Research (mystery) in Marathi Thriller by Prathamesh Dahale books and stories PDF | शोध ( रहस्यकथा )

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

शोध ( रहस्यकथा )

------------------------------------------------------------

शोध

( रहस्य / रोमांचक / थरारक / दीर्घकथा )

------------------------------------------------------------
" सचिन दादाsss काव्याला पाठवा..वेळ झाला आहे." उकळलेला गरम चहा कपात ओतत असतानाच सचिनच्या कानावर आवाज पडला.
" आत याss उशीर झालाय आज." सचिनचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या किशोरीने ऐकला. तशी ती लगबगीने दारातून आत शिरत किचनमध्ये गेली.
सचिनने चहाचे दोन कप उचलून टेबलवर त्याची मुलगी काव्यासमोर ठेवले.आणि तिच्याशेजारील खुर्चीवर बसत त्याने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिचा निरागस कोमल चेहरा बघून सचिनच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य पसरले.
" आज परत उशीर केला दादा.." किशोरी काव्याच्या बॅगमध्ये टिफिन ठेवताना हलकीशी नाराजीने बोलली.
" हो..काल जरा उशिरा झोपलो. त्यामुळे.."
" आवर बाळा...शाळेला उशीर होईल ना...लवकर चहा पी.." किशोरीच्या बोलण्यावर छोट्या काव्याने एक क्युट स्माईल देत आपल्या पप्पांकडे बोट दाखवले.." पप्पांमुळे उशीर झाला " हेच तिला बोलायचे होते. त्यावर सचिन आणि किशोरीला हसू आले.किशोरीने सचिनकडे पाहिले. नेहमीसारखाच अर्धवट झोप झालेला , शांत , कोणत्यातरी तणावात असल्यासारखा त्याचा चेहरा.आणि त्या चेहऱ्यावर सगळे तणाव बाजूला करून हसण्याचा केलेला प्रयत्न.नेहमीसारखाच.
" दादा...हिचे असे निरागस पणाने केलेले इशारे बघून खरचं वाईट वाटतं...देवाने का हिला बोलण्याचा अधिकार दिला नाही ? का बिचारी बोलू शकत नाही ? " किशोरीने काळजीने काव्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बोलताना तिचा आवाज जड झाला होता.तोपर्यंत तिने चहा संपवला देखील होता.
" मी जाते , बाय " असे काव्याने इशाऱ्यानेच सचिनला दाखवले.सचिनने हलकसं स्मित करत तिला हाताने बाय केलं. काव्या आणि किशोरी निघून गेले.सचिन काव्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच विचार करत होता.
काय पाप केले माझ्या मुलीने ? देवाने एवढ्याश्या वयात तिच्यापासून आईचे प्रेम हिरावून घेतले ? एकतर बिचारी बोलूही शकत नाही.कस सांभाळणार मी काव्याला ? किती दिवस माझ्या मनावर चिंतेच ओझं राहणार ? असे अनेक प्रश्न सचिनच्या मनात घर करत होते. विचारांच्या तंद्रीत हरवलेला असतानाच मोबाईलच्या आवाजाने तो भानावर आला. मोबाईल हातात घेत तो खुर्चीवरून उठला. त्याचा मित्र हेमंतचा कॉल होता.
" हॅलो " सचिन बारीक आवाजात बोलत होता.
" हॅलो सचिन , एक सॉलिड खबर आहे ! त्या लॉकेटचा मालक सापडला आहे ! " पलीकडून हेमंत उत्साहित होत बोलत होता.
" काय ? सापडला ? कुठे ? " सचिन आता गंभीर झाला.
" हो , पुण्यातील एका शॉपमध्ये तसे लॉकेट मिळतात.माझ्या एका पुण्यातील मित्राने माहिती काढली तर समजले की , तो पुण्यातच राहणारा आहे....शैलेश जाधव...शैलेश जाधव नाव आहे त्याच..." हेमंतने एका दमात सगळी माहिती सांगून टाकली. त्याचे बोलणे ऐकून सचिन पुढील विचार करू लागला.
" बोल , पुढं काय करायचं ? त्याला आताच जाऊन पकडतो..पोलिसात घेऊन जातो.." हेमंत सचिन काय बोलतो याची वाट पाहत होता.
" नाही हेमंत....त्याला आता पकडायचे नाही...प्लॅन करून संपवायचे...! " सचिन दाता खाली ओठ चावत बोलला.बोलताना त्याच्या डोळ्यात बदल्याची आग दिसून येत होती..नेहमी शांत असणारा सचिन आज असा कसा बोलतोय याचे हेमंतला आश्चर्य वाटले.
" हे काय बोलतोय तू सचिन ? डायरेक्ट संपवायचे...! हे अचानक काय झालं तुला ? कालपर्यंत तूच म्हणत होता की त्याला पकडून पोलिसात द्यायचे..आणि आज... " हेमंतला काही कळेनासे झाले.
" हेमंत , मी तुला फोनवर सगळं सांगू शकत नाही. आपण भेटल्यावर बोलू."
" ठीक आहे. मी येतो घरी."
" घरी नको. बाहेर आपल्या नेहमीच्या जागेवर भेटू..बारा वाजता.."
" ओके ठीक आहे..येतो मी."
" हम्म " म्हणत सचिनने फोन कट केला.
सचिन पुन्हा खुर्चीत बसला.डोक्यात विचारचक्र चालूच होते. बऱ्याच दिवसापासून तो ज्याचा शोध घेत होता ते त्याला सापडलं होत.आता फक्त बदला पूर्ण करायचा होता. विचार करता करता त्याने हातात असणाऱ्या मोबाईलवरून किशोरीला कॉल लावला.
" हॅलो , किशोरी "
" बोला दादा.."
" शाळा सुटल्यानंतर काव्याला तुझ्या घरी घेऊन जा.मी महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललो आहे. "
" ठीक आहे दादा."
सचिनने किशोरीचा फोन कट केला.आणि आतल्या रूममध्ये गेला.

सचिन त्याच्या खोलीत हातात एक फोटो अल्बम घेऊन बसलेला होता. अल्बम मधील एक फोटो वरून त्याने हात फिरवला.त्याच्या डोळ्यात अश्रुंचे थेंब जमा झालेले होते.
तो फोटो एका स्त्रीचा...सचिनची स्वर्गवासी पत्नी प्रज्ञाचा होता.चमकणारे केस , हसरा चेहरा , डोळ्यात निरागस भावना.अशा सुंदर स्त्रीचा तो फोटो.सचिनने डोळ्यातून पडणारे अश्रू हातानेच पुसले. अल्बम बंद करत तो बेडवरून उठला.अल्बम बेडवरच ठेवला. ड्रॉवर जवळ जात त्याने एका हाताने ते उघडले.आणि दुसऱ्या हाताने एक दागिने ठेवण्याचा असतो तसा बॉक्स त्यातून काढला.काही वेळ सचिन तो बॉक्स निरखून बघत होता.काहीतरी विचारात तो हरवला असावा.हलक्या हाताने त्याने तो बॉक्स उघडला. त्यात एक चमकणारे गळ्यातील लॉकेट होते.लॉकेट बघून त्याने बॉक्स बंद केला आणि रुमबाहेर पडला.


हेमंत एका चहाच्या टपरीवर चहा घेत उभा होता.डोळ्यात किमती गॉगल , गळ्यात सोन्याची चेन , अंगात महागडे हिरव्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या कलरची जीन्स पॅन्ट , डोक्यावरचे केस व्यवस्थित विंचरलेले ,अशा पेहेरवात तो सचिनची वाट पाहत उभा होता.


हेमंत आणि सचिनची मैत्री दोन वर्षांपासूनची. दोघांची भेट एका प्रवासात झाली होती. हेमंत एक तवेरा ड्रायव्हर. जवळपासच्या शहरातून भाडे आणणे आणि नेण्याचे त्याचे काम होते. सचिन एका आयटी कंपनीत कामाला होता. एकदा असेच त्याच्या मित्रांनी एक ट्रिप प्लॅन केली. तेव्हा हेमंतच्या गाडीतून त्यांनी प्रवास केला होता. तेव्हापासून त्यांची मैत्री होती आणि ती दिवसोंदिवस अधिकच घट्ट बनत चालली होती. दोघेही प्रत्येक वेळेला एकमेकांना मदतीसाठी हजर असायचे. एकमेकांच्या सुखात आणि दुःखात नेहमी सहभागी असायचे. दोघांच्या आर्थिक परिस्थितीत फार फरक होता. मात्र याची जाणीव सचिनने कधी त्याला होऊ दिली नव्हती. सचिनची पत्नी प्रज्ञाला तर तो सख्ख्या बहिणी सारख समजायचा. आणि तीही त्याला भावसारखेच प्रेम द्यायची. यामुळे दोघांचे मैत्रीचे नाते अजूनच मजबूत झालेले होते.


चहाचे घोट घेत हेमंत आजूबाजूला नजर फिरवत होता. सचिन अजून आलेला नव्हता. दुपारची वेळ असल्याने चहाच्या टपरीवर तो सोडून कोणी नव्हतेच.आजूबाजूलाही फार कमी वर्दळ होती.हेमंत आजूबाजूला बघत असतानाच समोरून एका बाईकवर सचिन येताना त्याला दिसला.अगदी साध्या वेशात.एक साधा निळ्या रंगाचा टी-शर्ट , फॉर्मल काळ्या रंगाची पॅन्ट आणि पाठीवर एक बॅग.डोक्यावरचे केस अस्तव्यस्त अवस्थेत. कसल्यातरी विचारात बुडल्यासारखा. थकल्यासारखे डोळे.आजूबाजूला काय चालू आहे याचे त्याला कदाचित भानच नसावे.समोर हेमंतला बघून तो भानावर आला असावा.त्याने आपली बाईक चहाच्या टपरी जवळ थांबवली.गाडीवरून उतरताना त्याने हेमंतकडे एक नजर टाकली.
" एक चहा द्या अजून." हेमंतने चहावाल्याला ऑर्डर दिली.
" नाही नको..." सचिनने त्याला नकार दर्शवला.
" काय यार..मित्रांसोबत चहा तर घे.." हेमंत गमतीत बोलला. सचिन गंभीर असूनही हेमंत बोलताना काही गंभीर दिसत नव्हता.
" आपण बाजूला जाऊन बोलूया. " सचिनने टपरीच्या बाजूला ठेवलेल्या छोट्या लाकडी बाकड्याकडे हात केला. तो गंभीरतेने बोलला. हेमंत चहा संपवत चहाचे पैसे देत होता. तोपर्यंत सचिन त्या बाकड्यावर जाऊन बसला. पाठीवरून बॅग काढत त्याने आजूबाजूला नजर टाकली.आजूबाजूला जवळपास काही मोजकीच लोकं सोडली तर कोणीच नव्हते.सगळीकडे शांत वातावरण वाटत होते.
" यात काय घेऊन आलास ? " हेमंतने बाकड्यावर बसता बसता विचारले.
" लॉकेट " सचिन शांततेने म्हणाला. आणि त्याने बॅगमधून एक लॉकेट बाहेर काढले. हे लॉकेट होते सचिनची पत्नी प्रज्ञाचा खून करणाऱ्या व्यक्तीचे. जे सचिनने पुरावा म्हणून त्याच्याकडेच जपून ठेवलेले होते. तो एकमात्र पुरावा होता तिच्या खुन्यापर्यंत पोहोचण्याचा.
" तू उन्हात का बसलाय..बाजूला सरक.." हेमंतच भलतंच बोलणं ऐकून सचिन मनातून संतापला.मात्र काही प्रतिक्रिया न देता तो शांत बसला.हेमंतचा असा मस्करीचा स्वभाव त्याला माहित होता.सचिन बाकड्यावर सरकून बसला.
" नाही..तू उन्हात होता म्हणून.." हेमंतने सचिनचा राग ओळखला होता.
" जे मुद्द्याच आहे ते बोल." सचिन काहीश्या रागातच बोलला.
" ऐक.."
" त्या लॉकेट चा फोटो मी माझ्या सगळ्या शहरातील मित्रांना पाठवला होता.आणि शोध घ्यायला लावला होता.काल मला पुण्याचा मित्र मंगेशचा फोन आला.अशा प्रकारचे लॉकेट स्पेशल असतात , ते फक्त ऑर्डरनुसारच बनवले जातात.शैलेश जाधव नावाच्या व्यक्तीने ते दोन महिन्यांपूर्वी बनवून घेतले होते.त्याचा पत्ताही मिळाला आहे.बस्स ! एवढीच माहिती आहे. आणि हा...त्याचा दुकानातून त्याचा मोबाईल नंबरही मिळाला होता. पण आता तो बंद आहे." हेमंत ने एका श्वासात सगळी माहिती सचिनला सांगून टाकली.
" शैलेश जाधव..याचा माझ्या प्रज्ञाशी काय संबंध होता ? काय दुष्मनी होती ? का त्याने प्रज्ञाला मारले ? " सचिन त्याची पत्नी प्रज्ञाच्या आठवणीने व्याकुळ झाला. त्याच्या डोळ्यात तरळणारे अश्रू पाहून हेमंतला ही कसेतरीच वाटले.
" जे झालं ते वाईटच झालं...पण आता आपण पुढचा विचार करायला हवा सचिन." हेमंत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाला.त्याने थोडावेळ सचिनला शांत होऊ दिले.
" आता बदला घ्यायचा.जे त्याने प्रज्ञा सोबत केलं , तेच आता त्याच्यासोबत करायचं ! " बोलताना सचिनमधे बदल्याची आग दिसत होती.त्याचे डोळे जणू आग ओकत होते.
" पण...तू जे म्हणतोय यात खूप रिस्क आहे ! जर पोलिसांनी आपल्याला पकडले तर ? आणि तू कधीपासून एवढा आक्रमक स्वभावाचा झाला ? अहिंसेवरून डायरेक्ट हिंसेवर कसा आला ? "
" खूप विचारानंतर ! आता जशास तसे ! " सचिन हेमंत कडे रोखून बघत म्हणाला.हेमंतने सचिनचे असे रूप याआधी कधीच पाहिलेले नव्हते.
" पण...कस..? "
" त्यासाठी एक प्लॅन तयार केलाय." सचिन बॅगेतून एक डायरी बाहेर काढत म्हणाला.
" पण हे सगळं आपण घरी केलं असत तर बरं झालं असत..नाही ? " हेमंत आजूबाजूला बघत म्हणाला. चहावाला कितीतरी वेळेपासून त्यांच्याकडेच बघत होता.
" घरी असलं की मला प्रज्ञाच्या आठवणी छळतात.त्यांच्याकडे बघून मला स्वतःच्या भावना रोखता येत नाही.." सचिनचा आवाज पुन्हा जड झाला होता. हेमंत थोडा वेळ काही बोलला नाही.
" मी तुला प्लॅन सांगण्यासाठी आलो होतो , पण आता मी त्या परिस्थितीत नाही.आता फक्त ही डायरी देतो. यात सर्व प्लॅन व्यवस्थित लिहिला आहे.एकदा वाचून काढ." सचिनने ती डायरी हेमंतसमोर धरली.
" आणि ते लॉकेट ? ते का आणलं ? " हेमंत वही हातात घेत म्हणाला.
" तेही तुला देण्यासाठी...मी माझ्याकडे नाही ठेऊ शकत आता.." सचिनने बॅगमधून लॉकेटचा बॉक्स काढत हेमंतकडे दिला.
" ओके.बॅगच दे की..हे कसं घेऊन जाणार.." हेमंत पुन्हा गमतीने बोलला.यावेळेस मात्र सचिनला काही वाटले नाही.त्याने त्याच्याही नकळत हेमंतकडे बॅग सरकवली.त्याच्या मनात त्याला प्रज्ञाची आठवण सतावत होती. तिचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून तरळत होता. हेमंत त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता.
त्याची अवस्था बघून हेमंतने उठून पाण्याचा ग्लास भरून आणत त्याच्यासमोर ठेवला.
" पाणी पी..शांत हो.."
सचिनने कसातरी ग्लास हातात घेत एक घोट पाणी घशाखाली ढकलले.
" ठीक आहे. मी येतो. खूप काही सांगायचे होते तुला...पण..." सचिन दुखी आणि जड आवाजात बोलला.
" मी समजू शकतो सचिन. प्रज्ञा आणि काव्या शिवाय तुला कोणी नाही. पण मी आहे ना...तुला मित्राच्या नात्याने शक्य ती मदत करणार...शब्द आहे आपला.." हेमंत सचिनचा हात हातात घेत म्हणाला.
" हम्म " सचिननेही त्याच्यावर विश्वास असल्याचे दाखवले.
" ठीक आहे...मी..जातो.." सचिन जाण्यास उठला.
" तू काय करशील त्यात मी तुझ्या सोबत आहे मित्रा.." हेमंत उठून उभा राहीला.
" प्रज्ञा माझ्या बहिणीसारखी होती.तिच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे." हेमंत सचिनच्या पाठीवर हात ठेवत त्याला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता. हेमंतने विश्वासाने सचिनच्या डोळ्यात पाहिले. हेमंतला सचिनच्या डोळ्यातही त्याच्याबद्दल विश्वास दिसत होता.
सचिन बाईक चालू करून निघेपर्यंत हेमंत त्याच्याकडेच बघत होता.त्याला सचिनबद्दल काळजी वाटत होती.
हेमंतने बाकड्यावर ठेवलेली डायरी आणि लॉकेट बॉक्स बॅग मध्ये ठेवला आणि आपल्या बाईक वरून निघून गेला.


संध्याकाळची वेळ...सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत होता..आकाशातील नारंगी रंगाच्या छटेने आकाशाची शोभा दुगुणीत झाली होती..पावसाचे दिवस असल्याने हवेत गारवा होता. सचिन आपल्या घराच्या अंगणात आरामदायक खुर्चीवर बसून सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य डोळ्यात साठवत बसलेला होता. मनातील चालणारे विचारांचे चक्र थांबवण्यासाठी त्याला कुठेतरी लक्ष वळवणे गरजेचे होते.यात अस्ताला जाणारा सूर्य त्याला पूर्णपणे मदत करत होता.
कोणीतरी पळत येण्याची चाहूल लागताच त्याने त्या दिशेने पाहिले.पळत येणाऱ्या काव्याने त्याच्यावर झेप घेतली.सचिनने तिला सांभाळत मांडीवर बसवले आणि तिच्या गालाचा मुका घेतला. काव्याने " मी आज खूप खेळले. " असे इशाऱ्यानेच सांगितले. तिचे इशारे बघून नकळत सचिनच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
समोरून किशोरी येऊन सचिन समोरच्या खुर्चीवर बसली.
सचिनच्या चेहऱ्यावरील हास्य बघून किशोरीला हायसे वाटले.
" खूप उशीर केला आज..खूप खेळली वाटतं. " सचिन काव्याच्या केसांवरून हात फिरवत बोलला.
" हो.घरी यायला तयारच नव्हती.आपल्या बहिणीला सोडावं वाटत नाही तिला." किशोरी हसत म्हणाली.
" हम्म..."
" किशोरी... " सचिनने किशोरीकडे पाहिले.
" थँक यु ! " सचिनला पुन्हा भरून आले.
" थँक्स ? कशासाठी ? "
" प्रज्ञा गेल्यापासून तू आईसारखे काव्याला सांभाळले आहे त्यासाठी.." सचिनच्या बोलण्यात उपकाराची भावना जाणवत होती.
" त्यात थँक्स कशाला ? मी तिची मावशी असल्याचे कर्तव्य पार पडते आहे.आणि म्हणतात ना...मावशी म्हणजे दुसरी आईच असते.मी जन्मभर काव्याला पोटच्या मुलींसारखं सांभाळेल. " बोलताना किशोरीचे मन भरून आले.
" तू नसती तर कसं सांभाळलं असत मी हिला ? प्रज्ञा तर गेली हिला माझ्याकडे सोडून...माझा आणि काव्याचा काही विचार केला का तिने जाताना.." सचिन काकुळतीला येऊन बोलत होता. किशोरील त्याचे दुःख जाणवत होते.
" दादा , तू आता प्रज्ञा ताईच्या आठवणीतून बाहेर यायला हवं.किती दिवस झालेली गोष्ट आठवून मनात ओझं ठेवणार ? याचा तुलाही त्रास होईल आणि काव्यालाही."
किशोरी जे झालं ते विसरण्यास सांगत होती. मात्र हे सचिनला शक्य होत नव्हते.
" जोपर्यंत मी प्रज्ञाच्या खुन्याला शोधून त्याला संपवणार नाही.तोपर्यंत माझं दुःख कमी होणार नाही ! " सचिन रागाने बोलत होता.किशोरीचे त्याला एवढ्या रागात कधी पाहिले नसावे.
" हे काय दादा..? हे काय बोलतोय तू ? संपवणार ? म्हणजे तू त्या खुन्यासारखं पाप करणार ! नाही दादा...हे बरोबर नाही." किशोरीला सचिनच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.
" मग त्याने प्रज्ञाचा खून केला ते बरोबर होत ? तो कोण होता ते ही माहीत नाही. काय संबंध होता त्याचा ते ही माहीत नाही. का मारले त्याने प्रज्ञाला ?...या सगळ्याचा शोध लावून त्याला शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी." सचिन अजूनच आक्रमकपणे बोलत होता. त्याला बघून काव्या घाबरली.हे किशोरीच्या लक्षात आले. तिने खुर्चीतून उठत तिला सचिनच्या मांडीवरून उचलत आपल्या कडेवर घेतले.
" हिला घेऊन जाते घरी.तुला आरामाची गरज वाटते.आणि तुझा जो विचार आहे तो बदल.जे झालं ते विसरून पुढचा विचार कर दादा." किशोरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली.सचिन खाली शून्यात नजर लावून बसला होता.तो त्याच्या मनस्थिती समोर हतबल झाला होता.जो पर्यंत तो त्याचा बदला पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याचे मन स्वस्थ होणार नव्हते.
एकीकडे प्रज्ञाची आठवण त्याला सतावत होती.तर दुसरीकडे काव्याची चिंता सतावत होती.
किशोरी काव्याला घेऊन निघून गेली. जाताना काव्याने वळून सचिनकडे पाहिले.तिला तिच्या पप्पांजवळ राहायचे होते.हे किशोरीच्या लक्षात आले.मात्र सचिनला आता एकट राहून देणं गरजेचं होतं.अशा अवस्थेत तो काव्याला सांभाळू शकत नव्हता.


" हॅलो , यार काय सॉलीड प्लॅन बनवला आहे तू ! " हेमंत फोनवर उत्साहाने बोलत होता.
" मी येतोय तुझ्या घरी.तेव्हा बोलू.." सचिन ताटातला नाश्ता खात म्हणाला.
" माझ्या घरी ? मीच आलो असतो ना तुझ्या घरी.माझी बायको काल आलीये गावावरून...तिला काही कळलं तर हजार प्रश्न विचारून माझं डोकं खाईल." हेमंत गमतीत बोलला.
" ठीक आहे , ये." शांतपणे बोलून सचिनने फोन कट केला.


सचिन त्याच्या बेडरूमध्ये बसून मोबाईल बघत होता. त्याचे प्रज्ञा सोबतचे फोटो.काव्याच्या जन्माधीचे...ते दोघे लग्न झाल्यानंतर शिमलाला फिरायला गेले होते ते फोटो.शिमलाच्या निसर्गसौंदर्यात खुलून दिसणारे तिचे ते देखणे रूप बघून सचिनसमोर पुन्हा तिच्या आठवणी जाग्या झाल्या.


" नाही..मुलगा होईल."
" शक्य नाही ! मुलगी."
" ठीक आहे मुलगी तर मुलगी.जशी तुझी इच्छा." प्रज्ञा गरम गरम चहाचा घोट घेत मनमोहक हसत म्हणाली.
" मुलगा असो नाहीतर मुलगी.आपल्या बाळाचे खूप लाड होणार हे नक्की." सचिनही तेवढंच सुंदर हसला.
" हम्म..तुझ्यासारखा धनाढ्य आणि सुंदर बाबा असल्यावर." प्रज्ञा त्याच कौतुक करत म्हणाली.
" आणि तुझ्यासारखी लाड करणारी आई असल्यावर तर विचारायलाच नको." सचिनही तेवढ्याच कौतुकाने म्हणाला. यावर प्रज्ञा पुन्हा मनमोहक हसली.
सचिन आजूबाजूचा परिसर बघत होता.सर्व बाजूने बर्फाने त्याची चादर पसरलेली होती..त्यात बर्फावर चमकणाऱ्या सूर्याची किरणे अजूनच सुंदर भासत होती..वातावरणात जास्त गारवा जाणवत होता..अंगातील उबदार कपडे त्यापासून संरक्षणाचे काम करत होते.आजूबाजूला सगळीकडे चहा नाश्त्याची..तर काही ठिकाणी इतर काही खरेदीची दुकाने.सगळीकडून नजर फिरवत असताना एका ठिकाणी त्याला काहीतरी दिसले.
" चल तिकडे.."
" कुठे ? "
" चल.मग समजेल."
" चहा तर संपू दे.आणि आता बोलला तर पैसे लागतील का ? किती मोजकं बोलशील ? " प्रज्ञा गमतीने म्हणाली.
सचिन अजूनही त्याच दिशेने बघत होता.
" चल." प्रज्ञा चहा संपवत म्हणाली.
दोघे हातात हात घेऊन चालू लागले. सचिन प्रज्ञाला घेऊन एका छोट्या ज्वेलरी शॉपजवळ घेऊन आला.अशा ठिकाणी ज्वेलरी शॉप असणे दुर्मिळच. प्रज्ञालाही ज्वेलरी शॉप बघून आश्चर्य वाटले. सचिन ज्वेलरी शॉपच्या बाहेर थांबला.
" तुला आठवतय ? तू लग्नाआधी मला काहीतरी मागितले होते.." सचिन प्रज्ञाकडे बघत बोलला. प्रज्ञा आठवण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला काहीतरी आठवले.
" हो...एक गोल्डन रिंग...लग्नाआधी मागितली होती. तू म्हणाला होता की घेऊन देईन.पण अजून दिली नाही. " प्रज्ञा खोट्या नाराजीने नाक मुरडत म्हणाली.
" आणि तू इथे घेऊन आलाय.इथे तशी रिंग मिळेल असा वाटत नाही." प्रज्ञा दुकान निरखून बघत म्हणाली.
" हो पण बघायला काय हरकत आहे ? दुकान दिसले म्हणून आलो." सचिन दुकानाकडे नजर टाकत म्हणाला.
" ठीक आहे.चल." प्रज्ञा पुन्हा सुंदर हसली. दोघेही दुकानाच्या आत शिरले.बाहेरून साधे दिसणारे ते दुकान आतून मात्र सुंदर व्यवस्थित स्वच्छ असे दिसत होते. शोकेसमध्ये ठेवलेले वेगवेगळे सोन्याचांदीचे हार , अंगठ्या , लॉकेट , ब्रेसलेट बघून प्रज्ञाला फार आनंद वाटला.सचिन ते दुकान निरखून बघत होता.खासकरून तो प्रज्ञाला हवी तशी अंगठी दिसते का ते पाहत होता. त्याची नजर एका अंगठ्याच्या सेटजवळ येऊन थांबली.
हिरे चांदी आणि सोने अशा तीन धातूंच्या त्या अंगठ्या बघून सचिन मनातून खुश झाला.
" बोलीये साहब..क्या मदत करू.." शॉपकीपरच्या आवाजाने दागिन्यांच्या सुंदरतेत हरवलेले दोघे भानावर आले.
" अ...वो..अंगुठी दिखाओ." सचिनने त्या मघाच्या अंगठ्याच्या सेटकडे बोट दाखवले. बाकीचे दागिने बघताना प्रज्ञाचे त्याकडे लक्षच गेले नव्हते.तो सेट बघून प्रज्ञा मनातून जाम खुश झाली.त्यात तिला हवी तशी सोन्याची अंगठी बघून ती मनातल्या मनात आनंदाने जणू उड्या मारू लागली. शॉपकीपरने तो सेट काढून दोघांसमोर ठेवला.
" बोला मॅडम , सोन्याची की चांदीची ? " सचिन तिच्याकडे बघून हसला.
" ही..! " आपल्या आवडत्या अंगठिकडे बोट दाखवताना प्रज्ञा उत्साहाने जवळजवळ ओरडलीच.
" नक्की ? "
" हो नक्की..! " प्रज्ञाचा उत्साह बघून सचिनला आनंद वाटला.
" आपण मराठी आहात...महाराष्ट्रातून आलात का ? " एक दुसरा शॉपकीपर दोघांकडे बघत म्हणाला.
" हो.आपण पण मराठी आहात ? " प्रज्ञाने हसत त्या व्यक्तीला विचारलं.
" हो.म्हणजे मी मूळ इथलाच...पण काही दिवस तिकडे राहिलो आहे.माझा जन्मही तिथलाच..नाशिकचा.." तो शॉपकीपर हसतमुखाने बोलला.
" आम्ही मुंबई वरून आलोय.इथे मराठी माणसाला बघून चांगले वाटले." सचिन स्मित करत म्हणाला.
" मग दादा...मला बहीण समजून ही अंगठी एका सुंदर बॉक्समध्ये पॅक करून द्या." प्रज्ञाने थेट त्याला भाऊ मानल्याने तो थोडा गडबडलाच.
" ह..हो..हो..देतो." त्या शॉपकीपरच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिकच फुलले.तो पॅकिंग करत असताना सचिन बाहेर लोकांची चाललेली वर्दळ बघत होता.प्रज्ञाचे मात्र शोकेस मधील एका लॉकेटकडे लक्ष होते.तिने प्रयत्न करूनही तिची नजर त्या लोकेटवरून हटण्यास तयार नव्हती.तिला ते लॉकेट प्रचंड आवडले होते.
" सचिन.." प्रज्ञाने बाहेर बघणाऱ्या सचिनचे लक्ष आपल्याकडे ओढले.
" मला अजून काहीतरी आवडले आहे." प्रज्ञा लाडात येऊन बोलली. सचिनने प्रश्नांकित नजरेने तिच्याकडे पाहिले.
" ते..ते लॉकेट." प्रज्ञाने तीला आवडलेल्या लॉकेटकडे
हात केला.
" लॉकेट ?...दादा दाखवा ते." सचिनने शॉपकीपरला ते लॉकेट दाखवण्यास सांगितले.
" घेऊन देशील नक्की..? " प्रज्ञाने लाडीकपणाने प्रश्न केला.
" पहिले बघू तर.."
शॉपकीपरने ते लॉकेट दोघांसमोर ठेवले. अस्सल सोन्याची चमकणारी लॉकेटची चेन.त्यावर अत्यंत बारीक असे सुंदर नक्षीकाम.आणि मधोमध सुंदर बदामाच्या आकाराचे पेंडल.ते पाहून सचिनलाही ते लॉकेट प्रचंड आवडले.
" सुंदर आहे "
" हे पॅक करून द्या दादा." सचिनला ते लॉकेट आवडलेले पाहून प्रज्ञा ही खुश झाली.
त्या मराठी शॉपकीपरने अंगठी आणि लॉकेट पॅक करून प्रज्ञाकडे सोपवले. सचिनने कार्ड स्वाईप करून बिल पे केले आणि दोघेही बाहेर आले.
" एका अंगठी सोबत लॉकेट ही घेऊन दिले.आता परत काही मागू नको..म्हणजे झालं." सचिन चालताना गमतीने म्हणाला.
" आता काही मागायची गरजचं नाही.खरचं हे लॉकेट मला इतके आवडले ना की आता जन्मभर सांभाळून ठेवेल." प्रज्ञा हसून म्हणाली. त्यावर सचिनच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरले.


प्रज्ञा सोबतचा तो प्रसंग आठवून सचिनच्या डोळ्यात पाणी आले.मोबाईलची बंद झालेली स्क्रीन चालू करत तो पुन्हा तो फोटो पाहू लागला. कितीतरी वेळ तो प्रज्ञाचा हसरा चेहरा न्याहाळत होता. शेवटी भावना अनावर झाल्याने त्याने मोबाईल हातातून बाजूला फेकला. अचानक त्याला काही तरी आठवले.तसा तो आणखीनच दुखी होऊन जास्तच रडू लागला. आपले डोके हातात धरून बसल्यावर त्याला स्वतःच्या हुंदक्यांची जाणीव झाली.बऱ्याच दिवसानंतर तो इतकं मनमोकळं रडत होता.बऱ्याच दिवसांचे मनात साठवलेले दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होते. प्रज्ञाला जाऊन दोन महिने झाले होते.पण हे दोन महिने त्याला दोन वर्षांसारखे भासले होते.तो यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही त्याला अपयशच लाभत होते.
मन जरा शांत झाल्यावर तो बेडवरून हळूपणे उठला. बाजूला असलेल्या कपाटकडे जाऊन त्याने ते हळूच उघडले. कपाट कपड्यांनी पूर्णपणे भरले होते. त्यात त्याचे स्वतःचे आणि प्रज्ञाचे ड्रेस. सचिनने कपाटाच्या उजव्या बाजूचा ड्रॉवर हळूच उघडत त्यातून एक छोटा आणि एक मोठा बॉक्स बाहेर काढले.आणि कपात पुन्हा लावून घेतले. हे तेच बॉक्स होते.प्रज्ञाच्या लॉकेट आणि अंगठीचे. ते घेऊन सचिन पुन्हा बेडवर बसला.त्याच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नव्हते.
त्याने अंगठीचा बॉक्स हातात घेत अलगद उघडत अंगठी हातात घेतली.प्रज्ञाची आवडती रिंग.सचिनने पुन्हा आपल्या भावनांचा बांध फुटण्याआधीच ती रिंग बॉक्समध्ये ठेऊन दिली.लॉकेट चा बॉक्स उघडण्याचे धाडस त्याच्यात नव्हतेच.पण प्रज्ञाची आठवण त्याला ते लॉकेट बघण्यास प्रवृत्त करत होते. एका हाताने डोळ्यातील अश्रू पुसत दुसऱ्या हाताने त्याने बॉक्स उघडला. ते चमचमणारे लॉकेट त्याने अलगद हातात घेतले.पेंडलला मागच्या बाजूने उघडून त्यातला फोटो त्याने हातात घेतला.सचिनचा अगदीच तरुण पणातला तो फोटो...तो फोटो प्रज्ञाला प्रचंड आवडीचा होता.यामुळेच तिने तो तिच्या आवडत्या लॉकेट मध्ये ठेवलेला.सचिन पुन्हा प्रज्ञाच्या आठवणी मध्ये हरवणार तोच दारावरची बेल वाजली. बहुतेक हेमंत आला असावा. सचिनने पटकन लॉकेट आणि अंगठी कपाटामध्ये पाहिल्या जागेवर ठेऊन दिले. आणि पटकन दरवाज्याकडे धावला. तोपर्यंत अजून तीन वेळा बेल वाजली. सचिनने दार उघडले तर अपेक्षेप्रमाणे हेमंत उभा होता. बेल वाजवून वैतागल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.
" काय यार...आता घरात घ्यायची पण इच्छा नाही का आम्हाला." हेमंत आत येत त्रासिक आवाजात म्हणाला.
" काय करत होता रे ? कधीची बेल वाजवतोय." हेमंत सोफ्यावर बसत म्हणाला. पाठीवरील बॅग त्याने समोर टेबलवर ठेवली.
" काही नाही..असच.." सचिन हेमंत शेजारी सोफ्यावर बसत बारीक आवाजात बोलला. त्याचा चेहरा बघून काय ते हेमंतला समजले.
" तुझ्या चेहऱ्यावरून समजतंय." हेमंत त्याच्याकडे काळजीने बघत म्हणाला.
" किती दिवस असा जगणार ? विसरून जा यार आता जे झालं ते." हेमंत त्याच्या मांडीवर हात ठेवत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
" कसं विसरू ? प्रत्येक क्षणाला तिचीच आठवण येते.प्रत्येक वेळी काव्याची काळजी वाटते.तीच कस होईल ? " सचिन रडवेला झाला होता. त्याची अवस्था बघून हेमंतला वाईट वाटले. पहिले कमी बोलणारा पण हसऱ्या चेहऱ्याचा सचिन आता मनातून पूर्णपणे खचलेला त्याला दिसत होता.
" यावर एकच मार्ग आहे मित्रा..जे झालं ते विसरणे." हेमंत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होता.
सचिनला शांत होण्यासाठी हेमंतने वेळ दिला. त्याची अवस्था बघून हेमंतला अस्वस्थ झाले.
" प्लॅन पूर्ण वाचला ? " मन शांत झाल्यावर सचिनने प्रश्न केला.
" हो , कुठून एवढा भारी प्लॅन सुचला तुला ? " हेमंत कौतुकाने म्हणाला. यावर सचिनने काही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने हळूच पुढे होत टेबलवरील बॅग हातात घेत त्यातून ती डायरी बाहेर काढली.
सुरवातीच्या काही पानांवर खाडाखोड केलेली दिसत होती. तर काही पानांवर त्याच्या काही मित्रांचे , त्याचे आणि हेमंतचे नाव लिहून त्यावर काही विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या होत्या.
" च्यायला , पण हे नाही समजलं की , एवढ्या सोप्या कामासाठी एवढे कष्ट करायची काय गरज ? नाही म्हणजे..त्याला पकडून जागेवरच संपवला तर..! "
" त्याने ज्या प्रकारे मला त्रास दिलाय तोच त्रास त्याला झाला पाहिजे.तडपून तडपून मारायचा त्याला.." सचिन रागाने लाल झाला होता.त्याच्या मनातली बदल्याची आग काही थांबायला तयार नव्हती.
" सचिन , हे बघ..तू जे काही बोलतोय ते रागाच्या भरात बोलतोय.एकदा शांत डोक्याने पुन्हा विचार कर." त्याची अवस्था बघून हेमंतला काळजी आणि भीती वाटू लागली होती.
" तू या विचाराने स्वताचे नुकसान करतोय.जर या सगळ्यात तुला काही झाले तर...तर काव्याचे काय ? "
" मला काहीही होणार नाही..मला स्वतःवर आणि माझ्या प्लॅनवर पूर्ण विश्वास आहे. " सचिन आत्मविश्वासाने बोलला. हेमंतला मात्र त्याचे बोलणे काही पटत नव्हते.
" तूला माझी मदत करायची आहे की नाही हेमंत ? तू काल मला बोलला होता की शक्य ती मदत करेन आणि आज काय झालं ? " सचिन थोडा रागात बोलला.
" न..नाही तस नाही..मी अजूनही तुला पूर्णपणे मदत करायला तयार आहे.पण एक लक्षात ठेव...या कामात थोडी जरी चूक झाली , तर नंतर पस्तावा करण्याशिवाय काही राहणार नाही." हेमंत सचिनला सावध करत म्हणाला.
" त्याची पूर्ण काळजी मी घेतली आहे. तू प्लॅन बद्दल विचार केला तर तुझ्या लक्षात येईल ते." सचिन हातातील डायरीची पाने पालटत म्हणाला.
" आपल्याला येणाऱ्या लहान-मोठ्या अडचणी...आणि त्या सर्व अडचणींचा उपाय...याबद्दल मी आधीच विचार केला आहे. " सचिन आपल्या प्लॅन मध्ये काही कमतरता नाही हे हेमंतला पटवून सांगत होता.
" ठीक आहे. तुझ्यावर विश्वास आहेच माझा..फक्त आता हे सांग की पुढे काय करायचं.सध्या तरी आपल्याला हेच माहीत आहे की तो पुण्याचा कोणतरी...म्हणजेच शैलेश जाधव आहे. याव्यतिरिक्त आपल्याला काहीच माहीत नाही. "
" एकदा पूर्ण प्लॅन तुला समजावून सांगतो.नीट ऐक..." सचिन डायरीतील पाने चाळत सांगू लागला. हेमंत त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागला.
" सर्वात पहिले काम होते त्याला त्या लॉकेटच्या साहाय्याने शोधणे , जे पुरावा म्हणून आपल्याकडे आहे. त्यात आपण यशस्वी झालो. आता पुढे.... तो कोण आहे ? कुठे काम करतो ? त्याच्या कुटुंबात कोण कोण आहे , याची माहिती काढणे.त्यासाठी तुझा मित्र मंगेश आपल्याला मदत करेल."
" मी त्याला सांगितलं आहे तस.पण त्याला माहीती कशी मिळणार ? हा प्रश्न आहे. " हेमंत बोलला.
" त्याच्याशी ओळख करून , त्याचा विश्वास जिंकून म्हणजेच त्याचा मित्र बनून ! " सचिनने शांततेत उत्तर दिले.
" आणि तू डायरीत हे पण लिहिले आहे की मी सुद्धा त्याच्याशी मैत्री करायची..पण त्याला माझ्यावर शंका आली किंवा त्याला आपल्या मैत्रीबद्दल समजले तर..? " हेमंतने मधेच विचारले.
" म्हणूनच तू माझा दुष्मन आहे असे त्याला भासवायचे.आणि माझ्याविरुद्ध एक कट रचायचा ! " सचिनचा चेहऱ्यावर बदल्याची भावना स्पष्ट दिसत होती.
" आणि योग्य वेळी त्यालाच त्या कटामध्ये पूर्णपणे अडकवायचे ! "
" आणि हा...त्या व्यक्तीचे कुटुंबातील ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्याला किडन्याप करून त्याला तितकेच तडपवायचे जेवढे त्याने मला तडपवले आहे.त्याला पूर्णपणे अडकवून योग्य वेळी त्याचा काटा काढायचा ! मरताना त्याने माझ्यासमोर नाक रगडलेच पाहिजे ! जेवढं मी प्रज्ञासाठी रडलो आहे , तेवढच तो मरताना रडला पाहिजे..! " सचिन रागाने जवळजवळ थरथरत होता. हेमंतने तर त्याचे असे रूप कधीच पहिले नव्हते.
" पण...त्याच्या कुटुंबातील कोणाला गायब करणे बरोबर नाही वाटत." हेमंत ने नाराजी दाखवली.
" माझी काव्या एवढ्याश्या वयात आईचे प्रेम हरवून बसली , त्याचे काय ? मी प्रज्ञा नसताना इतका एकटा पडलो..ते फक्त आणि फक्त त्या खुन्यामुळेच.त्यालाही तो त्रास झालाच पाहिजे." सचिन काकुळतीला येऊन बोलत होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा आसवांनी जागा घेतली.
" का माहीत नाही..पण मला हे चुकीचे वाटते आहे.नाही म्हणजे...पाहिले त्याचा मित्र बनून त्याचा विश्वास जिंकूण त्याच्या पाठीवर वार करणे.आणि नंतर त्याच्या घरातील कोणाला गायब करणे ! हे तर जर जास्त होतंय सचिन..."
" हाच माझा बदला आहे.त्याने जे मला दिलं त्याच्या दुप्पट त्याला परत देणार ! " सचिन सूड भावनेने पेटून उठला होता. तो इतर चांगल्या वाईट गोष्टी जशा विसरलाच होता. आपण करतोय ते कितपत योग्य आहे याचे त्याला काहीच भान राहिलेले दिसत नव्हते.
" आणि तुला नक्की झालाय काय ? थोड्यावेळा आधी माझ्या प्लॅन च कौतुक करत होता.आणि आता अचानक असा काय बोलतोय..तुला अजूनही सांगतो , माझी मदत करायची नसेल तर तस स्पष्टपणे बोल." सचिन हेमंतवर संतापला होता.
" आधी मी एवढा विचार केलाच नव्हता.भावनेच्या भरात मी प्लॅन चांगला आहे असं बोललो.त्याच्या खोलात मी गेलोच नाही.पण आता मला वाटतय की आपण चुकीच्या मार्गावर जातोय. आपण चूक करतोय.या ऐवजी आपण पोलिसांची मदत घेतली तर अधिक बर होईल." हेमंत बारीक आवाजात बोलला.
" ठीक आहे..तू आता गेला तरी चालेल ! " सचिन चांगलाच नाराज झाला होता. हेमंतचा त्याला आता संताप येत होता.
" सचिन...तुला अजूनही सांगतोय.तू गैर मार्गाला जातोय. यात तुझे नुकसानच होईल..त्या खुन्यापेक्षा वाईट काम करतोय तू." हेमंतचा सचिनला समजावण्याचा प्रयत्न चालूच होता.
" तुला मी शेवटचं विचारतोय...मला मदत करशील का नाही ? " सचिन चिडून मोठ्याने बोलला.
हेमंतला आता काही समजेनासे झाले.एकीकडे सचिनने जो मार्ग निवडला होता तो नक्कीच चुकीचा वाटत होता.मात्र दुसरीकडे सचिनला मदतीचे दिलेले आश्वासन.आणि त्याची प्रज्ञा गेल्यापासून झालेली अवस्था..त्याला सचिनला अशा अवस्थेत एकट सोडणंही बरोबर वाटत नव्हतं..आणि त्याला या सगळ्यात कसं बाहेर काढावं हेही त्याला समजेनासे झाले होते. काहीवेळ दोघे शांतच होते. सचिन सोफ्यावर मान टेकवून वर बघत काहितरी विचारात गुंतला होता. हेमंतच्या मनात मात्र चलबिचल सुरू होती. शेवटी एक मोठा श्वास सोडत हेमंत बोलला.
" ठीक आहे सचिन.मी तुला मदत करेन.शेवटी शब्द दिला आहे तुला.पण एक लक्षात ठेव यात काहीही चूक होऊन देऊ नको.नाहीतर तुझ्या या सूडाच्या भावनेने काव्याचेही आयुष्य बरबाद होईल." हेमंत अजूनही काळजीत दिसत होता.
" हेमंत.." सचिनने हेमंतच्या हातावर आपला हात ठेवला.
" मला या वेळी तुझ्या मदतीची खूप गरज आहे.तूच जर साथ सोडली तर मी पूर्णपणे तुटून जाईल." सचिन विनंतीच्या सुरात बोलला. पुन्हा त्याचे मन भरून आले होते. हेमंतने त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर दिला.
" तू जे म्हणतोय ते बरोबर आहे हेमंत.मी चुकीचा मार्ग निवडतोय.पण मी प्रयत्न करूनही स्वतःला हे करण्यापासून रोखू शकत नाहीये.जोपर्यंत मी त्या खुन्याला रडताना तडफडून मरताना बघत नाही तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही." सचिन अजूनच पेटून उठला.
" ठीक आहे..जर हेच तुला प्रज्ञाच्या आठवणींमधून बाहेर काढणार असेल.या मुळेच तू जर पहिल्यासारखा सचिन होणार असशील तर मी तुझ्या सोबत आहे." हेमंत सचिनला विश्वास देत म्हणाला.
" तुझी खूप कृपा होईल." सचिन डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला.
" त्यात काय कृपा ? " हेमंत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
" आता हे सांग..आपल्याला सर्वात पहिले काय करायचे ? " हेमंत सचिनचे लक्ष मूळ मुद्द्याकडे आणत म्हणाला.
" प्लॅन नुसार पहिले शैलेश जाधवची सर्व कुंडली काढणे.आणि..." सचिन बोलत असतानाच हेमंतचा फोन वाजला.
" मंगेशचा फोन आहे.नक्कीच काहीतरी माहिती असणार ! " हेमंत खिशातून फोन काढत म्हणाला.
" हॅलो." हेमंत गांभीर्याने बोलत होता.
पलीकडून मंगेश काहीतरी बोलताच हेमंतचा चेहरा उडाला.
" काय..! हे कसं शक्य आहे...! " हेमंत धक्का बसल्यासारखा ओरडला. त्याला बघून काहीतरी गडबड आहे हे सचिनला समजले. मंगेशचे बोलणे ऐकून हेमंतच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिकच गंभीर होत होते.
" ठ..ठीक..आहे.." मंगेशचे बोलणे संपल्यावर हेमंतने थरथरत्या हाताने फोन ठेवला.
सचिन आता कान देऊन हेमंत काय सांगतो ते ऐकू लागला. हेमंतने सचिनकडे पाहिले. हेमंत घाबरलेला दिसत होता. सचिनने त्याला इशारा करत " काय झालं ? " विचारले.
" सचिन...शैलेश जाधव नावाचा माणूस या जगातच नाहीये..! " हेमंतच्या वाक्यावर सचिनला धक्काच बसला.तो गडबडला.हेमंत काय बोलतोय त्याला काय समजेनासे झाले.
" म्हणजे ? तुला नक्की काय म्हणायचंय ? मंगेश काय बोलला ? " सचिन आता आतुर होऊन हेमंतचे बोलणे ऐकू लागला.
" मंगेश बोलला की..शैलेश जाधव नावाचा माणूस सहा महिन्याधीच वारला आहे..! " हेमंत घाबरत बोलला.
" काय ? हे कस शक्य आहे ? ते लॉकेट तर त्याच्या नावावर आहे.आणि प्रज्ञाचा खून होऊन दोन महिने ! " सचिन आता अस्वस्थ झाला होता..त्याचे डोके बधिर होत चालले होते.हेमंत ची तीच अवस्था होती.ज्याची कट रचून हत्या करण्याचा विचार ते करत होते तो सहा महिन्यांनाधीच गेला होता..!
" काहीतरी गडबड आहे.कदाचित तो दुसरा शैलेश जाधव असेल. " सचिन हळूच बोलला.
" नाही.मंगेशने त्याच्या विश्वासातील माणसांकडून माहिती काढली आहे..आणि तो जो पत्ता लॉकेट खरेदी केलेल्या दुकानातून भेटला.त्याच पत्यावर त्याचे कुटुंब राहत आहे.शैलेश फेब्रुवारी मधेच कार अपघातात गेला." हेमंतने एका दमात मंगेशने सांगितलेली माहिती सचिनला सांगितली. काही वेळापूर्वी रागाने पेटून उठलेला सचिन आता मात्र प्रचंड अस्वस्थ होऊन चिंताग्रस्त झाला होता. आता काय करावे आणि नेमकं काय सत्य आहे हे कळायला सध्या तरी काही मार्ग नव्हता. दोघेही चिंताग्रस्त होऊन विचारात पडले.
" नक्कीच यामागे कोणी दुसरा असेल. " सचिन शांततेत म्हणाला.
" कस काय ? " हेमंत काही न कळल्यासारखं बोलला.
" हा जो कोणी आहे तो फार हुशार असणार.आणि म्हणूनच त्याने एका मृत माणसाच्या नावावर लॉकेट घेतलं असणार." सचिन आता चिकित्सक बुद्धीने विचार करत होता.
" पण तो अस का करेल ? नाही..म्हणजे त्याने लॉकेट तर मुद्दामून सोडलं नसणार ना..तो स्वतःहून का पुरावा मागे सोडेल ? " हेमंत विचार करत बोलला.
" तुझं बरोबर आहे.पण तरीही त्याने पूर्वतयारी केली असणार. त्याने सर्व बाजूने विचार केला असणार.पकडलं जाऊ नये म्हणून त्याने अस केलं असेल. शैलेश जाधव आणि त्या खुन्याचा काहीतरी नक्कीच संबंध असणार..यात शैलेशच्या कुटुंबाला अडकवण्याचाही कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. " सचिन विचार करत बोलला.
" पण मग यात प्रज्ञाचा काय संबंध ? "
" आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त तो खुनीच देऊ शकतो.त्याला पकडणे आता आपले काम.." सचिनच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरूच होते. पुन्हा एकदा खुन्याला पकडण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात सुरू झाला होता. हेमंतला हे लक्षात आले. तसा तो वैतागला.
" पण त्याला कस शोधणार ? " हेमंत आता वैतागत बोलला.
" आपल्याला आता प्लॅन बदलावा लागेल हेमंत...आता फक्त खुन्याला पकडून त्याला जागेवर संपवणे हेच आपले काम..! " सचिनच्या वाक्यावर हेमंत अधिकच वैतागला.
" नाही सचिन...आता आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल.त्याशिवाय पर्याय नाही.आणि आतातरी खुन्याला मारण्याचा विचार सोडून दे." हेमंतने स्पष्टपणे नाराजी दाखवली.
" नाही हेमंत..पोलीस एकतर साधी केस म्हणून जास्त खोलात तपास करणार नाही.आणि वेळ आली तर आपल्यावरही ते संशय घेतील.केस सॉल्व्ह होईपर्यंत थांबण्याचा संयम माझ्यात नाही ! तोपर्यंत हे दुःख सहन करण्याची हिम्मत माझ्यात नाही ! सचिनने धडधडीत नाराजी दाखवली. तो पुन्हा रागाने पेटून उठला.
" मग आता करायचे काय ? काहीच समजत नाहीये यार.." हेमंत पुरता गोंधळला होता.
" आता पोलिसांचे काम आपल्याला करावे लागेल." सचिन काहीतरी विचार करत बोलला.
" म्हणजे ? "
" तपास ! या लॉकेटच्या आणि शैलेश जाधवच्या आधारे.."
" तपास करायचा ? सचिन..हे बोलायला सोपं आहे. खुन्याला शोधणं आणि ते ही एका लॉकेटवरून !..जे एका मृत व्यक्तीच्या नावाने खरेदी केले गेले ! काय बोलतोय तू सचिन ! " हेमंतने सचिनच्या बोलण्याला विरोध केला.
" सोपं असो नाहीतर अवघड.मला फक्त माझ्या प्रज्ञाचा बदला घ्यायचा आहे.आणि त्यासाठी मी काहीही करेन..! " सचिन पुन्हा आक्रमक झाला.हेमंतला आता मात्र त्याच्या वागण्याचा वैताग येत होता.मात्र मदतीचे आश्वासन दिल्याने त्याला ते पूर्ण करणे रास्त होते.एकीकडे मित्रत्वाच्या नात्याने मदत तर दुसरीकडे न्यायासाठी चुकीचा मार्ग या दोघांमध्ये हेमंत अडकला होता. तरीही यावेळी त्याला सचिनला साथ देणं जास्त महत्वाचं वाटत होत.
" सगळ्यात पहिले शैलेश जाधव च्या कुटुंबियांना भेटावे लागेल.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे..."
" त्यांना का ? " हेमंतने सचिनचे मधेच बोलणे तोडले. सचिन सोफ्यावरून उठून उभा राहिला.
" यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना अडकवण्याचा डाव असणार.आणि याचे कारण म्हणजे जुने वैर किंवा इतर काही वाद असण्याचा मला संशय वाटतो आहे." सचिन विचार करत खिडकीजवळ जाऊन उभा राहत बाहेर पाहू लागला.
" ते काम मंगेश करेल.पण त्यानंतर काय ? " हेमंतही आता सोफ्यावरून उठला.
" त्यांनतर आपल्याला पुण्याला जावं लागेल." सचिन खिडकीबाहेरची नजर न हटवता बोलला.
" आणि तिथे जाऊन काय करणार ? " हेमंतने सचिनजवळ जात विचारले. सचिन त्याच्या पाठमोरा उभा होता.
" निट विचार कर हेमंत...प्रज्ञाचा खून पुण्या जवळच्या एका छोट्या गावात झाला.आणि शैलेशही पुण्याचा.ते लॉकेटही पुण्यातून खरेदी केले गेले. याचा अर्थ जो कोणी खुनी असेल तो पुणे किंवा आजूबाजूला राहणार असावा." सचिनने मान वळवून मागे हेमंत कडे पाहिले.
" पण एका पुराव्यावर ?...आणि तो ही आता काही कामाचा नाही. " हेमंतने वैतागत मान झिडकारली.
" कामाचा आहे. हेमंत तू काहीतरी विसरतोय ! " सचिनने हेमंतला तो काहीतरी विसरत असल्याची जाणीव करून दिली. हेमंतच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उमटले.
" मी काय विसरलोय ? " हेमंत विचारात पडला.
" सीसीटीव्ही कॅमेरा..! " सचिनने मागे वळत हेमंतकडे स्मित करत पाहिले. सचिनच्या बोलण्यावर हेमंत ने आपले दोन्ही हात डोक्याला लावले.
" च्यायला..! हे कसं लक्षात नाही आलं..! " हेमंत स्वतःची कीव करत बोलला.
" तो खुनी नक्कीच सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असणार ! " सचिनच्या चेहऱ्यावरचे स्मित अधिकच गडद झाले. मात्र तो लगेच गंभीर झाला.
" आता मी मागे हटणार नाही..आता त्याचा शोध घेतल्याशिवाय मी राहणार नाही हेमंत. " सचिन पुन्हा मागे वळून खिडकी बाहेर बघत बोलला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते.
" आपण उद्याच पुण्याला निघुया.आता उशीर करण्यात अर्थ नाही."
" ठीक आहे सचिन..तू जे म्हणशील ते करायला मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे.." हेमंतने सचिनच्या पाठीवर विश्वासाने हात ठेवला. मनातून अजूनही तो सचिनच्या विचाराबाबत उत्सुक नव्हताच.पण शेवटी त्याने सचिनला साथ देण्याचे ठरवले होते.
" मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे हेमंत.माझ्या खचलेल्या मनाचा सध्या तूच आधार आहेस." सचिन मागे वळून हेमंतकडे आशेने पाहिले. हेमंतनेही त्याच्याकडे विश्वासाने पाहिले. सचिनने हेमंतला कडकडून मिठी मारली.अचानकपणे मिठी मारल्याने हेमंत जरा दचकलाच.याआधी कधी सचिनने त्याला अशी मिठी मारली असेल आठवत नाही.
" आता ठरले..माझा जीव गेला तरी चालेल..पण प्रज्ञाच्या खुन्याला शोधून संपवनारच..! " हेमंत मिठी सोडवत आत्मविश्वासाने सचिनला वचन देत बोलला. त्याच्या डोळ्यात आता आसवे जमा झाली.सचिनचा त्याच्यावरचा विश्वास पाहून त्याला भावना आवरता आल्या नव्हता. याच भावनेच्या भरात त्याने सचिनला वचन दिले होते , जे पूर्ण करण्यासाठी तो कसलीही पर्वा करणार नव्हता.
" उद्या सकाळी सात वाजता निघुया..तुझी कार घेऊन.बाकी काय ते नंतर सांगतो. " सचिन हेमंतच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला.
" ठीक आहे.येतो मी..तयारी करावी लागेल." हेमंत हाताने डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला. आणि घराबाहेर पडला. जाताना त्याने डायरी आणि लॉकेट तेथेच सोडले.



किशोरी काव्याला आणि तिच्या मुलीला , ध्वनी ला जेवण भरवत होती.समोर सोफ्यावर किशोरीचा पती सारंग हातात रिमोट पकडून समोर चालू असलेला टीव्ही बघण्यात मग्न होता..तसं म्हणलं तर त्याची नजर फक्त टिव्हीकडे होती.मनात मात्र दुसरेच विचार सुरू होते. दारावरच्या बेलच्या आवाजाने त्याचे विचारचक्र थांबले. सोफ्यावरून उठत दरवाज्याजवळ जाऊन त्याने दार उघडले..तर समोर सचिन उभा होता..सचिनला बघून सारंगचा चेहरा उतरला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला.
" ये दादा.असा अचानक ? " किशोरीने सचिनकडे नजर टाकून काव्याला घास भरवत विचारलं.
" हो.काव्याला भेटायला आलोय." सचिन सारंग शेजारी सोफ्यावर जाऊन बसला.
" काव्याची जेवढी काळजी करतो तेवढी कधी तरी स्वतःची पण करत जा." सारंग टीव्ही वरून नजर न हटवता बोलला.
" तिची काळजी नसती तर माझे असे हाल झाले असते का सारंग ? " सचिन शांत आवाजात बोलला.
" सचिन अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्या मनातून वैरी विचार काढून टाक.किशोरीने सांगितले तुझ्या मनात काय चालू आहे ते.." सारंग सचिनकडे नजर टाकत बोलला. सचिन मात्र यावर काही बोलला नाही. त्याचे काव्याकडे लक्ष होते. जेवण चालू असतना ती सारखी सचिनकडे बघत होती.
" जा बाळा , तुझ्या पप्पांकडे. " किशोरी काव्याला मांडीवरून उठवत म्हणाली. तशी काव्या सचिनकडे धावली. सचिनने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवत एक मुका घेतला. तसे काव्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य पसरले.
" निदान काव्याकडे बघून तरी विचार कर. जर तुला काही झालं तर तिला कोण सांभाळेल ? " सारंग काव्याकडे नजर टाकत बोलला. बोलताना तो काळजीत दिसत नव्हता. मात्र गंभीर होता.
" जर मी प्रज्ञाच्या आठवणीतून आलो नाही , तर काव्याला कधीच सांभाळू शकणार नाही. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे. प्रज्ञाच्या खुन्याचा खून ! " सचिनच्या आवाजात दुःख दिसत होते. सारंगने आता नाराजीने तोंड वाकडे केले.
" तू एकदा शांत मनाने विचार कर. अस रागाच्या भरात तू मोठी चूक करशील. " किशोरी सचिनशेजारी बसत काळजीने बोलली.
" मी विचार करूनच हा निर्णय घेतलाय...मला या दुःखातून बाहेर येण्यासाठी दुसरा मार्ग नाहीये किशोरी..." सचिन हतबलतेने बोलला. किशोरीला आता काय बोलावे समजत नव्हते.
" तुला काय वाटत..जर आज प्रज्ञा असती तर , तुझ्या अश्या वागण्याने खुश झाली असती ? नाही ना ? " किशोरी सचिनचा हात हातात घेत म्हणाली.
" ती असती तर आज माझी अशी अवस्था नसती झाली.असा एकही दिवस नाही जेव्हा तिची आठवण येत नाही..रोज रात्री तिच्या आठवणींनी झोप येत नाही. तिच्या आठवणींनी रोज डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अस किती दिवस जगणार मी ? " सचिन काकुळतीला येऊन बोलला.
" आता मी तुला काही बोलणार नाही दादा.पण यात जर तू अडकला तर ? तू पुढचा विचार का करत नाहीये..जी घटना होऊन गेली ती विसरून जा..त्या काव्यासाठी तरी माझं ऐक ! " किशोरी काकुळतीला येऊन सचिनला विनंती करत होती. मात्र सचिनवर याचा काही फरक पडत नव्हता.
" बस्स कर किशोरी , आपण कितीही बोललो तरी तो ऐकणार नाही. करू दे त्याला जे करायचंय. " सारंग रागाने बोलला. सचिनने सोफ्यावरून उठत काव्याला आपल्या कडेवर घेतले.
" किशोरी , मी उद्या पुण्याला चाललोय. अजून थोडे दिवस तुला काव्याला सांभाळावे लागेल." सचिन किशोरीकडे बघत बोलला.
" पुण्याला ? का ? " किशोरी उठून उभी राहिली.
" खुन्याला शोधायला ! " सचिन काव्याला खाली सोडत बोलला. यावर किशोरीने नाराजीनेच त्याच्याकडे पाहिले. सचिनला बोलून काही उपयोग नाही हे किशोरीने ओळखले होते.
" सोबत माझा मित्र हेमंत आहे.किती दिवसांनी येईल सांगू शकत नाही.पण जेव्हा येईल तेव्हा काम पूर्ण करूनच येईल. तोपर्यंत काव्याला सांभाळ , एवढीच विनंती आहे. " सचिन किशोरीला विनंतीच्या सुरात बोलला.
" तिची काळजी तू करू नको. मी आहे त्यासाठी. " किशोरी सचिनवर नाराज झाली होती. मात्र काव्याकडे बघून तिला काळजी वाटत होती.
" हेमंत ! म्हणजे याला पण अडकवणार. स्वतः सोबत दुसऱ्याचे पण आयुष्य बरबाद करणार तू. " सारंग सचिनला उपहासाने बोलला. सचिनने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.
" आपल्या कर्माचे भोग , दुसरं काय." सारंग सोफ्यावरून उठत बोलला. त्याच्या बोलण्याचा अर्थ सचिन आणि किशोरीला काही कळला नाही.
" तुला नेमकं काय म्हणायचं सारंग ? " सचिनने प्रश्नांकित
चेहऱ्याने विचारलं.
" दोन वर्षांपूर्वी तू राहुल सोबत जे केलं..त्याचीच ही परतफेड." सारंग सचिनच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला.
" आता झालं गेलं का उकरून काढतोय सारंग..." किशोरी रागाने म्हणाली.
" यासाठीच , की सचिनला त्याची चूक लक्षात राहावी. तुझ्या त्या प्रज्ञाने माझ्या भावाचेआयुष्य बरबाद केले ! याची शिक्षा तर तिला देव देणारच होता ! " सारंग संतापाने बोलत होता. सारंगच्या बोलण्यावर सचिन चांगलाच संतापला.
" तुला काय म्हणायचंय सारंग..? प्रज्ञाने काय वाईट केले ? काय चुकले तिचे ? राहुल कोणत्या गोष्टीत तुला बरोबर वाटतो ? " सचिन तावातावाने बोलत सारंगच्या अजूनच जवळ जाऊन उभा राहिला. तो संतापाने सारंग कडे बघत होता.
" तुम्ही दोघांनी मिळून जर राहुलला ती जमीन देण्यास विरोध केला नसता ना तर आज त्याची अशी हालत नसती. " सारंग बोलताना दुखवला गेलेला दिसत होता.
" आम्ही जे काही केले ते तुमच्यासाठी चांगले होते सारंग..काय केलं असत त्या छपरी राहुलने ती जमीन घेऊन ? आं...बोल ना काय केलं असत त्याने तिथे..बार बांधून कल्याण केलं असतं ? " सचिन प्रचंड संतापाने मोठ्याने बोलत होता. तो अजूनही सारंग कडे रखरखत्या डोळ्यांनी बघत होता. सारंगचाही आता पारा चढला होता.
" शांत हो दादा. सारंग , आता या गोष्टी वर बोलायची योग्य वेळ नाही. " किशोरी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ती सचिनचा हात धरून त्याला मागे खेचू लागली.
" एक लक्षात ठेव सचिन..राहुलच्या अवस्थेला तू जबाबदार आहे...तुला त्याची परतफेड करावीच लागेल..! " सारंग आता रागाने हातवारे करत बोलला. तो रागाने थरथर कापत होता. त्या दोघांना बघून काव्या आणि ध्वनी घाबरून रडू लागल्या. किशोरी पटकन त्यांना घेऊन आतल्या खोलीत गेली.
" मी ? मी जबाबदर आहे ? मी आणि प्रज्ञा फक्त त्याला चांगला मार्ग दाखवत होतो..जर त्याला ती जागा द्यायला आम्ही विरोध नसता केला..तर आज तू आज पास्तावण्या शिवाय काहीही नसत केलं." सचिनचा आवाज अजूनच वाढला. सारंगने तर रागाने मूठ आवळली. तो सचिनवर धावून जाणार तोच किशोरीने वळत येऊन त्याला अडवले.
" बाजूला हो ! " किशोरी सारंगला सचिनपासून दूर घेऊन गेली.
" सारंग तुला झालंय काय ? का राहुल चा विषय काढतोय आता ? " किशोरी सारंगला बाजूला घेऊन गेली.
" मला दुःख वाटत राहुल साठी.जर या दोघांनी ती जागा राहुलला मिळू नये म्हणून कट रचला नसता..तर आज तो आज भाड्याच्या घरात राहत नसता..दोन वेळच्या जेवणासाठी इतका तळमळला नसता." सारंगला आता संतापाने आणि राहुलच्या काळजीने अश्रू अनावर झाले.
" तू जे समजतोय ते खोट आहे.राहुल तुला सगळं खोट सांगून तुझ्याकडून फक्त पैसे उकळतो.त्याने तुला भ्रमात ठेवलंय सारंग.तो एक नंबर खोटारडा आहे ! " सचिन रागाने थरथरत ओरडला. सारंगचा आता ताबा सुटला. तो सचिनवर हल्ला करायला धावणारच होता. मात्र किशोरीच्या पकडीतून तो सुटला नाही.
" सोड मला किशोरी..आज याला मी सोडणार नाही ! अरे माझ्या भावानी काय केलं होत यांचं ? आं ? " सारंग किशोरीच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता.पण त्याला ते शक्य होत नव्हते.
" दादा , तू निघून जा. ही वाद घालण्याची वेळ नाही दादा..तू जा.." किशोरी रडत सचिनला विनंती करत होती. सचिनलाही असे वाद घालणे बरोबर वाटत नव्हते. मात्र सारंगच्या बोलण्याने तो स्वतःला थांबवू शकला नव्हता.
आता इथे थांबणे योग्य नाही हे त्याच्या लक्षात आले.
" मी जातोय किशोरी.पण एक लक्षात ठेव सारंग , एक दिवस तुला असं वागण्याचा नक्किच मनस्ताप होईल. " सचिनने एक जळजळीत कटाक्ष सारंग कडे टाकला.
" जा निघ..परत आला तर याद राख ! " सारंग सचिनला धमकी देत ओरडला. त्याचे स्वतावर नियंत्रण राहिले नव्हते. सचिन पुन्हा एकदा सारंग कडे रागाने बघत तावातावाने निघून गेला.



सचिन सकाळी लवकर उठून आवरायला लागला होता. सकाळी सात वाजता निघण्याचे त्याचे लक्ष्य होते. त्यादृष्टीने तो घाईघाईने आवरत होता. सगळं आवरून झाल्यावर तो चहाचा कप घेऊन हॉल मधील सोफ्यावर बसला. काय राहिले तर नाही ना याची उजळणी डोक्यात चालू होती. तसा त्याचा फोन वाजला. अपेक्षेप्रमाणे हेमंत होता.
" बोल "
" पाच मिनिटात तुझ्या घराजवळ येतोय. आवरून झालंय ना ? " हेमंत बोलताना फार उत्साहात दिसत होता.
" हो तयार आहे. ये तू." सचिनने फोन ठेवला. चहा संपवत त्याने आतल्या रूममधून दोन पाठीवरील बॅग्स आणल्या. आणि प्रत्येक कप्पा उघडून काही राहील तर नाही बघू लागला. सर्व घेतलं आहे याची खात्री करून त्याने एक बॅग पाठीवर अडकवली आणि दुसरी हातात घेऊन घराबाहेर आला. दार लॉक करून तो अंगणात थोडा वेळ उभा राहिला. हवेत गारवा जाणवत असल्याने त्याने जाडसर जॅकेट अंगात टाकलेले होते. सकाळचे असे शांत वातावरण त्याला सुखावून टाकत होते. कदाचित तो कोणत्या कामासाठी चालला आहे याचे त्याला भानच राहिले नसावे. हेमंतच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज कानावर पडताच त्याने त्या दिशेने पाहिले.
" चल बस..." हेमंतने कारच्या अर्धवट उघडलेल्या खिडकीतून सचिनला आवाज दिला. सचिनने चालत कारजवळ जात मागची डिक्की उघडत हातातली आणि पाठीवरील बॅग त्यात हळूच ठेवली. आणि पुढच्या सीटचे दार उघडून हेमंतच्या शेजारी बसला.
" च्यायला , मी रेनकोट घेऊन आलोय आणि तू गरम जॅकेट. " हेमंत सचिनकडे बघून हसला. सचिन मात्र दुसऱ्याच विचारात गुंग होता. हेमंत त्याच्याकडेच बघत होता. रात्रभर झोपला नाही वाटत. हेमंतच्या मनात विचार आला. हेमंतने गाडी चालू केली. त्याआधी स्पीकर वर त्याच्या आवडीचे रोमँटिक गाणे लावायला विसरला नाही. त्याची सवयच होती ती. तो एक तवेरा ड्रायव्हर. मुंबईच्या आसपास भाडं घेऊन जाण्याचे त्याचे काम होते. या प्रवासात त्याला संगीताशिवाय करमायचे नाही.


काहीवेळ गेल्यानंतर सचिन विचारातून बाहेर आला.
" काय झालं रे. कसला विचार करतोय ? रात्रभर विचार करून थकतो का नाही ? " हेमंत किंचित हसत मात्र गंभीरतेने बोलला.
" ते काल..." सचिनला वाक्य पूर्ण केले गेले नाही.
" काल काय ? " हेमंतने गाडी चालवत विचारले.
" सारंग सोबत भांडण झालं. " सचिन जड आवाजात बोलला.
" सारंग सोबत ? कशावरून ? " हेमांतन गंभीर होत विचारले.
" जुनी गोष्ट आहे हेमंत..." सचिन सांगायचे टाळत होता.
" म्हणजे मला पण नाही सांगणार ? बोलल्याने मन हलकं होत रे. अश्या किती गोष्टी मनात ठेवणार." हेमंत काळजीने बोलला. सचिन मात्र शांत होता. आता तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे ओळखून हेमंतही शांत बसला.


हेमंत आणि सचिन एका छोट्या हॉटेलवर चहा घेण्यासाठी थांबले होते. सचिन आजूनही विचारात गुंतलेला होता. हेमंत चहाचे घोट घेत हॉटेल आणि आजूबाजूचे निरीक्षण करत होता. हॉटेल मध्ये एका बाजूला काउंटरवर ऑर्डर घेण्याचं काम चालू होतं. तर आतल्या एका छोट्या जागेत गरमागरम नाश्ता बनवण्याचं काम चालू होतं. हॉटेलमध्ये जवळपास पंधरा - वीस जणांना बसण्याची जागा होती. तर बाहेर दोन छोटे टेबल ठेवले होते. वातावरणात गारवा असल्याने हेमंतने बाहेरची जागा निवडली होती. त्याला असे वातावरण प्रचंड आवडायचे. आणि त्यात गरम चहा म्हणल्यावर तर विचारायला नको. मात्र त्याला सचिनकडे बघून चिंता वाटत होती.
" पुण्याला पोहोचायला अजून दोन - तीन तास तरी लागतील. पुढचा काय प्लॅन ? " सचिनला बोलतं करण्यासाठी हेमंत बोलला.
" सर्वात पहिले शॉप वर जाऊन सीसीटीव्ही फुटेज बघणे ! तो सर्वात मोठा पुरावा आहे. " सचिन चहाचा घोट घेत बोलला.
" मला तरी वाटते की सीसीटीव्ही बघून त्या माणसाला शोधणं अवघड जाईल." हेमंत बारीक आवाजात बोलला.
" अवघड आहे पण अशक्य नाही ! " सचिनने आत्मविश्वास दाखवला.
तो दोघे बोलत असतानाच एक तरुण मुलगा ते बसलेल्या टेबलच्या समोरील टेबलवर येऊन बसला. तो हेमंतच्या समोरच बसल्याने हेमंतचे त्याच्याकडे लक्ष गेले. मध्यम उंची , सरळ चेहरा , बारीक दाढी आणि केसांच्या स्टाईलने तो तरुण अगदी फिल्मी हीरोसारखा भासत होता. अंगात महागडे जॅकेट त्याच्यावर जास्तच शोभून दिसते होते.
हेमंत मात्र विचारात पडला. याला कुठेतरी पहिल्यासारखे का वाटतेय ? हिरो तर नसेल एखादा ?
" खुनी नक्कीच सराईत गुन्हेगार असणार. त्याशिवाय त्याने इतक्या चपळाईने प्रज्ञावर हल्ला केला नसता आणि महत्वाचे म्हणजे त्याने सगळं प्लॅन नुसार केलं असणार. शैलेश जाधव किंवा त्याच्या घरातील कोणाला तरी यात अडकवण्याचा प्लॅन ! " सचिनने बोलून हेमंतकडे पाहिले. त्याचे लक्ष नव्हतेच. कसल्यातरी विचारात तो गढला होता.
" हेमंत " सचिनच्या आवाजाने हेमंत भानावर आला.
" अं ?... काय ?... " हेमंतने प्रश्नांकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.
" तू कधीपासून एवढा विचार करायला लागला ? काय झालं ? " सचिन नाराजीने म्हणाला.
" नाही...काही नाही..." हेमंतने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
" चल निघुया. " सचिन खुर्चीतुन उठत बिल देण्यासाठी गेला. हेमंत उठून गाडीकडे जाऊ लागला.
" थांबा.." मागून आलेल्या आवाजाने हेमंत थांबला. त्याने मागे वळून पाहिले. तो मघाचाच तरुण हेमंतकडे चालत आला.
" आपण..हेमंत देशमुख ? " त्या तरुणाने हसऱ्या चेहऱ्याने विचारलं.
" हो..मी हेमंत देशमुख. आपण ? " हेमंतच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
" आपण ओळखलं नाही ? आपल्याला एकदा प्रवासात भेटलो होतो. "
" माफ करा , माझ्या लक्षात नाही. पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय. " हेमंत बोलला. तेवढयात सचिन तेथे आला. त्याने त्या तरुणावर एक नजर टाकली. त्यानेही सचिनकडे हसून पाहिले. सचिनने प्रश्नार्थक नजरेने हेमंतकडे पाहिले.
" मी दिनेश घाटगे. " त्या तरुणाने आपला हात मिळवण्यासाठी पुढं केला. पाहिले सचिन आणि नंतर हेमंत ने हात मिळवला.
" मी काही दिवसांपूर्वी यांच्या गाडीने नाशिक वरून मुंबईला आलो होतो. कदाचित यांच्या लक्षात नाही. " दिनेश पहिले हेमंतकडे आणि नंतर सचिनकडे पाहून बोलला.
" रोज अनेक लोक भेटतात , त्यामुळे कस लक्षात राहणार ? " हेमंत बोलला.
" आपली हरकत नसेल तर , मी आपल्या गाडीने येऊ शकतो ? " दिनेशने विनंती केली.
" हो चालेल " हेमंत हसत बोलला.
" पण आपल्याला जायचे कुठे आहे ? आम्ही तर पुण्याला चाललोय " सचिनने त्याला विचारले.
" मलाही पुण्यालाच जायचे आहे. तिकडे काम आहे. " दिनेश आपल्या चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवत बोलला.
" ठीक आहे चला. " सचिन घड्याळात वेळ पाहत बोलला.
" हो " म्हणत दिनेश खुर्चीवर ठेवलेली बॅग आणण्यासाठी गेला. तोपर्यंत हेमंत आणि सचिन चालत गाडीजवळ आले.
" पोरगा चांगल्या घरचा दिसतोय..यांच्याकडे गाडी नाही याचे आश्चर्य आहे ! " सचिन लांब दिनेशवर एक नजर टाकून बोलला.
" काय माहीत ? नंतर गप्पा मारू तेव्हा समजेल. " हेमंत गाडीत बसत बोलला. सचिनची त्याच्या बाजूच्या सीटवर बसला.
" बॅग डिक्कीत टाक. " हेमंत बॅग घेऊन येणाऱ्या दिनेशला बोलला. त्याने बॅग डिक्कीत टाकली आणि मागच्या सीटवर बसला. हेमंत गाडी चालू केली. आणि पुढच्या प्रवासाला निघाले.
" आपण नेमकं कुठं राहता ? नाशिक की पुणे ? " हेमंतने गाडी चालवत दिनेशला विचारलं.
" नाशिकला. पण अधूनमधून कंपनीच्या कामासाठी यावं लागत इकडे. " दिनेश मघासारखाच हसत बोलला.
" च्यायला...एक तुम्ही आहात जे नेहमी हसत बोलतात. आणि एक आमचा मित्र ज्याला हसण्यासाठी सांगावं लागत. " हेमंत सचिनची खेचत गमतीने बोलला. यावर दिनेश मोठ्याने हसला. सचिन मात्र गंभीर होता. पुढे काय आणि कसं करायचं याचा विचार त्याच्या डोक्यात चालू होता.
" आपण कशासाठी चाललात पुण्याला ? " दिनेशच्या प्रश्नावर हेमंत गंभीर झाला.
" अरे काही नाही. एका मित्राला भेटायला चाललोय. साला खूप दिवसांचा बोलावतोय. म्हणलं जाऊया. " हेमंतने उडवाउडवीच उत्तर दिलं.
" आणि हो. मला दिनेश किंवा दिनू म्हणालात तरी चालेल." दिनेश हसत म्हणाला.
" ओके मित्रा. " हेमंतही हसला. सचिनला एवढं शांत बघून दिनेश मात्र विचारात पडला. एवढा शांत आहे म्हणल्यावर काहीतरी गंभीर प्रकरण आहे , हे त्याच्या लक्षात आले. तो मात्र गप्पा मारतच राहिला.


दिनेश आणि हेमंतच्या बराच वेळ गप्पा सुरू होत्या. सचिनही अधून मधून त्यांच्या गप्पांत सामील झाला होता. हे बघून दिनेशला जरा बरे वाटले. इतक्या वेळात बाहेर बारीक पाऊस सुरू झालेला होता. जस जस पुढं जाईल तसा पाऊस वाढतच होता. काही वेळाने पावसाने तर अचानकच जोराचा वेग पकडला. अचानक पाऊस वाढल्याने हेमंतला पुढचा रस्ता दिसेनासा झाला. एकत्र रस्त्यावर इतर गाड्याही जास्त होत्या. त्यामुळे त्याला गाडी चालवणे अवघड वाटू लागले.
" आपण आता थांबायला हवं हेमंत..इतक्या पावसात गाडी चालवणे शक्य नाही. " सचिन खिडकीतून पावसाचा वाढलेला वेग बघत म्हणाला.
" हा यार..हा पाऊस अचानकच कोसळायला लागलाय.." हेमंत समोर बघत म्हणाला.
" इथे काही अंतरावर माझ्या मित्राचे एक हॉटेल आहे. तिथे थांबुया. " दिनेश दोघांचे बोलणे ऐकून बोलला.
" हो ठीक आहे. " सचिनने त्याला सहमती दर्शवली.
दिनेश जसा रास्ता सांगेल त्या रस्त्याने हेमंत गाडी चालवत होता. पावसाने आता आणखीनच रुद्रावतार धारण केला. समोर फक्त पांढऱ्या रंगाचे दृश्य दिसत होते. हेमंतनी कसेबसे करत गाडी दिनेशने सांगितलेल्या हॉटेलच्या मेन इंटरेन्स मधून आत आणली. गाडी पार्किंगमध्ये उभी केल्यावर हेमंतने सुटकेचा श्वास सोडला.
" हुश्श !...सुटलो बाबा या पावसाच्या तावडीतून..." हेमंत गाडीतून उतरत बोलला.
" आपल्यासारखा कसलेला ड्रायव्हर इतका दमला , म्हणजे विचार करा...हा पाऊस किती असाधारण आहे ते.." दिनेश गाडीतून उतरत बोलला. आणि मागे डिक्कीतून बॅग काढण्यासाठी गेला.
" सचिन , आपल्याला पाऊस जाईपर्यंत इथेच थांबावे लागेल. पाऊस गेल्याशिवाय निघणे धोकादायक आहे. " हेमंत सचिनकडे पाहून बोलला.
" हो , पण लवकर निघता आले तर बरच होईल. " सचिन मागे डिक्कीकडे जात बोलला. सचिन आणि दिनेश डिक्कीतून बॅग काढत होते. हेमंत आजूबाजूला बघत होता. पार्किंगमध्ये त्यांच्या गाडीशिवाय एक फोर व्हीलर सोडली तर दुसरी कोणतीही गाडी नव्हती. पार्किंगच्या बाजूलाच हॉटेलमध्ये जाण्याचा रस्ता होता. मोठे आलिशान दिसणारे ते हॉटेल हेमंतला बाहेरूनच प्रचंड आवडले होते. आतून हॉटेल कसे असेल याची कल्पना तो मनोमन करू लागला.
" चला. मध्ये जाऊया. " दिनेशच्या आवाजाने हेमंत कल्पनेतून बाहेर आला. तिघेही आपल्या बॅग्स घेऊन हॉटेलमधे जाऊ लागले. मध्ये जाण्याआधी सचिनने हॉटेल च्या नावावर नजर टाकली. ' सुरेश रेस्टॉरंट अँड लॉज ' वर सुवर्णाक्षरात नाव लिहिलेले होते. तिघेही आत शिरले. आत उजव्या बाजूला रिसेप्शन तर डाव्या बाजूला काही रूम्स आणि किचन होते. समोरच एक जिना जो वरच्या रुम्सपर्यंत जात होता. सकाळची वेळ असल्याने काही गर्दी नव्हती. सगळीकडे अजून साफसफाईचेच काम चालू होते. हेमंत तर हॉटेलची सुंदरता बघण्यात मग्न होता.
" इकडे या. " दिनेश दोघांना घेऊन रिसेप्शन वर आला.
" येस सर , मी आपली काय मदत करू शकते ? " ते जवळ येताच रिसेप्शनिस्ट मोठ्या अदबीने म्हणाली.
" मी विनीत कुलकर्णी यांचा जवळचा मित्र. कदाचित आपण मला ओळखत नाहीत. मी नेहमी येत असतो इकडे. " दिनेशच्या मनमोहक हास्याने ती जरा शरमलीच.
" माफ करा. मला माहित नाही...मी नवीन आहे इकडे. " रिसेप्शनिस्ट लाजतच बोलली.
" ओके. नो प्रॉब्लेम. पण मला माझ्या नेहमीच्या रूमची चावी द्या. रूम नंबर ९. " दिनेश चेहऱ्यावर हास्य कायम ठेवत बोलला.
" वाटलं तर तुम्ही बेलबॉय कडून कम्फर्म करू शकता. मी विनीत यांचा मित्र आहे ते. तोही मला ओळखतो. " दिनेश एकाच बेलबॉय कडे हात दाखवत बोलला. आणि हलकेच हसला.
" न..नाही , त्याची गरज नाही. " रिसेप्शनिस्ट अधिकच शरमली. तिने रूम नंबर ९ ची चावी दिनेशच्या हातात सोपवली.
" चला पहिले फ्रेश होऊ आणि मग नाश्त्याच बघू. " दिनेश हॉटेलची सुंदरता बघण्यात मग्न असलेल्या हेमंत आणि बाहेर पाऊस बघणाऱ्या सचिनला म्हणाला. दिनेशच्या ओळखीचा बेलबॉय घाईघाईत त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या हातातून बॅग्स घेऊन त्यांना रूमकडे घेऊन गेला.


हेमंत आणि सचिन रूममधील खिडकी शेजारी उभे राहून कोसळणारा पाऊस बघत होते. खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याने दोघेही मनातून खुश होत होते. समोर पावसाने जणू पांढऱ्या रंगाची चादर पसरली होती. त्यावर काळ्याकुट्ट अभाळाने आपले साम्राज्य विस्तारले होते.
आणि आजूबाजूने सुंदरता वाढवणारी हिरवीगार झाडे. आणि रस्त्यावर दिसणारी वाहने. असे मनमोहक दृश्याने दोघेही आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हेच विसरून गेले असावे. दारावरच्या बेलच्या आवाजाने दोघांच्या निसर्गाची किमया बघण्याच्या कार्यक्रमात बाधा आणली. सचिनने हेमंत कडे पाहिले तसा त्याने जाऊन दार उघडले. बेलबॉय हातात ऑर्डर केलेले पदार्थ घेऊन मोठ्या अदबीने आत शिरला. आणि तेच टेबलवर ठेऊन तितक्याच अदबीने निघून गेला. नाश्त्याचा आणि कॉफीचा सुवास नाकात शिरताच हेमंतच्या तोंडाला पाणी सुटले.
" हेमंत , मला वाटत नाही आपण आज इतक्या सहजासहजी पुण्याला पोहोचू शकू. " सचिन बेडवर येऊन बसला.
" तेच वाटतय. आता सव्वा दहा वाजलेत. " हेमंत हातातील घड्याळ बघत बोलला.
" जर बारा पर्यंत निघालो तरच चांगलं. नाहीतर आपले काम होता होता रात्र होईल. " हेमंत बेडवर त्याच्याजवळ बसला.
" एक विचारू ? " सचिनने परवानगी मागितली.
" अरे विचार ना मग. त्यात काय एवढा विचारतो. " हेमंतने हसत परवानगी दिली.
" तुला या दिनेश वर भरोसा वाटतो ? " सचिनने प्रश्न केला.
" सध्या तरी भरवश्याचा वाटतो आहे. मनाने चांगला वाटलं मला. तुला काय वाटतं ? " हेमंत ने आपली बाजू मांडत प्रतिप्रश्न केला.
" चांगला वाटतोय. पण काही गोष्टी खटकतायत. " सचिन शंकीत मुद्रेने बोलला.
" कोणत्या गोष्टी ? " हेमंतने विचारलं. यावर सचिन काही बोलणार तोच बाथरूमच्या आवाजाने बोलायचा थांबला.दिनेश टॉवेलने अंग पुसत बाहेर आला.
" अरे तुम्ही सुरू का नाही केलं ? " दिनेशने टेबलवर ठेवलेल्या नाश्त्याकडे पाहून विचारलं.
" तुझीच वाट बघत होतो." हेमंत बोलला.
" अच्छा , म्हणजे तुम्ही मला मित्र म्हणून स्वीकारले तर..." दिनेश आपल्या बागेतून कपडे बाहेर काढत बोलला.
" हो कधीच. " हेमंत हसून बोलला.
सचिन उठून नाश्त्याला बसायची तयारी करू लागला. तोपर्यंत हेमंत फ्रेश होण्यास गेला. सचिन आपली प्लेट घेऊन बेडवर बसला. दिनेश त्याच्या समोर खुर्चीवर बसला.
" आपण इकडे नेहमी येत वाटत. " सचिनने बोलायला सुरुवात केली. खर तर त्याला दिनेश आपल्याला काही मदत करू शकतो का ते पहायचे होते.
" हो , जेव्हा मुंबई वरून पुण्याला जावं लागतं तेव्हा येतो इकडे. माझा मित्र विनीतही बोलावत असतो अधेमधे. " दिनेश खायला सुरू करत बोलला.
" मग आपली पुण्यात ही फार ओळख असणार.." सचिन अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागला.
" जास्त नाही..फक्त कामाशी संबंधित लोकांशी. " दिनेश घास चावत बोलला. तेवढ्यात हेमंत फ्रेश होऊन बाहेर आला. आणि आवरून त्यांच्यासोबत नाश्ता खाण्यात सामील झाला.
" आपण बोलताना सांगितलं नाहीत , की आपण नेमकं काय काम करता ते. " हेमंत घास गिळत बोलला.
" मी ब्युटी प्रॉडक्ट्स विकण्याचे काम करतो. चांगले काम आहे. फक्त प्रवास जास्त करावा लागतो. " दिनेश नेहमीचं हसू कायम ठेवत बोलला.
" चांगलं आहे की.." हेमंतने हसत त्याच्याकडे पाहिले.
" आपण कोणत्या मित्राकडे चालला आहात ? कदाचित मी ओळखत ही असेल." दिनेशने विचारले.
" मंगेश पाटील. माझा जवळच मित्र आहे. शाळेतही आम्ही बरोबरच होतो. बऱ्याच दिवसांपासून भेट झाली नाही , म्हणून निघालो भेटायला. " हेमंतने माहिती पुरवली.
" अच्छा..माझ्यातरी ओळखीचा नाहीये. पण भेटलो तर होईलच ओळख." दिनेश स्मित करत बोलला.थोडावेळ कोणीच काही बोलले नाही. सचिन आणि हेमंत ने आपला नाश्ता संपवला. सचिन पुन्हा विचारात गढून गेला. दिनेश त्याच्याकडेच बघत होता. याच्या मनात नक्कीच कसलेतरी दुःख असणार , हे दिनेशला समजले. मात्र नेमके कसले दुःख कसला तणाव आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते.
" माफ करा. पण आपण फार शांत , कसल्यातरी तणावात यासल्यासारखे दिसता. नेहमी कोणत्यातरी विचारात असल्यासारखे.." दिनेश सचिनकडे बघून बोलला. थोडावेळ सचिन काहीच बोलला नाही.
" हो..प्रत्येकाच्या जीवनात असतातच अशा गोष्टी. तशाच माझ्याही आहेत.." काही वेळाने सचिन बोलला. मात्र त्याने थेट उत्तर द्यायचे टाळले.
" ते तर आहेच. पण बोलल्याने मन हलकं होत. आणि तुम्ही मला मित्र मानलेच आहे तर , तुम्ही बिनधास्तपणे सांगू शकता. मित्र म्हणून मी शक्य ती मदत करेन. " दिनेश मदत करण्याच्या हेतूने बोलला. सचिनने हळूच हेमंतकडे पाहिले. हेमंतने मानेनेच " सांगून टाक " असा इशारा केला.
सचिन मात्र गप्प होता.
" आपली हरकत असेल तर राहुद्या. मी फक्त मदतीच्या हेतूने बोललो. " सचिन काही सांगण्याच्या बाजूने नाही हे पाहून दिनेश बोलला.
" मला तर वाटते सांगून टाक सचिन..दिनेश आपल्याला नक्कीच काहीतरी मदत करेल. " हेमंतने दिनेशवर विश्वास दाखवला. ते पाहून दिनेशला मनातून चांगले वाटले.
" ठीक आहे. आपल्याला मित्र म्हणून सांगतो. माझ्या मनातलं दुःख..यातना..हे फक्त एक मित्रच समजू शकतो." सचिन दुखी आवाजात बोलला. दिनेश सचिनच्या मनातील दुःख काय आहे ? हे समजून घेण्यासाठी आतुर दिसत होता. सचिनच्या मनातील दुःख कमी व्हावे एवढीच त्याची मनातील भावना होती. बोलण्याआधी सचिनने आपल्या पँटच्या मागील खिशातून आपले पाकीट काढले. हळूच पाकीट उघडत त्याने त्यातून एक फोटो बाहेर काढला. प्रज्ञाचा. तिचा फोटो पाहून सचिनचे मन भरून आले. त्याने हळूच तो फोटो दिनेश समोर धरला.
" ही माझी पत्नी..प्रज्ञा.." सचिनचा आवाज आता जड झाला. दिनेशने तो फोटो हातात घेतला. सुंदर चेहरा आणि त्यावर निखळ हसू. डोळ्यात प्रेमळ भाव. जे तिच्या मनाचा चांगुलपणा स्पष्ट करत होते. तिचा तो सुंदर फोटो पाहून दिनेश काही वेळ हरवलाच.
" खूप सुंदर. इतके निखळ हसू ! हाच तर खरा दागिना आहे. " दिनेश प्रज्ञाचे हास्य पाहून नकळत बोलला. तिचे हसू पाहून काहीवेळ त्याला आरशात पाहिल्यासारखेच वाटले.
" हीचा खून झालाय ! " हेमंत जड आवाजात बोलला.
" काय ?.." दिनेशला ते ऐकून धक्काच बसला. हेमंतच्या बोलण्यावर त्याला काही वेळ विश्वासच बसेना.
" इतक्या सुंदर , हसमुख स्त्रीचा कोणी कसा खून करू शकतो !..लाज वाटली पाहिजे अशा माणसांना.." दिनेश कळकळीने बोलला. तो अस्वस्थ झाला.
" हिच्या खुन्याला शोधण्यासाठीच आम्ही पुण्याला चाललो होतो. त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्यायची हे आम्ही ठरवलेय. " हेमंत म्हणाला.
" शिक्षा ? अशा निर्दयी माणसाला पकडून फाशीवर लटकवले पाहिजे.." दिनेश जास्तच अस्वस्थ झाला होता. एका अनोळखी स्त्रीसाठी त्याला खूप वाईट वाटत होते.
" मी संपवणार त्याला.! जिथे सापडेल तिथे.! " सचिन व्याकुळतेने बोलला. त्याच्या डोळ्यात प्रज्ञाच्या आठवणींचे अश्रू जमा झाले.
" सचिन..तुला या कामात मदत करायला मी तयार आहे. जे मी करू शकेल ते मी करेल. " दिनेश मदतीचे आश्वासन देत बोलला.
" माहीत नाही का पण आपल्या पत्नीकडे बघून मला आपलंसं वाटतय...एक बहीण समजून मी तिला न्याय मिळवून देईल." दिनेशचेही आता मन भरून आले होते.
" तुझे फार उपकार होतील मित्रा. जोपर्यंत तिचा खुनी सापडत नाही , तोपर्यंत सचिन या दुःखातून बाहेर येऊ शकणार नाही. " हेमंत उपकाराच्या भावनेने बोलला.
" मैत्रीत कसले उपकार हेमंत..आपला मित्र संकटात असताना त्याला मदत करणे हे एक कर्तव्य आहे. तेच मी पार पडतोय. " हेमंत विश्वासाने दोघांकडे बघत बोलला.
" खरंच दिनेश , या सगळ्यातून बाहेर यायला मला तुझी आणि हेमंतची साथ हवी आहे. त्याशिवाय मी काही करू शकत नाही. " सचिन डोळ्यातील पाणी पुसत बोलला.
" तू फक्त बोल मित्रा. वेळ आली तर जगातला कोपरा कोपरा पिंजून काढेल त्या नराधमाला शोधायला.." दिनेशने खुर्चीतून उठत सचिनच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवला.
" त्यासाठी पुण्याला पोहोचणे गरजेचे आहे. तिकडेच पुरावा मिळेल. " हेमंत म्हणाला.
" आपल्याला का वाटते की तो पुण्याचा असेल ? " दिनेश खिडकीजवळ जात बोलला. आणि भिंतीला टेकून उभा राहत दोघांकडे पाहू लागला. ते दोघे त्याच्या पाठमोरे बसलेले होते.
" लॉकेट..प्रज्ञाचा खून झाला त्यावेळी खुन्याचे लॉकेट तेथेच पडले होते. त्यावरून माझा मित्र मंगेशने तपास केला तर समजले की हे लॉकेट शैलेश जाधव नावाच्या एका मृत व्यक्तीच्या नावावर आहे ! " हेमंत बोलला.
" काय ? मृत व्यक्तीच्या नावावर लॉकेट ? म्हणजे जो खुनी आहे तो मृत झाला आहे ? " दिनेशला अजून एक धक्का बसला. त्याला काही समजेनासे झाले.
" नाही दिनेश..शैलेश जाधवला जाऊन सहा महिने झालेत. आणि प्रज्ञाचा खून दोन महिन्यांपूर्वी. " सचिन उठून उभा राहिला.
" पण मग लॉकेट त्याच्या नावाने कस ? " दिनेश आता बुचकळ्यात पडला. सचिन त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला.
" ते खुन्याने मुद्दाम केलं असणार.. कदाचित शैलेश जाधवला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाला तरी फसवायला ! " सचिन बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघून बोलला. दिनेशने वर बघत एक मोठा श्वास सोडला.
" म्हणजे खुन्याला एकतर माहीत नसणार की शैलेश मरण पावला आहे. किंवा तू म्हणतो ते खरे असणार. " दिनेश सचिनकडे नजर टाकून बोलला.
" नक्कीच " सचिनने त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली.
" पण आता पुढं काय करायचं. जर शैलेश जाधव या जगात नाही तर.." दिनेशला काही सुचत नव्हते.
" सीसीटीव्ही फुटेज ! " सचिन शांततेत बोलला.
" ज्या दुकानातून त्याने लॉकेट खरेदी केले. तेथील सीसीटीव्ही मध्ये तो नक्कीच दिसणार. " हेमंत देखील उठून त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला.
" बरोबर. पण जर खुनी इतका शातीर असणार की त्याने मृत व्यक्तीच्या नावावर लॉकेट खरेदी केले , तर त्याने सीसीटीव्ही बाबत खबरदारी नक्कीच घेतली असणार. " दिनेश विचार करत बोलला.
" काही ना काही पुरावा मिळेलच दिनेश...गुन्हेगार कितीही मोठा असला तरी तो पुरावा सोडतोच. ते लॉकेट त्याचेच एक उदाहरण.." सचिन बाहेर बघत बोलला. ते तिघेही कसल्यातरी विचारात गढले. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज सोडला तर इतर कसलाही आवाज आता रूममध्ये नव्हता. काहीवेळ शांततेत गेल्यावर दिनेशने शांततेचा भंग केला.
" प्रज्ञाचा खून कुठे झाला सचिन ? " दिनेशने हळू आवाजात सचिनला विचारले.
" पुण्याजवळच्या एका गावात.." सचिनने आपली खिडकीबाहेरची नजर न हलवता उत्तर दिले.
" मी तिच्यासोबत असूनही तिला वाचवू शकलो नाही. याची मला जन्मभर खंत राहील. " सचिन दुखी होत बोलला. तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उमटू लागला.
" नेमकं काय घडलं होत सचिन..त्या रात्री नेमकं काय झालं ? तू आजपर्यंत सांगितलेलं नाही..मनात किती दिवस ठेवणार ती वाईट आठवण..मन मोकळं कर." हेमंत गंभीर होत बोलला. त्याच्या बोलण्यात काळजी जाणवत होती. सचिनसमोर ती काळरात्र पुन्हा तरळू लागली. आजपर्यंत त्याने त्या रात्रीबद्दल कोणाला सांगितले नव्हते. त्याची तशी कधी हिंमत झाली नाही. ती रात्र आठवली की त्याचे अंग थरथर कापत असे. भीतीने मन कापत असे.
" सचिन..हेमंत बरोबर बोलतोय..नेमकं काय घडलं होत ते सांगून मन मोकळं कर. " दिनेशने हेमंतच्या बोलण्याला दुजोरा दिला. सचिनने खिडकीत आपले दोन्ही हात टेकले. आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत सांगू लागला.


सचिन आपली टू व्हीलर गाडी पुण्याच्या रस्त्याने पळवत होता. आधीच उशीर झाल्याने तो घाईत होता. मागे प्रज्ञा काव्याला पकडून बसलेली होती. मधेच काव्या रडू लागल्याने प्रज्ञाने सचिनला थांबायला सांगितले. सचिनने एका रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली.
" मला वाटते हिला पाणी प्यायचे असेल. " प्रज्ञा काव्याला कडेवर घेत गाडीवरून उतरली. प्रज्ञाने डिक्कीतून पाण्याची बोटल बाहेर काढली. मात्र त्यात घोटभरच पाणी शिल्लक होते.
" पाणी संपले आहे सचिन..आजूबाजूला पाणी मिळते का पहावे लागेल. " प्रज्ञा उरलेले पाणी बघून बोलली. सचिन गाडीवरून खाली उतरला.
" आता कुठे मिळेल पाणी.." सचिन आजूबाजूला पाहू लागला. रस्त्यावरुन एखाद दुसरेच वाहन जात होते. रस्ता ओसाड त्यात दूरपर्यंत घर किंवा वस्ती दिसत नव्हती. तेवढ्यात प्रज्ञा ला एक गावकरी माणूस दुरून येताना दिसला. काव्या आता जास्तच रडू लागली होती. तिला पाहून कोणाकडून तरी मदत मागणे गरजेचे आहे हे सचिनला जाणवले.
" त्यांना विचारुया का ? " प्रज्ञा त्या लांबून येणाऱ्या गावकरी कडे बघून म्हणाली.
" विचारून बघूया. "
" काका.." प्रज्ञाने त्या गावकरील थांबवले. तसे त्या गावकऱ्याने थांबून त्यांच्याकडे पाहिले.
" इकडे कुठे पाणी मिळेल का ? " प्रज्ञाने विचारले.
" पाणी..व्हय मिळलं की..पण गावात जावं लागलं. " तो गावकरी गावाकडील भाषेत बोलला.
" गाव किती लांब आहे इथून ? " सचिनने विचारलं.
" नजीकच आहे की..या पायवाटानं जा..पाच मिनिटात पोहोचतालं.." गावकरी बाजूच्या एका पायवाटेकडे हात दाखवत म्हणाला.
" ठीक आहे. धन्यवाद. " प्रज्ञा त्यांचे आभार मानत म्हणाली.
तो गावकरी निघून गेला. काव्या अजूनही रडतच होती. लवकर गावात जाऊन पाणी घ्यायला हवे , या विचाराने ते गाडीवरून निघाले. गावात गेल्यावर ते एका घरापाशी थांबले. बाहेर एक वृद्ध महिला बसली होती. प्रज्ञाने त्यांच्याकडून पाणी त्यांचे आभार व्यक्त केले. त्या महिलेने काव्याकडे पाहून काही बिस्किटे आणि इतर काही खाण्याचे सामान ही पुरवले. प्रज्ञा आणि सचिन दोघांनाही हे पाहून चांगले वाटले. जायला उशीर होईल म्हणून ते लगेच गावातून निघाले.

मघाच्याच पायवाटेने जात सचिनने रस्त्यावर गाडी आणली. आणि गाडीचा वेग वाढवला. जसा त्याने गाड़ीचा वेग वाढवला तसे समोरून एक कार जोराच्या वेगाने येताना सचिनला दिसली. ती गाडी साईडने येत होती. त्यामुळे बाजूच्या मोकळ्या रस्त्यावरून निघून जाईल असे सचिनला वाटले. मात्र ती कार जोराच्या वेगाने त्यांच्याच दिशेने धावत येत होती. ते पाहून सचिन काही वेळ डगमगला. त्याने पटकन गाडीचा वेग कमी केला. मात्र ती कार अधिकच जोराच्या वेगाने समोरून येऊ लागली ! हे प्रज्ञाच्या लक्षात येताच तीही आता प्रचंड घाबरली. आता ती कार जोरात येऊन सचिनच्या गाडीला धडकणार... तेवढ्यात....
सचिनने प्रसंगावधान दाखवत पटकन गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला वळवत रस्त्याच्या कडेला नेली..त्याची गाडी बाजूच्या झाडावर धडकणार तोच त्याने जोरात ब्रेक दाबला. इतकं सगळं घडे पर्यंत ती कार विजेच्या वेगाने त्यांना चाटून गेली. सचिनने त्या गाडीच्या दिशेने पाहिले , विजेच्या वेगाने पळत ती गाडी दिसेनाशी झाली.जोराचा ब्रेक दाबल्याने प्रज्ञा पडता पडता बचावलीच. झालेल्या प्रसंगाने काव्या रडायला लागली. प्रज्ञा काव्याला घेऊन गाडीवरून उतरून रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. ती मनातून प्रचंड घाबरली होती. तीने हमसून हमसून रडणाऱ्या काव्याला आपल्या छातीजवळ कवटाळले. सचिन ही घाबरघुबरा झाला होता. त्याचे अंग घामाने थबथबले होते. त्याने प्रज्ञाकडे पाहिले.
" तू ठीक आहे ? " सचिनने काळजीने विचारले.
प्रज्ञा मात्र काहिच बोलली नाही.झालेल्या प्रसंगामुळे तिला रडू कोसळले होते. सचिनने तिच्याजवळ जात काव्याला आपल्या कडेवर घेत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. प्रज्ञा हुंदके देऊन रडत सचिनला जाऊन बिलगली.
" शांत हो..काही झालं नाही.. " सचिन आपला हात तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. एका हातात त्याने काव्याला पकडलेले होते. दोघांना शांत होण्यास त्याने थोडा वेळ दिला.
" मी खूप घाबरले होते रे !.." प्रज्ञा हुंदके देत बोलली. आणि सचिनच्या मिठीतून लांब झाली. काव्या आता जरा शांत झाली होती.
" काही नाही झालं प्रज्ञा..सगळं ठीक आहे..तू पहिले शांत हो. " सचिन तिला धीर देत बोलला. प्रज्ञाने काव्याला सचिनच्या कडेवरून आपल्या कडेवर घेतले.
" कोण होता तो..काय अडलं होत त्याच आपल्यापासून.. " प्रज्ञा डोळे पुसत रागात बोलली.
" कोणीतरी पिऊन गाडी चालवत असेल.." सचिन विचार करत बोलला.
" आता इथे थांबणं बरोबर नाही..आपण आज रात्री गावात थांबुया..उद्या सकाळी पुण्याला जाऊया.." सचिन तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावत बोलला.
" ठीक आहे." प्रज्ञाने डोळे पुसत त्याला होकार दिला. आता काव्याही शांत झाली होती. घडलेला प्रसंग रस्त्यावरून जाणाऱ्या पैकी कोणीच पहिला नव्हता. त्या रस्त्याला वाहतूक नसल्याने वाहनेही कमीच होती. त्यामुळे मदतीसाठी कोणीही आलेले नव्हते. लिफ्ट घेऊन पुण्याला जाण्याचा सचिनचा विचार यामुळे त्याने रद्द केला. आता गाडी चालवण्याचेही बळ त्याच्यात उरले नव्हते. आपण फॉर व्हीलर का नाही घेऊन आलो ? या विचाराने तो स्वतःवर नाराज होत होता. मात्र लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढणे गरजेचे असल्याने त्याने गावात कोणाकडे तरी मदत मागून आजची रात्र तेथेच काढण्याचे ठरवले होते.
सचिनने गाडी वर बसत गाडी चालू केली. त्याचे हात अजूनही थरथर कापत होते. त्याने प्रज्ञाकडे पाहिले. ती काव्याला घेऊन हळूच गाडीवर बसली. तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. घाबरतच ती गाडीवर बसली. एका हातात काव्याला पकडून दुसरा हात तिने सचिनच्या खांद्यावर ठेवला. त्याने गाडीच्या आरशातून एकदा प्रज्ञा कडे पाहिले. ती अजूनही धक्क्यातच होती. तिच्याकडे बघून सचिन गाडी पुन्हा गावाच्या दिशेने चालवणार तोच...त्याला मागून कोणीतरी जोरात पळत येत असल्याचा भास झाला. आरशात मात्र अंधारामुळे काही दिसत नव्हते. " सचिनsss..." प्रज्ञा मोठ्याने ओरडली..तो मागे वळून बघणार तेवढयात.... त्याची गाडी कोणीतरी पूर्ण ताकद लावून आडवी ढकलली...अचानक झालेल्या हल्ल्याने सचिनचे गाडीवरचे नियंत्रण सुटले..त्याची गाडी धपक्कन आडवी झाली...सचिन जोरात खाली आदळला....प्रज्ञा तोंडावरच जोरात पडली..पडताना तिने काव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत तिला आपल्या कवेत घेतले. प्रज्ञाच्या डोक्याला मात्र प्रचंड मार लागला. तरीही तीने काव्याला काही होऊ दिले नाही...सचिनचा पाय दगडावर जोरात आपटल्याने त्याला उठता येत नव्हते. तो उठून त्या हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या पायाला गंभीर मार लागला होता. सचिनने त्या हल्लेखोराकडे पाहिले. अंगात पूर्ण काळ्या रंगाचे जॅकेट आणि चेहरा झाकण्यासाठी मानवी कवटीच्या चिन्हाचे मास्क...सचिन उठण्याचा प्रयत्न करत असतानाच तो हल्लेखोर प्रज्ञा जवळ जाऊन उभा राहिला.
" नाही !...तिला काही करू नको !..." सचिन जिवाच्या आकांताने ओरडला. मात्र त्या हल्लेखोरावर काही फरक पडला नाही. त्याने रडणाऱ्या काव्याला प्रज्ञा पासून दूर केले. काव्या प्रज्ञा कडे बघून मोठमोठ्याने रडू लागली. मात्र त्या दगडाचे हृदय असणाऱ्या माणसाला त्याची काही कीव नव्हती.
" तिला हात लावला तर याद राख..." सचिन उठण्याचा प्रयत्न करत मोठमोठ्याने ओरडत होता. त्या नराधमाने बेशुद्ध झालेल्या प्रज्ञाच्या पाठीमागून गळ्यात हात टाकत तिला उभे केले. त्याच्या त्याच हातात चाकू होता.
" तिला काही झालं तर मी तुला सोडणार नाही ! " सचिन रागाने मोठ्याने ओरडत कसाबसा उठला..तो उठून उभा राहिला तसे त्या हल्लेखोराने पाठीमागून पकडलेल्या प्रज्ञाला मानेवर चाकू तसाच ठेवत पलटवले. प्रज्ञा डोळे किलकिले करून त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करणेत होती. मात्र तिला त्या मानवी कवटीच्या आकृतीशिवाय काही दिसत नव्हते..सचिन त्याच्याकडे कसाबसा पळत जाऊ लागला...तेवढ्यात त्या हल्लेखोराने प्रज्ञाच्या पोटात निर्दयीपणाने जोरात चाकू खुपसला..तिच्या त्या हृदयद्रावक किंकाळीने त्या सुमसान रस्त्यालाही भय वाटले असावे...तिची किंकाळी कानावर पडताच सचिन मटकन खाली बसून रडू लागला..त्याच्या आणि छोट्या जीवाचे ते हृदय पिळटावून टाकणाऱ्या आवाजाने त्या राक्षसाला मात्र आनंद मिळत असावा..प्रज्ञाच्या पोटातील चाकू बाहेर काढून त्याने सचिनकडे पाहिले.
" प्रज्ञा...." खाली पडणाऱ्या प्रज्ञाला पकडण्यासाठी सचिन कसाबसा धावला...मात्र त्या आधीच तो नराधम चाकू घेऊन जोराने सचिनकडे धावला...तो चाकूने सचिनवर हल्ला करणार तोच सचिनने चपळाईने त्याचा वार चुकवला...सचिनने त्याच्या पोटात एक जोरदार बुक्का लगावला..मात्र त्याने एक जोरदार लाथ सचिनच्या जखमी पायावर मारली..सचिन वेदनेने जोरात किंचाळत खाली बसला..झालेली घटना बघून लांबून काही लोक पळत त्यांच्या दिशेने येऊ लागले..ते पाहून तो खुनी पकडलो जाऊ नये म्हणून हातात चाकू घेऊन शक्य तितक्या वेगाने झाडाझुडपांतून पळून फरार झाला..पळत येणाऱ्या लोकांपैकी काही जण त्या झाडाझुडपांतून खुन्याला पकडण्यासाठी गेले. तर त्यातील एका महिलेने काव्याला सांभाळले. एक जण सचिनला उभं राहण्यासाठी मदत करू लागला.
" प्रज्ञा...प्रज्ञा..." सचिन मोठ्याने आक्रोश करत होता. कसेतरी चालत त्याने प्रज्ञा जवळ जात तिचे हात हातात घेऊन मोठ्याने रडू लागला. तिचे प्राण आता शिल्लक नाहीत हे जाणवताच त्याने मोठ्याने हंबरडा फोडला. इतर लोक त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या आक्रोशाने आणि काव्याच्या रडण्याने अनेकांचे हृदय पिळटावून निघत होते. त्या रात्रीच्या अंधारात सचिनचा आक्रोश आभाळ चिरत होते.



त्या रात्रीचा तो वाईट प्रसंग आठवून सचिनच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याला आधार देण्यासाठी हेमंतने त्याच्या पाठीवर हात ठेवला. सचिन हेमंतच्या गळयात पडून मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या मनातील त्या वाईट घटना त्यातील प्रज्ञाला न वाचवू शकल्याचे दुःख..अश्रू रूपाने बाहेर काढत सचिन मनमोकळे पणाने हमसून हमसून रडत होता. हेमंतने त्याला इतक्या मनमोकळे पणाने रडताना कधीच पाहिले नव्हते.
" शांत हो सचिन..जे झालं ते झालं.." हेमंत सचिनला मिठीतून सोडवत म्हणाला. हेमंतने त्याला बेडवर बसवत पाणी दिले. दिनेश बाहेर शून्यात नजर लावून बघत होता. त्या रात्रीची घटना ऐकून तो सुन्न झालेला होता. कोण इतकं निर्दयी कसा असू शकतो ? एखाद्याचा आक्रोश ऐकून ही कोणाला दया कशी वाटत नाही ? इतक्या दगडी हृदयाचा कोणी कसा असू शकतो ? घडलेल्या प्रसंगाची कल्पना करून दिनेशचे मन कापत होते.
" अशा वेळी लोक का मदतीला येत नाहीत ? का सगळं घडेपर्यंत शांत बसतात ? " हेमंत दुखी होत बोलला.
" पण आता आपण शांत नाही बसायचं सचिन..आता बदला घ्यायचा..तडपून तडपून मारायचा साल्याला.! भलेही मी पहिले तुझ्या म्हणण्याच्या विरोधात होतो. पण आता नाही..आता जिथं सापडेल तिथं संपवायचा त्याला ! " हेमंत आता रागाने लाला झाला होता.
" इतक्या निर्दयी माणसाला जिवंत सोडणेच पाप आहे ! अश्यांना तर जागीच ठार केले पाहिजे. " दिनेश हेमांतजवळ जात रागाने बोलत होता.
" त्याला परफेक्ट प्लॅन करून नाही..जिथे सापडेल तिथेच संपवणे हेच फक्त आपले काम ! " दिनेश संतापाने बोलला. मनातून तो प्रचंड दुखी झाला होता.
" सचिन..एवढं सगळं मनात असताना सुद्धा तू एका मुलीला सांभाळतो. हे खरंच सोपं नाही..तू एका खुन्याचा खून करायचा विचार करतो , यात मला तरी काही चुकीचं वाटत नाही..तू फक्त आता धीर खचू नको. मी आणि हेमंत तुझ्या सोबत आहोत. " दिनेश सचिनला धीर देत म्हणाला.
" आणि काव्या..एवढीशी मुलगी इतक्या लवकर आपल्या आईला गमावून बसली..काय अवस्था असेल तिची ? " दिनेश डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला.
" एकतर बिचारी जन्मापासून बोलू शकत नाही आणि आईचे छत्र ही हरवले.." हेमंत जड आवाजात काव्याबद्दल काळजी दाखवत बोलला.
" काय..काव्या बोलू शकत नाही ! " दिनेशला अजून एक धक्का बसला. त्याचे मन आता काव्याच्या विचाराने तुटत चालले होते.
" ती जन्मापासून मुकी आहे. किती फुटकं नशीब आहे माझ्या मुलीचं ! " सचिनचे पुन्हा मन भरून आले होते. मात्र यावेळेस त्याने आपल्या भावना दाबून ठेवल्या.
हेमंत त्याच्या शेजारी बसला. दिनेश ही त्याच्या शेजारी येऊन बेडवर बसला.
" ती आता कुठे आहे ? " दिनेश ने भरलेल्या मनाने विचारलं.
" तिची मावशी किशोरीकडे. प्रज्ञा गेल्यापासून तीच तिला आईसारखं संभाळतेय. " हेमंत बोलला.
" आभार मानलं पाहिजे त्या माऊलीचं. एका बिना आईच्या मुलीला सांभाळायला देवाचं काळीज लागतं.." दिनेश मनोमन किशोरीचे आभार मानत म्हणाला.
" मला तरी वाटत सचिन , की तू काव्या मोठी होईपर्यंत किशोरी कडेच ठेवावं. ती तिला चांगली सांभाळू शकेल. " हेमंतने आपला विचार बोलून दाखवला.
" मला नाही वाटत हे शक्य आहे. " सचिन बोलला.
" का ? म्हणजे मला नाही वाटत की किशोरी शिवाय काव्याचा सांभाळ कोणी करू शकेल. " हेमंत किशोरीवर विश्वास दाखवत म्हणाला.
" काल सारंग बरोबर जे झालं त्यामुळं मला नाही वाटत , की सारंग काव्याला जास्त दिवस त्याच्या घरी ठेवेल. " सचिनने आपल्या मनातील शंका उपस्थित केली.
" सारंग कोण ? आणि काल काय झालं ? " दिनेशने प्रश्न केला.
" सारंग किशोरीचा पती. " सचिन शांततेत बोलला.
" काल नेमकं काय झालं सचिन ? तू सकाळीही त्याबद्दल सांगितलं नाही. " हेमंत नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी सचिनला परावृत्त करू लागला.
" हेमंत..मला वाटतं सध्या सचिनला काही न विचारलेलंच बर..त्याला थोडा वेळ शांत होऊ " दिनेश सचिन बद्दल काळजी दाखवत बोलला.
" सारंगचा भाऊ राहुल..त्याची जी अवस्था आहे त्याचा थेट आरोप त्याने प्रज्ञा वर केला. उलटं प्रज्ञा आणि मी राहुल ला गैरमार्गला जाण्यापासून रोखले होते. पण हे सारंगला अजूनही कळलेले नाही. यावरूनच काल आमच्यात बाचाबाची झाली. " सचिन स्वतःहून काय घडलं ते सांगू लागला. त्याच्या डोळ्यात राग दिसत होता.
" जर किशोरी मध्ये आली नसती...तर मी सारंगला सोडलं नसतं. " सचिन संतापाने बोलला.
" सारंगने आधीपासूनच तुला आणि प्रज्ञाला चांगली वागणूक दिलेली नाही. मी जेवढया दिवसांपासून सोबत आहे , तेव्हापासून मी हे पाहिलंय." हेमंत सारंगबद्दल रोष व्यक्त करत म्हणाला.
" राहुलचे तुमच्याशी संबंध कसे होते ? " दिनेश ने प्रश्न केला. आता तोही सर्व बाजूने विचार करत होता. प्रज्ञाला मारणारी घरातील व्यक्ती असू शकते असा त्याने अंदाज लावला.
" त्याने नेहमी आमचा तिरस्कारच केला ! सारंग आणि राहुलच्या वडिलांनी एक हॉस्पिटल बांधण्याच्या उद्देशाने ती जागा राहुल ला देणार होते..मात्र तो कसलाही विचार न करता पब बार बांधण्याचे मनसुबे बांधत होता. " सचिनने हळूच दिनेशकडे पाहिले.
" आणि यालाच प्रज्ञा आणि मी विरोध केला होता. राहुलला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र सारंग ! त्याला कधी चांगलं वाईट कळलंच नाही. " सचिन पश्चातापाने बोलला. बोलणे थांबवत तुणे एक मोठा श्वास घेतला.
" यामुळेच राहुलला ती जमीन न देता त्याच्या वडिलांनी ती दुसरीकडेच विकली आणि राहुलला त्याच्या अशा विचारांमुळे घरातून हाकलून दिले...आता तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला आहे ! " सचिन बोलायचे थांबला.
दिनेश बेडवरून उठत रूममध्ये चकरा मारू लागला.
" तुला वाटत की यामागे राहुल किंवा सारंग असेल ? " दिनेश ने सचिनकडे बघत विचारले.
" हो ! " सचिनने लगेच उत्तर दिले.
" मग आताच त्याला जाऊन पकडूया ना...त्याच्याशिवाय दुसरे कोण आहे ? दुसरं कोण आहे जो प्रज्ञा आणि सचिनशी काट खाऊन होता ? तोच आहे जो प्रज्ञाचा इतका निर्दयी खून करू शकतो..तोच खरा गुन्हेगार असणार ! " हेमंत उठून उभा राहत तावातावाने आणि संतापाने बोलला. यावर दिनेशने थांबून एकदा त्याच्याकडे पाहिले.
" हेमंत.." दिनेश त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला.
" आपल्याकडे अजून पुरावा नाही , की तोच खरा खुनी आहे असं. जोपर्यंत आपल्याला ठोस पुरावा सापडत नाही तोपर्यंत आपण कोणावरही आळ घेऊ शकत नाही. " दिनेश हेमंतला शांत करत बोलला.
" आणि अशा वेळी संशयाच्या भोवऱ्यात अनेक जण असतात. अनेक जण संशयित आहेत , पण आपल्याला माहीत नाही की नक्की कोणी प्रज्ञाला मारले ते ! " दिनेश विचारपूर्वक बोलला. हेमंत आता शांत झाला.
सचिनने खिडकीजवळ जात बाहेर नजर टाकली. पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. आता निघायला हवे या विचराने त्याने हातातल्या घड्याळावर नजर टाकली. दुपारचे दीड वाजून गेलेले होते.
" मला वाटत आपण निघायला हवं. पाऊस कमी झालाय. " सचिन म्हणाला.
" नाही सचिन..आपण उद्या निघुया. आज इथेच थांबुया. " दिनेश त्याला नकार दाखवत म्हणाला.
" दिनेश , जेवढे लवकर त्या खुन्यापर्यंत पोहोचता येईल तेवढे चांगले. मी आता जास्त वाट बघू शकत नाही. " सचिनने त्याचा विचाराला विरोध दाखवला.
" सचिन बरोबर म्हणतोय दिनेश , उशीर करणं बरोबर नाही. " हेमंतने सचिनला साथ दिली.
" ठीक आहे. मग लगेच निघुया. " थोडावेळ विचार करून दिनेशही तयार झाला.
" आता त्याला शोधल्या शिवाय माझे मैत्रीचं कर्तव्य पूर्ण होणार नाही ! वाटलं तर पाताळातूनही शोधून काढू त्याला ! " दिनेश आत्मविश्वास दाखवत बोलला.
" चल सचिन. आपले मिशन सुरू ! " हेमंत सचिनच्या खांद्यावर हात टाकत बोलला. सचिनने त्याच्याकडे आत्मविश्वासाने पाहिले.
" आणि तुझ्यासाठी हे मिशन पार करणारच ! " हेमंतने त्याचा हात हातात घेत त्याला विश्वास दिला.
" फक्त आपल्या मैत्रीसाठी.." दिनेशने जवळ जात दोघांच्या हातावर आपला हात ठेवला. तिघांनी एकमेकांकडे विश्वासाने पाहिले. दिनेश आणि हेमंत आपली मैत्रीचे कर्तव्य पार पाडण्यात पूर्णपणे तयार होते. सचिनला त्यांच्या साथीची अशीच अपेक्षा होती. आता काहीही झाले तरी खुन्याला शोधण्याचे हे आव्हान तिघांनी स्वीकारले होते.


सचिन , दिनेश आणि हेमंत तिघेही आपापले समान घेऊन रिसेप्शन वर आले. दिनेशने रूमची चावी परत करत रिसेप्शनिस्ट चे आभार मानले. मघाशी इतका हसणारा दिनेश आता एवढा गंभीर कसा याचे रिसेप्शनिस्टला आश्चर्य वाटले.

सचिन कारच्या मागच्या सीटवर शांतपणे बसलेला होता. डोक्यात विचारांचे चक्र नेहमीप्रमाणे सुरूच होते. आपल्या बॅग्स डिक्कीत टाकून हेमंत ड्रायव्हर सीट वर , तर दिनेश त्याच्या शेजारच्या सीटवर बसला. हेमंतने गाडी चालू केली.
काही वेळाने दिनेश चा फोन वाजला. खिशातून फोन काढत त्याने स्क्रीनवर नाव पाहिले आणि एकदा हेमंत कडे पाहिले. हेमंत स्पीकर वर लावलेल्या मंद आवाजातील गाणे ऐकण्यात दंग होता. एकदा आरश्यातून मागे बसलेल्या सचिनवर नजर टाकून फोन उचलला.
" हॅलो " दिनेश गंभीरतेने बोलला.
" हो. आताच हॉटेलवरून निघालो. "
" ठीक आहे भेटूया तेव्हा. " दिनेशने फोन ठेवला. हेमंतने त्याच्याकडे पाहिले.
" दिनेश , तू तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. तुझ्या घरी कोण असत ? " हेमंत ने विचारले. दिनेशने हळूच त्याच्याकडे पाहिले.
" कोणीच नाही ! " दिनेश बोलताना दुखावलेला दिसत होता.
" कोणीच नाही ? मला तर वाटले की..." हेमंत आश्चर्याने बोलता बोलता मधेच थांबला. दिनेशने त्याच्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहिले.
" नाही म्हणजे..जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तू मोठया घराचा असशील असे वाटले होते. तुझ्या घरी कोणी नाही हे ऐकून धक्काच बसला ! " हेमंत आश्चर्याने बोलला.
" हो..मी एका मोठ्या श्रीमंत घरातील आहे. माझे वडील एक राजकारणी होते. माझे वडील एकुलते एक. आणि मी ही. त्यामुळे जे काही माझ्या वडिलांकडे होतं ते त्यांनी माझ्या नावावर केलं. पण..." दिनेश बोलताना दुखी झाला.
" एका अपघातात माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला. " दिनेश डोळ्यातील पाणी पुसत बोलला. सकाळी एवढ्या हसऱ्या चेहऱ्याचा दिनेश आता भावुक झालेला बघून हेमंतला वाईट वाटले. मागे बसलेला सचिनही ते ऐकून दुखावला.
" दिनेश...मी तुझे दुःख समजू शकतो. आपल्या जवळच्या माणसांना गमावण्याचं दुःख काय असतं ते मलाही माहीत आहे. " सचिन त्याला धीर देत बोलला.
" जवळच्या माणसांचा विरह मी सहन केलेला आहे सचिन..तुझे दुःख काय आहे ते मला जाणवते..म्हणूनच मी तुला शक्य ती मदत करायला तयार आहे.." दिनेश आरश्यातून सचिनकडे बघत बोलला. दिनेशची परिस्थिती बघून सचिनला कसेतरीच वाटले. त्याच्या मनात दुःख असूनही तो हसऱ्या चेहऱ्याने आपल्याला मदत करायला तो तयार झाला , याचे त्याला कौतुक वाटतं होते.


संध्याकाळची वेळ असल्याने बाहेर फिरायला गर्दी झालेली होती. आकाशातील आभाळ आता हळूहळू मोकळे होत चालले होते. सूर्याच्या किरणांनी आभाळ नारंगी छटेने उजळून निघाले होते. पक्ष्यांचे उडणारे थवे आभाळाची शोभा आणखीनच वाढवत होते.
या अशा मनमोहक दृश्याचे निरीक्षण करत सचिनने चहाचा एक घोट घेतला. बाजारातील एका छोट्या चहा टपरीवर तो आणि दिनेश चहा घेत उभे होते. हेमंत बाजूला उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता.
" चालेल. अजून काही माहिती मिळाली तर कळव. समजलं ! ठेव. " हेमंत मंगेशचा फोन ठेवत दोघांजवळ येऊन उभा राहीला.
" अजून काही माहिती ? " सचिनने चहाचा घोट घेत हेमंतला विचारलं.
" अजून काही नाही. शैलेश जाधवचे घरातील व्यक्तींशी सोडले तर कोणाशी वाद नाहीत. आणि त्याचे ज्याच्याशु वाद आहेत त्यांचा तुझ्याशी किंवा प्रज्ञाशी काही संबंध असेल असं वाटत नाही. " हेमंत टेबलवर ठेवलेला चहाचा ग्लास उचलत माहिती पुरवली.
" म्हणजे यात शैलेश जाधवला अडकवले असण्याची शक्यता असेल असं वाटत नाही. " दिनेश दोघांकडे बघून बोलला.
" चला सीसीटीव्ही फुटेज बघू तेव्हाच समजेल. " सचिन चहा संपवत म्हणाला आणि टपरी समोर असणाऱ्या एका ज्वेलरी शॉप कडे बघत पुढं जाऊन उभा राहिला. ' सुकन्या ज्वेलरी शॉप ' इथूनच ते लॉकेट खरेदी केले गेलेले होते. हेमंत आणि दिनेश ही चहा संपवून त्या ज्वेलरी शॉप कडे निघाले.

तिघेही एकामागून एक ज्वेलरी शॉपमध्ये शिरले. बाहेरून जसे दिसत होते तसेच आतूनही शॉप सजवलेले होते. बऱ्याच प्रकारचे दागिने तिथे शोकेस मध्ये ठेवलेले दिसले.
त्यांना बघून एक शॉपकीपर त्यांच्या जवळ आला.
" बोला साहेब , काय मदत करू ? " शॉपकीपर सचिनकडे बघून म्हणाला.
" आम्हाला काही चौकशी करायची आहे. एका लॉकेट बद्दल. " सचिन शांततेत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून शॉप चे मालक त्यांच्याजवळ आले
" लॉकेट बद्दल ? काही दिवसांपूर्वी एक माणूस सुद्धा लॉकेट बद्दलच चौकशी करत होता. नेमकं काय प्रकरण आहे ? " मालकांनी गंभीर होत विचारलं.
" हो. माझा मित्र मंगेश आला होता चौकशी साठी. " हेमंत म्हणाला. हेमंत ने पाठीवर लटकवलेल्या बॅगेतून ते लॉकेट बाहेर काढत मालकांसमोर धरले.
" हे आपल्या इथेच मिळते ? " हेमंतने प्रश्न केला.
" हो आम्हीच असे लॉकेट बनवतो..पण नक्की काय हवं आहे आपल्याला ? " मालक आता वैतागत बोलले.
" प्रकरण गंभीर आहे साहेब. आपली मदत हवी आहे. " दिनेश गंभीरतेने बोलला. बाकीचे गिऱ्हाईक आणि कामगार त्यांच्याकडे शंकीत नजरेने पाहू लागले. हे पाहून मालकांनी त्या तिघांना बाजूला येण्याचा इशारा केला. तसे ते तिघे मालका सोबत एका कोपऱ्यात उभे राहिले.
" आम्हाला ते लॉकेट कुणाच्या ऑर्डर वरून बनवले गेले ते समजले आहे. पण आता आम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघायचे आहे. " दिनेश बोलला.
" पण नेमकं झाला काय आहे ? मी असच कोणाला पण सीसीटीव्ही फुटेज नाही दाखवू शकत.." मालकांनी पुन्हा वैतागत थेट नकार दिला.
" हे बघा साहेब या लॉकेट वरून आम्ही एका खुन्याचा तपास करत आहोत. त्यामुळे आपण आम्हाला मदत करा. " दिनेश थोडा आक्रमकपणे बोलला. खून ऐकून मालक घाबरलाच.
" काय खून ? " मालक आजूबाजूला बघत हळूच बोलला.
" हो , आम्ही या लॉकेट च्या आधारे आम्हाला त्या खुन्यापर्यंत पोहोचायचे आहे. " सचिन गंभीरतेने म्हणाला.
" पण आपण कोण आहात ? पोलीस ? जे मी तुम्हाला अस फुटेज देऊ ? " मालक आता थेट वाकड्यात शिरत होता.
" आम्ही पोलिसांची परवानगी घेतली आहे. " सचिनच्या वाक्यावर हेमंत आणि दिनेश अवाक झाले.
" कोणाची ? " मालक घाबरत म्हणाला. सचिनने खिशातून फोन काढत कोणाला तरी फोन लावला.
" हॅलो इन्स्पेक्टर साळगावकर , सुकन्या ज्वेलरी शॉपचे मालक आम्हाला सीसीटीव्ही फुटेज नाकारत आहेत ! " सचिन मालकांकडे रोखून बघत फोनवर बोलला.
" हो बोला " सचिनने फोन मालकांसमोर धरला. मालकाने सचिनकडे बघत थरथरत्या हाताने फोन घेतला. आजूबाजूचे लोक आता काहीतरी गडबड आहे हे कळाल्याने त्यांच्याकडेच पाहू लागले.
" ह..हॅलो.." मालक घाबरत फोनवर बोलला. पलीकडून साळगावकर काहीतरी बोलले. तसे मालक अजूनच घाबरले.
" हो साहेब..देतो.." मालकाने थरथरत्या हाताने फोन सचिनला परत दिला.
" इकडे ये.." मालकांनी हात वर करून एका कर्मचाऱ्याला बोलावले. तसा तो कर्मचारी घाबरतच त्यांच्याजवळ आला.
" यांना दोन महिन्यांनाधीचे सीसीटीव्ही फुटेज दाखव.." मालक घाबरत बोलले. तो कर्मचारी मानेनेच होकार देऊन जाऊ लागला.
" हे घे..यात.." हेमंतने खिशातून एक पेन ड्राइव्ह काढून त्याच्या समोर धरला. ते घेऊन तो घाबरतच निघून गेला.
" आणि आम्हाला खरेदी करणाऱ्यांचे रेकॉर्ड बघायचे आहे. " दिनेश म्हणाला.
" हो..पण आपण जरा बाहेर जाऊया.." मालक घाबरत म्हणाला.
" हम्म " म्हणत सचिनने दिनेश आणि हेमंत कडे पाहिले. आणि ते शॉप बाहेर येऊन एका बाजूला जिथे कोणी बघणार नाही अश्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. बाहेर येताना लोक त्यांच्याकडे संशयाने बघत होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते बाहेर येऊन उभे राहत ते मालकाची वाट पाहू लागले.
" वा सचिन ! भारी सेटिंग लावली तू तर.." हेमंत सचिनला कौतुकाने म्हणाला.
" याचे श्रेय दिनेश ला जात. सचिनने दिनेश कडे पाहून स्मित केलं.
" मला आधीच माहीत होते , आपल्याला सहजासहजी फुटेज मिळणार नाही..म्हणूनच मी माझे मित्र इन्स्पेक्टर साळगावकर यांना मघाशी चहा घेताना आपल्या प्लॅनबद्दल कळवले होते. ते आपल्याला मदत करायला तयार आहेत.त्यांच्या मदतीने आपण सुरक्षित आहोत. आपण त्या खुन्याला पकडून मारून जरी टाकले तरी आता आपण यात अडकणार नाही ! " दिनेशने स्पष्टीकरण दिले.
" वा दिनेश , मानलं तुझ्या बुद्धीला.." हेमंत दिनेशची स्तुती करत बोलला. तितक्यात मालक हातात एक रजिस्टर घेऊन आले. सोबत हेमंतने दिलेला पेन ड्राइव्ह सुद्धा.
" हे रजिस्टर. यात मागच्या चार महिन्याचे रेकॉर्ड. आणि यात मे आणि जून महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज.." मालकांनी घाबरतच रजिस्टर आणि पेन ड्राइव्ह सचिनकडे सोपवले. सचिनने पेन ड्राईव्ह खिशात टाकत रजिस्टर उघडले. पाने पलटून नोंदी बघू लागला. बघत असतानाच एका ठिकाणी त्याची नजर थांबली. त्याने ते रजिस्टर हेमंत आणि दिनेशला दाखवत एका ठिकाणी बोट दाखवले.

' शैलेश जाधव , सोन्याचे लॉकेट , ऑर्डर - २५ मे , डिलिव्हरी - १४ जून ' आणि त्यासमोर कॉन्टॅक्ट नंबर.

" लॉकेट खरेदी १४ जून आणि प्रज्ञाचा खून १६ जून.." सचिन हळूच पुटपुटला. हेमंत आणि दिनेशने त्याच्याकडे पाहिले.
" ठीक आहे साहेब...आपले धन्यवाद. पण एक लक्षात असुद्या..याबद्दल कोणालाही काही कळले नाही पाहीजे..नाहीतर..." सचिनने मधेच बोलायचं थांबून मालकांकडे पाहिले.
" नाही नाही साहेब..कोणाला काहीच समजणार नाही...आपण त्याची काळजी करू नका. " मालक घाबरत बोलले.
" हम्म " म्हणत सचिनने रजिस्टरच्या त्या पानाचा फोटो काढून घेतला. आणि ते रजिस्टर मालकाकडे सोपवले. मालक घाबरतच निघून गेला.
" चला , आपल्याला फार मोठा पुरावा मिळाला आहे. " सचिन दोघांकडे बघून बोलला.
" हम्म..आता त्या खुन्याला कोणी वाचवू शकत नाही. " दिनेश आत्मविश्वासाने बोलला. आणि ते तिघे निघाले.



हेमंतने गाडी ' दिनेश रेस्टॉरंट अँड लॉज ' च्या गेटमधून आत घेत पार्किंगमध्ये आणली. पार्किंग हॉटेल इंटरेन्स समोरच असल्याने सचिनला गाडीतून उतरताच नाव दिसले.
" मागचे हॉटेल तुझ्या मित्राचे होते , आता हे तुझे का ? " सचिन दिनेश कडे बघत गमतीने बोलला.
" तसच समजा ! " दिनेश ही गमतीने बोलला. सकाळच्या सारखे हसू पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटले.
" हे ही माझ्या मित्राचेच आहे. विनीतचे. " दिनेश हॉटेलकडे बघत म्हणाला.
" च्यायला..असे किती हॉटेल्स आहेत तुझ्या मित्राचे ? " हेमंत हसून बोलला.
" माझ्या माहितीप्रमाणे तीन..तिसरे कुठे माहीत नाही ! " दिनेश बोलला. तोपर्यंत सचिनने मागच्या डिक्कीतून बॅग्स बाहेर काढल्या देखील होत्या. आपले सामान घेऊन तिघेही आत गेले. दिनेश ची इथेही ओळख असल्याने त्याने लगेच रूम नंबर ९ ची चावी घेतली. आणि हेमंत आणि सचिन सोबत रूममध्ये आला.

रूममध्ये गेल्यागेल्या सचिनने घाईघाईत हेमंतच्या बॅग मधून लॅपटॉप बाहेर काढत टेबलवर ठेवला. आणि तेवढ्याच घाईत त्याने खिशातून पेन ड्राइव्ह काढत लॅपटॉपला कनेक्ट केला. त्याला बघून दिनेश घाईघाईने त्याच्या जवळ आला.
" सचिन...मला वाटत तू पहिले आराम केला तर बरं होईल.हे तर आपण नंतर बघू. पहिले फ्रेश तर हो ! " दिनेश त्याला थांबवत म्हणाला.
" नाही दिनेश , आता मी थांबू शकत नाही. तो कोण आहे ते मला आताच बघायचंय ! " सचिन उतावीळ होत बोलला. त्याच्या डोळ्यात संताप आणि राग दिसून येत होता.
" थोडा वेळ आराम कर सचिन..तो कोण आहे हे आज जरी कळले तरी आपण रात्रीच काय करणार आहे ? " हेमंत दिनेशच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. त्यांच्या बोलण्याने सचिन उठून उभा राहिला.
" हे बघ " दिनेशने सचिनच्या खांद्यावर हात ठेवला.
" तू या सगळ्याने फार थकलेला , वैतागलेला दिसतोय. तुला आरामाची गरज आहे सचिन.." दिनेशने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सचिनने एकदा त्याच्याकडे पाहिले.
" घाई करून उपयोग नाही. " दिनेश शांततेत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर सचिनबद्दल काळजी दिसत होती.
सचिनने चालू केलेला लॅपटॉप पुन्हा बंद करत पेन ड्राइव्ह टेबलवरच ठेवला.
" बरोबर बोलतोय तू दिनेश..थकलो आहे मी..थकलोय आता प्रज्ञाची आठवण काढून..थकलोय बदल्याच्या भावनेने.." बोलताना सचिनचे मन भरून आले. त्याने दिनेशला कडकडीत मिठी मारली.त्याने अशी मिठी मारलेली बघून दिनेश भावुक झाला.ते बघून हेमंतही भारावला. काही वेळ एकमेकांच्या मिठीत आपल्या मैत्रीचा घट्टपणा जाणून दिनेश बाजूला झाला.
" जा फ्रेश होऊन आराम कर.." दिनेश पुन्हा सचिनच्या पाठीवर हात ठेवत बोलला. सचिन आपले पाणावलेले डोळे पुसत वॉश रूममध्ये निघून गेला.
" खरंच दिनेश , तुझ्या सारखा मित्र भेटणं भाग्याची गोष्ट आहे ! " हेमंत डोळे पुसत दिनेशला म्हणाला. दिनेश ने ही पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले.



सचिन बेडवर शांतपणे झोपलेला होता. बसल्या बसल्या विचार करतानाच त्याला झोप लागली होती. कितीतरी दिवसांनी त्याला इतकी शांत झोप लागली असावी. आज का माहीत नाही पण त्याला मनाचे ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते. कदाचित दिनेश आणि हेमंतने दिलेली साथ याला कारण असावे.
दिनेश खुर्चीवर बसून समोर टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपवर काहीतरी करत होता. त्याच्याही चेहऱ्यावर थकल्यासारखे भाव होते. तोही विचार करून थकला होता. आणि सचिनच्या चिंतेने सुद्धा तो थकला असावा. सकाळीच भेटलेले मित्र आता एकमेकांच्या दुःखाचे जणू आधार झाले होते. त्यांची मैत्री इतक्या कमी वेळात अधिकच घट्ट बनली होती.
बाथरूमच्या आवाजाने दिनेशने लॅपटॉप वर काम थांबवून तिकडे पाहिले. हेमंत फ्रेश होऊन बाहेर आला.
" काय करतोय रे ? तुला पण गरज आहे आरामाची. " हेमंत दिनेश लॅपटॉप वर काहीतरी काम करतोय हे पाहून म्हणाला.
" सर्च करतोय. शैलेश जाधवला ! " दिनेश लॅपटॉप कडे पाहून म्हणाला.
" शैलेशला ? का ? " हेमंत ने आश्चर्याने विचारले.
" त्याला सर्च करायच्या आधी आपण सीसीटीव्ही बघायला पाहिजे. " हेमंत काही न कळल्याने म्हणाला.
यावर दिनेश ने हळूच झोपलेल्या सचिनकडे नजर टाकली.
हेमंतला समजले. सचिनचा आराम झाल्यावर मग बघू , हेच दिनेशला सांगायचे होते.
" पण शैलेश जाधव ला सर्च करून काय मिळेल ? " हेमंतची शंका अजूनही दूर झालेली नव्हती.
" सोशल मीडियावरून खूप काही समजू शकते. " दिनेश आपले काम चालू ठेवत बोलला. हेमंत फक्त तो काय करतो ते बघत उभा होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हेमंतने खिशातून फोन काढत उचलला.
" हॅलो " हेमंत बोलता बोलता रूममध्ये चकरा मारू लागला. पलीकडून मंगेश बोलत होता.
" काय !? आता हे काय सांगतोय तू मंगेश ? " हेमंत धक्का बसल्यासारखा मोठ्याने ओरडला. तसे दिनेशने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या आवाजाने सचिन दचकून जागा झाला.
" पण हे..." हेमंत ने बोलता बोलता कपाळाला हात लावला. तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.
त्याने थरथरत फोन ठेवला. थंड वातावरणातही त्याला घाम फुटला.काहीतरी गडबड आहे हे पाहून सचिन बेडवर उठून बसला. दिनेश खुर्चीतून उठणार तोच त्याला लॅपटॉप वर काहीतरी दिसले.
" काय झालं हेमंत ? " सचिनने गंभीरतेने विचारले. हेमंत डोक्याला हात लावून बेडवर बसला. तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. दिनेश मात्र लॅपटॉप वर गंभीर होऊन काहीतरी करत होता. त्याला काहीतरी सापडले होते. मात्र हेमंतची अवस्था बघून तो काहीही न खुर्चीतून उठून हेमंत जवळ जाऊन उभा राहिला. त्याने एकदा सचिनकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह होते. दिनेश ही गंभीर होता.
" काय झालं हेमंत ? काय बोलला मंगेश ? " दिनेशने हेमंतच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे विचारले. हेमंत ने दोघांकडे एकदा पाहिले.
" शैलेश जाधव..." हेमंतला बोलले गेले नाही.
" काय ? शैलेश जाधव काय ? " सचिनने अस्वस्थ होत विचारले.
" जो शैलेश जाधव वारला आहे , त्याच्याच बिल्डिंग मध्ये... अजून एक शैलेश जाधव राहतो ! " हेमंत ने कसेबसे वाक्य पूर्ण केले. ते ऐकून दोघांनाही धक्का बसला.
" ते लॉकेट आता जिवंत असणाऱ्या शैलेशने खरेदी केले असणार ! " हेमंत बोलला. सचिन आता अजूनच अस्वस्थ झाला. नेमकं काय चालल आहे त्याला काही समजत नव्हते.
" म्हणजे आता जिवंत असणाऱ्या शैलेश जाधवने प्रज्ञाचा खून केला ? की त्याला कोणी अडकवले ? " सचिनचे डोके आता बधिर झाले होते. त्याला काही समजेनासे झाले. दिनेश अस्वस्थपणे आपले दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभा राहिला. हळूच वर बघत त्याने मोठा श्वास सोडला. सचिन आणि हेमंत आपलं डोकं हातात घेऊन बसलेले होते.
" मला अजून काहीतरी माहिती मिळालीय.." दिनेश शांतपणे म्हणाला.
" काय ? " सचिनने अधिकच अस्वस्थ होत विचारले.
" मृत झालेला शैलेश जाधव राहुल आणि सारंगचा मित्र होता ! " दिनेशने अजून एक धक्का दिला. सचिन अस्वस्थपणे बेडवरून उठून उभा राहिला. हेमंत तर आता पूर्णपणे बधिर झाला होता.
" शैलेश जाधवचा अपघात झाला , त्या कारमध्ये राहुल आणि सारंग देखील होते. मात्र ते अपघातातून बचावले. " दिनेशने अजून एक बॉम्ब फोडला.
" दिनेश..तू हे काय बोलतोय ? म्हणजे..म्हणजे प्रज्ञाला मारण्यात सारंग आणि राहुल चा हात आहे ? आणि त्यांनी शैलेश जाधवला फसवण्यासाठी हे सगळं केलं ? मला...मला काहीच समजत नाहीये दिनेश..नक्की कोण खुनी आहे ?...कोण ? " सचिन आता सैरभैर झाला होता. त्याच डोकं आता बधिर झाले होते. तेवढ्यात त्याला काहीतरी लक्षात आले.
" सीसीटीव्ही...सीसीटीव्ही.." सचिन पटकन जाऊन पेन ड्राइव्ह लॅपटॉपला कनेक्ट केला. घाईघाईत तो २५ मे ची फाईल प्ले करून खुर्चीत बसला. हेमंत आणि दिनेश त्याच्या बाजूला उभे राहून फुटेज पाहू लागले. दुकानात येणाऱ्या एका एका माणसाचा चेहरा पॉज करून ते बघत होते. जो संशयित वाटतो त्याला निरखून बघत होते. अस करता करता २५ तारखेचे पूर्ण फुटेज त्यांनी पाहिले..पण त्यांना सारंग किंवा राहुल यांपैकी कोणीच दिसलं नाही. नाही काही संशय घेण्यासारखं. शेवटी सचिन जाम वैतागला. त्याचे आता डोके फुटायची वेळ आली होती.
" यात तर हेमंत किंवा राहुल कोणीच दिसत नाहीये..अस कस होईल ? " सचिनने वैतागून बोलत बॅक केले. तेवढ्यात त्याला दुसऱ्या विंडो वर राहुलची सोशल मीडिया प्रोफाइल ओपन दिसली.
" हा..हा तर राहुल आहे.." सचिन बोलला.
" हो..शैलेशच्या अकाउंट वर त्याचे राहुल आणि सारंग सोबत अनेक फोटो आहेत. आणि तू सारंग च्या प्रोफाइल ला ऍड असल्याने मला खात्री पटली , की हाच किशोरीचा पती सारंग आणि त्याचा भाऊ राहुल आहेत. " दिनेशने स्पष्टीकरण दिले.
" पण ते लॉकेट दुसरं कोणाचं असेल तर ? आणि दिनेश म्हणतोय त्या प्रमाणे शैलेश राहुल आणि सारंगचा मित्र असेल..तर त्यांनी शैलेश कडून लॉकेट वापरण्यासाठी घेतलेलं असू शकत..आणि तेच त्याच्याकडून पुरावा म्हणून सुटलं असेल तर ? " हेमंतने खोलात विचार करून प्रश्न केला.
" बरोबर हेमंत..हे देखील शक्य आहे..पण मी आता मेलेल्या शैलेश जाधव चा फोटो पाहिलाय..तो या फुटेज मध्ये नाहीये ! "
" मग कोण ? कोण असेल ? " हेमंतने आता हैराण होऊन डोक्याला हात लावला. सचिनचीही तीच अवस्था होती. तो टेबलवर डोकं टेकून बसला होता.
" हे बघा.." दिनेश ने लॅपटॉपवर एक वर्तमान पत्राचा फोटो ओपन केला.
" ही शैलेश जाधवच्या अपघाताची बातमी. यात दिले आहे की , शैलेश जाधवचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आणि गाडीतील त्याचे मित्र राहुल पवार आणि सारंग पवार किरकोळ जखमी झाले. " दिनेशने अजून माहिती दिली. सचिन आणि हेमंत साठी अजूनच गुंता वाढला.
" आता आपण शांत डोक्याने विचार करूया. " दिनेश रूममधून चकरा मारु लागला.
" पण त्याआधी.." त्याला मधेच काहीतरी आठवले. पुन्हा त्याने लॅपटॉपवर जाऊन काहीतरी सर्च केले. थोडा वेळ काहीतरी बघून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनच गंभीर झाले.
" ही आता जिवंत असणाऱ्या शैलेश ची प्रोफाइल..मरण पावलेला शैलेश याला ऍड आहे. आणि सारंग आणि राहुल सुद्धा ! " दिनेश ने लॅपटॉपची स्क्रीन दोघांना दाखवली.
" हे प्रकरण खुप किचकट होत चालले आहे. काहीच समजत नाहीये कोण आणि का ? " सचिन हतबलतेने बोलला. दिनेश पुन्हा रूममध्ये चकरा मारू लागला.
" सर्वात पहिले संशयित कोण आहेत ते पाहूया सचिन.. पहिला संशयित..."
" आता जिवंत असलेला शैलेश , सारंग आणि राहुल..हे तीन संशयित आहेत. " हेमंत दिनेशचे वाक्य मधेच तोडत घाईघाईत बोलला. आता त्याचा संयम सुटत चालला होता.
" येस..आता आपण अधिक बारकाईने विचार करूया. " दिनेश बोलला. तेवढ्यात सचिनला काहीतरी आठवले. त्याने घाईघाईत लॅपटॉप मध्ये १४ जून चे फुटेज चालू केले. ते दिनेश आणि हेमंतने पाहिले.
" काय बघतोय सचिन ? काही सापडले का ? " हेमंतने अधीरतेने प्रश्न केला. दिनेशच्या लक्षात आले सचिन काय पाहतोय ते. जो २५ ला लोकेटची ऑर्डर द्यायला आला असणार तो ते घ्यायला १४ तारखेला आलाच असणार. आणि तो या दोन्ही दिवसांच्या फुटेजमधे नक्कीच दिसला असणार. हे आपल्या लक्षात कसे आले नाही या विचाराने दिनेश खजील झाला. मात्र लगेच तो फुटेज पाहू लागला.
हीच गोष्ट हेमांतच्याही लक्षात आली. तो ही लक्ष देऊन फुटेज पाहू लागला. सचिन फार बारकाईने फुटेज मध्ये दिसणाऱ्या एकेकाचा चेहरा निरखून बघत होता.
एका ठिकाणी दिनेशला काहितरी दिसले. त्याने पटकन तेथे पॉज केले. एक माणूस तोंडाला रुमाल बांधून आणि अंगात एका चॉकलेटी रंगाचे जॅकेट घालून होता. ते पाहून अचानक दिनेशला काहीतरी आठवले. त्याने घाईघाईत २५ मे चे फुटेज प्ले करून ते फास्ट फॉरवर्ड करून पाहू लागला. बघता बघता त्याने एका ठिकाणी पॉज केले. तोच माणूस तश्याच पेहरावात सीसीटीव्ही पासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून सचिनच्या चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचे भाव पसरले.
" येस..हाच आहे तो.." सचिन मोठ्याने ओरडला.
" हा तर मोठा गुन्हेगार आहे ! " सचिन शांत आवाजात म्हणाला. त्याने त्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलेले होते.
" कोण आहे हा नराधम ? " हेमंत रागाने बोलला.
" जॉनी नाव आहे याचं..मागील दोन वर्षातील सर्वात मोठा गुन्हेगार. न जाणे किती खून याने सुपारी घेऊन केले असतील ! मी यांच्याबद्दल वाचले आहे याचा फोटोही पहिला आहे. " बोलता बोलता दिनेश ने लॅपटॉप वर गुगल उघडून त्याचे नाव सर्च केले. अगदी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला तसाच त्याचा पेहराव. दिनेशला हा तोच आहे याची खात्री पटली. फक्त इंटरनेटवरील फोटो मध्ये त्याच्या डोळ्यावर चष्मा होता , मात्र सीसीटीव्ही मध्ये नाही. हा फरक सोडला तर अजून कुठलाही फरक दिसत नव्हता.
" खुनी सापडला. पण यामागचा खरा सूत्रधार नाही ! " सचिन शांततेत मात्र रागाने म्हणाला.
" साळगावकरांच्या मदतीने ते ही कळेल. " दिनेशच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य पसरले.
" आता लगेच त्यांना फोन लाव दिनेश..आता माझा संयम संपला..आणि प्रज्ञाच्या खुन्याचा खेळ सुद्धा ! " सचिन खुर्चीतून उठत बोलला. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल दिसत होते. दिनेशने लगेच साळगावकरांना फोन लावला. मात्र फोन लागला नाही.
" मी खाली जातो , इथे नेटवर्क नाहीये. " दिनेश नेटवर्क नसल्याने खाली निघून गेला. सचिन कसलातरी विचार करत रूममध्ये चकरा मारत होता.
" आपण खूप जवळ पोहोचलो आहोत सचिन.." हेमंत सचिनकडे पाहून बोलला.
" आता फक्त काही तासात त्याचा खेळ खल्लास ! " सचिन रोषाने बोलला.
" खरंच आपण दिनेश चे आभार मानले पाहिजे..त्याने आपल्याला खरंच खूप मदत केली आहे. " हेमंत दिनेशचे आभार मानत बोलत होता.
" एक अनोळखी माणूस आपल्याला योगायोगाने भेटतो आणि आपल्याला मदत न मागता एवढं करतो ! अशी माणसे आजच्या जगात खरंच कमी आहेत. " हेमंत दिनेशचे कौतुक करत बोलला.
" दिनेशचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही ! कधीच नाही विसरू शकतं ! " सचिन भावुक होत बोलला. थोडावेळ शांततेत गेला. सचिन विचारात गुंतला होता. हेमंत लॅपटॉप स्क्रीनवर ओपन असलेला गुन्हेगार जॉनी चा फोटो तो निरखून बघत होता. इकडे सचिनने कोणाला तरी फोन लावला.
" हॅलो " सचिन जड आवाजात बोलत होता.
" हॅलो , दादा " पलीकडून किशोरी बोलत होती.
" काव्या...कशी आहे ? " सचिन कसातरी बोलला. काव्याच्या आठवणीने आणि काळजीने त्याचे मन भ्रूणले होते.
" ठीक आहे..पण तू ? कुठे आहेस ? " किशोरीने काळजीने विचारले.
" मी प्रज्ञाच्या खुन्याच्या खूप जवळ पोहोचलो आहे किशोरी.." सचिनच्या बोलण्यात राग दिसून येत होता.
" काय ? कोण आहे तो ? " किशोरीचे अधीर होत विचारलं. सचिन काहीच बोलला नाही.
" बोल सचिन ! कोण ? " किशोरीने पुन्हा विचारलं.
" सारंग आणि राहुल ! " सचिनचे बोलणे ऐकताच किशोरला धक्काच बसला.
" काय ? तू हे काय बोलतोय ? सारंग ? तो का प्रज्ञाला मारेल ? " किशोरीने अस्वस्थपणे विचारले. सचिन पुन्हा गप्प बसला. तेवढ्यात दिनेश दार उघडून घाईगजाईत आता आला. तो काहीतरी सांगण्याच्या घाईत होता. त्याला काहीतरी कळाले असावे. मात्र सचिन फोन वर बोलतोय हे पाहून तो गप्प बसला. हेमंत ने दिनेश कडे पाहिले. काहीतरी मोठी गोष्ट माहीत पडल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.
" बोल सचिन..काहीतरी बोल.." किशोरी ओरडून बोलली.
" मी तुला आता फक्त एवढंच सांगतो किशोरी..प्रज्ञाला मारण्यात सारंग आणि राहुलचा हात आहे ! " सचिन रंगबे बोलला.
" हे कसं म्हणू शकतो तू दादा..कोणत्या पुराव्यावरून तू सारंग वर आरोप लावतोय ? " किशोरी आता संतापली होती. सारंगने त्यांचे चाकू असलेले बोलणे ऐकले. तसा सारंगने किशोरीच्या हातातून फोन हिसकावून घेतला.
" मी पुराव्यांवरूनच बोलतोय किशोरी..सारंग आणि राहुलने प्रज्ञाच्या खुनाची सुपारी दिली होती ! पुरावा म्हणून असलेले लॉकेट ही त्या प्रख्यात गुन्हेगाराचे आहे , ज्याला सुपारी दिली..."
" गप्प बस्स ! गप्प बस सचिन..खबरदार जर एक शब्द बोलला तर ! " सचिनचे बोलणे ऐकून सारंग चांगलाच संतापून बोलला.
" माझ्यावर आरोप लावतोय तू ? माझ्यावर ? अरे , तू आणि प्रज्ञाने केलेल्या वाईट कामांची देवाने तिला शिक्षा दिलीय ! " सारंग संतापात मोठ्याने ओरडून बोलत होता
" तुला तर मी सोडणार नाही ! तू फक्त समोर ये तुला जागीच संपवतो ! " सचिन तावातावाने बोलत होता. त्याचे अंग रागाने कापत होते. संतापाने त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
"अरे तुझी हिम्मत कशी झाली ?..राहुल आणि माझ्यावर आरोप लावायची ? आं ? " किशोरी सारंग ला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. कसेबसे तिने सारंग कडून मोबाईल घेतला. सारंग मागून ओरडत सचिनला काही बाही बोलत होता.
" दादा.. तू शांत हो..तू रागाच्या भरात अस कोणावरही आरोप करू शकत नाही.." किशोरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सचिन शांत होण्याचं नावच घेत नव्हता.
" एक लक्षात ठेव किशोरी..मी राहुल आणि सारंगला आता सोडणार नाही..मी त्याला जिथे दिसेल तिथे जागेवर मारून टाकीन ! आणि मला कोणीही थांबवू शकत नाही ! " सचिन चा आता ताबा सुटत चालला होता. तो रागाने थरथर कापत ओरडत होता. त्याची अवस्था बघून दिनेश आणि हेमंत त्याला सांभाळण्यासाठी धावले.
" शांत हो सचिन..शांत हो.." दिनेश त्याला पकडून शांत करत म्हणाला. हेमंतने त्याच्या हातातून फोन घेत कॉल कट केला. दिनेशने त्याला शांत करत बेडवर बसवले. हेमंतने त्याला ग्लास मध्ये पाणी आणून दिले. एक घोट पाणी पिऊन काही वेळाने सचिन थोडा शांत झाला.
" सचिन.." दिनेश त्याच्याजवळ बसला.
" या वेळी संताप किंवा राग करण्यापेक्षा थंड डोक्याने विचार करणे जास्त महत्वाचे आहे. " दिनेश शांततेत म्हणाला.
" आता काय विचार करायचा ? आं ? आता फक्त खून करणे हेच बाकिये ! " सचिन रागाने धुसमुसत बोलला.
" साळगावकर काय बोलले दिनेश ? मघाशी तू इतक्या घाईघाईत काय सांगणार होता ? " हेमंतने प्रश्न केला. तसा दिनेश गंभीर झाला.
" सळगावकरांनी एक महत्वाची माहिती दिली आहे ! " दिनेश गंभीर होत सांगू लागला. हेमंत लक्ष देऊन ऐकत होता. मात्र सचिन वेगळ्याच विचारात गुंग होता.
" जॉनी आणि राहुल यांची जवळची ओळख आहे ! आणि राहुल खुनाची सुपारी नेहमी जॉनीला देतो. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका हत्याकांडात ही माहिती समोर आली होती. " दिनेशने माहिती पुरवली.
" आणि यात सारंग चा काही संबंध आहे ? " हेमंत ने विचारले.
" नाही ! साळगा.." दिनेश बोलणार तोच सचिन मोठ्याने ओरडला.
" काय ? यात सारंगचा संबंध नाही ? दिनेश तू चुकतोय.. मला पूर्ण खात्री आहे , यात सारंगचा खूप मोठा हात आहे ! " सचिन पुन्हा आक्रमक झाला.
" नाही सचिन...साळगावकरांनी सांगितल्या प्रमाणे सारंग नावाच्या कोणाशीही जॉनी आणि राहुलचा क्रिमिनल रेकॉर्ड मध्ये संबंध नाही..तू उगाच सारंग वर संशय घेऊ नको ! " दिनेश पुन्हा त्याला समजावत बोलला.
" म्हणजे खरा खुनी राहुल आहे ! " हेमंत दोघांकडे बघत बोलला.
" हो ! " दिनेशने त्याला दुजोरा दिला.
" आताच्या आता जाऊन संपवतो त्या राहुलला ! " सचिन दात ओठ खात बोलला.
" पण आता राहुल कुठे असेल ? " हेमंतने दिनेश कडे बघत विचारले.
" त्याच्या मित्राचा पुण्यात एके ठिकाणी बार आहे. तिथेच नशेच्या आहारी पडून असतो. नेहमी त्याच्या मित्रांच्या असलेल्या ओळखीमुळे जामिनावर सुटतो. " दिनेशने उत्तर दिले.
" उद्या सकाळी त्याचा खेळ खल्लास ! " दिनेश हाताची मूठ आवळत बोलला. आणि उठून उभा राहिला.
" उद्या का ? आता का नाही ? आताच्या आता जाऊन खल्लास करू साल्याला ! " सचिनने उठून उभा राहत दिनेशकडे पाहिले. दिनेश ने हळूच त्याच्याकडे पाहिले.
" त्यासाठी एक प्लॅन आहे ! " दिनेश हळूच बोलला.
" कसला प्लॅन ? " हेमंत ने पुन्हा प्रश्न विचारला. दिनेश हळूच इकडून तिकडे फेऱ्या मारत सांगू लागला.
" सगळ्यात पाहिले साळगावकर उद्या सकाळी राहुलला कोणत्या तरी गुन्ह्याच्या अटकेत अटक करून एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातील. अशा ठिकाणी जेथे कोणीही आपल्याला बघणार नाही. नाही कोणाला काही तपास लागेल ! नंतर आपण तेथे पोहोचून खेळ संपवायचा ! सिम्पल ! " दिनेशने दोघांना प्लॅन समजावून सांगितला. तसा हेमंतच्या चेहऱ्यावर समाधानी स्मित उमटले.
" म्हणजे उद्या आपला बदला पूर्ण होणार ! प्रज्ञाच्या खुनाचा बदला ! " बोलताना हेमंतचे डोळे पाणावले.
" दिनेश.." सचिन दिनेश जवळ जाऊन उभा राहिला.
" तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तू जी मदत केली आहे , त्याची मी कधीच परतफेड करू शकणार नाही.." सचिन भावुक होत बोलला.
" उपकार ?..अरे हे तर कर्तव्य आहे माझे..मैत्रीचे..हे सगळं मी आपल्या मैत्रीसाठी...प्रज्ञासाठी केलंय.." दिनेश चा आवाज आता जड झाला होता. त्याला मनातून भरून आले होते.
" जिला मी ओळखत ही नव्हतो , तिचे हसु बघून मला आपलेपणा वाटावा..तिच्याबद्दल वाईट वाटावं..तिच्याबद्दल आत्मीयता वाटावी..हे खरंच प्रज्ञाचे मोठेपणं आहे. " दिनेश डोळ्यातील पाणी पुसत बोलला.
सचिनने त्याला धीर देत त्याच्या पाठीवर हात ठेवला.
दिनेशनेही विश्वासाने त्याच्याकडे पाहिले.
" आता आराम करूया..हं ? " दिनेश सचिनच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला.
" हं " म्हणत सचिन वॉशरूमकडे निघून गेला.


रात्रीचे दोन वाजून गेलेले होते. हेमंत आणि दिनेश शांतपणे झोपलेले होते.सचिन बेडवर पडून मात्र जागाच होता. त्याला झोप लागत नव्हती. प्रज्ञाच्या अनेक आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून जात होत्या. ते भेटल्यापासूनचे अनेक प्रसंग त्याला आठवत होते. त्यांची पहिली भेट. कॉलेजमधली. हसऱ्या चेहऱ्याची , दुसऱ्याला नेहमी आनंदात ठेवणारी , अभ्यासात हुशार , स्वच्छ मनाची प्रज्ञा. त्यांनतर त्यांनी सोबत घालवलेला प्रत्येक वेळ , प्रत्येक प्रसंग आठवणींच्या रूपाने सचिनसमोर झळकत होता. प्रज्ञाला दिलेले शेवटचे वचन त्याला आठवले , तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. काव्याला शिक्षिका बनवण्याचे ते वचन. स्वतःचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही , म्हणून काव्याच्या रूपाने तरी ते पूर्ण व्हावे ही तिची इच्छा होती. शिक्षण हे महत्वाचे आहे , असेच ती जन्मभर समजत आली. शिक्षक बनून दुसऱ्याला सुशिक्षित बनवण्याचे काम तिला करायचे होते. जे ती पूर्ण करू शकली नव्हती. मात्र काव्याने हे काम करावे अशी तिची मनापासून इच्छा होती. आणि याचेच वचन तिने त्याच्याकडून मागितले होते. जर ती आज असती तर नक्कीच तिने यासाठी प्रयत्न केले असते. पण आता तिला दिलेले वचन पूर्ण कण्याची जबाबदारी सचिनची होती. त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता. अशा अनेक आठवणी समोर येत असताना त्याला अचानक काहीतरी आठवले. काहीतरी वाईट. ते आठवताच त्याला घाम फुटला. तो अस्वस्थ होऊन उठून बसला. हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने बाजूला झोपलेल्या हेमंत आणि दिनेश कडे पाहिले. ते शांतपणे झोपलेले होते. जणू एखादे वाईट स्वप्न पडावे तशी त्याची हालत झाली. पण ती एक आठवण होती. एक वाईट आठवण. जी त्याला छळत होती.


सकाळची उन्हाची कोवळी किरणे चेहऱ्यावर पडताच सचिन जागा झाला. डोळे किलकिले करत त्याने आजूबाजूला पाहिले. हेमंत खिडकीजवळ उभा राहून फोनवर बोलत होता.
" हो येतो गं..आज नक्की येतो.ठेव. " हेमंत फोन ठेवत सचिनजवळ येऊन उभा राहिला.
" च्यायला , माझी बायको लई डोकं खाती बाबा. " हेमंत गमतीने बोलत सचिनजवळ बसला.
" झोप झाली नाही वाटत ! " हेमंत सचिनचा चेहरा बघून हसत बोलला.
" होणार तरी कशी ? रात्रभर विचाराने झोप लागली नसेल. आज तो दिवस आहे ज्याची तू वाट पाहत होता सचिन. " हेमंत किंचितस हसत बोलला.
" दिनेश कुठे आहे ? " दिनेश दिसत नाही हे बघून सचिनने विचारले.
" खाली. साळगावकरांशी बोलत आहे. " हेमंतने सांगितले.
सचिनने शेजारी पडलेला आपला फोन उचलून किशोरीला फोन लावला.
" काव्याकडे दे. " फोन उचलल्या उचलल्या सचिन बोलला. किशोरीने शाळेसाठी तयार झालेल्या काव्याकडे फोन दिला. आणि तिच्याशेजारी उभी राहिली.
" हॅलो काव्या..बाळा.." बोलताना सचिनचे मन भरून आले. त्यावर काव्याने किशोरीकडे बघत काहीतरी इशारा केला.
" ती विचारतेय..माझे पप्पा कधी येणार ? " किशोरीने शांतपणे सांगितलं.
" पप्पा आज येतील हा बाळा ! संध्याकाळी भेटूया हा ! " सचिन लाडीकपणाने बोलला. यावर काव्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरले. ते बघून किशोरी मनोमन खुश झाली.
" फार खुश झालीये ती.." किशोरी हलकं हसत बोलली. पण लगेच तिला कालचा प्रसंग आठवला तशी ती नाराज झाली.
" किशोरी..काव्याला सांभाळ. मी तिला आता सांभाळू शकेल का नाही माहीत नाही ! " सचिनने किशोरीच्या बोलण्याची वाट न पाहता फोन कट केला. सचिनने आपले पाणावलेले डोळे पुसले. त्याला बघून हेमंतलाही वाईट वाटले.
" हेमंत " सचिनने बाजूला बसलेल्या हेमंत कडे पाहिले.
" तू माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केले आहे. अजून एक विनंती आहे." सचिनने हेमंत समोर आपले हात जोडले.
" हे काय करतोय ? " हेमंतने सचिनचे जोडलेले हात खाली घेतले.
" जर मला काही झालं तर काव्याला तू संभाळशील.." सचिन विनंतीच्या सुरात बोलला.
" तुला काहीही होणार नाही..तू कशाला काळजी करतो ? " हेमंत त्याला समजावत म्हणाला.
" मला काव्याची काळजी वाटते हेमंत..मी नसलो तर तीच कस होईल ? " सचिन काव्याच्या काळजीने बोलला.
" तू नकारात्मक विचार नको करू सचिन..सगळं ठीक प्लॅननुसार होईल..तू उगाच टेन्शन कशाला घेतो ? " हेमंत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात दिनेश रूममध्ये आला.
" काय झालं सचिन ? " सचिनची अवस्था बघून दिनेश ने विचारले.
" यार काही सांग याला. उगाच नको ते विचार करतोय. म्हणतोय मी नाही राहिलो तर काव्याचे काय होणार ? " हेमंत ने सचिनला समजावण्यास दिनेशला सांगितले.
दिनेश हळूच बेडच्या एका कोपऱ्यात बसला. आणि सचिनकडे एक नजर टाकली.
" तुला काही होणार नाही याची जबाबदारी माझी ! बस्स ? " दिनेश सचिनला आश्वासन देत बोलला.
" नको ती काळजी करू नको. उठ आवरून तयार हो. बरोबर बारा वाजता साळगावकर राहुलला घेऊन एका निर्जन ठिकाणी पोहोचतील...आणि मग आपण ! " दिनेश बेडवरून उठला. रुमच्या एका कोपऱ्यात पडलेली आपली बॅग त्याने उचलली. त्यातून एक लेदरचे पाकीट बाहेर काढले. आणि ते घेऊन त्यादोघांजवळ आला.
" हे आपले हत्यार ! " दिनेशने ते पाकीट दोघांसमोर धरले.
" हे काय ? " हेमंत ने प्रश्न केला.
" पिस्तूल ! " दिनेश चेहऱ्यावर स्मित उमटवत बोलला.
" ही कुठे भेटली ? " सचिन ने विचारले.
" तुला तर माहीतच आहे , माझे वडील राजकारणात होते ते..त्यांचे अनेक विरोधक असल्याने त्यांनी नेहमी ही पिस्तुल स्वतःजवळ ठेवली होती. आणि आता ती आपल्याला कामात येईल ! " दिनेश पिस्तुल पॉकेटमधून बाहेर काढत बोलला.
" तू ही नेहमी तुझ्याजवळ ठेवतो ? " हेमंतचा प्रश्न.
" हो ! नेहमी ! " दिनेश पिस्तुल हातात पकडत उत्तर दिले.
" अस काहीच नाही ज्याच्यावर तुझ्याकडे काही उपाय नाही दिनेश.." हेमंत कौतुकाने बोलला. यावर दिनेश हळूच हसला.


सचिन पार्किंग मध्ये गाडीला टेकून उभा होता.कसल्यातरी विचारात गुंगलेला. लांबून चालत येणाऱ्या हेमंत आणि दिनेशची चाहूल लागताच तो विचारातून बाहेर आला. दोघे हसत काहीतरी बोलत चालत येत होते.
" माझ्या सारख्या गरिबाला काय माहीत त्याची चव." हेमंत चालत गाडीजवळ पोहोचला.
" आता विचार करायची नाही , कृती करायची वेळ आहे मित्रा. " हेमंत सचिनच्या खांद्यावर हात मारत म्हणाला.
" हम्म " म्हणत त्याने हेमंत कडे पाहिले. आणि मागच्या सिटचे दार उघडून आत बसला. दिनेश ड्रायव्हिंग सीटवर बसला. हेमंत बसल्यावर तो गाडी चालू करणार तेवढयात सचिन बोलला.
" एक मिनिट दिनेश.." दिनेशने मागे वळून पाहिले.
" काय सचिन ? " दिनेशने विचारलं.
" मी सांगतो तिकडे चल " सचिन बोलला.
" कुठे ? " दिनेशने न कळून विचारलं.
" प्रज्ञाच्या आई वडीलांकडे ! "
" काय ? प्रज्ञाचे आई वडील ? आणि इकडे ? " दिनेशला काही कळेनासे झाले.
" प्रज्ञाचे आईवडील पुण्यातच असतात. पण...प्रज्ञाचा खून झाल्यापासून ते सचिनशी बोलत नाहीत..ते या सगळ्या साठी सचिनलाच जबाबदार समजतात. " हेमंतने स्पष्ट केले. दिनेश मात्र दुःखी झाला.
" प्रज्ञाचा खून झाला तेव्हा सचिन आणि ती त्यांच्याकडेच चालले होते. " हेमंत बोलला.
" त्यांनी मला कधीही आई वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. ते माझ्याशी बोलू किंवा नाही..पण आज मला फक्त त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे..आज त्यांच्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय जो मिळणार आहे.." सचिन जड अंतकरणाने बोलला.
" मला आज त्यांना भेटायची खुप इच्छा आहे दिनेश.." सचिन बोलला.
" ठीक आहे , जशी तुझी इच्छा. " म्हणत दिनेशने गाडी सुरू केली.

दिनेशने सचिन सांगेल त्या दिशेने गाडी आणत एका बिल्डिंग खाली उभी केली. सचिन गाडीतून उतरला. हेमंत आणि दिनेश गाडीतच बसून होते. सचिन काय बोलायचं..कस बोलायचं याचा मनोमन विचार करून बिल्डिंगमध्ये शिरला. विचारांच्या तंद्रीत पायऱ्या कधी चढल्या गेल्या त्याला कळलेच नाही. तो प्रज्ञाच्या आई वडिलांच्या रुमसमोर उभा होता. कसातरी धीर करतच त्याने बेल वाजवली. काहीवेळाने एका वयस्कर व्यक्तीने दार उघडले. समोर सचिनला बघून त्यांचा चेहरा उडाला. रागाने त्यांचे अंग थरथर कापू लागले.
" बाबा ! " सचिनच्या तोंडातून नकळतच शब्द फुटले. ते प्रज्ञाचे वडील सुधाकर पंडित.
" का आला परत ? मला मारायला ? " सुधाकर रागाने बोलले.
" बाबा प्लिज मला आत येउद्या..मला आपल्याशी काही बोलायचे आहे. " सचिन विनंतीच्या सुरात बोलला.
सुधाकर यांनी रागाने दार उघडले आणि मध्ये निघून गेले. सचिन आत गेला. सुधाकर खाली शून्यात नजर लावून सोफ्यावर बसले होते. वर भिंतीवर नजर जाताच सचिनच्या पायाखालची जमीनच हलली. त्याच्या अंगाला कंप सुटला. भिंतीवरील प्रज्ञाच्या आई रीमाच्या फोटोवर हार चढवलेला होता.
" आ..आईच्या फोटोला हा..हार ! " सचिन चाचरत बोलला.
" तूच मारली तिला ! माझ्या मुलीचा आणि पत्नीचा हत्यारा आहे तू ! " सुधाकरांनी दुःखी होत थेट सचिनवर आरोप लावला. त्यांचे डोळे पाणावले.
" बाबा..अस बोलू नका बाबा..तुम्ही का मला प्रज्ञाचा गुन्हेगार समजता ? त्यात माझी काहीच चूक नव्हती बाबा..मला समजून घ्या ! " सचिन रडतच त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून बोलला.
" बिचारी रीमा..मुलीच्या विरहाने आपले ही प्राण त्यागले तिने.." सुधाकर त्यांच्या पत्नीच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडत होते.
" मला फक्त आशीर्वाद द्या बाबा..आज मी प्रज्ञाला न्याय मिळवून देतोय बाबा..मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.." सचिनने रडत रडत त्यांचे पाय पकडले. त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्याने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
" न्याय ? अरे तू मरशील तेव्हा मिळेल नाय..माझ्या मुलीला आणि पत्नीला.." सुधाकर रागाने ओरडत होते. त्यांनी सचिनला पाय झटकत लांब केले. सचिन कसातरी उभा राहिला. सुधाकर खाली बघत रडत होते. त्यांचा राग आणि दुःख अश्रूंच्या रूपाने टपकत होते.
" येतो मी...पण मी अजूनही तुम्हाला सांगतो बाबा..मी गुन्हेगार नाही ! " सचिन डोळे पुसत बोलला. आणि जड अंतकरणाने रुममधून बाहेर पडला.


खाली दिनेश आणि हेमंत गाडीतच बसून त्याची वाट बघत होते. दिनेश पुढं काय आणि लस करायचं याची उजळणी करत होता. हेमंत मात्र सचिनच्या काळजीत होता. सचिन येताना दिसताच त्याने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा बघून हेमंतला काय ते समजले. दिनेश मात्र त्याला पाहून दु:खी झाला. मात्र काही बोलला नाही.
" सचिन , मी तुझी अवस्था समजू शकतो..पण आपल्या पुढच्या कामासाठी तुला मजबूत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी हिम्मत हरू नको. " दिनेशने त्याला समजावत गाडी चाकू केली.

थोडावेळ सचिन शांत व्हायला हवा म्हणून दिनेशने गाडी एका निर्जन स्थळी गाडी उभी केली. जेथे राहुलला आणले जाणार होते त्यापासून काही अंतरावर.
तिघेही तेथे गाडीतून उतरले. दिनेश ने दूरवर एक नजर टाकली. एके ठिकाणी एक पडकं घर त्याला दिसत होतं. कदाचित तेच ते ठिकाण होते जे साळगावकरांनी सांगितले होते.
" इथे तर लांब पर्यंत कोणी नाही ! योग्य जागा निवडलीये. " हेमंत आजूबाजूला बघत बोलला. त्यांची गाडी उभी होती तिथून चारही बाजूनी पडीक जागा होती. काही ठिकाणी पडलेली घरे , तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग. पण एकही माणूस त्या परिसरात दिसत नव्हता. कोणाला इकडे काहीही घडलं तरी कळायला मार्ग नव्हता. डेडबॉडी पडली तरी ती बरेच दिवस कोणी पहिली नसती. यामुळे हे एक योग्य ठिकाण दिसून येत होते.
काही वेळाने दिनेशचा फोन वाजला. त्याने फोन उचलेपर्यंत कट ही झाला.
" चला , आपली शिकार वाट पाहतयं. " दिनेश दोघांकडे बघून बोलला.
" पण इथे तर कोणीच दिसत नाही ! " हेमंत आजूबाजूला बघत म्हणाला.
" पुढे त्या पडक्या घरात. चला " दिनेश त्या पडक्या घराकडे हात दाखवत बोलला. हेमंत दिनेश बरोबर त्या घराकडे बघत चालू लागला. मात्र सचिन मागेच गाडीला टेकून कसल्यातरी विचारात गुरफटलेला होता.
" सचिन.." हेमंत च्या आवाजाने तो भानावर आला. त्याने हळूच हेमंतकडे पाहिले. मात्र जागचा हलला नाही.
त्याला बघून हेमंत पुन्हा त्याच्याजवळ आला. दिनेश पुढेच उभा राहून त्यांच्याकडे आणि पडक्या घरावरून नजर फिरवत होता.
" हेमंत.." सचिनला काहीतरी बोलायचे होते.
" चल यार..काय करतोय ? " हेमंत काहीसा वैतागत बोलला.
" मला काहीतरी चुकीचं वाटतयं.. का माहीत नाही पण अपराधीपणा वाटतोय." सचिन खाली नजर लावून बोलला.
" तू आता हे काय बोलतोय तू ? इतक्या दिवस तूच खुन्याला पकडून मारायचं बोलत होता..आणि आता ? आता हे काय ? " हेमंतला सचिन असा का बोलतोय काही कळत नव्हते.
" ते मी बहुतेक भावनेच्या भरात बोलत होतो..पण आता काहीतरी चुकीचं वाटतय.." सचिन त्ययाच्याकडे नजर टाकत बोलला.
" सचिन..तुझं डोक तर ठीक आहे ना ? इतक्या दिवसांपासून आपण ज्याला शोधत होतो , तो सापडलाय. आणि तू ? " हेमंत आता चांगलाच वैतागला होता. त्यांना बघून दिनेश ही त्यांच्याजवळ आला.
" दिनेश याला तू च समजावं यार.." हेमंत ने मान झिडकरात दिनेशला सांगितले.
" काय झालं ? सचिन चल..तू ज्याला इतक्या दिवसांचा शोधत होतास तो काही पावलांवर आहे आणि आता ? काय झालं ? " दिनेश ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
" दिनेश..मला का कोण जाणे..पण हे सगळं चुकीचं वाटतयं. " सचिन अपराधीपणा वाटत असल्यासारखा बोलला.
" सचिन ! " दिनेशने मान मुरडत नाराजी पणाने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.
" मी तुला इतकी मदत केली..तुला प्रज्ञाच्या खुन्याच्या इतक्या जवळ घेऊन आलो. आणि तू ? नेमक्या वेळेवर अस काहीतरी बोलतोय ? " दिनेश चांगल्याच नाराजीने बोलला.
" हे बघ सचिन तुला आपल्या मैत्रीची शप्पथ आहे..तू प्रज्ञाच्या खुन्याला असच नाही सोडू शकत ! " हेमंत संतापाने बोलला. सचिन आता गप्प झाला. त्याने हळूच आपले डोळे मिटले.
" तुला माझ्या मैत्रीची शप्पथ ! प्रज्ञा सारख्या चांगल्या स्त्रीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याने ज्या प्रकारे प्रज्ञाची हत्या केली , त्याच्या समोर आपण करतोय ती शिक्षा काहीच नाही ! " दिनेश संताप आणि दुःखाने बोलला. हेमंत अस्वस्थपणे सचिनकडे बघत उभा होता.
सचिनने डोळे न उघडताच वर पाहत एक मोठा श्वास घेतला. हळूच डोळे उघडत त्याने दिनेश आणि हेमंत कडे पाहिले.
" चूक तर चूक ! मी प्रज्ञासाठी हे ही करायला तयार आहे ! तुमच्या मैत्रीच्या शप्पथेसमोर मी पण काही करू शकत नाही..भलेही या अपराधी पणाने मी जन्मभर पस्तावेल..पण आता मागे हटणे योग्य नाही ! " सचिन विश्वासाने बोलला.
" चला..राहुलचा काळ आलाय आता ! " सचिन त्वेषाने बोलत त्या पडक्या घराच्या दिशेने चालू लागला. यावर दिनेश हलकेच हसला. आणि तो ही त्या दिशेने चालू लागला. हेमंतही आपली नाराजी दूर करत त्यांच्यासोबत निघाला.

सचिन पुढे चालत घराजवळ आला. डाव्या बाजूचा रूम पूर्णपणे जमीनदोस्त झालेला होता. तर त्याच्या बाजूला एक रूम होता. ज्याच्या भिंतीवर तडे गेलेले होते. तो रूम ही जास्त दिवस तग धरू शकणार नाही हे स्पष्ट दिसत होते...पण आजूबाजूला पोलीस जीप का दिसत नाही याचे सचिनला आश्चर्य वाटले. त्याने मागून येणाऱ्या दिनेश कडे प्रश्नांकित नजरेने पाहिले.
" साळगावकर नक्की राहुल ला घेऊन आले आहेत ? आजूबाजूला तर कोणी दिसत नाही. पोलीस जीप ही नाही ! " सचिन आजूबाजूला बघत बोलला.
" मध्ये तर चल..सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ! " दिनेश हळूच हसला. का माहीत पण त्याचे स्मित काहीतरी वेगळेच होते. आजूबाजूला पुन्हा एक नजर टाकत सचिन आत शिरला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. कुठूनही उजेड येण्यासाठी जागा नव्हती. खोलीच्या मध्यभागी एक विजेचा बल्ब लटकलेला त्याला दिसला. बाजूच्या भिंतीवर हाताने चाचपडत त्याने सर्व बटणे चालू केली. तसा बल्ब चा अंधुकसा पिवळा प्रकाश खोलीभर पसरला. पण आतमध्ये कोणीच नव्हते !
" हे काय ? इथे तर कोणीच नाही ! " सचिनने त्या छोट्याश्या खोलीत सगळीकडे नजर फिरवत चक्रावून विचारले. हेमंत इकडे तिकडे बघत होता. ती खोली पूर्णपणे रिकामी होती. संपूर्ण खोलीत धुळीशीवाय कशाचेही अस्तित्व नव्हते. सचिन आणि हेमंत चक्रावून इकडे तिकडे बघत होते. दिनेश मात्र शांत होता.
" दिनेश , साळगावकरांना फोन लाव..इथे कोणीच कस नाही ? " सचिन आता सैरभैर होत म्हणाला. यावर दिनेश मोठ्याने हसला. पूर्ण खोलीभर त्याचे विकट हास्य पसरले. हेमंत आणि सचिनला आता काही समजेनासे झाले. दिनेश असा का करतोय ?
" दिनेश..काय झालं ? तू हसतोय का ? " हेमंतने अस्वस्थपणे विचारले.
" दिनेश..साळगावकर कुठे आहेत ? आणि राहुल ? नक्की काय चालू आहे दिनेश ? बोल.." सचिन आता वैतागून मोठ्याने ओरडत होता. दिनेशचे विकट हास्य अजूनच वाढले.
" कोण साळगावकर ? " दिनेशने मोठ्याने हसत विचारले. अंधाऱ्या खोलीत त्याचा चेहरा क्रूर भासत होता. सचिन आता संतापला. काहितरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आले.
" बोल दिनेश..राहुल कुठे आहे ? " हेमंत ने कळकळीने दिनेशला विचारले. यावर दिनेश अधिकच कुटील हसला. आता मात्र सचिनचा पारा चढला.
" दिनेश...म्हणजे तू मला फसवलं ? मला येड्यात काढलं ? का दिनेश ? का ? " सचिन मोठ्याने ओरडला.
" दिनेश...बोल ! कुठे आहे राहुल ? कुठे आहे जॉनी ? आणि साळगावकर ? " हेमंत संतापाने ओरडला. यावर दिनेशचे हसू अधिकच क्रूर झाले. सचिनचा आता संयम सुटला त्याने थेट दिनेश ची कॉलर पकडली.
" बोल ! बोल ना ! कुठे आहे प्रज्ञाचा खुनी ? " सचिन शक्य तितक्या जोराने ओरडत होता.
" प्रज्ञाचा खुनी तुझ्यासमोर आहे ! " दिनेश कपटी हसत बोलला. यावर सचिनला प्रचंड मोठा धक्का बसला. त्याची कॉलर वरची पकड ढिली झाली.
" काय ? " सचिन मटकन खाली बसला. तो पूर्ण बधिर झाला.
" समोर म्हणजे ? म्हणजे कोण ? तू काय बोलतोय ? " आता हेमंतने दिनेशची कॉलर पकडली. दिनेशच्या चेहऱ्यावरचे क्रूर हसू मात्र कमी झालेले नव्हते.
" मीच प्रज्ञाचा खुनी आहे ! " दिनेश मोठ्याने हसत बोलला. आता मात्र सचिन आणि हेमंत पूर्ण पणे बधिर झाले. सचिन हतबलतेने जमिनीवर बसून होता. तो पूर्ण सुन्न होऊन बसला होता. दिनेशचे कपटी , क्रूर हसूही त्याला ऐकू येईनासे झाले. हेमंत ने अधिकच जोरात दिनेशची कॉलर पकडली.
" हराम**..**** " हेमंत ने कॉलर पकडून जोरात त्याला बाजूच्या भिंतीवर ढकलले. दिनेश जोरात भिंतीवर आदळता आदळता वाचला. जोरात जाऊन तो खाली पडला. हेमंत वेगाने त्याच्या अंगावर धावला. खाली पडलेल्या दिनेशच्या छातीवर बसत त्याने पुन्हा त्याची कॉलर घट्ट पकडली.
" बोल..का मारलं प्रज्ञाला ? आ ? काय बिघडवल होत तिने तुझं ? बोल ना साल्या.." हेमंत संतापाच्या भरात जोराजोरात ओरडत होता. दिनेश अजूनही हसत होता. हेमंत जोरजोराने त्याच्यावर ओरडत होता. मात्र त्याच्यावर त्याचा काहीही फरक पडत नव्हता. सचिन अंगात जीव नसल्यासारखा हळूच उठून उभा राहिला.
" इतका मोठा धोका ! मित्र बनून इतकं नीच काम केलं तू ! " सचिन संतापाने बोलत हळूच दिनेश जवळ जाऊन उभा राहिला.
" या सगळ्याची एकच शिक्षा.." सचिनने आपल्या पॅन्ट मध्ये लपवलेली पिस्तुल बाहेर काढली. तीच पिस्तुल जी दिनेश ने त्याला दिली होती.
" हह " हेमंत ने जोरात दिनेशची कॉलर सोडली आणि बाजूला झाला. सचिनने पिस्तूलचा नेम दिनेशवर धरला.
" मार साल्याला ! जिवंत सोडू नको ह्या ह****ला.." हेमंत रागारागाने दिनेशवर शिव्या बरसत होता.
" का केलं हे सगळं...का ? " सचिन जोरात ओरडला. दिनेश च्या चेहऱ्यावर मात्र हृदय अधिकच पसरले. भीती किंवा पश्चातापाची लकेरही त्याच्या चेहऱ्यावर नव्हती.
" बदला ! " सचिनकडे रोखून बघत दिनेश पुटपुटला.
" कसला बदला ? आं ? " हेमंत रागाने थरथर कापत होता.
" बोल ! " सचिन पिस्तुलच्या ट्रिगर वर हात ठेवत जोरात ओरडला.
" स्वताला विचार तू ! आठव तू काय केलं होतं..आठव ! " दिनेश पडल्या पडल्या मागे भिंतीला टेकून ओरडला.
सचिनचा आता पारा अजूनच चढला.
" स्वतःला विचारू म्हणजे ? उगाच काहीतरी बरळू नको ! " सचिनने ट्रिगर वरची पकड अजूनच घट्ट केली.
" तू एक नंबर चा नीच आहे ! तू आणि प्रज्ञा नी माझ्या भावाचा निष्कारण जीव घेतला ! " दिनेशने रागाने ओरडत सचिनवर आरोप केला. तो अस बोलताच सचिनला काहीतरी आठवले. त्याची पिस्तूलवरची पकड ढिली झाली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तो नकळत मागे सरकला.
" हा खोट बोलतोय सचिन..उगाच काहीतरी आरोप करतोय..वाट पाहू नको , उडव साल्याला " हेमंत संतापाने बोलला. सचिन कसल्यातरी धक्क्यात होता. काहीतरी आठवून तो सुन्न झाला. हेमंत दिनेशवर गोळी चालवण्यासाठी जोरजोरात ओरडत होता. सचिनच्या हातातून पिस्तुल पडणार तेवढ्यात..जोरात आवाज झाला...धाड्ड... !!!
सचिन जोरात खाली पडला. त्याच्या पायातून एक जोरात सणक गेली. पायात तीव्र वेदना होऊ लागली. तसा तो पाय पकडून विव्हळू लागला. जखमेतून वाहणाऱ्या रक्ताने त्याचे हातात माखले.
" सचिन ! " त्याची अवस्था बघून हेमंत ने पटकन त्याला पकडले. सचिनने डोळे किलकिले करत दरवाज्याकडे पाहिले. डोळ्यासमोरील अंधारात त्याला एका माणसाची आकृती त्याच्या दिशेने येताना दिसली. हेमंत ने घाबरतच त्याच्याकडे पाहिले. हातात पिस्तुल घेऊन एक माणूस समोर येऊन उभा राहिला. त्याला बघून दिनेश जोराजोरात हसू लागला. तो माणूस पिस्तुलचा निशाणा हेमंतवर धरत दिनेशच्या हसण्यात सामील झाला. त्यांच्या विकट हास्याने ती अंधारी खोली अधिकच भयमय भासत होती.
" कोण तू ? आणि सचिनच्या का मागे पडलाय ? " हेमंत पिस्तुल पकडून उभ्या असलेल्या माणसावर जोरात ओरडला. सचिन आणि हेमंत त्यांच्यासमोर हतबल झाले होते.
" काय केलं मी ? का...काय केलं होतं प्रज्ञाने " सचिन वेदनेने विव्हळत कसातरी बोलला.
" आठव...शिमला ला असताना काय केलं तू ? माझ्या भावाला का मारले ? " तो माणूस संतापाने ओरडला. मात्र मनातून तो थोडा दुखावलेला दिसत होता.
" तुम्ही काय बोलताय ? सचिनने काहीही केलेलं नाही ! " हेमंत काकुळतीला येऊन बोलत होता. तो मनातून घाबरला होता. मात्र विरोध करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.
" मी काही पण बोलतोय ? आं ? विचार या ह*****ला याने आणि त्या प्रज्ञाने आमचा भाऊ महेश ला मारले की नाही ते ! " तो माणूस संतापाने बोलला.
" आमच्या भावाला ? " हेमंत ला काही कळत नव्हते.
" हो...मी सुरेश घाटगे ! " तो माणूस हेमंत कडे रागाने बघत बोलला.
" काय ? " हेमंत आता पूर्णपणे बधिर झाला होता. काय चालू आहे त्याला काहीच समजत नव्हते.
" त्याला आम्ही...न...नाही..मारले.." सचिन कसातरी बोलला.
" मग ? कोणी मारले ? तुमच्याशिवाय कोण होत माझ्या भावाचा खून झाला तेव्हा ? " दिनेश उठून उभा राहत बोलला.
" कोणाला ? कोणाबद्दल बोलतोय तू सचिन ? " हेमंतने त्याला सांभाळत विचारले. नेमकं हे कशाबद्दल बोलताय ? त्याला काहीच समजायला मार्ग नव्हता. सचिनच्या डोळ्यासमोरून तो भयानक वाईट प्रसंग तरळू लागला.



प्रज्ञा ' महेश रेस्टॉरंट अँड लॉज ' या हॉटेलच्या आवारात असणाऱ्या गार्डन मधील एका बाकड्यावर सचिनची वाट पाहत बसली होती. तो अजूनही रूममध्ये फ्रेश होत होता. तिच्या उजव्या बाजूला लाईट नसल्याने गडद अंधार होता. तर डाव्या बाजूला कडाक्याची थंडी असल्याने काही लोकांनी शेकोटी पेटवलेली होती. कधी एकदाच जाऊन शेकायला मिळेल याची तिला उत्सुकता होती. मात्र सचिन अजूनही आलेला नव्हता. थोड्यावेळ ती शेकोटी भोवती खेळणाऱ्या लहान मुलांची गंमत बघत होती. समोरून सचिन येताच तिने त्याकडे पाहिले.
" चल , शेकोटीकडे जाऊ " प्रज्ञा उठत सचिनला म्हणाली.
दोघेही शेकोटीजवळ जाऊन शेकत गप्पा मारू लागले.
गप्पा मारता मारता त्यांची अनेकांशी ओळख झाली.नेमकं त्याच वेळी हॉटेलच्या स्थापना दिन असल्याने एक मोठा कार्यक्रम हॉटेलमधे आयोजित करण्यात आलेला होता. त्यात हॉटेलचे मालक महेश घाटगेही उपस्थित होते. प्रज्ञा आणि सचिनला त्या कार्यक्रमात खूप मजा आली.कार्यक्रम उरकल्यावर ते दोघे पुन्हा त्या बाकड्यावर बसून गप्पा मारत होते. रात्र झाल्याने हॉटेल मध्ये थांबलेले लोक मध्ये रूमवर निघून गेले. आता गार्डनमध्ये फक्त सचिन आणि प्रज्ञा बाकी होते. दोघे बोलत असतानाच त्यांना एक हॉटेलचे मालक गार्डनमध्ये चकरा मारताना दिसले. त्यांनी या दोघांना बघून त्यांच्यासोबत गप्पा चालू केल्या. औपचारिक बोलणे झाल्यावर सचिनने आपल्या कामाबद्दल सांगायला सुरुवात केली. मालक महेश घाटगे यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात.....
बंदुकीच्या गोळीचा धाड्ड.. आवाज झाला ! आवाजाने दोघे घाबरले. त्यांना काही कळायच्या आत महेश खाली कोसळले. पाठीमागून त्यांना कोणीतरी गोळी मारली होती. ते कोसळतात प्रज्ञाने त्यांना पकडले. सचिन लागेच गोळी चालवली गेली त्या दिशेने पळाला. गडद अंधार असल्याने कोण काही दिसत नव्हते. सचिन ने पळत जाऊन सगळीकडे पाहिले मात्र हल्ला करणारी व्यक्ती अंधारात कधीच फरार झाला असावा. आजूबाजूला कोणी नाही हे बघून तो पळत प्रज्ञा जवळ गेला. प्रज्ञाने महेश यांना पकडल्यामुळे तिच्या हाताला रक्त लागले होते. झालेल्या आवाजाने हॉटेलममधील स्टाफ आणि लोक पळतच बाहेर आले. बाहेर आलेल्या लोकांनी प्रज्ञाच्या हाताला रक्त बघून तिच्यावरच संशय घेतला.
" त्या बाजूने कोणीतरी गोळी चालवली ! त्या दिशेने जाऊन पहा.." सचिन पळत पळत येऊन कर्मचाऱ्याना सांगितले. तसे काही कर्मचारी आणि काही लोक त्या दिशेने पळाले. एका जणाने ताबडतोब अम्ब्युलन्स ला फोन लावला.
" पप्पाsss..पप्पाsss.." एक तरुण मधून पळत येत थेट महेश यांच्या जवळ जात त्यांच डोकं हातात घेऊन मोठमोठ्याने रडू लागला. झालेल्या प्रसंगाने प्रज्ञा खूप घाबरली होती. हातावर रक्त बघून तिला अपराधीपणा वाटू लागला. तिला सचिनने कसेबसे सांभाळले. त्या तरुण मुलाने प्रज्ञा आणि सचिनवर एक जळजळीत कटाक्ष टाकला.
" तुम्हीच मारले माझ्या पप्पांना ! " त्या तरुणाने थेट त्यांच्यावर आरोप लावला.
" काय ? हे काय बोलताय तुम्ही ? " त्याच्या आरोपाने सचिन गडबडला.
" यांच्या हाताला रक्त लागलं आहे..तुम्हीच मारलं माझ्या पप्पांना ! " तो तरुण रडत मोठमोठ्याने ओरडत होता.
" हो यांनीच मारलं यांना , यांच्याशिवाय इथे कोणीही नव्हतं.." मॅनेजर ने त्या तरुणाला साथ देत दोघांवर शाब्दिक हला चढवायला सुरुवत केली. त्यांना बघून इतर लोकांनीही थेट त्यांच्यावर आरोप लावायला काही विचार केला नाही.सगळ्यांनी अश्या प्रकारे सत्य समजून न घेता त्यांच्यावर प्रहार चालू केल्याने सचिनला काय करावे काही सुचेनासे झाले. आपली काहीही चूक नसल्याचे ते कळकळून सांगत होते. मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हते. हे सगळं सुरू असतानाच मालकांचा पुतण्या मधून पळत पळत आला. महेश यांना अश्या अवस्थेत बघून त्यानेही हंबरडा फोडला. इतरांचे ऐकून त्याने ही प्रज्ञा आणि सचिनवर आरोप लावायला सुरुवात केली. अम्ब्युलन्स येऊन महेश यांना घेऊन गेली. मात्र महेश यांच्या पुतण्या आणि मुलाने थेट पोलिसांची धमकी दिली. याने सचिन आणि प्रज्ञा प्रचंड घाबरले.
कोणीतरी सीसीटीव्ही बघण्याचे सुचवले. मात्र त्या बाजूचा सीसीटीव्ही खराब असल्याने सचिन आणि प्रज्ञा यात आणखीनच अडकले.
कोणाकडे बंदूक सापडते का हे पाहण्यासाठी संपूर्ण हॉटेलची झाडाझडती घराण्यात आली.पण ज्याने खून केला त्याने आधीच ती बंदूक सचिन आणि प्रज्ञाच्या रूममध्ये ठेवलेली होती. कोणीतरी मुद्दामून त्यांना अडकवण्याचा कट रचला होता. या सगळ्यामुळे प्रज्ञा आणि सचिन फारच घाबरले होते. सर्व अनपेक्षितपणे घडल्याने त्यांना मानसिक धक्का बसला होता. सचिनच्या वडीलांची शिमल्यात जुनी ओळख असल्याने कसेबसे यातून सुटले. मालकांच्या मुलाला आणि पुतण्याला पैशाची लालच दाखवून सचिनने त्यांना गप्प केले होते.




तो प्रसंग आठवून सचिनचे अंग भीतीने शहारले. त्याला आता सगळं समजत होते. महेशला मारले अस समजून आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी या दोघांनी हा घाणेरडा खेळ केला होता.
" मी अजूनही सांगतो त्यांच्या खुनाचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता.." सचिन त्यांना कळकळीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला काही अर्थ नव्हता.
" संबंध नव्हता ? मग ती बंदूक तुमच्या रूममध्ये कशी सापडली ? बोल ! आकाशातून पडली का बंदूक ? आं ? " सुरेश रागाने पेटून उठला होता. सत्य परिस्थिती च्या समजून न घेता त्याने आणि दिनेश ने इतके मोठे कपट सचिनविरुद्ध खेळले होते.
" ठरवलं असत तर जेव्हा दिसला होता त्या दिवशीच तुला संपवला असता ! पण तुझ्या बापाच्या ओळखीमुळं तू वाचला ! तेव्हाच ठरवलं होतं तुला शोधून आणि जाळ्यात अडकवून संपवायचा..! " सुरेश कपटी भावनेने बोलला.
" तुम्ही सत्य माहीत नसताना इतका मोठा घात कसा करू शकता ? लाज वाटली पाहिजे तुम्हला ! " हेमंत रागाने ओरडला. तसा सुरेशने हेमंतच्या पायावर गोळी चालवली. पायावर गोळी लागताच हेमंत वेदनेने विव्हळत खाली पडला.
" तुम्ही...तुम्ही फार मोठी चूक केलीये...दिनेशने मित्र बनून घात केला आहे..तुम्ही काही चूक नसताना माझ्या प्रज्ञाला माझ्यापासून हिरावून घेतले..तुम्हाला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही ! " सचिन तळतळाटाने बोलला.
" कोण शिक्षा करणार आम्हाला ? कोण ? " दिनेश सचिनजवळ जाऊन उभा राहिला.
" माझा भाऊ महेश ने विनाकारण जीव गमावला..याचीच शिक्षा तुला आणि तुझ्या त्या प्रज्ञाला मिळाली ! " दिनेश संताप आणि दुःखाने ओरडत होता.
" जेव्हा माझा भाऊ गेला तेव्हाच ठरवलं होतं...तुला आणि प्रज्ञाला जिवंत सोडायच नाही ! यासाठीच इतक्या वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. " सुरेश रागाने बोलला.
" आणि त्यासाठीच हा सगळा प्लॅन केला ! परफेक्ट प्लॅन ! आणि या सगळ्यात आम्हाला सर्वात मोठी मदत झाली ती.." दिनेशने बोलायचं थांबून सचिनकडे पाहिले. पुन्हा कपटी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले.
" सुधाकरराव आणि किशोरीची...!! " दिनेश अस बोलताच सचिनला जमीन हल्ल्यासारखे झाले. त्याचे डोके आता फक्त फुटायचंच बाकी होत..हेमंत चीही तीच अवस्था होती..सचिनच्या अंगातले अर्धे प्राण आता निघून गेले होते. आता काहीही ऐकायच्या स्थितीत तो नव्हता. त्याला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. प्रज्ञाच्या मृत्यू पेक्षाही हा धक्का मोठा होता. सचिन शारीरिक आणि मानसिक वेदनेने विव्हळत तसाच जमिनीवर आडवा झाला. डोळ्यातील अश्रू ने चेहरा पूर्ण भिजून चालला होता. हेमंत कसाबसा उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्याही अंगात आता तेवढे प्राण शिल्लक नव्हते. खूप काही बोलायचे असूनही त्याला बोलत येत नव्हते.
" सगळ्यात पहिले शिमला मधून तुझ्या बापाची कुंडली काढून तुझा पत्ता लावला. ठरवलं असत तर घरात घुसून तुला संपवला असता. पण हे सगळं करून आम्हाला त्यात अडकायचं नव्हतं. आणि म्हणूनच एवढी परफेक्ट प्लांनिंग ! " सुरेश बोलत होता. मात्र सचिनच्या कानावर फक्त शब्द पडत होते. ते समजून घेण्याची त्याची ताकद कधीच संपली होती. दिनेश सचिन समोर उभा राहून या दूषकर्माची कहाणी सांगू लागला.
" आणि योगायोगाने माझी आणि प्रज्ञाचे वडील सुधाकर रावांची ओळख झाली..आणि तेव्हाच समजले की त्यांना प्रज्ञा पेक्षा किशोरी लाडकी होती..सगळेजण प्रज्ञाला विचारतात..प्रत्येक गोष्टीत तिच्या आधी प्रज्ञाचे नाव घेतलं जातं यामुळे किशोरीलाही प्रज्ञाबद्दल रोष होता..आणि तेव्हाच आम्ही यात सुधाकर राव आणि किशोरीला आमचा बदला पूर्ण करून घेण्यासाठी यात सामील करून घेतलं ! त्यांच्या मनात प्रज्ञा आणि सचिनबद्दल विष कालवून या प्लॅन मध्ये सहभागी करणं काही अवघड नव्हतं ! " दिनेश बोलून पुन्हा एकदा कपटी हसला. सुरेश ही त्याच्या हसण्यात सामील होत पुढची कहाणी सांगू लागला.
" आणि ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी किशोरी आणि सुधाकर रावांनी प्रज्ञाला पुण्याला बोलावले. ते ही उशिरा..त्याचवेळी तुम्हाला कारने उडवण्याचा प्लॅन होता..मात्र तुझ्या हुशारीमुळे तू वाचला , अस तुला वाटलं..पण यामुळे प्रज्ञाला अजूनच निर्घृण पणे मरावं लागलं. दिनेशने चपळाईने गाडी पलटवत प्रज्ञाला यमसदनी धाडले ! मात्र तू ह***र पुन्हा वाचला ! " सुरेश रूममधून चकरा मारत बोलला. हेमंत आणि सचिन अर्धवट शुद्धीत त्यांचे बोलणे ऐकत होते. मात्र ऐकण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते.
" आणि यामुळेच पुढचं रामायण घडवावं लागलं..तुला अडकवण्यासाठी हे जाळं टाकावं लागलं. " दिनेश बोलला.
" तुला पुरावा म्हणून काहीतरी मिळू शकत याची आम्हाला आधीपासूनच खात्री होती..म्हणूनच त्या लॉकेट पासून कपड्यांपर्यंत सगळंच आम्ही मेलेल्या माणसांच्या नावावर खरेदी केल ! ते ही कुख्यात गुन्हेगार जॉनीचा वेष घेऊन ! दुर्दैवाने ते लॉकेट तुझ्या हाती लागलं..पण तू तरी काय करणार ? ते लॉकेट ही काही महिन्यांपूर्वी मेलेल्या शैलेश जाधवच्या नावावर..! " दिनेश पुन्हा कपटी हसला.
" आम्हाला किशोरीकडून तुमच्या आणि राहुल मध्ये असलेले वाद ही समजले होते..याचाच फायदा घेत आम्ही तुझे लक्ष काही ना काही पुरावे देऊन त्या दोघांकडे वळवले ! आणि सारंग आणि राहुल वर तू शंका घ्यावी म्हणून च त्यांचा मित्र शैलेश जाधवच्या नावावर आणि सुरेशने जॉनी सारखी वेशभूषा करून खरेदी केले. " दिनेश पुन्हा हसला.
" ज्वेलरी शॉप मधून फुटेज मिळवण्यासाठी मला खोटा इन्स्पेक्टर व्हावं लागलं ! मिस्टर साळगावकर बनून ! " महेश जोरजोराने हसायला लागला. त्याला साथ देत दिनेशही त्या विकट हसण्यात सामील झाला.
" सर्व आधीच प्लॅन होत सचिन , हेमंत " दिनेश भिंतीला टेकून बसलेल्या हेमंत समोर वाकून गुडघ्यावर बसला.
" मी तुझ्यासमोर मुद्दामून आलो ! तुला खोटी ओळख दाखवून ! आणि तुम्ही यात पूर्णपणे फसले ! " दिनेश पुन्हा मोठ्याने हसला. हेमंत त्याच्याकडे वेदनेने कण्हत रागाने बघत होता.
" तुम्हाला सुरेशच्या आणि माझ्या नावावर असणाऱ्या हॉटेल मध्ये घेऊन जाणं हे ही पहिलेच प्लॅन ! " दिनेश हेमंत समोरून उठत उभा राहिला. त्याने सचिनकडे एक नजर टाकून सुरेश कडे पाहत त्याला इशारा केला. तशी त्याने खिशात ठेवलेली पिस्तुल बाहेर काढत सचिनच्या जवळ उभा राहिला. त्याने थेट सचिनच्या छातीवर पिस्तुल धरली. हे पाहून हेमंत आता काहीतरी करायलाच पाहिजे..सचिनला वाचवलेच पाहिजे..या विचाराने उठण्याचा प्रयत्न करू लागला.
" थांब..तुम्ही हे चुकीचं करताय..सचिन गुन्हेगार नाही..त्याला मारू नका ! " हेमंत ओरडून ओरडून त्यांना याचना करत होता. मात्र त्याचा काहीच उपयोग नव्हता.
" हेमंत..तू गुन्हेगार नाही..तुला मारायची आमची इच्छा नाही ! त्यामुळे गप्प बसून तुझ्या लाडक्या मित्राची नरकयातना बघ ! " दिनेश त्याच्याकडे बघून बोलला.
" अरे त्या बिचाऱ्या काव्याचा तरी विचार कर दिनेश ! ती कशी जगेल विना आई वडिलांची ? " हेमंत आता काव्याच्या नावाने तरी हे पापी थांबतील अशी अपेक्षा करत बोलला.
" तिला सांभाळायला किशोरी आणि तू आहेच की ! किशोरीचे वैर प्रज्ञासोबत होते , काव्याला ती आपल्या मुलींसारखच समजते..ती सांभाळेल तिला.." बोलताना दिनेश थोडा दुःखी झालेला दिसत होता. मात्र तो लगेच गंभीर झाला.
" संपव सुरेश आता हा खेळ ! शूट ! " दिनेश जमिनीवर अर्धवट बेशुद्ध पडलेल्या सचिनकडे पाहून बोलला. हेमंत पुन्हा कसातरी उठण्याचा प्रयत्न करू लागला. तसे दिनेशने खिशातून पिस्तुल काढत हेमंतच्या दिशेने गोळी चालवली. तीने थेट त्याच्या गुडघ्याचा वेध घेतला. तसा हेमंत खाली कोसळला. त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागल्याने तो बेशुद्धच व्हायचा बाकी होता. त्याआधी त्याच्या कानावर गोळी झाडल्याचा ' धाड्ड !! 'आवाज पडला. कसेतरी त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले.
सचिनच्या छातीतून घळाघळा रक्त वाहू लागले. त्याच्या रक्ताचे शितोडे त्याच्या चहूबाजूला पसरले.
" गेम ओव्हर ! " सुरेश आपल्या चेहऱ्यावर उडालेले रक्त हाताने पुसत पुटपुटला. सचिनने आपले प्राण त्यागले याची खात्री करून दिनेश मोठ्याने हसू लागला. आपल्या हातातील पिस्तुल खिशात ठेवत सुरेश दिनेश जवळ जाऊन उभा राहिला. दोघांनी एकमेकांकडे विश्वासाने बघत मिठी मारली.
" महेशला न्याय मिळाला सुरेश..न्याय मिळाला.." दिनेश जड आवाजात उद्गारला.
" आपण जिंकलो दिनेश ! जिंकलो ! " सुरेशने मिठीतुन लांब होत डोळ्यातील पाणी पुसले. त्याने हळूच सचिनकडे नजर टाकली. त्याने कधीच आपले प्राण त्यागले होते. त्यांनी सचिनला त्याच घराच्या बाजूला खड्डा करून त्यात पुरून टाकले. काही पुरावा राहू नये म्हणून त्यांनी पिस्तुल ही त्या खड्ड्यात पुरल्या..काही पुरावा राहणार नाही याची त्यांनी खात्री करून मग बेशुद्ध झालेल्या हेमंतवर प्रथमौपचार करून काहीही न कळू देता त्याच्या घरी पोहोचवले.
अशा प्रकारे सचिनचा शोध आणि दिनेश आणि सुरेशचा प्रतिशोध पूर्ण झाला होता..ज्या बदल्याच्या आगीत सचिन इतक्या दिवस जळत होता , त्याच आगीत जळून तो भस्म झाला होता. ज्याचा शोध तो इतक्या दिवसांपासून घेत होता , ते त्याला सापडलं होत. पण त्यानेच त्याचा घात झाला होता. त्याचा शोध पूर्ण झाला होता. पण प्रतिशोध नाही ! दुसरीकडे हेमंत ज्याने त्याला मित्राच्या नात्याने पूर्ण मदत केली होती. त्यालाही अतोनात दुःख भोगावे लागले होते. प्रज्ञाला अजूनही खरा न्याय मिळाला नव्हता. ज्या महेश च्या खुणापासून हे सगळं सुरू झालं होतं ते एका निष्पाप जीवांच्या हत्येने समाप्त झालं होतं. पण खरं खुनी अजूनही सापडलेला नव्हता ! त्याचा शोध कोणालाच लागलेला नव्हता ! आणि कदाचित लागणारही नव्हता..!!


सहा महिन्यांनंतर....


सचिनच्या हत्येनंतर काव्याला सांभाळण्याची जबाबदारी हेमंतने घेतली होती. किशोरीच्या वगण्यामुळं त्याने काव्याला तिच्याकडे न ठेवता स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सचिनच्या सोबत असूनही त्याला वाचवू न शकल्याची खंत अजूनही त्याच्या मनात कायम होती. पोलिसात जाऊन दिनेश आणि सुरेश विरुद्ध तक्रार देण्याचाही विचार त्याने केला. मात्र त्याला आता ते नको होते. त्याला आता प्रज्ञाचे स्वप्न पूर्ण करायचे होते. काव्याला शिक्षिका बनवण्याचे..त्यासाठी तो पूर्ण प्रयत्नशील होता.

" मला अभिमान आहे बेटा तुझा ! महेश नंतर तू ज्या प्रकारे ह्या हॉटेल ची प्रगती केली आहे ती अविश्वसनीय आहे ! " दिनेश त्याचा मुलगा प्रणित च्या खांद्यावर थोपटत त्याचे कौतुक करत बोलला.
" मी तुम्हाला आधीच बोललो होतो पप्पा..मला हे हॉटेल सांभाळायला द्या..पण महेश काकांनी ऐकले नाही..नाहीतर आज अजून प्रगती केली असती आपण.." प्रणित काहीशी नाराजी दाखवत बोलला.
" काय बोलतोय प्रणित ! महेश असता तर आज हे हॉटेल शिमल्यातील बेस्ट हॉटेल राहिले असते ! ते च आता तूला करायचंय..मला विश्वास आहे तुझ्यावर.." दिनेश महेश च्या आठवणीने दुखावला मात्र त्याने प्रणितचे कौतुक ही केले.
" महेश असता तर तुझ्यावर इतक्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी आली नसती पण.."
" पप्पा...मी ही जबाबदारी पार पाडायला पूर्णपणे तयार आहे..मला हे हॉटेल प्रचंड आवडते..आणि याची जबाबदारी घ्यायला मला कधीही आवडेल..त्यासाठी मी काहीही करेल ! काहीही ! " प्रणित हसत बोलला.
दिनेश त्याच्याकडे विश्वासाने बघत केबिनच्या बाहेर निघून गेला. प्रणित मात्र मनोमन हसतच होता.
" मी या हॉटेल साठी काहीही करू शकतो पप्पा..काहीही ! महेश काकांचा जीव ही घेऊ शकतो ! " प्रणित स्वतःशीच पुटपुटत मोठ्याने कपटीपणाने हसला. त्याचे विकट हसू केबिनमध्ये सगळीकडे घुमत होते.

*******************************
समाप्त
*****************************