Baba Tumhi Majhyasathi kay kele in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | बाबा ! तुम्ही माझ्यासाठी काय केले?

Featured Books
Categories
Share

बाबा ! तुम्ही माझ्यासाठी काय केले?

 

        संध्याकाळची वेळ होती. रामराव हॉलमध्ये अध्यात्मीक पुस्तक वाचत बसले होते. त्यांची सुन मिताली किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. तेवढयात ऑफीसवरून त्यांचा मुलगा धीरज घरी आला. आत येताच त्याने आपल्या हातातील बॅग जोरात बेडवर आपटली. आज तो जरा रागातच दिसत होता. रामरावांनी त्याच्याकडे पाहिले. तो त्यांना काही न बोलता फ्रेश होण्यासाठी गेला. रामराव परत आपल्या हातातील पुस्तक वाचत बसले.

        थोडया वेळात धीरज किचनमध्ये येवून खुर्चीवर बसला. घरी आल्याबरोबर त्याला चहा पिण्याची सवय होती. नेहमी प्रमाणे मितालीने त्याला चहा बनवून दिला. त्याच्या चेहऱ्यावरील तणाव तिला स्पष्ट जाणवला. तो चहा पित होता. तेवढयात तिने त्याला जरा भितभितच विचारले,

        “ काय झालं धीरज ? आपण कोणत्यातरी ताणात दिवत आहात.”

        “ काही नाही.” धीरज जरा रागातंच बोलला.

        त्याचवेळी पुस्तक वाचता-वाचता रामराव त्याच्या तणावाचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले.”

        त्याचा चहा पिणं झाल्यावर मितालीने त्याला विचारलं, “तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. काय झालं सांगा.”

         “ तुला सांगून काय होणार आहे? ”

         “काही नाही; पण तेवढंच तुमचं मन हलकं होईल.”

        थोडा वेळ धीरज शांत बसला. मिताली त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. रामरावही त्यांच्या बोलण्याकडे कान देवून बसले. कारण काही दिवसांपासून धीरजचा स्वभाव जरा चिडचीडा झाला होता. रामरावांना तर तो जास्त बोलतंच नव्हता. ज्या बापानं आयुष्यभर कष्ट करून त्याला लहाणाचं मोठं केलं. त्यांनी त्याला काही विचारलं तर तो त्यांना उद्दामपणे म्हणायचा ‘तुम्हाला काय कळतंय यातलं तुम्ही शांतच बसा.’ त्यांच्या प्रत्येक वाक्याला तो प्रतिउत्तर द्यायचा. कारण नसताना तो त्यांचा तीरस्कार करायचा. मुलगा आता आपल्या बरोबरीला आला आहे. तरुण वयात माथा जरा गरमच असतो. असा विचार करुन कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले रामराव आपल्या मुलासमोर शांतच बसायचे. पण त्यांना आपल्या मुलाची अशी अवस्था पाहवत नव्हती.

        धीरजने बोलायला सुरुवात केली.

        “ काही नाही. काही दिवसांपासून आमचा बॉस मला जरा मानसिक त्रास देत आहे. त्याच्यापुढे हुजरेगिरी करणाऱ्यांचे ऐकून त्याचा माझ्याविषयी गैरसमज झाला आहे. आपल्याला वाटतं राजकारण फक्त राजकारणातंच चालतं पण तसं नाही. प्रत्येक क्षेत्रात राजकीय डोक्यांची लोकं असतात. ते आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रास देतात.” एवढे बोलून तो थोडावेळ शांत बसला.

मिताली, “मग आज काय झालं ?

धीरज, “आज बॉसने मुद्दामच क्षमतेपेक्षा जास्त काम दिलं. मग कसं करणार? तरीही मी पुरेपूर प्रयत्न केले. वेळेत काम न झाल्याने बॉसने सर्वांसमोर माझा अपमान केला. मग एवढया दिवस माझ्या मनात साठलेला रागही ज्वालीमुखी सारखा उफाळून बाहेर आला. मग मी ही त्याला अरे तुऱ्यावर येऊन बोललो. शेवटी रागात तुझ्या नोकरीवर लाथ मारतो म्हणून निघून आलो.”

        थोडावेळ सर्वच जाण शांत बसले. आपल्या मुलाला समाजावून सांगण्यासाठी रामराव किचनमध्ये आले.

        रामराव, “ काळजी करु नकोस धीरज. सर्व व्यवस्थीत होईल. जीवनात चढ -उतार येतंच असतात.”

        तो आधीच त्यांचा तिरस्कार करत होता. त्यांच्या समजावून सांगण्याचा त्याला राग आला. तो रागातंच म्हणाला,

        “ तुम्ही तर मला काहीच बोलू नका. घरचं रेशन आणायचं आहे. तुमचे औषध चालू आहेत. लाईट बिल थकलं आहे. वरचा मजला बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता आहे. तुम्ही आमच्यासाठी कमवून ठेवलं असतं तर मला अशी पळापळ करण्याची गरज पडली नसती. तुम्ही काय करून ठेवलं आमच्यासाठी ? परत म्हणता, सगळं व्यवस्थीत होईल.”

        रामरावांना माहित होतं. धीरज रागात असल्यावर कोणाचंच ऐकून घेत नाही. त्यामुळे ते त्यांना काही न बोलता बाहेर गेले. थोडा वेळ धीरज शांत राहिला. आपल्या सासऱ्याला धीरज विनाकारण बोलल्याचे पाहून मितालीला वाईट वाटले.

        धीरजला शांत झालेलं पाहून मिताली म्हणाली,

        “तुम्ही बाबांना असं नव्हतं बोलायला पाहिजे.”

धीरज तिच्यावरंच चिडला, “मी खरं तेच बोललो. त्यांनी कमवून ठेवलं असतं तर मला एवढा ताण नसता झाला.”

        त्याचा राग पाहून ती शांतच बसली.

        दुसऱ्या दिवशी सकाळी धीरज आठ वाजता उठला. त्यावेळी त्याला काल त्याने बाबांना बोललेल्या गोष्टींची आठवण झाली. तो बाहेर आला. त्याने त्यांना हॉलमध्ये, किचनमध्ये, गॅलरीमध्ये शोधलं. पण ते त्याला दिसले नाहीत. बाबा सकाळी कोठे तरी बाहेर गेले असतील असा विचार करुन त्याने स्नान उरकले. आता दहा वाजत आले तरी बाबा घरी न आल्याने त्याने मितालीला विचारले,

        “ बाबा कोठे गेले? ”

        मिताली, “ मी किचनमध्येच होते. तेव्हाच बाहेर गेले.”

        धीरज “मी बाहेर चाललो आहे. दुसऱ्या कंपनीत काम मिळतं का ते पाहतो.” असे बोलून तो बाहेर गेला.

 

        दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी सासरे घरी आले नाहीत त्यामुळे मितालीला काळजी वाटु लागली. तिने सकाळपासून त्यांना चार वेळेस फोन केला होता. परंतु त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तर तिला जास्तच काळजी वाटु लागली. धीरजला फोन करावा तर ते काम शोधण्यासाठी गेले आहेत. ते आधीच तणावात आहेत. त्यामुळे त्यांना फोन करणं चुकीचं आहे असे समजून तिने धीरजला फोन केला नाही.

        आता दुपारचे चार वाजले होते. त्यामुळे न राहवून मितालीने धीरजला फोन केला. धीरजने फोन उचचला परंतु ती काही बोलण्याच्या आतच तो तिला म्हणाला,    “थोडया वेळात परत फोन करतो. सद्या मी कामात आहे.”

        पंधरा मिनिटांनी धीरजचा फोन आला.

        मिताली, “हॅलो.”

        धीरज, “मिताली, आज मी खूप खुष आहे. पहिल्या जॉबपेक्षा चांगला जॉब      मिळाला शिवाय पगारही जास्त आहे.मी आलोच पंधरा मिनीटात घरी.” असे        बोलून त्याने फोन ठेवला देखील.

 

        पंधरा मिनीटांनी घरी आल्यावर धीरज आनंदाने मितालीला म्हणाला,

        “आज स्वयंपाकाला सुट्टी. आज आपण बाहेर जेवायला जाऊयात. बाबा कोठे         आहेत ?”

        मिताली, “बाबा सकाळपासून घरी आलेच नाहीत. त्यांचा फोनही बंद आहे.     तुम्ही कामात असाल म्हणून मी तुम्हाला फोन केला नव्हता.ज्यावेळी फोन       केला तेव्हा तुम्ही ऐकून घेतले नाही.”

 

        तिचे बोलणे ऐकून धीरजही काळजीत पडला. त्यालाही रात्री वडीलांना बोलण्याचा पश्चाताप झाला. तो थोडा वेळ शांत बसला. मग त्याने त्यांच्या मोबाईलवर फोन लावून पाहिला. फोन बंदच होता. त्यामुळे तर त्याला जास्तच ताण आला.

 

        तो,” मी बाबांना बाहेर शोधून येतो.” असे बोलून तो बाहेर गेला देखील.

 

        रात्री साडे सात वाजता तो घरी आला. मिताली त्याची वाटच पाहत होती. धीरजने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने नकारार्थी मान हलवली. बाबा अजूनही घरी आले नाहीत हे त्याला कळाले. त्यामुळे तो डोक्याला हात लावून खुर्चीवर शांत बसला. मितालीने जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला गहिवरून आलं.त्याचे डोळे पाणावले.

 

        तो, “ मिताली, मी खरंच काल बाबांना बोलायला नव्हतं पाहिजे. माझ्यासोबत तीन बहिणींना लहाणाचे मोठे केले. चौघांचे लग्न करुन दिले.सर्वांना उच्च शिक्षण देवून आपापल्या पायावर उभे केले. हे घरही त्यांनीच घेतले. मी फक्त वरचा मजला बांधला. आईला कर्करोग होता. तिच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च केला. तरीही आई अर्ध्यावरच त्यांची साथ सोडून गेली. पण त्यांनी आम्हा भावंडांना कधी आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनाही घर सांभाळता सांभळता तारेवरची कसरत करावी लागली. पण ते खचले नाहीत, त्याबद्दल त्यांनी आम्हाला राग राग केला नाही. मी आता कुठे कमवायला लागलो तर मला ते जड वाटु लागले. खरंच माझं चुकलं मी त्यांना असं नव्हतं बोलायला पाहिजे. ते त्यामुळेच रागाने बाहेर गेले. ते नक्कीच माझ्या कोणत्या तरी बहिणीकडे गेले असतील. आता त्याही माझ्यावर रागावतील. ज्यांनी मला इतक्या वर्ष सांभाळलं. ते मला काही दिवसांतच जड वाटू लागले. मी स्वत:ला कधीच माफ करु शकत नाही.”

        मितालीच्याही डोळयात पाणी आलं होतं.ती त्याला समजावू लागली. तेवढयात रामराव तिला दारामध्ये दिसले. त्यांना पाहून ती धीरजला आनंदाने म्हणाली,

         “बाबा आले.”

        धीरजने दरवाजाकडे पाहिले, त्यांना पाहून तोही आनंदाने उभा राहिला. रामराव घरामध्ये आले. धीरजने त्यांना पायापासून डोक्याच्या केसांपर्यंत न्याहाळलं. त्यांचे कपडे मळाले होते. चेहऱ्यावर धुळ जमा झाली होती व काळे डाग पडले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहताच त्याने विचारले,

           “बाबा, तुम्ही तुमच्या जुन्या फॅक्टरीमध्ये गेला होता ?”

        त्यावर रामराव हसतंच म्हणाले, “ रात्री तुला परेशानीमध्ये पाहून मला राहावलं नाही. मी विचार केला माझ्याच्याने जेवढं काम होईल तेवढं करून तुला पैशांचा थोडाफार हातभार लावावा.”

        धीरजला गहिवरून आलं. तो म्हणाला, ”बाबा, मी रागात तुम्हाला बोललो होतो. तुम्ही मनाला लागून घेऊ नका. खरं तर तुम्ही आमच्यासाठी जेवढं केलं आहे. त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. आता आम्हाला तुम्ही हवे आहात. तुमचे पैसे नाही. मला पहिल्यापेक्षा चांगला जॉब मिळाला आहे. पगारही जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला काम करण्याची गरज नाही.मी तुम्हाला यापुढे कधी दुखावणार नाही. मला माफ करा.”

        रामराव म्हणाले,

        “ माफ करायला मला तुझ्या बोलण्याचे वाईट वाटलेच नाही. मीही तुझ्या वयात असताना माझ्या वडीलांना असंच म्हणालो होतो. पण जेव्हा मी कमवायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं त्यांनी माझ्यासाठी काय केलं. बाप उन्हाचे चटके सहन करतो. पण आपल्या परिवाराला झळ लागू देत नाही. मी तुझ्यासाठी काय केलं हे तुला आज नाही कळणार. जेव्हा तू बाप होशील तेव्हा कळेल.”

        त्यांच्या बोलण्यावर मिताली म्हणाली, “खरं बोलताय बाबा तुम्ही. आई-वडीलांचा त्याग मुलांना दिसत नाही. ते म्हातारे झाले की मुलांना जड वाटु लागतात. यापुढे आम्ही दोघेही तुमची काळजी घेऊ. तुम्ही गेल्यानंतर आम्ही दोघेही काळजीत पडलो होतो. मला तर वाटलं तुम्ही रागात घर सोडून गेलात?”

        त्यावर रामराव म्हणाले,

        “हे घर माझं आहे. मी घरातून बाहेर कधीच जाणार नाही. आता तुम्हालाच माझ्या घरातून बाहेर जावं लागेल.”

        त्यांचे बोलणे ऐकून ते दोघेही काळजीयुक्त नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. त्यावर रामराव त्यांच्याकडे हसत पाहत म्हणाले,

        “ मी मजाक केली तुमची. तुम्हीच माझे घर आहात. माणसाची खरी ताकद हे त्याचे कुटुंबच असते.मी तुमच्या शिवाय कसं राहू शकेल? चला आता जेवण करुन घेऊयात. मला खूप भुक लागली आहे.”

        त्यावर मिताली म्हणाली, “बाबा, आज हेच आपल्याला बाहेर जेवायला घेऊन जाणार आहेत. आम्ही तुमच्या मुळेच थांबलो आहोत.”

        त्यावर रामराव म्हणाले, “चला आज मीच तुम्हाला जेवायला बाहेर घेऊन जातो.”

        त्यांचे बोलणे ऐकून धीरज व मिताली दोघेही खुष झाले. ते तीघेही आनंदाने बाहेर जेवायला गेले.