Yogi Arvind in Marathi Motivational Stories by Uddhav Bhaiwal books and stories PDF | योगी अरविन्द

Featured Books
Categories
Share

योगी अरविन्द


उद्धव भयवाळ

औरंगाबाद

योगी अरविंद

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. परंतु १५ ऑगस्ट या दिवसाला आणखी एका दृष्टीने खूप महत्त्व आहे हे पुष्कळ लोकांना ठाऊक नसेल. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माच्या इतिहासात या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले ते १५ ऑगस्ट १८७२ रोजी महान संत, तत्त्वज्ञानी, योगी अरविंदांचा जन्म झाला म्हणून !

१५ ऑगस्ट १९७२ रोजी सर्व भारतीयांनी स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला आणि योगी अरविंदांची जन्मशताब्दीही त्याच दिवशी आली हा एक अपूर्व योगच म्हटला पाहिजे.

भारतमातेच्या महान पुत्रांपैकी एक असलेले श्री अरविंद यांनी भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्या वेळच्या अनेक थोर पुरुषांप्रमाणेच श्री अरविंद यांनाही शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले होते. इंग्लंडमध्ये असतांनाही भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला आणि तिथून आल्याबरोबर त्यांनी राजकारणात उडी घेतली. पण ज्या दिवशी भारत गुलामगिरीतून मुक्त झाला त्या दिवशीच म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा महापुरुष राजकारणी राहिला नव्हता. तो संत झाला होता. एव्हाना अरविंदांनी पॉन्डिचेरी येथे अरविंदाश्रमाची स्थापना केली होती. जेव्हा कुणीतरी त्यांना सांगितले की, "आपल्या जन्मदिनीच भारत स्वतंत्र झाला आहे." तेव्हा गालात स्मित करीत त्यांनी उत्तर दिले, "हा केवळ योगायोग नाही, त्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे ! "

श्री अरविंदांचे जीवन भव्य आणि ऐश्वर्यसंपन्न होते. पाश्चात्त्य पद्धतीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण सुरुवातीपासून इंग्रजी माध्यमातून झाले. त्यांच्यावर त्यांच्या लहानपणी देखरेख करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एका आंग्ल स्त्रीची नेमणूक केली होती.

इंग्लंडमधून परतल्यावर श्री अरविंद हे बडोदा राज्यात इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचे प्राध्यापक होते. त्याचवेळी भारताच्या स्वातंत्र्याचा विचार सदैव त्यांच्या डोक्यात घोळत असे. आपोआपच ते जहाल मतवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांकडे आकर्षित झाले. एकीकडे भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला असतांना दुसरीकडे ते स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि रवींद्रनाथ टागोरांच्या आध्यात्मिक उपदेशाने प्रभावित झाले.

त्यांनी बंगालच्या क्रांतीमध्ये अविस्मरणीय कामगिरी केलेली आहे. त्यांनी "वंदे मातरम" नावाचे दैनिकही चालविले. त्यांच्या दहशतवादी हालचालींमुळे १९०७ साली त्यांना अटक करण्यात आली. प्रसिद्ध अलीपूर कटामध्ये {Alipore conspiracy case} गुंतवण्याचा प्रयत्न ब्रिटीश सरकारने केला पण कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली. या खटल्यात त्यांच्यातर्फे काम पाहणारे श्री चित्तरंजन दास त्यावेळी म्हणाले होते, "आजचे तंग वातावरण कधीतरी निवळेल, दहशतवादी चळवळी थंडावतील, पिढ्यामागून पिढ्या येतील व जातील. पण श्री अरविंदांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेली कामगिरी कुणीही विसरणार नाही. देशभक्त, द्रष्टा आणि मानवतावादी म्हणून फक्‍त भारतातच काय पण सातासमुद्रापलीकडेही त्यांची कीर्ती फैलावेल."

श्री अरविंदांनी अलीपूर जेलमध्ये राजबंदी म्हणून प्रवेश केला.पण ते जेव्हा जेलच्या बाहेर आले तेव्हा ते एक संत होते. महान तत्त्वज्ञानी होते. अंतर्मनाच्या हाकेला साद देऊन त्यांनी कलकत्ता शहर सोडले. ते काही दिवस चन्द्रनगरला राहिले व पुन्हा तिथूनही निघून ते पोन्डेचेरीस आले. आज हिंदुधर्माचे आणि भारतीय संस्कृतीचे एक पवित्र स्थान म्हणून उभ्या जगात प्रसिद्ध असलेला पोन्डिचेरीचा अरविंदाश्रम

त्यांनी स्थापन केला.

योगी अरविंदांचे जीवन म्हणजे एक न उलगडणारे कोडेच होते. श्री अरविंद हे कवी होते की संत होते, राजकारणी होते की देशभक्त होते, राष्ट्रवादी होते की क्रांतिकारक होते हे सांगणे कठीण आहे. त्यांनी हिंदुधर्मासाठी केलेले कार्य हे आद्य शंकराचार्य किंवा रामानुजांच्या कार्याइतकेच महान होते. मानवजातीचा अध्यात्मविषयक वारसा पुढे चालविण्यासाठी आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य यांच्या रुढी, परंपरा एकत्र आणून त्यांचा मेळ घालण्याचा श्री अरविंदांनी केलेला प्रयत्न अतुलनीय आहे.

आपल्यासारखी सामान्य माणसे भौतिकवाद आणि अध्यात्मवाद यामध्ये विशेष रस घेत नाहीत. आपण पूर्णत: भौतिकवादावर विश्वास ठेवून अध्यात्मवादावर टीकाही करीत नाही आणि अध्यात्मवादाच्या आहारी जाऊन भौतिकवादही अमान्य करीत नाही. पण तत्त्वज्ञानी विचारवंतांमध्ये असे दोन गट आहेत. एक गट फक्त भौतिकवादी आहे तर दुसरा गट अध्यात्मवादी. या दोन गटांचा वाद हाच एक "वाद" होऊन बसला आहे. पण श्री अरविंदांनी भौतिकवाद आणि अध्यात्मवाद एकमेकांना पूरक कसे आहेत हे सर्वांना पटवून दिले. त्यांनी अध्यात्मवाद आणि भौतिकवादाची सांगड घातली.

रवींद्रनाथ आपल्या "Salutation to Shri Aarobindo " या कवितेत म्हणतात, "साऱ्या राष्ट्राला आज श्री अरविन्दांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. कारण ते एक राजकारणी पुढारीच नव्हते तर थोर ऋषीही होते.

**********

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००५

मोबाईल: ८८८८९२५४८८.