Gairsamaj in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | गैरसमज

Featured Books
Categories
Share

गैरसमज

गैरसमज

उमेश दिसताच किशोरला आनंद झाला. कारण किशोरने त्याला बऱ्याच वेळा फोन केला होता. पण उमेशने फोन उचलला नव्हता. कारण किशोरला त्याला फोन न उचलण्याचे कारण विचारायचे होते.पण किशोरला पाहून उमेशने पाहून न पाहिल्यासारखे केले. व तो पुढे निघून गेला. किशोर काळजीत पडला. उमेश असा का वागत असेल? याचा तो मनाशीच विचार करु लागला. पण त्याचे कारण त्याला कळले नाही.

रात्री याच विचाराने त्याला झोप लागली नाही. कारण उमेश हा त्याचा जीवलग मित्र होता.एकमेकांच्या सुख,दु:खात ते कधीही धावून येत असत. अगदी बालवाडीपासूनची त्यांची मैत्री आजपर्यंत निसंकोच ‍टिकून होती. सगळा गाव त्यांच्या मैत्रीची स्तुती करत होता. आपल्याकडून काही चूक तर झाली नाही ना? या गोष्टीचा त्याने शंभरवेळा बारकाईने विचार केला. गेल्या काही दिवसातील घडलेले प्रसंग, घटना त्याने स्मरण करुन पाहिल्या. आपल्या नकळतपणे उमेशचे मन दुखले असेल आणि त्यामुळेच तो आपल्याला बोलत नसेल याचा त्याच्या मनात विचार आला. पण नेमकी कोणती चूक आपल्याकडून झाली असेल हे खूप वेळ विचार करूनही त्याच्या लक्षात येईना त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला.

दुसऱ्या दिवशीही त्याने उमेशला फोन केला पण उमेशने त्याचा फोन उचलला नाही. त्याने उमेशला माझ्याकडून काही चुकले असेल तर मला स्पष्ट सांग पण असे मनात ठेवू नकोस असा मेसेज पण केला. परंतु उमेशने त्याला प्रतिसाद दिला नाही. उलट त्याने किशोरचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला व त्याला व्हॉटस्अपला पण ब्लॉक केले.‍ किशोरला वाटत होते की, आपल्या इतर मित्रांनी उमेशची समजूत काढावी व त्याच्या मनात आपल्या विषयी असलेला गैरसमज दूर करून आपली मैत्री पुर्ववत करावी. पण इतर काही मित्रांना उलट त्या दोघांच्या भांडणाचा फायदा होत होता. त्यामुळे ते भांडण मिटवण्याऐवजी भांडण कसे वाढेल हे पाहत होते.प्रसंगी उमेशचे कान भरत होते.‍ किशोर पहिल्यापासून तुझ्या विषयी वाईट होता. तो स्वार्थासाठी तुझा उपयोग करत होता. पण तुला त्याची मैत्रीच आवडत होती. आता बघ कसा उलटला तो. असे किशोरविषयी नकारात्मक विचार उमेशच्या कानावर पडल्यामुळे त्याला किशोरचा आणखीनच तिरस्कार वाटु लागला. किशोर मित्रांमध्ये आल्यानंतर उमेश उठून जाऊ लागला. त्याचा विषय जरी काढला तरी तो मित्रांवर चिडु लागला.त्यामुळे प्रेमळ मनाचा किशोर अस्वस्थ होऊ लागला. उमेशच्या अशा तिरस्कारयुक्त वागण्याचे कारण खूप शोधूनही त्याला सापडत नव्हते. आपला जवळचा मित्र आपल्याला पारखा झाला याचे त्याला दु:ख होत होते.

आज जवळपास महिना होत आला होता. तरीही उमेशच्या वागण्यात तसुभरही बदल झाला नव्हता. किशोरचे चार महिन्यांपुर्वी जमलेले लग्न दोन दिवसांवर आले होते. त्याला आशा होती उमेश आपल्या लग्नाला तरी येईल.

किशोर उमेशच्या घरी गेला. त्यावेळी उमेश जेवण करत होता. उमेशच्या आईनेच किशोरला आत बोलावले. उमेश त्याला बस किंवा जेवण कर सुद्धा म्हणाला नाही.

‍"उमेश! उद्या माझे लग्न आहे आणि तु जर आला नाहीस तर मी लग्न सुद्धा करणार नाही." किशोर त्याला निश्चयपुर्वक म्हणाला.

उमेश त्याला काहीच बोलला नाही. किशोर उमेशच्या कुटुंबियांना लग्नाला येण्याचं निमंत्रण देवून बाहेर आला.'उमेश जर लग्नाला आला नाही तर मी लग्न करणार नाही' हे किशोरचे वाक्य सर्व मित्रमंडळ व गावामध्ये पसरले. किशारच्या घरचे व त्याचे काही जीवलग मित्र काळजीत पडले. कारण त्यांना किशोरचा निश्चयी स्वभाव माहित होता.लग्नाची वेळ टळून चालली तरी उमेश लग्नाला आला नाही.ज्याच्यावर आपण एवढे प्रेम केले. मित्रता निभावली त्यालाच जर आपली काळजी नसेल तर मग त्याच्यामुळे आपल्या जीवनातील मंगलमयी प्रसंगी दु:खी का राहावे? असा विचार मनात येवून किशोर लग्नाला तयार झाला.

शेवटी आता काहीही झाले तरी उमेशला बोलायचेच नाही असा किशोरने मनाशी निश्चय केला. दिवसांमागून दिवस गेले, आता किशोरच्या लग्नाला एक महिना झाला होता. तरी देखील ते दोघे मित्र अद्याप एकमेकांना बोलले नव्हते.

किशोरनेही आता उमेशचा विचार करणे सोडून दिले होते. आपण उमेशला एवढा जवळाचा मित्र समजत होतो पण आता तो त्या लायकीचा राहिला नाही. त्याच्या सुख दु:खात आपण त्याला नेहमी साथ दिली तोही आपल्या मदतीला कधीही न बोलवता यायचा. मग अशातच काय झाले? त्याने किमान आपल्या बद्दल त्याच्या मनात काय आहे हे तरी स्पष्ट सांगायला हवे होते. मग आपल्यालाही कळले असते नेमकी आपली चूक कोठे झाली? पण आता उपयोग नाही.आपण त्याला कितीदा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो नेहमी आपल्याला दुर्लक्षीत करतो. त्यापेक्षा त्याला नाही बोललेलेच बरे असा त्याच्या मनात ‍विचार आला आणि खरंच तो त्या दिवसापासून उमेशचा किंचितही विचार न करता,आपल्या नव्या जीवनसाथीसह संसारात रममाण झाला.

काही दिवस असेच गेले आणि एके दिवशी सकाळी अचानक उमेश किशारच्या घरी आला. त्याच्या डोळयात पाणी तरळले होते. बहुतेक त्याला किशोरला न बोलण्याबद्दल, त्याला त्रास दिल्या बद्दल पश्चाताप झाला होता. किशोरला क्षणभर वाटले. उमेशला बोलु नये. पण त्याने विचार केला मग आपल्यात व त्याच्यात काय फरक राहिला.

किशोरने त्याला आत बोलावले.उमेश घरातील सोप्यावर येवून बसला.त्याला अपराध्यासारखे वाटत होते. किशोर सारख्या चांगल्या मित्रावर त्याने कधीही न केलेल्या कृत्याबद्दल गैरसमज करून घेवून आपल्या जीवलग मित्राला बोलणे सोडले होते.

उमेश किशोरकडे पाहत बोलला,

"मित्रा,मी तुझा फार मोठा अपराधी आहे. तु न केलेल्या कृत्याबद्दल मी तुला दोषी धरले व तुझे काही ऐकून न घेता तुझ्यासोबत असलेली बालपणापासूनची मैत्री तोडली."

"मी तुला तेच विचारत होतो, नेमकं मला तु का बोलत नव्हतास? तर तु माझ्याकडे दुर्लक्ष करून मला बोललाच नाहीस. मग मला तरी नेमके कारण कसे कळेल?" किशोरही हळव्या स्वरात बोलला.

"मागे माझे लग्न मोडले होते."

"हो."

"त्यावेळी माझ्या भावकीतील काही लोकांनी मला सांगीतले की, माझे लग्न तुच मोडले आहेस."

"तुही मला काही न सांगताच त्यांच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलास." किशोर काहीशा रागातच बोलला.

"हो ना.तीच माझी मोठी चूक झाली. मी तुला काही न विचारताच तुझ्याबद्दल गैरसमज करून बसलो, व तु न केलेल्या कृत्याबद्दल तुला दोष देवून बसलो.खरं तर मला नंतर त्या पाहुण्यांकडूनच कळाले, मी व्यसनी आहे. मला इतर वाईट शौक आहेत, असे खोटे सांगून माझ्या भावकीतील लोकांनीच माझे लग्न मोडले व त्याचा आळ तुझ्यावर घातला."

"आता यापुढे कधीही लक्षात ठेव. दुसऱ्याचे ऐकून आपल्या जीवलग मित्रावर आळ ठेवून, त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून कधीही मित्रता तोडू नकोस."‍किशोर समाजावणीच्या स्वरात म्हणाला.

त्या दोघांचे बोलणे चालू होते. तितक्यात किशोरची बायको पोहे घेवून आली.‍तिने दोघांच्या हातात पोहयाच्या प्लेट दिल्या.

तेवढयात उमेश म्हणाला," मला नको वहिणी.मी आताच नाश्ता करून आलो आहे."

"घ्या भाऊजी.तुम्हाला आवडतात ना पोहे. त्यामुळे मुद्दामच केले आहेत."

"तुम्हाला कसे माहित मला पोहे आवडतात ते?"

"घरात सतत तुमच्या विषयीच बोलत असतात.माझा मित्र उमेश खूप चांगला आहे.पण तो आता जरा रुसला आहे. त्याचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे. पण बोलेल काही दिवसात. दिवसातून एकदा तरी तुमची आठवण काढतात. तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंत तुमच्या मैत्रीबद्दल सर्व सांगीतले त्यांनी मला."

तिचे बोलणे ऐकून आता मात्र उमेशला अश्रू अनावर झाले. कारण एका सच्चा मित्रावर आपण गैरसमजातून आरोप लावून त्याला इतक्या दिवस बोललो नाहीत. यामुळे पश्चाताप होवून तो किशोरची माफी मागु लागला.यापुढे कधीच गैरसमज करून मैत्री तोडणार नाही.अशी शपथ घेवून उमेश व किशोर हसत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून घराबाहेर पडले.त्यांना सोबत पाहून इतर त्यांच्या हितचिंतक मित्रांनाही आनंद झाला व ते ही त्यांच्यात सामील झाले.

तात्पर्य:- नाते कोणतेही असुद्या. फक्त एखादा छोटास गैरसमज ते अमूल्य नाते तोडण्यास कारणीभुत असते. मैत्री तोडल्यामुळे आपल्याला व आपल्या मित्रालाही मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टी विषयी खात्री होत नाही. तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवून गैरसमजातून आपली अनमोल मैत्री तोडु नका.