Bali - 25 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - २५

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

बळी - २५

बळी - २५
"आज रंजना कुठे आहे? दिनेशकडे गेली असेल; तर तिकडेच जाऊया! इन्स्पेक्टर दिवाकर जाधवांना म्हणाले. त्यांना हा गुंता लवकरात लवकर सोडवायचा होता. केदारच्या आयुष्याचा प्रश्न होता! एकदा का रंजना सावध झाली; की नंतर तिला सापळ्यात पकडणं कठीण होतं.
"आज ती त्याच्या घरी गेली नाही! काॅलेजलाच गेली आहे. आणि दिनेशसुद्धा सकाळपासून त्याच्या कामावर गेला आहे! त्यामुळे आज रंजना आणि दिनेश दोघंही एकत्र भेटणार नाहीत! रंजनाचे वडील दौ-यावर गेले आहेत. भाऊ इंजिनिअर आहे. पुण्याला एका मोठ्या कंपनीत कामाला आहे! तो त्याच्या कुटुंबासह तिकडेच रहातो. घरी फक्त तिची आई तुम्हाला भेटेल!. ती तर पोलिसांना बघूनही घाबरून जाते! आम्हाला तिच्याकडून काहीही इन्फर्मेशन मिळाली नाही. साधं काॅलेजचं नाव तिला सांगता येत नाही -- . अगदीच अशिक्षित आणि गावंढळ आहे. तुम्ही बघा प्रयत्न करून -- तिच्याकडून काही माहिती मिळाली तर! "
"नको! सतत घरी चौकशी होतेय हे कळलं; तर रंजना सावध होईल आणि दिनेशलाही सावध करेल! बहुतेक आजचा दिवस फुकट जाणार, असं वाटतंय! त्या दोघांना स्वतःच्या डोळ्यांनी एकत्र पाहिल्याशिवाय केदार विश्वास ठेवणार नाही! ठीक आहे! आजचा दिवस आराम करू! नाहीतरी खूप मोठा प्रवास झालाय!" दिवाकरना आता खरोखर विश्रांतीची गरज वाटत होती.
तेवढ्यातच इन्सपेक्टरच्या समोरचा फोन वाजला.
"साहेब रंजनाला पिक -अप करायला दिनेश कार घेऊन काॅलेजच्या समोर आला होता. आताच दोघंही निघाली आहेत!" रंजनाच्या मागावर ठेवलेला काॅन्स्टेबल दीपक बोलत होता.
"रंजना नेहमी रात्री घरी जाते! आता संध्याकाळचे सहा वाजतायत --- ती दोघंही नक्कीच दिनेशच्या घरी जातील! चला आपण निघूया!" घाईघाईने हॅट उचलत दिवाकर म्हणाले. एका क्षणात ते थकवा विसरले होते.
"केदार आणि निशालाही बरोबर घ्या! केदारला रंजनाचं खरं रूप दाखवायची वेळ आली आहे! बहुतेक हा नाटकाचा शेवटचा अंक असेल!" ते जीपमध्येच बसताना सूचना देत होते.
"आपण इतक्या घाईघाईत कुठे चाललोय? " केदारने त्यांची गडबड बघून विचारलं.
"तुला रंजनाला भेटायचं आहे नं? आपण तिकडेच चाललोय! --- जीप थोडी फास्ट चालव! ती दोघं दिनेशच्या घरी पोचण्यापूर्वी आपण तिथे जाणं गरजेचं आहे!" दिवाकर ड्रायव्हरच्या कानात पुटपुटले!
"होय साहेब! ते घर इथून फार लांब नाही!" ड्रायव्हर म्हणाला.
गावाबाहेरच्या एका ओसाड जमिनीवर दिनेशने लहानसं घर बांधलं होतं. आजूबाजूला वस्ती नव्हती. गेटला कुलूप होतं! बाहेर उतरून सगळे दबा धरून बसले. गाडी ड्रायव्हरला झाडांमागे लपवायला सांगितली!
"आपण इकडे-- या निर्जन जागेवरील या भकास घरात का आलो आहोत? रंजना इथे रहात नाही! त्यांचा वाडा खूप मोठा आहे! आजूबाजूला मोठी वस्ती आहे! --" केदारला काय चाललंय -- काही कळत नव्हतं.
दिवकरांनी बोट दाखवून त्याला न बोलण्याची खूण केली.
"इथून पुढे जे दिसेल; ते तू फक्त बघायचं आहे! एकही शब्द बोलायचा नाही! ते त्याला म्हणाले. निशाला त्यांनी केदारला सांभाळण्याची खूण केली.
********
चमचमणारी कार घेऊन दिनेश काॅलेजसमोर उभा होता. रंजना मुलीच्या घोळक्यात बाहेर पडताना त्याने पाहिली. इतर मुली त्यांच्या घराकडे जाण्यासाठी पांगल्या, आणि रंजना एस. टी स्टॅण्डकडे चालू लागली. गावाकडे जाणारी पुढची बस दोन तासांनी होती. प्रत्येक स्टाॅपवर थांबत थांबत काटेगावला न‌ऊच्या आधी पोहोचणार नव्हती! रंजनाला कडकडून भूक लागली होती , गाडीवरच्या भजी आणि बटाटेवड्यांचा सुगंध तिचे पाय तिकडे खेचत होता; पण ही काही मुंबई नव्हती! गावात एकट्या मुलीने स्टाॅलवर उभं राहून काही खाताना पाहिलं असतं तर सगळ्यांचे डोळे तिच्यावर रोखले गेले असते; रंजनाला लोकांच्या नजरेत यायचं नव्हतं.
"फार दिवस हे काॅलेजचं आणि शिकण्याचं नाटक मी करू शकणार नाही! कंटाळा आलाय आता! फक्त केदारचं प्रकरण थोडं जुनं होऊ दे; मग हा त्रास घ्यायची गरज उरणार नाही-- घरी काहीना काही खोटी कारणं देऊन दिनेशच्या घरी दोन- चार तासांसाठी जाणं कठीण नाही! पण पोलीस चौकशी थांबेपर्यंत हा रोजचा एस. टी. चा त्रास घ्यावाच लागेल. बाबा सोबत गाडी आणि ड्रायव्हर देणार होते; पण मी नको म्हणाले कारण मग प्रेमाच्या भेटी-गाठी -- ज्यासाठी मी एवढी मोठी खेळी खेळले; ---त्या शक्य नव्हत्या! -- त्रास तर होतोय--- पण -- सगळं काही प्रेमासाठी! " ती स्वतःशीच बडबडत होती; तितक्यात तिचं लक्ष कारला रेलून उभ्या असलेल्या दिनेशकडे गेली. त्याला पहाताच ती थबकली,
"तू इथे कसा? आज काम होतं नं तुला? आपलं कालच ठरलं होतं; की आज भेटायचं नाही!" तिने हसत विचारलं.
त्याला बघून रंजना आश्चर्यचकित- आणि तेवढीच आनंदितही झाली होती. तिने तिरक्या नजरेनं विचारलेल्या प्रश्नाने दिनेश घायाळ झाला होता. हसत म्हणाला,
"कामावरच गेलो होतो. पण तुला भेटल्याशिवाय रहावत नव्हतं!" त्याने कारचा दरवाजा उघडून रंजनाला आत बसण्याचा निर्देश केला.
"ह्या तुझ्या प्रेमासाठीच मी मुंबई सोडून या काटेगावात परत आलेय!" गाडीत बसत रंजना म्हणाली.
"गाडी छान आहे! कधी घेतलीस?" ती गाडी बघून खुष झाली होती.
"आजच डिलिव्हरी मिळाली! सेकंड हँड आहे! पण अगदी नवी कोरी वाटतेय नं? ह्या कारच्या मालकाने कार घेऊन जाण्यासाठी फोन केला, आणि तुला सरप्राइझ द्यायचं ठरवलं! विचार केला, की तुला काॅलेजमधून घरी सोडावं! छान लाँग ड्राइव्ह होईल! अगदी वेळेवर आलो की नाही? थोडा वेळ माझ्या घरी थांब आणि नेहमीच्या वेळी तुझ्या घरी जा! नाहीतरी एस.टी.ने रात्र झाल्याशिवाय घरी गेली नसतीस!"
आपल्या मागावर पोलीस आहे, आणि आपली प्रत्येक हालचाल पोलिस- चौकीवर कळवली जातेय; याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती.
घराजवळ आल्यावर गाडीचा स्पीड कमी करत दिनेश रंजनाला म्हणाला,
"ही चावी घे आणि गेट उघड! मी घराच्या मागे गाडी पार्क करून येतो! तोपर्यंत तू घराचा समोरचा दरवजा उघडून आत जाऊन बस! या रस्त्यावरून विशेष कोणी जात नाही; पण क्वचित् कोणी आला, तर नवीन गाडी बघून चौकशी करायला सरळ घरात येईल---- त्यापेक्षा गाडी मागच्या बाजूला ठेवलेली बरी! मला तु माझ्याबरोबर असेपर्यंत कोणाची कटकट नकोय!"
रंजना गाडीतून उतरली, ती गेट उघडून आत गेली. दिनेशने त्याची गाडी घराला वळसा घालून मागे नेली.
********
रंजनाला त्या आडवाटेवर असलेल्या घराजवळ गाडीतून उतरताना पाहून केदार चकित झाला होता; मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे डोळे विस्फारून सगळा प्रकार बघत होता. रंजनाच्या नकळत सगळेच गेटमधून आत आले होते; आणि घराच्या भिंतीआड बंद खिडकीखाली लपले होते.
अचानक् इन्स्पेक्टर जाधवांच्या डोक्यात केदारच्या पांढ-या शर्टकडे बघून एक कल्पना आली. ते केदारच्या कानात पुटपुटले ;
" तिला आता हाक मारू नको! दरवाजाच्या बाजूला दिसणा-या त्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन उभा रहा! रंजनाला आपण सरप्राईज देऊ! तुला अचानक् समोर बघून तिला किती आनंद होईल! --"
त्या गाडीतून दिनेश तिला घेऊन आला आहे; हे अजून केदारला माहीत नव्हतं-- या गोष्टींचा त्यांनी फायदा घेतला होता.
रंजना कुलूप उघडू लागली !----
"रंजना!--" तिच्या कानावर थरथरणा-या आवाजातली हाक आली.
"कोण आहे?" म्हणत तिने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली; घरासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली उभ्या असलेला केदार तिला दिसला; आणि ती नखशिखान्त हादरून गेली. आतापर्यंत सूर्यास्त झाला होता. केदारनं आज पांढरा शर्ट घातला होता, आणि झाडाखालच्या अंधारात काळ्या पँटमुळे त्याचं फक्त घड तिला जमीनीवर तरंगतंय असं वाटत होतं! चेह-यावर पडलेल्या पानांच्या सावल्यांनी चेहरा भेसूर दिसत होता. हे द्दश्य बघून तिचे हात -पाय कापू लागले; -- तिचं अवसान गळून गेलं; आणि तोंडून किंचाळी बाहेर पडली.
केदार तिला सावरण्यासाठी तिच्या जवळ येऊ लागला, आणि ती अधिकच घाबरली. तिने डोळे हातांनी गच्च धरले. त्याच वेळी इ. दिवाकर त्याला परत आडोशाला घेऊन गेले.
दिनेश मागचा दरवाजा उघडत होता; रंजनाची किंचाळी ऐकून तो दरवाजा उघडाच ठेवून धावत आला! रंजना अजूनही डोळे गच्च धरून जमिनीवर बसली होती. तिचा चेहरा विकृत दिसत होता.
" काय झालं? तुझा चेहरा असा का झालाय? " त्याने घाबरून विचारलं. तिचा हात धरून तो तिला घरात घेऊन गेला.
दिनेशला बघून केदार त्याला पकडण्यासाठी दिवाकरांचा हात झटकण्याचा प्रयत्न करत होता! --- चेहरा रागाने लाल झाला होता!
" माझा खुन करण्याचा ज्याने प्रयत्न केला, तो हाच इसम -- दिनेश आहे! तुम्ही त्याला पकडत का नाही? आज तो माझ्याप्रमाणेच रंजनाशी ओळख काढून तिला इथे घेऊन आला आहे! कदाचित् तिलाही त्याने किडनॅप केलं असेल! आज त्याला मी चांगलाच इंगा दाखवतो! सोडा मला!" केदारला आवरणं दोघांनाही कठीण होत होतं.

******* contd. Part 26