Paaus - 2 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | पाऊसः आंबट-गोड! - 2

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

पाऊसः आंबट-गोड! - 2

(२)

भज्यांवर मनसोक्त ताव मारुन सुंठ-मीऱ्याच्या चहाचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या...
"काहीही म्हणा पाऊस पडत असताना भज्यांपाठोपाठ असा चहा म्हणजे एक अलौकिक आनंद..."
"आणि सोबत तात्यांच्या पावसाळी आठवणी म्हणजे आमच्यासाठी कपिलाषष्टीचा योग!" मी म्हणालो. तसे हसत तात्या म्हणाले,
"व्वा! कविराज, व्वा! आलो होतो या विचाराने की, मोसम बनला आहे. आषाढदिन आहे. तुमच्याकडून छान कवितांचा त्यातच पावसाळी कवितांचा आस्वाद घ्यावा. पण तुम्ही तर आम्हालाच बोलते करीत आहात..."
"कसे आहे तात्या, आम्ही कवी तर नेहमीच अगदी समोरच्या माणसांना कंटाळा येईपर्यंत ऐकवत असतो. तुमच्या आठवणी का नेहमी नेहमी ऐकायला मिळणार आहेत? महत्त्वाचे काय तर तुमच्या आठवणी अर्थात तुमच्या परवानगीने शब्दबद्धही करता येतीलच की..."
"क्या बात है। ही तर आजच्या दिनी तुमच्याकडून मिळालेली फार मोठी दाद आहे. आमच्या आठवणी तर सांगता येतीलच पण मला एक सांगा, महाकवी कालिदास दिन आज का साजरा केला जातो? आज कालिदासांचा जन्मदिवस आहे का?"
"तात्या, नाही. आज त्यांचा जन्मदिन नाही कारण त्यांच्या जन्मदिनाचा उल्लेख कुठेही आढळत नाही परंतु त्यांचे 'मेघदूत' हे महाकाव्य अजरामर आहे. या महाकाव्यात त्यांनी 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी रचना केली आहे. त्यामुळे या अलौकिक अशा शब्दरचनेतून जे उत्कट भाव व्यक्त झाले आहेत आणि या महाकाव्यात आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला जे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केल्या जातो..."
"क्या बात है, एका काव्यातील शब्दप्रयोगामुळे त्या शब्दानेच तो दिवस ओळखला जावा ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे ना..."
"अगदी खरे आहे. ही घटना म्हणजे 'न भूतो न भविष्यती' असाच प्रकार म्हणावा लागेल. कारण असे पुन्हा कधी घडले नाही. एखाद्या साहित्यकृतीवरुन त्या लेखकाला ओळख नक्कीच मिळते पण वर्णन केलेल्या दिवसाला त्या कवीच्या नावाने ओळखले जावे ही इतिहासातील अलौकिक घटना असावी."
"मी तर मेघदूत हे महाकाव्य वाचले नाही. मला थोडक्यात सांगाल काय?"
"मेघदूत हे महाकाव्य म्हणजे पत्नीच्या विरहात तळमळत असलेल्या, कासावीस झालेल्या यक्ष नावाच्या एका पतीच्या विरह भावना आहेत..."
"कोण होता हा यक्ष?"
"तात्या, हा यक्ष म्हणजे कुबेराचा एक सेवक! कुबेराने दिलेले आदेश पाळण्यात धन्यता मानणारा हा यक्ष एकदा नवविवाहित पत्नीच्या सहवासात मग्न असताना कुबेराने सांगितलेले एक काम करायचे विसरुन गेला. त्यामुळे कुबेर प्रचंड रागावला. त्याने यक्षाला एका वर्षासाठी हद्दपार होण्याची शिक्षा फर्मावली. त्यानुसार यक्ष रामगिरी पर्वतावर जाऊन राहिला... एकटाच! त्यामुळे त्याला आपल्या पत्नीची आठवण नेहमीच त्रासदायक ठरत होती. भावभावनांचे आवेग त्याला सहन होत नव्हते. तशातच वर्षाऋतू सुरु झाला. एकेदिवशी यक्ष पत्नीच्या वियोगाने अत्यंत व्याकूळ झाला होता. त्याला आपल्या पत्नीची भेट घ्यावी अशी तीव्र इच्छा होत होती. तो अत्यंत विकल, रडवेला झाला होता. काय करु नि काय नको अशी अवस्था झाली असताना अचानक आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली. ढगांचा गडगडाट सुरू असताना त्या ढगांकडे पाहत असताना यक्षाचे एका मोठ्या ढगाने लक्ष वेधले. प्रथमदर्शनी तो ढग त्याला एखाद्या महाकाय हत्तीप्रमाणे भासला. त्या ढगाकडे पाहत असताना अचानक यक्षाला वाटले की, हा ढग आपल्यापासून म्हणजे रामगिरी पर्वतापासून अलकानगरीकडे अर्थात माझ्या प्रिय पत्नीच्या निवासाकडे जात आहे. या मेघासोबतच मी माझ्या भावना पत्नीकडे पाठवतो.  मुसळधार पावसाच्या सरी बरसाव्यात त्याप्रमाणे यक्ष आपल्या भावना व्यक्त करु लागला. त्यात स्वतःची अवस्था व्यक्त करताना तो पत्नीला होणाऱ्या विरहाची मांडणी करतो. पत्नीच्या भावना आपल्यापेक्षा भिन्न नाहीत हे जाणून तो तिचीही अवस्था व्यक्त करतो. मेघ तसा निर्जीव परंतु त्याला संदेशवहनाचे काम कालिदासाची लेखनी सोपवते. कारण विरहाने व्याकूळ झालेल्या मानवाला कोण सजीव, कोण निर्जीव ह्या भावना नसतात त्याच्याठायी विरह एवढा ऊन्मत्त झालेला असतो की, भेदाभेद करण्याची, सारासार विचार करण्याची क्षमता तो हरवून टाकतो..."
"तुमची हरकत नसेल तर एक विचारतो, कालिदासांचे लेखन काहीसे अश्लील आहे असे मी वाचल्याचे मला आठवतेय. खरे आहे का हे?"
"तुम्हाला एक सांगू का, श्लील-अश्लीलता ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामध्ये मानवाची शारीरिक, मानसिक, सामाजिक अवस्था फार परिणामकारक ठरते. असे बघा, एखादी साहित्य कृती वाचताना किंवा एखादी सौंदर्यवती समोर आली किंवा सध्या पाऊस सुरू आहे अशा काळात एखादी पूर्ण भिजलेली स्त्री समोर आली तर एखादा बालक तिच्याकडे नक्की बघेल पण त्या भावना बालकसुलभ असतील. तोच सोळा ते तीस वर्षाच्या युवकाच्या भावना उचंबळून येतील, पन्नाशी ओलांडलेला अर्थात तुमच्या माझ्या वयाचा माणूस त्या सौंदर्याचे आकंठपान नक्की करेल पण भावनांना ओलावा, व्याकुळता येणार नाही. मनाची अवस्था जरुर वेगळी होईल. शिवाय मानवाचे चारित्र्यही याबाबींकडे पाहण्यासाठी परिणामकारक ठरु शकते. या सर्व परिस्थितीमुळे कुणाला कोणते साहित्य अश्लील, कामूक वाटत असेल परंतु निव्वळ सौंदर्याचा पूजक, साहित्याचा आस्वादक म्हणून पाहिले तर खरा आनंद मिळेल. म्हणजे ज्याला कामुकतेचा आनंद घ्यायचा आहे त्याला तो निश्चित मिळेल. ज्याचा त्याचा मापदंड निराळा असू शकतो..."
"व्वा! असे वाटते की, तो कालिदास प्रत्यक्ष माझ्यासमोर बसलेला आहे. पत्नी वियोगाने विकल प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र झाडे वेली, पशूपक्षी दिसेल त्याला सीतेबद्दल विचारतात तशी काहीशी अवस्था कालिदासाकृत यक्षाची झाली असल्याचे वाटते."
"अगदी बरोबर आहे. खरेतर ही चर्चा अशी लवकर संपणारी नाही परंतु त्यात जी कल्पना केलेली आहे ती अद्वितीय अशीच आहे..."
"आणि सोबतच पत्नीच्या विरहाचे दुःख सहन करणाऱ्या प्रत्येक माणसाचे आहे, प्रत्येक स्त्रीचे आहे..."
"मेघदूत या महाकाव्याचे हेच खरेखुरे आणि या काव्याला अजरामर बनविणारे यश आहे..." आम्ही चर्चा करीत असताना टीव्हीचा आवाज बंद केला होता परंतु गाणी सुरु होतीच. आषाढ महिन्याचा शुभारंभ पावसाने झाल्यामुळे गाणीही पावसाळी लागत होती. एका गीताने आमचे लक्ष वेधले...
     चिंब भिजलेले, रुप सजलेले
     बरसूनी आले रंग प्रितीचे...
"तुम्हाला सांगतो ही अशी गाणी ऐकायची खरी मजा पावसाळ्यात येते..." बोलताना तात्या कुठेतरी हरवल्याचे मला जाणवले. मी काही क्षण थांबून विचारले,
"तात्या, काय झाले? कुठे हरवलात? काही आठवणी जाग्या झाल्या का?"
"होय. 'आला आला वारा, संगे आठवणींच्या धारा, भूतकाळ उभा करिती सारा..."
"तात्या, तुम्हीपण कविता करता की..."
"कशाच्या कविता नि काय? ही कविता असेलच तर त्याला हा पाऊस आणि तुमचा सहवास कारणीभूत आहात. पावसाशी काही खास आठवणी जोडलेल्या आहेत. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाची गोष्ट. त्यावेळी मुलींच्या शिक्षणाची एवढी प्रगती नव्हती. आमच्या वर्गात दोन आणि एकूण कॉलेजमध्ये दहा-अकरा मुली होत्या. आमचे कॉलेज त्याकाळात गावाबाहेर होते. एका शेतातून तेही दोन-अडीच किलोमीटर जावे लागे. पावसाळ्यात जास्तच मजा येत असे..."
"भिजण्याची?..."
"भिजण्याची मजा तर आता यावयातही असते कविवर्य! पण कॉलेजमध्ये असताना पाऊस सुरु झाला. थोडावेळ वाट पाहून तो थांबण्याची शक्यता नसली की आणि त्यातही एका खास कारणांमुळे आम्ही भिजतच निघत असू?"
"खास कारण ते कोणते?"
"आत्ता सांगितले तसे आमच्या कॉलेजमध्ये दहा एक मुली होत्या. पाऊस सुरू झाल्या की ह्या मुलीही पाऊस थांबण्याची शक्यता कमी वाटली की निघत असत. कधीकधी असेही होत असे की, पाऊस थांबला म्हणून निघावे तर पुन्हा अर्ध्या रस्त्यात पाऊस गाठायचा. कसेही असेना आम्ही निघालो की, पाठोपाठ त्या मुलीही निघायच्या. काही क्षणातच त्यांची मंजूळ आवजातील किणकिण कानावर पडली की आम्ही ठरल्याप्रमाणे एखादे झाड पाहून थांबत असू..."
"पाऊस थांबण्याची वाट पाहत?"
"नाही. दुसरेच कारण होते..." असे म्हणत तात्यांनी आत डोकावले आणि आमची बायको जवळपास नाही हे लक्षात घेऊन ते हलक्या आवाजात पुटपुटले,
"पाठीमागून येणाऱ्या मुलींचे चिंब भिजलेले रुपडे न्याहळता यावे म्हणून. काही वेळात मुली समोरुन निघून जायच्या. त्यांचे ते रुप डोळ्यात साठवत आम्ही त्यांच्या पाठोपाठ निघत असू. असा पाऊस सुरु झाला आणि ही पावसाळी गाणी लागली की, मन कसे तितरबितर होते बघा..."
"याचा अर्थ असा तर नाही ना कि त्या चिंब भिजलेल्या एखाद्या मुलीवर तुमचे प्रेम..."
"प्रेम म्हणता येणार नाही कारण प्रेमाला दोन बाजू असतात. समोरून प्रतिसाद मिळाला तर..."
"समजलो मी. तुमचे हे अव्यक्त प्रेम वहिनीला समजले काय?"
"हो ना. सांगितले पण लग्न झाल्यावर..."
"म्हणजे त्या मुलींमध्ये एक मुलगी..."
"नंतर माझ्या आयुष्यात सहचारिणी म्हणून आली..."
"काय तात्या हे! मान गए! बढिया! किती छान विषय आहे ना..."
"लिहा मग एखादे काव्य! अनायासे आज कालिदास आहे. भाऊजींनी छान विषय दिले आहेत तर होऊन जाऊ देत एखादी अजरामर कृती..." आतून पुन्हा चहा घेऊन आलेली बायको म्हणाली. तसे तात्यांनी चपापत विचारले,
"म्हणजे वहिनी, तुम्ही सारे ऐकलेत?"
"होय. म्हणजे मुद्दाम आणि सारे नाही ऐकले. पावसाच्या आवाजात जेवढे सहज ऐकता येईल ते ऐकले. चालू द्या तुमच्या गप्पा..."असे म्हणत ती आत निघून गेली आणि आम्ही चहाचे घोट घेत टीव्हीवर लागलेल्या पावसाळी गाण्यांचाही आस्वाद घेऊ लागलो…

००००