अपेक्षाभंग
नितीन व अमित यांची मैत्री कृष्णा अर्जुनासारखीच होती. दोघेही बालपणापासूनचे मित्र होते. एकमेकांच्या सु:ख-दु:खात दोघेही सहभागी होत असत. मित्राचे आई-वडील म्हणजे आपलेच आई-वडील. मित्राची बहीण म्हणजे आपलीच बहीण असे मानून ते एकमेकांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमामध्ये आपुलकीने सामील होत असत.
आज अमितला मुलगी पाहण्यासाठी जायचे होते. त्याने नितीनला कालच गाडी घेवून सकाळी बरोबर नऊ वाजता घरी येण्यास सांगीतले होते. आता अकरा वाजत आले तरी नितीन आला नव्हता. अमितच्या घरची मंडळी आवरून बसली होती. पाहुण्यांचाही निघाले का? म्हणून सतत फोन येत होता. अमित नितिनला सारखा फोन करत होता.पण नितीन फोन उचलत नव्हता. अमितचे वडील त्याला सतत गाडी कधी येणार आहे म्हणून विचारत होते. तो वैतागून नितीनला पुन्हा-पुन्हा फोन करत होता.पण नितीन फोन उचलत नव्हता. नितीनच्या घरी जावे तर सद्या नितीनने अमितच्या घरापासून दूर असलेल्या नविन कॉलनीमध्ये प्लॉट घेतला होता.त्यामुळे आता तिकडे जाण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता.शेवटी अमितने चिडून दुसरी गाडी बोलावली. व तो कुटुंबियांसोबत मुलीच्या गावाकडे निघाला.
अमित गाडीमध्ये पुढे बसला होता. तो सतत नितीनचाच विचार करत होता. नितीनसाठी आपण काय केले नाही? त्याला मुलगी पाहायला जाताना आपण त्याच्या आधी आवरून त्याच्या घरी जावून बसलो होतो. कोणता ड्रेस घालायचा यापासून आपण त्याला तयार केले होते. आपण त्याला रात्री लवकर ये म्हणून सांगीतले होते.तो लवकर तर आलाच नाही, पण आपण इतके फोन करूनही त्याने साधा फोनही घेतला नाही. अमित जेवढा जास्त या गोष्टीचा विचार करत होता, तेवढाच नितीनबाबत संताप त्याच्या मनात वाढत होता. आपण नितीनच्या लग्नात, त्याच्या बहीणीच्याही लग्नात पुढे होवून कामे केली, त्याच्या प्रत्येक सुख-दु:खात सामील झालो. इतकेच काय त्याच्या शेतातीलही कामे केली. तरी त्याला त्याची काहीच कदर नाही. आज त्याच्याजवळ गाडी आहे म्हणून तो फुगीरीत आहे. आज ना उद्या आपल्या जवळही गाडी येईल. मग त्याला दाखवून देऊ.असे विषारी विचार त्याच्या मनात उमटू लागले. इतकी मैत्री असताना त्याने आपला फोन उचलू नये, आपल्याला असा एैनवेळी धोका द्यावा. याबाबत त्याच्या मनात राग उत्पन्न होवू लागला. संतापाने तो बेभान झाला होता. गाडी जितक्या वेगाने धावत होती त्याच्या दुप्पट वेगाने त्याच्या मनातील संतापाचे घोडे दौडत होते. तो आणखीही नितीनला फोन लावत होता.पण नितीन फोन उचलत नव्हता. फक्त एकदा नितीनने फोन उचलावा मग त्याला फाडफाड बोलून तुझी मला गरज नाही म्हणून त्याच्याशी मैत्री तोडून टाकायची, मला आयुष्यात कधील बोलू नकोस म्हणून त्याला सांगायचे असे अमितने मनात ठरवले. मुलीचे गाव आले. तो पर्यंत संतापात अमितने नितीनला पंचेचाळीस वेळा फोन केला होता. पण नितीनने एकदाही फोन उचलला नव्हता. त्यामुळे तर अमित आणखीनच चिडला होता.
गाडी मुलीच्या दारात येवून थांबली. पाहुणे दारात वाटच पाहत उभे होते. अमित व त्याच्या घरचे गाडीतून खाली उतरले. पाहुण्यांनी हातपाय धुण्यासाठी पाणी दिले. सर्वजण फे्रश झाले. अमित एका खुर्चीवर बसला. मुलीचा भाऊ, वडील व काका अमितला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळून पाहत होत. अमित दिसायला देखणा होता. मजबुत, पिळदार शरीर, उंच देह, टोकदार नाक, थोडासा सावळा रंग पण रेखीव चेहरा यामुळे अमित उठून दिसत होता. दूरवरून आल्यामुळे व दुपारच्या जेवणाची वेळ झाल्यामुळे आधी जेवणाचा कार्यक्रम उरकून घेण्याचे ठरले. सगळयांचे जेवण झाले.
मुलीला आणू का? म्हणून मुलीच्या वडीलांनी अमितच्या वडीलांना विचारले. त्यांनी होकार दिला. अमित व त्याचे कुटुंब मुलीच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून पाहू लागले. तेवढयात नक्षत्रासारखी सुंदर,तजेलदार मुलगी गुलाबी साडीत नटून-थटून आली. तिच्या काकांनी तिला समोर खुर्चीवर बसायला सांगीतले. ती खाली मान घालून शांत बसली. अमितच्या वडीलांनी व आईने मुलीला प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांचे उत्तर तिने समाधानकारक दिले. उत्तर देताना तिचे लाघवी बोलणे व मंजूळ आवाज अमितला खूप आवडला. तिचे ते दैवी सौंदर्य पाहून त्याच्या मनात काही वेळापुर्वी आलेला संताप कुठल्या मावळला. अमितला मुलगी पसंद पडली.शेवटी निरोप घेण्याची वेळ आली.गाडी निघाली. पाहुणे निरोप द्यायला दारापर्यंत आले. ती मुलगी पण आईच्या पाठीमागे लपून अमितला न्याहळत होती. शेवटी निरोप घेवून गाडी गावाकडे परत निघाली.
अमितने परत नितीनला फोन केला. यावेळी पण नितीनने फोन उचलला नाही. शेवटी अमितने चिडून नितीनच्या व्हॉटस्अपला मेसेज केला. 'तुझ्यासाठी मी इतकं केलं. पण तु ऐनवेळी मला धोका दिलास. तुला यायचे नव्हते तर मला आधीच सांगायचे ना. तुझ्यामुळे मला जायला उशीर झाला. आता मला कधीच बोलू नकोस.'
अमित घरी आला. तेवढयात त्याच्या मोबाईलवर नितीनच्या ताईच्या मोबाईलवरून फोन आला. अमित फोन उचलून बोलला."बोल ना ताई." पण समोरून नितीनचा आवाज आला. "हॅलो!"
नितीनचा आवाज ऐकताच अमितने रागाने फोन कट केला. नितीनने तीन-चार वेळा फोन केला. पण अमित आणखीही रागातच होता. त्याने परत फोन कट केला. शेवटी पाचव्यांदा अमितने फोन उचचला. आणि मोठया आवाजात तो बोलला, "हा, बोल."
" मुलगी पाहून आलास का?" नितीनने शांत आवाजात विचारले.
"हो आलो. तुला काय कराचचे?" अमितने रागातच बोलला.
नितीन शांतच होता. पण अमितचा संताप आता उफाळून बाहेर आला. मगापासूनची मनातील खदखद त्याला बाहेर काढायची होती.जमिनीतून लाव्हा उफाळून बाहेर येतो. त्याप्रमाणेच त्याच्या तोंडातून शब्दांचे निखारे बाहेर पडु लागले.
"तुझ्या एकटयाकडेच गाडी आहे का? तुला काय वाटलं? तु नसलास तर मला दुसरी गाडी मिळणार नाही का? आता मला तुझी गरज नाही. आजपासून तु मला बोलू नकोस." असे म्हणून अमितने रागातच फोन कट केला.
नितीनने परत अमितला फोन केला.
अमित परत रागातच बोलला, "तुला सांगीतलेलं कळत नाही का?मला बोलू नको म्हणून."
नितीन तेवढयाच शांततेत बोलला," अरे! भाऊजींचा अपघात झाला होता. म्हणून मला गडबडीने इकडे साताऱ्याला यावे लागले."
नितीनचे शब्द ऐकून आपण किती मोठी चूक केली.हे अमितच्या लक्षात आले.
"आरे बाप रे! कधी? अमितच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"सकाळीच नऊ वाजता. ताईचा फोन आला होता. ती खूप घाबरलेली होती.मग आम्हाला तात्काळ निघावे लागले. त्याच गडबडीत माझा मोबाईल घरीच राहिला."
"मग मला का सांगीतले नाहीस.मी आलो असतो ना तुझ्यासोबत.भाऊजींची तबीयत कशी आहे आता?"
"भाऊजी बरे आहेत. डोक्याला मार लागल्यामुळे कोमामध्ये गेले आहेत. एक आठवडयात शुद्धीवर येतील असे डॉक्टरांनी सांगीतले आहे. मी तुला पप्पांच्या मोबाईलवरून फोन करून सांगणार होतो.पण तुला सांगीतले असते तर तु लगेच निघाला असता, तुला मुलगी पाहण्यासाठी जायचे होते. तुझ्या व घरच्यांच्या आनंदावर विरझण पडायला नको म्हणून सांगीतले नाही."
नितीनच्या बोलण्याने अमितच्या डोळयात पाणी तरळले, त्याच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले." यार नित्या! तु ग्रेट आहेस.मला माफ कर.तुझ्याबद्दल किती गैरसमज करून बसलो होतो मी."
"मैत्रीमध्ये सॉरी नसतं.आल्यावर भेटतो तुला. ताई खूप रडत होती.आताच तिची समजूत घातली. आता तिला जेवण करायला लावतो. नंतर तुला फोन करतो."
फोन कट झाला. आणि त्याबरोबरच अमितच्या मनातील संतापही कट झाला. आपण आपला जवळचा मित्र म्हणून त्याच्याकडून स्वत:ची गाडी घेवून आपल्या सोबत येण्याची अपेक्षा ठेवली. त्याने आपली अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून आपण त्याच्यावर किती चिडलो. त्याची कुठलीही माहिती न घेता. तो का येऊ शकला नाही? याचे कारण न जाणताच आपण अपेक्षाभंग झाल्यामुळे त्याच्याशी बालपणापासून असलेले आपले मैत्रीचे नाते तोडण्यासाठी तयार झालो.आणि आपण एखाद्याकडून अपेक्षा का ठेवावी? प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार जगण्याचा हक्क आहे. यापुढे अपेक्षाभंगामुळे कधीही मन दुखवून घ्यायचे नाही. व समोरच्या व्यक्तीशी असलेले अमुल्य नाते तुच्छ कारणांमुळे तोडायचे नाही. असे ठरवून त्याने काही वेळापुर्वी नितीनच्या मोबाईलवर 'मला कधीच बोलू नकोस.' हा केलेला मेसेज डिलिट करून 'मित्रा मला माफ कर.' हा मेसेज केला.आणि त्याचवेळी इतक्या वेळापासून त्याच्या अस्थस्थ असलेल्या मनाला समाधान लाभले.
-संदिपकुमार