Bhutacha Wada in Marathi Thriller by संदिप खुरुद books and stories PDF | भुताचा वाडा

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

भुताचा वाडा

भुताचा वाडा

परीक्षा संपून मी खुप दिवसांनी गावाकडे आलो होतो. त्या काळी मोबाईल सर्वांकडेच नसायचा. गावातील एखाद्याकडेच असायचा. त्यामुळे सर्वजण एकत्र जमून पारावर गप्पांची चांगली मैफल रंगायची. असेच रात्री नऊ वाजता आम्ही मित्र मारुतीच्या पारावर गप्पा मारत बसलो होतो. लाईट गेली होती, सगळीकडे अंधार होता. बोलता-बोलता गण्यानं जगन सावकाराचा विषय काढला. गावाच्या पूर्व बाजूला जगन सावकाराचा टोलेजंग, चिरेबंदी वाडा होता. त्या भल्यामोठया वाडयामध्ये तो एकटाच राहत होता. गावातील जवळ-जवळ सगळयांकडेच त्याचे पैसे होते. गावातले लोक त्याला गुलामासारखे वाटत होते. तो वसुलीच्या नावाखाली सर्वांना त्रास द्यायचा. पण एके रात्री दरोडेखोरांनी त्याला वाडयातच मारुन टाकले व त्याचा मृतदेह वाडयातीलच आडात फेकून दिला. सावकार वाडयात एकटाच राहत होता. शिवाय हा वाडा गावापासून थोडया दूर अंतरावर होता.त्यामुळे दोन-तीन दिवस सावकार मेल्याचे कोणालाच कळाले नाही. एके दिवशी धनगराचा चक्या वाडयाजवळ मेंढया व शेळया चारत होता. तेवढयात एक शेळी वाडयामध्ये शिरली. शेळीला बाहेर काढण्यासाठी ता वाडयात गेला. आतमध्ये गेल्यावर त्याला दुर्गंध येऊ लागला.त्यानं आडात डोकावून पाहिलं, तर त्याला सावकाराचा कुजट मृतदेह दिसला. त्यानं पळत येवून गावकऱ्यांना ही बातमी सांगीतली. सावकार मेला म्हणल्यावर आपले पैसेही वाचले, व जमीनीही वाचल्या. यामुळे गावातील बऱ्याचशा लोकांना आनंद झाला. सावकाराच्या मृतदेहाचा खुप वास येत असल्याने सर्वांनी मिळून त्याला त्या आडातच पुरुन टाकले. ही घटना जवळ-जवळ आमच्या जन्मापूर्वी आजपासून तीस वर्षापुर्वीची होती. पण आजही त्या वाडयात सावकाराचा आत्मा आहे,असे वडीलधारी माणसं, गावकरी बोलत असत. भुताच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या.

माळयाचा बाल्या सांगु लागला,

“आमचा आज्जा तर भुताबरं कुस्ती खेळायचा, भुतास्नी चितपट करायचा.” सच्या बोलु लागला,

“मी एकदा तालुक्याहून आलो होतो. तवा मला पुलावर एक हाडळीन दिसली होती. मी देवाचं नाव घेत पळालो म्हणून वाचलो.”

मी म्हणलो, “माझा काय भुताबितावर विश्वास नाही ब्वा.”

तेवढयात गण्या म्हणाला, “मग लावतो का पैज?”

मी म्हणालो, “मी काय भितो काय, सांग काय करु ते?”

तेवढयात सच्या म्हणाला, “तर मग ऐक, उद्या आमावस्या आहे. आम्ही एक रुमाल त्या भुताच्या वाडयात ठेवणार. तु तो रुमाल आमावस्याच्या रात्री एकटयानेचव वाडयात जावून आणायचा.”

मी मागचा-पुढचा काहीच विचार न करता म्हणालो, “एवढच, तर मग हयो पठ्ठया तुम्हाला तो रुमाल आणूनच दाखवीन.”

सन्या म्हणाला, “आरे, वेडा आहेस तु. पैज नको लावु, पंधरा दिवसांपुर्वी त्या वाडयाचा कोणी वारस नसल्याने आमदाराने कागदावर काही तरी काळं-पांढरं करुन तो वाडा स्वत:च्या नावावर केला होता. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो आमदार झटका येऊन मेला.”

मी म्हणालो, “ तो योगायोग असु शकतो.”

सन्या वैतागुन म्हणाला, “कर मग तुला काय करायचे ते.”

मी म्हणालो, “मी लावणारच पैज मी भितो काय?”

दहा- पंधरा माणसांमध्ये मी पैज स्विकारली होती. आता माघार घेता येणार नाही हे मला माहित होते. त्या रात्री सगळेजण आपापल्या घरी गेले.

माझ्या घराकडे जायला अंधारच होता. मी भितभितच देवाचं नाव घेत घराकडे गेलो. जेवण करुन बिछान्यावर अंग टाकलं. पण काही केल्या मला झोप येईना. लहाणपणापासून मी त्या वाडयाबद्दल ऐकत आलो होतो. पण एवढया जणांमध्ये मी उगाचच फुशारकी मारली होती. आता मला पश्चाताप होत होता. पण मी गेलो नाही तर सगळेजण मला भेकड म्हणतील. त्यामुळे आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते होईल. असा विचार करुन मी झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकरच उठलो. अंघोळ करून गावातील सर्व मंदिरात पाया पडायला गेलो. भुतापासून संरक्षण करा, म्हणून सर्व देवांना प्रार्थना केली. सगळयाच देवळातला थोडा-थोडा अंगारा पुडीत बांधून खिशात ठेवला. मारुतीरायाचा लहानसा फोटो पाकीटात ठेवला. भुत आहे का नाही, हे काहीच माहीत नाही. पण आता असलं तरी मी अंगारा, देवाचा फोटो सोबत घेतला होता. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही, असा मी मनालाच धीर दिला. दिवसभर माझं मन कशातच लागलं नाही. आता रात्री काय होईल? याचाच विचार त्याच्या मनात येत होता.

दिवस मावळला, कामावर गेलेली माणसं आपापल्या घरी परतली, पाखरं दाही दिशा हिंडून–फिरुन आपापल्या घरटयाकडे आली. पाखरांची पिलं, माणसांची लेकरं, शेळयांची करडं, आपापले आई-बाप घरी आल्यानं आनंदून गेले. घरोघरी चुली पेटल्या. आया-बाया भाकरी कालवणाच्या तयारीला लागल्या. लेकरांना भुका लागल्यानं लेकरं जेवायला वाढण्याची वाट पाहत चुलीजवळच ताटं घेवून बसले. दिवसभर थकले भागलेले जीव कधी एकदा तुकडा खातोय अन् कधी अंग टाकतोय या विचारातच होते. सगळे जण आपापल्या परीनं काहीना काही करत होते. माझ्या मात्र तोंडचं पाणीच पळालं होतं.आईनं माझ्या आवडीची गवारची भाजी, बाजरीची भाकरी केली होती. सोबतीला ठेचा अन् कांदा होताच. तोंडी लावायला भाजके शेंगदाने अन् बाजरीची पापडी,लिंबाचं लोणचं, खोबऱ्या आंब्याची गोड कैरी असे शेलके आयटम होतेच. मात्र माझं जेवणात लक्षच लागेना. कदाचित,हे माझं शेवटचं जेवण ठरु नये असं मला वाटु लागलं. रात्रीचे नऊ वाजले असतील, मी जेवणच करत होतो. तेवढयात, चव्हाणाचा बारका चम्या मला बोलवायला आमच्या घरी आला. त्याला पाहताच मला यम बोलवायला आल्यासारखे वाटले. कारण, माझ्या लगेच लक्षात आलं. पोरांनीच त्याला मला बोलावण्यासाठी पाठवलं होतं.

तो म्हणाला, “संदीप दादा, तुला सचिन दादाने बोलविलंय चावडीवर लौकर ये”,

मी त्याला येतो म्हणून सांगीतलं. तो उडया मारतच चावडीकडे पळाला. लहान मुलांना मोठया मुलांमध्ये राहायची खुपच आवड असते. त्यांना हाकलून लावलं तरी ते येतातच, कारण त्यांना माहीत नसलेले विषय मोठया मुलांकडून त्यांना माहीत होतात. त्यामुळे मोठी मुले जे काम सांगतील, ते काम हे चिल्लेपिल्ले चुटकीसरशी करतात. चम्या पण त्यातीलच होता. तो पाचवीलाच होता. पण त्याचे सगळे मित्र आमच्याच वयाचे होते.

मी कसंतरी जेवण केलं, आणी बॅटरी घेवून पाराकडे निघालो. बाहेर काळोख दाटला होता. मला पावलं जड झाल्यासारखे वाटत होते. पुढं जावसं वाटेना. पण नाही गेलो तर सगळे भेकड म्हणतील, या विचाराने मी पारावर आलो. त्याठिकाणी बरीच गर्दी जमली होती. गावातल्या जवळ -जवळ सगळयाच पोरांना मी भुताच्या वाडयात जाणार आहे म्हणून माहीत झालं होतं. चिल्ले- पिल्ले, तरुण पोरं एवढचं काय काही म्हातारे पण पारावर जमा झाले होते.

“शनी आमावस्या हाई आज, कशाला पैज लावली कायकी हयानं, आता हे काई वापस येत नाही, कुठं पण डेरींग करीत असत्येत काय?” अशी कुजबुज माझ्या कानावर पडली. पण आता माघार घ्यायचीच नाही असं मी मनोमन ठरवलं.

सर्वजण मला वेशीपर्यंत सोडवायला आले. नित्याप्रमाणे आजपण लाईट गेलेलीच होती. सगळीकडे दाट काळोख होता. एका हातावरील अंतरावरलंही दिसेनासं झालं होतं. वाडयामध्ये गेल्यावर कामाला येईल म्हणून मी मुद्दामचं बॅटरी घेतली होती. वेशीजवळ गेल्यावर सुद्धा काहीजण मला, “नको जाऊ फुकट मरशील”, म्हणत होते. पण आता माघार घेणार घ्यायचंच नाही असं ठरवून मी त्या भुताच्या वाडयाकडे निघालो.

गावापासून मी बरेच अंतर दूर आलो होतो. जस-जसा वाडा जवळ येऊ लागला तसं-तसं माझं हदय जोरजोराने धडकु लागलं. मी खुप घाबरून गेलो. माझ्या पावलावर कोणीतरी पाऊल ठेवून माझ्या मागेच येत आहे, असा मला भास झाला. बॅटरी चमकून मी मागं वळून पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. मी देवाचं नाव घेत-घेत पुढं चालू लागलो. गाव मागे पडलं होतं. गावातली कुत्री विव्हळण्याचा आवाज तेवढा कानी येत होता. सोसाटयाचा वारा सुटला होता. घोंगावणारा वारा माझ्या विरुद्ध दिशेने होता. त्यामुळे मला जोर लावून चालावं लागत होतं. तो वारा जणू मला परत जा म्हणून बजावत होता. तरीही मी देवाचं नाव घेत वाडयाच्या दिशेनं निर्धाराने चालतच होतो.

मी वाडयाजवळ आलो. वाडयातल्या डेरेदार वडाच्या झाडाच्या पानांचा सळासळाट माझ्या कानी आला. जणु काय तो वड माझी वाटच पाहत होता. दिवसा भिती वाटावी, असा तो वाडा आणी त्या वाडयाजवळ मी आमावस्याच्या काळोख्या रात्री आलो होतो. मी अंगाऱ्याची पुडी खिशात चाचपून पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं, अंगाऱ्याची पुडी, आणी मारुतीचा फोटो ठेवलेलं पाकीट मी गडबडीत टेबलवरच विसरलो होतो. आता मात्र माझे हातपायच गळाले. तरीही देवाचं नाव घेत उसनं आवसान आणून मी त्या चिरेबंदी वाडयाचं जाडजूड लोखंडी गेट ढकललं. तसा त्या भल्यामोठया गेटचा कर्र्कर्र् असा आवाज झाला. वाडयामध्ये पाऊल टाकताच एक जोराची वावटळ माझ्याच दिशेनं आली. माझं हदय जोरजोरानं धडधडायला लागलं, माझं सर्वांग थरथरायला लागलं. वावटळ माझ्या अंगावर येवून मला झटका देवून निघून गेली. नक्कीच त्या वावटळीत त्या सावकराचं भुत असणार, या विचारानं माझं अंग शहारून गेलं.

मी सावधगिरीनं एक-एक पाऊल टाकत पुढे चालु लागलो. एवढया मोठया वाडयात रुमाल कोठे ठेवला, हेच विचारायचं मी विसरुन गेलो होतो. मी चालत-चालत सावकराला पुरलेल्या दगडी आडाजवळ आलो. कदाचित रुमाल त्या आडामध्ये ठेवला असेल, असा तर्क करून मी आडामध्ये बॅटरी चमकवली. तेव्हा त्या आडामध्ये कोणाचे तरी डोळे चमकताना मला दिसले. माझ्या अंगाचं पाणी-पाणी झालं. मी मोठमोठयानं ओरडु लागलो. पळावं तर पायात आवसानच राहीलं नाही. तेवढयात एक काळंझ्यार मांजर त्या आडातून बाहेर आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, या मांजराचेच डोळे चमकले होते. ते मांजर निघून गेल्यावर त्या आडामध्ये मी बॅटरी चमकवली. रुमाल काही दिसला नाही. मी मनाशीच पश्चाताप करत होतो. निदान तो रुमाल कुठे ठेवला आहे, ते तरी विचारायला पाहिजे होते. बहुतेक तो रुमाल कुठल्यातरी खोलीतच लपवला असणार, असा अंदाज बांधून मी पुढे-पुढे चालु लागलो. एकामध्ये एक अशा सात दगडी खोल्या होत्या. हे मी मित्रांसोबत यापुर्वी दिवसाच वाडयात येवून गेल्यामुळे मला माहित होतं. मी पहिल्या खोलीमध्ये भितभितच गेलो. खोलीमध्ये सगळीकडे बॅटरी चमकवली. भिंतीतल्या लाकडी कपाटात, माळवदाला वटवाघुळं लटकलेले होते. वटवाघळं माझ्या अंगावर येवून परत दिशा बदलून जात होते. मी शांतपणे एक-एक पाऊल पुढे टाकत खोलीचे कोपरे, दिवळया, कपाटामध्ये रुमाल शोधु लागलो.

रुमाल शोधत-शोधत मी पाचव्या खोलीमध्ये आलो. मी एका कपाटात बॅटरी चमकावली. मला आनंद झाला, कारण मला मित्रांनी ठेवलेला लाल रुमाल दिसला होता. मी झपाटयाने कपाटाकडे जावून तो रुमाल हातात घेतला, बघतो तर काय? अडीच-तीन फुटाचा लाल भडक साप माझ्या हातात. त्या सापालाच मी रुमाल समजून चुकलो होतो. मी भितीनं पटकन तो साप खाली फेकला. भितीमुळं माझ्या हातातील बॅटरी पण खाली पडून बंद झाली. आता सगळीकडं अंधार होता. समोरचं काहीच दिसेना. आता दुहेरी भिती निर्माण झाली होती. एकीकडून भुत आणी एकीकडे साप. कारण, आता मी फेकलेला साप अंधार असल्यामुळं मला दिसेना. आता कधी माझा त्याच्यावर पाय पडेल, आणी कधी तो मला डसेल सांगता येत नव्हतं. मी देवाचं नाव घेत त्याच जागेवर थोडा वेळ उभा राहिलो. थोडया वेळानं साप गेला असेल, असा विचार करुन जपूनच एक-एक पाऊल पुढे टाकू लागलो. सर्वत्र अंधार असल्यामुळे मी नेमका कुठे चाललो हे मला काही कळेना. पण अंदाजाने भिंतीला चाचपडत मी कसा तरी सहाव्या खोलीपर्यंत आलो. देवाचं नाव घेतच मी कसेतरी कपाट तपासले.रुमाल सापडला नाहीच.

आता शेवटची खोली उरली होती. एवढया अडचणींचा सामना करत इथपर्यंत आलो, आता तरी रुमाल सापडु दे. अशी मी देवाला मनोमन प्रार्थना केली. मी शेवटच्या खोलीमध्ये प्रवेश केला, खोलीमध्ये कोणीतरी असल्याची चाहूल मला लागली.तेवढयात माझ्या बाजूलाच कोणीतरी उभे आहे हे मला स्पष्ट जावणले. मी हळूच हात पुढे केला तर माझा हात कोणत्यातरी पुरुषी देहाला लागल्याचे माझ्या लक्षात आले. तेवढयात, कोणीतरी अगदी माझ्याजवळ कर्कश ओरडायला लागलं. बहुतेक दोन भुतं होती. माझ्याजवळच कर्कश आवाजात ओरडत होती. आता मात्र मी वाचत नाही, या विचारात मी मोठयानं ओरडायला लागलो. ती दोन भुतं अंदाजानं माझ्या जवळ हाताच्या अंतरावरच होती. मी प्रतिकार करण्यासाठी जोरजोरानं देवाचं नाव घेत हात-पाय फिरवु लागलो. तर खरचं माझी एक बुक्की एका भुताच्या तोंडावर बसली. तसं ते भुत मोठमोठयानं ओरडायला लागलं. ते भुत सच्याच्या आवाजात का ओरडतयं मला काही कळेना. तेवढयात कुणीतरी बॅटरी लावली. तेव्हा माझ्या लक्षात आलं हे भुत नसून माझे मित्र सच्या आन् शश्या आहेत. तेव्हा माझ्या जिवात जीव आला. आम्ही तिघजण एकमेकांकडे पाहून हसू लागलो.

आम्ही तिघेजण हसत-हसतच वाडयाच्या बाहेर आलो. वेशीजवळ

पोरं आमची वाटच पाहत उभे होते. शेवटी सर्वांनी मी पैज जिंकल्याचे मान्य केले.