ALIBI - 14 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ॲ लि बी. - (प्रकरण १४)

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ॲ लि बी. - (प्रकरण १४)

अॅलिबी

प्रकरण १४

पाणिनी पटवर्धन इन्स्पे.होळकर बरोबर पोलीस चौकीत पोचला.बघतो तर कनक ओजस आधीच एका पोलिसा बरोबर तिथे बसलेला दिसला.पाणिनी आश्चर्याने अवाक झाला. “ कनक काय भानगड आहे ही ? तू इथे कसा? “

“ या घटके पर्यंत तरी मला कोणी काही सांगितलं नाही.” ओजस म्हणाला आणि जागे वरून उठून पाणिनी कडे गेला.

“ चल, पाणिनी, सरकारी वकील वाट बघताहेत आत.” इन्स्पे.होळकर म्हणाला.

ओजस पाणिनी जवळ येऊन म्हणाला, ” पाणिनी त्यांनी काहीही सांगू दे, पण मी तुझ्याच बाजूने आहे. तू काही गोष्टी वाकड्या पद्धतीने केल्या आहेस अशी माझी समजूत मी कोणालाही करू देणार नाही.” असे बोलून त्याने पाणिनी च्या हातात हात मिळवले आणि कोणाच्याही नकळत एक कागद पाणिनी च्या हातात सरकवला.

“ ए तुम्ही दोघे काय खुसपूस करताय? बाजुला सरका.” ओजस ज्या पोलीस बरोबर बसला होता तो पोलीस पाणिनी आणि ओजस ला उद्देशून म्हणाला.

“ ठीक,ठीक, पाणिनी म्हणाला, पॅण्ट च्या खिशातून रुमाल काढताना पाणिनीने ओजस ने दिलेला कागद हळूच खिशात सारला.

दोन मोठी दारे उघडून ते दोघे आत गेले, एक मोठा व्हरांडा होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या केबिन्स होत्या , त्यातील एक हेरंभ खांडेकर यांची होती.ते एखाद्या बुलडॉग सारखे होते.जाड मान. एखाद्या पिंपा सारखी छाती,आणि चेहेऱ्यावर एक प्रकारची मिजास.

“ बसा, पटवर्धन, त्या खुर्चीत. “ ते म्हणाले. पाणिनी ने आजुबाजूला नजर टाकली.एक शॉर्ट हॅण्ड लिहून घेणारा पत्रकार खुर्चीत बसला होता. त्याच्या बाजुला मंदार आणि मिसेस टेंबे बसले होते. शेजारी गेयता बाब्रस होती तिचे डोळे रडलेले दिसत होते.वरकरणी ती खूप दुखावलेली दिसत होती.

“ काय म्हणताय खांडेकर? “ – पाणिनी

“ माझ्याकडे अशी काही माहिती आहे ,ज्या आधारे मी तुला अटक करू शकतो पटवर्धन.पण तू वकील आहेस. तुला बोलायची संधी द्यायचं मी ठरवलंय.” - खांडेकर.

“ त्या बद्दल धन्यवाद.” अत्यंत नम्रपणाने कडवट पणा दाखवत पाणिनी पटवर्धन म्हणाला.

“ माझं पहिल्यापासूनच मत आहे आणि मी तुला सांगत आलोय की तुझ्या शोध घेण्याच्या आणि कोर्टातल्या उलट तपासणी घेण्याच्या पद्धती या अत्यंत धोकादायक असतात . एक ना एक दिवस त्या तुला गोत्यात आणू शकतात.” – खांडेकर

“ मला वाटतं आपण भाषण बाजी आणि उपदेश पर व्याख्यान टाळलेले बरे. मुद्द्याचं बोला.” पाणिनी म्हणाला.“ माझ्या पद्धती या माझ्या स्वतःच्या आहेत,माझी तत्व सुध्दा माझी आहेत त्याची जबाबदारी सुध्दा माझी आहे. तुम्हाला वेगळ काही सांगायचं असेल तर सांगा.” पाणिनी ने फटकारले.

“ मी तुला सावध करतोय पटवर्धन, ही आपली मुलाखत लिहून घेतली जाणार आहे.तू जे काही सांगशील ते तुझ्या विरोधात वापरलं जाऊ शकत.तू उत्तर द्यायलाच पाहिजेस असे नाही पण तू जर दिलंस उत्तर तर ते तू स्वेच्छेने दिले आहेस आणि कोणी बळजबरी न करता असे गृहित धरू आम्ही.”

“ हा सर्व सोपस्कार मला नवीन नाही.थोडक्यात आणि महत्वाचे सांगा.” पाणिनी म्हणाला.

खांडेकर, मंदार कडे वळले. “ तू मला जे सांगितलस ते पटवर्धन ला सांग.”

“ त्याला कशाला सांगायला पाहिजे, त्याला सर्व माहितीच आहे की.”

“ तरीही परत सांग त्याला सगळ. “ – खांडेकर

मंदार ने पाणिनी कडे खाऊ की गिळू नजरेने पाहिले , पाणिनी वर राग काढायची त्याला संधीच मिळाली होती. “ मी टोपे चा सेक्रेटरी होतो. मागच्या मंगळवारी पटवर्धन यांनी माझ्या ऑफिस मधे फोन केला.’’

पाणिनी पटवर्धन ने मधेच विचारले, “ किती वाजता? ‘’

“ नऊ च्या थोडा वेळ. आधी.’’

“ पटवर्धन मधे मधे बोलू नका.” खांडेकर म्हणाले.” तुला जे काय बोलायचं आहे, बचाव करायचाय,तो तुला नंतर करता येईल.हे कोर्ट नाहीये, त्याची उलट तपासणी घ्यायला.माझ्या हातात जी माहिती आली आहे ती तुला देण्यासाठी आणि त्यावर तुझं म्हणणे काय ते ऐकण्यासाठी तुला बोलावलंय.”

“ तुम्ही माझ्यावर एखादा आरोप ठेवणार असाल तर त्या विषयावर मला पूर्ण माहिती घ्यायचा अधिकार आहे.” पाणिनी खांडेकर ना उद्देशून म्हणाला. “ मंदार तुला विचारलेल्या प्रश्नाचे उतर दे “

मंदार ने पाणिनी च्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले आणि पुढे माहिती देऊ लागला.

“ पटवर्धन ने सांगितले मला की त्याला मिळालेल्या माहिती नुसार टोपे मेला होता. टोपे ज्या ट्रस्ट चा ट्रस्टी होता त्याची लाभार्थी म्हणजे पाणिनी पटवर्धन ची अशील असलेली गेयता बाब्रस होती.पटवर्धन ने पुढे मला असेही सांगितले की त्याला अशी माहिती मिळाली होती की टोपे ने वेस्टर्न माईन या कंपनीच्या शेअर्स मधे मोठी गुंतवणुक करण्याची व्यवस्था केली होती.हा व्यवहार त्याच्या अशिलाच्या दृष्टीने फायदेशीर होता.किमान पन्नास लाख रक्कम बाजूला राखून ठेवण्याचा त्यांचा इरादा होता.”

“ टोपे ज्या वेळेला प्रत्यक्षात मृत्यू पावला, त्या नंतर बऱ्याच वेळाने त्याचा मृत्यू झाला असावा असे जर पोलीस समजले,तर त्याचा फायदा त्याच्या दुसऱ्या अशिलाला होईल असे पटवर्धन ने सांगितले का? “ खांडेकरांनी विचारले.

खूप जुनी घटना आठवायची आहे असा अविर्भाव आणून नाटकी पणाने मंदार ने उत्तर दिले. ” अगदी त्याच भाषेत नाही पण पटवर्धन असे म्हणाला की मंगळवारी दुपारपर्यंत तो जीवंत असणे हे त्याच्या अशिलांच्या दृष्टीने फायदेशीर होते.”

“ एक अशील की अनेक अशील?” – खांडेकर

“ अनेक वचनात उल्लेख केला त्याने.”

टेंबे च्या डोळ्यातील विरोध आणि गेयता बाब्रस चा अप्रत्यक्ष आरोप, पाणिनी ला दिसला. पाणिनीने शांतपणे सिगारेट केस बाहेर काढली. नंतर लायटर शोधतोय असे भासवून ओजस ने दिलेली चिट्ठी बाहेर काढली आणि वाचली मोकाशी पळाला असून एका हॉटेल मधे खोट्या नावाने राहिला असल्याचा उल्लेख त्यात होता. हॉटेल चे नाव आणि ज्या नावाने राहिलाय ते नाव दिले होते.

मंदार पुढे सांगू लागला, ” पटवर्धन ने सांगितले की एजन्सी अॅक्ट नुसार टोपे मेल्या नंतर मला व्यवहार पूर्ण करायचा हक्क रहात नाही. पण सगळ्यांच्याच दृष्टीने टोपे मरण्यापूर्वी हा व्यवहार झाला असणे हिताचे आहे. पटवर्धन ने मला प्रस्ताव दिला की मी जर त्याला मदत केली तर दहा लाख तो मला देईल. “

“ मग तू सहकार्य करायचं मान्य केलंस का? आणि कसले सहकार्य अपेक्षित होतं त्याला?“ – खांडेकर

“अजिबात नाही मान्य केले मी सुरुवातीला पण मला मोह पडला. , तो मला म्हणाला की टोपे मंगळवारी अकरा वाजता जीवंत होता असे दाखवणे हे त्याच्या अशिला ला फायद्याचे असल्याने आपण दोघे मिळून एक नाटक करू , ज्यात पटवर्धन त्याच्या सेक्रेटरी तर्फे मला फोन करून टोपे शी बोलायची परवानगी मागणार होता.मग मीच टोपे च्या आवाजात त्याच्याशी बोलायचे असे पटवर्धन नेच सुचवले. या बद्दल मला दहा लाख द्यायचे कबूल केले. आणि दिले सुध्दा. मी दुसऱ्या बँकेत ते खोट्या नावाने खाते उघडून जमा केले.”

“ हे तू कोणाला सांगितलं आहेस “ – खांडेकर

“ नाही, तुम्हाला आज सकाळी बोललो तेवढच “

“ पटवर्धन तुला काय म्हणायचं आहे या सर्वांवरती ? “ – खांडेकर

“ मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत त्याला.”

“ प्रश्न विचारायची ही वेळ आणि ठिकाण योग्य आहे असे मला वाटत नाही.हे कोर्ट नाहीये आणि हा काही खटला चालू नाहीये.” – खांडेकर

पाणिनी ने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मंदार ला विचारले. “ तू ज्या खोट्या नावाने कुठल्यातरी बँकेत खाते उघडलेस , त्याची माहिती खांडेकर ना मिळाली म्हणून त्यांनी तुझ्याकडे त्याचे स्पष्टीकरण मागितले.त्यासाठी तू ही गोष्ट रचलीस “

“ त्याने असले काही केले नाही.” – खांडेकर

“ मला माझी सारासार विवेक बुध्दी स्वस्थ बसू देईना म्हणून मी स्वतःच खांडेकर नं भेटलो आणि सर्व सांगितलं. नाहीतर कोणालाच त्या खात्या बद्दल माहीत नव्हत “ - मंदार

“ खांडेकर तुम्ही लक्षात घ्या काय झालाय ते, मी मंदार ला भेटलो तेव्हा त्याने कबूल केले की टोपे मेल्याचे त्याला माहीत झाले होते. बोरगीकर त्याच्या कडचे शेअर्स विकायला उत्सुक होता कारण .त्यातून त्याला पन्नास लाख मिळणार होते. टोपे जीवंत असतानाच व्यवहार झाला तरच तो कायदेशीर ठरेल म्हणून टोपे जीवंत आहे हे भासवण्यासाठी बोरगीकर ने मंदार ला दहा लाख देऊ केले.माझ्या भेटीत मी मंदार ला सूचित केले होते या दहा लाखावर आयकर खात्याची नजर जाऊ शकेल आणि तू गोत्यात येशील. म्हणून त्याने ही गोष्ट रचून सांगितली.” - पाणिनी

“ धादांत खोटं आहे हे. “ मंदार म्हणाला

“ पाणिनी, असल काहीतरी कुभांड रचण्याचा प्रयत्न करू नको.मी बोरगीकर शी बोललोय. हे खरंच आहे की बोरगीकर त्याच्या जवळचा वैयक्तिक नावाचा शेअर्स चा व्यवहार करायला उत्सुक होता.पण त्याला या दहा लाख बद्दल काहीही माहीत नाही.आणि व्यवहार पूर्ण करतेवेळी टोपे मेला होता याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. दुसऱ्याला गोवून स्वतःला वाचवता नाही येणार तुला.” – खांडेकर

खांडेकर च्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाणिनी पटवर्धन पुढे बोलत राहिला.

“ बोरगीकर ने त्याच्या वकिलांचा सल्ला घेतला होता, वकिलांनी त्याला सांगितलं की टोपे मेल्यावर एजंट म्हणून मंदार चे अधिकार संपुष्टात येतात हे खरं आहे आणि त्यामुळे व्यवहार रद्द होईल आणि बोरगीकर ला मिळालेले पैसे पुन्हा गमवावे लागतील, त्या ऐवजी जर पाणिनी पटवर्धन ने, लाभार्थी गेयता बाब्रस चा वकील म्हणून या व्यवहाराला संमती दिली तर मंदार हा गेयता बाब्रस चा एजंट म्हणजे प्रतिनिधी ठरेल आणि ती जीवंत असल्याने व्यवहार कायदेशीर ठरेल आणि बोरगीकर ला मिळालेली रक्कम गमवावी लागणार नाही.”

“ अत्यंत कल्पनारम्य आणि तर्कसंगत ! पण पटवर्धन, दुर्दैवाने असे सर्व झाले असल्याचा पुरावा नाहीये तुझ्याकडे. “ – खांडेकर

“ ठीक आहे मी दुसऱ्या बाजूने मांडतो माझा मुद्दा. तुमचे काय मिसेस टेंबे ? तुम्हीच मला गेयता चे हित जपले जावे म्हणून नेमले होते ना? तुम्ही माझ्याकडे कधी आलात ते तुम्हाला माहीत आहे नाही का?” – पाणिनी

“ मी तुम्हाला मंगळवारी सकाळी दहा च्या आसपास फोन केला होता.पण त्या आधीच मी येणार आहे आणि तुम्हाला बाब्रस ची वकीली घ्यायला लागणार आहे हे तुम्हाला माहीत होते.”

“ कसे माहीत होते मला?, मी काय तुमच्या मनात शिरून माहिती घेतली ?

“ तुम्हाला पळशीकर कडून कळल होत. सोमवारी रात्री पासून तुम्ही त्याच्याशी संपर्क ठेऊन आहात. त्याने सोमवारी रात्री तुम्हाला भेटून गेयता बाब्रस चे वकीलपत्र घेण्यासाठी गळ घातली.” - टेंबे

“ अस घडलं असेल असं का वाटत तुम्हाला?” - पाणिनी

“ त्याने मला सांगितलं की .....” मिसेस टेंबे

तिला मधेच थांबवत खांडेकर खेकसले. “ त्याला उत्तर देऊन संधी देऊ नका.

“ या मुलाखतीचा हेतू काय आहे? ” - पाणिनी

“ तुला काय घडलंय याची माहिती देणे आणि तुझ्यावर कट कारस्थान रचल्याचा आणि गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप ठेऊन अटक वॉरण्ट बजावणे.” – खांडेकर

पाणिनी पटवर्धन एकदम शांत होता, कसलाच तणाव त्याच्यावर नव्हता.

“ कोणत्या गुन्ह्यात आणि कोणाला मदत करण्याचा आरोप ? “

“ पळशीकर ला, टोपे च्या खुना मध्ये मदत.”-खांडेकर

“ ओह, म्हणजे पळशीकर खुनी आहे तर ! “ पाणिनी ने विचारले.

“ तुला माहिती आहे ते. “ – खांडेकर

“ आणि मला कसं माहिती आहे म्हणे ते? “ – पाणिनी

“ सोमवारीच रात्री किंवा मंगळवारी पहाटे तुला तो तुझ्या ऑफिसात भेटला गूढ पणे. आणि तुला वकीली दिली. खुनाच्या वेळी तो तिथे नव्हताच असे सिध्द होईल अशी तू व्यवस्था केलीस.त्यासाठी मंगळवार दुपार पर्यंत टोपे जीवंत होता असे दाखवणे तुझ्या फायद्याचे होते.मंदार च्या निवेदना नंतर माझ्या या म्हणण्याला पुष्टीच मिळते आहे. तू निर्दोष असल्याचे मला तू पटवून देई पर्यंत तुझ्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणे ही मी माझे कर्तव्य च समजतो. ” – खांडेकर

“ तुम्ही मला कोणाला प्रश्न विचारून देत नाही, तुमच्या कडे माझ्या विरुध्द काय पुरावा आहे ते तुम्ही कळू देत नाही, माझे हात पूर्ण बांधून ठेवलेत तुम्ही आणि म्हणताय की निर्दोष आहे म्हणून सिध्द कर, कसं जमणार हे? ” – पाणिनी

“ त्यासाठी साक्षीदारांना उलट तपासणी घेतल्या सारखे प्रश्न विचारायची गरज नाही.तुझा या प्रकरणात काय संबंध आहे याचे साधे आणि सरळ विधान तू करू शकतोस.”

“ असे करणे म्हणजे माझ्या अशीलाचा विश्वास घात केल्या सारखे आहे. “ – पाणिनी

“ पळशीकर सोमवरी मध्यरात्री नंतर तुला भेटल्याचे तू नाकारतो आहेस का?“

“ माझ्या अशीलाशी संबंध येत असलेल्या कोणत्याही कृत्याची मी माहिती देणार नाही.” – पाणिनी

“ तर मग माझ्या दृष्टीने ही मुलाखत संपली.” खांडेकर म्हणाले. “ माझ्या कडील पुराव्या नुसार, पळशीकर हा मिसेस टोपे च्या प्रेमात होता.त्याने प्रयत्न करूनही ही गोष्ट टोपे ला समजली होती.त्या दोघांना रंगे हाथ पकडण्याचा टोपे चा डाव होता. ते करत असतानाच त्याला मृत्यू आला.” खांडेकर यांनी जाहीर केले.

“ किती वाजता ? “ पाणिनीने भाबडे पणाचा आव आणत विचारले

“ सव्वा अकराला सोमवारी रात्री. ‘’ खांडेकर म्हणाले.

पाणिनी ने मस्त पैकी सिगारेट चा धूर छतावर सोडला. “सव्वा अकराला, अच्छा, कोणी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला का? “

खांडेकर त्याच्या प्रश्नाला उत्तर देता देता थांबले. त्या ऐवजी त्यांनी फोन उचलला, “ आदिती हुबळीकर आहे का तिथे? आणि कनक ओजस ? .... ठीक आधी मी ओजस ला घेतो आत.”

“ मी जो तर्क लढवला आहे त्यात रात्री साडे अकराला तो मरणे हे अन्य घटनांशी जुळत नाही.” पाणिनी स्वतः शीच बोलल्या सारखे भासवत म्हणाला.

“ तुझ्या अंदाजाने कधी मेला असावा तो ? “ – खांडेकर

“ सोमवारी रात्री साडे नऊ ला.” – पाणिनी

“ या वेळे बाबत मी अत्ताच काही हमी देऊ शकत नाही , मला अजून एका साक्षीदारा ची मुलाखत घ्यायची आहे नंतर मी सांगीन.”

“ या तुमच्या साक्षीदाराने आवाज ऐकलाय बंदुकीचा? “

“ त्याने पळशीकर ला खुनी म्हणून ओळखलंय, त्याने प्रत्यक्ष खून पाहिलाय.मी त्याच्याशी फोन वर बोललोय फक्त लेखी निवेदन अजून हातात नाहीये माझ्या.” – खांडेकर

पाणिनी पटवर्धन ने आपले हात- पाय लांब करून ताणले आणि आळस दिला.” चला , मी निघतोय, मला अजून काहीच सांगायचे नाही.” असे म्हणून तो उभा राहिला.

“ माझ्या माणसाना तुला अटक करण्याचे वॉरंट काढायला सांगतोय मी पटवर्धन. तुझ्या कामाच्या पद्धती तुला एक दिवस गोत्यात आणणार आहेत हे मी पुन्हा पुन्हा सांगितलंय.”

“ अटक पूर्व जामिनासाठी मी पात्र असेन ना ? “ – पाणिनी

“ गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुझ्यावर असेल.”

“ तुमचे आरोप पत्र तयार आहे ? ”

“ तासाभरात होईल.”

“ तो पर्यंत मी अटकेत नाहीये ना ? “

“वॉरंट नसताना अटक करण्याचा माझा विचार नाही.”

“ मला माझी बाजू अत्यंत प्रभावी पणे मांडू दिल्या बद्दल आभार “ पाणिनी पटवर्धन खवचट पणे म्हणाला.आपली सिगारेट विझवली आणि निघाला.

“ या सगळ्यात आम्हा दोघींची नेमकी काय स्थिती राहणार आहे समजत नाहीसं झालंय. गेयता ला काही हे शेअर्स नको आहेत.” मिसेस टेंबे म्हणाली.
“ मला वाटतंय की हा व्यवहार आपल्याला दिवाणी न्यायालायातूनच रद्द करून घ्यावा लागेल.” खांडेकर म्हणाले.

गेयता बाब्रस हुंदके देत म्हणाली.” प्रत्येक जण माझ्याशी कट केल्या सारखेच वागतोय. अफरातफर झालेली रक्कम सोडून बाकीची रक्कम कवडीमोल किंमतीच्या शेअर्स मधे अडकली.”

“ तुला त्याची किंमत कवडीमोलाची आहे असे वाटतंय? “ - पाणिनी

“ नक्कीच.” ती म्हणाली.

काही न बोलता आणि मागे देखील न बघता पाणिनी दारा बाहेर च्या व्हरांड्यात गेला. वाटेत मंदार ने त्याला जाताना पाहिले, कोणतेही भाव चेहेऱ्यावर नव्हते त्याच्या.

बाहेर आल्यावर पाणिनीने आपल्या ऑफिस ला फोन केला.गती ने तो उचलला. “ कोण असेन मी ओळख “ सावध पणे पाणिनी म्हणाला. पलीकडून फक्त खोकल्याचा आवाज आला.” गती तुला ऐकू येतंय नं माझं बोलणं? “ पुन्हा खोकला. “ अच्छा, ऑफिस पोलिसांच्या नजरे खाली आहे.आणि तू तिकडून बोलू शकत नाहीयेस , बरोबर? “

पुन्हा खोकला.

“ मी काय बोलतोय हे दुसऱ्या लाईन वरून पोलीस ऐकत नाहीयेत ना?”

“ नाही.”

“ तू तुझ्या मित्राशी बोलते आहेस असे भासव.” पाणिनी म्हणाला.

“ मी आज नाही येऊ शकत डार्लिंग., साहेबांनी मला खूप काम देऊन ठेवलंय आणि ते काहीतरी अडचणीत आहेत....इथे खूप पोलिसांची नजर आहे ऑफिस वर, डार्लिंग, मला अस लाडाने बोलता पण नाही येणार.....”

मधेच ती एका पोलिसाला उद्देशून म्हणाली “ मी हे पण सांगू शकत नाही का माझ्या मित्राला की तुम्ही सगळ्यांनी नजर ठेवल्ये माझ्यावर....”

“ सौम्या कुठे आहे हे समजलंय का, तिच्या शी संपर्क झालंय ना? तिला तू फोन करू शकतेस ना.?” पाणिनी ने विचारले.

“ डार्लिंग, तुला सांगितलं ना मी ! अरे भेटले नाही तरी तुला फोन करू शकते.”

पाणिनी ने काय ते ओळखले. “ बाथरूम ला जाते असे भासवून जा, तिथे जवळ जो इंटर कॉम आहे, त्यातून सौम्या ला निरोप दे की पोर्टेबल टाईप रायटर घेऊन हॉटेल मधे मला भेट.लगेच नीघ असे सांग.” पाणिनी ने फोन ठेवा पर्यंत त्याला पोलीस गती शी बोलताना ऐकू आले. “ मला तुझ्याशी अत्ता बोललेल्या मित्राच नाव आणि पत्ता दे.”

पाणिनी पटवर्धन पुढच्या दहा मिनिटात हॉटेल मधे पोचला,तेवढ्यात सौम्या तिथे आलीच.

“ कितपत गंभीर आहे सर्व?” तिने विचारले.

पाणिनी ने तिला मंदार ने खोटी गोष्ट रचून त्याला अडकवण्याचा कसा प्रयत्न केलं ते सांगितलं. “ पुढे काय करायचयं आपण?” सौम्या ने विचारले.

“या हॉटेलात हरकिसन हर्षे या नावाने राहिलेल्या एका माणसा प्रति आपल्याला आदर भाव व्यक्त करायचा आहे.! “ – पाणिनी

“ त्याची खोली शोधून काढायची आहे?” सौम्या.

“ हो “

सौम्या ने एका फोन बूथ मधून हॉटेल च्या स्वागत कक्षाला फोन लावला. “ वन अॅण्ड ओन्ली या मॉल मधून बोलत्ये. हरकिसन हर्षेना त्यांच्या एका मित्राने सरप्राईज गिफ्ट पाठवलंय मला बाकी काही नकोय ते ५२० नंबर मधे आहेत ना एवढीच खात्री करायची होती. बर,बर ४०९ का, ठीक, ठीक ऐकण्यात चूक झाली आमची. आभारी आहे.”

पाणिनी खुष झाला, सौम्या ला बाजूला सारून त्याने ओजस च्या ऑफिस ला फोन लावला. ओजस च्या सहकाऱ्याने तो घेतला. “ मी पाणिनी पटवर्धन बोलतोय. मला अगदी तातडीने तुमचा एक माणूस मी सांगतोय त्या हॉटेल च्या पत्त्यावर हॉटेल च्या खोली नंबर ४०९ मधे पाठवा. हा माणूस दिसायला आणि प्रत्यक्षात एकदम दणकट,रांगडा हवा .मी खोलीत असेनच. तो आत आला की त्याने दोन बोटे वर करून मला खूण करायची म्हणजे तो आपलाच माणूस आहे हे मला कळेल.मी त्याला सांगे पर्यंत त्याने काहीही बोलायचे नाही. समजलं सगळ नीट ? “ त्याने फोन ठेवला आणि सौम्या ला म्हणाला,

“चला, जाऊया.”

ते दोघे ४०९ क्रमांकाच्या खोली समोर उभे राहिले. पाणिनी ने दार वाजवले.आतून त्या अनाथालयात काम करणाऱ्या आणि गाडी खाली पैसे ठेवणाऱ्या मोकाशी नामक इसमाचा क्षीण असा आवाज आला. “ कोण आहे “

सौम्या ने बाहेरून उत्तर दिले “ सर, टॉवेल्स आणलेत बदलायला.”

दार आतून उघडले गेले. पाणिनी लगेच आत घुसला, सौम्या ला आत घेतले.मागून दार बंद करून घेतले. विस्फारलेल्या डोळ्यांनी मोकाशी ने त्या दोघांकडे पाहिले.

“ सौम्या बाथरूम मधे कोणी नाही ना बघ.” पाणिनी म्हणाला.त्याने स्वतः कपाटाची दारे उघडून तपासली. सौम्या टेबलावर टाईपरायटर ठेऊन, त्यात कागद, घालून जय्यत तयारीत बसली.

“ तू फसवला गेलेला माणूस आहेस, तू काही केलं असशील असे वाटत नाही मला पण त्यांनी तुझा बळीचा बकरा केलाय.” पाणिनी म्हणाला.” तुला फक्त पैसा दिसत होता मोकाशी, त्याशिवाय तुला काहीही नको होत. त्यासाठी कोणीही काहीही सांगितलं तरी तू ऐकलं असतंस.

“ तुम्ही काय बोलताय हे मला कळत नाही “ – मोकाशी

त्याच्या बोलण्याकडे पाणिनीने लक्ष पण दिले नाही “ मोकाशी खून होताना तू बघितलं आहेस असे सांगण्यासाठी तुला पैसे देण्यात आले होते.तुला सांगितलं गेलं की पळशीकर पण मेलाय त्यामुळे तू सांगतो आहेस हे नाकारणारे कोणीच नाही, म्हणून तू बोलायला तयार झालास.आणि सांगितलस की पळशीकर ने टोपे ला गोळी घालताना तू बघितलं आहेस. तू त्या वेळी तिथेच होतास.”

मोकाशी च्या चेहेऱ्यावरील भाव गम्भीर होत गेले. पाणिनी पुढे बोलू लागला, “ तू एक गोष्ट विसरलास की खऱ्या खुन्याला , खुनाचा आरोप पळशीकर वर यावा असे वाटत नव्हते, त्याची तशी इच्छा ही नव्हती.अजून आठवडाभराने काय होणार आहे माहित्ये मोकाशी? पळशीकर हजर होईल अचानक, त्याच्या कडे खुनाच्या वेळेला तो तिथे नव्हता हे सिध्द होणारा पुरावा असेल , मग सरकारी वकील असा पवित्र घेतील की पळशीकर तिथे नव्हता पण खून झाला तेव्हा मोकाशी तिथेच होता, त्यानेच तसे कबुल केलंय याचा अर्थ मोकाशी हाच खुनी आहे, तो पळशीकर वर उगाचच आळ आणू पाहत होता. तुझा फाशीचा मार्ग सुकर होईल मोकाशी !

“ पळशीकर मेलाय “ मोकाशी खिन्न पणे म्हणाला.

“ तुला वाटतंय तस. प्रत्यक्षात, त्याच्याच गाडीत सापडलेला रक्ताळलेला कोट म्हणजे त्याने च पोलिसांच्या डोळ्यात केलेली धूळ फेक होती.”

मोकाशी अस्वस्थ पणे चुळबुळत राहिला. “ मी कोणालाही काहीही सांगितलं नाहीये.” तो म्हणाला.

“ नाही कसं, खांडेकर ना सगळ सांगितलं आहेस तू पोपटा सारखं, जसं तुला बोलायला सांगण्यात आल होत.सोमवारी रात्री पाऊस पडायला सुरवात झाल्यावर टोपे ला तो त्याच्या गाडीत बसलेला असताना मारण्यात आलं.तो लगेच मेला नाही, रात्री अकरा वाजे पर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत गाडीतच पडून होता. अकरा वाजल्या नंतर त्याला त्याच्या घरी हलवण्यात आले.अंथरुणावर झोपवण्यात आले. त्या नंतर मात्र तो लगेच मेला.त्याच्या पॅण्टच्या मागच्या खिशात बत्तीस कॅलिबर चे पिस्तुल होते.त्यातून गोळी झाडली गेली नव्हती.त्याच्या कोटाच्या खिशात असलेल्या रुमालावर लिपस्टिक चे ताजे डाग होते.टोपे ला त्याची बायको आणि पळशीकर चे संबंध माहीत झाले होते. पळशीकर ने जर गाडीत टोपे ला बघितले असते तर लगेचच गोळी घातली असती आणि निघून गेला असता. लिपस्टिक चे डाग रुमालावर पडले नसते.तुझ्या डोक्यातली जळमटं काढून टाक मोकाशी आणि त्या लिपस्टिक वर लक्ष केंद्रीत कर. कोणी चुंबन घेतलं असेल टोपे चं ? त्याच्या बायकोने? नक्कीच नाही. कारण ती तर त्याचा द्वेष करत होती. एकच स्त्री होती जिने त्याचे चुंबन घेतले असायची शक्यता होती आणि त्यानेही तिचे घेतले असेल. ते घेतले आणि त्याला गोळी घातली गेली.” तूच अंदाज बांध.”

“ मोकाशी मी तुला तीन मिनिटे देतो फक्त. त्यात तू कबुली दे. मीच तुझी शेवटची आशा आहे.”

“ तुम्ही मला अडकवू नाही शकत.”

तेवढ्यात धाडकन दार उघडले गेले. एक रांगडा माणूस, आत आला, त्याने दोन बोटे वर केली.

पटवर्धन एकदम उठून उभा राहिला, “ अरे कॅप्टन तुम्ही ! किती दिवसांनी भेटताय ! मोकाशी ला अटक करायला तुम्ही स्वतः याल असे वाटले नव्हते. मला वाटले इन्स्पे.होळकर येतील”

“ नाही, मीच स्वतः आलो.” तो पाहुणा म्हणाला.

“ हा माणूस आहे ना एक नंबर चा भित्रा ससा आहे, पण ब्लँक मेलर आहे. याच्यावर मला खुनाचा आरोप आणायचा नाहीये मला खर म्हणजे.तो खरं सांगायला तयार झालाय, त्याने तस लेखी दिले तर त्याची मान फासाच्या दोरी पासून मी वाचवायला तयार आहे.,त्याला तुम्ही साठ सेकंदाचा वेळ द्या, पलीकडे माझी सेक्रेटरी टाईपरायटर घेऊन तयारच आहे तो सांगेल ते लिहून घ्यायला., द्याल का माझ्या शब्दाखातर वेळ त्याला विचार करायला? ” पाणिनी काकुळतेचा आव आणून म्हणाला.

“ तू म्हणतो आहेस तर देतो मी त्याला दोन मिनिटे.” ओजस चा माणूस म्हणाला.

मोकाशी ने जरा विचार केला. “ ठीक आहे, मी कबुली जबाब द्यायला तयार आहे, पण मला वाचवाल ना तुम्ही? ”

पाणिनी ने मान डोलावली.

“ नक्की ? “

पाणिनी ने पुन्हा मान डोलावली.

मोकाशी ने आपल्या खिशातून कळकट असा रुमाल काढून घाम टिपला. “ मी नेमके काय करू?”

“ समोर सौम्या बसली आहे , तिला सर्व काही सांग. न लपवता. आणि तिचे लिहून झाले की त्याच्यावर सही कर.” – पाणिनी

“ या सर्वाला सुरुवात झाली, जेव्हा मी टोपे ला ब्लॅक मेल करायला सुरवात केली.” मोकाशी ने सांगायला सुरवात केली. “ पहिल्याने माझ्याकडे असलेली माहिती मी त्याला विकणार होतो....”

सौम्या चे हात मशीन वर अक्षरशः नाजुक पणे एखाद्या पियानोवर फिरतात तसे फिरत होते.मोकाशी च्या बोलण्याच्या वेगा पेक्षा काकणभर जास्तच वेगाने .सर्व लिहून झाले तेव्हा पाणिनी सौम्या ला म्हणाला,” यावर मोकाशी ची सही घे, साक्षीदार म्हणून कॅप्टन सरांची घे आणि त्या वर्तमान पत्राच्या संपादकाकडे पाकिटात घालून नेऊन दे. तुझ्या बरोबर मोकाशी ला ही घेऊन जा.”

पाणिनी एवढ सांगून दारातून बाहेर पडला. जाता जाता ओजस च्या माणसाला म्हणाला, मोकाशी ने मधेच काही शहाण पणा करायचा प्रयत्न केला तर फाडून काढ त्याला ! “

“ कसं फाडू त्याला?”

“ दोन हात आहेत ना तुला? पुरेसे नाहीत का ते? “ पाणिनी हसून म्हणाला आणि बाहेर पडला.

(प्रकरण १४ समाप्त)