही तरी जाणवलं. त्या उठून निलेशच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. निलेश चपापला, लिहिणं थांबवून उगाचच विचार करतो आहे असा चेहरा करून बसला. मॅडम तिथेच उभ्या होत्या आणि निलेशला काय लिहावं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ तसाच गेला. निलेश नुसताच बसून होता.

अजून पांच मिनिटं झाली आणि शालिनी मॅडम नी निलेशला विचारलं

“काय रे वेळ भराभर संपतो आहे आणि तू काहीच न लिहिता का बसला आहेस ?”

“नाही मॅडम विचार करतो आहे.” – निलेश

“ठीक आहे.” असं म्हणून मॅडम तिथून समोर गेल्या आणि समोर जाऊन दुसऱ्या रांगेत शिरल्या. निलेश नी आता कॉपी काढून लिहायला सुरवात केली होती. शालिनी मॅडम डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होत्या. रांगेच्या शेवटी जाऊन त्या वळल्या आणि पुढे जाऊन वळसा घालून निलेशच्या  बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. नीलेशनी लिहिणं चालूच ठेवलं पण आता त्याचा स्पीड मंदावला होता. मधूनच त्यानी मान वर करून मॅडम कडे पाहिलं.

“काय झालं मॅडम ?” निलेशनी विचारलं.

“काही नाही तू का थांबलास ? तू पेपर लिही.” – मॅडम

“मॅडम तुम्ही अशा बाजूला उभ्या आहात म्हणून मला सुचत नाहीये.” – निलेश

“ठीक आहे” असं म्हणून मॅडम रांगेच्या शेवटी जाऊन उभ्या राहिल्या. मॅडम जवळ नाही असं पाहून निलेशनी कॉपीचा कागद बाहेर काढला आणि लिहायला सुरवात केली. त्याच वेळी मॅडमनी त्याचा हात पकडला. निलेशच्या हातात कॉपीचा कागद होता. म्हणाल्या

“निलेश तू कॉपी करत होतास ? हे बरोबर नाहीये. परीक्षा तुम्ही किती अभ्यास केला हे बघण्या साठी घेतली जाते.”

“मॅडम चुकलं माझं. एक वेळ माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही.” निलेश म्हणाला. तो घाबरला होता. गयावया करत मॅडमची पन्हा पुन्हा माफी मागत होता. सगळा क्लास त्यांच्याच कडे बघत होता.

शालिनी मॅडमनी त्याचा पेपर  आणि कॉपीचा कागद पीन लावून टेबलावर ठेवला. आणि त्याला सांगितलं की जागेवर जाऊन बस. मग शिपायाला बोलावलं आणि सांगितलं की कोणाला तर वर्गावर पाठव.

दुसरे सर आल्यावर शालिनी मॅडम प्रिन्सिपलच्या ऑफिस मधे गेल्या. हेड सरांना सर्व माहिती दिल्यावर सर म्हणाले की “त्या मुलाला घेऊन या.” तो आल्यावर सर त्याला म्हणाले

“निलेश, शाळेत जे काही शिकवल्या जातं ते समजत नाही का ?”

निलेश गप्प.

“तुला ज्या काही अडचणी आल्या असतील त्या तू मॅडमना विचारल्या का ?” प्रिन्सिपल सरांनी विचारलं.

निलेश गप्प. मुख्याध्यापकांसमोर काही बोलण्याची त्याची हिम्मत झाली नाही.

“निलेश, आपण सर्व मध्यम वर्गीय लोक आहोत. आपल्याला जसं नापास होणं परवडणार नाही, तसंच लांडी लबाडी पण करणं परवडणार नाही. कारण आपली सचोटी हीच आपली ओळख आहे. आयुष्यात लबाड्या कामाला येत नाहीत. तू चांगला मुलगा आहेस, अश्या वाईट सवईं पासून दूरच रहा. तू जा पण उद्या तुझ्या वडीलांना शाळेत घेऊन ये. शालिनी मॅडम, त्याला एक चिठ्ठी द्या.” प्रिन्सिपल सर म्हणाले.

दुसऱ्या दिवशी निलेश आणि त्याचे वडील शाळेत हजर झाले. मुख्याध्यापकांनी निलेशच्या वडिलांना परिस्थितीची जाणीव करून दिली.

“सर,” निलेशचे वडील म्हणाले की

“आम्हाला निलेशनी सगळं सांगितलं आहे. त्याची चूक झाली आहे. पण सर त्याचं वर्ष वाया जाऊ देवू नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. याचं वर्ष वाया  जाणं आमच्या परिस्थितीला झेपणार नाही सर.”

“हे बघा, मी माझ्या अधिकारात एक निर्णय घेऊ शकतो. ही नववीची परीक्षा असल्याने, शाळा त्याची पुन्हा परीक्षा घेऊ शकते. त्या साठी त्याला एक महिन्यांचा वेळ देवू. पण त्याला अभ्यास करावा लागेल आणि त्याला अडचणी असतील तर त्यांचं निवारण करण्यासाठी, वेळ द्यायला शालिनी मॅडम तयार आहेत. काय रे निलेश आहे का तुझी तयारी, पुन्हा हा पेपर देण्याची. अर्थात प्रश्न वेगळे असतील. बोल.” – मुख्याध्यापक  

“हो सर, मी जोरात अभ्यास करीन. आणि काही अडचण आली तर, मॅडम कडे येईन.” निलेश म्हणाला.  

“ठीक तर मग आज पासूनच सुरवात कर. आणि हो, हे बघ शॉर्ट कट हा नेहमी अपघातच घडवून आणतो. तेंव्हा पुन्हा असं काही करू नकोस. जा बेस्ट लक.” प्रिन्सिपल सरांनी विषय संपवला.

बाप लेक घरी गेले. नाही म्हंटलं तरी निलेशच्या वडिलांना निलेशनी कॉपी केली हा मोठाच धक्का होता. घरी गेल्यावर त्यांनी नीलेशचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या आर्थिक परिस्थितीची त्याला पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली. म्हणाले

“निलेश तू मला निराश केलं तुझ्या अश्या वागण्याने तुझ्या दोघा धाकट्या भावांवर काय परिणाम यांचा विचार तू केला नाहीस. आज जर तू सापडला नसतास, तर असाच वाममार्गानी कामं करत राहिला असतास आणि पुढे गुंड मवाली बनला असतास. तुझं तर भविष्य डागाळलं असतच पण तुझ्या भावांच सुद्धा खराब झालं असतं. आता तरी सुधर, नीट अभ्यास कर.”

निलेश खाली मान घालून ऐकत होता. काही बोलला नाही. मग निलेशची आईच म्हणाली

“अहो पुरे आता. पोरानी चूक केली पण आता तो अभ्यास करीन म्हणतो आहे न मग करेल. आता नका बोलू त्याला. आता चला जेवायला. आणि निलेश उद्या पासून लाग रे बाबा अभ्यासाला. लागलेला डाग धुवून काढ. काढशील न  ?”

“हो आई. मन लावून करीन अभ्यास. माझी चूक मला कळली आहे.” – निलेश

पण निलेशच्या  मनात काही तरी भलतच चाललं होतं.त्याला स्वत:चीच फार घृणा वाटत होती. शेवटी त्यांनी मनाशी काही ठरवलं. आणि मगच झोपी गेला.  

दुसऱ्या दिवशीची सकाळ जरा विचित्रच उजाडली. सकाळी निलेशच्या आईला निलेश दिसला नाही. तिने त्याच्या दोघा धाकट्या भावांना उठवलं आणि विचारलं

“अरे निलेश कुठे दिसत नाहीये, तुम्हाला माहीत आहे का तो कुठे गेला आहे ते ?”

“नाही आई आम्ही तर झोपलो होतो.” – दोघा जणांनी उत्तर दिलं.

एव्हांना निलेशचे वडील आंघोळ करून बाहेर आले होते. त्यांना हा प्रकार समजला. ते म्हणाले

“अग येईल लवकरच. गेला असेल त्याच्या कोणा मित्रा कडे. एवढी काय काळजी करते आहेस ?”

“नाही हो काल पासून तो जरा गप्प गप्प च आहे. मला भीती वाटते. ए, जा रे तुम्ही दोघं त्याच्या मित्रांकडे जाऊन बघून या बरं.” निलेशची आई धाकट्या दोघांना म्हणाली.

“हे बघ तू फार काळजी करतेस. येईल तो, गेला असेल इकडे तिकडे जवळच. लहान आहे का तो आता. बरं मी आता कामावर जातो आहे”. असं म्हणून निलेशचे वडील निघून गेले.

बराच वेळ झाला, निलेश ची दोघं भावंड सगळी कडे फिरून आली. नन्नाचा पाढा. आई आता फारच अस्वस्थ झाली होती. यंत्रवत सगळी सकाळची कामं करत होती. पण त्यात काही जीव नव्हता. दोघं पोरं पण ओसरीवर चुपचाप बसून होती, दादा नाही म्हंटल्यांवर त्यांनाही काही सुचत नव्हतं.

बारा वाजण्याच्या सुमारास शेजारचा नवनीत धावत आला.

“काकू, काकू लवकर चला”

“काय रे काय झालं.” – निलेश ची आई  

“काकू, निलेशला तलावांतून बाहेर काढलंय.” – नवनीत

“अरे देवा ! काय सांगतो आहेस ? कसा आहे तो आता ?”  निलेश ची आई मटकन खालीच बसली. सगळं जग फिरताय असं वाटायला लागलं आणि तिची शुद्धच हरपली. तिघही मुलं छोटी होती, त्यांना कळेच ना की आता काय करायचं ते. तेवढ्यात हा आरडा ओरडा ऐकून नवनीत चे आई वडील बाहेर आले. त्यांना सगळा प्रकार समजल्यावर त्यांनी आधी नवनीतला निलेशच्या बाबांच्या ऑफिस मधे पिटाळलं. आणि मग निलेशच्या   आई कडे लक्ष पुरवलं. ती शुद्धीवर आल्यावर नवनीत चे वडील आपल्या बायकोला म्हणाले

“तू जरा यांच्या कडे लक्ष ठेव. मी तलावावर जाऊन बघतो काय घडलं आहे ते.”

तलावावर बराच गोंधळ माजला होता. बरीच गर्दी जमा झाली होती. निलेशची बॉडी बाहेर काढली होती आणि पोलिस पंचनामा करत होते. तेवढ्यात निलेशचे बाबा पण तिथे पोचले.

“अरे, या मुलाला ओळखणारं कोणी आहे का इथे ?” एका पोलिसांनी विचारलं.

निलेश चे बाबा पुढे झाले. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. त्यांनी ओळख पटवली.

आणि मग पोलिसांचे सवाल जवाब सुरू झाले.

“या मुलाने आत्महत्या केलेली दिसते आहे. असं काय घडलं घरी, की याच्यावर ही वेळ आली ? काय  मारपीट केली का ?” – इंस्पेक्टर

“नाही हो, हात सुद्धा लावला नाही त्याला. कॉपी करतांना पकडल्या गेला म्हणून थोडं रागवलो आणि नंतर समजावून सांगितलं. त्याला सुद्धा पटलं म्हणाला उद्या पासून नीट मन लावून अभ्यास करीन. बस. एवढंच. हवं तर यांना विचारा.”  निलेशच्या बाबांनी नवनीतच्या वडीलांकडे बोट दाखवलं.

“हे कोण  ?” – इंस्पेक्टर

“आमच्या शेजारी राहतात.” – निलेशचे बाबा

“हं बोला तुम्हाला काय माहिती आहे ? खरं बोला, खोटं बोलून सारवा सारव करण्याचा प्रयत्न  केला तर महागात पडेल.” पोलिसांनी नवनीतच्या बाबांना दम दिला.

“नाही साहेब, खोटं काय बोलायचं ? खरंच सांगतो. आमचे जवळचे संबंध आहेत. शेजारीच राहतो आम्ही. यांच्याकडे आजतागायत मी पोरांना मारल्याचं पाहीलं नाहीये. पोरं पण गुणी आणि सुस्वभावी आहेत. या निलेशनी कॉपी का करावी हेच कळत नाहीये. हा मुलगा तसा नव्हता हो. जबाबदार मुलगा होता. आणि डफर तर नक्कीच नव्हता.” नवनीतचे बाबा म्हणाले.

मग पोलिसांनी पंचनामा केला आणि अॅम्ब्युलन्स आल्यावर बॉडी मरणोत्तर तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिली.

त्या नंतर पोलिस शाळेत गेले.

“कॉपी कोणी पकडली ?” – इंस्पेक्टर

“मी,” शालिनी मॅडम समोर आल्या.

“काय घडलं ते आम्हाला सविस्तर सांगा. फक्त घटना सांगा तुमची मतं सांगू नका.” पोलिसांनी सुरवातच जरा कडक भाषेत केली.

शालिनी मॅडमनी सर्व वृत्तान्त कथन केला. अगदी जसं घडलं होतं तसा. नंतर पोलिसांनी प्रिन्सिपल आणि इतरांची चौकशी केली आणि ते निघून गेले.

दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात आली आणि सगळा  स्टाफ आणि शिक्षक लोक अन्त्यसंस्कारात सामील झाले. पोलिसांनी ‘आत्महत्या’ म्हणून केस ची नोंद केली. अश्या प्रकारची घटना शाळेत प्रथमच घडत होती, त्यामुळे सर्वांवरच शोक कळा पसरली होती. अत्यंत व्यथित अंत:करणाने निलेशच्या आई, वडिलांचे सांत्वन करून सगळे आपापल्या घरी गेले.

क्रमश: ..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर जरूर लाइक करा.

धन्यवाद.