स्वावलंबन
उद्या मावसभावाचे लग्न असल्यामुळे नितीन आजच मावसभावाच्या गावी गेला होता. त्याचे आई-वडील, भाऊ, वहिणी, बायको, एक तीन वर्षांचा पुतण्या व त्याची एक वर्षाची लहान मुलगी हे सर्वजण लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी येणार होते. नितीनने खास लग्नात घालण्यासाठी पाच हजार रु. किंमतीचा एक ड्रेस विकत घेतला होता. तो ड्रेस त्याने घरीच ठेवला होता व उद्या येताना घेवून येण्यास आपल्या पत्नीला म्हणजेच शितलला सांगीतले होते.
मावसभावाचा कलवरा होवून नितीन नवरीच्या गावी गेला होता. लग्नाचा दिवस उजाडला, लग्नाची वेळ जवळ आलेली होती. तरी नितीनच्या घरच्या मंडळींची गाडी आलेली नव्हती. त्याने आपल्या भावाला फोन करून विचारले असता त्याच्या भावाने अर्ध्या तासात पोहचणार असल्याचे सांगीतले. परण्या निघाला होता. नितीनला तो नविन ड्रेस लग्नामध्ये घालून लग्नामध्ये मिरवायचे होते. पण घरच्या मंडळींची गाडी न आल्याने त्याला तो ड्रेस घालता येत नव्हता. घरच्यांना यायला उशीर झाल्यामुळे नितीनला आता खूप राग आला होता. परण्या मारोतीला जावून परत निघाला. तेवढयात गाडी येताना नितीनला दिसली. त्याच्या घरचे सर्व मंडळी गाडीतून उतरून मांडवात जावून बसली. नितीन आपल्या बायकोकडे गेला. त्याने तिला ड्रेस मागीतला. ती थोडावेळ शांतच राहिली. कारण लहान मुलांच्या आवरण्याच्या गडबडीमध्ये नितीनचा ड्रेस तिच्याकडून घरीच विसरला होता. आणि ड्रेस विसरल्यामुळे नितीन चिडणार हे नक्की होतं. तिला त्याचा राग माहित होता. तो राग आल्यावर काय करील सांगता येत नव्हतं.ती घाबरली. तिने एकवेळ आपल्या सासूकडे पाहिले. परंतु तिची सासु दुसऱ्या पाहुण्यांना बोलण्यात मग्न होती. नितीनने तिला परत विचारले, “ ड्रेस कुठे आहे ? ” तिने भित भितच ड्रेस घरी विसरल्याचे सांगीतले. नितीनला हे ऐकून खूप राग आला. काय होतंय कळायच्या आत त्याने एक चापट तिच्या गालावर लगावली. त्या आवाजाने सर्व पाहुण्यांचे लक्ष त्यांचेकडे वळले. तिच्या गोऱ्या गालावर त्याच्या हाताच्या बोटांचे लाल वळ उमटले. कसेतरी नितीनच्या आईने त्याला समजावून सांगत तेथून बाजूला पाठवून दिले.
मांडवातील सर्व महिला आता शितलकडेच पाहत होत्या. तिला खूप लाज वाटू लागली. ती सर्वांच्या नजरा चुकवत शांतपणे खाली पाहत रडू लागली. तिच्या आईसारख्या प्रेमळ सासुने तिची समजूत काढली. ईकडे आता नितीनचा राग शांत झाला होता. त्याला झालेल्या कृत्याचा पश्चाताप वाटत होता. पण आता होवून गेलेल्या गोष्टीला विलाज नव्हता. त्याचे लग्नामध्ये मन लागले नाही. लग्न उरकले. सर्वजण घरी परत आले. तो तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. त्याला आपराध्यासारखं वाटत होतं.
घरी आल्यावर ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही.पण सकाळी आपल्या लहान बाळाला घेवून ती कोठेतरी घरातून बाहेर निघून गेली. सगळयांनी तिला फोन केला पण तिने कोणाचा फोन उचलला नाही. नितीनच्या आईने ती तिच्या माहेरी गेल्याचे सांगीतले.आता घरातील सर्वजण नितीनला बोलू लागले.
त्याची आई म्हणाली, “या अशा जमान्यामध्ये तुला खूप गरीब स्वभावाची बायको भेटली. तु तिला वेळोवेळी त्रास देत होतास. तिची यामध्ये कोणतीही चूक नाही. तुझ्याच मुलीला भुक लागल्यामुळे तिने तिला पाजण्यासाठी छातीशी धरलं होतं. गाडी येवून दारात थांबली होती. सर्वजण तिला लवकर आवरण्यासाठी गडबड करत होते. त्यामुळे गडबडीमध्ये तिच्याकडून तुझा ड्रेस घरीच विसरला. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यावर तिच्या ते लक्षात आले पण तोवर आम्ही खूप लांब आलो होतो. तुझा ड्रेस विसरल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होते. पण मीच तिची समजूत काढली. तु सर्वांसमोर तिला मारलेस. लहाणपणापासून तु असाच वागतोस. तु तुझ्या वस्तु स्वत: व्यवस्थीत ठेवायला हव्यास. पण तु सदैव इतरांवर अवलंबून राहतोस. मी तुझी आई होते म्हणून सहन केलं. आणि तुझी बायकोही गरीब स्वभावाची असल्यामुळे इतक्या दिवस सहन करत होती. पण काल तु इतक्या माणसांसमोर तिच्यावर हात उगारला. त्यामळे त्या बिचारीचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यामुळे ती तुला सोडून आपल्या माहेराला निघून गेली आहे.
नितीन आपल्या खोलीमध्ये आला आणि त्याला आता मागील काही दिवसांतील घटना आठवू लागल्या. थोडया-थेाडया गोष्टींवरून तो तिला रागवत होता. एखादेवेळेस तोच एखादी वस्तू कोठेतरी ठेवायचा आणि ती वस्तू त्याच्याच लक्षातून गेल्यामुळे त्याला न सापडल्यास तो तिच्यावरच रागवायचा.ऑफीसला जातानाही सर्व वस्तू तिने वेळेवर दिल्या नाही तर तो तिला खूप रागवायचा. आता त्याचं हे वागणं रोजचंच झालं होतं. त्याचा राग पाहून कधी-कधी तिला भितीमुळे माहित असलेली वस्तूही लवकर सापडायची नाही. तिच्या मनाने नितीनची चांगलीच दहशत घेतली होती. पण याची सुतरामही कल्पना नितीनला नव्हती. फक्त घरातील इतर मंडळी चांगली असल्यामुळे ती त्या घरात टिकली होती. नितीन रोज ऑफीसला जायचा. आल्यानंतर जेवण करून मोबाईल पाहत बसायचा. तो तिच्यासाठी थोडाही वेळ देत नव्हता. कधी कधी ऑफीसमधील तणावाचा तो तिच्यावरच राग काढायचा. ती सर्व कामे आटोपून बाळाला खाऊ-पिऊ घालून झोपी जायची. हा सकाळी पुन्हा उशीरा उठून रोजंच किर-किर करायचा. आता या सर्व गोष्टी आठवून त्याला खूप पश्चाताप होत होता.
त्याने तिला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. मेसेज केला पण तिने मेसेजलाही रिप्लाय दिला नाही. तसे त्याचेही तिच्यावर जिवापाड प्रेम होते. पण त्याला ते व्यक्त करता येत नव्हते. त्याच्या बाळाच्या जन्माच्यावेळी त्याला आपल्या पत्नीची खूप काळजी लागून राहिली होती. डॉक्टरांनी गर्भ पिशवीमध्ये पाणी कमी असल्याने सिझर करावे लागेल. अन्यथा बाळाच्या जिवितास धोका होऊ शकतो असे सांगीतले होते. तेव्हा त्याने आपल्या दुसऱ्या एका डॉक्टर मित्राचा व आपल्या नातेवाईकांचा सल्ला घेवून सिझर डिलिव्हरी करण्यासाठी संमती दिली होती. शितलला डिलीव्हरीसाठी डिलिव्हरी वॉर्डमध्ये नेले होते. त्यावेळी नितीनला खूप चिंता लागून राहिली होती. तो मनातच देवाचे नाम:स्मरण करत होता. सगळं सुरळीत होऊ दे म्हणून विनंती करत होता. तो दवाखान्यातीलच एका मोकळया रुममध्ये गेला. आपल्या पत्नीने आपलं मूल जन्माला घालण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला.या विचाराने त्याच्या डोळयात अश्रू दाटून आले होते. तो एकटयातच रडत होता. तेवढयात त्याला त्याची आई बोलवायला आली. तिने “ मुलगी झाली.आई व बाळ दोन्हीही सुरक्षीत आहेत.” असं सांगीतलं. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. थोडावेळानं त्याने आपलं बाळ पाहिलं होतं. ते बाळ त्याच्या पत्नीसारखंच सुंदर दिसत होतं. आता आपल्या बाळाच्या आठवणीनेही त्याचा जीव व्याकूळ झाला. ते बाळ झालं तसं त्याने आपल्या बाळाला आपुलकीने कधी जवळ घेतलं नव्हतं. बाळ कधी रात्री रडू लागलं तर झोपमोड होते म्हणून तो आपल्या पत्नीवरच रागवत होता. शितल आपल्या बाळाला मांडीवर घेवून रात्र-रात्र जागी असायची. थोडा डोळा लागला की, ते बाळ परत उठून रडू लागायचं.परत तिची झोपमोड व्हायची. ऑफीसला जायचे असल्यामुळे नितीन झोपी जायचा. शितल सकाळी त्याच्या आधी उठून त्याचा टिफीन तयार करून द्यायची. नितीन उशीरा उठून काही विसरलं तर तिच्यावर रागवायचा. कपडे, टॉवेल घरामध्ये तसाच अस्ताव्यस्त टाकून निघून जायचा.
आता त्याला आपल्या पत्नी व आपल्या बाळाची आठवण येऊ लागली. खरंच आपण समजतो, आपल्या पत्नीला काही काम नाही. पण ती आपल्यापेक्षा जास्त काम करते. उलट आपल्याला ऑफीसला काही दिवस सुट्टया असतात. पण तिला घर कामातून एक दिवसही सुट्टी नाही. आजारी असली तरी तिला काम करावेच लागते. आपल्या कामात व तिच्या कामात फरक इतकाच आहे की, आपल्याला आपल्या कामाचा पगार मिळतो आणि तिला आपल्या कुटुंबाचे काम केल्याने समाधान. खरंच आजच्या काळात आपल्या पत्नीसारखरी सोशीक बायको मिळणे कठीण आहे. आपण तिच्यावर इतक्यांदा रागावलो पण ती कधी आपल्याला उलट बोलली नाही. पण काल जे आपण केले ते खरेच चुकीचे होते. आपला बॉस जर आपल्याला एखाद्यावेळी रागावला तर आपल्याला किती वाईट वाटते? मग आपण तर रोजच तिच्यावर रागावतो. तिला पण वाईट वाटतंच असेल. पण त्याचा आपण कधीच विचार केला नाही.असा मनाशीच विचार करत तो पश्चाताप करू लागला. त्याच्या डोळयातून नकळतपणे अश्रू वाहू लागले. त्याच्या घशाला कोरड पडली. तो खाली मान घालून रडत होता. तेवढयात कोणीतरी त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. त्याने ग्लास धरलेल्या व्यक्तीच्या हाताकडे पाहिले. त्या हातातील बांगडया त्याला ओळखीच्या वाटल्या. तो हात आपल्या पत्नीचाच असल्याचे त्याने ओळखले. त्याने वर पाहिले.तीच होती. त्याने आनंदाने तिला मिठी मारली. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तरीही तो तिला रडतच म्हणाला, “ माझी चूक झाली. मला माफ कर.” तिने त्याचे डोळे पुसत त्याला पाणी प्यायला दिले. त्याने तिच्याकडे पाहत पाणी पिले. त्याला आता ताजंतवाणं झाल्यासारखं वाटु लागलं. ती म्हणाली, “ मला माहित आहे. तुमचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण काही दिवसांपासून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. आपलं नविन लग्न झाल्यावर तुम्ही जसं प्रेम करत होता. तसं प्रेम मला तुमच्याकडून अपेक्षीत आहे. मी समजू शकते तुम्हाला ऑफीसमध्ये कामाचा ताण आहे. पण माझ्यावर रागावल्याने तो ताण कमी होणार आहे का? उलट त्या रागाचा तुमच्याच आरोग्यावर व आपल्या हसत्या-खेळत्या संसारावर व घरातील इतर सदस्य व आपल्या लहान बाळावर त्याचा परिणाम होवून घरातील चांगले वातावरण दुषीत होते.”
त्याला तिचे म्हणणे पटले. तो म्हणाला, “ खरंच माझं भाग्य आहे. मला तुझ्यासारखी समजदार पत्नी मिळाली. आता मी तुला कधीच त्रास देणार नाही.” ती हसली व म्हणाली, “ हॉलमध्ये चला.सर्वजण तुमची वाट पाहत आहेत.” तोही हसला व तो तिच्या सोबत हॉलमध्ये आला. त्याचे आई-वडील, भाऊ-वहिणी तेथे होते. लहान मुले झोपली होती.
त्याचे वडील म्हणाले, “आज माझं वय साठीच्या पुढे असून मी माझे कपडे व माझ्या वस्तू व्यवस्थीत ठेवतो. कुठे जायचे असेल तर त्याची सर्व तयारी आधीच करून ठेवतो. त्यामुळे मला कोणावर रागवायची गरज पडत नाही. त्यामुळे माझे सर्व कामे वेळेवर पार पडतात. पण तु सर्व वस्तू अस्ताव्यस्त ठेवतो. व एखादी वस्तू वेळेवर नाही मिळाल्यामुळे चिडचिड करतो. मी काही दिवसांपुर्वी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तु ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.”
त्याची आई म्हणाली, “ खरं तर ती माहेरी गेली नव्हती. मीच तिला आपल्या गावातील तिच्या मावशीकडे थोडया वेळासाठी पाठवले होते. तुला ती माहेरी गेल्याचे खोटेच सांगीतले होते.” आता त्याला सासू-सुनाचा प्लॅन लक्षात आला. त्याने आपल्या बायकोकडे पाहिले.ती लाजून स्वत:च्या पायाच्या बोटाकडे पाहत हसत होती. त्यालाही हसू आले. ते पाहून घरातील इतर मंडळीही हसू लागली. काही क्षणापुर्वी उद्ध्वस्त होणारे घर घरातील इतर चांगल्या स्वभावांच्या मंडळीमध्ये वाचलं होतं. त्या दिवशी पासून नितीनही आपल्या ऑफीसच्या व इतर वस्तू स्वत: व्यवस्थित ठेवत होता. त्यामुळे त्या त्याला वेळेवर सापडून त्याचा वेळही वाचत होता आणि त्याला आता कोणावर रागवण्याची वेळही येत नव्हती. त्या दिवशीपासून त्याने स्वावलंबन अंगिकारले. त्याचा परिणाम त्याच्या ऑफीसमधील कामकाजावरही झाला. तो आता ऑफीसमधील कामही मन लावून करत होता. तो घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याचा संसार पुन्हा आनंदाने फुलु लागला.