घरी आलो.  तेंव्हा सर्व बायका तोंडाला पदर लावून माझ्याकडे पाहत होत्या.  काही आप्तस्वकीय बायांचा आतून रडण्याचा आवाज येत होता.  बाहेर माणसांची गर्दी जमलेली होती.  कुणी एक तिरडी बांधण्यात व्यस्त होते,  तर काही लाकडांची जमवाजमव करीत होते. 
                  मी आईला दिसताच तिने हंबरडा फोडला.  आणि ती  रडायला लागली . मी ही आता डोळ्यांतून अश्रू गाळू लागलो. बाबांचं पार्थिव शरीर जमिनीवर पडून एक निद्रा घेत होते. मी आज बाप या शब्दाला कायमचा मुकलो होतो.  अमर म्हणून आवाज देणारे माझे बाबा,  सावित्री म्हणून बोलणारा नवरा,  आज कायमचा शांत झाला होता. आईची स्थिती माझ्यापेक्षा ही बेकार झाली होती. चेहरा रडून-रडून पडल्यासारखा झाला होता.  झोप नसल्याने आणि सारखं रडत असल्याने डोळे लालसर झाले होते पण आईचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं.. आणि का म्हणून थांबणार  ???? नियतीने असा घाणेरडा खेळ का करावा??? पहिल्या वेळेस पोटची पोरगी चित्रा गेली आणि आता स्वतःचा नवरा सोडून गेला होता . तो या परिस्थितीने कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्याने स्वतःला संपवलं होतं . मी मात्र बाबाकडे सारखा बघत होतो.  माझे बाबा खरंच भित्रे होते का??? त्यांनी स्वतःहून आपली जीवनयात्रा संपविली !!! पण मला त्यांच्या चेहऱ्यावर कधीचं आणि आजही भित्रेपणा चे भाव दिसत नव्हते . त्यांचा चेहरा आत्ताही स्मितहास्य करीत होता . मनात नाना तऱ्हेचे प्रश्न उठत होते विचारांचं वादळ मनात निर्माण झालं होतं.
                     सौभाग्यकांक्षिणी असणारी आज माझी माय  नवरा मेल्याने आजपासून विधवेचे आयुष्य जगेल, या विचारानेच मनात थरकाप उठला होता.  सर्व प्रश्न चक्र माझ्या मनात तांडव करत होते.  आई मात्र रडून-रडून थकली होती.  तरी तिचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं.  कुणीतरी बाहेरून आवाज दिला ,
"अमर आता आपल्याला घेऊन निघायला हवं!!" तसंच पुन्हा  आईने जोराने रडायला सुरुवात केली.  कारण आता बाबा चे  पार्थिव शरीर डोळ्यांसमोर दिसणार  नाही. सरणावर जाणार आणि कायमची  राख  होऊन डोळ्यांसमोरून  नष्ट होऊन मातीत मिसळेल.
                   आईला  मी शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. बाबांच्या पार्थिव शरीराला तिरडीवर टाकून सजविण्यात आले.  मुलाला खांदा देण्याचं काम असतं म्हणून मी खांदा दिला . सोबत आनंदने ही दिला . तसा तो  जिवलग मित्र होता पण आज मला त्याच्या रूपात माझ्या भावाची जागा त्याने भरून काढली होती . बाबांचे पार्थिव शरीर खांद्यावर घेऊन आम्हीं स्मशान भूमीत आलो. गावातील लोकांनी अगोदरचं लाकडे रचून ठेवली होती. त्यांवर बाबांचा देह ठेवण्यात आला. आता मी मात्र लहान मुलासारखा रडत होतो.  कारण यानंतर जन्मदाता बाप नजरेसमोर दिसणार नाही. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शेवटी बाबांच्या पार्थिव शरीराला अग्नी द्यायची आहे,  असं मला सांगण्यात आलं. हिंमत तर होत  नव्हती पण कर्तव्य म्हणून,   शांत झोपलेल्या माझ्या बाबांच्या , कष्ट करून झिजलेल्या शरीराला अग्नी दिला. त्यांच्या  सरणाकडे  पाहून मनात ओळीं आठवल्या...
  " सरणावर पाहून देह तुमचा बाबा,
     कसा ठेवु हो मनावर मी ताबा,
    सोडून गेले एकटेच आम्हां,
    कसं जगू  तुमच्याशिवाय मी अन् आई 
    एकदा तरी बाबा तुम्ही  सांगा,
    एकदा तरी बाबा तुम्ही सांगा...."
                      आता मात्र आईच्या जीवनात विरहाने जागा घेतली.  माझ्या  वाट्याला फक्त आता आईचं प्रेम उरलं होतं.  परिस्थिती अजूनही भयावह वाटत होती. आईची तर परिस्थिती अजूनच खराब होती.कुणाशी बोलत नव्हती , ना जेवण करत होती. घरचा कर्ता पुरुष मग तो मारझोड करणारा असला तरी,  स्त्री ची किंमत जीवनात तो असेपर्यंत सदा असते . पण तो  व्यक्ती गेल्यानंतर तिच्या वाट्याला फक्त दुःख आणि वेदना येत  असतात . तो गेल्यानंतर त्याने आपल्या मुलाबाळांसाठी काही जमीन - जुमला, पैसा ठेवला , तर ती  आई काही प्रमाणात दुःख विसरून , आपल्या मुलांत खूश राहण्याचा प्रयत्न करते.  पण जिच्या नशिबी फक्त दुःख आले होते त्यांनी कसं जगायचं.  पहिले पोटचा गोळा चित्रा आणि नंतर नवरा गमावताना पहावं लागलं होतं.  नियतीचा खेळ सुद्धा तिच्याशीचं वैर घेण्यात व्यस्त होत. 
                  पुढचे एक-दोन महिने मी मिळेल ते काम करू लागलो.  आईला जगवू लागलो.  हे दोन महिने खूप अडचणी होते.  हाताला पाहिजे त्या प्रमाणात काम मिळत नव्हतं.  मिळालं तरी खूप दूर असायचं. आणि कामाला नाही गेलं की जेवणाची वणवण असायची.म्हणून मग कुठंही काम असलं तरी ते करायचं.  तेव्हां कुठे  पैसा येऊन दोन वेळच्या अन्नाची सोय होत होती. तेव्हा मात्र बाप खरचं किती गरजेचा असतो याची  प्रकर्षाने आठवण येऊ लागली . आई आता आपले दुःख विसरून , मिळेल ते काम करत होती . पण पहिल्यासारखे ती कुणाशी जास्त बोलत नव्हती. आपल्याचं विश्वात जगत असायची. मी  आईला सोडून कुठे जाऊ शकत नव्हतो . 
                  कॉलेजला खूप दिवस झाले ,गेलो नाही. आईला सोबत न्यायचं तर  राहण्याची सोय नव्हती.  तेंव्हा आईच म्हणाली , " अमर किती दिवस झाले तुझा अभ्यास बुडवून???  जा आपलं शिक्षण पूर्ण कर. मी जगेल आता  तुझ्यासाठी!!  तुझ्याशिवाय तर आता माझं कुणी नाही """ असं म्हणत आईने डोळे पाणावले होते .
"  मी काम करून तुला पैसे पाठवून जाईल"  असं तिला सांगितलं असतं तर,  तिने ते मान्य केलंच नसतं.  पण मी मात्र मनात विचार केला की,  आता कॉलेज सोबतचं काही वेळ काम करायचं आणि आईला पैसे पाठवत जायचे . आईने विचारलं तरी सांगायचे,  कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली किंवा ऑफिसमध्ये मी जात असतो.  शेवटी आईचा निरोप घरून मी  कॉलेजला नियमित जाऊ लागलो. 
             महाविद्यालयात इतर सर्वांनी माझी विचारपूस केली . कसं झालं ??? काय झालं??  त्याविषयी विचारणा केली.  सरांनी हिंमतीने घे असे शब्द दिले.  जे झालं ते विसरून जा. भरकटलेली अभ्यासाची गाडी आनंदने  सावरण्यास मदत केली . तसं  आनंदला सर्व  प्रकारची माहिती असल्याने , जास्त कुणी मला विचारपूस केली नाही.  सर्व आनंदच सांगत असायचा. आता अभ्यासाकडे लक्ष घालू लागलो . अनेक ठिकाणी  कामाचा शोध घेऊ लागलो. कुठे काम मिळते का याची चौकशी करू लागलो.  आतापर्यंत आईला आधार देण्यासाठी बाबा होते.  जरी त्यांना दोन वेळ खायला चांगलं मिळत नव्हते  तरी बाबा म्हणजे आईची हिंमत होती . दोघही कष्ट करत होते . पण आज त्यातील रथाचं एक चाक , संसाराच्या गाड्यातील एक चाक कायमचं तुटून पडल्याने आईचा आधार होण्यासाठी मला काम करावंच लागेल.. 
क्रमशः .....