Saubhagyavati - 30 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | सौभाग्य व ती! - 30

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

सौभाग्य व ती! - 30

३०) सौभाग्य व ती !
जून महिन्याची सकाळ. बाहेर पाऊस पडत होता. पावसाळा तसा अगोदरच सुरू झाला होता त्यामुळे अनेक महिन्यांपासून तापलेली धरित्री सुखावत होती आणि जणू चित्कारत होती. अनेक महिन्यांच्या वियोगानंतर ज्या आवेगाने पतीच्या मिठीत शिरावे त्याप्रमाणे व्याकुळ झालेली पृथ्वी जलधारांना आत खोलवर सामावून घेत सुखावत होती. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती...
सकाळी कार्यालयात जावे आणि थकलेली प्रवासभत्त्याची देयके काढून घ्यावीत असे ठरवून रात्री झोपलेला बाळू सकाळी जागा झाला तोच मुळी पावसाच्या आवाजाने. सुखाची संवेदना जाणवली आणि कार्यालयात जाण्याचा रात्रीचा निश्चय बदलला. तशा सुंदर, मदमस्त वातावरणात घरीच त्या गुलाबी वातावरणात मीनासोबत मस्तपैकी वार्तालाप करावा असा एक विचार त्याला सुचला आणि त्याच्या शरीरात एक वेगळीच संवेदना शिरली. तितक्यात दाराशी वर्तमानपत्र टाकल्याचा आवाज आला. काहीशा अनिच्छेने परंतु ते वाचण्याच्या नियमित सवयीमुळे त्याने दार उघडून वर्तमानपत्र उचलले. दार बंद करून आत येत असताना बाळूने पहिल्या पानावरील ठळक बातम्यांवरून नजर टाकली. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापलेल्या त्या फोटोने त्याचे लक्ष वेधले. फोटो खालील बातमी वाचून बाळू अत्यंत आनंदाने ओरडला,
"मीना... ए, मीना. लवकर ये..."
"काय झालं? अजून बरोबर ऊठला नाहीत तर लागलात धावा करायला. काय पाहिजे? तोंड धुवा. चहा ठेवत..."
"थांब जरा. असं मीनाक्षी एक्सप्रेसप्रमाणे धावू नकोस. बघ तर... आनंदाची बातमी आहे. नयनचा फोटो आलाय. तिला राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालाय. नगरपालिकेकडून तिचा भव्य सत्कार होणार आहे."
"वा! वा! सकाळी-सकाळी खूप आनंदाची बातमी मिळाली."
"मी ऑफिसात जातो. बिलाचे बघून नयनला फोन लावतो..."
"अशा पावसात तुम्ही जाणार? बिलावाचून काही अडलेय का? मिळेल की आज ना उद्या. नयनला फोन करायचा म्हणत आहात पण तिला सुट्ट्या आहेत ना, मग नयन शाळेत आली असेल का?"
"अग पावसाचा जोर कमी होतोय. मी जागा झालो तेव्हा कसा मुसळधार पाऊस होता आणि आता बघ किती कमी झालाय. सुट्ट्या असल्या तरी नयन रोज सकाळी अकरापर्यंत शाळेत असते. महत्त्वाचे टपाल पाहायला आणि इतर कामांसाठी ती दररोज शाळेत येते."
"तुम्ही म्हणताय ते खरे आहे. बघा ना. सकाळी उठले तेव्हाचा पाऊस पाहून वाटले होते, नक्कीच चार पाच दिवसांची झड लागेल. तुमची रस्ता दुरूस्तीची कामे बंद होतील. तेव्हा... तेव्हा..."
"काय गं? काय विचार आहे?" असे विचारत बाळूने मीनाला पकडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात विठाबाईचा आवाज आला,
"बायसाब..." बाळूला अंगठा दाखवत मीनाने दार उघडले. भर पावसात अंगावर मेणकापड घेऊन विठाबाई उभी होती. कापड बाहेर ठेऊन ती आत येत म्हणाली,
"म्हणलं पानी पडत्ये तव्हा तुमी उठल्या का न्हाई? काय सांगावं बाप्पा कसं पानी व्हत? फाटे फाटे सुरू झालेला पाऊस पाहून म्या इच्चार केला चार-सा दिस झड ऱ्हाती का काय पर आता बगा तर चक्क उजाडलं हाय, ऊन बी पडतय. देवाच बी काही खरं ऱ्हायल न्हाई. त्येचं तरी काय चुकत्ये म्हणा, आपुन मान्सच चुकतो. त्यो सजा देणारच. पाणी पडलं तर बी कट्टाळा येतो, न्हाई पडलं तर जीव कासाईस बी व्हतो. बाहीर असंच ऊन ऱ्हायलं ना तर देरीने ऊठणाऱ्या मान्साला पाऊस पडल्याच खोट्ट वाटल बगा..." विठाबाईची टकळी थांबावी म्हणून बाळूने पेपर तिच्यासमोर धरून नयनचा फोटो दाखवत विचारलं,
"विठाबाई, या फोटोतली बाई कोण आहे गं? ओळखले का?"
"ह्यो फोटू व्हय? बाळासाब, मी येडी वाटली का खुळी? अव्हो, आर्ध्या राती बी मी तायसाबाला वळखीलकी. पर मला एक सांगा, पेपरात फोट कामून आला हाय? सम्द ठीक हाय ना?"
"विठा, अग आनंदाची बातमी आहे. तुझ्या तायसाबाला मोठ्ठ बक्षीस मिळालय. दोन दिवसांनी अमरावतीला तिचा फार मोठा सत्कार आहे. "
"बाळासाब, तुम्ही म्हणता ते सम्द डोस्क्यावरून चाललय बगा. फकस्त लई आनंदाची बातमी हाय येवढंच गावल. हे पाच रूपै घ्या आन पेडा आणा बर. लै चांगली बातंमी सांगली बघा..."
"विठा, तू कशाला पैसे देतेस? मी पेढे आणणारच आहे..."
"तुम्ही मोठे मान्स, तुमी किलोभर आणशाल पर म्या गरीब आसली तरी त्येंची मोठी भन हाय. तव्हा न्हाई म्हणू नका. अव्हो, तव्हा लै सोसलं वो त्या कवळ्या पोरीने. या-या डोळ्यांनी फायलं. तव्हा वाटायचं हे डोळे फुटाव..." असे म्हणत विठाबाईने डोळ्याला पदर लावला. बाळूने घड्याळ घेतले व तो म्हणाला,
"दहा वाजत आहेत. जाईपर्यंत ऑफिसही सुरू होईल आणि नयनही शाळेत येईल. मी अर्ध्या तासात येतो. नयनलाही फोन लावतो."
"बाळासाब, मला लै बर वाटलं आस्स तायसाबास्नी सांगा."
"सांगतो..." असे म्हणत तो ऑफिसात पोहोचला. देयकाचे काम मार्गी लावून त्याने नयनला फोन लावला तर तिचा फोन सारखा 'व्यस्त' येत होता.
शेवटी एकदाचा तिकडून आवाज आला, "हॅलो..."
"नयन, मी बाळू..."
"बाळू, सगळे ठीक आहे ना?" शंकित मनाने नयनने विचारले.
"इकडे मस्त आहे. सकाळी वर्तमानपत्रात तुझा फोटो आणि बातमी पाहिली. खूप-खूप आनंद झाला सर्वांना. अभिनंदन! नयन, अगं विठाबाईलाही खूप आनंद वाटला. तिने पेढे आणण्यासाठी पाच रुपये दिले..."
"बाळू, तुमचे आभार. विठाला नमस्कार आणि खुशाली सांग. तसं काल सायंकाळीच समजलं होतं. आज सकाळी पेपरमध्ये फोटो पाहून घरी कुणाचाही आनंदाचा, कौतुकाचा शब्दही नाही. शाळेत आल्यापासून सारखे फोन येताहेत. परंतु प्रेमाचा, आपलेपणाचा फोन तुझाच. बाकीचे कर्तव्यपूर्तीचे! तुझे, मीनाचे, विठाबाईचे आभार! आणखी एक आनंदाची बातमी आहे. अरे, आपल्या माधवीला पसंती आलेय. माझ्या शाळेतील गायतोंडे भाऊ आहेत ना, त्यांचा पुतण्या इंजिनियर आहे. त्याने आपण होऊन मागणी घातलीय. बोलाचाली, सत्कार एकाच दिवशी आहे. येशील तू?"
"नैने, येशील म्हणजे? हे काय विचारणं झालं. तुझा सत्कार आणि माधवीच्या आनंदाच्या क्षणी मी आणि मीना नक्कीच येऊ. तू काळजी करू नकोस, ठेवतो आता." असे बोलून बाळूने फोन ठेवला.
शेजारच्या हॉटेलातून एक किलो पेढा आणि वेगळे पाच रूपयाचे पेढे घेवून तो घरी परतला. कामं संपली असली तरीही घरी विठाबाई त्याची वाट पाहत होती. त्याला बघताच विठाने विचारले,
"भेटल्या का व्हो बायसाब? काय म्हण्ल्या? मझा निरोप सांगला का?"
"अग, हो... हो... भेटली. तुझा निरोप सांगितला. खूप खुश झाली. आणखी एक आनंदाची बातमी आहे. माधवीला पसंती आलीय..."
"काय? छकुलीचं लगीन? अवो ती एवढीशी बाळी आणि तिच लगीन..."
"विठा, आता ती बाळी राहिली नाही तर सोळा वर्षांची झालीय. बघ आमचा दिलीप दहा वर्षांचा होतोय..."
"किती खुशीचा दिवस आहे आजचा! एकामागे एक आनंदाच्या बातम्या येताहेत." मीना म्हणाली.
"साहेब हात का?" तितक्यात बाहेरून कुणीतरी आवाज दिला.
"कोण आहे?" असं विचारत बाळू बाहेर आला.
"बाळासाब?" गड्याने विचारले.
"हो मीच. बोल..."
"चला बिगीन चला. तुमाला मालकानं बलवलं हाय."
"तू कोण? तुझे मालक कोण?" बाळूने असमंजसपणे विचारलेः
"अव्हो, सदाशिवरावाचा निरोप हाय..."
"का...य? त्यांनी मला बोलावलंय ? नीट ऐकलेस का?"
"व्हय मालक. मालकानं तुमास्नी बलीवलं हाय..."
"बरे, येतो म्हणून सांग..." बाळू म्हणाला आणि तो गडी निघून गेला.
"कोण होते हो?" मीनाने विचारले.
"अग, सदाशिवने बोलावले आहे मला." बाळू म्हणाला.
"सदाशिवने बोलावले? कशाला? आता त्याला काय गरज पडली? आता तर कुठे नयनच्या जीवनात चांगले दिवस यायला सुरूवात झालीय. त्यात या माणसाची दृष्ट कशाला?"
"अग, पण पाहू तर दे काय म्हणतोय ते? मागे दुकानात भेटला तेव्हाही त्याने बोलायचा प्रयत्न केला होता..."
"मालकीन, बाळासाबांना जाऊ द्या. फाहू तर काय सांगणार हाय ते समजू तर द्या..."विठा म्हणाली. तसा तयार होऊन बाळू बाहेर पडला...
००००